Saturday, March 3, 2018

kabir


jugalbandhi on fb......
Pramod bapat… 
आमचा कविमित्र गेली काही वर्षे सातत्याने कबीरांच्या रचना समवृत्तात आणतो आहे. गंगेवरचा एक एक दिवा गोदेवर आणण्याच्या त्याच्या या छंदाचे..नव्हे नव्हे हट्टाचे हे चार चरणांतून कौतुक :
कबीराच्या मागावरती तू, 
छंद म्हणू की हट्ट |
कबीराच्या मागावरचा तू
धरूनी धागा घट्ट ||
https://scontent-bom1-1.xx.fbcdn.net/v/t1.0-1/c0.5.32.32/p32x32/1229930_556398681076500_188244877_n.jpg?oh=8107d081cc3d30af0c004504979b560c&oe=5B475758
कबीर...
मरत मरत हे जग मरते बघ सहज मरतो कोण
कबिर असा एकदाच मेला मरण ये परतून
मरत मरत हे जग मेले रे विचार केला नाही
हीच हुशारी : आपुल्या हाती नसते इथले काही
मरायचे तर मरून जा रे सोडून हे जंजाळ
कशाकरिता मरावयाचे हरदिन शंभर वेळ
मरणाला घाबरतो त्याचे प्रेमच असते खोटे
प्रेमघराला पोचायाचे ते तर अवघड मोठे
अनंत निर्गुण अनाहताला पुजतो तोही मरतो
म्हणे कबिर की रामावरती प्रेम करी तो तरतो
ज्या मरणाला जग घाबरते मजलागि आनंद
कबीर म्हणे की ये मरणा ये तू तर परमानंद
पद्यानुवाद- 
सुवर्णसुत ९७०२७२३६५२

Vaibhav
गुरुजी, आपला आशीर्वाद..

bapat   
गुरूजी म्हणूनी आळविशी जरी 
लावून स्वर कोवळा |
कबीरधागा अलख जागवित 
आवळेल ना गळा ||


Vaibhav
शिष्यापाठी भूत लागता गुरू पळे का दूर?
भ्यालेला मी सभोवताली दिसतो फक्त कबीर।
bapat   
कबीर दिसता जवळ-दूर वा 
नुरते पुढती-मागे |
ज्योत अंतरी ठेव तेवती 
कबीर इतुके सांगे ||

Vaibhav
तानाबाना रंग पाहुनी विनतो कबीरशेला
पाठीवरती हात असू द्या कृपाभिलाषी चेला

bapat   
पाठीवरती दुजा कुणाचा 
हवा कशाला हात |
शब्ददिव्यांतून पहा तेवते
त्यां शेल्याची वात ||

Vaibhav
तरी वाटते असावेस तू पाठीशी 'बाप' टा
वरून द्याया थापट माझ्या अधार आतुन घटां

bapat   
'बाप टा'कुनी, गेह फुंकूनी
कबीर गंगेकाठी |
स्वये उजळतो निजघट, घेऊनी
विवेकफुंकणि ओठी ||

Vaibhav
कबीर मोठा गोष्ट निराळी त्याची माझ्याहुनी
पाठीवरती हात असू द्या; इतका तर मी गुणी!

bapat   
पाठ नको, तव पाठ कबीरी,
दोह्यांचा मज हवा |
गोदेमधल्या प्रतिबिंबातील
भिजका दोहा नवा ||

Vaibhav
या मातीच्या कुशीमधुनिया रुजेल काही नवे
पण मातीला तुझ्या कृपेचे जलसिंचन तर हवे

bapat   
स्वयंप्रकाशी बिंब तयाची
जळात दिसती रूपे |
श्रेय जळाचे वा बिंबाचे
उत्तर अगदी सोपे ||
या दोघांचे असणे होते
सार्थ तरी अन् तेव्हा |
दुज्या तटावर उभा कुणीसा
दृश्ये टिपतो जेव्हा ||
बिंब तळपते वरी कबीराचे
तळी वाहती भाषा |
तू टिपसी हे दर्शन-वैभव
पूर्ण इथे गुण-रेषा ||
दीर्घ चरण हे कबीर, भाषा
आणि तुझ्यास्तव तीन |
श्रेय तुझे तुजपाशी आहे
घे इतुके समजून ||

Vaibhav
खरेच तेही! तरी टिपणारा उभा कुणाच्या मुळे?
उभा वृक्ष हा कारण याची तुम्ही शिंपली मुळे

bapat   
मुळे शिंपती, जळे कोणती
कुणास कधी आकळे |
म्हणूनी दडती मुळे, डहाळ्यां-
वरी लखडती फळे ||

Vaibhav
कुणा कळते पण झाडाला ठावुक असते सारे
कुणामुळे माथ्यावर येती घोस फुलांचे न्यारे

bapat   
पुष्पफळे का कधी सांगती
कुठली माती ..पाणी? |
फुलून यावे, रसार्द व्हावे
यांतच सुफळ कहाणी ||


Vaibhav
सुफळ कहाणी मागे असते त्यास कसे विसरावे
कबिर म्हणे की देव भेटला तरी गुरूस भजावे



No comments:

Post a Comment