Thursday, September 27, 2018

मराठी मूळाक्षरे

मराठी मूळाक्षरे

मराठीच्या शुद्धलेखनाच्या कार्यशाळेसाठी संपर्क 9702723652.

Monday, September 24, 2018

बुद्धी दे, शांती दे, आरोग्य दे, धन दे तारतम्यही दे


आदिपूजेचा मान मिळालेले दैवत म्हणजे श्री गजानन...  सोळा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती तो श्री गणेश... त्याचा भाद्रपदी होणारा सोहळा म्हणजे केवळ आनंद पर्वणी... अवघ्या महाराष्ट्राला एक नवा तजेला ... एक नवी उमेद देणारा हा सोहळा... त्याची लक्षावधी रुपे... त्याचा साती खंडात वाजणारा डंका... जगाच्या पाठीवर असा दुसरा सोहळा नसावा. पण...
हा पण...
बुद्धी दे... शक्ति दे... आरोग्य दे... धन दे... अशा मागण्या करताना आम्हाला तारतम्यही दे असे म्हणायला लावतो. हे तारतम्य नाही लाभले तर आपण आपला लाखमोलाचा आनंद आणि तेवढ्याच लाख मोलाचा सोहळा हरवून बसायचो. किंवा त्याची तेजोमय प्रभाच निष्प्रभ करून ठेवायचो.
बाजाराला नकार
सगळ्या जगावर बाजाराने गारूड केले आहे. त्याचा परिणाम आपल्या सणांवरही दिसतो. सणांसाठी बाजार सजणे वेगळे आणि सणांचा बाजार होणे वेगळे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आपले सण हे नात्याच्या जपणुकीसाठी... समाजातील सद्भावना वाढीसाठी... समाजाच्या उन्नतीसाठी आहेत. त्याऐवजी बाजार मांडून समाजाला अधिकच बाजारकेंद्री करण्याचे पातक आपल्या हातून घडत नाही ना याचे भान आपण ठेवले पाहिजे. बाजाराला जाहिरातीची गरज असते. ती जाहिरात आपल्या सणांमध्ये का घुसली? याचा विचार आपण का नाही केला?
व्हीआयपी आणि सेलेब्रिटी
आपल्या गणेशोत्सवात व्हीआयपी आणि सेलेब्रिटी आले पाहिजेत हा अट्टाहास आपण का करू लागलो आहोत? सेलेब्रिटीशिवाय आपला उत्सवच पूर्ण होत नाही का? आमदार, खासदार, नगरसेवकांना आपण गणेशोत्सवात कशासाठी बोलवतो? त्यांनी मंडळाला देणगी द्यावी म्हणून? मंडळापुढच्या रस्त्यावर खड्डे... तेथे सिग्नल नाही... स्पीडब्रेकर नाही... ते काम करायचे- करून घ्यायचे काम प्रतिनिधींचे आहे, पण आपण मंडळाला देणगी मागू लागलो नि ती  डीजेवर उधळू लागलो तर सगळ्या समस्या तशाच राहणार, हे आपण जाणायला नको का?
कलांचे ओंगळवाणे प्रदर्शन
गणेशोत्सवासारख्या सणांवेळी नृत्ये केलीच पाहिजेत. गणेश ही देवता कलांची देवता आहे. पण बीभत्सपणा, अश्लीलता त्यांना या प्रसंगी आपण थारा देता कामा नये. अनेकदा आपण अशा कलांना या दिवसांत प्रोत्साहन देऊ लागलो आहोत. दहीहंडीच्या मंचावर अलीकडे जी नृत्य झाली ती संताप आणणारी होती. ही कोणती भक्ती आहे? मद्यपान करून विसर्जन मिरवणुकीत असला बीभत्सपणा करणार्‍यांना आपण आवरले पाहिजे. लोककलांत अश्लिलता डोकावू लागली तर ती वेळीच रोखली पाहिजे.कलगीतुर्‍याच्या नावाखाली जाखडी नृत्य आणि भजनांतही अश्लील गीते सादर होताना दिसतात. ते आपण थांबविले पाहिजे.
भक्त विनम्र हवा
एखाद्या गणेशोत्सवाची कीर्ती वाढली की मग त्या गणेशोत्सवाच्या मंडळातील कार्यकर्त्यांचा अभिमान वाढीस लागतो. तो अभिमान मग गर्वाची जागा घेतो. त्यातून मग भाविकांना दुय्यम लेखायला सुरुवात होते. पोलिसांना दादागिरी करून दाखवली जाते. बाबांनो, तुम्ही भक्त आहात ना? भक्त विनम्र हवा. तुम्ही बाप्पाची सेवा करता ना? अशी करतात सेवा? या अशा एक दोन कार्यकर्त्यांमुळे मंडळातील रात्रंदिवस राबणार्‍या कार्यकर्त्यांनाही नावे ठेवली जातात हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या लोकांचे प्रबोधन करणे हे आपलेच काम आहे, हे लक्षात घ्या आणि अशा कार्यकर्त्यांना आवरा.
तुम्ही तर संस्कृती वाहक
गणेशोत्सवातील कार्यकर्ते आणि या उत्सवात सहभागी होणारे भाविक हे आपल्या संस्कृतीचे वाहक आहेत. त्यांना त्याची जाणीव असली पाहिजे. तुम्हीच समाजात आपली परंपरा, संस्कृती घेऊन जात असता. नव्या पिढीला तिचे दर्शन घडवीत असता. तेव्हा तुम्ही जर बेजबाबदार झालात तर संस्कृती वहनाचे कामच दूषित होऊन जाईल. तुमच्या खांद्यावरच या संस्कृतीची पालखी आहे. नव्या पिढीला आपल्या संस्कृतीचा परिचय करून देण्याचे काम करताना म्हणूनच अधिक जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे.
हेवेदावे विसरा
छोट्या-मोठ्या अनेक मंडळांत हेवेदावे दिसतात. गट-तट दिसतात. सण-उत्सव हे एकत्र येण्याचे, एक दिलाने काम करण्याचे निमित्त असते. आपण सार्‍यांनी हेवेदावे विसरून काम केले पाहिजे. एकत्र येऊन गुण्यागोविंदाने, प्रेमान,े स्नेहभावाने वागले पाहिजे. पण अनेकदा आपण अशा हेव्यादाव्यांना खतपाणी घालताना दिसतो. हे काही बरे नाही.
तारतम्य दे...
कोकणात देवापुढे गार्‍हाणे घालायची पद्धत आहे. आज आपण सर्व गणेशभक्तांनी मिळून देवाधिदेव गणेशाला एक गार्‍हाणे घालूया. हे देवाधिदेवा... होय महाराजा... आम्हाला बुद्धी दे... होय महाराजा... आम्हाला शांती दे...होय महाराजा... आम्हाला धन दे... होय महाराजा...  आम्हाला आरोग्य दे...होय महाराजा... आणि उत्सव साजरा करताना तारतम्य दे रे महाराजा... होय महाराजा...

Monday, September 3, 2018

सिद्धपुरुष



एक दिवस ऑफिसातला सहकारी श्रीधर ओंकारला म्हणाला,
‘उद्या कार्यक्रमाला येणार?’
‘कुठे कसल्या?’
‘स्टार्ट नाऊ!’
‘काय आहे ते!’
‘यशाची सुरुवात! अशी बेसलाईन आहे त्याची!’
‘बकवास असणार!’
‘कशावरून?’
‘अरे, असे कार्यक्रम करणारेच तेवढे यशस्वी होतात. ऐकणारे होत नाहीत!’
‘निगेटिव्हच का बोलतोस?’
‘मग...’
‘चांगलं बोल ना! झाला तर झाला फायदा नाही झाला तर आपल्याला कुठे पैसे गुंतवायचेत. शंभर रुपये तर
तिकीट आहे.’
‘ठीक आहे, पण मला सांग तू, काय वेगळं असतं त्यात?’
‘यशस्वी बाराखडी’
तुला व्हायचंय का यशस्वी?’
‘हो! अर्थात!’
‘मग ठीक आहे. तुला यशस्वी करण्यासाठी मी तुला हा कार्यक्रम दाखवतो. अट एकच तू मला त्याचा काय फायदा झाला ते महिन्यानंतर प्रूफ करून दाखवायचंस!’
‘ओ.के.’
***
ओंकार बर्वे! वय वर्षे पंचेचाळीस! एका प्रायव्हेट कंपनीत कारकून म्हणून काम करणारा. घरात बायको, दोन मुलं, आई आणि वडील. परिस्थिती बेताची! पण ती लवकरच सुधारेल अशी आशा असलेलं कुटुंब! ओंकार हुशार, मेहनती. सतत कोणत्या ना कोणत्या कामात अखंड बुडालेला. बोलणं मृदू आणि गोड. त्यामुळेच मित्रमंडळी आणि नातेवाइकांत सगळ्यांना हवाहवासा!
***
श्रीधरला कार्यक्रम दाखवायचं पक्कं ठरलं. दोघे कार्यक्रमाला गेले.
कार्यक्रम छान झाला. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर ताबडतोब कृती करणं गरजेचं कसं आहे त्यावर तो ट्रेनर छान बोलला. श्रीधर भारावून गेला. ओंकारला त्याचं भाषण आणि विचार आवडले. पण हे ऐकून काही एखादा पटकन सुरुवात करेल आणि सुरुवात केलीच तरी यशस्वी होईल असं काही ओंकारला वाटलं नाही.
कार्यक्रम संपल्यावर दोघं परतीच्या वाटेवर गप्पा मारत होते. ओंकार म्हणाला,
‘काय करायचं ठरवलंयस?’
‘करणार काही तरी!’
‘एक महिन्याची मुदत आहे. नाहीतर 200चे 400 करून द्यावे लागतील तिकिटाचे पैसे!’
‘त्याची गरजच पडणार नाही!’
‘ठीक आहे पाहू!,’ ओंकार छद्मी हसत म्हणाला. श्रीधर 400 रुपये हरणार याबाबत त्याला पक्की खात्री होती.
संध्याकाळी ओंकार छोट्याला घेऊन गेला असता त्याला एकदम गार्डनमध्ये कालच्या कार्यक्रमाची आठवण झाली. वाटलं काय काय आयडिया काढतात लोक! कमाल वाटते यांची! लोकांच्या मनाचा नेमका ठाव घेतात. किती किती धंदे बोकाळलेत नुसते.
कुणी शेअर बाजाराचं ट्रेनिंग देतो, कुणी ब्युटिशियनचा कोर्स काढतो, कुणी व्यक्तिमत्त्व विकासाची कार्यशाळा घेतो, एवढंच काय तर गझललेखनाच्या कार्यशाळाही होतात. या सगळ्याच्या मुळाशी आहे ती पैसे कमविण्याची वृत्ती. एकदा पैसे कमवायचे म्हटले की लोक विज्ञानापासून बुवाबाजीपर्यंत काय वाटेल ते मार्ग शोधून काढतात.
सगळ्याच्या मुळाशी माणसाच्या मनाचा कमकुवतपणा! माणसं स्वतः कष्ट करून मोठं होण्यावर विश्वास ठेवत नाहीत. सतत पराभवाला घाबरत राहतात. मग असल्या ट्रेनर, बाबा आणि बायांना फसून पैसे गमावतात. मोठी स्वप्न दाखवून हे लोक फसवतात बापड्यांना! असल्या ट्रेनिंगमधून ट्रेनिंग देणाराच फक्त श्रीमंत आणि यशस्वी होतो. कुणीतरी म्हटलं आहे, जे स्वतःला जमलं नाही ते इतरांना करायला सांगतो तो ट्रेनर! खरंच आहे ते. मध्ये ‘मशरूम पिकवा’च खूळ आलं होतं, तेही यातूनच बोकाळलं होतं.
ओंकार विचारात हरवला होता.
तेवढ्यात मुलगा जवळ आला. त्याची तंद्री भंगली. पण रात्री झोपताना पुन्हा त्याच्या डोक्यात तेच विचार घुमू लागले. वाटलं आपणही हे तंत्र वापरून पाहायचं का? लोक मूर्ख असतील तर आपण खरंच ते मूर्ख आहेत का? हे पाहायलाच हवं!
काहीतरी केलं पाहिजे, त्याचे विचारचक्र वेगाने फिरू लागले.
एक पक्की योजना आखूनच तो झोपला.
लोक दुःखाला घाबरतात म्हणून ते असे वेड्यागत पैसे खर्च करत बसतात. हे नेमके ओळखून ओंकारने लोकांचे
दुःखच नाहीसे करण्याची बतावणी करण्याची युक्ती शोधून काढली. युक्ती सोपी होती. एकेका माणसाला भेटायचं. एकावेळी एकाला त्याला त्याच्या समस्या आणि दुःखे याबाबत बोलतं करायचं. एखादा खूपच चांगलं चाललंय म्हणाला तर त्याच्यासमोर बथ्थड भविष्याची चित्रे उभी करायची. मग माणूस नक्कीच घाबरेल. मग यावर उपाय आहे म्हणून सांगायचं. अट एकच! कोणता? कसा? कोण करणार? कुठे करणार? असले प्रश्न विचारायचे नाहीत. परिस्थिती बघून माणसांना रक्कम सांगायची. महिन्याभरात फरक न दिसल्यास पैसे परत मिळतील म्हणून सांगायचं,  योजना पक्की ठरली.
***
‘आता तुमच्यासमोर सर्वाधिक दुःख कसलं आहे सांगा. आधी आपण त्याचं निवारण करू?’ हॉटेलच्या कोपर्‍यात बसून ओंकार डाणगे साहेबांना विश्वासात
घेत होता.
‘सगळ्यात आधी माझं हे छातीतलं दुखणं थांबायला हवं. परवा रात्री दुखायला लागलं म्हणून जाग आली तर घाबरलो हो. वाटलं आता जगत नाही! आजकाल तरणी मुलं जातात हो अ‍ॅटॅकने!, ठाणगे साहेब काकुळतीला येऊन सांगत होते.
‘माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचं हेही दुखणं संपेल. मी काय करायचं ते करतो. तुम्ही फक्त एक काम करा. उद्याचा दिवस जाऊ दे. परवा दिवशी जाऊन कार्डिओलॉजिस्टकडून तपासून घ्या. तपासायची गरज नाही, पण मनाची खात्री झालेली बरी तुमच्या!  म्हणजे निर्धास्त व्हाल. ताबडतोब मला कळवा. रिपोर्ट नॉर्मल आले तर मी पास झालो आणि आजार आढळला तर नापास आणि नापास झालो तर सगळी फी परत. त्याच दिवशी घेऊन जा, असं आतापर्यंत तरी
झालं नाही.’
ठाणगे मोठ्या विश्वासाने बाहेर पडले.
ओंकारने देवाला हात जोडले आणि म्हणाला, ‘या माणसाला हृदयविकार नसू दे रे बाप्पा! त्याचे पाच हजार खाल्लेत आपण!’
त्या दिवशी ओंकार एका बाईंना समजावत होता. त्याच हॉटेलात तेव्हा ठाणगे आले. डोळ्यात पाणी आणत म्हणाले, ‘उपकार झाले तुमचे! रिपोर्ट नॉर्मल आहेत!’
ओंकार म्हणाला, ‘छान, आता घाबरू नका. सगळं हळुहळू व्यवस्थित मार्गी लागेल!’
एवढा मोठा साहेब, पण हात जोडून धन्यवाद म्हणाला.
ओंकारसमोर बसलेल्या आजीबाईही ओंकारकडे अपार आदराने पाहत म्हणाल्या,
‘काय होतं यांचं?’
‘छातीचं दुखणं... गेलं... पळालं!’
‘छान!’
‘ते जाऊ दे. आपण आपल्या विषयाकडे वळू. तर तुमचा डायबेटीस अवघड काम आहे. काही गोष्टींवर कायमस्वरूपी पर्याय नसतात, पण तुमच्या आजाराचा तुम्हाला त्रास होणार नाही याचा बंदोबस्त करू आपण! गेल्या पाच वर्षांमध्ये जेवढ्या सुखी नव्हता तेवढ्या सुखी आणि आनंदी जगू शकता तुम्ही. तुम्हाला थोडंसं संयमानं आणि काटेकोर वागावं लागेल, पण ती ताकद तुमच्यात निर्माण करू आपण. मी काय केलं, कोठे जाऊन केलं, कसं केलं याबाबत शंका मनात ठेवायची नाही. कुणाला याबाबत काही बोलायचं नाही. उद्या डॉक्टरांकडे जाऊन या. त्यांनी सांगितलेल्या औषधगोळ्या वेळेवर घ्या. मस्त उड्या मारू लागाल लवकरच!’
‘तेच पाहिजे बघा.’ उरली वर्षं हातपाय हलवत गेली म्हणजे झालं!’
‘काही चिंता करू नका आणि कधी अडचण आली तर माझा नंबर आहेच! कधीही फिरवा! काळजी करू नका जा. सगळा बंदोबस्त करतो.’
आजीबाई गेल्या. ओंकारनं पैशाचं पाकीट खिशातून काढून बॅगेत सरकवलं आणि तोही बिल भागवायला काऊंटरकडे चालू लागला.

ओंकार रोज कामावरून सुटल्यावर हाच एक धंदा करू लागला. ज्यांना भेटला त्यातली निम्मी माणसं त्याची गिर्‍हाईक होऊ लागली. पुढच्या काळात एकही माणूस पैसे मागायला आला नाही. वर्षभरात त्याने तीस एक लोकांच्या आयुष्यातलं दुःख दूर केलं. त्यातल्या अनेकांनी त्याचे पाय धरले. कुणी पुन्हा अडचणी घेऊन आलं. कुणी वाटेल ते पैसे मागा, पण हे काम कराच, म्हणू लागलं.
आपल्याकडे कोणतीच सिद्धी नाही ही गोष्ट तो सपशेल विसरून गेला. आपण एक प्रयोग सुरू केला होता हेही विसरला. पैसा माणसाला बदलतो म्हणणार्‍याचाच हा नमुना! ओंकार हळुहळू चमत्कारी झाला. त्याच्याही नकळत. बँक अकाऊंटवरचे पैसे वाढताना त्याला बरे वाटत होते. घरात बायको-मुलं सुखी होती. त्यांच्याही गालावर आता मूठभर मास चढलं होतं. एक-दोन नातेवाईक हा विकास पाहून बोटे मोडत होती, पण तेवढीच. बाकींच्यासाठी तो एक देवदूतच ठरला होता.
आता आता तर त्याला रक्कमही सांगावी लागत नव्हती. लोक येतानाच अधिक पैसे आणीत आणि त्याच्या पायावर ठेवत.
ओंकारने हुशारीने स्वतःचा ‘बुवा-बाबा’ होणे टाळले होते. तो उगाच कुणालाही गिर्‍हाईक बनवत नसे आणि रोज फक्त एकालाच भेटून दोन तास गप्पा मारी. नेमके दुःखणे हेरी. त्याबद्दल जे जे सुचेल ते सर्व त्या माणसाला सांगत राही. बाहेर निघताना त्या माणसाचे खांदे रुंदावत. तो उभा राहून लढू लागे आणि जिंकून मोकळा होई. त्याचे श्रेय ओंकारलाच मिळत असे.
सगळं कसं छान चाललं होतं. पण...
***
ओंकार रुग्णालयात खॉटवर पडून आहे. माणसं त्याला भेटायला जमली आहेत. काल जवळचे नातेवाईक येऊन गेले. आज मित्रमंडळी आणि हितचिंतक! बहुतांश त्याची गिर्‍हाईके... नव्हे ज्यांच्या आयुष्यातलं दुःख ओंकारनं गायब केलं ते सर्व.
आलेले लोक शहाळी घेऊन आलेले. त्यांच्यात चौकशा सुरू होत्या, कधी झाला अपघात? कुठे? कसा काय झाला? चूक कोणाची होती? असे प्रश्न आणि ‘अजबच नाही!,’ ‘कसला विचित्र प्रकार!,’ ‘यांच्यावर उगाच ही पाळी!’ असले उद्गार पुन्हा पुन्हा उमटत होते.
झालं असं. काल सकाळी झेरॉक्स काढायला म्हणून ओंकार खाली उतरला. रस्ता क्रॉस करून पलीकडच्या फुटपाथवरून चालत होता. तेवढ्यात एक कार येऊन त्याला धडकली. तो सरळ जाऊन दूध केेंद्रावर आदळला. दुसर्‍या क्षणी बेशुद्ध पडला. ओळखीच्या चहावाल्याने बिल्डिंगमध्ये माहिती दिली. लोक भराभर रस्त्यावर उतरले आणि टॅक्सीत टाकून रुग्णालयात घेऊन गेले.
कारसमोर छोटी मुलगी आली. तिला वाचविण्यासाठी कार डावीकडे घेतली तर तिथे गाय बसलेली. तिच्यावर गाडी जाऊ नये म्हणून आणखी डावीकडे वळवली, तर ती सरळ येऊन ओंकारवर धडकली.
लोक रुग्णालयात येत-जात होते. ओंकारच्या मांडीचं हाड मोडलं होतं. कंबर चेचली होती. लोक हळहळत होते. एक जण दुसर्‍याला म्हणाला, ‘दुसर्‍याच्या दुःखात धावून जाणारा माणूस! आमची सगळी विघ्न यांनीच दूर पळवली.’
दुसरा म्हणाला, ‘ओंकार, तुम्ही लवकर बरे व्हाल. अहो, मला माझ्या आजारपणातून बाहेर काढलात तुम्ही. स्वतःला तर नक्कीच काढाल. आमच्या शुभेच्छा आहेत आपल्या पाठीशी!’
पहिला म्हणाला, ‘आजवर दुसर्‍यांच्या दुःखावर औषधोपचार केलात, आज स्वतःच्या दुःखावर करा आणि मोकळे व्हा यातून!’
ओंकारला त्यांच्या म्हणण्याचं बरं वाटलं आणि वाईटही.
बरं यासाठी की आपल्यामुळे या सर्वांची दुःख नाहीशी झाली आणि वाईट यासाठी की असं कोणतंच औषध आपल्यापाशी नाही.
***
सात वाजल्यानंतर लोक यायचे बंद झाले. बायको आठ वाजता येणार होती. तासभर झोप काढावी म्हणून ओंकार कुशीवर वळला. बराच वेळ निद्रादेवीची प्रार्थना करूनही त्याला झोप येईना आणि एकदम त्याला मगाच्या माणसाचे संवाद ऐकू यायला लागले. दुसर्‍याच्या दुःखात धावून जाणारा माणूस! आमची सगळी विघ्न यानंच दूर पळवली! एक दिवस आले आमच्याकडे हे भावोजी! त्यांना काहीतरी सांगून गेले. मग त्यांनी काय केलं कुणास ठाऊक पण त्या दिवसापासून आमची भांडणच मिटली! मुलाच्या अ‍ॅडमिशनची केवढी चिंता पडली होती. पन्नासएक हजार तरी कर्ज काढावं लागलं असतं. ओंकार आला. म्हणाला, असं असं करा. पैसे वाचतील आणि खरंच की हो अ‍ॅडमिशन झाली डोनेशनशिवाय! त्याला या वाक्यांनी बरं वाटलं, पण मग एक आणखी एकाचं म्हणणं पुन्हा पुन्हा आठवायला लागलं, ‘गंडवतो काय साल्या, तू पण धंद्याला लागला काय? पचणार नाय रे हे असलं!’ हा संवाद आठवला आणि ओंकारचा चेहरा पडला. काळजात धस्स झालं. वाटलं आपण आपल्या कर्माचीच फळं भोगतोय की काय? नक्कीच! नाहीतर त्या अपघातात आपण का उगाच भरडलो असतो. नीट फुटपाथवरून तर चालत होतो. विचारात बुडत असतानाच कंबेरतून कळ गेली. जीवघेणी कळ होती ती!
वाटलं, लोक, त्या सर्व लोकांची पळालेली दुःखे जर पैशाचा शोध घेत आपल्याकडेच आली तर... हा अपघात म्हणजे त्यातल्याच कुणाचं दुःख की काय?

- वैभव बळीराम चाळके

Tuesday, March 6, 2018

विज्ञान- तंत्रज्ञानाच्या विकासाने कुपोषण, गरिबी, आजार हे प्रश्न का सुटले नाहीत?


विज्ञान- तंत्रज्ञानाच्या विकासाने कुपोषण, गरिबी, आजार हे प्रश्न का सुटले नाहीत?


मानवाने विज्ञान-तंत्रज्ञानात केवढी तरी मोठी प्रगती केली आहे. सगळे जग एका क्लिकवर आले आहे परग्रहावर वस्ती करण्याची स्वप्ने मानवाला पडू लागली आहेत. मात्र असे असताना जगातील कुपोषण, आजार, दारिद्य्र, प्रदूषण, युद्ध या आणि अशा समस्या मानवाला संपवता आलेल्या नाहीत. असे का? असा प्रश्न प्रत्येक विचारी माणसाला केव्हा ना केव्हा पडलेला असतोच. अलीकडेच मी पर्यावरणस्नेही जीवनपद्धतीचा विचार आणि स्वीकार करणार्‍या आमच्या विनित वाघे नावाच्या मित्राच्या चिपळूणच्या घरी गेलो होतो. निसर्गाशी नाते सांगणारे आणि निर्माण करणारे घर त्याने तेथे बांधले आहे. त्या भेटीत त्याने त्याच्या एका ज्येष्ठ मित्राने, दिलीप कुलकर्णी यांनी लिहिलेले ‘वेगळ्या विकासाचे वाटाडे’ हे पुस्तक वाचावयास दिले. वर उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात सापडली ‘यिन्-यँग्चा समतोल’ नावाच्या प्रकरणात फ्रिट्यॉप काप्रा या शास्त्रज्ञाच्या विचारांचा परिचय करून दिला आहे. काप्रा म्हणतो, जगाच्या विकासाची दिशा चुकली. विज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमागचे तत्त्व चुकले,  म्हणूनच आज एवढ्या विकासानंतरही माणसाच्या खर्‍या समस्या तशाच आहेत. किंबहुना वाढलेल्या दिसतात.

कोण आहे हा फ्रिट्यॉप काप्रा?
डॉ.फ्रिट्यॉफ काप्रा हे मूळचे ऑस्ट्रिया देशातील व्हिएन्नाचे आहेत. 1966 साली त्यांनी पदार्थ विज्ञानात पदवी मिळवली. मग फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका येथील विद्यापीठांतून त्यांनी संशोधन व अध्यापन केले. अणूचा अभ्यास हे त्यांचे संशोधन क्षेत्र आहे. पण फक्त तेवढाच अभ्यास न करता त्यांनी चीनमधील ताओ तत्त्वज्ञान अभ्यासले. हिंदू, बौद्ध आणि झेन-बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. विज्ञान आणि तत्त्वज्ञान या दोन विरुद्ध गोष्टी मानल्या जातात. विज्ञान जड-द्रव्य यांचा अभ्यास करते तर तत्त्वज्ञान चैतन्य, आत्मा, ब्रह्म वगैरे गोष्टींचा अभ्यास करते. पण काप्रा यांना पदार्थ विज्ञानातील निष्कर्ष तत्त्वज्ञानाशी जुळताना आढळले. त्यातून त्यांनी नवा विचार मांडला. ‘दि ताओ फिजिक्स’ आणि ‘दि टर्निंग पॉइंट’ ही त्यांची या नव्या विचाराची पुस्तके जगभर गाजली. त्यातील ‘दि टर्निंग पॉइंट’ या ग्रंथातील विचार दिलीप कुलकर्णी यांनी उपरोक्त दीर्घ लेखात मांडला आहे.

योग्य दिशा कोणती?
व्यक्ती, समाज हा एका नैसर्गिक चक्राचा भाग आहेत. विश्वाचा एकात्मपणे विचार केला पाहिजे. ही नवी जाणीव निसर्गवादी आहे. संपूर्ण पर्यावरण व्यवस्था ही एक मोठी प्रणाली असून अन्य प्रणाली तिचे उप-उप भाग आहेत. या संपूर्ण जाळ्यातील एखाद्या धाग्याचा स्वतंत्र विचार करता येत नाही. त्या धाग्याचा विचार त्या जाळ्याच्या संदर्भात करावा लागतो. चिनी तत्त्वज्ञानात यिन् आणि यँग अशा दोन कल्पना आहेत. आपल्याकडे जशा प्रकृती-पुरुष कल्पना आहेत, तशाच त्या आहेत. यिन म्हणजे प्रकृती, तर यँग म्हणजे पौरुष! यिन म्हणजे स्त्री, पृथ्वी, रात्र, अंधार, हिवाळा, आर्द्रता, नमतेपणा, समजूतदारपणा, सहकार्य तर यँग म्हणजे पुरुष, सूर्य, दिवस, उजेड, उन्हाळा, कोरडेपणा, उष्णता, ताठपणा, आक्रमकता, स्पर्धात्मकता होय. यशातील गुण परस्पर विरोधी आहेत. ताओ तत्त्वज्ञान सांगते, या यिन-यँगमध्ये समतोल हवा. यिन-यँग हे वाईट नसते. त्याचा अतिरेक वाईट असतो. काप्रा म्हणतात, आपण विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास यिन-यँग मधील यँग गुणाच्या वाढीसाठी केला. म्हणून त्या दोहोतील समतोल संपला. आपल्या समस्या त्यामुळे कमी न होता वाढत गेल्या. त्यातून दारिद्य्र, कुपोषण, आजार, ऊर्जानाश, स्त्रीदमन असे प्रश्न उद्भवले, वाढले.

देकार्तेचा प्रभाव
रेने देकार्ते या गणिततज्ज्ञ-विचारवंताने हे जग विश्व नीर्जीव व उद्देशहीन आहे, एखाद्या गोष्टीचे ज्ञान मिळवायचे तर त्या गोष्टीचे छोटे छोटे भाग करून त्याचा अभ्यास करावा, असे सांगितले. काप्रा म्हणतात, आपल्या गेल्या दोन शतकांच्या विज्ञान प्रगतीच्या मुळाशी हे देकार्ते याचे तत्त्वज्ञान आहे. न्यूटन यांनी सगळे विश्व गणिती पद्धतीने काम करणारे यंत्र आहे असा समज आपल्या कामातून दृढ केला. आपले एकूण विज्ञान-तंत्रज्ञान या देकार्ते यांच्या विचारप्रणालीमुळे चुकीच्या दिशेने विकसित झाले. त्यामुळेच आपण आपल्या समस्या संपवू शकलो नाही.
काप्रा म्हणतात की, अणुयुद्ध, नैसर्गिक पर्यावरणाची हानी, दारिद्य्र, कुपोषण ही वेगवेगळी संकटे नसून ते एकाच महासंकटाचे पैलू आहेत. कालबाह्य झालेल्या विश्वविषयक दृष्टिकोनाला आपण कवटाळून बसल्याने हे महासंकट निर्माण झाले आहे.

अर्थशास्त्राचे ‘शास्त्री’करण
अर्थशास्त्राला ‘शास्त्र’पदास पोहचविण्यासाठी अर्थतज्ज्ञांनी अर्थशास्त्राकडे गुणात्मकपणे न पाहता संख्यात्मक मोजमापांनी पाहायला सुरुवात केली. उत्पादन वाढ, त्यासाठी उपभोग वाढ करता करता हवा, पाणी, जमीन, पर्यावरणाच्या नाशाकडे दुर्लक्ष केपले. आजचे अर्थशास्त्र वाढीच्या संकल्पनेने पछाडलेले आहे. चुकीच्या ‘शास्त्री’करणामुळे असंतुलित वाढ केली गेली. संपत्ती म्हणजे भौतिक संचय अशी व्याख्या तयार झाली. मानवी जीवनाचे संपन्नीकरण झाले नाही. सर्वांना सोबत घेऊन, पर्यावरण सांभाळत केलेली वाढच खर्‍या अर्थाने विकास ठरतो हे लक्षातच घेतले नाही. त्यामुळे जगभर समस्याच समस्या निर्माण झाल्या. रासायनिक खते वाढवून आपण उत्पादन वाढवले. पण त्यावेळी त्या नफ्यातून जमिनीचा घसरलेला पोत वजा करायचे आपण विसरलो. विखंडित विचारांमुळे असे झाले. म्हणून एकत्र विचार हवा. त्यातून खरी संतुलित वाढ आणि संपन्नता साधता आली असती.
तंत्रज्ञानाच्या विकासातही आपण समतोल साधला नाही. त्यातून लोकांचे शोषण झाले. दारिद्य्र वाढले.पर्यावरणाची हानी झाली. आरोग्याचे नुकसान झाले. अतोनात वाढ हीच आपण प्रगती समजून बसलो. त्यांनी काय काय गमावले याचा विचार केला नाही. बहुराष्ट्रीय उद्योग जन्मास आले आणि वाढले. त्यांनी मानवी समाजाचे मोठे नुकसान केले. विनाशकारी वाढ झाली. त्या वाढीने अनेक समस्या जन्मास घातला.
या अतिवेगवान, विचित्र वाढीसाठी पर्यावरणाला घातक मार्गांनी  ऊजेचे उत्पादन केले गेले. अविचाराने  ऊर्जेचा वापर केला गेला. त्यातून प्रदूषण वाढले, नैसर्गिक साधनांचा नाश झाला. जगासमोर ऊर्जासंकट उभे राहिले. जग अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. 50 कोटी लोक कुपोषित आहेत. 40 टक्के लोकांना आरोग्यसेवा नाही. मात्र अनेक गरीब देश आरोग्याच्या क्षेत्रापेक्षा तीनपट अधिक खर्च शस्त्रास्त्रांवर करतात. 50 टक्के शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ शस्त्रास्त्रांच्या संशोधनात गुंतून पडले आहेत.

शेतीचे संकटही देकार्तेच्या विचारामुळे
देकार्तेच्या विचारानुसार, आपण शेतीचाही विचार केला. जमिनीला यंत्र समजून अधिक पिकासाठी जैविक, रासायनिक घटकांचे नियंत्रण करून उत्पादन वाढवले. त्यातून जमिनीचा कस व पर्यावरण बिघडवले. परिणामी शेती संकटात आली. काप्रा म्हणतात, हरित क्रांतीने शेतकर्‍याला, जमिनीला आणि भुकेलेल्यांना फायदा झाला नाही. तेल उद्योगांचे उखळ तेवढे पांढरे झाले.

स्त्रीवादाचा पुरस्कार
काप्रा स्त्रीवादाचा पुरस्कार करतात. ते म्हणतात की, आपली आदर्श पद्धतीही पुरुषसताक, स्त्रीचे दमन करणारी होती. प्रणाली दृष्टिकोन आणि स्त्रीवाद दृ्रष्टिकोन या समांतर प्रक्रिया आहेत. स्त्रियांना योग्य स्थान दिले तरच यिनला आलेले गौणत्व दूर होईल आणि यिन-यँग याचा समतोल साधला जाईल. निसर्गाशी असणारा स्त्रियांचा संबंध अधिक ठसठशीत असतो. त्या विराटाशी, निसर्गाच्या चक्राशी जवळून जोडलेल्या असतात, असेही काप्रा सांगतात.

आरोग्याचे प्रश्न
काप्रा सांगतात, आरोग्याचा विचार शरीराला होणारे रोग व त्यांच्यावरील औषधोपचार एवढाच केला गेला. आरोग्य ही शारीरिकच नव्हे तर मानसिक आणि त्यापुढे जाऊन कौटुंंबिक, सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय कल्पना आहे, याचा एकात्म विचार करायला हवा. तो तसा न केला गेल्यामुळे आज आरोग्याचा प्रश्न गंभीर बनून राहिला आहे. कुपोषणामुळे गरीब देशात आजार व मृत्यू होतात. विकसित देशात हृदयविकार, कर्करोग यांचे प्रमाण अधिक आहे. हिंसाचार, गुन्हेगारी, आत्महत्या, मद्यपान, व्यसने, अपघात या समस्या वाढल्या आहेत. आजचे वैद्यकशास्त्र यातील अनेक आरोग्य समस्यांचा विचारच करीत नाही. शिवाय एकात्मिक विचारही केला जात नाही. त्यातून आरोग्य ही समस्या वाढत चालली आहे.
काप्रा हे खरे तर पदार्थ वैज्ञानिक, पण आपल्या विज्ञान-तंत्रज्ञानाने मानवाचे प्रश्न का सुटले नाहीत याचा विचार करताना त्यांनी तत्त्वज्ञानाला विज्ञानाशी जोडून घेतले. पश्चिमी जगात जन्मलेले, वाढलेले असून पूर्वेकडील तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून एकात्म विचाराची आवश्यकता पटवून दिली. त्यासाठी ग्रंथनिर्मिती केली. आंधळेपणाने विकासापाठी धावणार्‍या आपण सर्वांनी तो विचार, समजून घेतला पाहिजे आणि काप्रा यांची परिचय करून दिल्याबद्दल दिलीप कुलकर्णी यांच्याविषयी कृतज्ञतेची भावनाही मनात जपली पाहिजे.
-      वैभव बळीराम चाळके
       9702723652

Saturday, March 3, 2018

kabir


jugalbandhi on fb......
Pramod bapat… 
आमचा कविमित्र गेली काही वर्षे सातत्याने कबीरांच्या रचना समवृत्तात आणतो आहे. गंगेवरचा एक एक दिवा गोदेवर आणण्याच्या त्याच्या या छंदाचे..नव्हे नव्हे हट्टाचे हे चार चरणांतून कौतुक :
कबीराच्या मागावरती तू, 
छंद म्हणू की हट्ट |
कबीराच्या मागावरचा तू
धरूनी धागा घट्ट ||
https://scontent-bom1-1.xx.fbcdn.net/v/t1.0-1/c0.5.32.32/p32x32/1229930_556398681076500_188244877_n.jpg?oh=8107d081cc3d30af0c004504979b560c&oe=5B475758
कबीर...
मरत मरत हे जग मरते बघ सहज न मरतो कोण
कबिर असा एकदाच मेला मरण न ये परतून
मरत मरत हे जग मेले रे विचार केला नाही
हीच हुशारी : आपुल्या हाती नसते इथले काही
मरायचे तर मरून जा रे सोडून हे जंजाळ
कशाकरिता मरावयाचे हरदिन शंभर वेळ
मरणाला घाबरतो त्याचे प्रेमच असते खोटे
प्रेमघराला पोचायाचे ते तर अवघड मोठे
अनंत निर्गुण अनाहताला पुजतो तोही मरतो
म्हणे कबिर की रामावरती प्रेम करी तो तरतो
ज्या मरणाला जग घाबरते मजलागि आनंद
कबीर म्हणे की ये मरणा ये तू तर परमानंद
पद्यानुवाद- 
सुवर्णसुत ९७०२७२३६५२

Vaibhav
गुरुजी, आपला आशीर्वाद..

bapat   
गुरूजी म्हणूनी आळविशी जरी 
लावून स्वर कोवळा |
कबीरधागा अलख जागवित 
आवळेल ना गळा ||


Vaibhav
शिष्यापाठी भूत लागता गुरू पळे का दूर?
भ्यालेला मी सभोवताली दिसतो फक्त कबीर।
bapat   
कबीर दिसता जवळ-दूर वा 
नुरते पुढती-मागे |
ज्योत अंतरी ठेव तेवती 
कबीर इतुके सांगे ||

Vaibhav
तानाबाना रंग पाहुनी विनतो कबीरशेला
पाठीवरती हात असू द्या कृपाभिलाषी चेला

bapat   
पाठीवरती दुजा कुणाचा 
हवा कशाला हात |
शब्ददिव्यांतून पहा तेवते
त्यां शेल्याची वात ||

Vaibhav
तरी वाटते असावेस तू पाठीशी 'बाप' टा
वरून द्याया थापट माझ्या अधार आतुन घटां

bapat   
'बाप टा'कुनी, गेह फुंकूनी
कबीर गंगेकाठी |
स्वये उजळतो निजघट, घेऊनी
विवेकफुंकणि ओठी ||

Vaibhav
कबीर मोठा गोष्ट निराळी त्याची माझ्याहुनी
पाठीवरती हात असू द्या; इतका तर मी गुणी!

bapat   
पाठ नको, तव पाठ कबीरी,
दोह्यांचा मज हवा |
गोदेमधल्या प्रतिबिंबातील
भिजका दोहा नवा ||

Vaibhav
या मातीच्या कुशीमधुनिया रुजेल काही नवे
पण मातीला तुझ्या कृपेचे जलसिंचन तर हवे

bapat   
स्वयंप्रकाशी बिंब तयाची
जळात दिसती रूपे |
श्रेय जळाचे वा बिंबाचे
उत्तर अगदी सोपे ||
या दोघांचे असणे होते
सार्थ तरी अन् तेव्हा |
दुज्या तटावर उभा कुणीसा
दृश्ये टिपतो जेव्हा ||
बिंब तळपते वरी कबीराचे
तळी वाहती भाषा |
तू टिपसी हे दर्शन-वैभव
पूर्ण इथे गुण-रेषा ||
दीर्घ चरण हे कबीर, भाषा
आणि तुझ्यास्तव तीन |
श्रेय तुझे तुजपाशी आहे
घे इतुके समजून ||

Vaibhav
खरेच तेही! तरी टिपणारा उभा कुणाच्या मुळे?
उभा वृक्ष हा कारण याची तुम्ही शिंपली मुळे

bapat   
मुळे शिंपती, जळे कोणती
कुणास कधी आकळे |
म्हणूनी दडती मुळे, डहाळ्यां-
वरी लखडती फळे ||

Vaibhav
कुणा न कळते पण झाडाला ठावुक असते सारे
कुणामुळे माथ्यावर येती घोस फुलांचे न्यारे

bapat   
पुष्पफळे का कधी सांगती
कुठली माती ..पाणी? |
फुलून यावे, रसार्द व्हावे
यांतच सुफळ कहाणी ||


Vaibhav
सुफळ कहाणी मागे असते त्यास कसे विसरावे
कबिर म्हणे की देव भेटला तरी गुरूस भजावे