Friday, December 21, 2018

गाडगेबाबा

 गाडगेबाबा

महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास अशी एक मोठी परंपरा महाराष्ट्रात होऊन गेली. ज्ञानेश्वरांनी रचलेल्या संतपरंपरेच्या पायावर जे विशाल देवालय उभे राहिले, ज्याचा कळस तुकोबांनी उभारला, त्या महादेवालयाच्या कळसावर फडकणारी विवेकाची पताका म्हणजे संत गाडगे महाराजांचे जीवनकार्य होय. जगाच्या इतिहासात असा महात्मा झाला नाही. पुढे व्हावयाचा नाही. 20 डिसेंबर 1956 रोजी या संत पुरुषाने जगाचा निरोप घेतला. आज त्यांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांचे हे कृतज्ञ स्मरण... नव्या पिढीला काही शिकवणारे... काही सांगणारे... विवेकाच्या दिशेने घेऊन जाणारे!
आधुनिक काळातील संत शिरोमणी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या गाडगेबाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव नावाच्या गावात झाला. झिंगराजी व सखुबाई यांच्या पोटी 13 फेब्रुवारी 1876 रोजी त्यांचा जन्म झाला. तो दिवस महाशिवरात्रीचा होता. बाबांचे नाव डेबूजी असे ठेवण्यात आले. डेबूजी झिंगराजी जानोरकर हे त्यांचे पूर्ण नाव. झिंगराजी शेतकरी होते. शेती करून ते आपली उपजीविका करत. त्यांची परमेश्वरावर नितांत श्रद्धा होती. त्यांचे अकाली निधन झाले. वडिलांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या आईने त्यांना आपल्या माहेरी म्हणजे दापुरे या गावी आणले. गाडगेबाबांचे मामा मोठे कर्तबगार पुरुष होते. त्यांच्याकडे राहूनच डेबूजी हळूहळू मोठा होऊ लागला. सकाळी लवकर उठून प्रथम गुरांचा गोठा साफ करावा, भाकर्‍या खाव्यात, दुपारच्या जेवणासाठी कांदा-भाकरी सोबत घ्यावी, गुरे चरून झाल्यावर त्यांना पाणी पाजून झाडांच्या सावलीत उभे करून जेवण करावे आणि एखाद्या वृक्षाखाली ‘राम कृष्ण हरी! जय जय राम कृष्ण हरी!’ भजन गात विश्रांती घ्यावी. रात्री गावात भजन चाले, तिकडे जाऊन भजनात बसावे, असा त्यांचा बालपणीचा दिनक्रम होता. बालपणातच त्यांचे मन माणुसकीने भरून आले. आंधळे, पांगळे, लंगडे, लुळे, कुष्ठरोगी यांच्याविषयी त्यांच्या मनात कळवळा निर्माण झाला. ते त्यांच्यासाठी जे जे शक्य ते ते करू लागले. वयाच्या सोळाव्या वर्षी त्या काळातील प्रथेनुसार डेबूजीचे लग्न करण्यात आले. पुढे सावकाराने मामांचे शेत लुबाडले. त्या धक्क्याने मामा वारले. मामाच्या माघारी सावकाराने डेबूजीस मारण्यासाठी गुंड पाठवले. पण डेबूजी अंगापिंडाने मजबूत होता. त्याने त्या गुंडांना पिटाळून लावले.
डेबूजीस एक कन्या झाली. एक पुत्ररत्न झाले.दुर्देवाने मुलगा बालपणीच मरण पावला. पुढे एका अज्ञात विभूतीच्या हाकेला ओ देत 1 फेब्रुवारी 1905 या दिवशी पहाटे तीन वाजता डेबूजी घराबाहेर पडले आणि जगाच्या संसाराला लागले. सर्वस्वाचा त्याग करून डेबूजी काटेरी मार्गाने समाजहितासाठी चालू लागले. अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या, कानाला अडकवलेली बांगडी आणि एका हातात काठी, दुसर्‍या हातात गाडगे घेऊन गाडगेबाबा गावोगाव फिरून स्वच्छता करू लागले. सायंकाळी कीर्तन करू लागले. गाडगेबाबांचा हा वैरागी अवतार अनेकांना विचित्र वाटे. लोक त्यांना वेडा समजत. भिकारी समजत. गाडगेबाबा गावोगाव जाऊन स्वच्छता करीत. सायंकाळी तिथल्याच एखाद्या नदीकाठी, एखाद्या वृक्षाखाली, कीर्तन करीत. कीर्तन करायला त्यांना मंदिर लागत नसे.
गावस्वच्छता आणि कीर्तन या कामासोबतच त्यांनी गावागावांत विहिरी, धर्मशाळा बांधायला सुरुवात केली. कीर्तनातून विषमतेवर, जातीभेदावर आघात करत बाबा समाजाला समतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असत. त्यांची कीर्तनाची पद्धत फारच परिणामकारक होती. अधूनमधून ते विनोद करीत, प्रश्न विचारून लोकांना कीर्तनात सहभागी करून घेत. कीर्तन हे एक समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे, हे त्यांनी दाखवून दिले. अंधविश्वास, परंपरागत रूढी, धर्माच्या नावावर असलेले शोषण याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. सामाजिक सुधारणा व्हावी, दारूबंदी व्हावी, सावकारशाहीचे समूळ उच्चाटन व्हावे, शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी आपली सगळी हयात खर्च केली.
गाडगेबाबा कीर्तनातून मोठी प्रभावी मांडणी करीत. भुकेल्यांना जेवण द्या... तहानलेल्यांना पाणी द्या... बेकारांना काम द्या... उघड्यानागड्यांना वस्त्रे द्या... बेघर असलेल्यांना घरे द्या... रोग्यांना औषधोपचार द्या... गरीब मुलामुलींना शिक्षण द्या... पशुपक्षी, मूक प्राण्यांना अभय द्या... हाच खरा धर्म आहे... हीच खरी ईश्वरसेवा आहे... असे ते आपल्या कीर्तनातून सांगत असत. देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका... व्यसनांच्या आहारी जाऊ नका... चोरी करू नका... सावकाराकडून कर्ज काढू नका... जातिभेद, अस्पृश्यता पाळू नका... असे ते पोटतिडकीने सांगत. संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत, पण
स्वतःबद्दल मात्र ते म्हणत, मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही.
सामाजिक प्रबोधनासोबतच गाडगेबाबांनी नाशिक, देहू, आळंदी, पंढरपूर अशा धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली. नद्यांना घाट बांधले. गोरगरिब -अपंग यांच्यासाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली. आज इतक्या वर्षानंतरसुद्धा हजारो गरजवंतांसाठी गाडगेबाबा आधार ठरलेले आहेत. हातात गाडगे घेतलेला हा माणूस आजही हजारो लोकांचा आधार आहे. सांस्कृतिक, विवेकवादी आणि प्रबोधनाचा विचार करणार्‍या कितीतरी पिढ्यांचा गाडगे महाराज हा मोठा सशक्त असा मानसिक आधार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गाडगेबाबा यांची 1941 च्या जुलै महिन्यात भेट घेतली तेव्हाचा प्रसंग अनेकदा सांगितला जातो. गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती, ही माहिती कळताच कायदेमंत्री असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गाडगेबाबांना भेटायचे ठरवले. गाडगेबाबा तेव्हा त्यांना म्हणाले, डॉक्टर, तुम्ही कशाला आले? तुमचे एक मिनिट महत्त्वाचे. तुमचा किती मोठा अधिकार आहे. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणाले, बाबा माझा अधिकार दोन दिवसांचा. खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार फार  मोठा आहे. या दोन महामानवांमधील सख्य हे असे होते.
आज पुण्यतिथीनिमित्त गाडगेमहाराज यांना आपण कृतज्ञ प्रणाम करू या.

Sunday, December 9, 2018

मुलांना कसे वाढवावे? कसे वाढवू नये?

 मुलांना कसे वाढवावे?  कसे वाढवू नये?
डॉ. शुभांगी पारकर यांनी केलेले मार्गदर्शन

लालबाग येथील विद्यार्थी उत्कर्ष मंडळाची स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला नुकतीच पार पडली. राज्यभरातील व्याख्यानमाला श्रोत्यांअभावी ओस होत असताना या व्याख्यानमालेला लाभलेला प्रतिसाद आशादायक होता. व्याख्यानमालेच्या संयोजनासाठी, प्रतिसाद  आणि भव्यतेसाठी कार्यकर्त्यांनी घेतलेले कष्ट वाखाणण्याजोगे होते. विविध विषयातल्या तज्ज्ञ मान्यवरांची व्याख्याने श्रोत्यांसाठी पर्वणीच होती. तुम्हाआम्हा सर्वांच्या जिव्हाळ्याच्या ‘नव्या पिढीतील बालक-पालक’ अर्थात मुलांना कसे वाढवावे, या विषयावर मानसोपचार तज्ज्ञ आणि शुभांगी पारकर यांनी दिलेले व्याख्यान ऐकण्याची संधी मिळाली. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातील या काही गोष्टी सर्वांसमोर ठेवत आहोत.
डॉक्टर शुभांगी पारकर म्हणाल्या की, मानवी जगण्याची उत्क्रांती होत आहे. आपण आज आधुनिक जगात जगतो आहोत, म्हणजे अधिक काही सुंदर मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. आज माणसाचे वयोमान 80 वर्षांपर्यंत वाढले आहे. पूर्वी जे करता येत नव्हते ते करणे आज सहज शक्य झाले आहे. भारत हा आशियातला सर्वात सुंदर देश आहे. मात्र या आधुनिक काळात आपल्या जीवनशैलीला काय झाले, तेच कळेनासे झाले आहे. आपण जीवनशैलीच्या आजारांत पहिल्या क्रमांकावर पोहोचतो आहोत, हे आपल्यासाठी फारसे भूषणावह नाही. किंबहुना ते आपल्या देशासाठी वाईटच आहे. म्हणूनच आज आधुनिक काळात जगत असताना, आपण आपल्या आजारांबाबत विचार करताना, सिंहावलोकन केले पाहिजे. शारीरिक संवर्धनासोबतच मानसिक संवर्धन महत्त्वाचे आहे, हे आपण जाणले पाहिजे. त्यासाठी आध्यात्मिकता महत्त्वाची आहे. गुणवत्ता वाढ होते, तेव्हाच खर्‍या अर्थाने आपण आधुनिक होतो. आनंदाने, समाधानाने जगू लागणे, मला हवे तसे, पण माझ्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, असे जगता येणे म्हणजे आधुनिकता होय. व्यक्तिस्वातंत्र्य उपभोगताना सामाजिक बंधनांची जाणीव आपण ठेवली पाहिजे. माणसाचे जगणे हे एकमेकांसोबतचे
जगणे आहे.

मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय?
सचिन तेंडुलकर जेव्हा नर्व्हस नाईंटीमध्ये बाद होत होता, तेव्हा त्याने दुर्दम्य आत्मविश्वासाच्या जोरावर, मानसिक कणखरतेच्या जोरावर त्या परिस्थितीतून बाहेर पडून पुढचा प्रवास केला. अशा प्रकारे वाईट स्थितीतून स्वतःला बाहेर काढता येणे, मानसिक कणखरता दाखविणे, दुर्दम्य आत्मविश्वास दाखवणे, म्हणजे मानसिक स्वास्थ्य होय. सगळेच धावत असतात. पण पी.टी. उषा एकच होते, कारण तिच्याजवळ आत्मविश्वासाची ऊर्जा असते. आपला आत्मसन्मान आपण महत्त्वाचा मानला पाहिजे. आपली इतर कोणाशी तरी तुलना करता कामा नये. दुसर्‍याकडे आहे त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त मिळेल ही अपेक्षा चांगली नव्हे. आपले बायबल, गीता हे धर्मग्रंथसुद्धा अधिकचे मिळवा असे सांगत नाहीत. म्हणून आजच्या पालकांनी आपल्या मुलांचा आत्मसन्मान जपला पाहिजे, वाढवला पाहिजे. मुलांमध्ये आत्मसन्मानाची जाणीव ही त्यांच्या वयाच्या पहिल्या वर्षापासून असते, असे लक्षात आलेले आहे. आत्मसन्मान असणारा माणूस कधीच हरत नसतो.

आनंदी व्यक्तीची प्रतिकारशक्ती चांगली
आपल्या मुलांना आपण नातेसंबंध, मित्रमंडळी यांचे महत्त्व आणि त्यांची आयुष्यातील अपरिहार्यता समजावून सांगितली पाहिजे. त्यातूनच आपले आयुष्य अधिक आनंदी होत असते, हे मुलांच्या मनावर बिंबविले पाहिजे. आनंदी असलेल्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती चांगली होते, असे आता विज्ञानाने सिद्ध केलेले आहे. आपल्या शरीरातील चयापचय, थायरॉईड या सगळ्याच व्यवस्था आपण आनंदी असल्यास अधिक चांगल्या कार्यरत होतात. परिणामी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आपण अधिक सशक्त आणि अधिक आनंदी आयुष्य जगू शकतो. मन समाधानी असेल तर त्या व्यक्तीला रक्तदाबाचा, मधुमेहाचा त्रास कमी होतो, असेही लक्षात आले आहे. आधुनिक पालकांनी घरात जर आनुवंशिकतेने वाढणारे आजार असतील तर नव्या पिढीला आताच डायटिंगची सवय लावली पाहिजे.

सर्जनशीलता प्रत्येकाच्या  ठायी
सर्जनशीलता प्रत्येक माणसाच्या ठायी असते. आई छान स्वयंपाक करते, सुंदर घर लावून ठेवते, तेव्हा त्यातही सर्जनशीलता असते. ही अशी सर्जनशीलता, अशी विधायकता, अशी कल्पकता आपण आपल्या मुलांना शिकविली पाहिजे.
आपल्या मुलांना आधुनिक पालकांनी दोन गोष्टी शिकवल्या पाहिजेत. पहिली म्हणजे जे पटते ते करा आणि दुसरी म्हणजे जे पटत नाही ते करू नका. जेव्हा पटतात त्या गोष्टी करता तेव्हा त्यातून आनंद मिळत असतो. पटत नाही अशा गोष्टी केलात की माणूस दु:खी होतो. यासाठी आपले आपण मित्र व्हायला हवे. स्वतःवर आपला विश्वास असायला हवा. ज्यामध्ये आनंद मिळतो त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत.
मुले निरीक्षणातून शिकतात
मुले निरीक्षणातून शिकत असतात. पालकांकडे पाहून ते तसे वागण्याचा प्रयत्न करतात. आपण अनेकदा मुलांना खोटे बोलू नका असे सांगतो. मात्र स्वतः वागताना गरज पडली म्हणून, परिस्थिती तशी होती म्हणून, अशी कारणे देऊन का होईना; पण खोटे बोलतो. मग मुलांच्या असे लक्षात येते की खोटे बोलू नये, असे सांगायचे असते, पण प्रत्यक्षात मात्र खोटे बोलण्याची गरज पडते तेव्हा खोटे बोलायचे असते.
दुसरी गोष्ट म्हणजे खोटे बोलू नका, चोरी करू नका असे आपण सांगतो. का करू नका? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला अनेकदा देता येत नाही. अशा वेळी आपण मुलांना त्याचे कारण सांगितले पाहिजे. म्हणजे जी गोष्ट आपल्या बाबतीत घडल्यामुळे आपल्याला वाईट वाटेल, आपले नुकसान होईल, तीच गोष्ट दुसर्‍याबाबत करता कामा नये. कारण त्याचेही नुकसान झाले की त्यालाही वाईट वाटणार असते. अशा प्रकारे अगदी सोप्या शब्दांत आपण त्यांना त्याची उत्तरे देऊ शकतो.

स्पर्धेमुळे जीवघेणा ताण
पुढच्या पिढीचे आयुष्य अधिक अवघड, अधिक खडतर आहे. जीवनातील स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेमुळे जीवघेणा ताण येतो आहे. या सगळ्यांसाठी आपण आपल्या मुलांना तयार केले पाहिजे. आपला सामाजिक परीघ मोठा झाला पाहिजे. आपल्या विश्वात आपल्याला रमता यायला पाहिजे. जीवन कष्टमय असले तरी ते आनंदी असू शकते, हे आपण त्यांना शिकविले पाहिजे. मुलांमध्ये आपण लवचिकता आणायला हवी. म्हणजे एखाद्या वेळेला परिस्थिती बिकट असेल तरी त्यांना त्या परिस्थितीशी जुळवून घेता यायला हवे. काही असो अथवा काही नसो; तरी आपले मन शांत कसे राहील हे आपण पाहिले पाहिजे. बाह्य गोष्टीमुळे आपल्या मनाची शांती भंग पावणार नाही ही क्षमता आपल्यात वाढवली पाहिजे.

प्रौगंडावस्थेत मानसिक आजार
प्रौगंडावस्था ही एक अवघड अवस्था आहे.प्रौगंडावस्थेतील मुले ही त्रिशंकू अवस्थेत जगत असतात. ती ना लहान असतात ना मोठी असतात. या काळात शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. तेव्हा परिस्थितीशी जमवून घेण्यात पालकांनी मुलांना मदत करायला हवी. पालकांची भूमिका या काळात मुलांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. अनेकदा पालक मुलांना अमुक गोष्ट मिळवली तर माझा खरा मुलगा अशा काही चित्रविचित्र अटी घालतात. त्यातून मुलांचे नैतिक खच्चीकरण होत असते. याच काळात मुलांमध्ये मानसिक आजाराचे प्रमाण मोठे असल्याचे लक्षात आलेले आहे. याच काळात मुलांमध्ये आणि आईवडिलांमध्ये दरी निर्माण होते. विसंवाद निर्माण होतो. म्हणून आईवडिलांनी या काळात असलेल्या मुलांशी सुसंवाद निर्माण करायला हवा. व्यक्ती म्हणून मुलाची याच काळात घडण होत असते, हे लक्षात ठेवले पाहिजे.

यशाची व्याख्या
आपली यशाची व्याख्या आपण तपासून पाहिली पाहिजे. अनेकदा गाड्या, बंगले असणे किंवा डॉक्टर इंजिनीयर होणे अशी  आपण यशाची व्याख्या करतो; ती काही यशाची योग्य व्याख्या नव्हे.चटणी भाकरी खाऊन समाजसेवा करणारा माणूस हा अधिक यशस्वी माणूस असू शकतो. यश हे समाधानात असते. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. डिग्र्या न मिळवलेले, गाडी बंगले नसलेले अनेक लोक आपल्या आयुष्यात यशस्वी झालेले लोक आहेत. हे प्रथम आपण समजून घेतले पाहिजे आणि आपल्या मुलांना समजून सांगितले पाहिजे. मुलांना प्रेमाने वाढवावे की कठोरतेने वाढवावे हे आपण ठरविले पाहिजे. प्रसंगी शिस्त हवी, ठामपणा हवा, पण सतत कठोर बोलण्याने मुले घडण्याऐवजी बिघडण्याची शक्यता असते.
मुलांना निराश होऊ द्या
अलीकडे आपण मुलांचे अधिक लाड करतो. त्यांना यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी मदत करतो. पण त्यांना अपयशाच्या बाजूला फिरकूही देत नाही. खरे तर मुले अपयशाला लवकर सामोरे जातील तेवढे चांगले असते. त्यातूनच त्यांची सहनशीलता वाढते, ते नकार पचवायला शिकतात, निराशेवर मात करता येते; कशी करायची हे ते शिकतात. म्हणून मुलांना निराश होऊ द्या, त्यातून त्यांना बाहेर येऊ द्या. त्यातूनच त्यांची खरी प्रगती होत असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी त्यांच्या आशा-आकांक्षा मुलांवर लादू नयेत. त्यांचे स्वप्न मुलांवर लादू नयेत. मुले स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची आहेत, हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यांना त्यांचा मार्ग निवडण्याची मुभा दिली पाहिजे. त्यांना पडू दिले पाहिजे. निराश होऊ दिले पाहिजे. त्यातूनच त्यांना ऊर्जा मिळते आणि फिनिक्स पक्षासारखे ते उडायला शिकतात.
आपण चांगले वागतो म्हणून प्रत्येकाने आपल्याशी चांगलेच वागले पाहिजे, अशी अनेकदा अपेक्षा असते. तसे होणार नसते. जग तुमच्याशी चांगले वागायला बांधील नाही हे मुलांना समजून सांगितले पाहिजे. आपण भले करतो तो आपला चांगुलपणा, आपला निर्णय आहे. दुसर्‍याचा तसाच असेल असे नाही, हे वास्तव मुलांना सांगितले पाहिजे.

जीवनशैली रोबोटिक
 आजकाल मुलांना इंटरनेटवरील गेमचे व्यसन लागलेले दिसते. मुलांची जीवनशैली रोबोटिक झाली आहे. माझ्या पाहण्यात सतरा वर्षांचा एक असा मुलगा आला, ज्याने आपली आई नऊ दिवस आयसीयूमध्ये असताना तिला रुग्णालयात येऊन भेटण्याची तसदी घेतली नाही. तो त्या काळात फक्त गेम खेळत घरी थांबला होता. मुलांना मोबाईल, इंटरनेट देऊ नका असे नव्हे, त्या त्या सुविधांचे फायदे आहेत. मात्र मुले त्यांच्या आहारी जात नाहीत ना, याबाबत पालकांचे लक्ष असायलाच हवे. आजकाल मुले अशा प्रकारच्या गेमच्या आहारी जात आहेत. त्यांना त्याचे व्यसन लागत आहे. त्याच वेळी अतिशय वाईट अशा अमलीपदार्थांचे व्यसनसुद्धा मुलांना लागत आहे. म्हणून पालकांनी दक्ष राहिले पाहिजे. मुलांच्या मेंदूला रोज काही ना काही खाऊ लागतो. म्हणून त्यांना चांगली व्यसने लावली पाहिजेत. अभ्यासाचे व्यसन लावले पाहिजे, मैदानी खेळाचे व्यसन लावले पाहिजे. त्यातून त्यांची वाढ होते, त्यांना ऊर्जा मिळते.
सेल्समनसारखे वागू नये
मुलांशी वागताना एखाद्या सेल्समनसारखे पालकांनी वागू नये. तू अमुक केलेस तर अमुक देईन, अमुक केलेस तर तमुक देईन, अशी देण्याची भाषा मुलांसोबत करता कामा नये. मुलांना माणुसकीचे धडे लहानपणीच दिले पाहिजेत. तसेच एखादे वर्तन मुलांकडून झाले तर त्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या मुलाने पक्ष्याला, प्राण्याला पाणी नेऊन दिले, आजोबांना मदत केली, दुसर्‍या मुलाला मदत केली तर त्या मुलाला बक्षीस देऊन त्याच्या या वृत्तीचा गौरव केला पाहिजे. त्यातून मुले माणुसकी शिकत असतात.

मुलांचा सन्मान
मुलांसमोर पालकांनी एक आदर्श ठेवला पाहिजे. मुले त्या आदर्शाकडे बघूनच वाढत असतात, याचे भान पालकांनी ठेवलेच पाहिजे. मुलांच्या समोर आईवडिलांनी भांडू नये; त्यांच्यातील मतभेद मुलांच्या लक्षात येणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. मुलांचा सन्मान सांभाळणेही तितकेच गरजेचे असते. लखनवी भाषेत पालक मुलांना आप म्हणतात म्हणजे त्यांचा आदरार्थी उल्लेख करतात. आपण अनेकदा ठोंब्या अशी नकारात्मक भाषा वापरतो. त्यातून त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच लागत असते. याचा परिणाम मनावर होऊन आत्मविश्वास कमी होतो. मुले लहान असली तरी त्यांना आदराची गरज असते.

अभ्यासाची चिंता
आज टीव्ही, मोबाईल या साधनांमुळे घरातले बोलणेच बंद झाले आहे. घरातल्या माणसांमधला संवाद संपला आहे. त्यातून मुलं स्वयंकेंद्रित व्हायला लागली आहेत. मुलांना शिस्त हवीच, पण त्यांना प्रेमही हवे असते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. चिंता ही अशी गोष्ट आहे की एका मर्यादेपर्यंत ती माणसाला कार्यप्रवण करते. ती माणसाला आवश्यक असते; मात्र ती जर प्रमाणापेक्षा अधिक वाढली तर माणसाचे खच्चीकरण होते. त्याची काम करण्याची प्रेरणा संपते.तेव्हा याचे भान आपण ठेवले पाहिजे. अभ्यासाची चिंता मुलांना एका मर्यादेपर्यंत असायलाच हवी मात्र त्या मर्यादेपलीकडे ते जाऊ नये. फार ताण दिला तर त्यांची प्रगती ही अधोगतीमध्ये बदलत असते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

मोबाईलला लॉक
अलीकडे मुलांच्या मोबाईलला लॉक असतो. जर मूल मोबाइलवर काय करते हे पालकांना दाखवत नसेल; त्यांच्यापासून लपवून ठेवत असेल तर कदाचित ते मूल व्यसनाधीन होण्याची ती नांदी असू शकते हेही पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.
 मुले वाढविणे ही सहज गोष्ट नाही. ती पूर्वीपेक्षा आता अवघड झाली आहे. मात्र या सगळ्यांची चिंता करून प्रश्न सुटणार नाही. तर आपण अधिक सहजपणे अधिक प्रेमाने, मुलांशी संवाद वाढवून, त्यासाठी स्वतः थोडे कष्ट घेऊन वागले पाहिजे. तरच आपली मुले छान आयुष्य जगू शकतील आणि पर्यायाने आपले आयुष्यही सुंदर होऊन जाईल.                          

Monday, November 5, 2018


मराठीच्या शुद्धलेखनाच्या कार्यशाळेसाठी संपर्क 9702723652.

Thursday, September 27, 2018

मराठी मूळाक्षरे

मराठी मूळाक्षरे

मराठीच्या शुद्धलेखनाच्या कार्यशाळेसाठी संपर्क 9702723652.

Monday, September 24, 2018

बुद्धी दे, शांती दे, आरोग्य दे, धन दे तारतम्यही दे


आदिपूजेचा मान मिळालेले दैवत म्हणजे श्री गजानन...  सोळा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती तो श्री गणेश... त्याचा भाद्रपदी होणारा सोहळा म्हणजे केवळ आनंद पर्वणी... अवघ्या महाराष्ट्राला एक नवा तजेला ... एक नवी उमेद देणारा हा सोहळा... त्याची लक्षावधी रुपे... त्याचा साती खंडात वाजणारा डंका... जगाच्या पाठीवर असा दुसरा सोहळा नसावा. पण...
हा पण...
बुद्धी दे... शक्ति दे... आरोग्य दे... धन दे... अशा मागण्या करताना आम्हाला तारतम्यही दे असे म्हणायला लावतो. हे तारतम्य नाही लाभले तर आपण आपला लाखमोलाचा आनंद आणि तेवढ्याच लाख मोलाचा सोहळा हरवून बसायचो. किंवा त्याची तेजोमय प्रभाच निष्प्रभ करून ठेवायचो.
बाजाराला नकार
सगळ्या जगावर बाजाराने गारूड केले आहे. त्याचा परिणाम आपल्या सणांवरही दिसतो. सणांसाठी बाजार सजणे वेगळे आणि सणांचा बाजार होणे वेगळे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आपले सण हे नात्याच्या जपणुकीसाठी... समाजातील सद्भावना वाढीसाठी... समाजाच्या उन्नतीसाठी आहेत. त्याऐवजी बाजार मांडून समाजाला अधिकच बाजारकेंद्री करण्याचे पातक आपल्या हातून घडत नाही ना याचे भान आपण ठेवले पाहिजे. बाजाराला जाहिरातीची गरज असते. ती जाहिरात आपल्या सणांमध्ये का घुसली? याचा विचार आपण का नाही केला?
व्हीआयपी आणि सेलेब्रिटी
आपल्या गणेशोत्सवात व्हीआयपी आणि सेलेब्रिटी आले पाहिजेत हा अट्टाहास आपण का करू लागलो आहोत? सेलेब्रिटीशिवाय आपला उत्सवच पूर्ण होत नाही का? आमदार, खासदार, नगरसेवकांना आपण गणेशोत्सवात कशासाठी बोलवतो? त्यांनी मंडळाला देणगी द्यावी म्हणून? मंडळापुढच्या रस्त्यावर खड्डे... तेथे सिग्नल नाही... स्पीडब्रेकर नाही... ते काम करायचे- करून घ्यायचे काम प्रतिनिधींचे आहे, पण आपण मंडळाला देणगी मागू लागलो नि ती  डीजेवर उधळू लागलो तर सगळ्या समस्या तशाच राहणार, हे आपण जाणायला नको का?
कलांचे ओंगळवाणे प्रदर्शन
गणेशोत्सवासारख्या सणांवेळी नृत्ये केलीच पाहिजेत. गणेश ही देवता कलांची देवता आहे. पण बीभत्सपणा, अश्लीलता त्यांना या प्रसंगी आपण थारा देता कामा नये. अनेकदा आपण अशा कलांना या दिवसांत प्रोत्साहन देऊ लागलो आहोत. दहीहंडीच्या मंचावर अलीकडे जी नृत्य झाली ती संताप आणणारी होती. ही कोणती भक्ती आहे? मद्यपान करून विसर्जन मिरवणुकीत असला बीभत्सपणा करणार्‍यांना आपण आवरले पाहिजे. लोककलांत अश्लिलता डोकावू लागली तर ती वेळीच रोखली पाहिजे.कलगीतुर्‍याच्या नावाखाली जाखडी नृत्य आणि भजनांतही अश्लील गीते सादर होताना दिसतात. ते आपण थांबविले पाहिजे.
भक्त विनम्र हवा
एखाद्या गणेशोत्सवाची कीर्ती वाढली की मग त्या गणेशोत्सवाच्या मंडळातील कार्यकर्त्यांचा अभिमान वाढीस लागतो. तो अभिमान मग गर्वाची जागा घेतो. त्यातून मग भाविकांना दुय्यम लेखायला सुरुवात होते. पोलिसांना दादागिरी करून दाखवली जाते. बाबांनो, तुम्ही भक्त आहात ना? भक्त विनम्र हवा. तुम्ही बाप्पाची सेवा करता ना? अशी करतात सेवा? या अशा एक दोन कार्यकर्त्यांमुळे मंडळातील रात्रंदिवस राबणार्‍या कार्यकर्त्यांनाही नावे ठेवली जातात हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या लोकांचे प्रबोधन करणे हे आपलेच काम आहे, हे लक्षात घ्या आणि अशा कार्यकर्त्यांना आवरा.
तुम्ही तर संस्कृती वाहक
गणेशोत्सवातील कार्यकर्ते आणि या उत्सवात सहभागी होणारे भाविक हे आपल्या संस्कृतीचे वाहक आहेत. त्यांना त्याची जाणीव असली पाहिजे. तुम्हीच समाजात आपली परंपरा, संस्कृती घेऊन जात असता. नव्या पिढीला तिचे दर्शन घडवीत असता. तेव्हा तुम्ही जर बेजबाबदार झालात तर संस्कृती वहनाचे कामच दूषित होऊन जाईल. तुमच्या खांद्यावरच या संस्कृतीची पालखी आहे. नव्या पिढीला आपल्या संस्कृतीचा परिचय करून देण्याचे काम करताना म्हणूनच अधिक जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे.
हेवेदावे विसरा
छोट्या-मोठ्या अनेक मंडळांत हेवेदावे दिसतात. गट-तट दिसतात. सण-उत्सव हे एकत्र येण्याचे, एक दिलाने काम करण्याचे निमित्त असते. आपण सार्‍यांनी हेवेदावे विसरून काम केले पाहिजे. एकत्र येऊन गुण्यागोविंदाने, प्रेमान,े स्नेहभावाने वागले पाहिजे. पण अनेकदा आपण अशा हेव्यादाव्यांना खतपाणी घालताना दिसतो. हे काही बरे नाही.
तारतम्य दे...
कोकणात देवापुढे गार्‍हाणे घालायची पद्धत आहे. आज आपण सर्व गणेशभक्तांनी मिळून देवाधिदेव गणेशाला एक गार्‍हाणे घालूया. हे देवाधिदेवा... होय महाराजा... आम्हाला बुद्धी दे... होय महाराजा... आम्हाला शांती दे...होय महाराजा... आम्हाला धन दे... होय महाराजा...  आम्हाला आरोग्य दे...होय महाराजा... आणि उत्सव साजरा करताना तारतम्य दे रे महाराजा... होय महाराजा...

Monday, September 3, 2018

सिद्धपुरुष



एक दिवस ऑफिसातला सहकारी श्रीधर ओंकारला म्हणाला,
‘उद्या कार्यक्रमाला येणार?’
‘कुठे कसल्या?’
‘स्टार्ट नाऊ!’
‘काय आहे ते!’
‘यशाची सुरुवात! अशी बेसलाईन आहे त्याची!’
‘बकवास असणार!’
‘कशावरून?’
‘अरे, असे कार्यक्रम करणारेच तेवढे यशस्वी होतात. ऐकणारे होत नाहीत!’
‘निगेटिव्हच का बोलतोस?’
‘मग...’
‘चांगलं बोल ना! झाला तर झाला फायदा नाही झाला तर आपल्याला कुठे पैसे गुंतवायचेत. शंभर रुपये तर
तिकीट आहे.’
‘ठीक आहे, पण मला सांग तू, काय वेगळं असतं त्यात?’
‘यशस्वी बाराखडी’
तुला व्हायचंय का यशस्वी?’
‘हो! अर्थात!’
‘मग ठीक आहे. तुला यशस्वी करण्यासाठी मी तुला हा कार्यक्रम दाखवतो. अट एकच तू मला त्याचा काय फायदा झाला ते महिन्यानंतर प्रूफ करून दाखवायचंस!’
‘ओ.के.’
***
ओंकार बर्वे! वय वर्षे पंचेचाळीस! एका प्रायव्हेट कंपनीत कारकून म्हणून काम करणारा. घरात बायको, दोन मुलं, आई आणि वडील. परिस्थिती बेताची! पण ती लवकरच सुधारेल अशी आशा असलेलं कुटुंब! ओंकार हुशार, मेहनती. सतत कोणत्या ना कोणत्या कामात अखंड बुडालेला. बोलणं मृदू आणि गोड. त्यामुळेच मित्रमंडळी आणि नातेवाइकांत सगळ्यांना हवाहवासा!
***
श्रीधरला कार्यक्रम दाखवायचं पक्कं ठरलं. दोघे कार्यक्रमाला गेले.
कार्यक्रम छान झाला. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर ताबडतोब कृती करणं गरजेचं कसं आहे त्यावर तो ट्रेनर छान बोलला. श्रीधर भारावून गेला. ओंकारला त्याचं भाषण आणि विचार आवडले. पण हे ऐकून काही एखादा पटकन सुरुवात करेल आणि सुरुवात केलीच तरी यशस्वी होईल असं काही ओंकारला वाटलं नाही.
कार्यक्रम संपल्यावर दोघं परतीच्या वाटेवर गप्पा मारत होते. ओंकार म्हणाला,
‘काय करायचं ठरवलंयस?’
‘करणार काही तरी!’
‘एक महिन्याची मुदत आहे. नाहीतर 200चे 400 करून द्यावे लागतील तिकिटाचे पैसे!’
‘त्याची गरजच पडणार नाही!’
‘ठीक आहे पाहू!,’ ओंकार छद्मी हसत म्हणाला. श्रीधर 400 रुपये हरणार याबाबत त्याला पक्की खात्री होती.
संध्याकाळी ओंकार छोट्याला घेऊन गेला असता त्याला एकदम गार्डनमध्ये कालच्या कार्यक्रमाची आठवण झाली. वाटलं काय काय आयडिया काढतात लोक! कमाल वाटते यांची! लोकांच्या मनाचा नेमका ठाव घेतात. किती किती धंदे बोकाळलेत नुसते.
कुणी शेअर बाजाराचं ट्रेनिंग देतो, कुणी ब्युटिशियनचा कोर्स काढतो, कुणी व्यक्तिमत्त्व विकासाची कार्यशाळा घेतो, एवढंच काय तर गझललेखनाच्या कार्यशाळाही होतात. या सगळ्याच्या मुळाशी आहे ती पैसे कमविण्याची वृत्ती. एकदा पैसे कमवायचे म्हटले की लोक विज्ञानापासून बुवाबाजीपर्यंत काय वाटेल ते मार्ग शोधून काढतात.
सगळ्याच्या मुळाशी माणसाच्या मनाचा कमकुवतपणा! माणसं स्वतः कष्ट करून मोठं होण्यावर विश्वास ठेवत नाहीत. सतत पराभवाला घाबरत राहतात. मग असल्या ट्रेनर, बाबा आणि बायांना फसून पैसे गमावतात. मोठी स्वप्न दाखवून हे लोक फसवतात बापड्यांना! असल्या ट्रेनिंगमधून ट्रेनिंग देणाराच फक्त श्रीमंत आणि यशस्वी होतो. कुणीतरी म्हटलं आहे, जे स्वतःला जमलं नाही ते इतरांना करायला सांगतो तो ट्रेनर! खरंच आहे ते. मध्ये ‘मशरूम पिकवा’च खूळ आलं होतं, तेही यातूनच बोकाळलं होतं.
ओंकार विचारात हरवला होता.
तेवढ्यात मुलगा जवळ आला. त्याची तंद्री भंगली. पण रात्री झोपताना पुन्हा त्याच्या डोक्यात तेच विचार घुमू लागले. वाटलं आपणही हे तंत्र वापरून पाहायचं का? लोक मूर्ख असतील तर आपण खरंच ते मूर्ख आहेत का? हे पाहायलाच हवं!
काहीतरी केलं पाहिजे, त्याचे विचारचक्र वेगाने फिरू लागले.
एक पक्की योजना आखूनच तो झोपला.
लोक दुःखाला घाबरतात म्हणून ते असे वेड्यागत पैसे खर्च करत बसतात. हे नेमके ओळखून ओंकारने लोकांचे
दुःखच नाहीसे करण्याची बतावणी करण्याची युक्ती शोधून काढली. युक्ती सोपी होती. एकेका माणसाला भेटायचं. एकावेळी एकाला त्याला त्याच्या समस्या आणि दुःखे याबाबत बोलतं करायचं. एखादा खूपच चांगलं चाललंय म्हणाला तर त्याच्यासमोर बथ्थड भविष्याची चित्रे उभी करायची. मग माणूस नक्कीच घाबरेल. मग यावर उपाय आहे म्हणून सांगायचं. अट एकच! कोणता? कसा? कोण करणार? कुठे करणार? असले प्रश्न विचारायचे नाहीत. परिस्थिती बघून माणसांना रक्कम सांगायची. महिन्याभरात फरक न दिसल्यास पैसे परत मिळतील म्हणून सांगायचं,  योजना पक्की ठरली.
***
‘आता तुमच्यासमोर सर्वाधिक दुःख कसलं आहे सांगा. आधी आपण त्याचं निवारण करू?’ हॉटेलच्या कोपर्‍यात बसून ओंकार डाणगे साहेबांना विश्वासात
घेत होता.
‘सगळ्यात आधी माझं हे छातीतलं दुखणं थांबायला हवं. परवा रात्री दुखायला लागलं म्हणून जाग आली तर घाबरलो हो. वाटलं आता जगत नाही! आजकाल तरणी मुलं जातात हो अ‍ॅटॅकने!, ठाणगे साहेब काकुळतीला येऊन सांगत होते.
‘माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचं हेही दुखणं संपेल. मी काय करायचं ते करतो. तुम्ही फक्त एक काम करा. उद्याचा दिवस जाऊ दे. परवा दिवशी जाऊन कार्डिओलॉजिस्टकडून तपासून घ्या. तपासायची गरज नाही, पण मनाची खात्री झालेली बरी तुमच्या!  म्हणजे निर्धास्त व्हाल. ताबडतोब मला कळवा. रिपोर्ट नॉर्मल आले तर मी पास झालो आणि आजार आढळला तर नापास आणि नापास झालो तर सगळी फी परत. त्याच दिवशी घेऊन जा, असं आतापर्यंत तरी
झालं नाही.’
ठाणगे मोठ्या विश्वासाने बाहेर पडले.
ओंकारने देवाला हात जोडले आणि म्हणाला, ‘या माणसाला हृदयविकार नसू दे रे बाप्पा! त्याचे पाच हजार खाल्लेत आपण!’
त्या दिवशी ओंकार एका बाईंना समजावत होता. त्याच हॉटेलात तेव्हा ठाणगे आले. डोळ्यात पाणी आणत म्हणाले, ‘उपकार झाले तुमचे! रिपोर्ट नॉर्मल आहेत!’
ओंकार म्हणाला, ‘छान, आता घाबरू नका. सगळं हळुहळू व्यवस्थित मार्गी लागेल!’
एवढा मोठा साहेब, पण हात जोडून धन्यवाद म्हणाला.
ओंकारसमोर बसलेल्या आजीबाईही ओंकारकडे अपार आदराने पाहत म्हणाल्या,
‘काय होतं यांचं?’
‘छातीचं दुखणं... गेलं... पळालं!’
‘छान!’
‘ते जाऊ दे. आपण आपल्या विषयाकडे वळू. तर तुमचा डायबेटीस अवघड काम आहे. काही गोष्टींवर कायमस्वरूपी पर्याय नसतात, पण तुमच्या आजाराचा तुम्हाला त्रास होणार नाही याचा बंदोबस्त करू आपण! गेल्या पाच वर्षांमध्ये जेवढ्या सुखी नव्हता तेवढ्या सुखी आणि आनंदी जगू शकता तुम्ही. तुम्हाला थोडंसं संयमानं आणि काटेकोर वागावं लागेल, पण ती ताकद तुमच्यात निर्माण करू आपण. मी काय केलं, कोठे जाऊन केलं, कसं केलं याबाबत शंका मनात ठेवायची नाही. कुणाला याबाबत काही बोलायचं नाही. उद्या डॉक्टरांकडे जाऊन या. त्यांनी सांगितलेल्या औषधगोळ्या वेळेवर घ्या. मस्त उड्या मारू लागाल लवकरच!’
‘तेच पाहिजे बघा.’ उरली वर्षं हातपाय हलवत गेली म्हणजे झालं!’
‘काही चिंता करू नका आणि कधी अडचण आली तर माझा नंबर आहेच! कधीही फिरवा! काळजी करू नका जा. सगळा बंदोबस्त करतो.’
आजीबाई गेल्या. ओंकारनं पैशाचं पाकीट खिशातून काढून बॅगेत सरकवलं आणि तोही बिल भागवायला काऊंटरकडे चालू लागला.

ओंकार रोज कामावरून सुटल्यावर हाच एक धंदा करू लागला. ज्यांना भेटला त्यातली निम्मी माणसं त्याची गिर्‍हाईक होऊ लागली. पुढच्या काळात एकही माणूस पैसे मागायला आला नाही. वर्षभरात त्याने तीस एक लोकांच्या आयुष्यातलं दुःख दूर केलं. त्यातल्या अनेकांनी त्याचे पाय धरले. कुणी पुन्हा अडचणी घेऊन आलं. कुणी वाटेल ते पैसे मागा, पण हे काम कराच, म्हणू लागलं.
आपल्याकडे कोणतीच सिद्धी नाही ही गोष्ट तो सपशेल विसरून गेला. आपण एक प्रयोग सुरू केला होता हेही विसरला. पैसा माणसाला बदलतो म्हणणार्‍याचाच हा नमुना! ओंकार हळुहळू चमत्कारी झाला. त्याच्याही नकळत. बँक अकाऊंटवरचे पैसे वाढताना त्याला बरे वाटत होते. घरात बायको-मुलं सुखी होती. त्यांच्याही गालावर आता मूठभर मास चढलं होतं. एक-दोन नातेवाईक हा विकास पाहून बोटे मोडत होती, पण तेवढीच. बाकींच्यासाठी तो एक देवदूतच ठरला होता.
आता आता तर त्याला रक्कमही सांगावी लागत नव्हती. लोक येतानाच अधिक पैसे आणीत आणि त्याच्या पायावर ठेवत.
ओंकारने हुशारीने स्वतःचा ‘बुवा-बाबा’ होणे टाळले होते. तो उगाच कुणालाही गिर्‍हाईक बनवत नसे आणि रोज फक्त एकालाच भेटून दोन तास गप्पा मारी. नेमके दुःखणे हेरी. त्याबद्दल जे जे सुचेल ते सर्व त्या माणसाला सांगत राही. बाहेर निघताना त्या माणसाचे खांदे रुंदावत. तो उभा राहून लढू लागे आणि जिंकून मोकळा होई. त्याचे श्रेय ओंकारलाच मिळत असे.
सगळं कसं छान चाललं होतं. पण...
***
ओंकार रुग्णालयात खॉटवर पडून आहे. माणसं त्याला भेटायला जमली आहेत. काल जवळचे नातेवाईक येऊन गेले. आज मित्रमंडळी आणि हितचिंतक! बहुतांश त्याची गिर्‍हाईके... नव्हे ज्यांच्या आयुष्यातलं दुःख ओंकारनं गायब केलं ते सर्व.
आलेले लोक शहाळी घेऊन आलेले. त्यांच्यात चौकशा सुरू होत्या, कधी झाला अपघात? कुठे? कसा काय झाला? चूक कोणाची होती? असे प्रश्न आणि ‘अजबच नाही!,’ ‘कसला विचित्र प्रकार!,’ ‘यांच्यावर उगाच ही पाळी!’ असले उद्गार पुन्हा पुन्हा उमटत होते.
झालं असं. काल सकाळी झेरॉक्स काढायला म्हणून ओंकार खाली उतरला. रस्ता क्रॉस करून पलीकडच्या फुटपाथवरून चालत होता. तेवढ्यात एक कार येऊन त्याला धडकली. तो सरळ जाऊन दूध केेंद्रावर आदळला. दुसर्‍या क्षणी बेशुद्ध पडला. ओळखीच्या चहावाल्याने बिल्डिंगमध्ये माहिती दिली. लोक भराभर रस्त्यावर उतरले आणि टॅक्सीत टाकून रुग्णालयात घेऊन गेले.
कारसमोर छोटी मुलगी आली. तिला वाचविण्यासाठी कार डावीकडे घेतली तर तिथे गाय बसलेली. तिच्यावर गाडी जाऊ नये म्हणून आणखी डावीकडे वळवली, तर ती सरळ येऊन ओंकारवर धडकली.
लोक रुग्णालयात येत-जात होते. ओंकारच्या मांडीचं हाड मोडलं होतं. कंबर चेचली होती. लोक हळहळत होते. एक जण दुसर्‍याला म्हणाला, ‘दुसर्‍याच्या दुःखात धावून जाणारा माणूस! आमची सगळी विघ्न यांनीच दूर पळवली.’
दुसरा म्हणाला, ‘ओंकार, तुम्ही लवकर बरे व्हाल. अहो, मला माझ्या आजारपणातून बाहेर काढलात तुम्ही. स्वतःला तर नक्कीच काढाल. आमच्या शुभेच्छा आहेत आपल्या पाठीशी!’
पहिला म्हणाला, ‘आजवर दुसर्‍यांच्या दुःखावर औषधोपचार केलात, आज स्वतःच्या दुःखावर करा आणि मोकळे व्हा यातून!’
ओंकारला त्यांच्या म्हणण्याचं बरं वाटलं आणि वाईटही.
बरं यासाठी की आपल्यामुळे या सर्वांची दुःख नाहीशी झाली आणि वाईट यासाठी की असं कोणतंच औषध आपल्यापाशी नाही.
***
सात वाजल्यानंतर लोक यायचे बंद झाले. बायको आठ वाजता येणार होती. तासभर झोप काढावी म्हणून ओंकार कुशीवर वळला. बराच वेळ निद्रादेवीची प्रार्थना करूनही त्याला झोप येईना आणि एकदम त्याला मगाच्या माणसाचे संवाद ऐकू यायला लागले. दुसर्‍याच्या दुःखात धावून जाणारा माणूस! आमची सगळी विघ्न यानंच दूर पळवली! एक दिवस आले आमच्याकडे हे भावोजी! त्यांना काहीतरी सांगून गेले. मग त्यांनी काय केलं कुणास ठाऊक पण त्या दिवसापासून आमची भांडणच मिटली! मुलाच्या अ‍ॅडमिशनची केवढी चिंता पडली होती. पन्नासएक हजार तरी कर्ज काढावं लागलं असतं. ओंकार आला. म्हणाला, असं असं करा. पैसे वाचतील आणि खरंच की हो अ‍ॅडमिशन झाली डोनेशनशिवाय! त्याला या वाक्यांनी बरं वाटलं, पण मग एक आणखी एकाचं म्हणणं पुन्हा पुन्हा आठवायला लागलं, ‘गंडवतो काय साल्या, तू पण धंद्याला लागला काय? पचणार नाय रे हे असलं!’ हा संवाद आठवला आणि ओंकारचा चेहरा पडला. काळजात धस्स झालं. वाटलं आपण आपल्या कर्माचीच फळं भोगतोय की काय? नक्कीच! नाहीतर त्या अपघातात आपण का उगाच भरडलो असतो. नीट फुटपाथवरून तर चालत होतो. विचारात बुडत असतानाच कंबेरतून कळ गेली. जीवघेणी कळ होती ती!
वाटलं, लोक, त्या सर्व लोकांची पळालेली दुःखे जर पैशाचा शोध घेत आपल्याकडेच आली तर... हा अपघात म्हणजे त्यातल्याच कुणाचं दुःख की काय?

- वैभव बळीराम चाळके

Tuesday, March 6, 2018

विज्ञान- तंत्रज्ञानाच्या विकासाने कुपोषण, गरिबी, आजार हे प्रश्न का सुटले नाहीत?


विज्ञान- तंत्रज्ञानाच्या विकासाने कुपोषण, गरिबी, आजार हे प्रश्न का सुटले नाहीत?


मानवाने विज्ञान-तंत्रज्ञानात केवढी तरी मोठी प्रगती केली आहे. सगळे जग एका क्लिकवर आले आहे परग्रहावर वस्ती करण्याची स्वप्ने मानवाला पडू लागली आहेत. मात्र असे असताना जगातील कुपोषण, आजार, दारिद्य्र, प्रदूषण, युद्ध या आणि अशा समस्या मानवाला संपवता आलेल्या नाहीत. असे का? असा प्रश्न प्रत्येक विचारी माणसाला केव्हा ना केव्हा पडलेला असतोच. अलीकडेच मी पर्यावरणस्नेही जीवनपद्धतीचा विचार आणि स्वीकार करणार्या आमच्या विनित वाघे नावाच्या मित्राच्या चिपळूणच्या घरी गेलो होतो. निसर्गाशी नाते सांगणारे आणि निर्माण करणारे घर त्याने तेथे बांधले आहे. त्या भेटीत त्याने त्याच्या एका ज्येष्ठ मित्राने, दिलीप कुलकर्णी यांनी लिहिलेले ‘वेगळ्या विकासाचे वाटाडे’ हे पुस्तक वाचावयास दिले. वर उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात सापडली ‘यिन्-यँग्चा समतोल’ नावाच्या प्रकरणात फ्रिट्यॉप काप्रा या शास्त्रज्ञाच्या विचारांचा परिचय करून दिला आहे. काप्रा म्हणतो, जगाच्या विकासाची दिशा चुकली. विज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमागचे तत्त्व चुकले,  म्हणूनच आज एवढ्या विकासानंतरही माणसाच्या खर्या समस्या तशाच आहेत. किंबहुना वाढलेल्या दिसतात.

कोण आहे हा फ्रिट्यॉप काप्रा?
डॉ.फ्रिट्यॉफ काप्रा हे मूळचे ऑस्ट्रिया देशातील व्हिएन्नाचे आहेत. 1966 साली त्यांनी पदार्थ विज्ञानात पदवी मिळवली. मग फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका येथील विद्यापीठांतून त्यांनी संशोधन व अध्यापन केले. अणूचा अभ्यास हे त्यांचे संशोधन क्षेत्र आहे. पण फक्त तेवढाच अभ्यास न करता त्यांनी चीनमधील ताओ तत्त्वज्ञान अभ्यासले. हिंदू, बौद्ध आणि झेन-बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. विज्ञान आणि तत्त्वज्ञान या दोन विरुद्ध गोष्टी मानल्या जातात. विज्ञान जड-द्रव्य यांचा अभ्यास करते तर तत्त्वज्ञान चैतन्य, आत्मा, ब्रह्म वगैरे गोष्टींचा अभ्यास करते. पण काप्रा यांना पदार्थ विज्ञानातील निष्कर्ष तत्त्वज्ञानाशी जुळताना आढळले. त्यातून त्यांनी नवा विचार मांडला. ‘दि ताओ फिजिक्स’ आणि ‘दि टर्निंग पॉइंट’ ही त्यांची या नव्या विचाराची पुस्तके जगभर गाजली. त्यातील ‘दि टर्निंग पॉइंट’ या ग्रंथातील विचार दिलीप कुलकर्णी यांनी उपरोक्त दीर्घ लेखात मांडला आहे.

योग्य दिशा कोणती?
व्यक्ती, समाज हा एका नैसर्गिक चक्राचा भाग आहेत. विश्वाचा एकात्मपणे विचार केला पाहिजे. ही नवी जाणीव निसर्गवादी आहे. संपूर्ण पर्यावरण व्यवस्था ही एक मोठी प्रणाली असून अन्य प्रणाली तिचे उप-उप भाग आहेत. या संपूर्ण जाळ्यातील एखाद्या धाग्याचा स्वतंत्र विचार करता येत नाही. त्या धाग्याचा विचार त्या जाळ्याच्या संदर्भात करावा लागतो. चिनी तत्त्वज्ञानात यिन् आणि यँग अशा दोन कल्पना आहेत. आपल्याकडे जशा प्रकृती-पुरुष कल्पना आहेत, तशाच त्या आहेत. यिन म्हणजे प्रकृती, तर यँग म्हणजे पौरुष! यिन म्हणजे स्त्री, पृथ्वी, रात्र, अंधार, हिवाळा, आर्द्रता, नमतेपणा, समजूतदारपणा, सहकार्य तर यँग म्हणजे पुरुष, सूर्य, दिवस, उजेड, उन्हाळा, कोरडेपणा, उष्णता, ताठपणा, आक्रमकता, स्पर्धात्मकता होय. यशातील गुण परस्पर विरोधी आहेत. ताओ तत्त्वज्ञान सांगते, या यिन-यँगमध्ये समतोल हवा. यिन-यँग हे वाईट नसते. त्याचा अतिरेक वाईट असतो. काप्रा म्हणतात, आपण विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास यिन-यँग मधील यँग गुणाच्या वाढीसाठी केला. म्हणून त्या दोहोतील समतोल संपला. आपल्या समस्या त्यामुळे कमी न होता वाढत गेल्या. त्यातून दारिद्य्र, कुपोषण, आजार, ऊर्जानाश, स्त्रीदमन असे प्रश्न उद्भवले, वाढले.

देकार्तेचा प्रभाव
रेने देकार्ते या गणिततज्ज्ञ-विचारवंताने हे जग विश्व नीर्जीव व उद्देशहीन आहे, एखाद्या गोष्टीचे ज्ञान मिळवायचे तर त्या गोष्टीचे छोटे छोटे भाग करून त्याचा अभ्यास करावा, असे सांगितले. काप्रा म्हणतात, आपल्या गेल्या दोन शतकांच्या विज्ञान प्रगतीच्या मुळाशी हे देकार्ते याचे तत्त्वज्ञान आहे. न्यूटन यांनी सगळे विश्व गणिती पद्धतीने काम करणारे यंत्र आहे असा समज आपल्या कामातून दृढ केला. आपले एकूण विज्ञान-तंत्रज्ञान या देकार्ते यांच्या विचारप्रणालीमुळे चुकीच्या दिशेने विकसित झाले. त्यामुळेच आपण आपल्या समस्या संपवू शकलो नाही.
काप्रा म्हणतात की, अणुयुद्ध, नैसर्गिक पर्यावरणाची हानी, दारिद्य्र, कुपोषण ही वेगवेगळी संकटे नसून ते एकाच महासंकटाचे पैलू आहेत. कालबाह्य झालेल्या विश्वविषयक दृष्टिकोनाला आपण कवटाळून बसल्याने हे महासंकट निर्माण झाले आहे.

अर्थशास्त्राचे ‘शास्त्री’करण
अर्थशास्त्राला ‘शास्त्र’पदास पोहचविण्यासाठी अर्थतज्ज्ञांनी अर्थशास्त्राकडे गुणात्मकपणे न पाहता संख्यात्मक मोजमापांनी पाहायला सुरुवात केली. उत्पादन वाढ, त्यासाठी उपभोग वाढ करता करता हवा, पाणी, जमीन, पर्यावरणाच्या नाशाकडे दुर्लक्ष केपले. आजचे अर्थशास्त्र वाढीच्या संकल्पनेने पछाडलेले आहे. चुकीच्या ‘शास्त्री’करणामुळे असंतुलित वाढ केली गेली. संपत्ती म्हणजे भौतिक संचय अशी व्याख्या तयार झाली. मानवी जीवनाचे संपन्नीकरण झाले नाही. सर्वांना सोबत घेऊन, पर्यावरण सांभाळत केलेली वाढच खर्या अर्थाने विकास ठरतो हे लक्षातच घेतले नाही. त्यामुळे जगभर समस्याच समस्या निर्माण झाल्या. रासायनिक खते वाढवून आपण उत्पादन वाढवले. पण त्यावेळी त्या नफ्यातून जमिनीचा घसरलेला पोत वजा करायचे आपण विसरलो. विखंडित विचारांमुळे असे झाले. म्हणून एकत्र विचार हवा. त्यातून खरी संतुलित वाढ आणि संपन्नता साधता आली असती.
तंत्रज्ञानाच्या विकासातही आपण समतोल साधला नाही. त्यातून लोकांचे शोषण झाले. दारिद्य्र वाढले.पर्यावरणाची हानी झाली. आरोग्याचे नुकसान झाले. अतोनात वाढ हीच आपण प्रगती समजून बसलो. त्यांनी काय काय गमावले याचा विचार केला नाही. बहुराष्ट्रीय उद्योग जन्मास आले आणि वाढले. त्यांनी मानवी समाजाचे मोठे नुकसान केले. विनाशकारी वाढ झाली. त्या वाढीने अनेक समस्या जन्मास घातला.
या अतिवेगवान, विचित्र वाढीसाठी पर्यावरणाला घातक मार्गांनी  ऊजेचे उत्पादन केले गेले. अविचाराने  ऊर्जेचा वापर केला गेला. त्यातून प्रदूषण वाढले, नैसर्गिक साधनांचा नाश झाला. जगासमोर ऊर्जासंकट उभे राहिले. जग अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. 50 कोटी लोक कुपोषित आहेत. 40 टक्के लोकांना आरोग्यसेवा नाही. मात्र अनेक गरीब देश आरोग्याच्या क्षेत्रापेक्षा तीनपट अधिक खर्च शस्त्रास्त्रांवर करतात. 50 टक्के शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ शस्त्रास्त्रांच्या संशोधनात गुंतून पडले आहेत.

शेतीचे संकटही देकार्तेच्या विचारामुळे
देकार्तेच्या विचारानुसार, आपण शेतीचाही विचार केला. जमिनीला यंत्र समजून अधिक पिकासाठी जैविक, रासायनिक घटकांचे नियंत्रण करून उत्पादन वाढवले. त्यातून जमिनीचा कस व पर्यावरण बिघडवले. परिणामी शेती संकटात आली. काप्रा म्हणतात, हरित क्रांतीने शेतकर्याला, जमिनीला आणि भुकेलेल्यांना फायदा झाला नाही. तेल उद्योगांचे उखळ तेवढे पांढरे झाले.

स्त्रीवादाचा पुरस्कार
काप्रा स्त्रीवादाचा पुरस्कार करतात. ते म्हणतात की, आपली आदर्श पद्धतीही पुरुषसताक, स्त्रीचे दमन करणारी होती. प्रणाली दृष्टिकोन आणि स्त्रीवाद दृ्रष्टिकोन या समांतर प्रक्रिया आहेत. स्त्रियांना योग्य स्थान दिले तरच यिनला आलेले गौणत्व दूर होईल आणि यिन-यँग याचा समतोल साधला जाईल. निसर्गाशी असणारा स्त्रियांचा संबंध अधिक ठसठशीत असतो. त्या विराटाशी, निसर्गाच्या चक्राशी जवळून जोडलेल्या असतात, असेही काप्रा सांगतात.

आरोग्याचे प्रश्न
काप्रा सांगतात, आरोग्याचा विचार शरीराला होणारे रोग व त्यांच्यावरील औषधोपचार एवढाच केला गेला. आरोग्य ही शारीरिकच नव्हे तर मानसिक आणि त्यापुढे जाऊन कौटुंंबिक, सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय कल्पना आहे, याचा एकात्म विचार करायला हवा. तो तसा न केला गेल्यामुळे आज आरोग्याचा प्रश्न गंभीर बनून राहिला आहे. कुपोषणामुळे गरीब देशात आजार व मृत्यू होतात. विकसित देशात हृदयविकार, कर्करोग यांचे प्रमाण अधिक आहे. हिंसाचार, गुन्हेगारी, आत्महत्या, मद्यपान, व्यसने, अपघात या समस्या वाढल्या आहेत. आजचे वैद्यकशास्त्र यातील अनेक आरोग्य समस्यांचा विचारच करीत नाही. शिवाय एकात्मिक विचारही केला जात नाही. त्यातून आरोग्य ही समस्या वाढत चालली आहे.
काप्रा हे खरे तर पदार्थ वैज्ञानिक, पण आपल्या विज्ञान-तंत्रज्ञानाने मानवाचे प्रश्न का सुटले नाहीत याचा विचार करताना त्यांनी तत्त्वज्ञानाला विज्ञानाशी जोडून घेतले. पश्चिमी जगात जन्मलेले, वाढलेले असून पूर्वेकडील तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून एकात्म विचाराची आवश्यकता पटवून दिली. त्यासाठी ग्रंथनिर्मिती केली. आंधळेपणाने विकासापाठी धावणार्या आपण सर्वांनी तो विचार, समजून घेतला पाहिजे आणि काप्रा यांची परिचय करून दिल्याबद्दल दिलीप कुलकर्णी यांच्याविषयी कृतज्ञतेची भावनाही मनात जपली पाहिजे.
-      वैभव बळीराम चाळके
       9702723652