Wednesday, October 19, 2022

कबीर

परबत परबत मै फिरया, नैन गवाए रोई

सो बूटी पौ नहीं, जताई जीवनी होई


थकलो शोधून पर्वतरांगा, सर्व दिशांच्या दाही

जीवनदायी जडीबुटी पण, कुठे गावली नाही

कबीर

 जग में बैरी कोई नहीं… , जो मन शीतल होय |

यह आपा तो डाल दे… , दया करे सब कोए ||


मनात ज्याच्या शांती, त्याला जगात दुश्मन नाही

अहंकार टाकता, बोलवी जो तो आपुल्या गेही

कबीर

 ऊँचे पानी ना टिके, नीचे ही ठहराय

नीचा हो सो भारी पी, ऊँचा प्यासा जाय|


उंचावरती ठरे न पाणी, सखळ तिथे ते राही

जमिनीला लाभते पोटभर, नभात साचत नाही

Tuesday, September 20, 2022

 पत्ता बोला वृक्ष से… , सुनो वृक्ष बनराय |

अब के बिछड़े न मिले… , दूर पड़ेंगे जाय ||


पान बोलले झाडाला बा, ऐक सांगते तूज

दूर चालले सोडून आता पुन्हा न कधि हितगूज

 तीर तुपक से जो लड़ै, सो तो शूर न होय ।

माया तजि भक्ति करे, सूर कहावै सोय ।।


धनुष्य तलवारीने लढतो, त्यास न म्हणती शूर

माया त्यागुन भक्त जाहला तोच खरा नरवीर

Sunday, September 4, 2022

आकाश कवेत घेणाऱ्या कविता

 आकाश कवेत घेणार्‍या कविता...


उत्तम निर्मिती मूल्य आणि तितक्याच उत्तम कविता असलेला ‘थुई थुई आभाळ’ हा कवितासंग्रह हाती आला आहे. मुलांना साहित्य-संस्कृतीची जाण यावी, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी गेली अनेक वर्षे सातत्याने अत्यंत उत्साहाने काम करणाऱ्या शिक्षक गोविंद पाटील यांचा हा संग्रह अत्यंत देखणा आणि साहित्य मूल्यांनी परिपूर्ण असा आहे. ज्येष्ठ चित्रकार पुंडलिक वझे यांच्या चित्रकारीने या संग्रहातले भावविश्व अप्रतिम साकारले आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्याचे आकाश कवेत घेणारा हा संग्रह आहे.

डॉ. राजन गवस यांनी या संग्रहाची पाठराखण करताना म्हटले आहे, ‘गोविंद पाटील हे मराठीतील प्रतिभावान कवी आहेत. त्यांच्या बालकवितांना रानशिवाराचा गंध आहे...’

‘कामकरी मुंग्या’ या कवितेत शेवटच्या दोन ओळी अशा आहेत

़़‘अपघाताचा वारा नाही

आळसाला थारा नाही’

कवी यात फक्त वर्णन करीत नाही, तर मुलांना नकळत एक संस्कारही देऊन जातो.

‘टोळ’ कवितेमध्ये शेवटच्या दोन ओळी अशा आहेत,

‘सोलापुरात असे टोळ उडत उडत आले

खिशातला माल विकून गब्बरसिंग झाले’

यात केवळ गंमत नाही, सावधानतेचा इशारा आहे.

‘मासोळी’ कवितेमध्ये सुरुवातीलाच केलेले वर्णन बहारदार आहे,

‘पाण्यातली मासोळी पोहण्यात दंग

पाण्यावर आली की चकाकते अंग’

‘ढगांची चित्रकारी’मध्ये,

‘काळे पांढरे ढग मिळून झाले गोळा

आभाळाच्या फळ्यावर चित्र काढली सोळा’

अशी सुरुवात आणि

‘चित्रकारी ढगांची बघत रहा भाऊ

शिकून नवीन काही मजा घेत जाऊ’ असा शेवट आहे.

‘देश म्हणजे’ या कवितेमध्ये,

‘देश हिरव्यागार डोंगररांगा

देश फुलांनी बहरलेल्या बागा

देश असतो सर्वांसाठी सुखाने राहण्याची सुरक्षित जागा

आपला देश जपू या

त्याच्यासाठी खपू या’

अशा विलक्षण अर्थ सांगणाऱ्या, पण साध्या, आवडतील अशा ओळी आहेत.

मुंग्यांवरची ‘सलाम मंग्यांनो’ अशी आणखी एक छान कविता या संग्रहात आहे. त्यातील या ओळी तर फारच सुरेख उतरल्या आहेत,

‘दिशा पाहून सगळं

विचार करून नीट

ऊन पाऊस वारा

पंचांग बिंच्यांग

आंधळ्या श्रद्धाना

नाहीच थारा...’

‘अजबपूर’ नावाच्या कवितेत कवी लिहितो,

‘अजबपूरची प्रजासुद्धा

अजबगजब प्रजा

निवडणुकीत पैसे खाऊन

निवडते नी राजा’

शिक्षक आणि पालकांनी हे थोडे विस्कटून सांगावे अशी कवितेची आणि कवीची अपेक्षा असेल.

‘कल्पनेच्या दुनियेत’ कवितेचा शेवट कवीने असा केला आहे,

‘कल्पनेच्या दुनियेत आज वाटेल खोटे

यातूनच लागतील ना शोध मोठे मोठे’

गोविंद पाटील हे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी प्रयत्न करणारे शिक्षक आहेत, असे जे मी वर म्हटले आहे, ते यातून अधोरेखित होताना दिसते.

मुलांच्या संवेदनशीलतेला आव्हान करण्याचे काम आपल्या नित्याच्या शिकवणीतून करणाऱ्या गोविंद पाटील यांनी ‘नवीन वासरू’ या कवितेमध्ये गाय व्यायल्याचे वर्णनसुद्धा इतके नेमके केले आहे की, मुलांना या सगळ्यातील सौंदर्य कळावे.

‘हळुवार आले बाहेर मुंडके आणि पाय

आजीने जोर लावून मोकळी केली गाय...’

कोरोना काळात शाळा व्यवस्थेला जो धक्का बसला त्याचीही नोंद या कवितासंग्रहातल्या ‘गाणी गाऊ’ नावाच्या कवितेत आढळते,

‘चिव चिव चिव

ऑनलाईन शाळेत रमेना जीव’

या ओळी मोठ्यांच्या जिव्हारी लागतात.

गोविंद पाटील यांच्या या संग्रहाने मोठ्या अपेक्षा निर्माण केल्या आहेत. येत्या काळात त्यांच्याकडून असेच दर्जेदार लेखन होत राहील आणि असेच काही संग्रह रसिकांच्या वाट्याला येतील, अशी अपेक्षा करू या. त्यांना शुभेच्छा देऊ या आणि त्यांच्या कामासाठी कृतज्ञही राहू या!

- वैभव बळीराम चाळके

९७०२७२३६५२

Monday, March 7, 2022

आट्यापाट्या

 



आट्यापाट्या: चांदणरातीचा खेळ

(होळी विशेष)

वातावरणात गारवा अद्याप बाकी असतो. आता तो माघारी परतण्याच्या बेतात असतो. अशा वेळी होळीचा सण येतो. देशभर हा सण होळी आणि धूलवड असे दोन दिवस साजरा केला जातो. कोकणात मात्र होळी अर्थात शिमगा हा साधारण महिनाभर चालणारा सण आहे. होलिकादहनाचा कार्यक्रमसुद्धा सलग नऊ ते दहा दिवस सुरू असतो.

फाल्गुन पंचमीला सुरू झालेला होलिकादहनाचा कार्यक्रम सलग दहा दिवस पौर्णिमेपर्यंत चालतो. या दहा दिवसांत चांदण्या रात्रीत कोकणात आट्यापाट्या हा खेळ रंगतो. आट्यापाट्या हा⁰ अस्सल देशी खेळ आहे. एका संतरचनेमध्ये 'आट्यापाट्या आणि लगोऱ्या गोट्या डाव मांडीला' असा उल्लेख आहे. आट्यापाट्याचा इतिहास किमान इतका तरी जुना आहे.

पहिल्या होळीच्या दिवशी सायंकाळी सहाच्या सुमारास शाळेतून परतलेले बालगोपाळ शेवरीचे झाड शोधायला निघतात. एक चांगले बारा पंधरा फूट उंचीचे झाड मिळाले की ते तोडून त्याचा शेंडा नीट बांधून, खोडावरचे काटे काढून, आणून होळीच्या माळावर उभे केले जाते. मग भाजावलीसाठी (शेताची मशागत) तोडलेल्या झाडांच्या फांद्यांच्या कवलाचे भारे आणून होळीभोवती रचले जातात. होळी घेऊन येताना आपटबार काढण्यासाठी प्रत्येक जण छानसे दिंडे (वनस्पती) घेऊन येतो. होळी उभी राहिली तिच्याभोवती कवल व गवत लावून झाले की घराघरातून घमेली भरून राख आणून ठेवली जाते.

रात्री जेवण आटपून सगळे जण होळी पेटवायला हजर होतात. होळी पेटवून होळीत दिंडे भाजून त्याचे बार - आवाज- काढले जातात आणि मग आट्यापाट्या आखायला सुरुवात होते. उभ्या आडव्या रेषांनी आट्यापाट्याचे मैदान तयार केले जाते. प्रत्येक आडव्या रेषेच्या दोन्ही टोकांना दगड ठेवले जातात आणि मग आट्यापाट्याचा खेळ सुरू होतो. धुंगाडी टाळी देतो आणि खेळाला सुरुवात होते. एकेका रेषेवर खेळाडू अडविला जातो. कधी धुगाडी आणि रेषेवरचा खेळाडू प्रतिस्पर्धी खेळाडूची कोंडी करतात. ही कोंडी फुटली नाही तर ती कुजली म्हणून हिणवले जाते. आता कोणत्याही पट्टीवर एक खेळाडू बाद झाला तर सगळा संघ बाद होतो आणि एक खेळाडू शेवटच्या पट्टीच्या पार जाऊन पुन्हा पहिल्या पट्टीपर्यंत न मरता परतू शकला तर तो 'पाणी पाजले रे' अशी हाक देऊन आपला विजय जाहीर करतो.

नवरात्रीमध्ये गरबा-दांडिया खेळायला पहिल्या काही दिवसात गर्दी कमी असते आणि उत्तरोत्तर वाढत जाते, तसाच प्रकार इथेही घडतो. चंद्र कलेकलेने वाढत असतो. चांदण्याचा प्रकाश आसमंतावर पसरून राहिलेला असतो. हे चांदणे जसजसे वाढते, तसतसा आट्यापाट्याचा उत्साह वाढतो. खेळाडू वाढू लागतात. मैदान वाढवले जाते. उत्साह टिपेला पोहोचतो. होळीसाठी आणायच्या शेवरीच्या झाडाची उंचीसुद्धा दर दिवशी काही फुटांनी वाढत राहते. शिमगा सण असा कलेकलेने मोठा होत राहतो.

शेवटच्या दिवशी सर्वात मोठी होळी अर्थात होम केला जातो. या दिवशी पंचवीस-तीस-चाळीस फुटांचे शेवरीचे झाड तोडून वाजत-गाजत आणले जाते. या होळीच्या आगमनासाठी गावातील अबालवृद्ध गर्दी करतात. अगोदरच्या छोट्या होळ्यांच्या तुलनेत या मोठ्या होळीभोवती अधिक मोठ्या प्रमाणावर सुके कवळ आणि गवत लावले जाते. या होमाची विधिवत पूजा करून मग त्याला अग्नी दिला जातो. या होमामध्ये घराघरातून नारळ अर्पण केले जातात. होम पेटत असतानाच हे भाजलेले नारळ काढून खाण्यात एक आगळी मौज असते.

या शेवटच्या दिवशी खेळाला सर्वाधिक रंग चढतो. मध्यरात्रीपर्यंत खेळ रंगत जातो. दहा दिवस खेळाकडे ढुंकूनही न पाहणारे वयस्कर लोकसुद्धा या दिवशी जुन्या आठवणींना उजाळा देत खेळात सामील होतात. हा खेळ पाहणे हासुद्धा एक आनंदाचा भाग असतो. आपला मुलगा, आपला भाऊ, आपला नवरा किंवा आपले वडील आट्यापाट्या खेळताहेत, हे मोठ्या कौतुकाने पाहिले जाते. मैदानाभोवती गावातल्या स्त्रियासुद्धा रात्री उशिरापर्यंत प्रेक्षकाच्या भूमिकेत खेळाडूंना प्रोत्साहित करीत राहतात.

दुसऱ्या दिवशी धुळवड केली जाते आणि शिमग्याला सुरुवात होते. सोंगे, कोळ्याचा नाच, खेळे, भारूड, नमन, पालखी असे शिमग्याचे नाना रंग मग भरू लागतात... आट्यापाट्या खेळून अंगात उत्साह संचारलेले लोक मग शिमग्याच्या सणात आनंदाची दिवाळी करतात!
- वैभव चाळके
000

Thursday, January 13, 2022

म्हणींचे गाणे

 म्हणींचे गाणे


थेंबे थेंबे तळे साचे... आहे ज्ञान हे मोलाचे

आपला तो बाळ्या... जरी करतो टवाळ्या?

अति तिथे माती... नको फुगवूस छाती

बैल गेला झोपा केला ... कसा येणार कामाला?

पळसाला पाने तीन... त्याला बदलणार कोण?

देश तसा वेश... आहे मोलाचा संदेश

प्रयत्नांती परमेश्वर... नाही दुसरे उत्तर

रात्र थोडी सोंगे फार... हेच जीवनाचे सार

नाव मोठे लक्षण खोटे... जाऊ नये अशा वाटे...

सार काढलेली वाणी... त्यांना म्हणतात म्हणी


- सुवर्णसुत वैभव बळीराम चाळके

१३ जानेवारी २०२२


Friday, November 20, 2020

आतले आणि बाहेरचे...

 आतले आणि बाहेरचे...


कवी विंदा करंदीकर अर्थात गो. वि. करंदीकर यांनी 'आतले आणि बाहेरचे' या शीर्षकाचा एक ललित निबंध लिहिला आहे. एखाद्या व्यवस्थेच्या बाहेर असलेल्या माणसांना आतले लोक त्यांच्यावर अन्याय करतात, त्यांना आत येऊ देत नाहीत, असे वाटत असते. मात्र या बाहेरच्या पैकी ज्याला आत जाता येते तो आत गेल्यावर आपली भूमिका बदलतो आणि आतला होतो. बाहेरच्यांना बाहेर ठेवण्यासाठी प्रयत्नशील होतो. अशा आशयाचा तो निबंध आहे.

माणूस व्यवस्थेच्या बाहेर असताना वेगळा आणि आत असताना वेगळा वागतो, हे या निबंधात सांगितले आहे. पाठ्यपुस्तकात हा निबंध समाविष्ट होता. त्यामुळे कोट्यवधी लोकांना तो चांगलाच माहीत आहे. आतले आणि बाहेरचे म्हटले की सर्वप्रथम करंदीकरांचा हा लघुनिबंध आठवतो. त्यांनी जे सांगितलेले आहे ते सार्वत्रिक आहे. आपल्याला तसे अनुभव येतात आणि करंदीकरांचे मोठेपण पुन्हा पुन्हा प्रत्ययाला येते.

असे असताना पुन्हा आज या निबंधाचा विषय आतले आणि बाहेरचे असाच का निवडला असेल बरे, असा प्रश्न वाचकाला पडणे अगदी स्वाभाविक आहे. करंदीकरांच्याच भाषेचा उपयोग करून सांगायचे तर अशी परंपरा पाठीशी असल्याशिवाय नवता निर्माण होत नसते.

या जुन्यात शीर्षकाला एक नवीन अर्थ प्राप्त झालेला आहे किंवा एक नवीन अर्थ उमगला आहे. म्हणूनच आज हा विषय पुन्हा एकदा निबंधाचा विषय झाला आहे.

मित्रांनो, सध्या आपण अत्यंत बिकट परिस्थितीतून जातो आहोत. आपल्याला आपल्याच जगण्याच्या व्याख्या नव्याने मांडण्याची वेळ आलेली आहे. आर्थिक आघाडीवर आपण सारेच अडचणीत आलेलो आहोत. गेल्या सहा महिन्यांत लोकांमध्ये सर्वाधिक चिंतेचा विषय ही आर्थिक घसरण हा आहे, हे आपण सारे जाणतोच. मात्र एक गोष्ट कदाचित आपल्या लक्षात आली नसेल, या काळात सुस्थिस्तीत असणारे लोक म्हणजे ज्यांना आपण सेटल आहेत असे म्हणतो ते लोक अधिक चिंताग्रस्त झाल्याचे आपण पाहिले. याउलट आठ-दहा दिवस पायपीट करत आपल्या गावाला पोहोचलेला मजूर लाख अडचणींवर मात करीत गावागावांत सुखाने नांदतो आहे,  असे चित्र तुम्हाला दिसेल. अर्थात तो अत्यंत आनंदी आहे, त्याच्या समोर समस्या नाहीत, असे नव्हे. मात्र ज्यांना आपण सुस्थितीतील लोक समजतो, त्यांच्यापेक्षा हा माणूस अधिक आनंदी आहे, असे चित्र ढोबळमानाने मांडता येईल आणि ते सर्वांना मान्य होईल.

हे असे का झाले?

मित्रांनो, आपले प्रत्येकाचे असे एक आतले विश्व असते. आपण सारे या आतल्या विश्वात आणि आपल्या बाहेरच्या विश्वात स्वतःला "ऍडजेस्ट' करत जगत असतो. या काळात आपले बाहेरचे विश्व उद्ध्वस्त झाले.  अडचणीत आले. विस्कळीत झाले. हे आपण पाहिले, मात्र या काळात ज्यांनी आपले आतले विश्व विस्कटू दिले नाही. उद्ध्वस्त होऊ दिले नाही. तेच लोक आज थोडे आनंदी, थोडे समाधान, थोडे समतोल असलेले दिसतात. या बाहेरच्या विश्वाला बघत, या बाहेरच्या विश्वाचा वेध घेत चालत आले आणि ज्यांनी आपल्या आतल्या विश्वाकडे काहीसे दुर्लक्ष केले,  किंबहुना कधीतरी हा बाहेरचा वेग, हे बाहेरचे जग कोलमडून पडू शकते, याची शक्यताच मनाला स्पर्शू न दिल्यामुळे चुकीच्या पायावर जीवन उभे केले, त्यांचे अंतरविश्वसुद्धा उन्मळून पडले. तेच अधिक चिंतेत आहेत. गोष्ट कळायला थोडी अवघड आहे.  परिस्थितीच तशी अवघड आहे. मात्र हा सूक्ष्म असा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. या काळाकडून हे शिकले पाहिजे. आपले आतले विश्व आणि बाहेरचे विश्व याकडे आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे, बाहेरच्या विश्वावर आपले नियंत्रण नाही, पण आतल्या विश्वावर आपलेच नियंत्रण आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. प्रगतीच्या काळात याकडे दुर्लक्ष होते. ते तसे अनेकांचे झाले.

मजूर, गोरगरीब, कामगार यांची बाहेरच्या विश्वातली प्रगतीच न झाल्यामुळे त्यांच्या आतल्या विश्वावर त्याचे मोठे परिणाम झाले नव्हते आणि म्हणूनच त्यांचे आतले विश्व जसे होते तसे राहिले.  त्याला फारसा धक्का लागला नाही आणि त्याचेच परिणाम त्यांना या काळात अनुभवायला आले, हे आपण समजून घ्यायला हवे.

गेल्या काही वर्षांमध्ये जगाला बाजाराने ग्रासले आहे. माणसाच्या नकळत तो या बाजाराचा आहारी गेला आहे आणि तसेच जात असताना त्याला त्याचे सुखद अनुभव मिळत गेले. मात्र या सुखाच्या पायवाटेखाली अंथरलेला गालिचा आपला नाही, याची जाणीवच तो या सुखाच्या अनुभूतीत विसरून गेला आणि त्यामुळे अशा गालिचावर अनवाणी पायांनी मजेने चालू लागला. आपल्या स्वकष्टार्जित चपलासुद्धा गरजेच्या नाहीत म्हणून फेकून दिल्या.

बाजाराने आपला गालिचा काढून घेतल्यावर आता चपलांशिवाय चालताना या बाजारशरण माणसाचे मोठे हाल सुरू झाले आहेत.

- वैभव बळीराम चाळके
9702 723 652

Tuesday, October 20, 2020

बांगड्या बघा या...

बांगड्या बघा या...


तो काळ शतकाच्या उंबरठ्यावरचा होता. मी रुईया महाविद्यालयात शिकत होतो. कांजूरला माझ्या एका मैत्रिणीकडे अधूनमधून जात असे. आई-वडिलांशिवाय मुंबईत राहत असल्यामुळे मुलुंडला राहणाऱ्या बहिणीकडे आणि कांजूरला राहणाऱ्या या मैत्रिणीकडे गेलो म्हणजे मला आपल्या घरात गेल्याचा आनंद होत असे. त्या काळातल्या वाळवंटी जीवनातील ती ओयासिस होती असे म्हटलात तरी चालेल. मैत्रिणीच्या घरी तिची आजी, आई, बाबा आणि छोटा भाऊ असे पाच जण राहत. छोटा स्वप्निल तेव्हा साधारण दहा वर्षांचा होता असेल. त्या काळात खिशात फारसे पैसे नसत. त्यामुळे मी त्या छोट्या स्वप्निलसाठी पाच रुपयांची त-हेत-हेची दहा चॉकलेट घेऊन जात असे.


मी घरात नव्या पिढीतला मोठा मुलगा होतो आणि आणि माझ्या मागे अनेक भावंडे होती. त्यामुळे मुलांप्रति मला त्या कोवळ्या वयात वयातसुद्धा प्रचंड प्रेम होते. फक्त या घरातल्या छोट्यासाठी नव्हे, तर मी ज्या ज्या मित्रांकडे आणि नातेवाईकांकडे जात असे, त्या घरातील चिमुकल्यांसाठी मी अशीच छान छान चॉकलेट घेऊन जात असे.


लहान मुलांना तुम्ही किती रुपयाचा खाऊ देता याच्याशी काहीही देणेघेणे नसते. त्यांना हवा असतो नानाविध प्रकारचा आणि भरपूर खाऊ. त्यामुळे अगदी दोन-पाच रुपयांचा विचारपूर्वक निवडलेला असा खाऊ किंवा असेच स्वस्तातले एखादे खेळणे मी घेऊन गेलो की त्यांना आभाळभर आनंद होत असे.


या मैत्रिणीच्या भावाचेही तसेच होते. मी घरी गेलो आणि तो नेमका शाळेत असला तर मग मी त्याच्यासाठी घेतलेली ती चॉकलेट्स फ्रिजच्या पायामध्ये ठेवून देत असे. तो शाळेतून आला की त्याला,  वैभवदादा येऊन गेला, असं घरी कोणीतरी सांगितलं की, तो धावत जाऊन फ्रिजच्या पायामध्ये चॉकलेट आहेत का शोधत असे. ती तिथे ती हमखास असत.


पुढे काही वर्षांनी तो मोठा झाला आणि त्याच्या घरात मोठ्या बहिणीचा छोटा मुलगा आला. माझे त्या घरचे जाणे कमी झाले असले, आता पूर्वीपेक्षा  अधिक दिवसांनी  जाणे होत असे, तरी सातत्य होते. आता त्या छोट्या मुलालासुद्धा तशीच सवय लागून राहिली होती. या काही वर्षात माझ्या परिस्थितीत सुधारणा झाली होती आणि माझे चॉकलेटचे बजेट दुप्पट झाले होते.

आता मी दादाचा मामा झालो होतो.


प्रश्न चॉकलेट देण्याचा नाही. त्यामागच्या आनंदाचा आहे. एक गोष्ट आणखी सांगितली पाहिजे. एकदा दादरच्या छबिलदास गल्लीत एक सतरा-अठरा वर्षांची मुलगी अचानक माझ्या पुढ्यात येऊन थांबली आणि म्हणाली, वैभवमामा, ओळखलं?

मी अर्थातच तिला ओळखलं नव्हतं. तिला तसे सांगितल्यावर ती म्हणाली, अरे, मी सोनी!

पण सोनी नावाच्या अनेक मुली असतात. त्यामुळे मी तरीही तिला ओळखू शकलो नाही. तर ती पटकन म्हणाली, अरे मी मी किशोरीची भाची.

... आणि लखकन मला त्या चिमुकल्या सोनीची आठवण झाली. ही तीच मुलगी होती जिला मी अशीच पाच रुपयांची दहा चॉकलेट घेऊन जात असे.


हे सारे आज आठवण्याचे कारण म्हणजे आज तो छोट्या मुलगा- स्वप्निल- खूप महिन्यानंतर भेटला. तो आता तीस वर्षांचा झाला आहे. एका खासगी कंपनीत नोकरी करू लागला आहे. आम्ही भेटलो. गप्पा मारल्या. निघताना त्याने माझ्या हातात ही$$$ एवढी मोठी कॅडबरी दिली आणि म्हणाला, हे तुमच्या छोट्याला घेऊन जा...


त्याने दिलेले ते चॉकलेट हातात घेताच मला अमाप आनंद झाला. त्याला म्हटलं,

आज एक वर्तुळ पूर्ण झालं...


आपण सारे अशी अनेकानेक वर्तुळे पूर्ण करण्याची स्वप्न बघत असतो. सगळे विश्व एक मंडलाकार आहे आणि अशा मंडलाकारानीच आपले आयुष्य समृद्ध केलेले आहे, हे ज्यांना माहीत आहे, त्यांना वर्तुळ पूर्ण होण्यामधली धन्यता समजू शकेल.


मला या क्षणी बा. भ. बोरकर यांची कविता आठवते...


बांगड्या बघा या

बांगड्या बघा या

श्रावण लावण्यराज

लागला फुलाया...


- वैभव बळीराम चाळके

9702 723 652

■■■