Tuesday, April 23, 2019

कथा- निर्मला


चार दिवस पाऊस पडला नाही आणि जमिनीचा ओलावा संपला की निर्मला झाडूचा झडलेला पिसारा हाती घेऊन आपल्या घरापासून गल्ली झाडायला सुरुवात करी. तास-दीड तासाने ती गल्लीच्या त्या टोकापर्यंत पोचे. काम कसं अगदी नीट. निर्मलाने झाडलेल्या जागेवर कस्पट दिसायचं नाही कुणाला. अवघा परिसर झाडून काढी.

श्रावणाचे दिवस असले म्हणजे या स्वच्छतेने अवघा परिसर उजळून निघे. कधीकधी तिथेच मुलं गोट्यांचा डाव मांडत. एरवी गल्लीत चिखल आणि पालापाचोळा इतका असे की त्यात शेकडो गोट्या हरवल्या तरी एक सापडू नये. पण एकदा निर्मलाचा हात फिरला म्हणजे मुलांसाठी लख्ख मैदान तयार होई. ती एकटी न आवाज करता झाडलोट करत राही. कुणी येताजाताना दिसलं की त्याच्यासोबत बोले. ती व्यक्ती निघून गेली की पुन्हा आपल्या स्वच्छता मोहिमेत दंग होई. अख्खी गल्ली स्वच्छ करून झाली की तिथेच एखाद्या दगडावर विसावत दम खाई. मग उठून दूरवरच्या दगडावर झाडूचा बुंधा आपटून सरळ करी. मग आपलं कमरेला गुंडाळलेला जुनेर नीट करून घेई. एका टोकाने घाम पुसून घेई. ब्लाउज खाली करून नीट बसवी आणि सत्तरी पार केलेली हाडांची काडं झालेली निर्मला सदाच्या घरात शिरे. तिथेच पडवीत बसून सदाच्या बायकोला म्हणे, पाणी दे गो. संगू पाण्याचा तांब्या घेऊन आली की निरमला तो हाती घेई आणि दोन दोन घोट घशात ओतून घेत पाणी पीत राही.

जेवलीस काय के काकू? संगी विचारी.

पावसाने उघडीप दिलान तर म्हटलं गल्ली तरी झाडून घ्यावी तर एवढा वकत झाला बघ.

भाकरी खातेस.

नको. सकाळी टाकलेय भाकरी. सुकाटपण भाजून ठेवलंय, म्हणून निर्मला उठे आणि आपल्या घराकडे निघे.

आता त्या स्वच्छ मार्गावरून चालताना तिला आपण आपल्या घरात नव्हे तर राजप्रासादात जातो आहोत, असे वाटे. त्या स्वच्छ आरस्पानी वाटेवरून चालत ती घरात पोहोचे आणि त्या खुराडेवजा पडवीत थाटलेल्या आपला प्रशस्त महालात हातावर अर्धी भाकरी आणि त्यावर बळीच्या सुकटाचे दोन तुकडे घेऊन उरल्यासुरल्या दातांनी ते आनंदाने खात राही. एक अलौकिक समाधान तिच्या चेहऱ्यावर पसरे. जेवणाची दोन भांडी खळखळून टाकी. गोणपाट घासून उशाखाली पाठ घेई आणि पडून राही.

वाढत्या वयाबरोबर झोप उडाली आहे. रात्री थोडा वेळ डोळा लागे. एरवी ती टक्क जागी असे. दिवसा कसली झोप येणार? ती नुसतीच पडून राही. जरा उन्हं कळली की  गोणपाटाला घडी मारून ठेवी आणि कपभक च्या बनवून घेई. मग घराला कडी मारून बाहेर पडे.

घराच्या कोपऱ्यावर वळून निर्मला गल्लीत प्रवेश करती झाली तर तिला गल्लीत गोऱ्या सांडलेल्या दिसल्या. आत्ता झाडझूड केले नाही तोवर ही असली घाण केलेली पाहून तिच्या मस्तकाची शिर उठली. नेहमीच्या मनस्वी रागाने तिने शिव्यांचा यज्ञ सुरू केला.

रांडा ना धड चालता येत नाही. कशाला जन्मास आल्यात माहीत नाही. मी म्हातारी झाडलोट करते कंबर बांधून, तर दिसत नाही होय या हिरोइन्सनी. चालताना डोळे थाऱ्यावर नाहीत रांडांचे. पलीकडच्या तात्यांच्याच पोरी इथून गेल्या असाव्यात अशा अंदाजाने निर्मला शिव्या घालू लागते. डोळे नाहीत होय... गोट्या बसवलान परमेश्वरा... निर्मलाचा सुरू झालेला तोंडाचा पट्टा आता तासभर थांबायचं नाव घेत नाही. लोक हे सगळं ओळखून आपल्या कानाची बटन लावून घेतात. निर्मलाने त्या गोवऱ्या उचलून दूर शेतात फेकून दिल्या. मग त्याच स्थितीत पुढे निघाली. आता अवघ्या गल्लीची तपासणी केल्याशिवाय तिला चैन पडणार नव्हती. पाटलांच्या घराशेजारी धन्या मुळेचं आंब्याचं झाड होतं. त्याची कोरम फांदी मोडून गल्लीत पडली होती. त्यामुळे मगाशी झाडून स्वच्छ केलेल्या गल्ली घाण दिसत होती. ती पाहून निर्मलाचं डोकं आणखी तापलं. ह्या धन्याचं घरानं बुडालं, पण हा आंबा राहिला आहे माझी हाडं खायला... गुदस्ता पाडव्याला अशीच गल्ली साफ केली आणि त्यावर त्याची फांदी पडली. इमल्याचं पोर जरा वाचलं. मी ती फांदी उचलली तर माझ्या कमरेत चमाकलं. दोन दिवस जाग्यावर काढले. पाडव्याचं नमनपण चुकलं. या रान्डच्या आंब्यापाई.

जरा पुढे सरकली तर चॉकलेटचे दोन कागद आणि एक गोळ्यांची प्लास्टिक पिशवी पडलेली दिसली. ती उचलून दूर फेकत म्हातारी करवादली, या पोरांना तर नेऊन गाडली पाहिजेत. माझ्या जीवावर उठलेत. संगीच्या नातवाचा तर मी पायच मोडून ठेवणार आहे. माझी मजा बघतो. तेरोज सारवलेल्या ओसरीवर मुतून गेला गुलाम. संगी रांड बोलत पण नाही त्याला.

तेवढा सदाची लेक माईनं म्हातारीला हाक मारली, म्हातारे घरात ये. काम हाय.

तुझा बाप म्हातारा, म्हणत निर्मला घरात आली. माईनं तिच्या हातावर पेढा ठेवलं आणि म्हणाली, ताईला मुलगी झाली. आताच पाहुणे निरोप आणि पेढे घेऊन आले.

होव दे होव दे बाय. बाळंतीन बरी हाय ना... तिनं आईला विचारलं. पण माई बरी हाय म्हणाली.

ते न ऐकताच ती सांगू लागली, सकाळदरणं सगली गली साफ केली ती पाहवेना  रांडेच्यास्नी.  हे हगुन न ठेवलंय जिथं तिथं.

माई तिचं नाव ऐकताच आपल्या कामात बुडाली. तिथल्याच मडक्यातलं पाणी घेऊन पहिली आणि निर्मला घराबाहेर पडली. तिचा शिवा वाहण्याचा आणि कचरा उचलण्याचा यज्ञ अखंड सुरू झाला. गल्लीच्या टोकाला जाऊन  ती संगीच्या घरी विसावली.

मग अंधार पडत आला तशी माघारी फिरली. येताना तिने संगीताचा नातू, माईचा बारका भाऊ, पणजी बाईची सून आणि उभी नानी या सगळ्यांना उद्या रतवाला जायचा बेत सांगितला. एकेकाला माहिती देती अंधार पडल्यावर घरात परतली.

रतवा म्हणजे ओढ्यातले इवलेइवले लाल मासे. श्रावण सुरू झाला म्हणजे निर्मला तंगुसात गांडूळ ओवून ओढ्यावर रथवायला जाई. गांडूळ काढणे, ते तंगुसात ओवणे, गांडुळांचा गळ पाण्यात टाकणे आणि त्याला रतू लागली की तिला अलगत टोपलीत उचलून टाकणे, यात निर्मला मोठी माहीर होती. तिला या सगळ्या कामात मोठा रस वाटे.

दुसऱ्या दिवशी सगळी मुलंमुली आणि उभी नानी निर्मलासोबत वाला गेले. उन्हं उतरायला लागेपर्यंत निर्मलाची अर्धी रोवली भरली. बाकीच्यांनी दहा, वीस, तीस रतवा पकडल्या. घरी परतेपर्यंत आणि रतवा शिजेपर्यंत अंधार दाटून आला. साधारण साडे सातच्या दरम्यान निर्मलाने समोरच्या घरातल्या अंजीला आवाज दिला, अंजी, अगं अंजी... जरा बॅटरी दे. अंजी बॅटरी घेऊन आली आणि म्हणाली, आता कुठे कोसळतेस...

निर्मला त्यावर काहीच बोलली नाही.

मग ती चुलीवरल्या रतवांच्या पातेल्यातील रतवांचे जवळ ठेवलेली कुड्याच्या पानांत दहा-बारा वाटे केले. ते सगळे वाटे एका टोपात घेऊन ते वाटायला निघाली.

ज्या ज्या घरातल्या कुणी रतवाला आलं नव्हतं त्या घरात एक एक वाट नेऊन दिला.

काल तिने ज्यांना शिव्या घातल्या होत्या त्या सगळ्यांच्या घरातही एकेक वाटा पोचला होता. एक वाटा धन्या मोऱ्याच्या घराजवळ ठेवून दिला. तीन-चार रतवांचा एक एक वाटा, पण गल्लीतल्या प्रत्येक घरात आज रतवा होत्या आणि घराघरातून निर्मला म्हातारीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली गेली.

- वैभव बळीराम चाळके


Saturday, April 20, 2019

कथा- मृत्यू वाईट


मृत्यू वाईट...  मग तो कोणाचाही असो, मृत्यू वाईटच. अपघातात झालेल्या मृत्यू वाईट... आजाराने झालेला मृत्यू वाईट.... अकाली झालेला मृत्यू वाईट... तसा वयोमानाने झालेला मृत्यूसुद्धा वाईटच.... मृत्यू म्हणजे अस्तित्वाची समाप्ती. मृत्यू म्हणजे नसणे. मृत्यू म्हणजे शेवट. मृत्यू म्हणजे केवळ अंधार...
थंडीचे दिवस होते. दिवाळी नुकतीच होऊन गेली होती. त्यामुळे एक तर ऑफिसातल्या सगळ्या सहकार्‍यांच्या अंगावर नवे कपडे होते. दिवाळीचा उत्साह होता. चेहर्‍यावर प्रसन्नता होती. अशा वेळी कुसुरकरच्या मोठ्या भावाच्या निधनाची बातमी आली. ऑफिसात एकच शांतता पसरली. बातमी कळल्यावर कुसुरकर ढसाढसा रडला. भावाशी त्याचं नातं जवळचं होतं. तो भावाबद्दल पुन्हापुन्हा बोलत असे. भावाने त्याला लहानाचा मोठा केला होता असेही म्हणे. त्यामुळे भाऊ अचानक गेला हा धक्का त्याला सहन झाला नाही. मृत्यू वाईट... त्यात जवळच्या माणसाचा मृत्यू तर त्याहून वाईट...
कुसुरकर ताबडतोब घरी निघून गेला. त्याला गाडी करून गावाला निघावे लागले. त्याला सोडायला सोबत शिंदे गेला. ऑफिसात दिवसभर लोक त्याच गोष्टीबद्दल बोलत होते. दुपारी जेवणाच्या सुट्टीत आणि चार वाजता चहाच्या वेळी सुद्धा कुसुरकरच्या भावाच्या मृत्यूची चर्चा ऑफिसात सुरू होती.
पवार म्हणाला, बाराव्याला जायचं का? कुसुरकरचं घर तसं फार लांब नाही आणि रविवार येतोय बाराव्याला... शनिवारी रात्री जाऊन रविवारी कार्य करून रात्री गाडीत बसता येईल. सोमवारी कामावर हजर. कोणीच हो म्हणाले नाही. बघू... विचार करू... असेच सगळ्यांचे म्हणणे होते. पण पवार म्हणाला, मला गेले पाहिजे. माझ्या प्रत्येक गरजेला कुसुरकर भावासारखा उभा राहिला पाठीशी. मी जाणार. तुमच्यापैकी कुणी येणार असेल तर सांगा.
ऑफिसातल्या 18 माणसांपैकी कोणीही जायचं नाव काढलं नाही. दहा दिवस निघून गेले. अकराव्या दिवशी शनिवार होता. त्या दिवशी निघायचे होते. आज अर्धा दिवसच ऑफिस होते. पण आज पवार आलाच नाही. सगळ्यांना वाटले कदाचित हा सकाळीच गाडीला बसला असेल. पण ऑफिसची वेळ होऊन गेल्यावर उशिराने पवार हजर झाला. म्हणाला, शेजार्‍याला हार्ट अटॅक आला, त्याला ऍडमिट करून आलोय. आता मला कुसुरकरच्या भावाच्या कार्यालाही जाता येणार नाही. पण मला राहून राहून वाटतंय आपल्यापैकी कोणी तरी गेले पाहिजे. मग तो त्याच्या हाताखाली काम करणार्‍या ओमकारला म्हणाला, ओंकार एवढं काम करशील, हवे तर तुला जायचायायचा खर्च मी देतो, पण जाऊन ये.
ओमकारच्या शेजारी बसणारी शीतल म्हणाली, खरेतर मलाही जायला हवे. माझ्या मिस्टरांच्या आजारपणात कुसुरकर आठ दिवस रोज येऊन हॉस्पिटलला बसत होता. त्या दिवशीपासूनच मी विचार करते आहे पवारांसोबत जाता आलं तर जावं म्हणून.
मग ऑफिसातल्या इतर सहकार्‍यांकडे पाहत ती म्हणाली, चला रे कोणी तरी... एकमेकांच्या सोबत असलो म्हणजे कंटाळा येणार नाही. ओमकार निघतोच आहे, शिरोडकर तुम्ही किंवा साठे तुम्ही येताय का, चला जमत असेल तर जाऊन येऊ.
ओमकारचा नाईलाज होता. ओमकार जातो म्हणाला. संध्याकाळपर्यंत हो नाही करता ओंधकरबाई, शीतल आणि ओमकार असे तिघे जण कुसुरकरच्या गावी जायला निघाले. कुसुरकरचं गाव कोल्हापूर-सांगलीच्या दरम्यान कुठेतरी होते. पवारने पत्ता काढून दिला. मुंबई सेंट्रलवरून कोल्हापूरला जाणारी गाडी पकडा आणि कोल्हापूर स्थानकातून पुढे जा असा सल्लाही दिला.
रात्री नऊ वाजताची गाडी होती. तिघेही मुंबई सेंट्रल स्थानकात भेटू असे ठरवून दुपारी आपापल्या घरी गेले.
रात्री नऊची गाडी लागली तेव्हा एकटी शीतलच मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचली होती. औंधकरबाईंचा फोन लागत नव्हता. ओमकार आलोच, दोन मिनिटांत आलो, पाच मिनिटांत आलो, असं म्हणत होता. शीतलला काय करावे कळेना. गाडीला काही मिनिटे शिल्लक असताना ओमकार धावतपळत पोहोचला. औंधकरबाई आल्या नाहीत. शेवटी दोघांनी निघायचा निर्णय घेतला आणि गाडी पकडली.
मृत्यू वाईट... ओंकार शीतलला सांगत होता. फक्त माणसाचा नव्हे आमच्या घरी एक कुत्रा होता डॉल्फिन नावाचा. फार लाडात वाढवला होता मी त्याला. त्याचं प्रेम होतं आमच्या सगळ्यांवर. डॉल्फिन गेला तेव्हा तुला सांगतो शीतल, आम्ही तीन दिवस घरी जेवलो नव्हतो, वडापाव खा आणि सँडविच खा असे करत दिवस काढले. माणसाचं सुतक वाईट नसेल इतका वाईट काळ होता तो मला.
शीतल म्हणाली, मी तर असा मृत्यू अनुभवलाय की ती आठवणी नको वाटते पुन्हा.
मृत्यूबद्दलच्या गप्पांनी त्यांच्यात एक निराशा भरून राहिली.
बहिणीच्या मृत्यूची गोष्ट सांगताना शीतल खूपच भावुक झाली. तिला आपले अश्रू आवरता आले नाहीत. ती हमसून हमसून रडू लागली. तिच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते. ओमकारला काही क्षण काय करावे कळेना, पण फारच झाले तेव्हा त्याने तिला जवळ घेतले, तिचे डोळे पुसले आणि बराच वेळ तो तिच्या गालावर थोपटत राहिला, शीतलनेही ओमकारच्या कमरेभोवती हात टाकला. तिच्या हाताचा पंजा आपल्या एका कुशीवर रोवलेला ओमकारला स्पष्ट कळला. काहीतरी चुकते असे त्याला वाटायला लागलं. पण काय करावं ते कळत नव्हतं. दोघांमधून वीज संचारून गेली होती.
रात्रीच्या प्रवासात हे असंच होतं. बंध तुटून पडतात. माणसं जवळ येतात. ती एकमेकांना हवीहवीशी वाटतात. शीतल आणि ओमकार यांच्यातील नेमकं तेच झालं. एका मृत्यूची चर्चा करताकरता आणि एका मृत्यूनंतरच्या अंत्यविधीला जाताजाता एक नवाच सर्जनाचा कोंब रुजायला लागला. एक नवंच नातं जन्माला आलं. कुणालाही न कळता वाढलं. रात्रीचा अंधार बहुतेक या अशा अनधिकृत बांधकामांना वेग देत असावा. शीतल तर जवळजवळ त्याच्या मिठीत शिरली होती. ओमकार नको हे सारं म्हणता-म्हणता हवं हे पर्यंतच्या सीमेपर्यंत येऊन पोचला होता. त्यांच्याही नकळत दोघं आता एकमेकांची झाली होती.
पुणे सोडून गाडी सातारच्या दिशेने धावत असताना दोघांनी कुसुरकरच्या गावी जाण्याचा निर्णय रद्दबातल केला. दोघे सातार्‍याला उतरली. तिथे एसटी स्टँडवर चौकशी करून परिसरातल्या एका चांगल्या हॉटेलात थांबली. आता गाडी बिघडल्याचे कारण सांगून आपण सातार्‍यातून परत आल्याची बतावणी ते ऑफिसात करणार होते. तसा त्यांनी प्लॅनही केला. रात्री साधारण चार वाजता सातारा स्टँडवर उतरलेली दोघं साडेचारला आपल्या रूमवर पोचली.
साडेनऊ वाजता ओमकारला जाग आली, तेव्हा त्याने घाईघाईने शीतलला उठवले आणि परतीच्या प्रवासाला निघण्याची सूचना केली.
भराभर आंघोळ वगैरे आटोपून दोघे सातारा स्थानकात पोचले. दुपारचे साडे अकरा वाजले होते आणि संध्याकाळपर्यंत दोघे हमखास आपापल्या घरी बसणार होते, पण ऑफिसात कोणालाही शंका नको म्हणून दोघांनी मिळून ओंधकरबाईंना फोन केला. काल रात्री चार वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत गाडी दुरुस्तीचा निष्फळ प्रयत्न करून झाला आणि मग सातारा डेपोच्या गाडीमधून आम्हाला सातारा डेपोत आणले गेले. तेथून दुसर्‍या गाडीत बसविण्याची सोय करण्यात आली होती. मात्र इतक्या उशिरा गेल्यावर धर्मविधीला पोचता येणार नाही म्हणून आम्ही परतण्याचा निर्णय घेतला आणि आता इथे चहा नाश्ता करून परतीच्या प्रवासाला लागतो आहोत, असे त्यांनी औंधकरबाईंना सांगितले.
कोल्हापूरहून आलेली मुंबई गाडी पकडून त्यांनी मुंबई दिशेचा प्रवास सुरू केला.
ऑफिसात आपल्यात झालेल्या देवाणघेवाणीची कोणालाही खबर लागणार नाही याची जणू तरतूद एका फोनमुळे झाली होती.
शीतल परतीच्या प्रवासात ओमकारच्या हातात हात घालत आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपू पाहते तेव्हा ओमकार म्हणतो, आता हे पुरे झालं. हे आपल्याला असं नाही चालवता येणार. तुला तुझं घर आहे आणि मला माझं लग्न करायचं आहे. तेव्हा जे झालं ते विसरून जाऊ. त्यातच आपलं हित आहे. शीतलला सुरुवातीला त्याचं हे असं म्हणणं नको वाटलं. पण पूर्ण विचारांती तिनेही ठरवलं की जे झालं ते विसरून जाण्यातच आपलं हित आहे.
आणि मग ओमकार खरंच आपला खरा हितसंबंधी आहे, असं तिला वाटू लागलं. त्याचं म्हणणं तिला पटलं. दोघांनीही जे झालं ते विसरून जाऊ असं ठरवलं. शीतलही त्याचा हात सोडते आणि परक्या माणसाच्या शेजारी बसावे तशी बसते. आपल्यात काही झालंच नाही, आपल्यात आता इथून पुढे काही होणार नाही. आपण ऑफिसात होतो तसेच सहकारी आहोत. गाडी बिघडली त्यात चार तास फुकट गेले, म्हणून आपण परत चाललो आहोत, अशी मनाशी म्हणत शीतल विश्वासदर्शक नजरेनं ओमकारकडे पाहते आणि त्याला मनापासून थँक्स म्हणते.
मृत्यू वाईट... माणसाच्या सभ्यतेचा मृत्यू वाईट... नवर्‍याच्या आपल्यावरील विश्वासाचा मृत्यू वाईट... बाईच्या नैतिकतेचा मृत्यू वाईट...
... आणि अनैतिक असले तरी नुकत्याच उमललेल्या नात्याचाही मृत्यू वाईट...


- वैभव बळीराम चाळके

9702 723 652
20 एप्रिल 2019

Friday, April 12, 2019

कथा- सहजीवन सोसायटी


ही आहे आटपाट शहरातली सहजीवन सोसायटी. हे शहर एकविसाव्या शतकातला शहर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने संपन्न असलेली ही सोसायटी... म्हणजे सोसायटीच्या गेटवर तुम्ही उभे राहिलात की तुमच्यासाठी स्वयंचलित दरवाजा उघडला जातो. तो उघडत असताना सीसीटीव्हीने तुमच्या आगमनाची खबर ऑफिसातील सुरक्षा कक्षात बसलेल्या सुरक्षारक्षकाच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर धडकते आणि एक फोटोही काढला जातो. तो विजिटर फाईलमध्ये सेव्ह केला जातो. तुम्ही आलात... डावीकडे तुम्हाला फ्रेश होण्यासाठी अतिशय स्वच्छ असे बेसीन, त्यावर तुम्हाला टॉवेल अशा सुविधा दिसतील. उजव्या बाजूला मैदान, त्याच्याशेजारी बाग आणि या दोन्ही गोष्टी आवश्यक त्या सामनाने संपन्न... शेजारी पंख्याची सुविधा आहे.... आणि एक खास वातानुकूलित कक्षहा उभारला आहे.

तुम्ही पहिल्यांदाच पाहाल तेव्हा या सोसायटीच्या अगदी प्रेमात पडाल, पण पुन्हा पुन्हा पाहत राहाल तर तुमच्या असे लक्षात येईल की, सुविधा आहेत, पण त्याचा वापर कोण करते... म्हणजे वापर होतोच पण वैयक्तिक वापर…

नको... हे फारच वरवरचं सांगणे झाले... मी तुम्हाला थोडं खोलात जाऊन सांगतो…

आता एवढ्या मोठ्या सोसायटीतल्या प्रत्येकाची गोष्ट सांगणे काही शक्य नाही. म्हणून मी तुम्हाला त्यातल्या काही मोजक्याच गोष्टी सांगतो.

ई विंग मधल्या देवांग कुलकर्णीच्या घरात या... हे आजोबा सैन्यातून निवृत्त झालेले आहेत. अगदी परवा पंच्याहत्तरी साजरी करेपर्यंत कडक शिस्तीने जगत होते. आजी होती तोवर छान चालले होते. आजी गेली आणि देवांग काकांचा कडकपणाही संपला. आता ते 24 तास टीव्हीसमोर बसतात. इंटरनेटवर बसून कुठल्याकुठल्या युद्धाच्या क्लिप पाहत राहतात. त्यांना दोन मुले आहेत. पण दोन्ही अमेरिकेत... मोठा त्यांच्याशी बोलत नाही... छोटा कधीतरी व्हिडिओ कॉल करतो... आणि बोलतो. हळूहळू देवांग काका थकत चालले आहेत. अलीकडे त्यांना चक्करसुद्धा येते. म्हणून ते खाली जाणे टाळतात. दिवसदिवस घरातच असतात. टीव्ही हाच त्यांचा आता जीवनसाथी आहे…

नाडकर्णी काकूंच्या घरात येणार... चला... 702 बी विंग हा नाडकर्णी काकूंचा पत्ता. त्यांचा एकुलता एक मुलगा मतिमंद आहे. गेली दोन वर्षे तो जागेला खिळून आहे. काकूंचे वय आता सत्तरच्या आसपास असेल आणि चिरंजिवांचे 45- 50. चिरंजीव काहीही बोलत नाहीत. घरात लावलेल्या मोठ्या टीव्ही स्क्रीनवर गेम खेळत राहतात. तो एकच गेम गेली चार-पाच वर्षे खेळून चिरंजीवाला कंटाळा आलेला नाही. नाडकरणी काकू गरज पडली की दूरच्या नातेवाईकांपैकी कोणालातरी बोलावून घेतात. तेवढाच वेळ यांचे घर घर होते. बाकी घरात कोणी राहते आहे यावर विश्वास बसू नये अशी शांतता…

चला आपण ए विंग ला सुद्धा जाऊन येऊ. इथे गोपीनाथ पवार राहतात. त्यांची दोन्ही मुलं उच्चशिक्षित आहेत. पहिला आयटीमध्ये इंजिनीयर म्हणून चांगला नावलौकिक कमवून आहे. अलीकडेच त्याचा सरकारने सत्कार केला होता. दुसरा मुलगा चित्रपटसृष्टीत एका मोठ्या मीडिया हाऊससोबत काम करतो. त्यानेही तिथे चांगले नाव कमविले आहे. एका टेलिव्हिजन चॅनेलच्या सल्लागार मंडळात त्याचा समावेश आहे. अत्यंत सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोपीनाथ पवार यांच्या घरात गोपीनाथ पवार त्यांची पत्नी व दोन मुले राहतात. पण दुर्दैवाची गोष्ट सांगू... गोपीनाथ पवारांना मायनर हार्ट अटॅक आला, त्या दिवशी घरी त्यांची बायको किंवा दोन्ही मुले हजर नव्हती. परिणामी गोपीनाथ पवार स्वतः  जाऊन ऍडमिट झाले.

सी विंग ला अकराव्या माळ्यावर शर्मा फॅमिली राहते. त्यांची दोन मुले शाळेत जातात. मिस्टर शर्मा ऑईल कंपनीत मॅनेजर आहेत आणि मिसेस शर्मा एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या प्रिन्सिपल आहेत. ही फॅमिली अनेकदा एकमेकाशी हसत-खेळत जाता येताना दिसते. त्यामुळे बेस्ट फॅमिली ऑफ सोसायटी हा अवॉर्ड त्यांना दिला जाण्याची शक्यता आहे. अडचण एकच आहे दोघेही कामावर जातात म्हणून त्यांना आपली मुले डे केअर सेंटर मध्ये ठेवावी लागतात. चांगले डे केअर सेंटर दूर असल्याने त्यांनी मुलांना घेऊन जायला एका माणसाची नेमणूक केली आहे. मात्र त्या माणसाचीच शर्मा दाम्पत्याच्या मनात भीती बसून राहिली आहे.

बी विंग पाचव्या माळ्यावर फर्नांडिस एकटा राहतो. त्याच्याकडे त्याचे काही मित्र येतात. काही वेळेला मैत्रिणी आल्याचेही सुरक्षारक्षकाने सोसायटीच्या अध्यक्षांना सांगितले आहे. फर्नांडिस ही काहीतरी विचित्र गोष्ट असल्याचे सोसायटीच्या अध्यक्षांचे मत झाले आहे.

सोसायटीतल्या सव्वादोनशे फ्लॅटमध्ये सव्वादोन हजार कथा आहेत. त्या सगळ्या सांगत बसत नाही. शेवटची एकच गोष्ट सांगतो. मागच्या महिन्यात या सहजीवन सोसायटीत रामलाल यादव नावाच्या एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. बंद फ्लॅटमध्ये हा यादव कधीतरी मरुन पडला होता. शेजाऱ्यांना वास आला म्हणून चौकशी केली गेली तेव्हा प्रेत मरून कुजले असल्याचे लक्षात आले.

हे असे झाले तर करायचे...  काय अत्याधुनिक टेक्नॉलॉजीमध्ये यावर काही उपाय आहे का... हे शोधण्याचे काम सोसायटीने एका कन्सल्टंट कंपनीला तीन लाख रुपयांचा करार करून सोपविले आहे.
-वैभव बळीराम चाळके
९७०२ ७२३ ६५२

Monday, April 8, 2019

मोबाईल कैदी

मोबाईल कैदी

फोन ठेव फोन ठेव
सांगत असते आई
दोन वर्षांचं कार्ट,
पण ऐकतच नाही
चित्रबित्र फितीबिती
बघून बसतो डोलत
वय जातंय निघून तरी
शब्द नाही बोलत
मोबाईलची पिढी तिचं
सगळं सगळं न्यारं
पोटातच संस्कारांनी
बिघडलेत पोरं
आईबाप दोघे वेडे
त्यांनाच लागली लत
तसंच वाढणार झाड
ज्याला जसं मिळतं खत
मोबाईलच्या जमान्यातली
पिढी झाली ऐदी
जिथेतिथे बांधलेले
हे मोबाईल कैदी


- सुवर्णसुत
9702 723 652

Sunday, February 24, 2019

इंग्रजी माध्यमातील मुलांसाठी मराठीचे शुद्धलेखन

इंग्रजी माध्यमातील मुलांसाठी
मराठीचे शुद्धलेखन

वैभव बळीराम चाळके
9702 723 652
( नवाकाळ मध्ये २४ फेब २०१९ रोजी प्रकाशित  )

इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढते आहे. मराठी माध्यमातील शाळा दिवसेंदिवस कमी होऊ लागल्या आहेत. मराठी भाषादिनाच्या निमित्ताने इंग्रजी माध्यमातील आपल्या मुलांना मराठी शुद्धलेखन गरजेचे आहे का? तसेच मुलांचे मराठी नेमके व्हावे यासाठी काय करता येईला? याचा वेध घेणण्याचा हा अल्पसा प्रयत्न...

शुद्धलेखनाची आवश्यकता काय?
सर्वप्रथम शुद्धलेखनाची आवश्यकता काय हे पाहिले पाहिजे. कोणतीही भाषा ही संवादाचे काम करीत असते. शुद्धलेखन हे संवाद नेमका होण्यासाठी गरजेचे असते. शिवाय शुद्धलेखनाच्या आग्रहामुळे आणि क्षमतेमुळे विचारात स्पष्टता आणि खोलपणा येतो. आज इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या अनेक मुलांना आपले विचार नेमके मांडता येत नाहीत, याचे कारण रोजची व्यवहाराची भाषा नीट येत नसणे हे आहे. मराठी मातृभाषा असलेल्या मुलांना दहावीपर्यंत मराठी विषय असला तरी मराठी नेमके लिहिता येत नाही, बोलता येत नाही. भाषाविषयीचा आपला दृष्टिकोन याला कारणीभूत आहे.

भाषेचेच नव्हे, भाषकांचे नुकसान
खरेतर आपल्या मुलांचे शिक्षण मातृभाषेतून म्हणजे मराठीतून व्हायला हवे. अनेक कारणांनी ते शक्य नाही. पण अशा वेळी मुलांना उत्तम मराठी यायलाच हवे हा आग्रह आपण धरला पाहिजे. तो तसा न धरल्यास मराठी भाषेचेच नव्हे तर आपल्या मुलांचे, आपले, एकूण मराठी भाषकांचे नुकसान होणार आहे. ज्यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो, त्या कुसुमाग्रजांनी म्हटले आहे- ‘भाषा मरता, देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे...’ आपल्या मुलांच्या मनातील हा संस्कृतीचा दिवा विझू लागल्याचे स्पष्ट दिसते आहे. भाषेचे तेल घातल्याशिवाय हा दिवा तेवत राहू शकत नाही. संस्कृतीचा दिवा विझला की मग मुले मातीपासून तुटतात... माणसांपासून तुटतात...

मुलांसाठी शुद्धलेखन
साधारण पंचवीस वर्षे मराठी भाषेत गद्य-पद्य लेखन करताना, मराठी साहित्य विषय घेऊन पदवी मिळविताना, पत्रकारितेत पंधरा वर्षे नित्य लिहीत असताना, आयटी विरुद्ध मराठी, मित्र मराठी शाळांचे, युनिकोडचा प्रचार-प्रसार आधी चळवळींमधून सक्रिय सहभाग नोंदविताना आणि पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना शिकविताना केलेल्या निरीक्षणातून शुद्धलेखनाची समाजाची आवश्यकता लक्षात आली. त्यातून जमा झालेल्या अनुभवाच्या मंथनातून पत्रकारितेचे विद्यार्थी, साहित्याचे विद्यार्थी, भाषा विषयाचे शिक्षक, लेखक यांच्यासाठी ‘शुद्धलेखनाच्या दिशेने’ ही कार्यशाळा सुरू केली. ही कार्यशाळा घेत असताना शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कराल का, अशी विचारणा व्हायला लागली. त्या दृष्टीने काही दिवस अभ्यास केल्यावर ‘मुलांसाठी शुद्धलेखन’ ही कार्यशाळा आकारास आणली. त्यापुढे जाऊन आता इंग्रजी माध्यमातील मुलांच्या मराठी शुद्धलेखनासाठी काय करता येईल, अशी विचारणा काही दक्ष पालकांनी केल्यावर त्या दृष्टीने विचार करून कार्यशाळेची बांधणी सुरू झाली.

अडचणी कोणत्या?
आपल्या मराठी मुलांचे मराठी शुद्ध आणि नेमके व्हावे यासाठी काय काय करता येईल, याची चाचपणी केली असता, अगदीच प्राथमिक गोष्टी करण्याची आवश्यकता लक्षात आली. इंग्रजी माध्यमात मराठी भाषा ही दुय्यम विषय असल्याकारणाने असेल किंवा आपल्याच अनाग्रही वृत्तीमुळे असेल मराठीकडे बहुदा साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसते. त्याचे वाईट परिणाम व्यवहारात दिसत असूनही त्याकडे मराठी माणूस काणाडोळा करतो आहे. एक तर मराठी माध्यमांच्या शाळांमध्येसुद्धा शुद्धलेखन म्हणजे एखादा मजकूर कॉपी करणे इतकाच अर्थ घेतला जातो. शुद्धलेखनाचे नियम शिकवले जात नाहीत. आपल्या अनेक शिक्षकांना शुद्धलेखन येत नाही. (कारण त्यांनाही ते कोणी शिकवलेले नाही.) अशा परिस्थितीत इंग्रजी माध्यमातील मुलांच्या मराठी शुद्धलेखनाची स्थिती अत्यंत खडतर असणे आश्चर्याचे नव्हे. म्हणून आपण त्यासाठी थोडे जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी आपली मातृभाषा नेमकी जाणून घेणे आणि ती नेमकी लिहायला शिकणे किती गरजेचे आहे, हे प्रथम समजून घेतले पाहिजे. मुलांना काना, मात्रा, उकार, वेलांटी, र्‍हस्व, दीर्घ हे शुद्धलेखनातले प्राथमिक शब्दच नीट माहीत नसतात. त्यामुळे असतो चे आसतो, नाही चे नही, हे चे है अशा चुका मुलांच्या लेखनात मोठ्या प्रमाणावर आढळतात. र्‍हस्व- दीर्घ ही तर फार पुढची गोष्ट झाली. पासून, कडून, कडे, नुसार ही अव्यये अगोदर येणार्‍या शब्दाला जोडून लिहायची असतात, ते त्यांना येत नाही. हिंदीच्या प्रभावामुळे ते वेगळे लिहिले जातात. अनुस्वार कोठे द्यायचे याबाबत संभ्रम आढळतो. रफार नेमका देता येत नाही. जोडाक्षरे लिहिताना भंबेरी उडते. आपली वर्णमाला मराठी माध्यमातही नेमकी शिकवली जात नाही. इंग्रजी माध्यमातील मुलांना ती नेमकी माहीत असणे केवळ दुरापास्त गोष्ट आहे.

उपाय कोणते?
यावर उपाय म्हणून काय करता येईल याचा आपण सगळ्यांनीच विचार केला पाहिजे. शिक्षक आणि पालकांनी मुलांना उत्तम मराठी आले पाहिजे याची प्रथम मनाशी खूणगाठ बांधली पाहिजे. त्या दृष्टीने सहज शक्य आहे ती पावले तरी उचलली पाहिजेत. मुलांना रोज किमान चार-सहा ओळी मोठ्याने वाचायला लावल्या पाहिजेत. लिहायला लावल्या पाहिजेत. रोज काही मजकूर वाचून दाखवणे एवढे केले तरी भाषेचा
 रंग-ढंग, स्वभाव, चाल कळायला मदत होईल. म्हणी, वाक्प्रचार समजावून सांगितले पाहिजेत. प्रत्येकाने आपल्या पातळीवर या गोष्टी करायला हव्यात. मराठी, इंग्रजी सर्वच माध्यमातील मराठीच्या शिक्षकांनी मराठीचे शुद्धलेखन समजून घ्यायला हवे.
खरेतर माणसाला मातृभाषेतून शिक्षण मिळायला हवे. मात्र तशी परिस्थिती येईपर्यंत निदान त्याची मातृभाषा त्याला नेमकी लिहिता यावी यासाठीची ही कार्यशाळा अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. मराठी इंग्रजी माध्यमातील मुलांना शुद्ध आणि नेमके लिहायला शिकवणारी ही कार्यशाळा शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि सोसायट्यांमधूनही करता येऊ शकेल. मराठी लेखनाची आवश्यकता आणि त्यातील नेमकेपणाची गरज एकदा मनावर ठसली आणि शुद्धलेखनाच्या दिशेने जणवण्याचा मार्ग सापडला की मग ती गोष्ट आत्मसात करणे सोपे होऊ शकते.

Friday, December 21, 2018

गाडगेबाबा

 गाडगेबाबा

महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास अशी एक मोठी परंपरा महाराष्ट्रात होऊन गेली. ज्ञानेश्वरांनी रचलेल्या संतपरंपरेच्या पायावर जे विशाल देवालय उभे राहिले, ज्याचा कळस तुकोबांनी उभारला, त्या महादेवालयाच्या कळसावर फडकणारी विवेकाची पताका म्हणजे संत गाडगे महाराजांचे जीवनकार्य होय. जगाच्या इतिहासात असा महात्मा झाला नाही. पुढे व्हावयाचा नाही. 20 डिसेंबर 1956 रोजी या संत पुरुषाने जगाचा निरोप घेतला. आज त्यांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांचे हे कृतज्ञ स्मरण... नव्या पिढीला काही शिकवणारे... काही सांगणारे... विवेकाच्या दिशेने घेऊन जाणारे!
आधुनिक काळातील संत शिरोमणी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या गाडगेबाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव नावाच्या गावात झाला. झिंगराजी व सखुबाई यांच्या पोटी 13 फेब्रुवारी 1876 रोजी त्यांचा जन्म झाला. तो दिवस महाशिवरात्रीचा होता. बाबांचे नाव डेबूजी असे ठेवण्यात आले. डेबूजी झिंगराजी जानोरकर हे त्यांचे पूर्ण नाव. झिंगराजी शेतकरी होते. शेती करून ते आपली उपजीविका करत. त्यांची परमेश्वरावर नितांत श्रद्धा होती. त्यांचे अकाली निधन झाले. वडिलांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या आईने त्यांना आपल्या माहेरी म्हणजे दापुरे या गावी आणले. गाडगेबाबांचे मामा मोठे कर्तबगार पुरुष होते. त्यांच्याकडे राहूनच डेबूजी हळूहळू मोठा होऊ लागला. सकाळी लवकर उठून प्रथम गुरांचा गोठा साफ करावा, भाकर्‍या खाव्यात, दुपारच्या जेवणासाठी कांदा-भाकरी सोबत घ्यावी, गुरे चरून झाल्यावर त्यांना पाणी पाजून झाडांच्या सावलीत उभे करून जेवण करावे आणि एखाद्या वृक्षाखाली ‘राम कृष्ण हरी! जय जय राम कृष्ण हरी!’ भजन गात विश्रांती घ्यावी. रात्री गावात भजन चाले, तिकडे जाऊन भजनात बसावे, असा त्यांचा बालपणीचा दिनक्रम होता. बालपणातच त्यांचे मन माणुसकीने भरून आले. आंधळे, पांगळे, लंगडे, लुळे, कुष्ठरोगी यांच्याविषयी त्यांच्या मनात कळवळा निर्माण झाला. ते त्यांच्यासाठी जे जे शक्य ते ते करू लागले. वयाच्या सोळाव्या वर्षी त्या काळातील प्रथेनुसार डेबूजीचे लग्न करण्यात आले. पुढे सावकाराने मामांचे शेत लुबाडले. त्या धक्क्याने मामा वारले. मामाच्या माघारी सावकाराने डेबूजीस मारण्यासाठी गुंड पाठवले. पण डेबूजी अंगापिंडाने मजबूत होता. त्याने त्या गुंडांना पिटाळून लावले.
डेबूजीस एक कन्या झाली. एक पुत्ररत्न झाले.दुर्देवाने मुलगा बालपणीच मरण पावला. पुढे एका अज्ञात विभूतीच्या हाकेला ओ देत 1 फेब्रुवारी 1905 या दिवशी पहाटे तीन वाजता डेबूजी घराबाहेर पडले आणि जगाच्या संसाराला लागले. सर्वस्वाचा त्याग करून डेबूजी काटेरी मार्गाने समाजहितासाठी चालू लागले. अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या, कानाला अडकवलेली बांगडी आणि एका हातात काठी, दुसर्‍या हातात गाडगे घेऊन गाडगेबाबा गावोगाव फिरून स्वच्छता करू लागले. सायंकाळी कीर्तन करू लागले. गाडगेबाबांचा हा वैरागी अवतार अनेकांना विचित्र वाटे. लोक त्यांना वेडा समजत. भिकारी समजत. गाडगेबाबा गावोगाव जाऊन स्वच्छता करीत. सायंकाळी तिथल्याच एखाद्या नदीकाठी, एखाद्या वृक्षाखाली, कीर्तन करीत. कीर्तन करायला त्यांना मंदिर लागत नसे.
गावस्वच्छता आणि कीर्तन या कामासोबतच त्यांनी गावागावांत विहिरी, धर्मशाळा बांधायला सुरुवात केली. कीर्तनातून विषमतेवर, जातीभेदावर आघात करत बाबा समाजाला समतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असत. त्यांची कीर्तनाची पद्धत फारच परिणामकारक होती. अधूनमधून ते विनोद करीत, प्रश्न विचारून लोकांना कीर्तनात सहभागी करून घेत. कीर्तन हे एक समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे, हे त्यांनी दाखवून दिले. अंधविश्वास, परंपरागत रूढी, धर्माच्या नावावर असलेले शोषण याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. सामाजिक सुधारणा व्हावी, दारूबंदी व्हावी, सावकारशाहीचे समूळ उच्चाटन व्हावे, शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी आपली सगळी हयात खर्च केली.
गाडगेबाबा कीर्तनातून मोठी प्रभावी मांडणी करीत. भुकेल्यांना जेवण द्या... तहानलेल्यांना पाणी द्या... बेकारांना काम द्या... उघड्यानागड्यांना वस्त्रे द्या... बेघर असलेल्यांना घरे द्या... रोग्यांना औषधोपचार द्या... गरीब मुलामुलींना शिक्षण द्या... पशुपक्षी, मूक प्राण्यांना अभय द्या... हाच खरा धर्म आहे... हीच खरी ईश्वरसेवा आहे... असे ते आपल्या कीर्तनातून सांगत असत. देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका... व्यसनांच्या आहारी जाऊ नका... चोरी करू नका... सावकाराकडून कर्ज काढू नका... जातिभेद, अस्पृश्यता पाळू नका... असे ते पोटतिडकीने सांगत. संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत, पण
स्वतःबद्दल मात्र ते म्हणत, मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही.
सामाजिक प्रबोधनासोबतच गाडगेबाबांनी नाशिक, देहू, आळंदी, पंढरपूर अशा धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली. नद्यांना घाट बांधले. गोरगरिब -अपंग यांच्यासाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली. आज इतक्या वर्षानंतरसुद्धा हजारो गरजवंतांसाठी गाडगेबाबा आधार ठरलेले आहेत. हातात गाडगे घेतलेला हा माणूस आजही हजारो लोकांचा आधार आहे. सांस्कृतिक, विवेकवादी आणि प्रबोधनाचा विचार करणार्‍या कितीतरी पिढ्यांचा गाडगे महाराज हा मोठा सशक्त असा मानसिक आधार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गाडगेबाबा यांची 1941 च्या जुलै महिन्यात भेट घेतली तेव्हाचा प्रसंग अनेकदा सांगितला जातो. गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती, ही माहिती कळताच कायदेमंत्री असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गाडगेबाबांना भेटायचे ठरवले. गाडगेबाबा तेव्हा त्यांना म्हणाले, डॉक्टर, तुम्ही कशाला आले? तुमचे एक मिनिट महत्त्वाचे. तुमचा किती मोठा अधिकार आहे. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणाले, बाबा माझा अधिकार दोन दिवसांचा. खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार फार  मोठा आहे. या दोन महामानवांमधील सख्य हे असे होते.
आज पुण्यतिथीनिमित्त गाडगेमहाराज यांना आपण कृतज्ञ प्रणाम करू या.

Sunday, December 9, 2018

मुलांना कसे वाढवावे? कसे वाढवू नये?

 मुलांना कसे वाढवावे?  कसे वाढवू नये?
डॉ. शुभांगी पारकर यांनी केलेले मार्गदर्शन

लालबाग येथील विद्यार्थी उत्कर्ष मंडळाची स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला नुकतीच पार पडली. राज्यभरातील व्याख्यानमाला श्रोत्यांअभावी ओस होत असताना या व्याख्यानमालेला लाभलेला प्रतिसाद आशादायक होता. व्याख्यानमालेच्या संयोजनासाठी, प्रतिसाद  आणि भव्यतेसाठी कार्यकर्त्यांनी घेतलेले कष्ट वाखाणण्याजोगे होते. विविध विषयातल्या तज्ज्ञ मान्यवरांची व्याख्याने श्रोत्यांसाठी पर्वणीच होती. तुम्हाआम्हा सर्वांच्या जिव्हाळ्याच्या ‘नव्या पिढीतील बालक-पालक’ अर्थात मुलांना कसे वाढवावे, या विषयावर मानसोपचार तज्ज्ञ आणि शुभांगी पारकर यांनी दिलेले व्याख्यान ऐकण्याची संधी मिळाली. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातील या काही गोष्टी सर्वांसमोर ठेवत आहोत.
डॉक्टर शुभांगी पारकर म्हणाल्या की, मानवी जगण्याची उत्क्रांती होत आहे. आपण आज आधुनिक जगात जगतो आहोत, म्हणजे अधिक काही सुंदर मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. आज माणसाचे वयोमान 80 वर्षांपर्यंत वाढले आहे. पूर्वी जे करता येत नव्हते ते करणे आज सहज शक्य झाले आहे. भारत हा आशियातला सर्वात सुंदर देश आहे. मात्र या आधुनिक काळात आपल्या जीवनशैलीला काय झाले, तेच कळेनासे झाले आहे. आपण जीवनशैलीच्या आजारांत पहिल्या क्रमांकावर पोहोचतो आहोत, हे आपल्यासाठी फारसे भूषणावह नाही. किंबहुना ते आपल्या देशासाठी वाईटच आहे. म्हणूनच आज आधुनिक काळात जगत असताना, आपण आपल्या आजारांबाबत विचार करताना, सिंहावलोकन केले पाहिजे. शारीरिक संवर्धनासोबतच मानसिक संवर्धन महत्त्वाचे आहे, हे आपण जाणले पाहिजे. त्यासाठी आध्यात्मिकता महत्त्वाची आहे. गुणवत्ता वाढ होते, तेव्हाच खर्‍या अर्थाने आपण आधुनिक होतो. आनंदाने, समाधानाने जगू लागणे, मला हवे तसे, पण माझ्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, असे जगता येणे म्हणजे आधुनिकता होय. व्यक्तिस्वातंत्र्य उपभोगताना सामाजिक बंधनांची जाणीव आपण ठेवली पाहिजे. माणसाचे जगणे हे एकमेकांसोबतचे
जगणे आहे.

मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय?
सचिन तेंडुलकर जेव्हा नर्व्हस नाईंटीमध्ये बाद होत होता, तेव्हा त्याने दुर्दम्य आत्मविश्वासाच्या जोरावर, मानसिक कणखरतेच्या जोरावर त्या परिस्थितीतून बाहेर पडून पुढचा प्रवास केला. अशा प्रकारे वाईट स्थितीतून स्वतःला बाहेर काढता येणे, मानसिक कणखरता दाखविणे, दुर्दम्य आत्मविश्वास दाखवणे, म्हणजे मानसिक स्वास्थ्य होय. सगळेच धावत असतात. पण पी.टी. उषा एकच होते, कारण तिच्याजवळ आत्मविश्वासाची ऊर्जा असते. आपला आत्मसन्मान आपण महत्त्वाचा मानला पाहिजे. आपली इतर कोणाशी तरी तुलना करता कामा नये. दुसर्‍याकडे आहे त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त मिळेल ही अपेक्षा चांगली नव्हे. आपले बायबल, गीता हे धर्मग्रंथसुद्धा अधिकचे मिळवा असे सांगत नाहीत. म्हणून आजच्या पालकांनी आपल्या मुलांचा आत्मसन्मान जपला पाहिजे, वाढवला पाहिजे. मुलांमध्ये आत्मसन्मानाची जाणीव ही त्यांच्या वयाच्या पहिल्या वर्षापासून असते, असे लक्षात आलेले आहे. आत्मसन्मान असणारा माणूस कधीच हरत नसतो.

आनंदी व्यक्तीची प्रतिकारशक्ती चांगली
आपल्या मुलांना आपण नातेसंबंध, मित्रमंडळी यांचे महत्त्व आणि त्यांची आयुष्यातील अपरिहार्यता समजावून सांगितली पाहिजे. त्यातूनच आपले आयुष्य अधिक आनंदी होत असते, हे मुलांच्या मनावर बिंबविले पाहिजे. आनंदी असलेल्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती चांगली होते, असे आता विज्ञानाने सिद्ध केलेले आहे. आपल्या शरीरातील चयापचय, थायरॉईड या सगळ्याच व्यवस्था आपण आनंदी असल्यास अधिक चांगल्या कार्यरत होतात. परिणामी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आपण अधिक सशक्त आणि अधिक आनंदी आयुष्य जगू शकतो. मन समाधानी असेल तर त्या व्यक्तीला रक्तदाबाचा, मधुमेहाचा त्रास कमी होतो, असेही लक्षात आले आहे. आधुनिक पालकांनी घरात जर आनुवंशिकतेने वाढणारे आजार असतील तर नव्या पिढीला आताच डायटिंगची सवय लावली पाहिजे.

सर्जनशीलता प्रत्येकाच्या  ठायी
सर्जनशीलता प्रत्येक माणसाच्या ठायी असते. आई छान स्वयंपाक करते, सुंदर घर लावून ठेवते, तेव्हा त्यातही सर्जनशीलता असते. ही अशी सर्जनशीलता, अशी विधायकता, अशी कल्पकता आपण आपल्या मुलांना शिकविली पाहिजे.
आपल्या मुलांना आधुनिक पालकांनी दोन गोष्टी शिकवल्या पाहिजेत. पहिली म्हणजे जे पटते ते करा आणि दुसरी म्हणजे जे पटत नाही ते करू नका. जेव्हा पटतात त्या गोष्टी करता तेव्हा त्यातून आनंद मिळत असतो. पटत नाही अशा गोष्टी केलात की माणूस दु:खी होतो. यासाठी आपले आपण मित्र व्हायला हवे. स्वतःवर आपला विश्वास असायला हवा. ज्यामध्ये आनंद मिळतो त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत.
मुले निरीक्षणातून शिकतात
मुले निरीक्षणातून शिकत असतात. पालकांकडे पाहून ते तसे वागण्याचा प्रयत्न करतात. आपण अनेकदा मुलांना खोटे बोलू नका असे सांगतो. मात्र स्वतः वागताना गरज पडली म्हणून, परिस्थिती तशी होती म्हणून, अशी कारणे देऊन का होईना; पण खोटे बोलतो. मग मुलांच्या असे लक्षात येते की खोटे बोलू नये, असे सांगायचे असते, पण प्रत्यक्षात मात्र खोटे बोलण्याची गरज पडते तेव्हा खोटे बोलायचे असते.
दुसरी गोष्ट म्हणजे खोटे बोलू नका, चोरी करू नका असे आपण सांगतो. का करू नका? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला अनेकदा देता येत नाही. अशा वेळी आपण मुलांना त्याचे कारण सांगितले पाहिजे. म्हणजे जी गोष्ट आपल्या बाबतीत घडल्यामुळे आपल्याला वाईट वाटेल, आपले नुकसान होईल, तीच गोष्ट दुसर्‍याबाबत करता कामा नये. कारण त्याचेही नुकसान झाले की त्यालाही वाईट वाटणार असते. अशा प्रकारे अगदी सोप्या शब्दांत आपण त्यांना त्याची उत्तरे देऊ शकतो.

स्पर्धेमुळे जीवघेणा ताण
पुढच्या पिढीचे आयुष्य अधिक अवघड, अधिक खडतर आहे. जीवनातील स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेमुळे जीवघेणा ताण येतो आहे. या सगळ्यांसाठी आपण आपल्या मुलांना तयार केले पाहिजे. आपला सामाजिक परीघ मोठा झाला पाहिजे. आपल्या विश्वात आपल्याला रमता यायला पाहिजे. जीवन कष्टमय असले तरी ते आनंदी असू शकते, हे आपण त्यांना शिकविले पाहिजे. मुलांमध्ये आपण लवचिकता आणायला हवी. म्हणजे एखाद्या वेळेला परिस्थिती बिकट असेल तरी त्यांना त्या परिस्थितीशी जुळवून घेता यायला हवे. काही असो अथवा काही नसो; तरी आपले मन शांत कसे राहील हे आपण पाहिले पाहिजे. बाह्य गोष्टीमुळे आपल्या मनाची शांती भंग पावणार नाही ही क्षमता आपल्यात वाढवली पाहिजे.

प्रौगंडावस्थेत मानसिक आजार
प्रौगंडावस्था ही एक अवघड अवस्था आहे.प्रौगंडावस्थेतील मुले ही त्रिशंकू अवस्थेत जगत असतात. ती ना लहान असतात ना मोठी असतात. या काळात शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. तेव्हा परिस्थितीशी जमवून घेण्यात पालकांनी मुलांना मदत करायला हवी. पालकांची भूमिका या काळात मुलांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. अनेकदा पालक मुलांना अमुक गोष्ट मिळवली तर माझा खरा मुलगा अशा काही चित्रविचित्र अटी घालतात. त्यातून मुलांचे नैतिक खच्चीकरण होत असते. याच काळात मुलांमध्ये मानसिक आजाराचे प्रमाण मोठे असल्याचे लक्षात आलेले आहे. याच काळात मुलांमध्ये आणि आईवडिलांमध्ये दरी निर्माण होते. विसंवाद निर्माण होतो. म्हणून आईवडिलांनी या काळात असलेल्या मुलांशी सुसंवाद निर्माण करायला हवा. व्यक्ती म्हणून मुलाची याच काळात घडण होत असते, हे लक्षात ठेवले पाहिजे.

यशाची व्याख्या
आपली यशाची व्याख्या आपण तपासून पाहिली पाहिजे. अनेकदा गाड्या, बंगले असणे किंवा डॉक्टर इंजिनीयर होणे अशी  आपण यशाची व्याख्या करतो; ती काही यशाची योग्य व्याख्या नव्हे.चटणी भाकरी खाऊन समाजसेवा करणारा माणूस हा अधिक यशस्वी माणूस असू शकतो. यश हे समाधानात असते. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. डिग्र्या न मिळवलेले, गाडी बंगले नसलेले अनेक लोक आपल्या आयुष्यात यशस्वी झालेले लोक आहेत. हे प्रथम आपण समजून घेतले पाहिजे आणि आपल्या मुलांना समजून सांगितले पाहिजे. मुलांना प्रेमाने वाढवावे की कठोरतेने वाढवावे हे आपण ठरविले पाहिजे. प्रसंगी शिस्त हवी, ठामपणा हवा, पण सतत कठोर बोलण्याने मुले घडण्याऐवजी बिघडण्याची शक्यता असते.
मुलांना निराश होऊ द्या
अलीकडे आपण मुलांचे अधिक लाड करतो. त्यांना यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी मदत करतो. पण त्यांना अपयशाच्या बाजूला फिरकूही देत नाही. खरे तर मुले अपयशाला लवकर सामोरे जातील तेवढे चांगले असते. त्यातूनच त्यांची सहनशीलता वाढते, ते नकार पचवायला शिकतात, निराशेवर मात करता येते; कशी करायची हे ते शिकतात. म्हणून मुलांना निराश होऊ द्या, त्यातून त्यांना बाहेर येऊ द्या. त्यातूनच त्यांची खरी प्रगती होत असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी त्यांच्या आशा-आकांक्षा मुलांवर लादू नयेत. त्यांचे स्वप्न मुलांवर लादू नयेत. मुले स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची आहेत, हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यांना त्यांचा मार्ग निवडण्याची मुभा दिली पाहिजे. त्यांना पडू दिले पाहिजे. निराश होऊ दिले पाहिजे. त्यातूनच त्यांना ऊर्जा मिळते आणि फिनिक्स पक्षासारखे ते उडायला शिकतात.
आपण चांगले वागतो म्हणून प्रत्येकाने आपल्याशी चांगलेच वागले पाहिजे, अशी अनेकदा अपेक्षा असते. तसे होणार नसते. जग तुमच्याशी चांगले वागायला बांधील नाही हे मुलांना समजून सांगितले पाहिजे. आपण भले करतो तो आपला चांगुलपणा, आपला निर्णय आहे. दुसर्‍याचा तसाच असेल असे नाही, हे वास्तव मुलांना सांगितले पाहिजे.

जीवनशैली रोबोटिक
 आजकाल मुलांना इंटरनेटवरील गेमचे व्यसन लागलेले दिसते. मुलांची जीवनशैली रोबोटिक झाली आहे. माझ्या पाहण्यात सतरा वर्षांचा एक असा मुलगा आला, ज्याने आपली आई नऊ दिवस आयसीयूमध्ये असताना तिला रुग्णालयात येऊन भेटण्याची तसदी घेतली नाही. तो त्या काळात फक्त गेम खेळत घरी थांबला होता. मुलांना मोबाईल, इंटरनेट देऊ नका असे नव्हे, त्या त्या सुविधांचे फायदे आहेत. मात्र मुले त्यांच्या आहारी जात नाहीत ना, याबाबत पालकांचे लक्ष असायलाच हवे. आजकाल मुले अशा प्रकारच्या गेमच्या आहारी जात आहेत. त्यांना त्याचे व्यसन लागत आहे. त्याच वेळी अतिशय वाईट अशा अमलीपदार्थांचे व्यसनसुद्धा मुलांना लागत आहे. म्हणून पालकांनी दक्ष राहिले पाहिजे. मुलांच्या मेंदूला रोज काही ना काही खाऊ लागतो. म्हणून त्यांना चांगली व्यसने लावली पाहिजेत. अभ्यासाचे व्यसन लावले पाहिजे, मैदानी खेळाचे व्यसन लावले पाहिजे. त्यातून त्यांची वाढ होते, त्यांना ऊर्जा मिळते.
सेल्समनसारखे वागू नये
मुलांशी वागताना एखाद्या सेल्समनसारखे पालकांनी वागू नये. तू अमुक केलेस तर अमुक देईन, अमुक केलेस तर तमुक देईन, अशी देण्याची भाषा मुलांसोबत करता कामा नये. मुलांना माणुसकीचे धडे लहानपणीच दिले पाहिजेत. तसेच एखादे वर्तन मुलांकडून झाले तर त्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या मुलाने पक्ष्याला, प्राण्याला पाणी नेऊन दिले, आजोबांना मदत केली, दुसर्‍या मुलाला मदत केली तर त्या मुलाला बक्षीस देऊन त्याच्या या वृत्तीचा गौरव केला पाहिजे. त्यातून मुले माणुसकी शिकत असतात.

मुलांचा सन्मान
मुलांसमोर पालकांनी एक आदर्श ठेवला पाहिजे. मुले त्या आदर्शाकडे बघूनच वाढत असतात, याचे भान पालकांनी ठेवलेच पाहिजे. मुलांच्या समोर आईवडिलांनी भांडू नये; त्यांच्यातील मतभेद मुलांच्या लक्षात येणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. मुलांचा सन्मान सांभाळणेही तितकेच गरजेचे असते. लखनवी भाषेत पालक मुलांना आप म्हणतात म्हणजे त्यांचा आदरार्थी उल्लेख करतात. आपण अनेकदा ठोंब्या अशी नकारात्मक भाषा वापरतो. त्यातून त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच लागत असते. याचा परिणाम मनावर होऊन आत्मविश्वास कमी होतो. मुले लहान असली तरी त्यांना आदराची गरज असते.

अभ्यासाची चिंता
आज टीव्ही, मोबाईल या साधनांमुळे घरातले बोलणेच बंद झाले आहे. घरातल्या माणसांमधला संवाद संपला आहे. त्यातून मुलं स्वयंकेंद्रित व्हायला लागली आहेत. मुलांना शिस्त हवीच, पण त्यांना प्रेमही हवे असते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. चिंता ही अशी गोष्ट आहे की एका मर्यादेपर्यंत ती माणसाला कार्यप्रवण करते. ती माणसाला आवश्यक असते; मात्र ती जर प्रमाणापेक्षा अधिक वाढली तर माणसाचे खच्चीकरण होते. त्याची काम करण्याची प्रेरणा संपते.तेव्हा याचे भान आपण ठेवले पाहिजे. अभ्यासाची चिंता मुलांना एका मर्यादेपर्यंत असायलाच हवी मात्र त्या मर्यादेपलीकडे ते जाऊ नये. फार ताण दिला तर त्यांची प्रगती ही अधोगतीमध्ये बदलत असते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

मोबाईलला लॉक
अलीकडे मुलांच्या मोबाईलला लॉक असतो. जर मूल मोबाइलवर काय करते हे पालकांना दाखवत नसेल; त्यांच्यापासून लपवून ठेवत असेल तर कदाचित ते मूल व्यसनाधीन होण्याची ती नांदी असू शकते हेही पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.
 मुले वाढविणे ही सहज गोष्ट नाही. ती पूर्वीपेक्षा आता अवघड झाली आहे. मात्र या सगळ्यांची चिंता करून प्रश्न सुटणार नाही. तर आपण अधिक सहजपणे अधिक प्रेमाने, मुलांशी संवाद वाढवून, त्यासाठी स्वतः थोडे कष्ट घेऊन वागले पाहिजे. तरच आपली मुले छान आयुष्य जगू शकतील आणि पर्यायाने आपले आयुष्यही सुंदर होऊन जाईल.