खेडूत मुलींचा भाग्यविधाता फुटबॉलचा महाकुंभ नुकताच साजरा झाला. जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाचा आनंद साऱ्यांनीच लुटला. दूर तिकडे दोहामध्ये फुटबॉलचे सामने रंगत असताना अवघे जग त्यात सामील झाले होते. मेस्सी... मेस्सीची गर्जना आपल्या गावखेड्यातही ऐकायला मिळाली. याच फुटबॉलने झारखंडमधील रांचीशेजारच्या कर्मा नावाच्या खेड्यातील २५० मुलींच्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. आनंद कुमार गोपे या विलक्षण माणसाचे हे आगळेवेगळे काम प्रेरणादायी आहे. खेळावरील प्रेम म्हणजे कोणी तरी जिंकल्यावर केवळ जल्लोष करणे नव्हे, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. कर्मा गावातील बहुतांश लोकसंख्या आदिवासी आहे. राज्याच्या राजधानीपासून जवळ असूनही या गावातील अनेक मुलींना स्वतंत्र जीवन जगण्याची परवानगी नाही. कुटुंबातील सदस्यांनी नेमून दिलेली कामे करण्याशिवाय त्या घराबाहेर पडत नाहीत. लहान वयातच त्यांचे विवाह केले जातात. मात्र आनंद कुमार यांनी या गावातील मुलींच्या आयुष्यात फुटबॉल खेळाच्या मदतीने नवसंजीवनी भरली आहे. माजी फुटबॉल खेळाडू आणि परवानाधारक प्रशिक्षक असलेल्या आनंद यांनी आपले जीवन ही रत्ने घडवण्यासाठी समर्पित केले आहे. ३० वर्षीय आनंद यांना लहानपणापासून फुटबॉलची आवड आहे. आई-वडिलांनी त्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले. २०१०, २०११ आणि २०१२ मध्ये रांची लीग आणि जिल्हा स्तरावरही ते खेळले आहेत; मात्र बेताच्या आर्थिक परिस्थितीने त्यांना कधीही राष्ट्रीय स्तरावर सहभागी होता आले नाही. आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी आपले कौशल्य सामाजिक कारणासाठी वापरण्याचे ठरवले आणि कर्मामधल्या मुलींना त्यांचा भाग्यविधाता लाभला. गावात अनेक मुलींचे काही हजार रुपयांच्या हुंड्यासाठी लहान वयात विवाह केले जातात आणि राजस्थान, हरियानासारख्या राज्यांत त्यांची पाठवणी केली जाते, हे पाहून आनंद यांनी या मुलींना फुटबॉल शिकवायचे ठरवले; पण हे आव्हान सोपे नव्हते. अल्पशिक्षित, अशिक्षित ग्रामस्थांना मुलींचे सक्षमीकरण पटवून देण्यात सहा महिन्यांहून अधिक काळ गेला. तेव्हा कुठे त्यांच्या पालकांनी परवानगी दिली. ऑक्टोबर २०१३ मध्ये १५ मुलींना त्यांच्या पालकांनी फुटबॉल खेळण्याची परवानगी दिली आणि या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला सुरुवात झाली; पण स्थानिक रहिवाशांनी त्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुलींनी फुटबॉल खेळणे आणि शॉर्ट्स परिधान करणे त्यांना रुचत नव्हते. फूटबॉल खेळू लागलेल्या मुलींना आनंद यांनी शाळेत दाखल केले. त्यामुळे त्या शाळेतील फुटबॉल संघांचा भाग बनू शकल्या. हळूहळू त्यांनी आपल्या गावातील २५० हून अधिक मुली आणि ५० मुलांना प्रशिक्षण दिले. २५ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केले. आठ मुलींनी इंग्लंडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. सहा मुली डेन्मार्कमध्ये खेळल्या आहेत. अनिता कुमारी आणि सोनी मुंडा या दोघींना २०२२ च्या फिफा विश्वचषकासाठीच्या शिबिरासाठी निवडण्यात आले होते. एका विद्यार्थिनीचा बालविवाह होण्यापासूनही त्यांनी रोखला आहे. १३ वर्षांच्या त्या मुलीला २५ हजार रुपयांसाठी राजस्थानात पाठवले जात होते. त्याच मुलीची नंतर झारखंडच्या १४ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली. पुढे ती ताजिकिस्तानमध्ये भारतीय संघासाठी खेळली. आनंद यांचे काम केवळ अवर्णनीय असे आहे. एका बाजूला देश मंगळ मोहिमा राबवत असताना दुसऱ्या बाजूला आजही लाखो लोक दारिद्र्यात आणि परंपरांच्या बेड्यांत गुरफटलेले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या सरकारी योजना असूनही समाज अपेक्षित उंची गाठू शकलेला नाही; मात्र आनंद कुमारसारखे लोक आपल्या एकट्याच्या हिमतीवर इतिहास रचत असतात. हजारो जणांचे आयुष्य घडवतानाच शेकडोंना प्रेरणा देण्याचे काम करीत असतात. | |||
No comments:
Post a Comment