Monday, February 19, 2018

कागदाची करामत भिले चिपळूण


कागदाची करामत


सुट्ट्यांची गंगा वाहती राहू दे!

सुट्ट्यांची गंगा वाहती राहू दे!
अजय आपल्या मित्रांना सांगत होता, अरे! परवा मुलाची पिगीबँक फोडली (म्हणजे पैसे साठवायचा डबा) तर त्यातून अठरा हजार रुपये निघाले. सात वर्षे त्यात आम्ही पैसे टाकत होतो. घेतानाच मोठी घेतली होती मला वाटले होते पाच-एक हजार निघतील. मोजले तर अठरा हजार आणि वर निघाले...
मला एकदम पंधरा-वीस दिवसांपूर्वीचा प्रसंग आठवला.
सिएसटीहून बस पकडून मी दादरच्या दिशेने निघालो होतो. एक वृद्ध ग्रहस्थ बसमध्ये चढले, पण शंभराची नोट सुट्टी नसल्याने आणि वाहकापाशीसुद्धा सुट्टे पैसे नसल्याने त्यांना काय करावं कळेना. क्षणभर घुटमळून ते चालत्या बसमधून उतरले. उतरल्या उतरल्या धडपडले. कदाचित पडलेच असते. सुट्ट्या पैशांअभावी बिचार्‍यांना थेट हॉस्पिटल गाठण्याची वेळ आली असती.
बस प्रवासात ही सुट्टे पैसे मोठी भानगड असते. सीएसटी ते गिरगांव प्रवासाचे आधी सहा रुपये आणि मग आठ रुपये सुट्टे ठेवणे ही मोठीच डोकेदुखी ठरून राहिली होती माझ्यासाठी. चार दिवस सुट्टे द्यावेत तरी पाचव्या दिवशी वाहकाशी भांडण ठरलेले. मग एकदा मी ठरवून टाकले, आजपासून वाहकाशी हुज्जत घालायची नाही. तो असून देत नसला तरी शांत राहावयाचे. देवदयेने आपल्या खिशात पैसे आहेत. दहा रुपयाचे तिकीट घ्यायचे. वाद संपवायचा. मी हे असे ठरवून आता काही वर्षे निघून गेली. मला एकदाही आठऐवजी दहा रुपयाचे तिकीट काढावे लागलेले नाही. एकतर मी सुट्टे पैसे घेऊन जातो. दहाची नोट दिली तर सुट्टे पैसे मिळतात. म्हणजे मिळत आले आहेत.
सुट्टे हा खरे तर मोठाच प्रश्न आहे. एकदा मी खिशात पाचशेची नोट असताना दिवसभरात तिघांकडे सव्वाशे रुपये उधार ठेवले होते. शरम वाटू लागली होती स्वतःची ...
सांगायचा मुद्दा वेगळाच आहे. सुट्टे पैसे नसले म्हणजे अनेकदा शारीरिक, मानसिक त्रास होतो आणि आपल्या पैकी अनेक जण मुलांच्या पिगी बँकमधून आणि घरातल्या कपाटातून उगाचच सुट्टे पैसे अडकवून ठेवतात. सुट्टे पैसे चलनात राहिले पाहिजेत. ते असे अडचणीत ठेवू नका. सुट्टे पैसे आणायला रुग्णासोबतच्या माणसाला जेव्हा वणवण करावी लागते ना, तेव्हा त्याची काय अवस्था होत असेल ते आठवा आणि सुट्टे पैसे साठवून ठेवणे टाळा.
तुम्ही रस्त्यावर गाडी चालवित असताना जर अ‍ॅम्ब्युलन्स आली तर तुम्ही काय करता? अ‍ॅम्ब्युलन्सला जागा देता ना? सुट्टे पैसे अडवणे, अडवून ठेवणे हे अ‍ॅम्ब्युलन्सला जागा न देण्यासारखे आहे. तेव्हा वाट मोकळी करा. सुट्टे पैसे वाहत राहू द्या. ती गंगा मग तुमच्या गरजेला तुमच्यापाशीसुद्धा येईल, काय, आवडला ना विचार?
- वैभव बळीराम चाळके 
९७०२ ७२३ ६५२.

Thursday, August 31, 2017

शपथ स्वच्छतेची

शपथ स्वच्छतेची

बालनाटिका

(सर्व जण गात गात मंचावर येतात...)
‘निर्मल’ सोसायटीचे आम्ही रहिवासी.
 आमच्या सोसायटीत स्वच्छतेची काशी!!
(मग हळूहळू सगळे जण भिंत करून उभे राहतात.)
(एक जण ऑफिसला चाललाय. एकदम शर्ट झाडत उभा राहतो आणि वर पाहत म्हणतो-)
भापकर- ए, डोळे फुटले काय रे? कसले घाणेरडे पाणी ओतलंस? कोण आहे तो!
किशोर - (वरून आवाज येतो) सॉरी... सॉरी हं... भापकर काका!
भापकर- किश्या, सॉरी काय? माकडा, शर्ट खराब झाला माझा. आता माझी नोकरी जाईल. मग माझं घर तुझा बाप चालवेल काय रे?
(तिसरा माणूस बाजूने जात असतो. तो हा संवाद ऐकतो आहे. तो विचारतो-)
कदम- अहो, पण त्या पाण्याचा आणि नोकरी जाण्याचा काय संबंध?
भापकर- या असे... या शहाणपतराव! सांगतो कसा ते. (मग वर पाहत) ...आणि माकडा तू तिथंच थांब. तुला पाहायचंय अजून... तर तुम्हाला नोकरीचा संबंध हवा होता ना? ऐका! आता माझ्या बॉसचा जावई आणि मुलगी येणार आहेत फिलिपाईन्सवरून... त्यांना आणायला जायचंय मला... ती बघा गेटवर भाड्याची कार उभी आहे. आता कसा जाऊ? आणि आणायला गेलो नाही की गेली नोकरी...
कदम- घरी जाऊन बदला ना कपडे. दोन मिनिटे तर लागतील...
अजय - काका, जा आटपा... पटपट बदलून या कपडे आणि निघा...
भापकर- ए, काकावाल्या... तुझा भाऊ ना तो. त्या मूर्खाला कळत नाही. आणि दोन मिनिटांत कपडे बदला... अरे तीन माळे चढायला दोन मिनिटे लागतील. तोवर तो गाडीवाला थांबला पाहिजे ना...
कदम- का नाही थांबणार?
भापकर- शेअरिंग कार आहे ती... ती तीनच मिनिटे थांबते. ती संपतील आता...
कोरे - अणावकर... अणावकर... (जोराने ओरडत येतो) कुठे आहेस रे?
अणावकर - का? काय झालं काय कोकलायला?
कोरे - संडासचा पाईप तुटलाय... खाली घाण पसरलय दिसत नाही का? कसले सेक्रेटरी तुम्ही?
अणावकर- सगळ्यांची घाण काय सेक्रेटरीने काढायची काय?
कोरे- सगळ्यांची नाही हो... तुमच्यामुळे झालेली आहे. तुमच्या चिरंजीवाने  काल पाईप तोडलाय.. आज सकाळपासून वाहतोय तो...
अणावकर- बोंबलू नका... तुमची सगळी घाण काढेन... सर्वांसमोर... सांगून ठेवतोय...
कोरे- काय घाण करतो हो आम्ही... सांगा ना?
अणावकर- तुमची मिसेस गॅलरीत केस विंचरते... ते अनेकदा आमच्या ताटापर्यंत पोहचतात. तुमची कन्या खाली मातीत किल्ले बनवत बसते... सगळ्या सोसायटीत धूळ होते... आणि तुमचे पप्पा... खोकून खोकून आवाजाचे आणि हवेचे प्रदूषण करीत असतात त्याचे काय? चांगला डॉक्टर बघत नाही तुम्ही... खोकतोय बिचारा म्हातारा...
कोरे- अणावकर, ही असली अस्वच्छता तर सगळी सोसायटीच करते. गेटवर तुमच्या विंगची मुलं उभी राहतात.  त्यांची भाषा ऐका... शिसारी येते.
अरुणा काकू - शीशी... काय काय बोलतात ही मुलं. - ऐकायला लाज वाटते. मी पोथी वाचत बसते तर दर दोन पाच मिनिटाला यांचे अभद्र शब्द कानावर येतात...
कोरे- तुम्ही तोंड खुपसू नका! तुम्ही जे काय उद्योग करता ना धर्माच्या नावाखाली ते म्हणजे पाप करून पापशालन करण्यासारखे आहे. दुपारी तंबाखूची मशेरी भाजता आणि रात्री धूप घालता! फायदा काय हो त्याचा?
अरुणा काकू- तुमच्या मुलांच्या तोंडच्या शिव्या माझी नातही उच्चारायला लागली आहे. परवा मुन्नीच्या नानाची टांग टांग... असे काही म्हणत होती...
सविता काकू - आणि काय हो, सत्यनारायणाच्या पूजेला डान्स करतात आपली मुलं... ती गाणी तरी काय, मुन्नी बदनाम हुई... शिलाच्या आयचा घो... दिल बत्तमीज...? मुलांच्या भाषेची आधी स्वच्छता केली पाहिजे.
अणावकर- त्या आधी तुमच्या हिशोब तपासनीस नवर्‍याने सोसायटीच्या हिशोबात घाण करून ठेवलय ती आधी स्वच्छ करायला पाहिजे...
सविता काकू- पोराच्या वह्या बघा... त्या आधी स्वच्छ करा... काय ते  अक्षर... घाण घाण नुसती!
अध्यक्ष - शांत व्हा! शांत व्हा! अरे अशी अस्वच्छता सर्वत्रच पसरली आहे. ती आपल्या नात्यातही उतरली आहे. लक्षात ठेवा. शरीर, घर, परिसर अस्वच्छ झाला की, शारीरिक रोग होतात आणि मन व नाती अस्वच्छ झाली की, मानसिक रोग होतात. तेव्हा आज यानिमित्ताने आपण सोसायटीतील सर्व जण शपथ घेऊया... स्वच्छतेची शपथ...
सर्व जण- ‘आम्ही निर्मल सोसायटीचे सर्व सदस्य मनापासून अशी शपथ घेतो की, आम्ही आमचे मन, शरीर, सोसायटी, आमचे आचार, विचार यांची स्वच्छता अबाधित राखू! या सर्व ठिकाणी अस्वच्छता होणार नाही, याची काळजी  घेऊ!’
एक मालवणी- हे देवा म्हाराजा... आम्ही सर्व जण आज तुला गार्‍हाणा घालतो  की, आमच्या तनामनात घरा-आवारात कसलीच घाण होणार नाही याची काळजी घे रे देवा म्हाराजा...
सर्व जण- होय म्हाराजा...
दुसरा मालवणी- मनात दुष्ट विचार, पोटात घाणेरडे पदार्थ आणि आवारात कचरा टाकण्याची आमची दुर्बुद्धी दूर कर रे देवा म्हाराजा!
सर्व जण- (एकत्र गातात-)
स्वच्छ तनमन, स्वच्छ परिसर
स्वच्छ भारत करू
सर्व मिळुनी करू स्वच्छता
स्वच्छ ध्यास हा धरू ॥
 (पडदा)
वैभव बळीराम चाळके
9702 723 652

Tuesday, July 4, 2017

 विस् मरण 


पृथ्वी आपल्या भ्रमणकक्षेतून सुटणार आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अंत करणारी जगबुडी होणार ही बातमी आल्यापासून आता 15 तास होऊन गेले आहेत. अवघ्या जगात काल सायंकाळी सात वाजता सुरू झालेला हलकल्लोळ शमून सर्वत्र मरणकळा पसरली आहे. स्मशानशांततेने जगावर पांघरूण ओढलंय. वातावरणात नुसताच मरणगंध पसरलाय. माणूस माणूस उरलेला नाही. विड्राअल सिमटम्सही संपून गेले आहेत.
जगबुडीच्या बातमीचा परिणाम झालेला नाही तो फक्त मानवेतर सृष्टीवर... माणूस मात्र पार कोलमडलाय. भिकारी आणि लफंगे काल रात्रीपासून सताड उघडी पडलेली दुकाने लुटून खूश झाले होते, तेही काय अजब चाललंय सारं, म्हणून धास्तावून निपचीत पडले आहेत.
मंदिरे, चर्च, मशिदीत माणसं प्रार्थना करून थकून पडली आहेत. एकेकाचा चेहरा पाहू नये, इतका भकास दिसतो आहे. बाजारपेठा माणसांशिवाय उघड्या पडल्या आहेत. रुग्णालयात डॉक्टर नाहीत, नर्स नाहीत, स्टाफ नाही. रुग्ण नुसतेच पडलेत. रस्त्यांवर वाहने नाहीत. रेल्वेे, रिक्षा, टॅक्सी स्थानके ओस पडली आहेत. विमानतळांवर विमाने उतरून पडली आहेत. शाळा, कॉलेजांच्या इमारती मढ्यासारख्या उभ्या आहेत. माणसं असून नसल्यासारखी सगळी पृथ्वी...
पस्तिशीतला शान आपल्या घराच्या हॉलमध्ये अस्वस्थ बसून फोन लावतोय. रिंग वाजते, पण फोन कोणीच उचलत नाही. तो पुन्हा-पुन्हा फोन लावतो. मग आतल्या खोलीत चक्कर टाकून येतो. पुन्हा फोन लावतो. मग टीव्ही लावतो. टीव्हीच्या पडद्यावर मुंग्या... चॅनेल बदलतो. एक-दोन-तीन... नवव्या चॅनेलवर एक वृत्तनिवेदिका दिसू लागते. “अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष मेरी सुलेमान बाटलीवाला यांनी जगभरातील शास्त्रज्ञांना व्हाइट हाऊसमध्ये पाचारण केले आहे. ते काही तासांत पोहचतील. एक यान अंतराळात सोडले जाणार असून त्यातून कोणत्या वस्तू व कोणता संदेश अंतराळात पाठवायचा यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. लोक हो, जगातील सर्व प्रसारसेवा ठप्प झाल्या असून न्यूज नेटवर्क ही आमची एकमेव सेवा सध्या आपल्या सेवेत आहे. स्टीफन हॉकिंग यांनी लवकरच माणसाच्या वस्तीसाठी गृह शोधावा लागेल असे 2017 साली भाकीत केले होते. ते एवढ्या लवकर आठवावे लागेल असे कोणासही वाटले नव्हते. लोक हो, आपण सारेच जण जाणार आहोत. उद्या पाच वाजेपर्यंत किंवा आपला संपर्क असेपर्यंत आम्ही आपल्याला सेवा देऊ.”
शान अस्वस्थ... फोन फिरवतोय... रिंग वाजतेय... प्रतिसाद नाही. आतल्या खोलीतून मोठी किंकाळी ऐकू येते. तो आतल्या खोलीत जातो...
त्यांची पत्नी अ‍ॅना बाळंतवेणांनी धास्तावलेय... धपापतेय... हा डोक्यावर हात थोपटून तिला धीर देतो...
ती पुन्हा एकदा उसळी देऊन ओरडते. तो आता खाली पाहतो, तर बाळ जन्मास आले आहे. तो ते बाळ उचलतो आणि तिच्या छातीवर ठेवतो.
ती बाळाकडे पाहते. ते लालबुंद चेहर्‍याचे... इवल्याइवल्या नाक-कान, डोळ्यांचे इवले बाळ पाहून ती अपार समाधानाने हसू लागते... नवर्‍याच्या चेहर्‍यावर आनंद उमटू पाहतो... उमटत नाही... तो तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आधार देतो... जगभर माणसे मरणकळेने काळी पडली आहेत. हसते आहे ती बाळाच्या आगमनाने आणि प्रसूतिवेदनेतून सुटल्यामुळे मृत्यूच्या गडद छायेचे विस्मरण झालेली एकटी अ‍ॅना!

- वैभव बळीराम चाळके

Thursday, February 16, 2017

कवितेतील फुलपाखरे

ज्ञानपीठाची उंची

परवा लोकलमध्ये प्रवासात मी विजया
राजाध्यक्ष यांनी संपादित केलेले ‘करंदीकरांचे
समग्र लघुनिबंध’ वाचत होतो. मित्राला म्हटलं
हा असा अवलिया लेखक आहे की, दर दोन
पानानंतर मी मनातल्या मनात या माणसाचे
पाय धरतो. यांच्या निवडक कवितांच्या ‘संहिता’
नावाचा संग्रह आहे, तो मी कित्येकदा वाचलाय.
पुन्हा पुन्हा वाचतो आणि पुन्हा पुन्हा या
माणसाची कमाल वाटते. या कविमहात्म्याला
प्रत्यक्ष ऐकण्याचा अनेकदा योग आला. यातच
काही जीवन सार्थक झाले! ज्ञानपीठाची उंची
केवढी? हे जाणून घ्यायचं असेल तर कवी
मंगेश पाडगावकरांनी संपादित केलेला ‘संहिता’
हा काव्यसंग्रह वाचावा.
‘संहिता’ वाचताना मी वेळोवेळी टीका अधोरेखा
करून ठेवलेल्या ओळी इतक्या आहेत की, त्या
सर्व देणे अशक्यच. पण त्यातल्या निवडाव्या
कोणत्या, हाही प्रश्न पडतो. हे घ्या काही तुकडेकाळ्या
कुलपातून कुजते धान्य/आणि
तळमळ्यात अगा? अर्भके/काळाच्या क्यूत (ती
जनता अमर आहे)...
आणि जिचा आत्मा एक/ती जनता अमर आहे
(ती जनता अमर आहे)
छातीच्या सापळ्यातील मुठीएवढ्या उंदिरावर/
कशाला वटारतेस मांजराचे डोळे, ज्यांतील
संपले रडण्याचेही सामर्थ्य? (त्रिवेणी)
कुरकुरणार्‍या पाळण्यामधून दोन डोळे
उमलू लागतात आणि मग इवल्या इवल्या
मोदकमुठीतून तुझ्या स्तनांवर। बाळसे चढते।
(झपताल)
सद्गुरू - वाचोनी। सापडेल सोय। तेव्हा जन्म
होय? धन्यधन्य (आततायी अभंग)
जगाचे पोशिंदे। भुकेने भाजती। आणखी
माजती। मधलेच (आततायी अभंग) जागृतांनो
फेका। प्राणांच्या अक्षता । ऐसा योग आता पुन्हा
नाही? (आततायी अभंग).
- शब्दवैभव

कवितेतील फुलपाखरे

भूक

कवितेचा छंद हा जगण्याचा, जगणं समजून घेण्याचा,
समजून जगण्याचा छंद आहे. काही वर्षांपूर्वी मी एक
छोटा लेख लिहिला होता ‘हल्ली विनोद वाचल्यावर रडू
येते.’ तेव्हा एक ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणाले होते, असे नको
रे करू! विनोदात असे दुःख पाहू लागलास तर जगणे
अवघड होईल. परवा व्हॉटस्अ‍ॅपवर एक विनोद आला होता.
तो वाचून मला पुन्हा रडू आले. विनोद होता-
‘ती सध्या करते काय? (मग बरीच मोकळी जागा...
आणि मग उत्तर) ती काहीही करू दे. तू फ्लॅटफॉर्म आणि
पायदानातील अंतरावर लक्ष दे!’
मला लोकलने प्रवास करणार्‍या बापुडवाण्या
चाकरमान्यावरील ही अत्यंत करुण टिप्पणी वाटली.
बिचारा कधी खाली जाईल त्याचा नेम नाही.
आज गुलजारांच्या ‘त्रिवेणी’चा शांता शेळके यांनी केलेला
अनुवाद वाचताना एका त्रिवेणीने असाच विचार मनात
आणला. त्रिवेणी अशी आहेकोण
खाणार? कुणाचा हा वाटा?
दाण्यादाण्यावर लिहिले आहे नाव
शेठ सूरचंद मूलचंद जेठा!
केवढी करुण अवस्था आहे सामान्यांची! दाण्यादाण्यावर
लिहिले आहे नाव म्हणायचे. पण प्रत्येक दाण्यावर एकाच
शेठचे नाव लिहिलेले ही सगळ्यांची शोकांतिका! त्यातही
शेठ, सूरचंद, मूलचंद, जेठा या चारही अक्षरातले वजन
गरीब कसा चिरडला जातोय ते सुचविणारे!
मला वामनदादा कर्डक यांचे गाणे आठवले. त्यांनी
विचारले होते,
सांगा आम्हाला टाटा बिर्ला बाटा
कुठं आहे हाय हो
सांगा धनाचा साठा नि आमचा
वाटा कुठं हाय हो
इथल्या पददलिताची अवस्था इतकी वाईट की धनवान
टाटाबिर्लाबाटाचा पत्ताही त्याला माहीत नाही. तो त्याला
इतराकडे विचारावा लागतोय. अर्थातच धनाचा आपला
वाटा मिळण्याची शक्यता तेवढीच कमी!
कधी तरी एक गाणे लिहिले होते
लागं पोटाला या भूक
एक एवढीच चूक
अशा चुकीसाठी घ्यावं
का रं मुठीमध्ये नाक? दादा रं दादा रं ...
एका अभंगिकेत भुकेबाबत लिहिले आहे-
भुकेल्याच्या लेखी। कोण जीवशिव
एका वडापाव। ब्रह्म त्याचे

- शब्दवैभव

Monday, January 30, 2017

कवितेतील फुलपाखरे

कवितेतील
 फुलपाखरे

फुलपाखरांशी खेळतच आमची पिढी मोठी झाली.
सोबतीला होती ग.ह. पाटील यांची कविता -
छान किती दिसते! फूलपाखरू
या वेलींवर! फुलांबरोबर
गोड किती हसते! फूलपाखरू
पंख चिमुकले! निळेजांभळे
हलवून झुलते! फूलपाखरू
डोळे बारीक! करिती लुकलूक
गोल मणी जणू! फूलपाखरू
मी धरू जाता! येई न हातां
दूरच ते उडते! फूलपाखरू
ही कविता आमच्या पिढीच्या सर्वांच्याच गळ्यातला
ताईत होऊन राहिली आहे. कविता म्हटले की, ज्या
दोन-चार कविता हमखास आठवतात त्यातली ही
एक कविता. तिचे कवी कोण, हे कदाचित अनेकांना
माहीत नसेल. पण कविता मात्र तोंडपाठ आहेच.
तर मराठीतील आणखी कोणकोणत्या कवितांत
‘फुलपाखरू’ आले आहे याचा विचार करू लागलो
की मला दोन शेर आठवतात. हे दोन्ही शेर मला
कविमित्र कैलास गांधी याने प्रथम ऐकवले. त्यानंतर
ते अनेकदा अनेक ठिकाणी अनेकांकडून ऐकावयास
मिळाले. त्यातला पहिला शेर आहे. गोव्याच्या
कवियित्री राधा भावे यांचादु:खालाही
चिमटीमध्ये धरता येते।
आणिक त्याचे फूलपाखरू करता येते॥
राधाजींच्या या शेराला दाद न देईल तो अरसिक!
केवढा जबरदस्त विचार मांडलाय! दु:खाचे फुलपाखरू
ही प्रतिमाही एकदम नावीन्यपूर्ण! पुन्हा फुलपाखराशी
मानवी मनाचे जे पूर्वबंध आहेत ते जागवले म्हणजे या
शेराची उंची कळू लागते!
दुसरा शेर आहे गजलकार चित्तरंजन भट यांचा!
हो, गजलसम्राट सुरेश भट्ट यांचे हे चिरंजीव. तेही
अफलातून गजल लिहितात. आजच्या लोकप्रिय
कवींच्या तोंडी त्यांचा हा शेर सदैव ऐकावयास मिळतो.
चित्तरंजन लिहितातकोणत्या
चिमटीत मी त्याला धरू
हिंडते मेंदूत जे फुलपाखरू
गजलेतील नवा विचार म्हणून या शेराकडे
पाहिले जाते. गजलच नव्हे तर एकूण कवितेत असा
नवा विचार मांडला गेला पाहिजे. नव्या प्रतिमांची,
कल्पनांची नवकवींनी कास धरली पाहिजे. भाषेचा
माथा तरच उन्नत होईल.
- शब्दवैभव