विज्ञान- तंत्रज्ञानाच्या
विकासाने कुपोषण, गरिबी, आजार हे प्रश्न का सुटले नाहीत?
मानवाने विज्ञान-तंत्रज्ञानात केवढी तरी मोठी प्रगती केली आहे.
सगळे जग एका क्लिकवर आले आहे परग्रहावर वस्ती करण्याची स्वप्ने मानवाला पडू लागली आहेत.
मात्र असे असताना जगातील कुपोषण, आजार, दारिद्य्र, प्रदूषण, युद्ध या आणि अशा समस्या मानवाला संपवता आलेल्या नाहीत. असे
का? असा प्रश्न प्रत्येक विचारी माणसाला केव्हा ना केव्हा पडलेला असतोच. अलीकडेच मी
पर्यावरणस्नेही जीवनपद्धतीचा विचार आणि स्वीकार करणार्या आमच्या विनित वाघे
नावाच्या मित्राच्या चिपळूणच्या घरी गेलो होतो. निसर्गाशी नाते सांगणारे आणि निर्माण
करणारे घर त्याने तेथे बांधले आहे. त्या भेटीत त्याने त्याच्या एका ज्येष्ठ मित्राने, दिलीप कुलकर्णी यांनी
लिहिलेले ‘वेगळ्या विकासाचे वाटाडे’ हे पुस्तक वाचावयास दिले. वर उपस्थित केलेल्या
प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात सापडली ‘यिन्-यँग्चा समतोल’ नावाच्या प्रकरणात फ्रिट्यॉप
काप्रा या शास्त्रज्ञाच्या विचारांचा परिचय करून दिला आहे. काप्रा म्हणतो, जगाच्या विकासाची दिशा
चुकली. विज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमागचे तत्त्व चुकले, म्हणूनच आज एवढ्या विकासानंतरही माणसाच्या खर्या समस्या तशाच आहेत.
किंबहुना वाढलेल्या दिसतात.
कोण आहे हा फ्रिट्यॉप काप्रा?
डॉ.फ्रिट्यॉफ काप्रा हे मूळचे ऑस्ट्रिया देशातील व्हिएन्नाचे
आहेत. 1966 साली त्यांनी पदार्थ विज्ञानात पदवी मिळवली. मग फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका येथील विद्यापीठांतून
त्यांनी संशोधन व अध्यापन केले. अणूचा अभ्यास हे त्यांचे संशोधन क्षेत्र आहे. पण फक्त
तेवढाच अभ्यास न करता त्यांनी चीनमधील ताओ तत्त्वज्ञान अभ्यासले. हिंदू, बौद्ध आणि झेन-बौद्ध
तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. विज्ञान आणि तत्त्वज्ञान या दोन विरुद्ध गोष्टी मानल्या
जातात. विज्ञान जड-द्रव्य यांचा अभ्यास करते तर तत्त्वज्ञान चैतन्य, आत्मा, ब्रह्म वगैरे गोष्टींचा
अभ्यास करते. पण काप्रा यांना पदार्थ विज्ञानातील निष्कर्ष तत्त्वज्ञानाशी जुळताना
आढळले. त्यातून त्यांनी नवा विचार मांडला. ‘दि ताओ फिजिक्स’ आणि ‘दि टर्निंग पॉइंट’
ही त्यांची या नव्या विचाराची पुस्तके जगभर गाजली. त्यातील ‘दि टर्निंग पॉइंट’ या ग्रंथातील
विचार दिलीप कुलकर्णी यांनी उपरोक्त दीर्घ लेखात मांडला आहे.
योग्य दिशा कोणती?
व्यक्ती, समाज हा एका नैसर्गिक चक्राचा भाग आहेत. विश्वाचा एकात्मपणे
विचार केला पाहिजे. ही नवी जाणीव निसर्गवादी आहे. संपूर्ण पर्यावरण व्यवस्था ही एक
मोठी प्रणाली असून अन्य प्रणाली तिचे उप-उप भाग आहेत. या संपूर्ण जाळ्यातील एखाद्या
धाग्याचा स्वतंत्र विचार करता येत नाही. त्या धाग्याचा विचार त्या जाळ्याच्या संदर्भात
करावा लागतो. चिनी तत्त्वज्ञानात यिन् आणि यँग अशा दोन कल्पना आहेत. आपल्याकडे जशा
प्रकृती-पुरुष कल्पना आहेत, तशाच त्या आहेत. यिन म्हणजे प्रकृती, तर यँग म्हणजे पौरुष! यिन म्हणजे स्त्री, पृथ्वी, रात्र, अंधार, हिवाळा, आर्द्रता, नमतेपणा, समजूतदारपणा, सहकार्य तर यँग म्हणजे
पुरुष, सूर्य, दिवस, उजेड, उन्हाळा, कोरडेपणा, उष्णता, ताठपणा, आक्रमकता, स्पर्धात्मकता होय. यशातील गुण परस्पर विरोधी आहेत. ताओ तत्त्वज्ञान सांगते, या यिन-यँगमध्ये समतोल
हवा. यिन-यँग हे वाईट नसते. त्याचा अतिरेक वाईट असतो. काप्रा म्हणतात, आपण विज्ञान तंत्रज्ञानाचा
विकास यिन-यँग मधील यँग गुणाच्या वाढीसाठी केला. म्हणून त्या दोहोतील समतोल संपला.
आपल्या समस्या त्यामुळे कमी न होता वाढत गेल्या. त्यातून दारिद्य्र, कुपोषण, आजार, ऊर्जानाश, स्त्रीदमन असे प्रश्न
उद्भवले, वाढले.
देकार्तेचा प्रभाव
रेने देकार्ते या गणिततज्ज्ञ-विचारवंताने हे जग विश्व नीर्जीव
व उद्देशहीन आहे, एखाद्या गोष्टीचे ज्ञान मिळवायचे तर त्या गोष्टीचे छोटे छोटे भाग करून त्याचा अभ्यास
करावा, असे सांगितले. काप्रा म्हणतात, आपल्या गेल्या दोन शतकांच्या विज्ञान प्रगतीच्या
मुळाशी हे देकार्ते याचे तत्त्वज्ञान आहे. न्यूटन यांनी सगळे विश्व गणिती पद्धतीने
काम करणारे यंत्र आहे असा समज आपल्या कामातून दृढ केला. आपले एकूण विज्ञान-तंत्रज्ञान
या देकार्ते यांच्या विचारप्रणालीमुळे चुकीच्या दिशेने विकसित झाले. त्यामुळेच आपण
आपल्या समस्या संपवू शकलो नाही.
काप्रा म्हणतात की, अणुयुद्ध, नैसर्गिक पर्यावरणाची हानी, दारिद्य्र, कुपोषण ही वेगवेगळी
संकटे नसून ते एकाच महासंकटाचे पैलू आहेत. कालबाह्य झालेल्या विश्वविषयक दृष्टिकोनाला
आपण कवटाळून बसल्याने हे महासंकट निर्माण झाले आहे.
अर्थशास्त्राचे ‘शास्त्री’करण
अर्थशास्त्राला ‘शास्त्र’पदास पोहचविण्यासाठी अर्थतज्ज्ञांनी
अर्थशास्त्राकडे गुणात्मकपणे न पाहता संख्यात्मक मोजमापांनी पाहायला सुरुवात केली.
उत्पादन वाढ, त्यासाठी उपभोग वाढ करता करता हवा, पाणी, जमीन, पर्यावरणाच्या नाशाकडे दुर्लक्ष केपले. आजचे
अर्थशास्त्र वाढीच्या संकल्पनेने पछाडलेले आहे. चुकीच्या ‘शास्त्री’करणामुळे असंतुलित
वाढ केली गेली. संपत्ती म्हणजे भौतिक संचय अशी व्याख्या तयार झाली. मानवी जीवनाचे संपन्नीकरण
झाले नाही. सर्वांना सोबत घेऊन, पर्यावरण सांभाळत केलेली वाढच खर्या अर्थाने विकास ठरतो
हे लक्षातच घेतले नाही. त्यामुळे जगभर समस्याच समस्या निर्माण झाल्या. रासायनिक खते
वाढवून आपण उत्पादन वाढवले. पण त्यावेळी त्या नफ्यातून जमिनीचा घसरलेला पोत वजा करायचे
आपण विसरलो. विखंडित विचारांमुळे असे झाले. म्हणून एकत्र विचार हवा. त्यातून खरी संतुलित
वाढ आणि संपन्नता साधता आली असती.
तंत्रज्ञानाच्या विकासातही आपण समतोल साधला नाही. त्यातून लोकांचे
शोषण झाले. दारिद्य्र वाढले.पर्यावरणाची हानी झाली. आरोग्याचे नुकसान झाले. अतोनात
वाढ हीच आपण प्रगती समजून बसलो. त्यांनी काय काय गमावले याचा विचार केला नाही. बहुराष्ट्रीय उद्योग जन्मास आले आणि वाढले.
त्यांनी मानवी समाजाचे मोठे नुकसान केले. विनाशकारी वाढ झाली. त्या वाढीने अनेक समस्या
जन्मास घातला.
या अतिवेगवान, विचित्र वाढीसाठी पर्यावरणाला घातक मार्गांनी ऊजेचे उत्पादन केले गेले. अविचाराने ऊर्जेचा वापर केला गेला. त्यातून प्रदूषण वाढले, नैसर्गिक साधनांचा
नाश झाला. जगासमोर ऊर्जासंकट उभे राहिले. जग अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. 50 कोटी लोक कुपोषित आहेत. 40 टक्के लोकांना आरोग्यसेवा नाही. मात्र अनेक
गरीब देश आरोग्याच्या क्षेत्रापेक्षा तीनपट अधिक खर्च शस्त्रास्त्रांवर करतात. 50 टक्के शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ शस्त्रास्त्रांच्या संशोधनात गुंतून पडले आहेत.
शेतीचे संकटही देकार्तेच्या विचारामुळे
देकार्तेच्या विचारानुसार, आपण शेतीचाही विचार केला. जमिनीला यंत्र समजून
अधिक पिकासाठी जैविक, रासायनिक घटकांचे नियंत्रण करून उत्पादन वाढवले. त्यातून जमिनीचा कस व पर्यावरण
बिघडवले. परिणामी शेती संकटात आली. काप्रा म्हणतात, हरित क्रांतीने शेतकर्याला, जमिनीला आणि भुकेलेल्यांना फायदा झाला नाही. तेल उद्योगांचे उखळ तेवढे पांढरे झाले.
स्त्रीवादाचा पुरस्कार
काप्रा स्त्रीवादाचा पुरस्कार करतात. ते म्हणतात की, आपली आदर्श पद्धतीही
पुरुषसताक, स्त्रीचे दमन करणारी होती. प्रणाली दृष्टिकोन आणि स्त्रीवाद दृ्रष्टिकोन या समांतर
प्रक्रिया आहेत. स्त्रियांना योग्य स्थान दिले तरच यिनला आलेले गौणत्व दूर होईल आणि
यिन-यँग याचा समतोल साधला जाईल. निसर्गाशी असणारा स्त्रियांचा संबंध अधिक ठसठशीत असतो.
त्या विराटाशी, निसर्गाच्या चक्राशी जवळून जोडलेल्या असतात, असेही काप्रा सांगतात.
आरोग्याचे प्रश्न
काप्रा सांगतात, आरोग्याचा विचार शरीराला होणारे रोग व त्यांच्यावरील
औषधोपचार एवढाच केला गेला. आरोग्य ही शारीरिकच नव्हे तर मानसिक आणि त्यापुढे जाऊन कौटुंंबिक, सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय कल्पना
आहे, याचा एकात्म विचार करायला हवा. तो तसा न केला गेल्यामुळे आज आरोग्याचा प्रश्न गंभीर
बनून राहिला आहे. कुपोषणामुळे गरीब देशात आजार व मृत्यू होतात. विकसित देशात हृदयविकार, कर्करोग यांचे प्रमाण
अधिक आहे. हिंसाचार, गुन्हेगारी, आत्महत्या, मद्यपान, व्यसने, अपघात या समस्या वाढल्या आहेत. आजचे वैद्यकशास्त्र यातील अनेक आरोग्य समस्यांचा
विचारच करीत नाही. शिवाय एकात्मिक विचारही केला जात नाही. त्यातून आरोग्य ही समस्या
वाढत चालली आहे.
काप्रा हे खरे तर पदार्थ वैज्ञानिक, पण आपल्या विज्ञान-तंत्रज्ञानाने
मानवाचे प्रश्न का सुटले नाहीत याचा विचार करताना त्यांनी तत्त्वज्ञानाला विज्ञानाशी
जोडून घेतले. पश्चिमी जगात जन्मलेले, वाढलेले असून पूर्वेकडील तत्त्वज्ञानाचा अभ्यास
करून एकात्म विचाराची आवश्यकता पटवून दिली. त्यासाठी ग्रंथनिर्मिती केली. आंधळेपणाने
विकासापाठी धावणार्या आपण सर्वांनी तो विचार, समजून घेतला पाहिजे आणि काप्रा यांची परिचय
करून दिल्याबद्दल दिलीप कुलकर्णी यांच्याविषयी कृतज्ञतेची भावनाही मनात जपली पाहिजे.
-
वैभव बळीराम चाळके
9702723652
No comments:
Post a Comment