मला गुरू नाही ः सुलोचना चव्हाण
‘तू माझ्या नातवासारखा आहेस. मी तुला अरेतुरेच करते, चालेल ना रे?’ त्या पहिल्या भेटीत ‘अरे’ असे म्हणून पुन्हा पुन्हा आपुलकीने ‘अरे’ म्हणत राहिल्या.
त्याबद्दल सांगतोच; पण त्याआधी ...
साधारण आठवी-नववीचे वय होते. तेव्हा आमच्या शेजाऱ्यांकडे टेपरेकॉर्डर होता आणि काही कॅसेट होत्या. त्यात सुलोचना चव्हाण यांच्या लावण्यांची कॅसेट होती. त्यामध्ये ‘नाव-गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची...’ ‘तुझ्या उसाला लागल कोल्हा... ’ अशा एकाहून एक बहारदार लावण्या होत्या. त्या मला ऐकायला आवडत. कारण इतर गायिकांच्या आवाजापेक्षा या लावण्यांचा आवाज वेगळा होता. तो ऐकावा वाटे. त्यात नुकताच वयात येत होतो. त्यामुळे डबल मिनिंग कळत असल्याचा एक वेगळाच आनंद त्या लावण्या ऐकण्यात होत होता. अर्थात घर मोठ्या संस्काराचे असल्याने या लावण्या गुणगुणता येत नसत. त्या छोट्या आवाजात ऐकता येत, पण तरीही मी त्या चोरूनच ऐकत राहिलो.
त्यानंतर तब्बल दहा वर्षानंतर दैनिक ‘नवाकाळ’मध्ये रविवार पुरवणी सांभाळायला लागलो. तेव्हा मराठीतल्या ज्या नामवंत कलावंतांची चरित्रे आली नाही त्यांच्या चरित्राच्या काही नोंदी करणारी लेखमालिका असा विचार मनात आला. संपादकांनी आनंदाने होकार दिला. मग मी तेव्हा ज्यांची चरित्रे आली नव्हती, अशा शाहीर साबळे, संगीतकार वसंत शिंदे, गीतकार अनंत पाटील अशा काही मंडळींवर त्यांच्याशी सविस्तर आणि अनेकदा बोलून दोन-तीन लेखांच्या लेखमालिका चालवल्या. याच काळात सुलोचना चव्हाण यांच्यावर लेखमालिका लिहायचे ठरले. त्यांच्या फणसवाडीतल्या घरी गेलो. पहिल्या भेटीत त्यांनी मला उपरोक्त प्रश्न विचारला.
छोट्या दोन खोल्यांच्या घरात त्या राहत होत्या. सोबत मिस्टर चव्हाण, मुलगा विजय, त्यांची पत्नी आणि चिरंजीव असे ते छोटेसे कुटुंब. त्यांचा दुसरा मुलगा अन्यत्र राहत असे.
पणसवाडीच्या या घरात मी अनेकदा त्या लेखांच्या निमित्ताने सुलोचना चव्हाण यांना भेटलो. त्यांचे सगळे आयुष्य त्यांनी उलगडून दाखवले. केवळ माझ्या एकट्यासाठी त्यांच्या लोकप्रिय असलेल्या जवळपास सगळ्या लावण्या थोड्या थोड्या म्हणून दाखवल्या. साबळे यांनी महाराष्ट्र गीत म्हणून दाखवले होते, तेव्हा मी शहारलो होतो, तसाच अनुभव पहिल्यांदा जेव्हा त्यांनी नावगाव कशाला पुसतात गायला तेव्हा आला.
पहिल्या बैठकीत, त्यांनी त्यांच्या गायनाची सुरुवात कशी झाली, हिंदी गाण्याच्या क्षेत्रात त्यांचा दबदबा कसा निर्माण व्हायला लागला होता, हे सर्व सांगितले. त्या मजकुरातून मी एक लेख लिहिला. त्याचे शीर्षक दिले होते, ‘मला गुरू नाही.’ तो लेख वाचून अनेकांना आश्चर्य वाटले. लेखाखाली सुलोचना चव्हाण यांचा क्रमांक होता. त्यामुळे त्यांना अनेकांनी फोन करून ‘तुम्ही गुरू नाही असे कसे म्हणता’ वगैरे प्रश्न विचारले होते. त्या मला म्हणाल्या, मी सगळ्यांना सांगितले, खरेच मला गुरू नाही. म्हणजे संगीतकारांनी त्यांची त्यांची गाणी मला समजावून सांगितली हे खरे; पण एरवी एखाद्या गायकाला एक गुरू असतो, तसा गुरू मला नाही, असे त्यांनी मला ठासून सांगितले होते. आजही तो लेख माझ्या संग्रही आहे. शोधायचा प्रयत्न करतोय; पण नेमका कुठे ठेवलाय, ते आठवेना झाले आहे.
सुलोचना चव्हाण यांच्यासोबत या लेखांनिमित्त बैठकी झाल्या. तेव्हा माझ्याकडे नोकियाचा वनवनझिरोझिरो मोबाईल होता. स्मार्टफोन बाजारात यायचे होते. त्यामुळे त्यांचा आणि माझा एकत्र फोटो नाही. पण पहिल्या भेटीपासून त्यांच्याशी आणि त्यांच्या मिस्टरांशीही घट्ट मैत्री झाली. त्यांची मिस्टर चव्हाण कविता लिहीत. त्यांच्या एक-दोन कविता मी ‘नवाकाळ’मध्ये छापून आणल्या, तर त्यांना केवढा आनंद झाला होता!
पुढे कधीतरी मी सहजच किंवा एखादी बातमी घेण्याच्या निमित्ताने त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांचा अनेकदा फोन येत असे. दरम्यान त्यांच्या एका मुलाचा मृत्यू झाला. फार हळहळल्या होत्या. मग मिस्टर चव्हाण गेले. तेव्हाही त्यांचे माझे बोलणे झाले होते. चिरंजीव विजय आणि त्यांचा मुलगा गिरगावात अनेकदा मला भेटत. दोन क्षण बोलल्याशिवाय बाप-बटे कधी पुढे गेले नाहीत.
आयुष्यात आपण काय काय कमावले, याचा विचार करायला लागलो की, मला जे दहा-वीस क्षण आठवतात. त्यात शाहीर साबळे यांनी माझ्यासाठी गायलेले ‘महाराष्ट्र गीत’ आणि सुलोचना चव्हाण यांनी म्हटलेली ‘नावगाव कशाला पुसतात’ ही लावणी, आणि जयंत नारळीकरांनी मला लिहिलेले पत्र अशा काही गोष्टी हमखास आठवतात.
गेल्या काही वर्षांत सुलोचना चव्हाण यांना भेटलो नाही. त्यांचा आवाज ऐकला नाही. ‘नवाकाळ’ची नोकरी सोडली आणि गिरगावात जाणेही बंद झाले; पण आजही वाटते कधीतरी त्यांचा फोन येईल आणि आपल्या त्या विशिष्ट स्वरात त्या म्हणतील, ‘अरे वैभव... ’
प्रेम कसे मिळवावे हे शिकवणारा मला गुरू नाही; पण मी ते शिकलो आहे. सुलोचना चव्हाण यांनी गुरूशिवाय गाणे अवगत केले... अगदी तसेच!
- वैभव बळीराम चाळके
९७०२ ७२ ३६ ५२
No comments:
Post a Comment