Monday, September 3, 2018

सिद्धपुरुष



एक दिवस ऑफिसातला सहकारी श्रीधर ओंकारला म्हणाला,
‘उद्या कार्यक्रमाला येणार?’
‘कुठे कसल्या?’
‘स्टार्ट नाऊ!’
‘काय आहे ते!’
‘यशाची सुरुवात! अशी बेसलाईन आहे त्याची!’
‘बकवास असणार!’
‘कशावरून?’
‘अरे, असे कार्यक्रम करणारेच तेवढे यशस्वी होतात. ऐकणारे होत नाहीत!’
‘निगेटिव्हच का बोलतोस?’
‘मग...’
‘चांगलं बोल ना! झाला तर झाला फायदा नाही झाला तर आपल्याला कुठे पैसे गुंतवायचेत. शंभर रुपये तर
तिकीट आहे.’
‘ठीक आहे, पण मला सांग तू, काय वेगळं असतं त्यात?’
‘यशस्वी बाराखडी’
तुला व्हायचंय का यशस्वी?’
‘हो! अर्थात!’
‘मग ठीक आहे. तुला यशस्वी करण्यासाठी मी तुला हा कार्यक्रम दाखवतो. अट एकच तू मला त्याचा काय फायदा झाला ते महिन्यानंतर प्रूफ करून दाखवायचंस!’
‘ओ.के.’
***
ओंकार बर्वे! वय वर्षे पंचेचाळीस! एका प्रायव्हेट कंपनीत कारकून म्हणून काम करणारा. घरात बायको, दोन मुलं, आई आणि वडील. परिस्थिती बेताची! पण ती लवकरच सुधारेल अशी आशा असलेलं कुटुंब! ओंकार हुशार, मेहनती. सतत कोणत्या ना कोणत्या कामात अखंड बुडालेला. बोलणं मृदू आणि गोड. त्यामुळेच मित्रमंडळी आणि नातेवाइकांत सगळ्यांना हवाहवासा!
***
श्रीधरला कार्यक्रम दाखवायचं पक्कं ठरलं. दोघे कार्यक्रमाला गेले.
कार्यक्रम छान झाला. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर ताबडतोब कृती करणं गरजेचं कसं आहे त्यावर तो ट्रेनर छान बोलला. श्रीधर भारावून गेला. ओंकारला त्याचं भाषण आणि विचार आवडले. पण हे ऐकून काही एखादा पटकन सुरुवात करेल आणि सुरुवात केलीच तरी यशस्वी होईल असं काही ओंकारला वाटलं नाही.
कार्यक्रम संपल्यावर दोघं परतीच्या वाटेवर गप्पा मारत होते. ओंकार म्हणाला,
‘काय करायचं ठरवलंयस?’
‘करणार काही तरी!’
‘एक महिन्याची मुदत आहे. नाहीतर 200चे 400 करून द्यावे लागतील तिकिटाचे पैसे!’
‘त्याची गरजच पडणार नाही!’
‘ठीक आहे पाहू!,’ ओंकार छद्मी हसत म्हणाला. श्रीधर 400 रुपये हरणार याबाबत त्याला पक्की खात्री होती.
संध्याकाळी ओंकार छोट्याला घेऊन गेला असता त्याला एकदम गार्डनमध्ये कालच्या कार्यक्रमाची आठवण झाली. वाटलं काय काय आयडिया काढतात लोक! कमाल वाटते यांची! लोकांच्या मनाचा नेमका ठाव घेतात. किती किती धंदे बोकाळलेत नुसते.
कुणी शेअर बाजाराचं ट्रेनिंग देतो, कुणी ब्युटिशियनचा कोर्स काढतो, कुणी व्यक्तिमत्त्व विकासाची कार्यशाळा घेतो, एवढंच काय तर गझललेखनाच्या कार्यशाळाही होतात. या सगळ्याच्या मुळाशी आहे ती पैसे कमविण्याची वृत्ती. एकदा पैसे कमवायचे म्हटले की लोक विज्ञानापासून बुवाबाजीपर्यंत काय वाटेल ते मार्ग शोधून काढतात.
सगळ्याच्या मुळाशी माणसाच्या मनाचा कमकुवतपणा! माणसं स्वतः कष्ट करून मोठं होण्यावर विश्वास ठेवत नाहीत. सतत पराभवाला घाबरत राहतात. मग असल्या ट्रेनर, बाबा आणि बायांना फसून पैसे गमावतात. मोठी स्वप्न दाखवून हे लोक फसवतात बापड्यांना! असल्या ट्रेनिंगमधून ट्रेनिंग देणाराच फक्त श्रीमंत आणि यशस्वी होतो. कुणीतरी म्हटलं आहे, जे स्वतःला जमलं नाही ते इतरांना करायला सांगतो तो ट्रेनर! खरंच आहे ते. मध्ये ‘मशरूम पिकवा’च खूळ आलं होतं, तेही यातूनच बोकाळलं होतं.
ओंकार विचारात हरवला होता.
तेवढ्यात मुलगा जवळ आला. त्याची तंद्री भंगली. पण रात्री झोपताना पुन्हा त्याच्या डोक्यात तेच विचार घुमू लागले. वाटलं आपणही हे तंत्र वापरून पाहायचं का? लोक मूर्ख असतील तर आपण खरंच ते मूर्ख आहेत का? हे पाहायलाच हवं!
काहीतरी केलं पाहिजे, त्याचे विचारचक्र वेगाने फिरू लागले.
एक पक्की योजना आखूनच तो झोपला.
लोक दुःखाला घाबरतात म्हणून ते असे वेड्यागत पैसे खर्च करत बसतात. हे नेमके ओळखून ओंकारने लोकांचे
दुःखच नाहीसे करण्याची बतावणी करण्याची युक्ती शोधून काढली. युक्ती सोपी होती. एकेका माणसाला भेटायचं. एकावेळी एकाला त्याला त्याच्या समस्या आणि दुःखे याबाबत बोलतं करायचं. एखादा खूपच चांगलं चाललंय म्हणाला तर त्याच्यासमोर बथ्थड भविष्याची चित्रे उभी करायची. मग माणूस नक्कीच घाबरेल. मग यावर उपाय आहे म्हणून सांगायचं. अट एकच! कोणता? कसा? कोण करणार? कुठे करणार? असले प्रश्न विचारायचे नाहीत. परिस्थिती बघून माणसांना रक्कम सांगायची. महिन्याभरात फरक न दिसल्यास पैसे परत मिळतील म्हणून सांगायचं,  योजना पक्की ठरली.
***
‘आता तुमच्यासमोर सर्वाधिक दुःख कसलं आहे सांगा. आधी आपण त्याचं निवारण करू?’ हॉटेलच्या कोपर्‍यात बसून ओंकार डाणगे साहेबांना विश्वासात
घेत होता.
‘सगळ्यात आधी माझं हे छातीतलं दुखणं थांबायला हवं. परवा रात्री दुखायला लागलं म्हणून जाग आली तर घाबरलो हो. वाटलं आता जगत नाही! आजकाल तरणी मुलं जातात हो अ‍ॅटॅकने!, ठाणगे साहेब काकुळतीला येऊन सांगत होते.
‘माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचं हेही दुखणं संपेल. मी काय करायचं ते करतो. तुम्ही फक्त एक काम करा. उद्याचा दिवस जाऊ दे. परवा दिवशी जाऊन कार्डिओलॉजिस्टकडून तपासून घ्या. तपासायची गरज नाही, पण मनाची खात्री झालेली बरी तुमच्या!  म्हणजे निर्धास्त व्हाल. ताबडतोब मला कळवा. रिपोर्ट नॉर्मल आले तर मी पास झालो आणि आजार आढळला तर नापास आणि नापास झालो तर सगळी फी परत. त्याच दिवशी घेऊन जा, असं आतापर्यंत तरी
झालं नाही.’
ठाणगे मोठ्या विश्वासाने बाहेर पडले.
ओंकारने देवाला हात जोडले आणि म्हणाला, ‘या माणसाला हृदयविकार नसू दे रे बाप्पा! त्याचे पाच हजार खाल्लेत आपण!’
त्या दिवशी ओंकार एका बाईंना समजावत होता. त्याच हॉटेलात तेव्हा ठाणगे आले. डोळ्यात पाणी आणत म्हणाले, ‘उपकार झाले तुमचे! रिपोर्ट नॉर्मल आहेत!’
ओंकार म्हणाला, ‘छान, आता घाबरू नका. सगळं हळुहळू व्यवस्थित मार्गी लागेल!’
एवढा मोठा साहेब, पण हात जोडून धन्यवाद म्हणाला.
ओंकारसमोर बसलेल्या आजीबाईही ओंकारकडे अपार आदराने पाहत म्हणाल्या,
‘काय होतं यांचं?’
‘छातीचं दुखणं... गेलं... पळालं!’
‘छान!’
‘ते जाऊ दे. आपण आपल्या विषयाकडे वळू. तर तुमचा डायबेटीस अवघड काम आहे. काही गोष्टींवर कायमस्वरूपी पर्याय नसतात, पण तुमच्या आजाराचा तुम्हाला त्रास होणार नाही याचा बंदोबस्त करू आपण! गेल्या पाच वर्षांमध्ये जेवढ्या सुखी नव्हता तेवढ्या सुखी आणि आनंदी जगू शकता तुम्ही. तुम्हाला थोडंसं संयमानं आणि काटेकोर वागावं लागेल, पण ती ताकद तुमच्यात निर्माण करू आपण. मी काय केलं, कोठे जाऊन केलं, कसं केलं याबाबत शंका मनात ठेवायची नाही. कुणाला याबाबत काही बोलायचं नाही. उद्या डॉक्टरांकडे जाऊन या. त्यांनी सांगितलेल्या औषधगोळ्या वेळेवर घ्या. मस्त उड्या मारू लागाल लवकरच!’
‘तेच पाहिजे बघा.’ उरली वर्षं हातपाय हलवत गेली म्हणजे झालं!’
‘काही चिंता करू नका आणि कधी अडचण आली तर माझा नंबर आहेच! कधीही फिरवा! काळजी करू नका जा. सगळा बंदोबस्त करतो.’
आजीबाई गेल्या. ओंकारनं पैशाचं पाकीट खिशातून काढून बॅगेत सरकवलं आणि तोही बिल भागवायला काऊंटरकडे चालू लागला.

ओंकार रोज कामावरून सुटल्यावर हाच एक धंदा करू लागला. ज्यांना भेटला त्यातली निम्मी माणसं त्याची गिर्‍हाईक होऊ लागली. पुढच्या काळात एकही माणूस पैसे मागायला आला नाही. वर्षभरात त्याने तीस एक लोकांच्या आयुष्यातलं दुःख दूर केलं. त्यातल्या अनेकांनी त्याचे पाय धरले. कुणी पुन्हा अडचणी घेऊन आलं. कुणी वाटेल ते पैसे मागा, पण हे काम कराच, म्हणू लागलं.
आपल्याकडे कोणतीच सिद्धी नाही ही गोष्ट तो सपशेल विसरून गेला. आपण एक प्रयोग सुरू केला होता हेही विसरला. पैसा माणसाला बदलतो म्हणणार्‍याचाच हा नमुना! ओंकार हळुहळू चमत्कारी झाला. त्याच्याही नकळत. बँक अकाऊंटवरचे पैसे वाढताना त्याला बरे वाटत होते. घरात बायको-मुलं सुखी होती. त्यांच्याही गालावर आता मूठभर मास चढलं होतं. एक-दोन नातेवाईक हा विकास पाहून बोटे मोडत होती, पण तेवढीच. बाकींच्यासाठी तो एक देवदूतच ठरला होता.
आता आता तर त्याला रक्कमही सांगावी लागत नव्हती. लोक येतानाच अधिक पैसे आणीत आणि त्याच्या पायावर ठेवत.
ओंकारने हुशारीने स्वतःचा ‘बुवा-बाबा’ होणे टाळले होते. तो उगाच कुणालाही गिर्‍हाईक बनवत नसे आणि रोज फक्त एकालाच भेटून दोन तास गप्पा मारी. नेमके दुःखणे हेरी. त्याबद्दल जे जे सुचेल ते सर्व त्या माणसाला सांगत राही. बाहेर निघताना त्या माणसाचे खांदे रुंदावत. तो उभा राहून लढू लागे आणि जिंकून मोकळा होई. त्याचे श्रेय ओंकारलाच मिळत असे.
सगळं कसं छान चाललं होतं. पण...
***
ओंकार रुग्णालयात खॉटवर पडून आहे. माणसं त्याला भेटायला जमली आहेत. काल जवळचे नातेवाईक येऊन गेले. आज मित्रमंडळी आणि हितचिंतक! बहुतांश त्याची गिर्‍हाईके... नव्हे ज्यांच्या आयुष्यातलं दुःख ओंकारनं गायब केलं ते सर्व.
आलेले लोक शहाळी घेऊन आलेले. त्यांच्यात चौकशा सुरू होत्या, कधी झाला अपघात? कुठे? कसा काय झाला? चूक कोणाची होती? असे प्रश्न आणि ‘अजबच नाही!,’ ‘कसला विचित्र प्रकार!,’ ‘यांच्यावर उगाच ही पाळी!’ असले उद्गार पुन्हा पुन्हा उमटत होते.
झालं असं. काल सकाळी झेरॉक्स काढायला म्हणून ओंकार खाली उतरला. रस्ता क्रॉस करून पलीकडच्या फुटपाथवरून चालत होता. तेवढ्यात एक कार येऊन त्याला धडकली. तो सरळ जाऊन दूध केेंद्रावर आदळला. दुसर्‍या क्षणी बेशुद्ध पडला. ओळखीच्या चहावाल्याने बिल्डिंगमध्ये माहिती दिली. लोक भराभर रस्त्यावर उतरले आणि टॅक्सीत टाकून रुग्णालयात घेऊन गेले.
कारसमोर छोटी मुलगी आली. तिला वाचविण्यासाठी कार डावीकडे घेतली तर तिथे गाय बसलेली. तिच्यावर गाडी जाऊ नये म्हणून आणखी डावीकडे वळवली, तर ती सरळ येऊन ओंकारवर धडकली.
लोक रुग्णालयात येत-जात होते. ओंकारच्या मांडीचं हाड मोडलं होतं. कंबर चेचली होती. लोक हळहळत होते. एक जण दुसर्‍याला म्हणाला, ‘दुसर्‍याच्या दुःखात धावून जाणारा माणूस! आमची सगळी विघ्न यांनीच दूर पळवली.’
दुसरा म्हणाला, ‘ओंकार, तुम्ही लवकर बरे व्हाल. अहो, मला माझ्या आजारपणातून बाहेर काढलात तुम्ही. स्वतःला तर नक्कीच काढाल. आमच्या शुभेच्छा आहेत आपल्या पाठीशी!’
पहिला म्हणाला, ‘आजवर दुसर्‍यांच्या दुःखावर औषधोपचार केलात, आज स्वतःच्या दुःखावर करा आणि मोकळे व्हा यातून!’
ओंकारला त्यांच्या म्हणण्याचं बरं वाटलं आणि वाईटही.
बरं यासाठी की आपल्यामुळे या सर्वांची दुःख नाहीशी झाली आणि वाईट यासाठी की असं कोणतंच औषध आपल्यापाशी नाही.
***
सात वाजल्यानंतर लोक यायचे बंद झाले. बायको आठ वाजता येणार होती. तासभर झोप काढावी म्हणून ओंकार कुशीवर वळला. बराच वेळ निद्रादेवीची प्रार्थना करूनही त्याला झोप येईना आणि एकदम त्याला मगाच्या माणसाचे संवाद ऐकू यायला लागले. दुसर्‍याच्या दुःखात धावून जाणारा माणूस! आमची सगळी विघ्न यानंच दूर पळवली! एक दिवस आले आमच्याकडे हे भावोजी! त्यांना काहीतरी सांगून गेले. मग त्यांनी काय केलं कुणास ठाऊक पण त्या दिवसापासून आमची भांडणच मिटली! मुलाच्या अ‍ॅडमिशनची केवढी चिंता पडली होती. पन्नासएक हजार तरी कर्ज काढावं लागलं असतं. ओंकार आला. म्हणाला, असं असं करा. पैसे वाचतील आणि खरंच की हो अ‍ॅडमिशन झाली डोनेशनशिवाय! त्याला या वाक्यांनी बरं वाटलं, पण मग एक आणखी एकाचं म्हणणं पुन्हा पुन्हा आठवायला लागलं, ‘गंडवतो काय साल्या, तू पण धंद्याला लागला काय? पचणार नाय रे हे असलं!’ हा संवाद आठवला आणि ओंकारचा चेहरा पडला. काळजात धस्स झालं. वाटलं आपण आपल्या कर्माचीच फळं भोगतोय की काय? नक्कीच! नाहीतर त्या अपघातात आपण का उगाच भरडलो असतो. नीट फुटपाथवरून तर चालत होतो. विचारात बुडत असतानाच कंबेरतून कळ गेली. जीवघेणी कळ होती ती!
वाटलं, लोक, त्या सर्व लोकांची पळालेली दुःखे जर पैशाचा शोध घेत आपल्याकडेच आली तर... हा अपघात म्हणजे त्यातल्याच कुणाचं दुःख की काय?

- वैभव बळीराम चाळके

1 comment: