Tuesday, November 25, 2025
संगमेश्वरी बोली - वैभव चाळके
Sunday, October 26, 2025
इवलेसे रोप
इवलेसे रोप
--वैभव बळीराम चाळके
--
अल्पाक्षरत्व अर्थात कमीत कमी शब्दांत अधिकाधिक अर्थ सांगणे, परिणाम साधणे, आनंद देणे... हे कवितेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. कविता इतर साहित्य प्रकाराहून भिन्न ठरते त्यात तिचा हा एक महत्त्वाचा गुण असतो. साहित्यात त्यालाच व्यवच्छेदक लक्षण म्हणतात.
कविता अल्पाक्षरी असते आणि तरी ती खूप काही सांगते अन् सुचवते. कारण कवितेत प्रतिमा, प्रतीके, अलंकार, सूचकता अशा गुणांचा अंतर्भाव असतो. शिवाय तो एकजीव असून उत्स्फूर्त आविष्कारातून जन्मास आलेला असतो. मराठी साहित्यापुरते बोलायचे म्हटले तरी आपल्याला अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. मराठीच्या हजारभर वर्षांच्या काव्यलेखनाच्या उपलब्ध इतिहासात पद्य रचना, दीर्घ कविता आणि स्फूट कविता विपुल प्रमाणात लिहिली गेली आहे.
संतकाव्यातील कितीतरी रचना अजरामर होऊन राहिल्या आहेत. अनेक कवितांमधील विशेषतः अभंगांतील केवळ एकेक ओळ सुभाषिताचे रूप घेऊन शेकडो वर्षे समाजमनात गुंजन करीत आली आहे. अशा शेकडो काव्यपंक्ती आपल्याला पुन्हा पुन्हा उद्धृत केलेल्या आढळतात.
संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या पुढील ओळी आपण हजारो वेळा एकमेकांना सांगितलेल्या आहेत-
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके।
मेळवीन।।
या पंक्ती अजरामर होऊन राहिल्या आहेत. मराठी अमृताहून गोड आहे, हे ज्ञानेश्वरांनी इतक्या समर्थपणे मांडले आहे, की मराठीविषयी बोलताना या पंक्तींना दुसरा पर्याय नाही.
मोगरा फुलला मोगरा फुलला।
फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला।।
‘मोगरा फुलला’ ही त्यांनी निर्माण केलेली प्रतिमा तर मराठीतील एक ‘न भूतो न भविष्यती’ अशी आहे. दृश्य, स्पर्श, गंध, नाद अशा विविध संवेदनांना सुख देणारी आणि नित्यनूतन अर्थ धारण करणारी ही प्रतिमा ही मराठी साहित्याला मिळालेली आगळी देणगीच आहे, असे म्हणावे लागेल.
संत तुकाराम महाराजांच्या अभंगांतील कितीतरी पंक्ती सुभाषित झाल्या आहेत. सुभाषित म्हणजे इवलासा अक्षरबंध... जो अर्थआभाळ कवेत घेतो.
जे का रंजले गांजले।
त्यांसि म्हणे जो आपुले।
तोचि साधू ओळखावा।
देव तेथेचि जाणावा।।
यात साधूसंतांची ओळख कशी नेमकी सांगितली आहे. आता हे माहिती झाले म्हणजे भोंदू कोण हे सहज लक्षात येऊ शकते.
सुख जवापाडे।
दुःख पर्वता एवढे।।
हे कठोर वास्तव इवल्याशा ओळीत आणि परिचित उपमेतून मांडल्याने सर्वांना पटले, रुचले, सांगावे-सांगत राहावे वाटले.
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास।
कठीण वज्रास भेदू ऐसे।।
असे म्हणून त्यांनी माणसाने कसे असावे, हे सांगितले आहे.
लहानपण देगा देवा।
मुंगी साखरेचा रवा।।
मध्ये विनयशीलता, अहंहीनता अंगी असली की लाभ होतो, हे सोप्या उदाहरणातून पटवून दिले गेले आहे.
नाही निर्मळ जीवन।
काय करील साबण।।
हा थेट सवालच आहे.
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे।
उदास विचारे वेच करी।।
हे वचन अकाली उद्भवणारे खर्च करताना केवढा आधार ठरते.
साखरेच्या गोण्या बैलाचिये पाठी।
तयासी शेवटी कडबा रे।।
हे कटू वास्तवही रोजच्या जगण्यात येणाऱ्या असह्य उपेक्षेच्या दिवसांत सांत्वन करते नाही का?
आणि हे सारे मांडणारे संत तुकाराम तरीही,
आनंदाचे डोही आनंदतरंग।
आनंदचि अंग आनंदाचे।।
असे म्हणून जड जीवनाला चैत्यन्याशी जोडून देतात. म्हणूनच म्हणतो, कविता हे इवलेसे रोप आहे. ते अर्थआभाळाला गवसणी घालत जाते.
उंदीरमामा की जय!
उंदीरमामा की जय!
--
‘प्रारंभी विनंती करू गणपती...’ असे म्हणत कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्याची आपली अनेक वर्षांची परंपरा आहे. या आद्यदैवत असलेल्या श्री गणेशाचे वाहन म्हणजे उंदीर. आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यात त्याने भावनिक महत्त्व प्राप्त केले आहे. गेल्या काही वर्षांत त्याने वैज्ञानिक क्षेत्रातही मोठी प्रगती केलेली दिसते. माणसावर करायचे कोणतेही नवे प्रयोग प्रथम उंदरावर करून पाहिले जातात हे आपण शिकलेलो आहोत. उदाहरणार्थ माणसावर एखाद्या औषधाचा काय परिणाम होईल, हे तपासण्यापूर्वी उंदराच्या शरीरावर त्याचा प्रयोग केला जातो. अलीकडे काही शास्त्रज्ञांनी उंदराच्या नाकात हवेचा वेग आणि विविध वास ओळखण्याची विलक्षण क्षमता असल्याचे सिद्ध केले आहे. या संशोधनाचा उपयोग माणसाच्या जीवनाला उपकार ठरेल, असे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
आम्हा शेतकरी कुटुंबात जन्मलेल्यांसाठी उंदीर हा पहिल्या क्रमांकाचा शत्रू होता. त्यामुळे उंदीर दिसला की तो जिथे गेला तिथे त्याला शोधून मारावा किंवा पळवून लावावा, असे लहानपणापासूनच आम्हाला सांगितले गेलेले. उंदीर, घुशी आणि चिचुंद्री असे प्रकार पाहतच आम्ही मोठे झालो. पुढे पांढरा उंदीर असतो, असे ऐकायला आणि पाहायलाही मिळाले. जगभरात उंदराचे ५० प्रकार असल्याचे सांगतात. उंदीर सर्वभक्षी आहे. म्हणजे धान्यापासून अंडी-मांसापर्यंत बरेच काही अन्न म्हणून खात असतात. शिवाय सतत वाढणारे दात काबूत आणि शाबूत ठेवण्यासाठी मिळेल ती कडक वस्तू कुरतडत राहणे हे त्याचे जीवनकर्तव्यच आहे. प्रजननाबाबत उंदराने मोठीच आघाडी घेतलेली दिसते. उंदीर मादी वर्षातून पाच ते सहा वेळा पिल्ले देते आणि प्रत्येक वेळी डझनभर पिल्ले जन्माला घालते. त्यामुळे उंदीर अनेकांची दमछाक करतात. शेतकऱ्यांच्या घरात, शेतात धान्याची नासधूस करतात. शहरात घरातील अन्नपदार्थ, फर्निचर, वायर कुरतडून वात आणतात. त्यामुळे मासे पकडण्याच्या जगात जशा शेकडो क्लृप्त्या माणसाने शोधल्या आहेत तसेच शेकडो उपाय उंदरांना मारण्यासाठी केले जातात. सापळे लावणे, विषप्रयोग करणे, चिकट कागद ठेवणे हे असे उपाय वर्षानुवर्षे सुरू आहेत. शहरांमध्ये उंदरांची संख्या वाढली, की महापालिका ते मारण्यासाठी कर्मचारी नेमते. त्यामुळे आपल्या आर्थिक क्षेत्रातील उलाढालीलाही उंदराने हातभार लावलेला दिसतो.
आपल्या संशोधकांनी उंदरांच्या नाकात वाऱ्याचा वेग आणि वास ओळखण्याची मोठी क्षमता असल्याचे सिद्ध केल्याने ते आता वेगवेगळ्या कामास येणार आहे. उंदराची ऐकण्याची क्षमता ही विलक्षण आहे, हे आपल्याला कधीचेच माहीत आहे. म्हणून तर प्रत्येक गणेश मंदिरात मोठा पितळी उंदीर बसवलेला असतो आणि भाविक त्याच्या कानात त्यांना जे हवे ते मिळवण्यासाठी अतिशय हळुवार आवाजात विनवत असतात. आपल्याकडे अधूनमधून निसर्ग, तौक्ते अशा तऱ्हेतऱ्हेच्या नावांची मोठी वादळे येत असतात. अशा वेळी आता आपल्याला आपल्या खिडक्यांवर उंदीर बसवून ठेवता येतील आणि ते आपल्या मोबाईलला कनेक्ट केले म्हणजे वारे किती जवळ आले आहे, हे लक्षात येऊन आपण आपली दारे-खिडक्या वेळीच बंद करून सुरक्षित बसू शकू!
वाऱ्याचा वेग आणि वास ओळखण्याच्या या क्षमतेमुळे शत्रू राष्ट्रांनी वाऱ्यावर विष पेरून दिले तर ते आपल्याकडे पोहोचण्यापूर्वीच सीमेवर उंदीर फौज उभी करून आपल्याला ते वेळीच ओळखता येईल का, याचाही शोध आपल्याला आता घ्यावा लागेल. तसे झाले तर वरून ड्रोन आणि खाली उंदीर सेना अशी एक वेगळीच लढाई भविष्यात दिसू शकते.
अर्थात उंदरांच्या या क्षमतांचा जर आपल्याला सुयोग्य वापर करायचा असेल, तर त्यासाठी उंदीर काही काळ मोकळे असणे गरजेचे आहे. सतत वाढणारे दात घासून कमी करण्यात त्यांचा बराचसा वेळ खर्च होतो आणि आपली प्रजनन क्षमता संपूर्ण कामी आणण्यातही ते पुष्कळ काळ व्यग्र असतात. त्यामुळे आपल्या विविध कामांसाठी मोठी संख्या असली तरी उंदीर कमी पडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाप्रमाणे उद्या उंदरांचे निर्बीजीकरण करून त्यांचा काही वेळ आपल्याला वापरता येईल का, याच्यावर विचार करण्यासाठी एखादी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची समिती कदाचित नेमावी लागेल.
विज्ञान अचाट गोष्टी साध्य करते आहे. त्यामुळे या उंदराच्या नाकातील वासाच्या क्षमतेचा वापर करून आपण आपल्या स्वयंपाकघरातील पदार्थ नीट घमघमत आहेत ना, याची खात्री करून घेऊ शकू. उद्या कदाचित मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये हे काम उंदरांकडेच स्वाधीन केले जाऊ शकते. फक्त क्वचित प्रसंगी हा ‘सुगंध इन्स्पेक्टर’ पदार्थात पडून आपल्या ताटात आला तर उदार मनाने त्याची आणि रेस्टॉरंट मालकाची चूक आपण पदरात घालायला हवी.
गणपतीसमोर आरत्यानंतर गणरायाचा जयजयकार करून झाल्यावर आणि मंत्रपुष्पांजली म्हटल्यावर कोणीतरी ‘गणपती बाप्पा की जय... उंदीरमामा की जय’ असे हमखास म्हणत असतो. तेव्हा हे ‘उंदीरमामा की जय’ कोठून आले, असा एक भाबडा प्रश्न अनेकदा पडत असे. आता मात्र उंदीर असा उपयोगात यायला लागल्यावर आपल्याला उंदीरमामाचा जयजयकारसुद्धा कृतज्ञतेची भावना दाटून येऊन करता येईल.
एक ‘चांदोमामा’ आणि दुसरा ‘उंदीरमामा’ हे आपल्या पुराणापासून विज्ञानापर्यंत आपल्याला फिरवून आणत आहेत. मामा आपल्याला नेहमीच प्रिय असतो. चांदोमामाने चांद्रयानातून आपल्याला ‘कधीतरी या राहायला’ असे निमंत्रण दिलेले आहे. त्यामुळे तो आता आणखीच प्रिय झाला आहे. नव्यानव्या शोधांमुळे आता उंदीरमामाही प्रिय होऊन राहील. तेव्हा सर्व मिळून म्हणू या, उंदीरमामा की जय!
(संपादित अंश सकाळमध्ये 24-10-25 रोजी संपदाकीय पानावर प्रकाशित)
Friday, June 6, 2025
मराठी
मराठी संवर्धनासाठी काय करता येईल?
महाराष्ट्रात मराठी अनिवार्यतेचा कायदा आहे. त्याची कठोर अंमलबजावणी सुरू करावी. अन्य भाषिकांना आम्ही तुमच्याविरोधात नाही; मात्र महाराष्ट्रात मराठीच्या संवर्धनासाठी आपण सहकार्याची भूमिका घेतलीच पाहिजे, ही सरकारची भूमिका असल्याचे स्पष्टपणे समजून सांगावे. म्हणजे वादाचे प्रसंग उपस्थित होणार नाहीत. मराठी शाळांच्या पुनरुज्जीवनासाठी आणि असलेल्या शाळा अधिक चांगल्या होण्यासाठी प्रयत्न करावेत. शाळांमधील दर्जाच्या सुधारण्यासाठी प्रयत्न केल्यास या शाळांकडे ओघ वाढू शकतो. महाविद्यालयात आणि विद्यापीठात मराठीच्या वर्गांची पटसंख्या वाढविण्यासाठी काय करता येईल याचा शोध घ्यावा. इतर माध्यमांमधील मराठीचे आध्यापन अधिक चांगले कसे होईल याचाही काळजीपूर्वक पाठपुरावा करावा. सर्व सार्वजनिक ठिकाणी मराठीचा वापर करून मराठी ही ताबडतोब अर्थकारणाची भाषा म्हणून अधिकाधिक कशी वाढेल यासाठी प्रयत्न सुरू करावेत. मराठीच्या संवर्धनासाठी काय काय करता येईल यासाठी या विषयातल्या विविध संस्था आणि तज्ज्ञ यांच्या स्वतंत्रपणे वारंवार बैठका घेऊन त्यातून आलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीवर बारकाईने लक्ष द्यावे. सरकारच्या विविध संस्थांमधला समन्वय वाढवून मराठीचे काम अधिक नेटाने पुढे कसे जाईल हे पाहावे. मराठी साहित्य, संस्कृती आणि भाषा यातील संशोधनावर भर देऊन हे संशोधन उपयोगात कसे आणता येईल यावर भर द्यायला हवा. शासनाचा निधी मोठ्या प्रमाणावर विविध उपक्रमांवर खर्च केला जातो; मात्र या उपक्रमांचे पुढे काय होते याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. उदाहरणार्थ विविध कोशांची निर्मिती केली आहे; पण बहुतांश मराठी माणसांना अशा प्रकारचे कोश आपल्याकडे निर्माण झाले आहेत आणि ते आपल्याला वापरता येतात याची कल्पनाच नाही तेव्हा या प्रकारच्या साधनसामग्रीच्या उपयोगाबाबत समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. आणखी 25 वर्षानंतर मराठीची महाराष्ट्रातील स्थिती काय असणार आहे याची एक स्पष्ट कल्पना संकल्पचित्र म्हणून मांडायला हवी. या उद्दिष्टाच्या पूर्णत्वासाठी कोण, केव्हा, किती आणि कसे काम करणार आहे, हे स्पष्ट करून घ्यावे. संबंधितांवर तशी जबाबदारी निश्चित करावी. महाराष्ट्रात मराठी भाषा, साहित्य, संस्कृती यांच्या संवर्धनासाठी खास निधी उभा करून तो मोकळ्या हाताने खर्च करावा. अत्यंत काटेकोरपणे त्याचा हिशोब मांडावा. मराठी माणसाच्या मनात मराठीच्या संवर्धनाचे आस निर्माण व्हावी यासाठी कोणते प्रयत्न करता येतील याचा शोध घ्यावा. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे यासारख्या बहुभाषिक होऊ लागलेल्या शहरांचा चेहरा मराठमोळा कसा राहील आणि या शहरांमध्ये जगताना मराठी माणसाला न्यूनतेची भावना न येता अभिमानाची भावना कशी निर्माण होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत.
सीनियर
सीनियर
मैत्री हे जगातल्या सुंदर नात्यांपैकी एक नाते होय. रक्ताचे नव्हे तर मनाने जोडलेले नाते. माझा मित्र-मैत्रिणींचा गोतावळा मोठा आहे त्याबाबत मी मोठाच भाग्यवान आहे. शाळेची पायरी चढण्यापूर्वीच मला मैत्री गवसली आणि 40 वर्षांहून अधिक काळ मैत्रीने मला हजारो अनुभव दिले. कधी अतीव आनंदाचे तर कधी आसवात भिजवणारी.
गेली साधारण दहा-एक वर्षे माझा प्रिय सिनियर मला त्याच्या गावच्या शेतघरात राहायला ये असे वारंवार सांगत होता. पण मला जमत नव्हते. तसे त्याचे गाव माझ्या गावापासून अवघ्या चाळीस-पन्नास किलोमीटरवर आहे पण मुंबई ते गाव अनेकदा प्रवास करणाऱ्या मला ते तेवढे अंतर गेली दहा वर्षे कापता आले नव्हते यंदा मात्र दोन दिवस अधिकची रजा हाती आली आणि मी त्याच्याकडे जायचे ठरवले. आदल्या आठवड्याच्या शेवटी पुढच्या आठवड्यात येतो आहे, असे सांगायला त्याला फोन केला, तर म्हणाला, मीच मुंबईला यायला निघालोय. मुलीचा दहावीचा रिझल्ट लागला आहे. तिला 96 टक्के मार्क्स मिळालेत तो आनंदाने सांगत होता. मलाही खूप आनंद झाला. मी लागलीच त्याचे अभिनंदन केले. पोरीचे कौतुक केले. खेळ, वक्तृत्व स्पर्धा आणि धमाल मौज करणाऱ्या या पोरीने स्वतःला कसोटीच्या क्षणी सिद्ध करून दाखवले. म्हटले, माघारी केव्हा निघणार आहेस? तर म्हणाला मी मंगळवार-बुधवारी निघेन. मी म्हटले, मी मंगळवारी निघून बुधवारी तुझ्याकडे यायचा विचार करत होतो. आता आला आहेस तर सोबतच निघू.
हा सीनियर आणि मी दोघे जिवलग मित्र. 25 वर्षांहून अधिक काळ आमची मैत्री आहे, पण आम्ही नियमित भेटणारे मित्र नाही. जेव्हा भेटतो तेव्हा जीवाभावाने भेटणारे मित्र आहोत आम्ही. मी बारावीत असताना तो एसवाय बीएला होता. म्हणजे त्याच्या माझ्यात साधारण तीन वर्षांचे अंतर आहे. त्याचा सगळा ग्रुपच त्या काळात एका हस्तलिखिताच्या निमित्ताने माझा झाला.
या सगळ्या सीनियर्सनी त्या काळात मला अमाप प्रेम दिले त्यांच्यात ज्युनिअरचा मी एकटाच होतो आणि त्यांचा जवळचा सुद्धा. त्या काळात त्यांनी मला प्रेमाने काय काय शिकवले त्याची गणतीच नाही. गंमत म्हणजे गेली 25 वर्षे ही मंडळी मला शिकवत आहेतच.
सीनियर कॉलेजमधून बाहेर पडला तेव्हा त्याने दिवाळी अंक काढला. त्याला नियोजनात मदत केली. लेखक मिळवले. पुढे तो निवडणुकीला उभा राहिला. मुंबई विद्यापीठात सिनेट मेंबर झाला. त्या काळात कार्यकर्ता ते मतदार अशा सगळ्याच भूमिका मी आनंदाने निभावल्या होत्या. पुढे भेटी कमी झाल्या तरी रुईयाच्या कट्ट्यावर अधूनमधून भेट व्हायची. तो आवर्जून कट्ट्यावर येतो आणि मी गेली दहा-बारा वर्षे रुईयात शिकवायच्या निमित्ताने आठवड्यातून एखाद्या दिवशी तिथे असतोच. त्यामुळे इतर सीनियर्सच्या तुलनेत हा मात्र मला अधिक वेळा भेटत आलाय. भेटला म्हणजे कडकडून मिठी मारतो. खाऊपिऊ घालतो. कविता ऐकव म्हणतो. एखादी छानशी ऐकून दाखवतो. ही अशी देवाणघेवाण अखंड सुरू असते.
ठरल्याप्रमाणे मंगळवारी सकाळी सीनियर गाडी घेऊन माझ्या दारात हजर झाला आणि आमची कोकण सहल सुरु झाली. कोकण हा आमचा दोघांचा अत्यंत आवडीचा विषय आहे. कविता हा दुसरा. त्यामुळे कोकणावर कविता केली तर ती याला दाखवायलाच हवी, असे मला वाटत राहते. त्यामुळे मी निघताना दहा एक वर्षे धुळखात पडलेला अद्यप प्रकाशित न झालेला माझा कवितासंग्रह बॅगेत टाकून मी निघालो होतो. या कवितांना ही कुणीतरी रसिक मिळणार होता.
अखंड बडबड करीत आम्ही कोकणातल्या गावाच्या दिशेने निघालो. म्हणजे बहुतांश वेळा मीच बोलत होतो. वाटेल भरपेट नाश्ता केला. चिपळूण खानावळीत जेवलो. गप्पा हास्यविनोदानी पोट तुडुंब भरले होते. गाव जवळ येऊ लागले. कितीतरी आठवणी दाटून आल्या. शाळेचे दिवस आठवले. शाळेतल्या मित्र-मैत्रिणी आठवल्या. माझी एक मैत्रीण वाटेवरच्याच एका गावात राहते. सीनियरला म्हटले तिच्याकडे जाऊया का रे? तर तो म्हणाला तू म्हणशील तिकडे जाऊ. मग आम्ही वाटेतल्या बालदोस्ताना भेटतभेटत आनंदाचा गुणाकार करत सीनियरच्या गावी पोहोचला.
सायंकाळी साडेचारला आम्ही गावात पोहोचलो गेटमधून आत घुसताच तो म्हणाला, ही आपली लायब्ररी. ती वास्तू पाहून मला आभाळभर आनंद झाला. आडगावात चक्क एका जंगलात एक अख्ख घर ग्रंथालय करणे ही कल्पनाच माझ्यासाठी अत्यंत सुखदायी होती. ग्रंथालयापासून पुढे जात डावीकडे वळण घेतले तर म्हणाला हा गोठा. 35 म्हशी होत्या. पुढे गेलो एक डावे वळण घेतले. डाव्या हाताला एक छोटी इमारत होती. हे मजुरांचे घर. गाडीतून उतरलो तर समोर एक अत्यंत देखणे घर... त्याला फुलांनी भरलेले अंगण... घराच्या आजूबाजूस माणसांचा, यंत्रांचा एकही आवाज नव्हता. हिरव्या कंच डोंगररांगात उतरंडीला बांधलेले शेतघर पाहून फार्म हाऊस या कल्पनेच्या संकुचितपणाचे तुकडे झाले. दहा वर्षे मी, या सिनियरचे चारेक एकर जागेत एखादे टुमदार छोटेखाणी घर असेल असे समजत होतो. पण हा राजा माणूस इथे निसर्ग राजा होऊन सव्वाशे अकरावर नांदतो हे पाहून मित्र म्हणून आनंदाने.. अभिमानाने उर भरून आला. हा समोरचा अख्खा डोंगर आपलाच आहे, असे तो म्हणाला, तेव्हा त्या डोंगराएवढाच आनंद मला झाला.
घरी सीनियरचा मामा होता. हा विलक्षण माणूस अधिकारी म्हणून मोठ्या पदिवरून सेवानिवृत्त होऊन जीवनाचा अखंड आनंद घेणारा माणूस. रात्री मामा, मी आणि सिंगर अंगणाच्या टेबलावर बसलो. घराशेजारीच एका टुमदार वास्तुत स्वयंपाक घर आहे. शेफ मॅक्सच्या हाताला चव आहे. त्यांने कोबी आणि कांद्याचे कुरकुरीत भजी आणून दिले. चहा भजीचा आस्वाद घेत असतानि मामा म्हणाले, तू छान कविता करतो म्हणत होता हा.. एखादी छानशी कविता म्हणून दाखव. सीनियरसारखा रसिक समोर असल्याने मी माझी सर्वात आवडती आई कविता सादर केली. ती कोकणातल्या मातीत राबणाऱ्या आईची प्रातिनिधी कविता असे मला वाटत आहले आहे. ती ऐकून सीनियर घायाळ झाला. मामाच्या काळजावर कवितेने आघात केल्याचे चेहऱ्यावर त्या अंधुक अंधारातही मला स्पष्ट दिसले. कवितेला या दोन रसिकांनी दिलेली दाद अपार समाधान देऊन गेली. मामा म्हणाले, पुन्हा वाच. फार आवडली. कवितेला वन्समोर... मी भरून पिवलो. ती कविता वाचून... अनुभवून थकलो होतो. म्हटले दोन मिनिटे थोडा विसावा घेऊ दे.
मग मी पुन्हा त्याच दमान ती कविता सादर केली..
'आधी आई पसरत जाते शेतभर आणि मग पाऊस...
आई रुजून येते हिरवीगार आणि सळाळत राहते वाऱ्यावर..'
आणि मग अशाच कवितांमधील तरल, तलम आणि धारदार प्रतिमांनी रसिकांना घायाळ करत संमेलन रंगले. रात्री मस्त जेवलो. छानपैकी झोपी गेलो. दिवसभराच्या झोपही लवकर लागली.
सकाळी उठलो. ब्रश करून चहा घेतला. त्याने टायगरला आवाज दिला. छू म्हणून त्याला सीमेवर धाडल्यावर, तो तिथे जाऊन भुंकून आला. हातात काठी घेऊन सीनिअर पुढे, त्याच्या पुढे टायगर आणि शेवटी मी. आम्ही तिघे जण काजूबागेतून चालत नदीच्या दिशेने निघालो.
सीनिअर म्हणाला, “इथून मागे जाऊ या की, फिरून जाऊ या?”
मी म्हटले, ‘‘कसेही.’’
आम्ही फिरून जायचे ठरवले. थोड्याशा चढावर चढताना मला धाप लागली. ती त्याला नेमकी दिसली. सावकाश ये म्हणाला. मग मी माझ्या वेगाने चालू लागलो. काजूबागेच्या एका बाजूला आमराई होती. पायवाटेच्या दुसऱ्या बाजूला पणसाची व आंब्याची झाडे लावलेली होती. त्यांना कुंपण घातलेले होते. उजवीकडे काजूबागेत बिया पडलेल्या होत्या. काही बोंडंही होती.
तो म्हणाला, “पाऊस पडला ना, तर या बियांचे मोठे नुकसान होईल. पुढच्या दहा दिवसांत जमेल तेवढे पिकून घ्यायला हवे.”
आम्ही त्या पायवाटेने आधी गोठ्यापर्यंत गेलो आणि उजवे वळण घेऊन पुन्हा डावीकडे वळत घरी पोहोचलो. अंगणात आल्यावर तो म्हणाला, “आपण या समोरच्या डोंगराला फेरी मारून आलो, कळलं ना तुला?”
मी त्या हिरव्यागार डोंगराकडे क्षणभर बघत राहिलो. खरे वाटलेच नाही.
मग आंघोळ करून नाश्ता केला. थोडा वेळ मामांशी गप्पा मारल्या. मामा आपल्या कामाला निघाले, तसे आम्हीही निघालो. रत्नागिरी जायचे, बंदर पाहायचे, आणि जमले तर मासे घेऊन यायचे – असा साधारण प्लॅन होता. लवकर आलो, तर लांजात जाऊन खानावळीत जेवून परतायचे असा विचार सीनियरने बोलून दाखवला होता.
आधी आम्ही खाली येऊन ग्रंथालय पाहिले. पाच-सहा हजार पुस्तके... अत्यंत विचारपूर्वक निवडलेली... रसिक आणि बुद्धिमान, जाणत्या माणसाने निवडलेली ही पुस्तके पाहताना हरखून गेलो. एकेक पुस्तक खूपच किमती होते.
अनेक कवितासंग्रह, काही कवींचे समग्र साहित्य, निवडक महत्त्वाच्या कादंबऱ्या, महत्त्वाचे निबंधसंग्रह, कितीतरी चरित्रे, अनुवाद – असे काय काय होते त्यात.
एका कप्प्यात इंग्रजी पत्रकारितेवरची पुस्तके ठेवलेली होती. सीनियर म्हणाला, “ही लेकीसाठी घेतली आहेत.”
त्यामुळे मी त्यावर बारकाईने लक्ष टाकले. “मीडिया इथिक्स” पुस्तक दिसले. वाटले — या माणसाने मुलीला काय शिकवायचे, ते अगदी ठरवून ठेवले आहे.
पण मग काल येताना तो काय म्हणाला होता ते आठवले. तो म्हणाला होता, “लेकीला पत्रकार बनवायचे आहे. तेव्हा तिला जरा काही मार्गदर्शन कर.”
मी म्हटले, “एक दिवस फक्त दोन तास वेळ काढ. तिला घेऊनच ये. अर्ध्या तासात ‘बातमी म्हणजे काय’ ते सांगतो. आमचे २५–२५ वर्षं बातमीदारी करणारेसुद्धा बातमी नीट लिहू शकत नाहीत.
दुसरा अर्धा तास — ‘लेख म्हणजे काय’ हे तिला समजावून सांगतो. मग अर्धा तास ‘पत्रकारिता म्हणजे काय’ हे आणि पुढचा अर्धा तास ‘नवी पत्रकारिता म्हणजे काय’ हे नीट समजावून देतो.
हे एकदा समजले की मग तिला वाटेल तो अभ्यास करता येईल.”
“मीडिया इथिक्स” हे पुस्तक तिला नेमके समजले पाहिजे. आणि हे सगळं कधी, कसे आणि किती बाजूला ठेवायचे, हेही तिला अचूक समजायला हवे. मग आपण त्यावर काम करू शकतो.
त्या पुस्तकातून निघावेसे वाटत नव्हते. पण पल्ला लांबचा होता, म्हणून निघालो.
साधारण दहा-बारा किलोमीटर गाडी चालली असेल. मला थोडा थकवा जाणवत होता.
मी सामान्यतः अखंड बडबड करत असतो, पण आता माझी बडबड थोडी कमी झाली होती.
सीनियर म्हणाला, “ थकल्यासारखा दिसतोस. आपण घरी जाऊ या का?”
मी म्हटलं, “हो, थोडे तसे वाटतेय, पण जाऊ या.”
मग आम्ही ठरवले – रत्नागिरीच्या घरी जाऊ, तिथे थोडा वेळ थांबू, आणि मग पुढे निघू.
घरी गेलो. थोडा वेळ झोपलो. पण झोप आली नाही, त्यामुळे फार फ्रेश वाटले नाही.
मग कुठेही न जाण्याचा निर्णय घेतला. तिथल्याच एका खानावळीत मस्त जेवलो आणि मग घरची वाट धरली.
वाटेत मामांचा फोन आला. म्हणाले, “माझे काम पुढे ढकलले गेले आहे, त्यामुळे मी आता थांबत नाही. थेट मुंबईला निघतो.”
मी म्हटले, “मामांना रस्त्यात भेटता आले, तर भेटू या.”
फोन केला, आणि मग रस्त्यात आम्ही भेटलो. दोन मिनिटे बोललो आणि पुन्हा आपापल्या मार्गाने निघून गेलो.
घरी जाऊन थोडा आराम केला. चहा प्यायलो आणि संध्याकाळी खानावळीत जेवायचे ठरवले. सीनियरच्या मित्राने सुरू केलेल्या, आणि त्यानेच चालवलेल्या खानावळीत गेलो.
अत्यंत ताजी, चविष्ट सुरमई खाल्ली.
जगातली सर्वात सुंदर अशी सोलकढी प्यायलो. ती इतकी अप्रतिम होती की पुन्हा एक वाटी मागून घेतली. आणि तीही मनसोक्त प्यायलो.
रात्री घरी परतल्यावर पुन्हा मैफल रंगली.
कितीतरी कविता आम्ही एकमेकांना ऐकवल्या. आमचे मराठीचे प्राध्यापक विजय तपास यांच्या कविता सीनियरने ऐकवल्या. निदा फाजली, पुनीत मातकर — अशा किती जणांच्या कविता ऐकत, ऐकवत राहिलो.
सगळे जुने दिवस पुन्हा जिवंत झाले. सगळी माणसे भोवताली पुन्हा नांदू लागली.
दारू पिणाऱ्यांना जशी हळूहळू नशा चढत जाते, तशीच आम्हाला आठवणींची नशा चढली.
त्या जिवंत झालेल्या स्मृतींच्या नशेत आम्ही बोलू लागलो — वर्तमान नात्यांप्रतीची कृतज्ञता दाटून आल्या असतानाच कुणीतरी गतनात्यांच्या सप्तरंगांची उधळण करावी, तसा एक विलक्षण आनंद अनुभवत आम्ही चिंब भिजत होतो.
किती किती माणसं आठवली...
किती क्षण पुन्हा जिवंत झाले...
माझ्या संग्रहात ही एवढी ऊर्जा आजही जिवंत आहे, याचा मलाच नव्याने अनुभव आला.
तो म्हणाला, आता हा संग्रह प्रकाशित व्हायलाच हवा. चांगला प्रकाशक भेटेलच – या कविता चांगल्या आहेत. पण नाहीच भेटला, तर मी आहे!
पण मी... गेली २५ वर्षं माझ्या संग्रहाला सांगत आलोय – "तू नको रे बाजारात उभा राहू. तेथे रसिकांपेक्षा जास्त विक्रेते असतात!"
म्हणूनच त्याला आतमध्ये, दडपून ठेवला.
क्षणभर वाटले – जर समान धर्मा मिळणार असतील, तर हा संग्रह प्रकाशित करायलाच हवा.
पण बाजाराचे नियम फार विचित्र असतात.
रात्री झोपलो. सकाळी उठलो.
सकाळी सीनियरने पुन्हा चहाच्या टेबलावर आपल्या वहीतील कविता ऐकवल्या.
या त्याच्या स्वतःच्या कविता होत्या.
किती उत्तम प्रतिमा होत्या त्यात!
एका जाणकाराने "मला नाही कविता लिहिता येत" म्हणावे आणि अस्सल ऐवज लिहावा – तसा अनुभव येत होता.
आणखी एक गोष्ट जाणवली – दोन दिवस आम्ही एकत्र असताना, त्याने आपल्या कवितांची ओळख होऊ दिली नाही.
असा विलक्षण संयम!
त्याच्यानंतर त्याने ‘मृत्यूभान’ ही लेखमाला वाचून दाखवली. त्यातले काही तुकडे ऐकताना असे वाटत होते – हा कुणी विलक्षण कलावंत आहे... जीवनाकडे समरसून पाहणारा.
गोड, स्पष्ट आवाज, नाट्य पकडणारी शैलीआणि भाव नेमके पकडण्याची समज… सगळे होते त्याच्या वाचनात...
म्हटले – अरे, हे ऑडिओ स्वरूपात यायला हवे!
आणि हा लेख मौजेत छापायला हवा!
चहा-नाश्ता करून आम्ही आमच्या गावाच्या दिशेने निघालो.
गेटबाहेर पडलो, तर पावसाची चाहूल लागली. थोडे पुढे आलो तर पावसाचे शिंतोडे पडू लागले.
त्याचा जीव कासावीस झाला – लाखोंची बी पावसात भिजण्याची भीती होती.
कालपासून तो एक एक माणूस शोधत होता – पण सापडत नव्हता.
त्याने स्वामींना प्रार्थना केली. मीही मनोमन हात जोडले.
घरी आलो, तेव्हा त्याने माझ्या बाबांना मिठी मारली.
आईच्या पाया पडला. आईला जवळ घेतले.
माझी आई मला प्रिय आहेच... जगातल्या कोणत्याही लेकराला त्याची आई प्रिय असते, तशीच.
पण… हा सीनियर दोन क्षणात तिचा झाला!
या पोराला ईश्वरी वरदान आहे.
एकाच वेळी याला लक्ष्मी, सरस्वती आणि प्रेमदेवता प्रसन्न आहेत.
ही तुझी समृद्धी वृद्धिंगत होत राहो, मित्रा!
- वैभव बळीराम चाळके
मे 2025
Tuesday, March 25, 2025
सामान्यांचा असामान्य सोबती विनोदकुमार शुक्ल
सामान्यांचा असामान्य सोबती
...‘हताशा से एक व्यक्ति बैठ गया था
व्यक्ति को मैं नहीं जानता था
हताशा को जानता था
इसलिए मैं उस व्यक्ति के पास गया
मैंने हाथ बढ़ाया
मेरा हाथ पकड़कर वह खड़ा हुआ
मुझे वह नहीं जानता था
मेरे हाथ बढ़ाने को जानता था
हम दोनों साथ चले
दोनों एक दूसरे को नहीं जानते थे
साथ चलने को जानते थे।’
विनोदकुमार शुक्ल यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर होताच देशभरातील त्यांच्या रसिकांनी त्यांचे अभिनंदन करताना, त्यांची ही कविता आपल्या समाजमाध्यमांवर उद्धृत केली आहे. समाजातील शेवटच्या माणसाप्रति तुमच्या मनात किती कणव आहे यावरूनच कलावंताचे महानपण ठरत असते, असे म्हणतात. ज्ञानेश्वरांची रेड्यामुखी वेद वदवण्याची प्रतीकात्मक कथा, श्री. म. माटे यांचा ‘बन्सीधर! आता तू कुठे रे जाशील?’ हा प्रश्न ते भालचंद्र नेमाडे यांच्या पांडुरंग सांगवीकरपर्यंत आपली साहित्याची सगळी परंपरा आपल्याला हेच सांगत आली आहे. हिंदीतही तशी मोठी परंपरा दिसते. त्यातील आजचे आघाडीचे नाव म्हणजे विनोदकुमार शुक्ल हे होय. विनोदकुमार शुक्ल यांची लेखनशैली अत्यंत साधी, गहन आशय व्यक्त करणारी आहे. त्यांच्या साहित्याची ताकद त्याच्या साधेपणात आणि सूक्ष्म निरीक्षणशक्तीत आहे. त्यांनी ग्रामीण जीवन, मानवी भावनांचा संघर्ष आणि स्वप्नांची मोहकता यांचे सुंदर दर्शन घडवले आहे. हिंदी साहित्यात त्यांनी आपली स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे. त्यांचे साहित्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
विनोदकुमार शुक्ल यांचा जन्म १ जानेवारी १९३७ रोजी छत्तीसगडमधील राजनंदगाव येथे झाला. त्यांचे बालपण आणि शालेय शिक्षणही तिथेच झाले. लहानपणीच त्यांना साहित्याची गोडी लागली. त्यांनी नागपूर विद्यापीठातून उच्चशिक्षण घेतले. त्यानंतर ते अध्यापन क्षेत्रात कार्यरत झाले. अत्यंत मितभाषी असलेले शुक्ल साध्या जीवनशैलीचे पालन करणारे लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सर्वच लेखनात साधेपणा असला तरी तो वरवरचा नाही. त्यामध्ये सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि गूढ आशय आहे. आपल्या लेखनाची सुरुवात त्यांनी काव्यलेखनाने केली. कवितांमधून साध्या, रोजच्या जीवनातील गोष्टींवर आपल्या असामान्य प्रतिभेचा प्रकाश टाकलेला पाहायला मिळतो. त्यांच्या कवितेतील भाषा सहज आणि प्रवाही आहे. सहज कळणारी आहे. शांत, साधी आणि तल्लख निरीक्षणशक्ती ही त्यांची वेगळी ओळख आहे. लगभग जयहिंद (१९७१), वह आदमी चला गया नया गरम कोट पहिनकर विचार की तरह (१९८१), सब कुछ होना बचा रहेगा (१९९२), अतिरिक्त नहीं (२०००), कविता से लंबी कविता (२००१), आकाश धरती को खटखटाता है (२००६), पचास कविताएँ (२०११), कभी के बाद अभी (२०१२), कवि ने कहा (२०१२), प्रतिनिधि कविताएँ (२०१३) हे त्यांचे कवितासंग्रह रसिकांच्या पसंतीस उतरले आहेत.
विनोदकुमार शुक्ल यांच्या कादंबऱ्या हिंदी साहित्यात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यांच्या कादंबऱ्या साध्या ग्रामीण जीवनाशी निगडित असल्या तरी त्यामध्ये मानवी मनोव्यापारांचे नितांत सुंदर दर्शन घडते. नौकर की कमीज़ (१९७९), खिलेगा तो देखेंगे (१९९६), दीवार में एक खिड़की रहती थी (१९९७), हरी घास की छप्पर वाली झोपड़ी और बौना पहाड़ (२०११), यासि रासा त (२०१७) आणि एक चुप्पी जगह (२०१८) या त्यांच्या कादंबऱ्या वाचकप्रिय झाल्या आहेत. ‘नौकर की कमीज’ ही त्यांची पहिली आणि सर्वाधिक लोकप्रिय कादंबरी. त्यात एका गरीब आणि साध्या नोकराच्या जीवनाचे दर्शन घडते. त्याची स्वप्ने, संघर्ष आणि त्याला मिळणारी वागणूक यांचे अत्यंत प्रभावी शब्दांत चित्रण केले आहे. यावर एक चित्रपटही आला होता. ‘खिलेगा तो देखेंगे’ या कादंबरीत एका ग्रामीण भागात शिकवणाऱ्या शिक्षकाच्या जीवनचित्रणाच्या निमित्ताने त्यांनी एकूण मानवी जीवनाचे विविध पैलू उलगडले आहेत. ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ ही कादंबरी मानवी जीवनातील तात्पुरतेपणा आणि शाश्वतता यावर भाष्य करणारी आहे. विशेषतः जग भौतिकतेच्या मागे धावायला लागल्याच्या पार्श्वभूमीवर या कादंबरीतील चिंतन महत्त्वाचे ठरते. विनोदकुमार शुक्ल यांनी लघुकथेच्या प्रांतातही यशस्वी मुशाफिरी केली आहे. त्यांच्या लघुकथांमध्येही लेखनशैलीची विशेष झलक दिसते. त्यांच्या कथांत पात्रांपेक्षा परिस्थिती आणि मानसिक प्रवृत्ती यांना जास्त महत्त्व असते. पेड़ पर कमरा (१९८८), महाविद्यालय (१९९६), एक कहानी (२०२१) आणि घोड़ा और अन्य कहानियाँ (२०२१) हे कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. ‘नींद की दूरी और अन्य कहानियाँ’, ‘महाविद्यालय’ हे त्यांचे कथासंग्रह विशेष गाजले.
त्यांची भाषा सरळ-सोपी आहे. कोणताही विलक्षण गुंतागुंतीचा अर्थ त्यांनी सोप्या भाषेत कुणालाही सहज कळेल अशा शब्दांत मांडला आहे. त्यांनी आपल्या साहित्यात सामान्य माणसांचे जीवन चित्रित केले. मानवी भावनांचे सूक्ष्म दर्शन घडवले. निसर्ग आणि मानवी जीवन यांचा त्याच्या साहित्यात सुंदर मिलाफ आढळतो. त्यांच्या साहित्यकृतींना अनेक महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना मानाचा व्यास सम्मान मिळाला. २०२३ मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. अशा या सामान्यांच्या असामान्य सोबत्याला ज्ञानपीठ मिळाल्याने इथल्या लाखो जणांना जगण्याची आणि हजारो कलावंतांना नवसर्जनासाठी नवी उमेद मिळेल.
(हा लेख सकाळ दैनिकात 24-3-2025 रोजी संपादकीय पानावर व्यक्तिनामा सदरात प्रकाशित झाला.)

