Tuesday, June 2, 2020

कोरोनाविरोधातील ‘केरळ पॅटर्न’


कोरोनाविरोधातील ‘केरळ पॅटर्न’
डॉ. अरुण गद्रे यांनी घेतलेली डॉ.अमर फेटले यांची मुलाखत

भारतातील पहिला कोरोना रुग्ण ज्या केरळ राज्यात सापडला त्या केरळ राज्याने कोरोना साथीचा जो यशस्वी मुकाबला केला तो कौतुकास्पद आहे. केरळ पॅटर्न म्हणून या गोष्टीकडे मोठ्या कौतुकाने पाहिले जात आहे. जगभरात हा पॅटर्न प्रसिद्ध झाला. हा केरळ पॅटर्न राबविणाऱ्या केरळच्या टीमपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे डॉ.अमर फेटले! महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डॉ. अरुण गद्रे यांनी या डॉ.अमर फेटले यांची ‘विचारवेध’साठी घेतलेली मुलाखत कोरोनाशी सामना कसा करावा, याचा आदर्श समोर ठेवणारी आहे. नवाकाळच्या वाचकांसाठी केलेले हे शब्दांकन...

डॉ.अरुण गद्रे- कोवीड आजाराविरोधाचा तुमचा हा लढा नेमका केव्हापासून सुरू झाला?
डॉ.अमर फेटले - सतरा-अठरा जानेवारीला आम्हाला चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे लोक आजारी पडत आहेत ही गोष्ट कळली. केरळचा चीनशी फार निकटचा संबंध आहे. कारण केरळमधून आमचे वैद्यकीय शाखेचे अनेक विद्यार्थी तेथे शिक्षणासाठी जातात. त्यामुळे मग आम्ही ताबडतोब आरोग्य खात्यात बरोबर बैठक घेतली आणि जर तेथे साथीचा मोठा प्रसार झाला तर आपले विद्यार्थी परत येतील तेव्हा काय करायचे, याच्या विचाराला सुरुवात केली. आमची कंट्रोल रूम तेव्हाच कामाला लागली. केरळमध्ये  14 जिल्हे आहेत. आम्ही कंट्रोल रूमच्या माध्यमातून पुढच्या काही महिन्यांत जर आपल्याकडे अशी परिस्थिती आली तर काय करायचे याची पावले उचलायला सुरुवात केली. आमच्याकडे कंट्रोल रूम सिस्टीम अगोदरपासूनच अस्तित्वात होती. गेली काही वर्षे साथीच्या आजारांसाठी ही सिस्टीम केरळ राज्याने उभारलेली आहे.

डॉ.अरुण गद्रे- म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने covid-19 जागतिक महामारी जाहीर करण्यापूर्वीच आपण सावध झाला होतात?
डॉ.अमर फेटले- अगदी बरोबर जागतिक आरोग्य संघटनेने महामारी जाहीर करण्यापूर्वीच आम्ही पावले उचलायला सुरुवात केली. आम्ही आमची संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लावली. संसर्गजन्य आजारांच्या लक्षणांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. तापाच्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवले. त्यानंतर आम्हाला भारत सरकारकडून सावधानतेचा इशारा मिळाला. मग आम्ही जागतिक आरोग्य संघटना आणि इतर वैद्यकीय संघटनांच्या वेबसाईटवरून अपडेट घेत राहिलो. तेथून मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही देशांमध्ये पहिल्यांदा कोरोनाशी कसा लढा द्यायचा याची गाईडलाईन तयार केली. कोरोना मॅनेजमेंटची गाईडलाईन आम्ही 26 जानेवारी रोजी जाहीर केली.

डॉ.अरुण गद्रे- जागतिक आरोग्य संघटनेने तपासण्या करण्यावर भर दिला होता. तुमच्या गाइडलाइनमध्ये त्याच्यापेक्षा वेगळे काही होते काय?
डॉ.अमर फेटले - जागतिक आरोग्य संघटनेने तपासणीचा जो मंत्र दिला तो फार नंतर आला. त्याच्या अगोदरच आम्ही आमच्या गाईडलाईन जाहीर केल्या होत्या. आम्ही सर्वप्रथम विमानतळांवर सावधानतेचा इशारा दिला. प्रत्येक एअरपोर्टवर एक एक वैद्यकीय अधिकारी नेमला. प्रत्येक विमानतळावर एक टीम सज्ज केली. तेथे आम्ही स्क्रिनिंग सुरू केले. प्रवाशांवर नीट पाळत ठेवली. रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित अशी विशेष रुग्णालयांपर्यंतची प्रवासाची सोय केली. ज्या चार जिल्ह्यांमध्ये एअरपोर्ट आहेत तेथे विलगीकरण कक्ष ताबडतोब उभारून घेतले. हे विलगीकरण कक्ष आम्ही अद्ययावत असे उभारले होते. तेथे पीपीई किट वेळीच उपलब्ध केल्या. हे सारे आम्ही ही फारच लवकर सुरु केले. सागरी वाहतूकीबाबतसुद्धा आम्ही वेळी दक्ष झालो. सगळ्या पोर्टवर यंत्रणा उभी केली.
त्याचबरोबर आम्ही आमची कंट्रोल रूम नव्याने अद्ययावत केली. वेगवेगळ्या टीम या कंट्रोल रूमसोबत काम करू लागल्या. वेगवेगळ्या विभागात कंट्रोल रूमचे काम सुरू झाले. पाळत ठेवणे, माहिती गोळा करणे, तपासण्या करणे, प्रसारमाध्यमांना वेळीच योग्य ती माहिती देणे, सोशल मीडिया योग्य प्रमाणे हाताळणे, पायाभूत सुविधा उभारणे, मनुष्यबळाची उभारणी करणे, त्यांना प्रशिक्षित करणे असे एकूण 18 विभाग कार्यरत झाले. मुख्य कंट्रोल रूमसोबत प्रत्येक जिल्ह्यात त्यांची त्यांची कंट्रोल रूम उभी करून काम सुरू केले. आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. राजन खोब्रागडे यांनी अत्यंत मेहनतीने आणि उत्साहाने हे सगळे काम हाती घेतले. आमच्या कुटुंब कल्याण खात्याच्या मंत्री केके शैलेजा टीचर यांनी या कामात स्वतःला झोकून दिले. त्या रोज आमच्या कंट्रोल रूममध्ये येऊन कामाला बसत असत. या दोघांच्या रूपाने आमचे सरकारच आमच्या सोबत कंट्रोल रूममध्ये कामासाठी हजर होते आणि प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींवर त्यांचे लक्ष होते.
आमच्यासोबत एक अकॅडमी कमिटीसुद्धा होती. ती कमिटी covid-19 आजार भविष्यात किती आणि कसा पसरेल याचा अंदाज बांधत होती. त्याचे चित्र रेखाटत होती. अशी एकापेक्षा अधिक कल्पना चित्रे या टीमने आपल्या अभ्यासातून रेखाटली आणि त्याप्रमाणे मग आम्ही तयारी करायला लागलो. त्याप्रमाणे आम्ही गाईडलाईन तयार केल्या. 
डॉ.अरुण गद्रे- हे सारे म्हणजे एखादे मिलिट्री ऑपरेशन असावे तसे आहे. आपण सुरुवातीच्या काळातील काही अनुभव आम्हाला सांगू शकाल का... मी असे ऐकले आहे की, एक वेळ तुम्ही 1 लाख 40 हजार  माणसांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवले होते. सरकारच्या बाजूने तुम्ही पूर्ण तयारी केली होती, पण शेवटी दुसरी बाजू लोकांची होती. लोकांनी कसा प्रतिसाद दिला... तुम्ही त्यांना कशाप्रकारे सारे समजावून सांगितले ते सांगा...
डॉ.अमर फेटले- 30 जानेवारीला मी माझ्या मुलीच्या बाळंतपणासाठी दुसऱ्या जिल्ह्यात गेलो होतो. मी तिथे असताना मला फोन आला की, एका चीनवरून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याची बातमी आहे. तिथे मोठाच प्रश्‍न निर्माण झाला होता. कारण ही भारतातील पहिली केस होती. त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना समजावून सांगण्यापासून सगळ्या गोष्टी आमच्या टीमने केल्या. ज्या त्रिशूर जिल्ह्यात ही केस आढळळी तेथे डॉक्टर रीना म्हणून होत्या, त्यांनी त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना समजावून सांगून त्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आणि क्वारनटाईन केले. त्या मध्यरात्री चार मंत्री रुग्णालयात त्या विद्यार्थ्याला पाहण्यासाठी हजर झाले होते. त्या रात्री झालेल्या मिटींगला मी हजर नव्हतो, पण दुसऱ्या दिवशी सकाळीच मी जाऊन आमच्या टीममध्ये सामील झालो. त्या रात्री सुरू झालेल्या बैठका दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सातत्याने सुरू होत्या. संपूर्ण देशातच एक भीती निर्माण झाली होती. प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा आम्ही काय करतो याची प्रचंड उत्सुकता होती. तेव्हा सरकारने प्रसारमाध्यमांसमोर हा सर्व विषय ठेवण्यासाठी माझ्यावर जबाबदारी सोपवली. तेव्हापासून मी दोन फोन वापरत होतो आणि त्या काळात जेवढे फोन आले तेवढे सगळे फोन मी उचलले होते. एकही फोन मी नाकारलेला नाही. त्याच वेळी आम्ही चॅनेलवरून काय करतो आहोत हे सर्वांना सांगत होतो. अत्यंत पारदर्शक व्यवहारामुळे लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. केरळमध्ये दिशा हेल्पलाइन नावाची एक हेल्पलाइन गेली काही वर्षे सुरू आहे. निपाह व्हायरस आला तेव्हा आणि केरळा पूर आला तेव्हा या दिशा हेल्पलाइने महत्त्वाचे काम केले होते. या वेळीसुद्धा ही दिशा हेल्पलाइन कामाला आली. या दिशा हेल्पलाइनची क्षमता वाढविण्यात आली आणि आणि प्रत्येकाला जी हवी ती माहिती मिळवण्यासाठी हा नंबर देण्यात आला. काही मुलभूत माहिती तिथला माणूस देत होता आणि अधिकची माहिती हवी असेल तर विशेषज्ञांचा लाईन जोडून देत होता. लाखो लोकांनी या हेल्पलाईनवरून माहिती घेतली. त्यामुळे लोकांना थेट डॉक्टरांकडूनच फोनवर माहिती मिळू लागली.
डॉ.अरुण गद्रे- या कालावधीत मोठ्या प्रमाणावर लोकांचे प्रशिक्षण करावे लागले. आशा वर्कर, नर्स, डॉक्टर या सगळ्यांनाच प्रशिक्षण देण्याची गरज होती. अल्पावधीत आपण हे सारे कसे साध्य केले?
डॉ.अमर फेटले-  या काळात आम्ही एकूण 8 लाख 50 हजार लोकांना प्रशिक्षित केले. हे सारे आम्ही  मिडिया कॉन्फरन्सिंगद्वारे केले. वेगवेगळ्या गटांसाठी वेगवेगळ्या मीडिया कॉन्फरन्स आयोजित केल्या. नर्स, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांच्यासोबत इतर विभागातील कर्मचाऱ्यांचेसुद्धा प्रशिक्षण केले. दोन-तीन आठवड्यात आम्ही इतक्या लोकांना प्रशिक्षित केले. एक यूट्यूब साईट तयार केली. त्याद्वारे माहिती देऊ लागलो.

डॉ.अरुण गद्रे- क्वारनटाईन व्हायला लोकांनी विरोध केला का? तुम्ही त्यावेळी ही परिस्थिती कशी हाताळली?
डॉ.अमर फेटले- अनेकदा लोकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. लोक बाईकवरून बाहेर निघत होते. मग आम्ही लोकल लोकांच्या मदतीने लक्ष ठेवणाऱ्या टीम तयार केल्या. सुरुवातीचे रुग्ण म्हणजे चीनमधून आलेले वैद्यकीय विद्यार्थी होते. त्यातले काही जण हिंसकसुद्धा झाले होते. त्यानंतर इतर देशातून येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. आम्ही मग एअरपोर्टवर लोकांना सविस्तर माहिती देऊन सेंटरमध्ये आणू लागलो.
मग आम्ही रूट मॅप तयार करायला सुरुवात केली. म्हणजे पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आलेल्या माणसांची त्याच्याकडून माहिती घेऊन केलेली तारीख, वेळ, माणूस यादी. तो कुठे भेटला, कधी भेटला या सगळ्याची नोंद. ते रूट मग आम्ही माध्यमांमध्ये सर्वांसाठी प्रसिद्ध केले. त्यामुळे लोकांमध्ये जी प्रचंड भीती निर्माण झाली होती ती काही प्रमाणात कमी झाली. रुग्ण कोठे कोठे गेला हे नेमके लोकांना कळले. त्यातून मग त्याच्या संपर्कात आलेले लोक ते स्वतः काळजी घेऊ लागले. लाखो लोक भीतीखाली वापरण्यापेक्षा हजार लोक भीतीखाली आले. हेल्पलाइनला लाखांऐवजी हजार लोकांचे फोन येऊ लागले. उगाचचा त्रास वाचला.

डॉ.अरुण गद्रे- शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील लोकांचा प्रतिसाद आणि सहकार्य मध्ये कोणता फरक जाणवला? तुम्ही त्या परिस्थितीशी कसा सामना केला?
डॉ.अमर फेटले- आमचे केरळ राज्य बहुतांश छोट्या छोट्या शहरांनी बनलेले आहे. येथे हे शहर आणि ग्रामीण असा मोठा फरक नाही. त्यातूनही ज्याला ग्रामीण भाग म्हणावे तेथून चांगला प्रतिसादाला मिळाला. अर्थात याचे श्रेय आमच्या स्थानिक वैद्यकीय पथकांना दिले पाहिजे. ग्रामीण भागात या वैद्यकीय पथकातील लोकांच्या नागरिकांशी थेट ओळखी होत्या. त्याचा उपयोग झाला. शहरी भागात अशा ओळखी असणे शक्य नव्हते.

डॉ.अरुण गद्रे- तुमच्याकडे मुंबईप्रमाणे झोपडपट्टीचा भाग आहे का?
डॉ.अमर फेटले- धारावीसारखी आमच्याकडे झोपडपट्टी नाही. काही भागांमध्ये झोपडपट्टी आहे. अर्थात तिथल्या लोकांना आम्ही स्थलांतरित म्हणत नाही. त्यांना पाहुणे कामगार असे म्हणतो. तेथे विविध भाषिक लोक असल्याने आम्हीही सहा भाषांमध्ये त्यांच्यासाठी काम सुरू केले. त्यांच्यासाठी सर्व प्रकारची मदत देऊ केली. त्यामुळे त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला. देशभर लॉकडाऊन होण्याच्या अगोदरच दोन दिवस आम्ही केरळमध्ये कर्फ्यू लावला होता.

डॉ.अरुण गद्रे- आपण या काळात तंत्रज्ञानाचा काही नावीन्यपूर्ण वापर केलात का?
डॉ.अमर फेटले- अनेकदा असे होत होते की काही लोक माहिती देत नव्हते. काही लोक चुकीची माहिती देत होते. अशा वेळेला आम्ही काय करत होतो, त्यांनी दिलेली माहिती सायबर सेलसोबत फोन मॅपिंग करून खात्री करून घेत होतो. त्यामुळे श्रम कमी झाले आणि नेमकी माहिती समोर येऊ लागली. सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज या मॅपिंगसाठी अनेकदा वापरले.


डॉ.अरुण गद्रे- तुम्ही क्वारनटाईन यंत्रणा कशी उभी केली?
डॉ.अमर फेटले- आमचे पायाभूत सुविधांचे खाते, पीडब्ल्यूडी आणि पंचायत यांच्या मदतीने कामाला लागले. लॉकडाऊन जाहीर झाल्यावर  राज्यातील वस्तीग्रहे, मोठ्या इमारती आणि रिकामी हॉटेले यांच्याशी बोलणी करून ती ताब्यात घेतली. तेथे सेंटर्स उभारली. परदेशातून चार विमानतळांवर प्रवासी येत होते. ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत अशा लोकांना कोरोना केअर सेंटरला पाठवत होतो. ज्यांना कोणतीच लक्षणे नाहीत त्यांना होम क्वारनटाईन करत होतो. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या लोकांना आम्ही फ्री वायफाय पुरवले होते. 24 तास मानसिक आधार देणारी हेल्पलाइन उपलब्ध करून दिली होती. 2 हजार समुपदेशकांची दिशाही हेल्पलाइन त्यासाठी काम करीत होती. होम क्वारनटाईन केलेल्या लोकांसाठीसुद्धा काही नियम घालून दिले होते आणि जनमैत्री पोलीस नावाने एक गट त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम करीत होता.
डॉ.अरुण गद्रे- या मोहिमेमध्ये आपण स्वयंसेवकांची मदत घेतली होती. हे स्वयंसेवक कसे मिळाले? ते कसे मिळवले?  त्यांच्याकडून कसे काम करून घेतले?
डॉ.अमर फेटले-  गेली काही वर्षे दर पावसाळ्यात केरळमध्ये लेप्टो, डेंग्यू यांच्या साथी येतात. म्हणून गेली काही वर्षे आम्ही जनजागृती मोहीम राबविली आहे. या मोहिमेत जन आरोग्य सेवक काम करतात. हे जन आरोग्य सेवक म्हणजे जनतेतीलच काही लोक आहेत. ते आशा वर्कर आणि आरोग्य पथकासोबत काम करीत असतात. सर्व गल्लीमोहल्ल्यांत, गावागावांत असे जन आरोग्य सेवक आहेत. हे आरोग्यसेवक म्हणजे आमचे ताबडतोब हाताशी असलेले स्वयंसेवक होते. शिवाय वेबसाइटवरून स्वयंसेवक म्हणून आम्हाला जोडून घेण्याची विनंती केली. आमच्या आवाहनाला 43 हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे तिथल्या प्रत्येक घरावर किमान 3 लोकांचे लक्ष होते. आम्ही नागरिकांना आवाहन केले होते कोरेना रुग्ण आढळल्यास त्याच्या मदतीला जा. त्याच्या घरच्यांना आधार द्या. रुग्णाला विलगीकरण कक्षात जाण्यासाठी आवाहन करा. मागच्यांची आम्ही काळजी घेतो असे सांगा. टेलिव्हिजन आणि प्रिंट अशा दोन्ही माध्यमांनी यासाठी मोठी मदत केली. मी स्वतः त्यासाठी कितीतरी वेळ दिला. शिवाय मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री रोज सायंकाळी एक तास जनतेबरोबर संवाद साधत होते, मुख्यमंत्र्यांच्या या संवादाला सर्वाधिक टीआरपी होता. लोक इतर सर्व गोष्टी सोडून मुख्यमंत्र्यांना ऐकत होते.

डॉ.अरुण गद्रे- लॉकडाऊन संपल्यानंतर या व्हायरससोबत कसे जगावे याबाबत काय सल्ला द्याल?
डॉ.अमर फेटले- असा सल्ला देण्याइतका मी मोठा विशेषज्ञ नाही. मात्र एवढे सांगू शकेन की, या वायरसला कमी लेखू नका. हा व्हायरस जाणार नाही. त्यामुळे बाहेर जाताना तो प्रत्येक सरफेसवर आहे याची जाणीव ठेवा. मास्क वापरा फार महागडे माज लावण्याची गरज नाही साधा कापडाचा मास्क वापरा. कोठेही बाहेर जाऊन आला की प्रथम आपले हात साबणाच्या पाण्याने धुवा. कामावरून आल्यावर आंघोळ करून मग इतर लोकांना भेटण्याची सवय लावा. बाहेर जाल तेव्हा सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा. वयस्कर लोकांची काळजी. घ्या मुलांना स्वच्छतेचे धडे द्या. रस्त्यावर थुंकणे टाळा. केरळमध्ये रस्त्यावर थंकणाऱ्यारांची संख्या अत्यल्प आहे. डॉक्टर आणि संशोधक हेच तज्ज्ञ असतात, हे लक्षात ठेवा. कोणीही सांगितलेल्या कुठल्याही माहितीवर उगाच विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही गोष्टीने प्रभावित होऊ नका. सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करा. एक-दोघांनी जरी नियमांचे उल्लंघन केले तर काही हजार लोकांचे जीव धोक्यात टाकण्यासारखे आहे, हे लक्षात ठेवा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला समजू द्या. ऐकला नाही तर रागवा. पण कायदा हातात घेऊ नका. संबंधित विभागाला कळवून त्यांना त्यांचे काम करू द्या. वैद्यकीय विभागात काम करणाऱ्यांना आदराने वागवा. त्यांना बहिष्कृत करणे टाळा. पोलिसांचा आदर करा. आपली तब्येत चांगली ठेवा. 90 टक्के कोरोना माइल्ड म्हणजे कमी त्रासदायक असतो. तांदळाची पेज आहारात घ्या. गुळण्या करायची सवय लावा. तुळशीचा रस, हळदीचे पाणी अशा काही स्थानिक गोष्टी उपयोगात आणू शकाल. फळे आणि आणि फळभाज्या, पालेभाज्या आहारात घ्या. आवळा, पपया यांचे सेवन आवर्जून करा. पुरेशी झोप घ्या. सारखेसारखे कोरोनाचे आकडे पाहत राहू नका. अमेरिकेत किती रुग्ण आहेत याच्याशी सामान्य माणसाला फारसे काही देणेघेणे नाही, हे लक्षात घ्या. आपण काय करायचे हे महत्त्वाचे आहे. आपल्या कुटुंबाची, आपल्याशी संबंधित लोकांची आणि आपल्या परिसरातील सेवेत असलेल्या लोकांची काळजी घेणे एवढेच आपले काम आहे. एवढे केले म्हणजे सगळ्या राज्यांची, देशाची आणि जगाचीही काळजी घेतल्यासारखे आहे.

Sunday, May 31, 2020

अजब न्याय


अजब न्याय

काय करतो आहेस?
वैजयंतीने फोनवर बोलणं या प्रश्नातच सुरू केलं.
उद्याचं पान लावतोय.. मी तिला म्हणालो.
मी तेव्हा उद्या प्रकाशित होणारे युवा पान  सेट करीत होतो.
कधी निघणार आहेस? तिने दुसरा प्रश्न विचारला.
पान झालं की... मी म्हणालो.
किती वेळ लागेल..? तिने प्रतिप्रश्न केला.
तासभर तरी जाईल... मी स्पष्टीकरण दिलं.
आज भेटशील..? तिने विचारलं
हो... म्हणालो.
मग भेटूया.. मी वाट पाहते... असं म्हणून ती फोन ठेवायला निघाली, तर मीच विचारलं,
काही अर्जंट आहे का?
तसंच समज... बोलायचंय तुझ्याशी.. ती म्हणाली.
येतो...
ठेवू... ?
मी बाय-बाय म्हणालो आणि आणि फोन कट केला.
पण 'काय प्रॉब्लेम असेल'च्या भुंग्याने मन पोखरायला सुरुवात केली. पानाचा लेआउट करण्यात मनच लागेना. ऑपरेटर सोलकरला सूचना दिल्या आणि पंधराव्या मिनिटाला मी ऑफिसबाहेर पडलो.
नेहमीच्या जागी पोहोचलो. वैजयंती अगोदरच पोचली होती. मोबाईलवर फेसबुकशी चाळे करीत माझी वाट पाहत बसली होती. नेहमी हसतमुख असणारी ही बया तोंड पाडून बसली होती. काय झालं म्हणून मी विचारलं तर काही न बोलता घडाघडा रडायलाच लागली.
बाजूला बसून उजवा हात पाठीमागून तिच्या उजव्या खांद्यावर टाकून मी तिला नेहमीप्रमाणे जवळ घेतलं आणि विचारलं,
काय झालं?
तर प्रश्नाचे उत्तर आले नाही. हुंदके ऐकायला येऊ लागले.
डाव्या हातानं प्रथम हनुवटी उचलून मग मी तिचे डोळे पुसले.
आश्वासक स्वरात पुन्हा विचारलं,
काय झालं?
मग मात्र तिने आढेवेढे न घेता रडवेल्या चेहऱ्याने सगळी गोष्ट सांगितली.
गोष्ट एकदम फालतू होती.
तिची सहकारी कोणी माया का छाया म्हणून... तिला बॉसने कामावरून काढून टाकलं. तिच्या घरी पैशाचा मोठा प्रॉब्लेम आहे. ती जाताना तिच्याजवळ रडली. त्या रडण्याचं हिला वाईट वाटलं. म्हणून आता ही हुंदके देत होती. मी म्हटलं, तुला वाईट वाटलं तर ठीक आहे. पण मेली तर नाही ना... जिवंत आहे ना... मग सोड चिंता. मिळेल दुसरा जॉब. मग जरा अस्वस्थ होत तिने आपला हॅंकी बाहेर काढून तोंड पुसलं. तिला हसवण्यासाठी ‘हॅंकी...’ म्हणालो. तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. हॅंकीचा शॉर्टफॉर्म तिच्या पहिल्या भेटीत कळला.  ती जेव्हा हातरुमालाला हॅंकी म्हणाली तेव्हा मी म्हटलं होतं की, शब्द एकदम परफेक्ट आहे. हॅकरचिप एवढा मोठा शब्द म्हणण्याइतका एफएसआय तरी आहे कुठे त्यावर?
तिला तेव्हा एफएसआय हा शब्द माहीत नव्हता. तो सांगितल्यावर तिला हसू आलं होतं. आज मात्र तिला हँकी म्हटलं की तो विनोद आठवण हसू येतं.
प्रेमात असलं की छोट्या छोट्या गोष्टी एवढ्या सुंदर दिसू लागतात.
आम्ही उठलो. नेहमीच्याच चहावाल्याकडे गेलो. मी चहा पीत नाही. ती नेहमीप्रमाणे फूल  चहा प्यायली.  चहावाल्याशेजारी पानपट्टी आहे त्याच्याकडून चॉकलेट घेतली. एक फोडून तोंडात टाकलं. खिश्यातून फोन काढला आणि ऑपरेटर सावपेकरला फोन केला.
झालं का रे पान? मी विचारलं तर तो म्हणाला, हो.
ठेवतो मग. गुड नाईट. मी म्हणालो आणि फोन कट केला.
सालपेकर आमच्या डिपारमेंटमधला सर्वात सीनियर माणूस. तितकाच सिन्सियर. म्हणूनच तर मी सालपेकरवर पान सोडून बाहेर पडू शकतो.
वैजयंतीला तिच्या गाडीला सोडून मी माझ्या घरची वाट धरली.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी अंथरुणात असतानाच फोन वाजला. उपसंपादक मानेचा फोन होता. मी झटकन फोन उचलून कानाला लावला आणि हॅलो म्हणालो. तो हॅलो न म्हणता म्हणाला, साल्या, वाट लावलीस ना... काल काय झोपला होतास काय पान लावताना? क्षणात माझी झोप उडाली. उठून बसत मी काळजीच्या स्वरात विचारलं, काय झालं?
झालेलं काही नाही. तू केलं आहेस ते सांगायला फोन केला.
अरे काय झालं ते नीट सांग ना... मी करवादलो.
काय लफडा करून ठेवला आहेस पानावर? त्याने प्रश्न घातला.
काय झाले ते सरळ सांग ना भडव्या... मी त्याला शिवी घातली.
वाघ्रप्रकल्पाच्या लेखात वाघवाघिणीच्या मैथुनाचा फोटो का टाकला आहेस?
काय? मी आश्चर्याने उद्गारलो. तो काहीच बोलला नाही.
सालपेकरने वाट लावली माझी यार... मी म्हणालो.
तो त्यावरही काही बोलला नाही. मग मीच म्हणालो, खरं सांगतो आहेस ना?
सरांनी दाखवलं मला... आल्याआल्या ते म्हणाले... तोच वाघ तुझ्यावर चढवतो.
म्हणाले, मालकाचा सकाळी सहाला फोन आला होता त्यांना...
मी त्यावर काहीच बोललो नाही. मग तोच म्हणाला, पण पुन्हा पाच मिनिटांनी सर मला म्हणाले, कळवा त्याला आणि टेन्शन घेऊ नको म्हणावं. आल्यावर बघू.
खर?
खरं!
होय... पण  लक्षात ठेव चूक गंभीर आहे.
निघतो मी ताबडतोब, मी म्हणालो
बाय म्हणत त्याने फोन ठेवला.
मानेचा फोन ठेवला आणि मी वाघ मागे लागल्यासारखा तयारीला लागलो.
मी ऑफिसात पोहोचलो तेव्हा माने कामासाठी बाहेर गेला होता. सरळ सरांच्या केबिनमध्ये शिरलो. सॉरी म्हणालो आणि सगळं खरं खरं सांगितलं, मैत्रिणीला भेटायला गेलो. उठल्यावर सरांनी तिचं नाव विचारलं. मी तेही आडपडदा न ठेवता सांगून टाकलं. थोडे वैतागले, पण मग म्हणाले, आता तू विषय सोड उद्याच्या कामाला लाग.
थँक्यू सर, म्हणून मी निघालो तर मागून सरांचा आवाज आलास, आणि हो त्या सालपेकरला शिव्या घालू नकोस.
नाही सर, मी म्हणालो.
मी सरांच्या केबिनमधून बाहेर पडलो आणि डीटीपी विभागात गेलो. सालपेकर तोंड पाडून माझ्याजवळ आला. म्हणाला, माफ करा सर, माझ्या लक्षातच आलं नाही. काल खूप काम होतं. चारच्या बातम्या बदलायचे होत्या. घाईत लक्षातच आलं नाही. मी पानावर घेतला तेव्हा तो फोटो छोटा होता. त्यामुळे असं काही असेल हे लक्षातच आलं नाही. मी घरी गेल्यावर उशिरा त्या आर्टिकलच्या बाजूची बातमी काढण्याचा आदेश आला, म्हणून नावकरने जागा भरायला फोटो वाढवला आणि मग एकदम की गोष्ट लक्षात यायला लागली.
केविलवाण्या स्वरात तो बोलू लागलेला पाहून मी त्याच्या दंडावर थोपटत म्हटलं, सोड... झालं ते झालं. आता मिटलं. मीच तुझ्यावर सोपवून जायला नको होतं.
दिवसभर कामात ती गोष्ट पुन्हा आठवली नाही, पण संध्याकाळी सर स्वतःहून आमच्या विभागात आले. म्हणाले, मालकाकडून मेल आला होता आणि त्यात स्पष्ट लिहिलं होतं ज्याने हा फोटो पानावर लावला त्याला आजपासून कामावर कमी करा. कोणाला कमी केलं ते आज रात्री ऑफिस सोडण्यापूर्वी मला कळवा. कळवायला हवं.
पुढे मला म्हणाले, खरे तर तुलाच कामावरून काढून टाकायला हवा. पण मला वाटतं आपण सालपेकरला कमी करू. मी निराशेतही उसळून विचारलं, का?
कारण सालपेकरला मी उद्या दुसऱ्या ठिकाणी नोकरीला शकतो. पगार तेवढाच मिळू शकेल त्याला. पण तुला काढून टाकलं तर तुझ्यासाठी जॉब नाही माझ्याकडे. मी त्यावर गप्प राहिलो. काय बोलणार...
सालपेकर आणि मला केबिनमध्ये बोलावलं. त्याला व्यवस्थित सांगितलं. आमच्यासमोरच फोन करून  सालपेकरला कामावर घेण्याची विनंती केली. इथल्याएवढा पगार द्यावा म्हणून प्रयत्नशील होते. पण समोरच्या माणसाने सहकारी नाराज होतील, महिन्याभरानंतर वाढवतो, असं सांगितलं. माझ्यावर विश्वास ठेव मी आणखी चांगला जॉब शोधून देईन तुला, सर सालपेकरला म्हणाले.
तो थँक्यू म्हणाला. मी दोघांप्रति कृतज्ञ होतो. पण थँक्यू म्हणून मोकळा होऊ इच्छित नव्हतो.
सकाळी लवकर उठलो होतो. दिवसभर काम करून थकलो होतो. म्हणून चहा प्यायला खाली उतरलो.
हे सर्व तिला सांगाव म्हणून फोन केला तर ती वेडी स्वतः रडत होती. मला नेहमीप्रमाणे माझं गाणं बाजूला ठेवून तिचं ऐकावं लागलं. काय झालं, हा प्रश्न पाच-सहा वेळा विचारल्यावर म्हणाली, मायाला परत घेणार होते कामावर. सकाळी मी सरांना तिच्या परिस्थितीबद्दल सांगितलं. सर तयार झाले. उद्या बोलु म्हणाले. मी उत्साहाने मायाला कळवलंही. आणि आता पाच मिनिटांपूर्वी सरांनी मला निरोप पाठवला, मायाला घेऊ शकणार नाही आपण. म्हणून मी रागातच त्यांना भेटायला गेले तर म्हणाले, वरून आदेश आलाय मला, कोणीतरी सालपेकर नावाचा इसम तिच्या जागेवर जॉईन होतोय उद्यापासून...
मी सारं समजलो. पण तिला काहीच बोललो नाही. चहा प्यायलो आणि ऑफिसला परतलो.
मनात अपराधाची भावना भरून राहिली.
वैजंयतीच्या फोनमुळे मी सालपेपरवर काम सोपवलं होतं. त्याची अप्रत्यक्षरीत्या तिला सजा भोगावी लागली. एक वेगळाच न्याय घडला होता. पण तरीही माझं मन मला खात होतं.
-
वैभव बळीराम चाळके
फेब्रुवारी 2013


Friday, May 15, 2020

माझे छंद माझे जीवन


माझे छंद माझे जीवन

अगदी लहानपणी मला टाकाऊ वस्तू जमवून ठेवून त्यांच्यापासून काही बनवण्याचा छंद होता. आईकडे बघून मी शालेय वयातच चपला शिवणे, छत्री दुरुस्त करणे इथपासून ते थेट कोंबडी कापून साफ करण्यापर्यंत अनेक गोष्टी शिकलो होतो. आजोबांकडून निरगुडीच्या काड्यापासून शेणाची पाटी आणि अंबाडीच्या सालीपासून दोर बनवायला मी शिकत असे. त्या सगळ्या गोष्टी करताना उपयोगी येणारे सामान आणि हत्यारे माझ्या एका झोलीत ठेवलेली असत. माळ्यावर चढायच्या शिडीखाली एका खुंटीला माझी झोळी टांगलेली असे. तिच्यात माझी खेळणी असत तशाच अशा कित्येक चित्रविचित्र गोष्टीसुद्धा असायच्या. घोंगडी सुखवायच्या पिरशात छत्रीची लोखंडी काडी गरम करून हातोडी आणि पकड यांच्या साह्याने घोंगडीला लावायचा म्हणजे पिन तयार करीत असे. त्याला मोठी कलात्मक गाठ घालण्यासाठी केवढा मोठा खटाटोप करायचो. अनेकदा हाताला चटका बसत असे. पण त्याचे कधी वाईट वाटले नाही. लोखंडी गाडी चालवायचो. त्या गाडीला तार लागे तीसुद्धा मी ठोकून ठोकून बनवत असे. आमच्या घरात बादलीच्या लोखंडापासून बनवलेली एक गाडी होतीच. पण आणखी एक गाडी होती. पण तिची दोन टोके एकमेकापासून दूर होती. त्यामुळे ती गाडी चालवता येत नसे. म्हणून मी कितीतरी दिवस... आठवण होईल तेव्हा तेव्हा... वेळ मिळेल तेव्हा तेव्हा... ती गाडी ठोकत असे. कोवळ्या हातांची फार वाट लागेपर्यंत.  पण त्यातून कदाचित सतत एकसारख्या गोष्टीचा ध्यास घेऊन संयमाने प्रयत्न करण्याचा गुण अंगी बाणवला. तेव्हा मला शास्त्रज्ञ व्हायची इच्छा होती आणि असे नाना उद्योग करताना मी त्याच भूमिकेत असे. कसल्या कसल्या झाडांपासून खेळणी बनवणे हा आमचा मोठा छंद होता. पावसाळ्यातील एक विशिष्ट झाड उगवत असे. त्यापासून आम्ही नांगर जोखड बनवायचो  आणि नांगर नांगर खेळायचो. झाडांच्या फांद्या व दोरा यांनी बनवलेले नांगर जोखड तर मला आजच बनवले असल्यासारखे आठवतात. उन्हाळी दिवसात जमीन खोदून कालवे काढण्याचा छंद होता. तसा त्या काळी बेचकी बनवण्याचा म्हणजे खेळण्यातली बांबूपासून बनवायची बंदूक बनविण्याचा छंद होता. आता आठवले म्हणजे आश्चर्य वाटावे इतक्या गोष्टी आम्ही मुले त्याकाळी करीत असू.

पुढे शाळेत चित्रकलेचा छंद लागला. कागदावर चित्रे काढलीच. पण वर्षातून एक-दोनदा घराच्या भिंती आई सारवीत असे. त्या दिवसाच्या आदल्या दिवशी भिंतीवर कोळसा आणि खडू यांची चित्रे काढण्याची हौस भागविता असे. गणपतीत आई घराच्या भिंती खालून तीन फुटापर्यंत सेल बॅटरीतील दारू घालून त्याने सारवत असे. मग त्यावर चुन्याने आदिवासींची वारली चित्रकला आहे ना त्या शैलीतील चित्रे काढत असे.  पुढे मीही ती कला थोडी अवगत केली होती. 

बांबूची बासरी बनवणे हाही असाच एक चांगला छंद होता. पोकळ बांबू आणून त्यात करवंदीच्या झाडाचे खोड बसायचो. करवंदाचे झाड तोडताना किती काटे लागले त्याचा पत्ता नाही आणि आमच्या बासरीतून सुरेल स्वरांना कधी पत्ता गवसला नाही. 
करवंदीच्या पानावर करवंदीच्या काट्याने नाव लिहून त्यावर आम्ही धुळ अंथरायचो. मग पान झाडले म्हणजे एवढी सुंदर अक्षरे दिसतात! करवंदीच्या पानाची पिपाणीसुद्धा आम्ही वाटेल तेव्हा बनवत असायचो आणि वाजवायचो. 

होळीच्या दिवसात दहा दिवस रानातून शेवरीची झाडे तोडून आणून होळी उभारायचो. 
बाराव्या दिवसापासून शेवरीच्या लाकडापासून शिमग्याच्या नाचासाठी वल्हवे आणि क्रिकेट खेळायला बॅट तयार करण्याचा उद्योग करायचो. बांबूच्या काठीवर कोणती कोणती डिझायर करत राहणे हा एक छंद होता. तांबेटी  या गवतापासून लोक टोप्या बनवत ते मात्र मला अनेकदा प्रयत्न करूनही जमले नाही. 

लपाछपी, चोर-पोलिस, लंगडी, विटीदांडू, लगोरी, कबड्डी, गोट्या,  आबादुबी, क्रिकेट खेळ खेळायचो. गणपतीगौरीत बाल्याडान्स करायचो. गावात भारुड करत त्यातही अनेकदा काम केले. उन्हाळी सुट्टीत गोठ्यात नमन नाट्याचा खेळ उभा करायचो. त्यासाठी पुठ्ठ्याची बाशिंगे बनवायचो. साडीच्या धारेचा  चाबूक बनवायचो. टॉवेल अंगरखा म्हणून वापरायचो. साडीच्या धारीचा कापडी बोल आम्ही आबादुबी आणि लगोरी खेळण्यासाठी वापरायचो. त्यासाठी अशा धाऱ्या मिळवून त्यांची बोल बनवायचो  खेळ म्हणजे हे असले. असले भलतेसलते.
पण त्यामुळेच आमच्या बालपणाला कंटाळा नावाचा राक्षस कधी शिवला नाही. आज जेव्हा माझा मुलगा टीव्ही... लॅपटॉप... आणि मोबाईलवर खेळून झाल्यावर, पप्पा काय करू सांग ना? कंटाळा आलाय! म्हणतो तेव्हा मला माझ्या समृद्ध बालपणाचे केवढे कौतुक वाटते.  तेव्हा पायात चप्पल नसायची आणि कपडे फाटलेले असायचे, पण अवघा परिसर आपल्याला अंगाखांद्यावर घेऊन खेळवायचा. कवी अरुण म्हात्रे यांचा एक शेर मला तिथे आठवतो आहे...
फाटका होतात खिसा अन् नोटही नव्हती खरी
पण नभीच्या चांदण्यावर मालकी वाटायची... 

आठवी-नववीच्या वयात मला कवितेचा छंद लागला. मग पाठ्यपुस्तकातल्या कविता माझ्या भसाड्या आवाजात मी मोठमोठ्याने गात असे. तोंडाला जरासा... बोंबलाचा दोर... किती छान लागे... सुकटा सार... हा मी चक्क स्वानुभवावर लिहिलेला अभंग गात असताना आजीने, फालतू अभंग लिहू नको अशी तंबी दिल्याचे आठवते. त्याच वयात मी मला आवडणार्‍या मुलीच्या नावाने माझा कवितासंग्रह बनवला होता. तो आजही माझ्या संग्रही आहे. आमच्या एस एस सी केंद्रात मी पहिला आलो आणि मला पुढील शिक्षणासाठी मुंबईत जाण्याची परवानगी मिळावी. मुंबईत येणे हे माझ्यासाठी विश्वरूप दर्शन होते.

मुंबईला आल्यावर रुईयासारख्या प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश मिळाला. माझ्या जीवनाला अपेक्षित दिशा आणि वेग प्राप्त झाला. तेथे मी सर्वप्रथम काय केलं असेल तर वाचनाची भूक भागवायला सुरुवात केली. आचार्य अत्रे, वि. स. खांडेकर यांचे साहित्य प्रथम वाचनात आले. त्याचा पहिला परिणाम म्हणजे भाषेवर संस्कार झाला. मला आठवते मुलांना अत्रे यांचे किस्से सांगणे याचा तेव्हा मला छंद होता. माझे सीनियर मित्र तर मला अनेकदा केवळ विनोदा आणि कविता सांगण्यासाठी लेक्चर बंक करून घेऊन जात असत. पुढे कवितेला खतपाणी मिळत गेलं.  कविता ऐकवून मुलींच्या डोळ्यात हमखास पाणी काढण्याचा मला तेव्हा मोठा छंद  लागला होता. परवा पंधरा-सोळा वर्षानंतर एक मैत्रीण भेटली तिने त्या तशा कवितेची आठवण करून दिली. महाविद्यालयाच्या पाच वर्षात काय काय गोष्टी केल्या... तर कविता केल्या. त्यांची संग्रह बनवले. हस्तलिखितासाठी काम केले. कविता आणि निबंध लेखनात बक्षिसे मिळवली. स्वतः एक पाणी अनियतकालिक काढले. पार्टटाईम नोकरी केली. कॉलेज करता करता कॅलिग्राफी शिकू लागलो. ग्रीटिंग बनवली. त्यासाठी छान छान संदेश लिहिले. कोणाकोणाला वाढदिवसाला भेट दिले. कोणाकोणाच्या वाढदिवसासाठी दुसऱ्याला असे संदेश लिहून दिले. मिळेल तेव्हा आणि पैसे असतील तर नाटके पाहिली. काव्यमैफली ऐकायला 

मुंबईच्या गल्लीबोळात भटकलो. पायपीट केली. कवितांचा कार्यक्रम केला. तो कॉलेजात सादर केला. साठाये महाविद्यालयात जाऊन सादर केला. विद्यापीठ गेलो असता तिथे मराठीचा चळवळीत सक्रिय भाग घेतला. आझाद मैदानावर उपोषण, चौकसभा केल्या. त्या चळवळीसाठी गाणी लिहून ती आझाद मैदानावर सादर केली. याच काळात मराठी शुद्धलेखन शिकलो. कवितेच्या छंदशास्त्राचा अभ्यास केला. गझलेची बाराखडी आत्मसात केली. सामाजिक संस्थेत काम करताना समाजातील उपेक्षित घटकांसाठी आणि घटकांसोबत काम केले. त्यासाठी मुलुंडच्या कोठीवर आणि भांडुपच्या सोलापूर परिसरात जाऊन जनजागृतीचे काम केले. त्यासाठी गाणी लिहून ती सादर केली.

मग पत्रकारितेत आलो. लोकसत्ता, तरुण भारत, आकाशवाणी करीत दैनिक नवाकाळ मध्ये पोहोचलो. तेथे हे काम करीत असताना नानाविध छंद जोपासत आहेच.
अल्बमसाठी साईबाबांवर, पावसावर गाणी लिहिली. त्याचे दोन अल्बम आले. सह्याद्री वरील एका मालिकेसाठी शीर्षक गीत लिहिलेले. रेडिओ सुरभीसाठी जिंगल लिहिली. दोन-तीन सिनेमांसाठी गाणी लिहिली. त्यातला तृषार्त नावाचा सिनेमा रिलीज झाला. दूरदर्शन, ईटीव्ही मराठी या वाहिन्यांवरून कविता सादर केल्या. आकाशवाणीसाठी कवितांचा कार्यक्रम केला. चिंतन सदरात काही लेख वाचले. कागदाची करामत नावाचा मुलांसाठीचा कार्यक्रम तयार करून त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग केले. मुंबई-पुणे-चिपळूण- कोल्हापूर अशा विविध ठिकाणच्या हजारो मुलांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचविला. 

शुद्धलेखनाच्या दिशेनेही कार्यशाळा घेऊन हजारो मराठी लोकांना शुद्धलेखनाचे कानमंत्र दिले. रुईया महाविद्यालयाच्या पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पत्रकारितेतील विविध विषय शिकविले. गणपतीची बाजारपेठ दादर आणि लालबागला विद्यार्थ्यांना वर्षानुवर्षे दाखविली. फक्त रुईया महाविद्यालयाच्या नव्हे तर साठ्ये महाविद्यालयाच्या पत्रकारिता पदवीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा हा प्रत्यक्ष रस्त्यावरचा शिकण्याचा अनुभव दिला. लहान मुलांना घेऊन फोटोग्राफीचे ते शिबिर केले. सायनच्या साधना विद्यालयातील विद्यार्थ्यांना गोष्ट कशी लिहावी याचे प्रशिक्षण दिले. प्रथम या नामवंत संस्थेच्या शिक्षकांना मुलांना भाषा कशी शिकवावी याचे प्रशिक्षण दिले. 

झी24तास या आघाडीच्या वाहिनीच्या सर्व पत्रकारांना शुद्धलेखनाचे धडे दिले. शासनाच्या एका समितीवर घेतले तेव्हा पत्रकारांची भाषा कशी सुधारावी यासाठी काही सूचना केल्या. अनेक महाविद्यालयात भाषा आणि करियर या विषयावर व्याख्याने दिली. मुलांच्या कविता स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून काम केले. हाताने विविध गोष्टी बनवून त्याचे छंदोत्सव या ग्रुपसोबत विविध ठिकाणी प्रदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. सोमय्या महाविद्यालयात देशभरातील हस्त कलाकारांसाठी भरणाऱ्या कला मेळाव्यामध्ये अशा हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन केले. कवितांची पोस्टर डिझाईन करून त्याचे प्रदर्शन केले. अनेक मित्रांना विजिटिंग कार्ड डिझाईन करून दिली. वर्तमानपत्राची शेकडो पाने डिझाईन केली. कॅलिग्राफर ग्रुपच्या फेसबुक पेज वरून कॅलीग्राफर लोकांना शुद्धलेखनाचे मार्गदर्शन केले. काही हजार कविता, काही हजार लेख, काही कथा लिहिल्या. 

कबीरांच्या दोहे यांचा अनुवाद केला. मिराबाईची काही पदे, सूरदासाची काही पदे अनुवादित केली. अनेक चांगले मित्र मिळवले. पुस्तकांचा संग्रह केला.
अवघे जीवनच छंदांनी समृद्ध करून घेतले.

- वैभव बळीराम चाळके
मे 2020
9702 723 752


Saturday, May 9, 2020

जगावेगळा चित्रकार



जगावेगळा चित्रकार
महात्मा गांधी विद्यालयाचे
आमचे डी.एस. सुतार सर

खूप वर्षानंतर शाळेबाहेरच्या रस्त्यावरून रिक्षाने जात होतो. रिक्षावाला मित्र होता. त्याला म्हटले एक- दोन मिनिटे थांब. शाळेत जाऊन येतो. त्याने गाडी थांबवली. शाळेचा गेट बंद होता. मग कंपाउंडवरून उडी मारून मी आत गेलो. डोळा भरून शाळा पाहून घेतली. मग माझे लक्ष पटकन शाळेच्या भिंतीवर काढलेल्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पोस्टवर गेले. माझी महात्मा गांधी विद्यालय साखरपा ही कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेची शाळा. इथे मी 90 ते 96  या वर्षांत शिकत होतो. शाळेच्या एका भिंतीवर कर्मवीर भाऊराव पाटलांचे पोट्रेट काढलेले आहे. त्यावर त्याची तारीख आहे आणि पोट्रेट काढणाऱ्या चित्रकार सरांची सहीसुद्धा...

1990 च्या जून महिन्यात मी इयत्ता पाचवीला प्रवेश घेतला. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर असलेली शाळा. दहा अकरा वर्षांचा मी माझ्या घरापासून साधारण पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या या शाळेत माझ्या शेजारपाजारच्या मुलांसोबत जाऊ लागलो.  सकाळी नऊ - सव्वा नऊ वाजता घर सोडायचे. साडेदहाला शाळेत पोहोचायचे. संध्याकाळी मात्र पावणेपाचला शाळा सुटली ती धूम ठोकत आम्ही एका तासात पावणे सहाला घरी पोहोचत असू. खरेतर शाळेत जाताना आम्हाला डोंगर उतरत जावे लागत असे आणि येताना डोंगर चढावे लागत असे. मात्र घरी जाण्याची ओढ आणि पोटातली भूक पायांना बळ देत असे. सकाळी नऊच्या आधी नाश्ता करून निघालेले आम्ही सगळे जण संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काहीही खात नसायचो. ही पद्धत होती. शाळेत डबा न आणणे ही फॅशन वाटत असे. गावातली शाळेच्या जवळ असलेल्या छोट्या शहरात राहणारी श्रीमंत घरची काही मोजकी मुले विशेषता मुलीच डबा आणत. त्यामुळे शाळेत डबा घेऊन येणे हे बायकीपणाचे लक्षण मानले जात असे. वाढत्या वयात खरेतर आमचे मोठे कुपोषण झाले, पण याची आम्हाला जाणीव नव्हती. आमच्या पालकांना,  आमच्या शिक्षकांना ही जगण्याची रीतच होती, त्यात काही वावगे आहे असे कुणाला वाटत नव्हते. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता आम्ही पाच किलोमीटरचा प्रवास करून शाळेत येत होतो. महामार्गावरचा दोन-अडीच किलोमीटरचा प्रवास बिनधास्तपणे करत होतो. गाड्या आतासारख्या मोठ्या प्रमाणावर नव्हत्या? तरी गाड्या होत्यात आणि वेगात येत असत. पण सह्याद्रीच्या डोंगररांगात जन्माला आलेल्या आम्हा लेकरांना अशा जगण्याची सवय झालेली होती. त्यामुळे त्याचे काही वाटत नव्हते. ना नवल होते न कौतुक होते.

मी प्राथमिक शाळेत जरा बरा विद्यार्थी होतो. या मोठ्या इंग्लिश शाळेमध्ये आल्यावर तेथेही आपणच समजदार आहोत आपल्यापुढे दोन-चार मुलेच आहेत याचीही लवकरच जाणीव झाली आणि आत्मविश्वास वाढला.
याच काळात मला चित्रकलेची आवड निर्माण झालेली होती. डी.एस. सुतार नावाचे एक पन्नाशीचे शिक्षक आम्हाला चित्रकला शिकवत असत. माणूस फारच गोड होता. सर्वांना प्रेमाने वागवणारा होता. त्यामुळे अर्थातच चित्रकलेविषयी अधिक प्रेम वाटू लागले. मला वाटते पावसाळ्याचे दिवस संपत आले तेव्हा आमच्या शाळेच्या दोन्ही बाजूकडील भिंतीवर आमच्या सुतार सरांनी नकाशे आणि चित्रे काढायला सुरुवात केली. एका भिंतीवर त्यांनी आमच्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे चित्र काढायला घेतले. त्याला पोट्रेट म्हणतात हे कळायला मध्ये वीस वर्षे जावी लागली. तर कर्मवीरांचे चित्र काढताना त्यांच्या जोडीला आमचे पवार मामा नावाची शिपाई असत. सर शिडीवर चढून चित्र काढीत. पवार मामा त्यांना मदत करीत. सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वी, मधल्या सुट्टीत, लघवीच्या सुट्टीत आणि दोन तासांच्या मधल्या वेळेत, मी सर चित्र कसे काढतात ते जाऊन पाहत असे. मला अजून आठवते शाळेत शेजारच्या होस्टेलच्या चुलीमधून सरांनी कोळसे आणले होते आणि त्या कोळशाने रेखाटन करून घेतले होते. मग त्याच्यावर रंगलेपन केले होते. हे काम पाहणे हा माझ्यासाठी मोठा आनंदाचा भाग होता. आपणही मोठे होऊन चित्रकार होणार अशी मनाशी मी खूणगाठ बांधली होती,पण...
हा पण नेहमीच वाईट असतो. पहिले सत्र संपण्याच्या आसपास सुतार सर यांचे आकस्मिक निधन झाले आणि त्याने चित्रकार मनावर आघात केला. चित्रकार व्हायचे स्वप्न भंगले.

पुढे सहावीत गेल्यावर मोरे नावाचे एक शिक्षक भेटले. ते आम्हाला मराठी शिकवायचे. मराठी शिकवण्याच्या पद्धतीमुळे भाषेची रुची लागली आणि चित्रकलेकडून मी भाषेकडे सरकलो. अर्थात तरीही मनात चित्रकला जिवंत होती. मी माझ्या परीने वाढवण्याचा प्रयत्न करीत होतो.

पुढे मुंबईत शिक्षणासाठी आल्यावर  पुस्तकांच्या प्रेमामुळे मुखपृष्ठ आणि मुखपृष्ठासह पुस्तकांसाठी चित्र काढणार्‍या चित्रकारानी मला चित्रकलेकडे ओढले. सुलेखनाकडे ओढले. पुढे पत्रकारितेत आल्यामुळे काही प्रदर्शनास जाण्याचा योग आला आणि म्हणताम्हणता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार, सुलेखनकार यांच्या ओळखी झाल्या. दरम्यान एकदा घर सोडून बाहेर पडावे लागले तेव्हा दोन चित्रकार बंधूंनी आधार दिला. सहा महिने त्यांच्यासोबत राहताना चित्रकलेत बुडूनच राहिलो होतो.

चित्रकलेची ही अशी वाटचाल करीत असताना त्या दिवशी शाळेबाहेर रिक्षा थांबवून मी शाळेच्या कंपाऊंडच्या आत गेलो.  सुतार सरांनी काढलेले ते पोट्रेट पाहत असताना सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

त्या पोट्रेटच्या खाली सुतार सरांनी केलेली स्वतःची डी.एस. सुतार ही सही आणि त्याच्याखालची 22- 9- 1990 ही तारीख वाचलीच! पण त्याखाली मदतनीस म्हणून वसंत पवार यांचे लिहिलेले नाव पाहून मला सुतार सरांबद्दल आणखीनच आदर वाटू लागला. सर तेव्हा जायला नको होते असे पुन्हा एकदा वाटून गेले. जगभरातल्या नामवंत चित्रकारांनी त्यांच्या चित्राखाली आपली सही आवर्जून केली आहे. ती कलावंताची नाममुद्रा असते. पण चित्राखाली आपली सही करताना आपल्याला मदत करणाऱ्या शिपायाचे नाव देण्याचे औदार्य असलेला मला माहीत असलेला हा एकमेव चित्रकार होय.
सुतार सर, तुम्ही माझ्या मनात आहात आणि मनात कायम राहाल. 

- वैभव बळीराम चाळके
   मे 2020
   संपर्क- 9702 723 652
   Kokanvaibhav.blogspot.com 

Wednesday, April 8, 2020

मराठी गझलक्षेत्रात बेसुमारांची सद्दी...

मराठी गझलक्षेत्रात बेसुमारांची सद्दी...

नव्वदच्या दशकात मी कॉलेजात प्रवेश केला तेव्हा चारोळ्यांचे युग सुरू होते. चंद्रशेखर गोखले यांचा मी माझा हा चारोळी संग्रह प्रचंड लोकप्रिय झाल्यामुळे कविता लिहू पाहणारा प्रत्येक जण चारोळी लिहून पाहत होता.  म्हणूनच कदाचित कविता लिहिणार्‍या मला माझे मित्र तू चारोळी संग्रह का काढत नाहीस, अशी विचारणा करीत असत.

मला आठवतं मी अशा मित्राला म्हणत असे, तुला पैसे वरती आले असतील तर सांग. सध्या बाजारात ज्या लायकीचे चारोळी संग्रह येत आहेत, त्या लायकीचा चारोळीसंग्रह एका रात्रीत लिहून देईन.

पुढे चारोळीसंग्रहाचा मोसम कमी कमी होत संपून गेला. पण मला आठवते, या चारोळ्यांनी चंद्रशेखर गोखलेना जी अमाप प्रसिद्धी दिली त्या प्रसिद्धीच्या मागे मराठीतले मोठमोठे कवी लाल गालत धावले होते. एका मोठ्या कवयित्रीने लिहिलेला चारोळीसंग्रह हाती आला तेव्हा त्यावरचा अभिप्राय मी पुढीलप्रमाणे दिला होता...
चारोळी लिहून तिने
प्रसिद्धी मिळवली
प्रसिद्धी मिळवली
आणि प्रतिष्ठा गमावली...

हे सगळं आज आठवायचं कारण म्हणजे बरोबर पंधरा-वीस वर्षांनी आज गझलसंग्रहाचे तसेच पीक आले आहे.

आज एका जेष्ठ गझलकाराशी बोलत असताना मी या पिकाला काँग्रेसच्या गवतासारखे अशी उपमा दिली आणि माझी मलाच गंमत वाटली. काँग्रेसचे गवत किती अमाप उगवते आणि किती निरुपयोगी असते हे आपणा सगळ्यांना माहीत असेलच. आज त्या काँग्रेसवरसुद्धा श्लेष निर्माण झाला आहे. आज मराठीमध्ये गझललेखन करणारे शेकड्याच्या संख्येत आहेत. कोणे एके काळी पुण्याच्या या एका लेखकाने मराठी साहित्यावर सुमाराची सद्दी असा एक लेख लिहिला होता. आजच्या गझललेखनाकडे पाहिले म्हणजे बेसुमाराची सद्दी असा लेख लिहावा वाटेल.

मी गजलचा अभ्यासक नाही. अलीकडच्या गझललेखनाचे माझे दांडगे वाचन नाही. तरीही  गेल्या या आठ-नऊशे वर्षांच्या मराठी कवितेचा रसिक म्हणून मी मराठीतील अनेक गझलकाराच्या गजला वाचत आलेलो आहे. अनेक गझलसंग्रहही वाचले आहेत. म्हणूनच कदाचित हे असे विधान करण्यापर्यंत मी येऊन ठेपलो आहे. मराठी गझलच्या क्षेत्रात अनेक लोक आले ही वाईट गोष्ट नाही. मात्र गझलचे तंत्र अवगत करताना त्यात आशय दोनच ओळी संपवायचा असतो, हीच गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली गेली. किंवा या सवलतीचा फायदा घेतलेला दिसतो. एका बाजूला गझलबद्दल असलेली समाजाची आवड... तिला मिळणारी प्रतिष्ठा... याचा मोह अनेकांना पडला आणि दुसऱ्या बाजूला छंदोबद्ध कविता लेखनाचा आवाका नसलेले लोक मग गजलेच्या दोनच ओळीच्या आशयाच्या झेपेकडे आकृष्ट झाले. त्यांनी सुमार शेराचे बेसुमार पीक काढले.

हे असे पीक आले याचे दुःख नाही. दुःख या गोष्टीचे आहे की जेव्हा असे काँग्रेस गवत बेसुमार वाढू लागते, तेव्हा परिसरातील दूर्वा दिसेनाशा होतात. समाज जिवंत ठेवायचा असेल... रसरशीत ठेवायचा असेल.... तर त्याला दूर्वांची नितांत गरज असते. त्या फार नको असतात. एकवीस दुर्वांची जुडी पुरत असते. मात्र काँग्रेस गवताच्या अमाप पिकात 21 दुर्वा हरवून जातात. त्या हरवून जाण्याचे दुःखच रसिकमनाला अहोरात्र टोचते आहे...

- वैभव बळीराम चाळके
9702723652