Showing posts with label वैभव चाळके. Show all posts
Showing posts with label वैभव चाळके. Show all posts

Tuesday, November 25, 2025

संगमेश्वरी बोली - वैभव चाळके


सोन्याचं दिवस येवदेत आमच्या बोलीला!
(संगमेश्वरी बोली - वैभव चाळके)
संगमेश्‍वरी बोलीभाषेची वैशिष्ट्ये, तिच्या इतिहासाचा शोध आणि आधुनिक काळातील तिचे अस्तित्व जपण्याचे प्रयत्न यांचा सखोल आढावा. बोलीतील शब्दसंपदा, व्याकरण, म्हणी आणि लोककलांमधील जतन याचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त लेख.


‘‘व अन्नानू! मुंबयसनं कदी आलाव? बरं हायस ना?’’

‘‘मी बराय. तू कुटं निगालास? बापूस बरा हाय ना?’’

‘‘केल्डी लय झालीत वो. झो जीव नको केलानी हाय. तात्या बरं हाय्त. वाय्च दम कोंड्तो अदीमदी.’’

‘‘वय झालं ना रं आता. आम्च्या दाजीसंगातचं तं.’’

‘‘त पन खरंच वो.’’

‘‘गोवलातला मावला कसा हाय रं?’’

‘‘बाबीमामा ना? बरा हाय. आला व्हत रैवारी!’’

हे असे लयदार संवाद ऐकत आम्ही मोठे झालो. पण मोठे होताना या भाषेकडून प्रमाणभाषेकडे कधी पोहोचलो आणि भाषेतील लय आणि तिचा गंध थोडा विसरत, थोडा सोबत घेऊन ‘पुस्तकी’ कधी बोलायला लागलो कळलेही नाही.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या एका संमेलनात देवरुखच्या आनंद बोंद्रे यांनी संगमेश्‍वरी बोलीभाषेतील कार्यक्रम सादर केला तेव्हा प्रथम आपली बोली इतरांपेक्षा वेगळी आहे याची जाणीव झाली. त्यानंतर नकळतपणे या बोलीचा शोध सुरू झाला आणि मी नव्याने ती बोली शिकण्याचा प्रयत्न केला. आईकडून काही गाणी कॅसेटवर रेकॉर्ड करून घेतली.

संगमेश्‍वरी असे या बोलीभाषेचे नाव असले, तरी ती केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्‍वर तालुक्यातच ती बोलली जात नाही. खेडपासून राजापूरपर्यंत ही बोली बोलली जाते. अर्थातच सामाजिक आणि आर्थिक स्तर, ग्रामीण आणि शहरी भाग यानुसार त्यात थोडाबहुत फरक आढळतो. गेल्या काही वर्षांत बोली सोडून प्रमाणभाषेकडे वळणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने मूळ बोली बोलणाऱ्यांची संख्या वेगाने कमी होत आहे. असे असले तरी अस्सल ग्रामीण भागात जे आपले जीवन जगत आहेत, त्या सर्वांच्या मुखी आजही हीच बोली दिसते. संतोष पवार, वैभव मांगले, प्रभाकर मोरे या कलावंतांनी ही बोली छोट्या पडद्यापर्यंत पोहोचवली आणि तिथून ती सगळ्या जगाला परिचित झाली. आपण अधिकाधिक ‘ग्लोबल’ होऊ लागल्यावर अधिकाधिक ‘लोकल’ होण्याची मनीषा जागृत झाली आणि वेगवेगळ्या बोलींतील लोक आपापल्या बोलींमधून सादरीकरणे करू लागले. ‘रील्स’ आणि व्हिडिओंद्वारे ती समाजमाध्यमांत पसरली.

या बोलीभाषेत साहित्याची फारशी निर्मिती झालेली नाही. मात्र येथील नमन, जाकडी, भारूड, भजने या लोककलांच्या माध्यमांतून ती अनेक वर्षे जतन झालेली दिसते. गुरुपरंपरेने आलेल्या चोपड्यांमध्ये या रचना पाहायला मिळतात. इथल्या नवनवीन कवनकारांनी आपल्या बोलीत कवने लिहून ती सादर केलेली आढळतात. पण त्यांचे शास्त्रीय पद्धतीने संकलन सिद्ध झाल्याचे अद्याप कानावर आलेले नाही.

ललित लेखनात काही ठिकाणी या बोलीचा वापर झालेला दिसतो. लांजा तालुक्यातील भांबेड गावचे बबन धनावडे यांनी आपल्या काही कथांमधून आणि ललित लेखांमधून ही बोली वापरलेली आढळते. संगमेश्‍वर तालुक्यातील साखरपा गावचे अशोक लोटणकर यांच्या काही ललित लेखांत या बोलीतील संवाद वाचल्याचे आठवतात. श्रीकांत शेट्ये हे रत्नागिरीच्या शिरगावचे लेखक ग्रामीण कथा लिहीत. त्यांच्या पात्रांच्या तोंडी ही बोली असलेली बऱ्याच वर्षांपूर्वी वाचल्याचे आठवते. अलीकडे प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या कादंबरीत काही ठिकाणी संगमेश्‍वरी बोलीचा वापर केला आहे. त्या कादंबरीस साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला. तेव्हा त्याचे अभिनंदन करताना मीही आवर्जून संगमेश्‍वरी बोलीत, ‘बावा, तू चालत ऱ्हा. चालनारा मॉप फुडं जातो, असं वाडवडलान सांगून ठेवलान हाय.’ असा त्याच बोलीतील संदेश त्याला पाठवला होता!

आपल्याकडील बोलीभाषांचे व्याकरण लिहिण्याचे प्रयत्न फारसे झालेले नाहीत. बोलींना व्याकरण असते. ते संगमेश्‍वरी बोलीलाही आहेच. या बोलीत करताव, घेताव, मारताव, लावताव, देताव, अशी रूपे आहेत आणि भूतकाळात घेतलान, मारलान, धरलान, लावलान, अशी रूपे आढळतात. या बोलीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्त्रियाही पुल्लिंगी क्रियापदेच वापरतात. म्हणजे पुरुषांप्रमाणे त्या येतो, जातो, करतो, देतो असे म्हणतात. मी मुंबईच्या महाविद्यालयात गेल्यावर ‘मॅडम येतो म्हणाल्या,’ असे बोललो होते आणि वर्गात एकच हशा पिकला होता!

कोणत्याही भाषेची आपली स्वतःची शब्दसंपदा असते. माणसाच्या जीवनशैलीतील बदलांप्रमाणे काही शब्द मागे पडतात, तसे यातील काही शब्द त्या त्या वस्तू, प्रथा-परंपरा, जीवनशैलीच्या बदलाप्रमाणे मागे पडले आहेत. उदाहरणार्थ- सोरकी, बिन्गा यांसारखी मातीची भांडी आता कोणी फारशी वापरत नाही. शेती करणे कमी झाल्याने शेतीशी संबंधित काही शब्द नाहीसे झाले. वाडा म्हणजे गोठा, बलाट म्हणजे गोठ्याला बांधलेली लाकडाची भिंत हे शब्द आता नामशेष व्हायला लागले आहेत. घर बांधण्याच्या पद्धतींत बदल झाल्यामुळे पडवी, वटी हे शब्द फारसे उरले नाहीत. अंगण अद्याप असल्यामुळे खळे हा शब्द आहे. लय म्हणजे खूप, नाकडं म्हणजे लाकडं, गुदस्ता म्हणजे गेल्या वर्षी, पावटन म्हणजे पायरी, करवादने म्हणजे रागवणे, कुपान म्हणजे कुंपण, मागलं म्हणजे मागील, इस्तव म्हणजे विस्तव, इजला म्हणजे विझला, हे शब्द व रूपे वापरात आहेत. ‘मान नाय मान्ता नी बसायला गोन्ता’(मान नसेल, तर सोयीही मिळत नाहीत), ‘भोपली बाय पसारली नी माग्चं गून इसारली’(यश मिळवल्यावर आपले मूळ विसरणे), ‘अडली गाय फटके खाय’ (अडचणीत असल्यावर नुकसान सहन करावे लागते) अशा अनेक म्हणी या भाषेत आढळतात.

ज्येष्ठ भाषातज्ज्ञ गणेश देवी यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर केलेल्या बोलीभाषांच्या सर्वेक्षणात संगमेश्‍वरी बोलीची बोलीभाषा म्हणून नोंद झाली आहे. पुण्याचे डेक्कन कॉलेज आणि राज्य मराठी विकास संस्था यांनी विविध भागांतील बोलींचा वेध घेणारा एक संयुक्त उपक्रम राबवला होता. त्यात संगमेश्‍वरी बोलीतील शब्दांचा संग्रह करण्यात आला आहे. ही सामग्री त्यांनी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. चिपळूण येथील अभ्यासक अरुण इंगवले यांनी गावखेड्यांमधून संगमेश्‍वरी बोलीभाषेतील १२००० अधिक शब्द, ७०० हून अधिक म्हणी आणि लोकगीते यांचे संकलन केले आहे. हा एक मोठा दस्तऐवज ठरावा.

सिंधुदुर्गात बोलल्या जाणाऱ्या मालवणी बोलीपेक्षा ही बोली वेगळी आहे. मालवणी व संगमेश्‍वरी यांच्यात व्याकरणाचा फरक आहेच, पण अनेक शब्दही वेगवेगळे आहेत. ‘वस्त्रहरण’सारख्या नाटकांमधून मालवणी जगभर पोहोचली. महेश केळुस्कर यांच्यासारख्या कवींनी ती सर्वदूर पोहोचवली.

जगभरातल्या विविध भाषा आणि बोली नामशेष होत असताना आपण पाहतो आहोत. त्यामुळे उत्तरोत्तर बोलीभाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण कमी होत जाणार. पण सुदैवाने अलीकडच्या काळात बोलींबाबत जागृती वाढल्यामुळे आणि तंत्रज्ञानाने समाजमाध्यमे उपलब्ध करून दिल्याने विविध बोलींचा वापर करून सादरीकरणे करणाऱ्याची संख्या वाढते आहे. त्यामुळे या माध्यमांच्या जगात बोली वाढत राहील, अशी आशा करायला जागा आहे.

तेव्हा एकासुरात म्हणू या-

‘पयलं नमान वंदू मी कोनाला
पयलं नमान शिरीगनेशाला
पयलं नम्मान पयलं नम्मान...
पयलं नम्मान पयलं नम्मान...
सोन्याचं दिवस येवदेत आमच्या बोलीला!’ 
(हा लेख 23-11-2025 रोजी सकाळच्या सप्तरंग पुरवणीत प्रकाशित झाला.)


Tuesday, March 25, 2025

सामान्यांचा असामान्य सोबती विनोदकुमार शुक्ल

 सामान्यांचा असामान्य सोबती

...
‘हताशा से एक व्यक्ति बैठ गया था
व्यक्ति को मैं नहीं जानता था
हताशा को जानता था
इसलिए मैं उस व्यक्ति के पास गया
मैंने हाथ बढ़ाया
मेरा हाथ पकड़कर वह खड़ा हुआ
मुझे वह नहीं जानता था
मेरे हाथ बढ़ाने को जानता था
हम दोनों साथ चले
दोनों एक दूसरे को नहीं जानते थे
साथ चलने को जानते थे।’
विनोदकुमार शुक्ल यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर होताच देशभरातील त्यांच्या रसिकांनी त्यांचे अभिनंदन करताना, त्यांची ही कविता आपल्या समाजमाध्यमांवर उद्‌धृत केली आहे. समाजातील शेवटच्या माणसाप्रति तुमच्या मनात किती कणव आहे यावरूनच कलावंताचे महानपण ठरत असते, असे म्हणतात. ज्ञानेश्वरांची रेड्यामुखी वेद वदवण्याची प्रतीकात्मक कथा, श्री. म. माटे यांचा ‘बन्सीधर! आता तू कुठे रे जाशील?’ हा प्रश्‍न ते भालचंद्र नेमाडे यांच्या पांडुरंग सांगवीकरपर्यंत आपली साहित्याची सगळी परंपरा आपल्याला हेच सांगत आली आहे. हिंदीतही तशी मोठी परंपरा दिसते. त्यातील आजचे आघाडीचे नाव म्हणजे विनोदकुमार शुक्ल हे होय. विनोदकुमार शुक्ल यांची लेखनशैली अत्यंत साधी, गहन आशय व्यक्त करणारी आहे. त्यांच्या साहित्याची ताकद त्याच्या साधेपणात आणि सूक्ष्म निरीक्षणशक्तीत आहे. त्यांनी ग्रामीण जीवन, मानवी भावनांचा संघर्ष आणि स्वप्नांची मोहकता यांचे सुंदर दर्शन घडवले आहे. हिंदी साहित्यात त्यांनी आपली स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे. त्यांचे साहित्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
विनोदकुमार शुक्ल यांचा जन्म १ जानेवारी १९३७ रोजी छत्तीसगडमधील राजनंदगाव येथे झाला. त्यांचे बालपण आणि शालेय शिक्षणही तिथेच झाले. लहानपणीच त्यांना साहित्याची गोडी लागली. त्यांनी नागपूर विद्यापीठातून उच्चशिक्षण घेतले. त्यानंतर ते अध्यापन क्षेत्रात कार्यरत झाले. अत्यंत मितभाषी असलेले शुक्ल साध्या जीवनशैलीचे पालन करणारे लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सर्वच लेखनात साधेपणा असला तरी तो वरवरचा नाही. त्यामध्ये सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि गूढ आशय आहे. आपल्या लेखनाची सुरुवात त्यांनी काव्यलेखनाने केली. कवितांमधून साध्या, रोजच्या जीवनातील गोष्टींवर आपल्या असामान्य प्रतिभेचा प्रकाश टाकलेला पाहायला मिळतो. त्यांच्या कवितेतील भाषा सहज आणि प्रवाही आहे. सहज कळणारी आहे. शांत, साधी आणि तल्लख निरीक्षणशक्ती ही त्यांची वेगळी ओळख आहे. लगभग जयहिंद (१९७१), वह आदमी चला गया नया गरम कोट पहिनकर विचार की तरह (१९८१), सब कुछ होना बचा रहेगा (१९९२), अतिरिक्त नहीं (२०००), कविता से लंबी कविता (२००१), आकाश धरती को खटखटाता है (२००६), पचास कविताएँ (२०११), कभी के बाद अभी (२०१२), कवि ने कहा (२०१२), प्रतिनिधि कविताएँ (२०१३) हे त्यांचे कवितासंग्रह रसिकांच्या पसंतीस उतरले आहेत.
विनोदकुमार शुक्ल यांच्या कादंबऱ्या हिंदी साहित्यात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यांच्या कादंबऱ्या साध्या ग्रामीण जीवनाशी निगडित असल्या तरी त्यामध्ये मानवी मनोव्यापारांचे नितांत सुंदर दर्शन घडते. नौकर की कमीज़ (१९७९), खिलेगा तो देखेंगे (१९९६), दीवार में एक खिड़की रहती थी (१९९७), हरी घास की छप्पर वाली झोपड़ी और बौना पहाड़ (२०११), यासि रासा त (२०१७) आणि एक चुप्पी जगह (२०१८) या त्यांच्या कादंबऱ्या वाचकप्रिय झाल्या आहेत. ‘नौकर की कमीज’ ही त्यांची पहिली आणि सर्वाधिक लोकप्रिय कादंबरी. त्यात एका गरीब आणि साध्या नोकराच्या जीवनाचे दर्शन घडते. त्याची स्वप्ने, संघर्ष आणि त्याला मिळणारी वागणूक यांचे अत्यंत प्रभावी शब्दांत चित्रण केले आहे. यावर एक चित्रपटही आला होता. ‘खिलेगा तो देखेंगे’ या कादंबरीत एका ग्रामीण भागात शिकवणाऱ्या शिक्षकाच्या जीवनचित्रणाच्या निमित्ताने त्यांनी एकूण मानवी जीवनाचे विविध पैलू उलगडले आहेत. ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ ही कादंबरी मानवी जीवनातील तात्पुरतेपणा आणि शाश्वतता यावर भाष्य करणारी आहे. विशेषतः जग भौतिकतेच्या मागे धावायला लागल्याच्या पार्श्वभूमीवर या कादंबरीतील चिंतन महत्त्वाचे ठरते. विनोदकुमार शुक्ल यांनी लघुकथेच्या प्रांतातही यशस्वी मुशाफिरी केली आहे. त्यांच्या लघुकथांमध्येही लेखनशैलीची विशेष झलक दिसते. त्यांच्या कथांत पात्रांपेक्षा परिस्थिती आणि मानसिक प्रवृत्ती यांना जास्त महत्त्व असते. पेड़ पर कमरा (१९८८), महाविद्यालय (१९९६), एक कहानी (२०२१) आणि घोड़ा और अन्य कहानियाँ (२०२१) हे कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. ‘नींद की दूरी और अन्य कहानियाँ’, ‘महाविद्यालय’ हे त्यांचे कथासंग्रह विशेष गाजले.
त्यांची भाषा सरळ-सोपी आहे. कोणताही विलक्षण गुंतागुंतीचा अर्थ त्यांनी सोप्या भाषेत कुणालाही सहज कळेल अशा शब्दांत मांडला आहे. त्यांनी आपल्या साहित्यात सामान्य माणसांचे जीवन चित्रित केले. मानवी भावनांचे सूक्ष्म दर्शन घडवले. निसर्ग आणि मानवी जीवन यांचा त्याच्या साहित्यात सुंदर मिलाफ आढळतो. त्यांच्या साहित्यकृतींना अनेक महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना मानाचा व्यास सम्मान मिळाला. २०२३ मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. अशा या सामान्यांच्या असामान्य सोबत्याला ज्ञानपीठ मिळाल्याने इथल्या लाखो जणांना जगण्याची आणि हजारो कलावंतांना नवसर्जनासाठी नवी उमेद मिळेल.
(हा लेख सकाळ दैनिकात 24-3-2025 रोजी संपादकीय पानावर व्यक्तिनामा सदरात प्रकाशित झाला.)

Wednesday, December 25, 2024

भारतीय कवयित्री

भारतीय कवयित्री

( सकाळ  नाममुद्रामध्ये 24 डिसेंबरला प्रकाशित झालेला लेख - वैभव चाळके)  

‘मैं जब तक आई बाहर एकांत से अपने... बदल चुका था रंग दुनिया का’ असे म्हणणाऱ्या कवयित्री गगन गिल साहित्य अकादमीच्या मानकरी ठरल्या आहेत. केवळ पाच कवितासंग्रहांनी हिंदी साहित्यात महत्त्वाचे स्थान मिळवलेल्या, गेली साडेतीन दशके सातत्याने लिहिणाऱ्या, आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गिल यांची भारतीय कवयित्री अशी ओळख निर्माण झाली आहे. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणे कोणत्याही साहित्यिकाने केलेल्या कामगिरीवर केलेले राष्ट्रीय पातळीवरचे शिक्कामोर्तब असते. अलीकडेच मराठीतील ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षा ग्रंथासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला, तेव्हाच उत्तरेकडील गगन गिल या ज्येष्ठ कवयित्रीसही ‘मैं जब तक आई बहार’ या कवितासंग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. गेली अनेक वर्षे सातत्याने काव्यलेखन आणि गद्यलेखन करणाऱ्या गगन गिल यांचे साहित्य सर्वदूर पोहोचले आहेच; मात्र या पुरस्कारामुळे त्याचा परीघ आता आणखी विस्तारेल आणि भारतीय माणूस, त्यातही स्त्रीचा वेध घेऊ पाहणारा विचार अधिक मोठ्या समाजापर्यंत पोहोचण्यास त्याची नक्कीच मदत होणार आहे. वडिलांनी सांगितलेल्या कहाण्यांचा त्यांच्या आयुष्यावर कायमच प्रभाव पडला. वडिलांनी जर त्या कहाण्या सांगितल्या नसत्या तर मी गगन गिल झाले नसते, असे त्यांनी एकदा म्हटले आहे. आपल्या भावना नेमक्या शब्दांत पकडणे हे कवितेपुढील सर्वांत मोठे आव्हान असल्याचे त्या सांगतात.
नवी दिल्लीत राहणाऱ्या गिल यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९५९मध्ये नवी दिल्लीत झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठामधून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. गेली अनेक वर्षे त्या सातत्याने लेखन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याबरोबर अलीकडील काही वर्षे त्या इंग्रजीतील नामवंत वर्तमानपत्रात लिटरली एडिटर म्हणून कार्यरत आहेत. १९९०मध्ये लोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखन कार्यक्रमात त्या भारताच्या प्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या. याशिवाय १९९२-९३मध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना पत्रकारितेसाठी फेलोशिपसुद्धा मिळाली होती. त्यांच्या नावावर पाच कवितासंग्रह अहेत. देश-विदेशांतील कवितेचे रसिक आणि अभ्यासक यांनी त्यांच्या कवितांची नेहमीच प्रशंसा केली आहे. याशिवाय अमेरिका, इंग्लंड आणि जर्मन या विद्यापीठांमध्ये त्यांच्या कविता शिकवल्या गेल्या आहेत. २००२च्या जुलैमध्ये त्यांनी युनायटेड किंगडममधील मॅंचेस्टर लायब्ररीमध्ये कॉमनवेल्थमधील लेखकांसाठी लेखन कार्यशाळांची मालिकाच घेतली होती. त्यानंतर २००४ मध्ये पेनसिल्व्हेनिया आणि बर्कले विद्यापीठाने एकत्र येऊन त्यांच्या लेखनावर एक विशेष वर्कशॉप आयोजित केले होते. २००५मध्ये लंडन विद्यापीठाच्या पोएट्री ट्रान्सलेशन सेंटरमध्ये त्यांच्या कवितांचे अन्य पाच आंतरराष्ट्रीय कवींच्या कवितांसह भाषांतर झाले आहे.

एक दिन लौटेगी लडकी (१९८९), अंधेरे में बुद्ध (१९९६), यह आकांक्षा समय नहीं (१९९८), थपक थपक दिल थपक थपक (२००३) हे त्यांचे अन्य काव्यसंग्रहही वाचकांच्या पसंतीस उतरले आहेत. याशिवाय त्यांनी गद्यलेखनही केले आहे. रामकुमार, दिल्ली में उनिंदे, आवक हे त्यांचे लेखसंग्रह प्रकाशित आहेत. त्यांनी विविध लेखक-कवींचे साहित्य भाषांतरितही केले आहे. बेगन्यू हरबर्ट, हरभजन सिंग, सीताकांत महापात्रा आणि श्रीकांत वर्मा आदी लेखकांच्या साहित्यकृती भाषांतरित करण्याचे मोलाचे कामही त्यांनी केले आहे.
भारतीय लेखकांच्या प्रतिनिधी मंडळामधून त्यांनी चीन, फ्रान्स, इंग्लंड, मॉरिशस, जर्मनी, मेक्सिको, ऑस्ट्रिया, इटली, तुर्की, बुलगेरिया, कम्बोडिया, इंडोनेशिया या देशांमध्ये जाऊन आपल्या रचना सादर केल्या आहेत. त्यांच्या लेखन कामगिरीसाठी त्यांना आजवर विविध नामवंत संस्थांचे पुरस्कार लाभले आहेत. १९८४मध्ये भारत भूषण अग्रवाल पुरस्कार, १९८९मध्ये संस्कृती सन्मान, २०००मध्ये केदार सन्मान, २००८मध्ये हिंदी अकादमी साहित्यकार सन्मान, २०१०मध्ये द्विजदेव सन्मान आदींनी त्यांना गौरविण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक निर्मल वर्मा यांच्याशी असलेल्या त्यांच्या नात्याविषयी नेहमीच बोलले-लिहिले गेले आहे. तो अनेकांच्या उत्सुकतेचा एक भाग आहे. साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्यावरही अनेकांना त्या अनोख्या मैत्रीची आठवण झाली आणि गिलही त्यावर अगदी मोकळेपणाने बोलल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय कवितेचा विशेषतः भारतीय कवयित्रींचा जेव्हा जेव्हा विचार होईल तेव्हा तेव्हा गगन गिल हे त्यातील एक महत्त्वाचे नाव असेल. आगामी काव्यसंग्रह ही ओळख अधिक ठळक करतील, यात शंका नाही! 

Sunday, November 10, 2024

कवितेतील प्रकाशोत्सव - वैभव चाळके

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. दिवाळीत सर्वत्र दिवे लावून आपण आनंद साजरा करीत असतो. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ हे जणू दिवाळीचे सूत्रच आहे. यानिमित्ताने मनाला भुरळ घालणारा हा मराठी कवितांमधील प्रकाशोत्सव... ‘देवा तुझे किती, सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, देव देतो’ या कवितेने आमच्या बालमनात कवितेचा पहिला सुंदर प्रकाश पडला. त्यानंतर ‘सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर... आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार...’ असे म्हणायचो, तेव्हा घरासमोरील डोंगरावरून आलेला सूर्याचा लख्ख प्रकाश संपूर्ण जगावर फाकलेला असायचा. पुढे कधीतरी ‘दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार’ वगैरे ऐकायला मिळाले. ‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ’ हे बालपणापासून म्हणतोच आहे; पण त्यातला सूर्यकोटिसमप्रभ शब्द कळायला फार दिवस जावे लागले आणि त्याचा अर्थ अजून कळतोच आहे. पुढे केव्हा तरी कवी अनिल यांच्या कवितेतील ‘सारेच दीप कसे मंदावले आता, ज्योती विझू विझू झाल्या, की झड घालून प्राण द्यावा पतंगाने, असे कुठेच तेज नाही!’ वाचायला मिळाली. कुसुमाग्रजांनी ‘स्वप्नांची समाप्ती’ या कवितेत ‘काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत’ असे लिहिले आहे. यातला अलीकडचा चांदण्याचा प्रकाश शुभ्र कोवळा आणि पलीकडचा सूर्याचा प्रकाश तप्त कोवळा आहे. मंगेश पाडगावकरांनी ‘काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली’ असे जे लिहून ठेवले आहे. त्या वेलींवरचा प्रकाश हा कोवळा प्रकाश... कोवळा शुभ्र प्रकाश आहे. कुसुमाग्रजांनी ‘प्रकाश प्रभू’ कवितेत म्हटले आहे - ‘घट तेजाचे भवती ओतित, असंख्य रविराजाचे प्रेषित, महाद्वार पूर्वेचे खोलुन, क्षितिजावर येती’...

विलक्षण प्रतिभेचे धनी असलेले त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांनी मराठी साहित्यात एकाहून एक सुंदर काव्यलेणी कोरून ठेवली आहेत. बालकवींच्या ‘अरुण’ कवितेमध्ये त्यांनी प्रकाशाची जी रूपे टिपली आहेत, त्यांना अन्य तोड नाही. ‘पूर्व समुद्रीं छटा पसरली रम्य सुवर्णाची, कुणीं उधळिली मूठ नभीं ही लाल गुलालाची?’ अशा सुरुवातीची ही कविता प्रकाशाची कितीतरी रूपे मांडते. या कवितेत बालकवी म्हणतात, क्षितिजाची कड उज्ज्वल दीप्तीने सारवली आहे. सृष्टीसतीने गळ्यात रंगीत मेघांचे अनुपम असे लेणे घातले आहे. हे दागिने सोन्याचे आहेत... रक्तवर्णाचे आहेत... पिवळे आहेत आणि मिश्रित रंगाचे आहेत. कुणाच्या तरी उदरातून सोन्याची गंगा वाहते आहे. कोणीतरी विशुद्ध कर्पूररस आपल्या अंगास लावला आहे. अरुण म्हणजे सूर्य जणू आपल्या नभपटलावर चित्र रंगवतो आहे, असेही ते पुढे म्हणतात. त्यापुढे जाऊन त्यांनी एक अत्यंत बहारदार अशी कल्पना केली आहे... दिवस-यामिनी म्हणजे दिवस आणि रात्र या सूर्योदयाच्या समयी परस्परांचे चुंबन घेत असल्याने त्यांच्या अनुरागाच्या म्हणजे प्रेमाच्या या लाल-गुलाबी छटा गगनात खुलल्या आहेत. सूर्योदय झाला, की रात्रीचे चांदणे दूर होते आणि लाल छटा पसरू लागते. बालकवी म्हणतात, जणू आपल्या मोत्यांची माळ कोणीतरी चोरून नेली आहे म्हणून नभश्री (म्हणजे आकाश) रुसली आहे आणि तिच्या गालावर ही लाल छटा आली आहे... पुढे या लखलखीत सूर्यप्रकाशाला बालकवींनी ‘सोन्याची द्वारका’ अशीही उपमा दिली आहे. दिव्याचे झोत अरुण वसुधेच्या हृदयात ओततो आहे, अशी कल्पनाही या कवितेच्या अंतिम खंडात बालकवींनी केलेली दिसते.
आपल्या ‘संध्यारजनी’ या कवितेत बालकवींनी रात्रीच्या प्रकाशाची वर्णने केली आहेत...
‘उदयगिरीवर नवतेजाची शांत पताका ही!
की गंगेच्या शुभ्र जलाचा झोत वरी येई? ’
‘शुक्रोदय’ कवितेत रात्रीच्या प्रकाश आकाशाकडे पाहू बालकवींनी ‘तेजाची फुटली पेठ... दिव्यत्वाची लयलूट’ असे म्हटले आहे, तर ‘अनंत’ कवितेत... ‘अनंत तारा, नक्षत्रे ही अनंत या गगनात... अनंत दीप्ती, अनंत वसुधा, हे शशीसूर्य अनंत’ असे म्हटले आहे. इथे चित्ताला शांती देणारा विश्वाच्या अफाटतेचे दर्शन घडवणारा विलक्षण ज्ञानप्रकाश आहे.
बालकवींच्या या ‘अरुण’ कवितेने प्रभावित होऊन राम गणेश गडकरी अर्थात गोविंदाग्रज यांनी या नावाच्या दोन कविता लिहिल्या आहेत. सूर्योदयाबाबत ते पहिल्या कवितेत म्हणतात... ‘की रजनीच्या उदरी दिसतो गर्भचि दिवसाचा’, तर दुसऱ्या कवितेत मात्र याच रंगांना अगदी वेगळ्या उपमा
दिल्या आहेत.
आपल्या भूपाळ्यांमध्येसुद्धा सूर्योदयाची अत्यंत विलोभनीय दृश्ये आहेत. ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेल्या एका भूपाळीत म्हटले आहे, ‘तुझ्या कांतिसम सूर्यपताका पूर्वदिशी फडकती अरुण उगवला प्रभात झाली ऊठ महागणपती.’ दिवाळीच्या गाण्यात तर ‘लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’च आहे. हा प्रकाशोत्सव पुन्हा धुंडाळताना... ‘सप्तरंगांत न्हाऊन आली... आली माझ्या घरी ही दिवाळी!’ अशी रंगीत अवस्था होऊन जाते.

Monday, August 5, 2024

सार्वजनिक उत्सव हा अर्थव्यवस्थेचा कणा!

 सार्वजनिक उत्सव हा अर्थव्यवस्थेचा कणा!

(वैभव चाळके)
...
गेले काही दिवस समाज माध्यमांवर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावा वा नाही, याबाबत चर्चा रंगली आहे. या उत्सवाच्या वेळी होणारे ध्वनिप्रदूषण, उत्सवांसाठी मंडप घालतात त्याची होणारी अडचण आणि या उत्सवांच्या काही मंडपांतच कार्यकर्त्यांकडून केले जाणारे जुगार, नशापाणी अशी कारणे विरोध करणाऱ्यांकडून चर्चिली जात आहेत. या अनुषंगाने ज्येष्ठ अभ्यासक ‘कालनिर्णय’चे जयराज साळगावकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सर्वच सार्वजनिक उत्सव सुरू राहायला हवेत, अशी भूमिका मांडली. सार्वजनिक उत्सव हे अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, असे ते म्हणाले.
...
आपल्या समाजात श्री गणेशाची आराधना शेकडो वर्षे होत आली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अठरा ओव्यांमध्ये ओंकारस्वरूप गणेशाचे वर्णन केले आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजनाने करण्याचा प्रघात आहे. स्वातंत्र्य चळवळीत जेव्हा ब्रिटिशांनी जमावबंदी आदेश लागू केला होता, तेव्हा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. तेव्हापासून गेली तब्बल सव्वाशे वर्षे महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. प्रथम स्वातंत्र्य चळवळीसाठी सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने पुढे सामाजिक अभिसरणाचे, कलागुणांच्या वाढीचे, छोट्या-मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देऊन कोट्यवधी हातांना काम देण्याचे उद्दिष्ट साध्य केलेले दिसते. गेल्या काही वर्षांत या गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले आहे. या उत्सवाला भव्यपण आले आहे. श्री गणरायांच्या आगमन सोहळ्यापासून विसर्जन सोहळ्यापर्यंत कितीतरी कार्यक्रम मोठ्या उत्साहात, मोठ्या गर्दीत पार पडताना दिसतात. या बदलत्या स्वरूपातील काही बाबींवर दरवर्षी काही प्रमाणात आक्षेप घेतले जातात. अर्थातच आक्षेप घेणाऱ्यांपेक्षा या उत्सवात सहभाग घेणाऱ्यांचे प्रमाण नेहमीच अधिक राहिलेले आहे आणि उत्तरोत्तर वाढते आहे. अलीकडच्या काळात मराठी माणसाच्या या सणात इतर भाषक आणि इतर धर्मीयसुद्धा मोठ्या उत्साहाने सहभागी होत असताना दिसतात.

जयराज साळगावकर याबाबत म्हणाले, मोठमोठे उत्सव ही समाजाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. आपल्या देशात गणेशोत्सव, दुर्गापूजा, नवरात्रोत्सव, दहीहंडी, दिवाळी असे मोठमोठे सण दरवर्षी साजरे केले जातात. ते साजरे करताना समाजात मोठा उत्साह पाहायला मिळतो. केवळ आपल्या देशातच असे सण होतात असे नाही, अमेरिकेत, युरोपातसुद्धा मोठमोठे सण साजरे केले जातात. जगभरातील सर्वच देशांमध्ये सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. कारण माणूस हा उत्सवप्रेमी आहे आणि त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली समाजरचना उत्सवातून उभी राहिलेली दिसते. आपल्या अर्थशास्त्राचा हे मोठे उत्सव म्हणजे कणाच आहे. उत्सवांमुळे होणारी मोठी आर्थिक उलाढाल पाहता अर्थशास्त्राला सणांचे मॉडेल स्वीकारणे सोपे गेले आणि मग त्यातूनच अर्थव्यवस्था उत्सवांवर चालत असलेली पाहायला मिळते. अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून मला मोठ्या उत्सवांमध्ये हा अर्थशास्त्राचा भाग अत्यंत महत्त्वाचा वाटतो. आदिम काळापासून माणूस उत्सव साजरे करीत आलेला आहे. समाज जेव्हा शेतीवर अवलंबून होता तेव्हा शेतीत धनधान्य पिकले म्हणजे माणूस उत्सव साजरा करीत असे. त्याच्या नव्या गरजा, त्याच्या नव्या आशाआकांक्षा पूर्ण करण्याचा तोच कालावधी असे. नव्या वस्तू खरेदी करण्याची संधी माणसाला याच काळात मिळत असे. त्यामुळे या काळातच सगळे उत्सव साजरे केले जात असल्याचे पाहायला मिळते. आपल्या सगळ्या मोठ्या सणांकडे पाहिलेत म्हणजे तुम्हाला माणूस आपल्या नवनव्या गरजा या सणांच्या काळातच पूर्ण करीत असल्याचे दिसते. बाजारात नव्या गाड्या, नव्या फॅशनचे कपडे, नवे तंत्रज्ञान या सणांच्या पार्श्वभूमीवरच दाखल होत असते. कारण सणांच्या निमित्ताने माणूस अधिक पैसे खर्च करायला तयार होत असतो. नवनव्या गोष्टी खरेदी करण्यास तयार असतो. त्यामुळे आपल्याकडील सर्व उत्पादनस्रोत हे कोणत्या ना कोणत्या सणाशी जोडून असलेले आणि आपले अनेक उद्योग-व्यवसाय सणांच्या संदर्भात आखणी करून चालवले जात असलेले दिसतात. त्यामुळे मोठ्या भव्य स्वरूपात साजरे होणारे आपले सार्वजनिक उत्सव छोट्या-मोठ्या कारणासाठी बंद करणे योग्य नव्हे! ती अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचवणारी, समाज रचनाच कोलमडून टाकणारी गोष्ट ठरेल. शेकडो उद्योग-व्यवसायातील लाखो करोडो लोकांना बेरोजगार करणारे ठरेल. केवळ आपला सार्वजनिक गणेशोत्सव उदाहरण म्हणून घेतला, तरी मूर्तीपासून देवपूजेच्या साहित्यापर्यंत आणि नैवेद्यापासून मनोरंजनाच्या क्षेत्रापर्यंत कितीतरी व्यवसायांना या काळात यानिमित्ताने चालना मिळालेली दिसते. मूर्तिकलेचा उद्योग वर्षभर सुरू असतो. कितीतरी कारागीर वेगवेगळ्या कलावस्तूंवर गणेशोत्सवासाठी वर्षभर मेहनत घेत असतात. आपल्याकडे चित्रपटांसाठी सेट उभारणारे जे लोक आहेत, त्यांच्यात कोकणातील आणि बंगालमधील कलावंतांचा सहभाग अधिक आहे. कारण या दोन प्रांतात अनुक्रमे सार्वजनिक गणेशोत्सव आणि सार्वजनिक दुर्गा उत्सव यांची शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्या परंपरेत हे कलावंत घडलेले आहेत. सार्वजनिक उत्सवांनी कितीतरी कला जगवल्या आहेत. वाढवल्या आहेत आणि आजच्या समाज रचनेत महत्त्वाचे योगदान दिले आहे. चित्रपटाचा विषय निघाला म्हणून सांगतो, आपल्या चित्रपटांनी आपल्या सणांना देशात सर्वदूर मान्यता दिली आहे. आपल्या समाजावर हिंदी चित्रपटांचा मोठा प्रभाव आहे. चित्रपटांमधून आपल्या सणांची कितीतरी गाणी सर्वत्र पोहोचली. लोकप्रिय झाली आणि त्यातून सण सार्वत्रिक झाले, असे दिसते.
...
जगभरात उत्सव
आपले अनेक उत्सव हे धर्माशी जोडलेले आहेत. जगभरात अशीच स्थिती दिसते. युरोप-अमेरिकेत अनेक चर्च मोठे उत्सव साजरे करतात. अन्य धर्मीयसुद्धा आपापले उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करताना दिसतात. याचे कारण समाजाला मोठ्या उत्सवांची गरज आहे आणि एकूण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे मोठ्या सणांची शक्ती निर्विवाद आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन अलीकडे ऑनलाइन पद्धतीने सामग्री विकणाऱ्या अमेझॉनसारख्या मोठ्या कंपन्या मोठमोठे शॉपिंग फेस्टिवल आयोजित करीत असतात. त्यांचा आकार पाहिला म्हणजे फेस्टिवल अर्थात उत्सवांचे अर्थकारणातील महत्त्व सहज लक्षात येईल.
...
समाजधुरिणांनी आवाहन करावे!
उत्सवांमध्ये होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबाबत साळगावकर म्हणाले, विविध सार्वजनिक उत्सवात ध्वनिप्रदूषण होते हे खरे आहे. त्यावर उपाययोजना करता येऊ शकतात. करायला हव्यात. सरकारने डीजेवर याआधीच बंदी आणली आहे. गणेशोत्सवातील कार्यकर्त्यांमध्ये जनजागृती करून आपण ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आणू शकतो. ती मोठी अवघड गोष्ट नाही.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात जुगार खेळणे, नशाबाजी करणे या मुद्द्यांबाबत ते म्हणाले, सध्या अशा प्रकारे कोणी गैरवर्तन करत असेल, असे वाटत नाही. १९८०च्या दशकात हे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत होते. ती गोष्ट लक्षात आल्यावर आमचे बाबा-ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी विविध व्यासपीठांच्या माध्यमातून जनजागृती केली. गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले. त्यानंतर या वाईट गोष्टींना उत्तम प्रकारे पायबंद बसला. आजही कोठे जर अनुचित गोष्टी घडत असतील, तर समाजातील धुरिणांनी पुढे येऊन आवाहन करायला हवे. अशा प्रकारच्या आवाहनाला कार्यकर्ते आणि तरुण चांगला प्रतिसाद देतात, हे यापूर्वीच लक्षात आले आहे.
रस्त्यावर मंडप घालून रस्ता अडवला जातो, असा एक आक्षेप घेतला जातो. याबाबत ते म्हणाले, नागरिकांना उत्सव हवा असतो. त्यामुळे नागरिक एकत्र येऊन उत्सव करतात. काही ठिकाणी जागेअभावी रस्त्यावर मंडप घातला जातो, हे खरे आहे; मात्र रस्त्याच्या एका बाजूला मंडप घालून दुसऱ्या बाजूने वाहनांसाठी जागा सोडली जाते. त्यातून सामंजस्याने लोक आपली वाहने बाहेर काढत असतात, असे अनेक ठिकाणी पाहायला मिळते. बहुतांश ठिकाण लोक वाद न घालता समजुतीने मार्ग काढत असतात. अनेक जण तर स्वतःच या उत्सवात सहभागी झालेले असतात. सार्वजनिक उत्सवांमध्ये सहभाग घेणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे.
...
सामाजिक अभिसरणाचे व्यासपीठ
सार्वजनिक उत्सवाबाबतच्या चर्चेदरम्यान त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दासुद्धा अधोरेखित केला. ते म्हणाले, सार्वजनिक सण-उत्सव हे सामाजिक अभिसरणाचे एक अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ आहे. दिवाळी, रंगपंचमी, होळी अशा सणांमध्ये धर्म-जात विसरून लोक एकत्र येत असतात, याचा विचार केला जात नाही. या अर्थाने समाज म्हणून एकत्र राहण्यासाठी सण-उत्सव अत्यंत महत्त्वाचे आहेत.
...
मुंबई पोलिसांची कार्यक्षमता मोठी!
मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे यानिमित्ताने साळगावकर यांनी आवर्जून कौतुक केले. ते म्हणाले, मुंबईतील सार्वजनिक उत्सवांदरम्यान मुंबई पोलिसांची कामगिरी नेहमीच वाखाणण्यासारखी राहिली आहे. मुंबई पोलिसांच्या या कार्यक्षमतेचे कौतुक करायला हवे. मोठे उत्सव समाजाला विविध अंगांनी उपयोगी पडत असतात, हे आपण पाहिलेच; पण ते उत्सव सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडण्यासाठी पोलिस जे नियोजन करतात, जी मेहनत घेतात, ती अत्यंत महत्त्वाची आहे.

(3 आॅगस्ट 2024 रोजी सकाळच्या अवतरण पुरवणीत प्रकाशित)  

Thursday, December 28, 2023

मराठी शायरी ः भाऊसाहेब पाटणकर

 मराठी शायरी ः भाऊसाहेब पाटणकर

वैभव चाळके


उर्दूत लोकप्रिय असलेली शायरी मराठीत लिहीत असताना भाऊसाहेबांनी तिचा आत्माच कसा मराठी राहील याची काळजी घेतली. याशिवाय शायरीचे तंत्र त्यांनी नेमके साध्य केले आहे. रचनेतील रसिकाला धक्का देण्याचे तंत्र त्यांनी इतके चोख अवगत केले की, तेच त्यांच्या यशाचे गमक ठरले. २८ डिसेंबर हा भाऊसाहेबांचा जन्मदिवस. त्यानिमित्त...


मराठी कवितेच्या महामार्गात काही नितांत सुंदर वळणे आहेत. रॉय किणीकरांच्या रुबाया आणि भाऊसाहेब पाटणकर यांची शायरी ही त्यातील दोन महत्त्वाची उदाहरणे. रसिकतेचा सोपान चढत असताना भाऊसाहेबांची शायरी ‘भेटली’ म्हणजे जीव अगदी हरखून जातो. महाविद्यालयात शिकत असताना मुंबई महानगरात कुठे कुठे होणाऱ्या काव्यमैफलींना हजेरी लावण्याच्या काळात मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, वसंत बापटांपासून संदीप खरे यांच्यापर्यंत नानाविध कवींची सादरीकरणे ऐकायला मिळाली. अशाच एका मैफलीनंतर रात्री परतताना एक ज्येष्ठ मित्र म्हणाले, ‘‘तू भाऊसाहेब पाटणकर यांची शायरी वाचली आहेस का? नसली वाचलीस तर नक्की वाच. तुला आवडेल.’’ तो सल्ला शिरोधार्य मानून दुसऱ्या दिवशी ग्रंथालयातून भाऊसाहेब पाटणकरांचा संग्रह आणला आणि वाचून काढला. तेव्हा चढलेली नशा आज २५ वर्षे होऊन गेली तरी उतरलेली नाही... ती कधी उतरेल, असे वाटत नाही!


भाऊसाहेब पाटणकर यांनी मराठीत लिहिलेली शायरी हे मराठी साहित्यातील एक सुंदर लेणे आहे. मराठी गजलेपेक्षा ही शायरी वेगळी आहे. सुरेश भटांनी ज्याप्रमाणे मराठी गजल लिहिली, तशी मराठी शायरी लिहिण्याचे काम भाऊसाहेब पाटणकर यांनी केले. येथे मराठी हा भाषावाचक शब्द नसून तो संस्कृतीवाचक, गुणवाचक शब्द आहे. ‘मठोमती मुंबाजींना कीर्तने करू द्या... विठू काय बेमानांना पावणारा नाही’ असे सुरेश भट म्हणतात, तेव्हा गजलेतील तो शेर केवळ मराठीत आहे, म्हणून मराठी नाही. तो मराठी संस्कृतीतून निर्माण झालेला वाक्प्रचार घेऊन येतो. म्हणून सुरेश भटांची गजल ही अस्सल मराठी गजल आहे. अगदी त्याचप्रमाणे उर्दूत लोकप्रिय असलेली शायरी मराठीत लिहीत असताना भाऊसाहेबांनी तिचा आत्माच कसा मराठी राहील याची काळजी घेतली. याशिवाय शायरीचे तंत्र त्यांनी नेमके साध्य केले आहे. रचनेतील रसिकाला धक्का देण्याचे तंत्र त्यांनी इतके चोख अवगत केले की, तेच त्यांच्या यशाचे गमक ठरले. काही हिंदी चित्रपट आणि काही गाणी जशी आपण पुन्हा पुन्हा ऐकली तरी आपल्याला त्यांचा कंटाळा येत नाही किंबहुना पुन्हा पुन्हा नवा आनंद देण्याचे काम त्या कलाकृती करतात, त्याच गुणवत्तेची ही शायरी आहे. यातली भाषा इतकी सोपी... इतकी प्रासादिक आहे की, कोणत्याही सामान्य वाचकाला या शायरीतील अर्थ सहज उलगडतो... भावतो... आणि दाद द्यायला भाग पाडतो.


इष्काच्या गोष्टी

एरवी शायरीतील प्रेमिक म्हणजे पुन्हा पुन्हा प्रेयसीच्या पायाशी बसून प्रेमाची आळवणी करणारा असतो. भाऊसाहेबांचा प्रेमिक मात्र आपला सन्मान सांभाळून प्रेम करणारा आणि तशीच वेळ आली तर त्या सन्मानासाठी प्रेम उधळून लावणारा आहे. त्यांनीच म्हटले आहे,

‘हसतील ना कुसुमे जरी ना जरी म्हणतील ये

पाऊल ना टाकू तिथे बाग ती अमुची नव्हे

भ्रमरा परी सौंदर्य वेडे, आहो जरी ऐसे अम्ही

इष्कातही नाही कुठे, भिक्षुकी केली अम्ही’

मराठी माणूस मोडून पडेल; पण वाकणार नाही, असे त्याचे जे वैशिष्ट्य सांगतात, ते इथे बेमालूमपणे सहज काव्यात उतरले आहे.

...

कल्पनेच्या  उंच भराऱ्या

कल्पनाविलास हा भाऊसाहेबांच्या काव्याचा अगदी खास गुण आहे. त्यांच्या अनेक रचनांमध्ये तोंडात बोट घालायला लावणाऱ्या कल्पनांचा खजिना आपल्याला सापडतो. जीवन व्यवहार आणि जीवन तत्त्वज्ञान हे त्यांचे चिंतनाचे विषय आहेत. ‘जीवन’ या रचनेत जीवनाच्या कठोर वास्तवाबद्दल त्यांनी म्हटले आहे...

‘सारे मला विसरोत, त्याचे वाईट ना वाटे मला

वाटते वाईट, त्यांना विसरता ये ना मला

वाचला वेदांत आणि क्षणमात्र त्यांना विसरलो,

दोस्तहो, दुसऱ्या क्षणी मी वेदांत सारा विसरलो’

साने गुरुजी यांनी त्यांच्या एका कवितेत ‘फक्त माझे अश्रू नको येऊ देवा, हाचि ठेव ठेवा जन्मभरी’ असे म्हटले आहे. भाऊसाहेबांनी म्हटले आहे...

‘काय माझ्या आसवांनी काय मज नाही दिले

ते दिले जे ईश्वराने योग्यासही नाही दिले’

आपल्या इथल्या जीवनाबद्दल ते इतके समाधानी आहेत की, त्यांना या जीवनापुढे स्वर्गही फिका वाटतो आणि मग त्यांच्यातील मिश्कील शायरसुद्धा याविषयी टिप्पणी करतो...

‘आलो तुझ्या दुनियेत नव्हतो चोर वा डाकू आम्ही

एकही ना चीज इथली घेऊन गेलो आम्ही 

तोही असो आमच्यासवे आणिला ज्याला इथे

भगवान अरे तो देह मी टाकून गेलो इथे’

...

शायरीतील विनोद


भाऊसाहेबांनी त्यांच्या शायरीतून विनोदाची अशी पखरण केली आहे की, आपण प्रसन्न होऊन जातो. रोजच्या व्यवहारातील छोट्या-छोट्या गोष्टीतून त्यांनी विनोद निर्माण केला आहेच; पण थेट मृत्यूशीही पंगा घेतलेला दिसतो.

‘चंद्रमा हासे नभी शांत शीतल चांदणे

आमच्या आहे कपाळी अमृतांजन लावणे

नसतो तसा नाराज मी

आहे परी नशिबात आपल्याच हाती लावणे’

किंवा

‘पत्रे तिला प्रणयात आम्ही खूप होती धाडली

धाडली होती अशी की नसतील कोणी धाडली

धाडली मजला तिनेही काय मी सांगू तिचे

सर्व ती माझीच होती एकही नव्हते तिचे’

किंवा

‘मृत्युची माझ्या वदंता सर्वत्र जेव्हा पसरली

घबराट इतकी नर्कलोकी केव्हाच नव्हती पसरली

प्रार्थति देवास, म्हणती सारे आम्हाला वाचवा

वाचवा अम्हास आणि पावित्र इथले वाचवा’

किंवा

‘तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद्द झालो खूश मी

आज पण कळले मला ती ऐसेच बघते नेहमी’

किंवा

‘भास्करा, येते दया मजला तुझी आधीमधी

पाहिली आहेस का तू, रात्र प्रणयाची कधी’

आणि मग सूर्य त्यावर शाहिराला उत्तर देतो...

‘आम्हासही या शायराची कीव येऊ लागते

याच्या म्हणे प्रणयास याला रात्र येऊ यावी लागते’

ना म्हणू की इष्क त्याला आहे जराही समजला

इष्कातही दिवसास की जो रात्र नाही समजला’

...

ईश्वराशी संवाद


संत तुकारामांनी 'सुख जवापाडे आणि दुःख पर्वताएवढे' असे सांगून ठेवले आहे. भाऊसाहेबांनी तेच शायरीत कसे सांगितले आहे पाहा...

‘भगवंत तुला जर हाय ऐसे नाव असते लाभले

आम्हासही कोटी जपाचे पुण्य असते लाभले.

पाहुनी हा जपयज्ञ तुजला संतोष असता वाटला

आम्हासही रडण्यात नुसता मोक्ष असता लाभला’

ज्ञानेश्वरांची चराचरांत ईश्वर असल्याची कल्पना मनात आणा आणि मग भाऊसाहेबांच्या या चार ओळी ऐका.

‘तुमचा आहे अंश भगवान मीही कुणी दुसरा नव्हे

लोळण्या पायी तुझ्या तुमचा कोणी कुत्रा नव्हे

हे खरे की आज माझे प्रारब्ध आहे वेगळे

ना तरी आपणास भगवंत काय होते वेगळे’

‘यदा यदाही धर्मस्य’ हे आपणा सगळ्यांना माहिती आहे. भाऊसाहेबांनी ते तिरकस पद्धतीने मांडले आहे. ते म्हणतात...

‘निर्धारण्या दृष्टास तुजला त्रास घ्यावा लागला

देह घ्यावा लागला, अवतार घ्यावा लागला’

याशिवाय जीवनाला गाडीची उपमा देऊन त्यांनी मांडलेले शेर मुळातून वाचण्यासारखे आहेत. इष्क, शृंगार किंवा प्रेम याबद्दलच्या त्यांच्या रचना तेव्हाही लोकप्रिय झाल्या आणि आजही कवितेच्या रसिकांमध्ये लोकप्रिय होऊन राहिलेल्या आहेत. भाऊसाहेबांची प्रेम करण्याची एक स्वतःची रीत आहे आणि ती कुणाही रसिकाला मोहात पाडणारी आहे.

‘दोस्तहो, हा इष्क काही ऐसा करावा लागतो

ऐसे नवे नुसताच येथे जीव द्यावा लागतो

वाटते नागीन ज्याला खेळण्यासाठी साक्षात हवी

त्याने करावा इष्क येथे छाती हवी मस्ती हवी

ना म्हणून इश्कातले या सौंदर्य त्याला समजले

झाल्यावरी बरबाद ज्याला बरबाद झालो समजले’

...

लाखमोली संपदा

जिंदादिल, दोस्तहो, मराठी मुशायरा, मराठी शायरी आणि मैफिल ही त्यांची शायरीची पुस्तके प्रकाशित झाली. देशभर नानाविध ठिकाणी त्यांनी मैफली सादर केल्या. एक निष्णात वकील, सहा वाघांना लोळविणारे नेमबाज शिकारी आणि त्याच एकाग्रतेने रसिकाच्या वर्मा आपल्या शेरोशायरीतून नेम धरणारे भाऊसाहेब पाटणकर हे मराठी काव्याला पडलेले एक सुंदर स्वप्न आहे.

सरते शेवटी त्यांना त्यांच्याच शैलीत अभिवादन...

वाचली ही शायरी, गुणगुणलोही लाखदा

ही मराठीच्या घरातील लाखमोली संपदा

...

(काही अंश दैनिक सकाळमध्ये २८ डिसेंबर २०२३ रोजी प्रकाशित)

Saturday, December 24, 2022

खेडूत मुलींचा भाग्यविधाता

 

खेडूत मुलींचा भाग्यविधाता


फुटबॉलचा महाकुंभ नुकताच साजरा झाला. जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाचा आनंद साऱ्यांनीच लुटला. दूर तिकडे दोहामध्ये फुटबॉलचे सामने रंगत असताना अवघे जग त्यात सामील झाले होते. मेस्सी... मेस्सीची गर्जना आपल्या गावखेड्यातही ऐकायला मिळाली. याच फुटबॉलने झारखंडमधील रांचीशेजारच्या कर्मा नावाच्या खेड्यातील २५० मुलींच्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. आनंद कुमार गोपे या विलक्षण माणसाचे हे आगळेवेगळे काम प्रेरणादायी आहे. खेळावरील प्रेम म्हणजे कोणी तरी जिंकल्यावर केवळ जल्लोष करणे नव्हे, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
कर्मा गावातील बहुतांश लोकसंख्या आदिवासी आहे. राज्याच्या राजधानीपासून जवळ असूनही या गावातील अनेक मुलींना स्वतंत्र जीवन जगण्याची परवानगी नाही. कुटुंबातील सदस्यांनी नेमून दिलेली कामे करण्याशिवाय त्या घराबाहेर पडत नाहीत. लहान वयातच त्यांचे विवाह केले जातात. मात्र आनंद कुमार यांनी या गावातील मुलींच्या आयुष्यात फुटबॉल खेळाच्या मदतीने नवसंजीवनी भरली आहे. माजी फुटबॉल खेळाडू आणि परवानाधारक प्रशिक्षक असलेल्या आनंद यांनी आपले जीवन ही रत्ने घडवण्यासाठी समर्पित केले आहे.
३० वर्षीय आनंद यांना लहानपणापासून फुटबॉलची आवड आहे. आई-वडिलांनी त्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले. २०१०, २०११ आणि २०१२ मध्ये रांची लीग आणि जिल्हा स्तरावरही ते खेळले आहेत; मात्र बेताच्या आर्थिक परिस्थितीने त्यांना कधीही राष्ट्रीय स्तरावर सहभागी होता आले नाही. आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी आपले कौशल्य सामाजिक कारणासाठी वापरण्याचे ठरवले आणि कर्मामधल्या मुलींना त्यांचा भाग्यविधाता लाभला. गावात अनेक मुलींचे काही हजार रुपयांच्या हुंड्यासाठी लहान वयात विवाह केले जातात आणि राजस्थान, हरियानासारख्या राज्यांत त्यांची पाठवणी केली जाते, हे पाहून आनंद यांनी या मुलींना फुटबॉल शिकवायचे ठरवले; पण हे आव्हान सोपे नव्हते. अल्पशिक्षित, अशिक्षित ग्रामस्थांना मुलींचे सक्षमीकरण पटवून देण्यात सहा महिन्यांहून अधिक काळ गेला. तेव्हा कुठे त्यांच्या पालकांनी परवानगी दिली. ऑक्टोबर २०१३ मध्ये १५ मुलींना त्यांच्या पालकांनी फुटबॉल खेळण्याची परवानगी दिली आणि या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला सुरुवात झाली; पण स्थानिक रहिवाशांनी त्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुलींनी फुटबॉल खेळणे आणि शॉर्ट्स परिधान करणे त्यांना रुचत नव्हते.
फूटबॉल खेळू लागलेल्या मुलींना आनंद यांनी शाळेत दाखल केले. त्यामुळे त्या शाळेतील फुटबॉल संघांचा भाग बनू शकल्या. हळूहळू त्यांनी आपल्या गावातील २५० हून अधिक मुली आणि ५० मुलांना प्रशिक्षण दिले. २५ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केले. आठ मुलींनी इंग्लंडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. सहा मुली डेन्मार्कमध्ये खेळल्या आहेत. अनिता कुमारी आणि सोनी मुंडा या दोघींना २०२२ च्या फिफा विश्वचषकासाठीच्या शिबिरासाठी निवडण्यात आले होते.
एका विद्यार्थिनीचा बालविवाह होण्यापासूनही त्यांनी रोखला आहे. १३ वर्षांच्या त्या मुलीला २५ हजार रुपयांसाठी राजस्थानात पाठवले जात होते. त्याच मुलीची नंतर झारखंडच्या १४ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली. पुढे ती ताजिकिस्तानमध्ये भारतीय संघासाठी खेळली.
आनंद यांचे काम केवळ अवर्णनीय असे आहे. एका बाजूला देश मंगळ मोहिमा राबवत असताना दुसऱ्या बाजूला आजही लाखो लोक दारिद्र्यात आणि परंपरांच्या बेड्यांत गुरफटलेले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या सरकारी योजना असूनही समाज अपेक्षित उंची गाठू शकलेला नाही; मात्र आनंद कुमारसारखे लोक आपल्या एकट्याच्या हिमतीवर इतिहास रचत असतात. हजारो जणांचे आयुष्य घडवतानाच शेकडोंना प्रेरणा देण्याचे काम करीत असतात.

Friday, December 21, 2018

गाडगेबाबा

 गाडगेबाबा

महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास अशी एक मोठी परंपरा महाराष्ट्रात होऊन गेली. ज्ञानेश्वरांनी रचलेल्या संतपरंपरेच्या पायावर जे विशाल देवालय उभे राहिले, ज्याचा कळस तुकोबांनी उभारला, त्या महादेवालयाच्या कळसावर फडकणारी विवेकाची पताका म्हणजे संत गाडगे महाराजांचे जीवनकार्य होय. जगाच्या इतिहासात असा महात्मा झाला नाही. पुढे व्हावयाचा नाही. 20 डिसेंबर 1956 रोजी या संत पुरुषाने जगाचा निरोप घेतला. आज त्यांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांचे हे कृतज्ञ स्मरण... नव्या पिढीला काही शिकवणारे... काही सांगणारे... विवेकाच्या दिशेने घेऊन जाणारे!
आधुनिक काळातील संत शिरोमणी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या गाडगेबाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव नावाच्या गावात झाला. झिंगराजी व सखुबाई यांच्या पोटी 13 फेब्रुवारी 1876 रोजी त्यांचा जन्म झाला. तो दिवस महाशिवरात्रीचा होता. बाबांचे नाव डेबूजी असे ठेवण्यात आले. डेबूजी झिंगराजी जानोरकर हे त्यांचे पूर्ण नाव. झिंगराजी शेतकरी होते. शेती करून ते आपली उपजीविका करत. त्यांची परमेश्वरावर नितांत श्रद्धा होती. त्यांचे अकाली निधन झाले. वडिलांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या आईने त्यांना आपल्या माहेरी म्हणजे दापुरे या गावी आणले. गाडगेबाबांचे मामा मोठे कर्तबगार पुरुष होते. त्यांच्याकडे राहूनच डेबूजी हळूहळू मोठा होऊ लागला. सकाळी लवकर उठून प्रथम गुरांचा गोठा साफ करावा, भाकर्‍या खाव्यात, दुपारच्या जेवणासाठी कांदा-भाकरी सोबत घ्यावी, गुरे चरून झाल्यावर त्यांना पाणी पाजून झाडांच्या सावलीत उभे करून जेवण करावे आणि एखाद्या वृक्षाखाली ‘राम कृष्ण हरी! जय जय राम कृष्ण हरी!’ भजन गात विश्रांती घ्यावी. रात्री गावात भजन चाले, तिकडे जाऊन भजनात बसावे, असा त्यांचा बालपणीचा दिनक्रम होता. बालपणातच त्यांचे मन माणुसकीने भरून आले. आंधळे, पांगळे, लंगडे, लुळे, कुष्ठरोगी यांच्याविषयी त्यांच्या मनात कळवळा निर्माण झाला. ते त्यांच्यासाठी जे जे शक्य ते ते करू लागले. वयाच्या सोळाव्या वर्षी त्या काळातील प्रथेनुसार डेबूजीचे लग्न करण्यात आले. पुढे सावकाराने मामांचे शेत लुबाडले. त्या धक्क्याने मामा वारले. मामाच्या माघारी सावकाराने डेबूजीस मारण्यासाठी गुंड पाठवले. पण डेबूजी अंगापिंडाने मजबूत होता. त्याने त्या गुंडांना पिटाळून लावले.
डेबूजीस एक कन्या झाली. एक पुत्ररत्न झाले.दुर्देवाने मुलगा बालपणीच मरण पावला. पुढे एका अज्ञात विभूतीच्या हाकेला ओ देत 1 फेब्रुवारी 1905 या दिवशी पहाटे तीन वाजता डेबूजी घराबाहेर पडले आणि जगाच्या संसाराला लागले. सर्वस्वाचा त्याग करून डेबूजी काटेरी मार्गाने समाजहितासाठी चालू लागले. अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या, कानाला अडकवलेली बांगडी आणि एका हातात काठी, दुसर्‍या हातात गाडगे घेऊन गाडगेबाबा गावोगाव फिरून स्वच्छता करू लागले. सायंकाळी कीर्तन करू लागले. गाडगेबाबांचा हा वैरागी अवतार अनेकांना विचित्र वाटे. लोक त्यांना वेडा समजत. भिकारी समजत. गाडगेबाबा गावोगाव जाऊन स्वच्छता करीत. सायंकाळी तिथल्याच एखाद्या नदीकाठी, एखाद्या वृक्षाखाली, कीर्तन करीत. कीर्तन करायला त्यांना मंदिर लागत नसे.
गावस्वच्छता आणि कीर्तन या कामासोबतच त्यांनी गावागावांत विहिरी, धर्मशाळा बांधायला सुरुवात केली. कीर्तनातून विषमतेवर, जातीभेदावर आघात करत बाबा समाजाला समतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असत. त्यांची कीर्तनाची पद्धत फारच परिणामकारक होती. अधूनमधून ते विनोद करीत, प्रश्न विचारून लोकांना कीर्तनात सहभागी करून घेत. कीर्तन हे एक समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे, हे त्यांनी दाखवून दिले. अंधविश्वास, परंपरागत रूढी, धर्माच्या नावावर असलेले शोषण याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. सामाजिक सुधारणा व्हावी, दारूबंदी व्हावी, सावकारशाहीचे समूळ उच्चाटन व्हावे, शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी आपली सगळी हयात खर्च केली.
गाडगेबाबा कीर्तनातून मोठी प्रभावी मांडणी करीत. भुकेल्यांना जेवण द्या... तहानलेल्यांना पाणी द्या... बेकारांना काम द्या... उघड्यानागड्यांना वस्त्रे द्या... बेघर असलेल्यांना घरे द्या... रोग्यांना औषधोपचार द्या... गरीब मुलामुलींना शिक्षण द्या... पशुपक्षी, मूक प्राण्यांना अभय द्या... हाच खरा धर्म आहे... हीच खरी ईश्वरसेवा आहे... असे ते आपल्या कीर्तनातून सांगत असत. देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका... व्यसनांच्या आहारी जाऊ नका... चोरी करू नका... सावकाराकडून कर्ज काढू नका... जातिभेद, अस्पृश्यता पाळू नका... असे ते पोटतिडकीने सांगत. संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत, पण
स्वतःबद्दल मात्र ते म्हणत, मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही.
सामाजिक प्रबोधनासोबतच गाडगेबाबांनी नाशिक, देहू, आळंदी, पंढरपूर अशा धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली. नद्यांना घाट बांधले. गोरगरिब -अपंग यांच्यासाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली. आज इतक्या वर्षानंतरसुद्धा हजारो गरजवंतांसाठी गाडगेबाबा आधार ठरलेले आहेत. हातात गाडगे घेतलेला हा माणूस आजही हजारो लोकांचा आधार आहे. सांस्कृतिक, विवेकवादी आणि प्रबोधनाचा विचार करणार्‍या कितीतरी पिढ्यांचा गाडगे महाराज हा मोठा सशक्त असा मानसिक आधार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गाडगेबाबा यांची 1941 च्या जुलै महिन्यात भेट घेतली तेव्हाचा प्रसंग अनेकदा सांगितला जातो. गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती, ही माहिती कळताच कायदेमंत्री असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गाडगेबाबांना भेटायचे ठरवले. गाडगेबाबा तेव्हा त्यांना म्हणाले, डॉक्टर, तुम्ही कशाला आले? तुमचे एक मिनिट महत्त्वाचे. तुमचा किती मोठा अधिकार आहे. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणाले, बाबा माझा अधिकार दोन दिवसांचा. खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार फार  मोठा आहे. या दोन महामानवांमधील सख्य हे असे होते.
आज पुण्यतिथीनिमित्त गाडगेमहाराज यांना आपण कृतज्ञ प्रणाम करू या.

Monday, February 19, 2018

कागदाची करामत भिले चिपळूण


कागदाची करामत


सुट्ट्यांची गंगा वाहती राहू दे!

सुट्ट्यांची गंगा वाहती राहू दे!
अजय आपल्या मित्रांना सांगत होता, अरे! परवा मुलाची पिगीबँक फोडली (म्हणजे पैसे साठवायचा डबा) तर त्यातून अठरा हजार रुपये निघाले. सात वर्षे त्यात आम्ही पैसे टाकत होतो. घेतानाच मोठी घेतली होती मला वाटले होते पाच-एक हजार निघतील. मोजले तर अठरा हजार आणि वर निघाले...
मला एकदम पंधरा-वीस दिवसांपूर्वीचा प्रसंग आठवला.
सिएसटीहून बस पकडून मी दादरच्या दिशेने निघालो होतो. एक वृद्ध ग्रहस्थ बसमध्ये चढले, पण शंभराची नोट सुट्टी नसल्याने आणि वाहकापाशीसुद्धा सुट्टे पैसे नसल्याने त्यांना काय करावं कळेना. क्षणभर घुटमळून ते चालत्या बसमधून उतरले. उतरल्या उतरल्या धडपडले. कदाचित पडलेच असते. सुट्ट्या पैशांअभावी बिचार्‍यांना थेट हॉस्पिटल गाठण्याची वेळ आली असती.
बस प्रवासात ही सुट्टे पैसे मोठी भानगड असते. सीएसटी ते गिरगांव प्रवासाचे आधी सहा रुपये आणि मग आठ रुपये सुट्टे ठेवणे ही मोठीच डोकेदुखी ठरून राहिली होती माझ्यासाठी. चार दिवस सुट्टे द्यावेत तरी पाचव्या दिवशी वाहकाशी भांडण ठरलेले. मग एकदा मी ठरवून टाकले, आजपासून वाहकाशी हुज्जत घालायची नाही. तो असून देत नसला तरी शांत राहावयाचे. देवदयेने आपल्या खिशात पैसे आहेत. दहा रुपयाचे तिकीट घ्यायचे. वाद संपवायचा. मी हे असे ठरवून आता काही वर्षे निघून गेली. मला एकदाही आठऐवजी दहा रुपयाचे तिकीट काढावे लागलेले नाही. एकतर मी सुट्टे पैसे घेऊन जातो. दहाची नोट दिली तर सुट्टे पैसे मिळतात. म्हणजे मिळत आले आहेत.
सुट्टे हा खरे तर मोठाच प्रश्न आहे. एकदा मी खिशात पाचशेची नोट असताना दिवसभरात तिघांकडे सव्वाशे रुपये उधार ठेवले होते. शरम वाटू लागली होती स्वतःची ...
सांगायचा मुद्दा वेगळाच आहे. सुट्टे पैसे नसले म्हणजे अनेकदा शारीरिक, मानसिक त्रास होतो आणि आपल्या पैकी अनेक जण मुलांच्या पिगी बँकमधून आणि घरातल्या कपाटातून उगाचच सुट्टे पैसे अडकवून ठेवतात. सुट्टे पैसे चलनात राहिले पाहिजेत. ते असे अडचणीत ठेवू नका. सुट्टे पैसे आणायला रुग्णासोबतच्या माणसाला जेव्हा वणवण करावी लागते ना, तेव्हा त्याची काय अवस्था होत असेल ते आठवा आणि सुट्टे पैसे साठवून ठेवणे टाळा.
तुम्ही रस्त्यावर गाडी चालवित असताना जर अ‍ॅम्ब्युलन्स आली तर तुम्ही काय करता? अ‍ॅम्ब्युलन्सला जागा देता ना? सुट्टे पैसे अडवणे, अडवून ठेवणे हे अ‍ॅम्ब्युलन्सला जागा न देण्यासारखे आहे. तेव्हा वाट मोकळी करा. सुट्टे पैसे वाहत राहू द्या. ती गंगा मग तुमच्या गरजेला तुमच्यापाशीसुद्धा येईल, काय, आवडला ना विचार?
- वैभव बळीराम चाळके 
९७०२ ७२३ ६५२.

Monday, September 12, 2016

जग बदलण्याचा राक्षसी वेग
जग नेहमीच बदलत आले आहे. अश्मयुगापासून आज सोशल मीडियाच्या युगापर्यंत आपण सतत बदलत आलो आहोत. बदल ही एकमेव गोष्ट शाश्वत आहे.  थांबला तो संपला, ही म्हण त्यातूनच निर्माण झाली. पण गेल्या काही वर्षांपासून आपण राक्षसी वेगाने बदलतो आहोत. परिवर्तन आणि बदल या दोन शब्दांकडे बारकाईने पाहिलेत की आपण परिवर्तन फार मागे सोडून आलोय आणि नुसतेच बदलू लागलोय हे लक्षात येईल. यातून झाले काय तर आपली नीतिमूल्ये गुणविवेकच हरवून बसला आहे. एका मोठ्या राजकीय नेत्याने त्याच्या आत्मचरित्रात म्हटल्याप्रमाणे पूर्वी मोठे मासे छोट्या माणसांना खात असत. आता अधिक वेगाने जाणारे मासे कमी वेगाने जाणार्‍या माशांना खाऊ लागले आहेत.
मागच्या पिढीची अडचण
या राक्षसी वेगामुळे मागच्या पिढीची मोठीच अडचण झाली आहे. नव्या पिढीच्या या वेगाशी स्वतःला जुळवून घेणे त्यांना मोठे जिकरीचे झाले आहे. याबाबतीतील एक किस्सा तर मोठा भीषण आहे. एक वडील निवृत्त होतात. चांगली तीस-पस्तीस वर्षे इमाने इतबारे नोकरी केल्यामुळे त्यांना पंधरा वीस लाख रुपये निवृत्तीफंड मिळतो. आता आपल्या एकुलत्या एका मुलाला हक्काचे, मालकीचे घर घेऊन देता येईल, म्हणून ते खुशीत असतात.  मुलगा घरी येताच ते त्याला ही गोष्ट सांगणार असतात. पण तेवढ्यात मुलाचा फोन येतो. तो म्हणतो, पप्पा मला अमूकतमूक कंपनीत नोकरी लागली आहे. मला लाखभर रुपये पगार मिळणार आहे आणि मुख्य म्हणजे कंपनीने एका बँकेसोबत होम लोनसाठी टायप केलेले असल्याने नोकरीसोबत वन बीएचके फ्लॅटही आपल्या नावावर होणार आहे. अभिनंदन बाबा, आपण आता आपल्या हक्काच्या घरात राहू. बदलाच्या या वेगामुळे बापाला हसावे की रडावे कळेना झाले.
बदलात मूल्ये हरवत आहेत
बदल शाश्वत आहे हे खरेच, पण पूर्वी बदल होत असताना त्या बदलांना मूल्यांशी जोडून त्याचे परिवर्तनात रूपांतर करता येत असे. आज इतक्या वेगाने आपण बदलतो आहोत, की मूल्यांचा विचार करायला वेळ मिळेना झाला आहे. नव्याचे कौतुक करण्यात आपण मूल्यभान विसरतो आहोत. आर्थिक व्यवहार हातातील मोबाईलवरून होऊ लागले. नाटक- सिनेमा सारे मोबाईलमध्ये दाखल झाले. त्यात ७० एमएम अनुभवाला आपण पारखे झालो. स्मार्टफोनने आपल्याला वरवर स्मार्ट केले आणि आतून बुद्धू करून ठेवले आहे. आपण रोज फेसबुक, वॉटस्ऍपवरून हजारो जणांना हाय हॅलो करतो. पण शेजारी शेजारी बसलेले लोक एकमेकांशी बोलणे विसरून गेले आहेत. मुले स्मार्टफोनवर सर्व गोष्टी करीत आहेत. त्यांचा की-बोर्डवर टाईप करण्याचा आणि स्क्रीनवर बोटं फिरवण्याचा वेग वाढला. पण शरीर स्थूल झालेय, त्यात चपळता उरली नाही. डोळे दिवसेंदिवस क्षीण होत आहेत. पाठीला पोक येऊ लागले आहे. हे आपल्या लक्षातच आलेले नाही.
मोफत वेगवान वायफाय!
मुतारी मात्र नाही
मुंबई लोकलच्या अनेक स्थानकांवर  मोफत वेगवान वायफाय उपलब्ध असल्याच्या मोठमोठ्या जाहिराती दिसतात. वायफाय अगदी चकटफू उपलब्ध आहे. पण त्याच स्टेशनवर लघवीला लागलेल्या प्रवाशाला तो तुंबला तरी मोकळे होता येईल, एवढ्या पुरेशा मुतार्‍या नाहीत. महिलांची तर याबाबतीत अवस्था आदिम काळापेक्षा भयानक आहे. तेव्हा किमान निर्जन आढोसे तरी होते. प्रगतीच्या या वेगाला आपण विवेकाची चाळणी लावणार नसू तर आपले भविष्य फार चांगले आहे, असे म्हणणे हे केवळ दिवास्वप्न ठरेल! सावधान!!

कवी कसा असावा?
काही काही दिवस अगदी विलक्षण असतात. परवा गुरुवारी असाच एक  विचित्र योगायोग घडून आला. ‘गुरुचरित्र’ लिहून मराठी कवितेत मानाचे स्थान मिळविणारे कवी गुरुनाथ सामंत यांनी मोजक्याच, पण दर्दी रसिकांसमोर जाहीर काव्यवाचन केले. (ते आध्यात्मिक गुरुचरित्र ते हे नव्हे!) आणि त्याच दिवशी काही तासांच्या अंतराने निसर्गकवी नलेश पाटील यांच्या निधनाची बातमी आली. एरवी जाहीर कार्यक्रमात कविता वाचन न करणारा एक कवी ऐकावयास मिळाल्याचा  आनंद अनुभवत असताना केवळ जाहीर कार्यक्रम हेच एकमेव माध्यम कवितेसाठी निवडलेला एक उमदा निसर्गकवी आपल्यातून निघून गेल्याचे दुःख
सामोरे आले.
या दोन घटनांच्या अनुषंगाने आज कवी कसा असावा? याविषयी मांडणी करावी वाटते आहे. कवी सामंतांचे जाहीर काव्यवाचन ऐकण्याची संधी मिळाली ती ‘रुची’चे संपादक सुदेश हिंगलासपूर आणि किरण येले यांच्यामुळे! त्यांनी ‘रुची’चा एकही कविता नसलेला विशेषांक काढला आहे आणि त्याचे प्रकाशन सत्यकथेची जेथे होळी करण्यात आली त्या मौजेच्या पायरीवर करण्यात आले. त्या घटनेचे साक्षीदार असलेल्या कवी गुरुनाथ सामंतांच्या हस्तेे हे प्रकाशन झाले. विशेषकांचा संपादक म्हणून किरण येले यांनी कवी कसा असावा, याचा एक वस्तुपाठच घालून
दिला आहे.
दुसरी गोष्ट गुरुनाथ सामंत यांची! नव्या कविता लिहू लागलेल्या सामंत यांनी एकदा कविता स्पर्धेत भाग घेतला. कवी रमेश तेंडुलकर परीक्षक होते. (भारतरत्न सचिन तेंडुलकर हे रमेश तेंडुलकर यांचे सुपुत्र) सामंतांच्या कवितेला तुफान टाळ्या पडल्या. सर्वांना माहीत होते पहिला क्रमांक सामंत यांचाच येणार, पण तेंडुलकरांनी सामंतांना उत्तेजनार्थ बक्षीसही दिले नाही. ते आपल्या भाषणात म्हणाले, सामंतने कविता छान म्हटली. पण त्यांच्यावर रेगे आणि मर्ढेकरांचा प्रभाव आहे. मी त्याला बक्षीस दिले नाही, कारण बक्षीस दिले तर तो असाच कविता करीत राहील. ते तसे त्याने करू नये, स्वतःची कविता शोधावी, म्हणून त्याला आज बक्षीस दिलेले नाही! सामंतांनी तेंडुलकरांचे ऐकले. पुढची काही दशके काव्यसाधना केली. प्रसिद्धीच्या मागे न जाता उत्तम लेखन केले. कवी कसा असावा, त्याचा हा एक वस्तुपाठच आहे!
आता तिसरी गोष्ट निसर्गकवी नलेश पाटील यांची! नलेश पाटील चित्रकार कवी! रंगानी वेड लावलेला अवलिया! निसर्गात रमणारा! कल्पनांनी बहरणारा!  त्यांनी गावोगाव कविता गाऊन कवितेचा गाव रसरशीत ठेवला. पण गंमत पाहा, अवघ्या महाराष्ट्राला नव्हे बृहन्महाराष्ट्राला माहीत असलेल्या या कवीचा स्वतःचा कवितासंग्रह नाही. ‘कवितांच्या गावा जावे’ या संग्रहात त्यांच्या काही कविता आहेत तेवढाच काय तो त्यांच्या संग्रहित प्रकाशित काव्यसंसार! उरलेल्या कविता कुठेकुठे नियतकालिकांत वाचायला मिळतात! सांगायचा मुद्दा म्हणजे कवी म्हणून नाव व्हायला, लोकांच्या मनात जागा मिळवायला संग्रह काढायची आवश्यकता नसते, चांगली कविता लिहिली पाहिजे. कवी कसा असावा याचा हा वस्तुपाठ! महाराष्ट्रात कविता गवता ऐसी उगवत आहे. अशा वेळी सर्व कवींनी हे तीन वस्तुपाठ सदैव
लक्षात ठेवायला हवेत!

Sunday, February 27, 2011

मराठी असे आमुची मायबोली

मराठी असे आमुची मायबोली
27 फेब्रुवारी हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिन आपण सारे "मराठी भाषा' दिन म्हणून साजरा करतो. मराठीला दुसरे ज्ञानपीठ मिळवून देणारे कुसुमाग्रज हे महान कवी या मातीत जन्मले हेही आपले भाग्यच होय. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हटलं की, "उठा, उठा चिऊताई'पासून "ओळखलंत का सर मला'पर्यंतच्या पाठ्यपुस्तकातील कविता आठवतात, तशाच पृथ्वीचे प्रेमगीत, स्वप्नांची समाप्ती, अहिनकुल, गर्जा जयजयकार अशा त्यांच्या अजरामर कविता आठवतात, पण मराठी भाषादिनाच्या निमित्ताने विचार करू लागलो की, "पन्नाशीची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडोनी वाट वाकडी धरू नका, ' हा त्यांचा फटका आठवतो. मराठी भाषेची झालेली दैन्यावस्था कुसुमाग्रजांनी या फटक्यातून मांडली. शासनाने त्या कवितेची पोस्टर बनविली. शिधावाटप पत्रिकेवर त्यातल्या काही ओळी छापल्या आणि कर्तव्यपूर्तीचा श्वास घेतला. पण मराठीचे दशावतार संपले नाहीत. संपण्याची चिन्हे नाहीत. मराठी कवींनी मराठी भाषेबद्दल वेळोवेळी रचना केल्या आहेत. त्यातून मराठीचा अभिमान तर व्यक्त होतोच, पण काळजीही व्यक्त होते. मराठीचा आवाज सतत वाजता ठेवण्याचं काम मराठी कवींनी सातत्याने 700-800 वर्षे केले आहे. आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आपण या आवाजाचा वेध घेऊ या.
मराठीची काव्य परंपरा साधारणतः ज्ञानेश्वरांपासून मानली जाते. मराठी कवितेचा भक्कम पाया ज्ञानेश्वरांनी रचला. त्या भक्कम पायावर आज मराठीची परंपरा उभी आहे. संत ज्ञानेश्वर मराठीची थोरवी सांगताना लिहितात-
जैसी दीपांमाझि दिवटी। का तिथी माझि पूर्णिमा गोमटी।
तैसी भाषांमध्ये मऱ्हाटी। सर्वोत्तम।।
तीर्थांमध्ये काशी। व्रतांमध्ये एकादशी। भाषांमध्ये तैशी।
मऱ्हाटी शोभिवंत।।
ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायातील ओळी तर सर्वश्रुतच आहेत-
माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातेंही पैजां जिंके।
ऐसी अक्षरें रसिकें। मेळवीन।।
संत ज्ञानेश्वरांच्या नंतर होऊन गेलेल्या संत एकनाथांच्या काळात संस्कृत भाषेचा वृथा अभिमान धरून पंडित प्राकृत भाषेस कमी लेखत होते. त्यांना थेट सवाल करताना एकनाथ महाराज लिहितात-
संस्कृतवाणी देवें केली। तरी प्राकृत काय चोरापासोनि झाली?
मराठी भाषेचा अभिमान असा थेट व्यक्त करून एकनाथ महाराजांनी मराठीत विपुल रचना केली. प्रौढ मराठीत तरी केलीच, पण लोकभाषेत भारूडे रचून मराठीला एक नावाच डौल प्राप्त करून दिला.
आज मराठीची प्रामुख्याने इंग्रजीशी तुलना होते. अशी तुलना करताना तुमच्या इंग्रजीत काका आणि मामाला एकच शब्द अंकल आणि काकी आणि मावशीलाही एकच आण्टी शब्द अशी टीका केली जाते. इंग्रजीची शब्दसंपत्ती अमाप आहे. तरी तिच्यातील नेमकी वैगुण्ये हेरून मराठी अभिमानी तिला कमी लेखून आपला अभिमान व्यक्त करतो. संस्कृताचा जोर होता तेव्हा दासोपंतांनी संस्कृताचे असेच वैगुण्य नेमके ओळखून मराठीचा आपला अभिमान व्यक्त केला आहे. तुमच्या संस्कृतात नुसता "घट'. पण आमच्या मराठीत त्याच्या नाना रूपांना नाना शब्द आहेत, हे सांगताना दासोपंत लिहितात-
संस्कृतें घट म्हणती। आतां तयाचे भेद किती
कवणा घटाची प्राप्ति। पावावी तेणें?
हारा, डेरा, रांजणु। मुठा, पडगा, आनु।
सुगडतौली, सुजाणु। कैसी बोलैल?
घडी, घागडी, घडौली। अलंदे वांचिकें वौळीं।
चिटकी, मोरवा, पातली। सांजवणें तें।।
ऐंसे प्रतिभाषे वेगळाले। घट असती नामाथिले।
एकें संस्कृतें सर्व कळे। ऐसें कैसेन?
आज मराठी भाषा ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. ती राजभाषा नव्हती तेव्हा कवी माधव ज्युलियन यांनी लिहिलेली "आमुची मायबोली' ही कविता आजही सर्वांच्या ओठावर आहे. ज्युलियन लिहितात-
मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं,
पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं,
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू वसे आमुच्या मात्र हृन्मदिरी
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे हिला बैसवू वैभवाच्या शिरी।।
मराठी भाषेचा अभिमान ओवी, अभंग, लावणी, पोवाडा अशा विविध रचनांतून व्यक्त झालेला आपण अनेकदा पाहतो पण रावसाहेब र.लु.जोशी यांनी मराठीची भूपाळी लिहिली आहे. ते लिहितात-
प्रभातकाळी तुझी लागली ओढ मायबोली
भवती गुंजे तव गुण गाणी मंगळ भूपाळी
संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषा अमृताशी पैजा जिंकते असे म्हटले आहे, हाच धाग धरून अमृताशी मराठीची तुलना करता करता सोपानदेव चौधरी म्हणतात-
अमृतास काय उणे?
सांगतसे मी कौतुकें
माझी मराठी बोलकी
परी अमृत हे मुके!
अमृत आणि मराठी इतर सर्व बाबीत समान, पण अमृताला बोलता येत नाही म्हणू ते थोडे कमीच, असे सोपानदेव म्हणतात. याचबाबत डॉ.ना.गो. नांदापूरकर आपल्या "माझी मराठी' कवितेत लिहितात-
माझी मराठी असे मायभाषा हिच्या कीर्तिचे तेज लोकी चढे
गोडी न राहे सुधेमाजि आता, पळाली सुधा स्वर्ग लोकाकडे
मराठी भाषेपुढे अमृताची गोडी फिकी पडल्याने अमृत थेट स्वर्गात पळून गेले अशी अद्वितीय कल्पना नांदापूरकर यांनी केली आहे.
मराठी गझलभास्कर सुरेश भट यांनी मराठीबाबत आपल्या मायबोली रचनेत म्हटले आहे-
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहला खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
मराठी भाषेची उपेक्षा आधी संस्कृतकडून आणि आता इंग्रजीकडून होत आहे. ही उपेक्षा मराठीच्या पुत्रांना सदैव सलत आली आहे. म्हणूनच मराठीच्या जन्मापासून मराठी कवींनी मराठीच्या बाजूने सदैव रणशिंग फुंकले आहे. जन्मापासूनच ही भाषा लढते आहे. तिचा लढा अखंड चालू आहे. आजही तो संपलेला नाही. पण ज्या अर्थी ती लढली पण मेली नाही त्या अर्थी ती इथून पुढेही अशीच लढून आपले अस्तित्व नक्की टिकवील. मराठी भाषादिनानिमित्त आपण तिच्या या लढाईला थोडे अधिक बळ देऊ या!
ज्या कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त आपण मराठी भाषा दिन साजरा करतो त्या कुसुमाग्रजांनीच बजावून ठेवले आहे-
भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे
गुलाम भाषिक होऊन अपुल्या प्रगतीचे शिर कापू नका।।