Saturday, December 24, 2022

खेडूत मुलींचा भाग्यविधाता

 

खेडूत मुलींचा भाग्यविधाता


फुटबॉलचा महाकुंभ नुकताच साजरा झाला. जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाचा आनंद साऱ्यांनीच लुटला. दूर तिकडे दोहामध्ये फुटबॉलचे सामने रंगत असताना अवघे जग त्यात सामील झाले होते. मेस्सी... मेस्सीची गर्जना आपल्या गावखेड्यातही ऐकायला मिळाली. याच फुटबॉलने झारखंडमधील रांचीशेजारच्या कर्मा नावाच्या खेड्यातील २५० मुलींच्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. आनंद कुमार गोपे या विलक्षण माणसाचे हे आगळेवेगळे काम प्रेरणादायी आहे. खेळावरील प्रेम म्हणजे कोणी तरी जिंकल्यावर केवळ जल्लोष करणे नव्हे, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
कर्मा गावातील बहुतांश लोकसंख्या आदिवासी आहे. राज्याच्या राजधानीपासून जवळ असूनही या गावातील अनेक मुलींना स्वतंत्र जीवन जगण्याची परवानगी नाही. कुटुंबातील सदस्यांनी नेमून दिलेली कामे करण्याशिवाय त्या घराबाहेर पडत नाहीत. लहान वयातच त्यांचे विवाह केले जातात. मात्र आनंद कुमार यांनी या गावातील मुलींच्या आयुष्यात फुटबॉल खेळाच्या मदतीने नवसंजीवनी भरली आहे. माजी फुटबॉल खेळाडू आणि परवानाधारक प्रशिक्षक असलेल्या आनंद यांनी आपले जीवन ही रत्ने घडवण्यासाठी समर्पित केले आहे.
३० वर्षीय आनंद यांना लहानपणापासून फुटबॉलची आवड आहे. आई-वडिलांनी त्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले. २०१०, २०११ आणि २०१२ मध्ये रांची लीग आणि जिल्हा स्तरावरही ते खेळले आहेत; मात्र बेताच्या आर्थिक परिस्थितीने त्यांना कधीही राष्ट्रीय स्तरावर सहभागी होता आले नाही. आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी आपले कौशल्य सामाजिक कारणासाठी वापरण्याचे ठरवले आणि कर्मामधल्या मुलींना त्यांचा भाग्यविधाता लाभला. गावात अनेक मुलींचे काही हजार रुपयांच्या हुंड्यासाठी लहान वयात विवाह केले जातात आणि राजस्थान, हरियानासारख्या राज्यांत त्यांची पाठवणी केली जाते, हे पाहून आनंद यांनी या मुलींना फुटबॉल शिकवायचे ठरवले; पण हे आव्हान सोपे नव्हते. अल्पशिक्षित, अशिक्षित ग्रामस्थांना मुलींचे सक्षमीकरण पटवून देण्यात सहा महिन्यांहून अधिक काळ गेला. तेव्हा कुठे त्यांच्या पालकांनी परवानगी दिली. ऑक्टोबर २०१३ मध्ये १५ मुलींना त्यांच्या पालकांनी फुटबॉल खेळण्याची परवानगी दिली आणि या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला सुरुवात झाली; पण स्थानिक रहिवाशांनी त्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुलींनी फुटबॉल खेळणे आणि शॉर्ट्स परिधान करणे त्यांना रुचत नव्हते.
फूटबॉल खेळू लागलेल्या मुलींना आनंद यांनी शाळेत दाखल केले. त्यामुळे त्या शाळेतील फुटबॉल संघांचा भाग बनू शकल्या. हळूहळू त्यांनी आपल्या गावातील २५० हून अधिक मुली आणि ५० मुलांना प्रशिक्षण दिले. २५ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केले. आठ मुलींनी इंग्लंडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. सहा मुली डेन्मार्कमध्ये खेळल्या आहेत. अनिता कुमारी आणि सोनी मुंडा या दोघींना २०२२ च्या फिफा विश्वचषकासाठीच्या शिबिरासाठी निवडण्यात आले होते.
एका विद्यार्थिनीचा बालविवाह होण्यापासूनही त्यांनी रोखला आहे. १३ वर्षांच्या त्या मुलीला २५ हजार रुपयांसाठी राजस्थानात पाठवले जात होते. त्याच मुलीची नंतर झारखंडच्या १४ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली. पुढे ती ताजिकिस्तानमध्ये भारतीय संघासाठी खेळली.
आनंद यांचे काम केवळ अवर्णनीय असे आहे. एका बाजूला देश मंगळ मोहिमा राबवत असताना दुसऱ्या बाजूला आजही लाखो लोक दारिद्र्यात आणि परंपरांच्या बेड्यांत गुरफटलेले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या सरकारी योजना असूनही समाज अपेक्षित उंची गाठू शकलेला नाही; मात्र आनंद कुमारसारखे लोक आपल्या एकट्याच्या हिमतीवर इतिहास रचत असतात. हजारो जणांचे आयुष्य घडवतानाच शेकडोंना प्रेरणा देण्याचे काम करीत असतात.

Sunday, December 11, 2022

मला गुरू नाही ः सुलोचना चव्हाण

 मला गुरू नाही ः सुलोचना चव्हाण



‘तू माझ्या नातवासारखा आहेस. मी तुला अरेतुरेच करते, चालेल ना रे?’  त्या पहिल्या भेटीत ‘अरे’ असे म्हणून पुन्हा पुन्हा आपुलकीने ‘अरे’ म्हणत राहिल्या.


त्याबद्दल सांगतोच; पण त्याआधी ...


साधारण आठवी-नववीचे वय होते. तेव्हा आमच्या शेजाऱ्यांकडे टेपरेकॉर्डर होता आणि काही कॅसेट होत्या. त्यात सुलोचना चव्हाण यांच्या लावण्यांची कॅसेट होती. त्यामध्ये ‘नाव-गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची...’  ‘तुझ्या उसाला लागल कोल्हा... ’ अशा एकाहून एक बहारदार लावण्या होत्या. त्या मला ऐकायला आवडत. कारण इतर गायिकांच्या आवाजापेक्षा या लावण्यांचा आवाज वेगळा होता. तो ऐकावा वाटे. त्यात नुकताच वयात येत होतो. त्यामुळे डबल मिनिंग कळत असल्याचा एक वेगळाच आनंद त्या लावण्या ऐकण्यात होत होता. अर्थात घर मोठ्या संस्काराचे असल्याने या लावण्या गुणगुणता येत नसत. त्या छोट्या आवाजात ऐकता येत, पण तरीही मी त्या चोरूनच ऐकत राहिलो.


त्यानंतर तब्बल दहा वर्षानंतर दैनिक ‘नवाकाळ’मध्ये रविवार पुरवणी सांभाळायला लागलो. तेव्हा मराठीतल्या ज्या नामवंत कलावंतांची चरित्रे आली नाही त्यांच्या चरित्राच्या काही नोंदी करणारी लेखमालिका असा विचार मनात आला. संपादकांनी आनंदाने होकार दिला. मग मी तेव्हा ज्यांची चरित्रे आली नव्हती, अशा शाहीर साबळे, संगीतकार वसंत शिंदे, गीतकार अनंत पाटील अशा काही मंडळींवर त्यांच्याशी सविस्तर आणि अनेकदा बोलून दोन-तीन लेखांच्या लेखमालिका चालवल्या. याच काळात सुलोचना चव्हाण यांच्यावर लेखमालिका लिहायचे ठरले. त्यांच्या फणसवाडीतल्या घरी गेलो. पहिल्या भेटीत त्यांनी मला उपरोक्त प्रश्न विचारला. 


छोट्या दोन खोल्यांच्या घरात त्या राहत होत्या. सोबत मिस्टर चव्हाण, मुलगा विजय, त्यांची पत्नी आणि चिरंजीव असे ते छोटेसे कुटुंब. त्यांचा दुसरा मुलगा अन्यत्र राहत असे.


पणसवाडीच्या या घरात मी अनेकदा त्या लेखांच्या निमित्ताने सुलोचना चव्हाण यांना भेटलो. त्यांचे सगळे आयुष्य त्यांनी उलगडून दाखवले. केवळ माझ्या एकट्यासाठी त्यांच्या लोकप्रिय असलेल्या जवळपास सगळ्या लावण्या थोड्या थोड्या म्हणून दाखवल्या. साबळे यांनी महाराष्ट्र गीत म्हणून दाखवले होते, तेव्हा मी शहारलो होतो, तसाच अनुभव पहिल्यांदा जेव्हा त्यांनी नावगाव कशाला पुसतात गायला तेव्हा आला. 


पहिल्या बैठकीत, त्यांनी त्यांच्या गायनाची सुरुवात कशी झाली, हिंदी गाण्याच्या क्षेत्रात त्यांचा दबदबा कसा निर्माण व्हायला लागला होता, हे सर्व सांगितले. त्या मजकुरातून मी एक लेख लिहिला. त्याचे शीर्षक दिले होते, ‘मला गुरू नाही.’ तो लेख वाचून अनेकांना आश्चर्य वाटले. लेखाखाली सुलोचना चव्हाण यांचा क्रमांक होता. त्यामुळे त्यांना अनेकांनी फोन करून ‘तुम्ही गुरू नाही असे कसे म्हणता’ वगैरे प्रश्न विचारले होते. त्या मला म्हणाल्या, मी सगळ्यांना सांगितले, खरेच मला गुरू नाही. म्हणजे संगीतकारांनी त्यांची त्यांची गाणी मला समजावून सांगितली हे  खरे; पण एरवी एखाद्या गायकाला एक गुरू असतो, तसा गुरू मला नाही, असे त्यांनी मला ठासून सांगितले होते. आजही तो लेख माझ्या संग्रही आहे. शोधायचा प्रयत्न करतोय; पण नेमका कुठे ठेवलाय, ते आठवेना झाले आहे.

सुलोचना चव्हाण यांच्यासोबत या लेखांनिमित्त बैठकी झाल्या. तेव्हा माझ्याकडे नोकियाचा वनवनझिरोझिरो मोबाईल होता. स्मार्टफोन बाजारात यायचे होते. त्यामुळे त्यांचा आणि माझा एकत्र फोटो नाही. पण पहिल्या भेटीपासून त्यांच्याशी आणि त्यांच्या मिस्टरांशीही घट्ट मैत्री झाली. त्यांची मिस्टर चव्हाण कविता लिहीत. त्यांच्या एक-दोन कविता मी ‘नवाकाळ’मध्ये छापून आणल्या, तर त्यांना केवढा आनंद झाला होता!

पुढे कधीतरी मी सहजच किंवा एखादी बातमी घेण्याच्या निमित्ताने त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांचा अनेकदा फोन येत असे. दरम्यान त्यांच्या एका मुलाचा मृत्यू झाला. फार हळहळल्या होत्या. मग मिस्टर चव्हाण गेले. तेव्हाही त्यांचे माझे बोलणे झाले होते. चिरंजीव विजय आणि त्यांचा मुलगा गिरगावात अनेकदा मला भेटत.  दोन क्षण बोलल्याशिवाय बाप-बटे कधी पुढे गेले नाहीत.

आयुष्यात आपण काय काय कमावले, याचा विचार करायला लागलो की, मला जे दहा-वीस क्षण आठवतात. त्यात शाहीर साबळे यांनी माझ्यासाठी गायलेले ‘महाराष्ट्र गीत’ आणि सुलोचना चव्हाण यांनी म्हटलेली ‘नावगाव कशाला पुसतात’ ही लावणी, आणि जयंत नारळीकरांनी मला लिहिलेले पत्र अशा काही गोष्टी हमखास आठवतात.

गेल्या काही वर्षांत सुलोचना चव्हाण यांना भेटलो नाही. त्यांचा आवाज ऐकला नाही. ‘नवाकाळ’ची नोकरी सोडली आणि गिरगावात जाणेही बंद झाले; पण आजही वाटते कधीतरी त्यांचा फोन येईल आणि आपल्या त्या विशिष्ट स्वरात त्या म्हणतील, ‘अरे वैभव... ’

प्रेम कसे मिळवावे हे शिकवणारा मला गुरू नाही; पण मी ते शिकलो आहे. सुलोचना चव्हाण यांनी गुरूशिवाय गाणे अवगत केले... अगदी तसेच!

- वैभव बळीराम चाळके

९७०२ ७२ ३६ ५२


Saturday, December 3, 2022

‘भाषा जनाची भाषा मनाची’


हा जना कोण?
मराठी भाषा विभागाने मराठी भाषेच्या प्रचार-प्रसार आणि संवर्धनासाठी घोषवाक्य आणि बोधचिन्ह जाहीर केले आहे. ‘भाषा जनाची भाषा मनाची’ असे हे घोषवाक्य आहे. या वाक्यातील ‘जना’ कोण? आपल्या जनी माहीत आहे. जना माहीत नाही. जन असा शब्द मराठी भाषेत आहे. त्याचे सामान्य रूप जना होते. मात्र तो अनेक वचनी शब्द असल्याने त्या सामान्य रूपावर अनुस्वार हवा. मराठी भाषा विभागाला एवढे कळत नसेल असे आपण म्हणू शकत नाही. म्हणून हा प्रश्न पडला आहे.
- वैभव बळीराम चाळके