Tuesday, July 28, 2020

कृष्ण नव्हे भोगी... शंकर नव्हे जोगी...

कृष्ण नव्हे भोगी... शंकर नव्हे जोगी...

संतश्री तुकाराम महाराज यांची गाथा हा लाखो मराठीजनांच्या मनाचा विसावा आहे. रोज हजारो-लाखो लोक या गाथेतील अभंग वाचतात. समजून घेतात. समजून सांगतात. रोजच्या व्यवहारातील कितीतरी प्रश्नांची उत्तरे गाथेत दडलेली आहेत. ती उलगडता आली म्हणजे आपले नित्याचे प्रश्नही सहज उलगडतात. आधुनिक संत म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, त्या विनोबा भावे यांनी तुकारामांचे निवडक अभंग या नावाने गाथेचे एक संपादन केलेले आहे. मी अनेकदा हे संपादन वाचत असतो. दर वाचनात एखादा नवा अभंग उलगडतो. एखादा नवा चरण नव्याने समजून येतो. तुकारामांचा एखादा विचार नव्यानेच कळून येतो. एखाद्याचे चरणातली सूचकता लख्खपणे दिसू लागते.
संत तुकारामांच्या एका अभंगांमध्ये एक चरण असा आहे-
कृष्ण नव्हे भोगी/
शंकर नव्हे जोगी/
तुका पांडुरंगी/
हा प्रसाद लाभला//
आपल्याला माहीत असलेला कृष्ण हा तर भोगी आहे. तो गोकुळात दहीदूध चोरून खातो. तो गवळणीची छेड काढतो. त्यांच्या माठातले दही-दूध-लोणी खातो. गवळणी यमुना जळात न्हाऊ लागल्या की त्यांचे कपडे पळवितो. त्याच्याबद्दलच्या अनेक तक्रारी लोक यशोदेकडे येऊन करीत असतात. तो बासरी वाजवतो. मोरपीस आपल्या डोक्यावर धारण करतो. हे आपण आपल्या साहित्यातून पाहिलेले आहे. त्यामुळे आपल्याला श्रीकृष्ण हा भोगी वाटतो. श्रीकृष्णाचे जीवन ऐहिक सुखदुखःत गेले असे आपल्याला वाटते. ते खरेही आहे. पण मग गीता वाचायला लागलो की फळाची अपेक्षा न ठेवता कर्म कर असे सांगणारा कृष्ण आपल्यासमोर येतो. जग ही माया आहे. नश्वर आहे. नाशिवंत आहे. हे सांगणारा कृष्ण तत्त्वज्ञ म्हणून आपल्यासमोर उभा राहतो. मग आपल्याला कृष्ण भोगी की त्यागी असा प्रश्न पडतो.
शंकर हे दैवत आपण वैराग्याचे दैवत म्हणून ओळखतो. तो अंगाला राख फासतो आणि स्मशान वैराग्याच्या खुणा अंगावर वागवतो. सृष्टीची निर्मिती ब्रह्म करतो. तिचे पालन विष्णू करतो आणि तिचा नाश शंकर करतो, असेही आपल्या धर्मशास्त्रात सांगितले जाते. शंकराचे तांडव नृत्य आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेच. तेव्हा असा हा शंकर म्हणजे खरंतर त्यागाची परिसीमा होय. तो भोळा आहे. तो भक्तांवर प्रसन्न झाला की त्यांना हवे ते देतो, अशाही अनेक कथा आपण ऐकलेल्या आहेत. पण मग कधीतरी शंकराला पार्वती, गणेश आणि कार्तिकेय यांच्यासोबत पाहिले की, हा कुटुंबवत्सल माणूस आहे, असेही वाटायला लागते. शिवपार्वती जोडी तर आपणा सगळ्यांना माहीत आहे. शिवपार्वतीच्या कितीतरी कथा आपल्या साहित्यात आढळतात. मग मात्र आपल्याला प्रश्न पडतो की, शंकराला त्यागी म्हणावे की भोगी म्हणावे? ज्याप्रमाणे कृष्णाला भोगी म्हणता म्हणता तो त्यागी आहे हे आपल्या लक्षात येते, त्याचप्रमाणे शंकराला त्यागी म्हणता म्हणता तो भोगीही आहे असेही लक्षात येते.
जीवनाची ही व्यामिश्रता आहे. तीच खरी आहे. त्याचे आकलन म्हणजे जीवनाचे आकलन होय. हेच संत तुकाराम वरील चरणातील सांगतात. एकदा काही व्यामिश्रता समजू लागली ही मग कितीतरी गहन वाटणारे प्रश्न सहज सुटून जातात.
श्रावणामध्ये धार्मिक ग्रंथपठाणाची पद्धत आहे. गाथेसारख्या ग्रंथांचे पठण या काळात करायचे ते जीवनाचे नेमके आकलन व्हावे यासाठीच होय. विवेकाच्या कसोटीवर घासून घेतलेले पुराण आणि शास्त्रग्रंथातले ज्ञान आजही मोठे उपयोगाचे आणि मार्गदर्शक आहे यात शंका असण्याचे कारण नाही.
000

No comments:

Post a Comment