Sunday, September 4, 2022

आकाश कवेत घेणाऱ्या कविता

 आकाश कवेत घेणार्‍या कविता...


उत्तम निर्मिती मूल्य आणि तितक्याच उत्तम कविता असलेला ‘थुई थुई आभाळ’ हा कवितासंग्रह हाती आला आहे. मुलांना साहित्य-संस्कृतीची जाण यावी, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी गेली अनेक वर्षे सातत्याने अत्यंत उत्साहाने काम करणाऱ्या शिक्षक गोविंद पाटील यांचा हा संग्रह अत्यंत देखणा आणि साहित्य मूल्यांनी परिपूर्ण असा आहे. ज्येष्ठ चित्रकार पुंडलिक वझे यांच्या चित्रकारीने या संग्रहातले भावविश्व अप्रतिम साकारले आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्याचे आकाश कवेत घेणारा हा संग्रह आहे.

डॉ. राजन गवस यांनी या संग्रहाची पाठराखण करताना म्हटले आहे, ‘गोविंद पाटील हे मराठीतील प्रतिभावान कवी आहेत. त्यांच्या बालकवितांना रानशिवाराचा गंध आहे...’

‘कामकरी मुंग्या’ या कवितेत शेवटच्या दोन ओळी अशा आहेत

़़‘अपघाताचा वारा नाही

आळसाला थारा नाही’

कवी यात फक्त वर्णन करीत नाही, तर मुलांना नकळत एक संस्कारही देऊन जातो.

‘टोळ’ कवितेमध्ये शेवटच्या दोन ओळी अशा आहेत,

‘सोलापुरात असे टोळ उडत उडत आले

खिशातला माल विकून गब्बरसिंग झाले’

यात केवळ गंमत नाही, सावधानतेचा इशारा आहे.

‘मासोळी’ कवितेमध्ये सुरुवातीलाच केलेले वर्णन बहारदार आहे,

‘पाण्यातली मासोळी पोहण्यात दंग

पाण्यावर आली की चकाकते अंग’

‘ढगांची चित्रकारी’मध्ये,

‘काळे पांढरे ढग मिळून झाले गोळा

आभाळाच्या फळ्यावर चित्र काढली सोळा’

अशी सुरुवात आणि

‘चित्रकारी ढगांची बघत रहा भाऊ

शिकून नवीन काही मजा घेत जाऊ’ असा शेवट आहे.

‘देश म्हणजे’ या कवितेमध्ये,

‘देश हिरव्यागार डोंगररांगा

देश फुलांनी बहरलेल्या बागा

देश असतो सर्वांसाठी सुखाने राहण्याची सुरक्षित जागा

आपला देश जपू या

त्याच्यासाठी खपू या’

अशा विलक्षण अर्थ सांगणाऱ्या, पण साध्या, आवडतील अशा ओळी आहेत.

मुंग्यांवरची ‘सलाम मंग्यांनो’ अशी आणखी एक छान कविता या संग्रहात आहे. त्यातील या ओळी तर फारच सुरेख उतरल्या आहेत,

‘दिशा पाहून सगळं

विचार करून नीट

ऊन पाऊस वारा

पंचांग बिंच्यांग

आंधळ्या श्रद्धाना

नाहीच थारा...’

‘अजबपूर’ नावाच्या कवितेत कवी लिहितो,

‘अजबपूरची प्रजासुद्धा

अजबगजब प्रजा

निवडणुकीत पैसे खाऊन

निवडते नी राजा’

शिक्षक आणि पालकांनी हे थोडे विस्कटून सांगावे अशी कवितेची आणि कवीची अपेक्षा असेल.

‘कल्पनेच्या दुनियेत’ कवितेचा शेवट कवीने असा केला आहे,

‘कल्पनेच्या दुनियेत आज वाटेल खोटे

यातूनच लागतील ना शोध मोठे मोठे’

गोविंद पाटील हे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी प्रयत्न करणारे शिक्षक आहेत, असे जे मी वर म्हटले आहे, ते यातून अधोरेखित होताना दिसते.

मुलांच्या संवेदनशीलतेला आव्हान करण्याचे काम आपल्या नित्याच्या शिकवणीतून करणाऱ्या गोविंद पाटील यांनी ‘नवीन वासरू’ या कवितेमध्ये गाय व्यायल्याचे वर्णनसुद्धा इतके नेमके केले आहे की, मुलांना या सगळ्यातील सौंदर्य कळावे.

‘हळुवार आले बाहेर मुंडके आणि पाय

आजीने जोर लावून मोकळी केली गाय...’

कोरोना काळात शाळा व्यवस्थेला जो धक्का बसला त्याचीही नोंद या कवितासंग्रहातल्या ‘गाणी गाऊ’ नावाच्या कवितेत आढळते,

‘चिव चिव चिव

ऑनलाईन शाळेत रमेना जीव’

या ओळी मोठ्यांच्या जिव्हारी लागतात.

गोविंद पाटील यांच्या या संग्रहाने मोठ्या अपेक्षा निर्माण केल्या आहेत. येत्या काळात त्यांच्याकडून असेच दर्जेदार लेखन होत राहील आणि असेच काही संग्रह रसिकांच्या वाट्याला येतील, अशी अपेक्षा करू या. त्यांना शुभेच्छा देऊ या आणि त्यांच्या कामासाठी कृतज्ञही राहू या!

- वैभव बळीराम चाळके

९७०२७२३६५२

No comments:

Post a Comment