पत्ता बोला वृक्ष से… , सुनो वृक्ष बनराय |
अब के बिछड़े न मिले… , दूर पड़ेंगे जाय ||
पान बोलले झाडाला बा, ऐक सांगते तूज
दूर चालले सोडून आता पुन्हा न कधि हितगूज
आकाश कवेत घेणार्या कविता...
उत्तम निर्मिती मूल्य आणि तितक्याच उत्तम कविता असलेला ‘थुई थुई आभाळ’ हा कवितासंग्रह हाती आला आहे. मुलांना साहित्य-संस्कृतीची जाण यावी, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी गेली अनेक वर्षे सातत्याने अत्यंत उत्साहाने काम करणाऱ्या शिक्षक गोविंद पाटील यांचा हा संग्रह अत्यंत देखणा आणि साहित्य मूल्यांनी परिपूर्ण असा आहे. ज्येष्ठ चित्रकार पुंडलिक वझे यांच्या चित्रकारीने या संग्रहातले भावविश्व अप्रतिम साकारले आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्याचे आकाश कवेत घेणारा हा संग्रह आहे.
डॉ. राजन गवस यांनी या संग्रहाची पाठराखण करताना म्हटले आहे, ‘गोविंद पाटील हे मराठीतील प्रतिभावान कवी आहेत. त्यांच्या बालकवितांना रानशिवाराचा गंध आहे...’
‘कामकरी मुंग्या’ या कवितेत शेवटच्या दोन ओळी अशा आहेत
़़‘अपघाताचा वारा नाही
आळसाला थारा नाही’
कवी यात फक्त वर्णन करीत नाही, तर मुलांना नकळत एक संस्कारही देऊन जातो.
‘टोळ’ कवितेमध्ये शेवटच्या दोन ओळी अशा आहेत,
‘सोलापुरात असे टोळ उडत उडत आले
खिशातला माल विकून गब्बरसिंग झाले’
यात केवळ गंमत नाही, सावधानतेचा इशारा आहे.
‘मासोळी’ कवितेमध्ये सुरुवातीलाच केलेले वर्णन बहारदार आहे,
‘पाण्यातली मासोळी पोहण्यात दंग
पाण्यावर आली की चकाकते अंग’
‘ढगांची चित्रकारी’मध्ये,
‘काळे पांढरे ढग मिळून झाले गोळा
आभाळाच्या फळ्यावर चित्र काढली सोळा’
अशी सुरुवात आणि
‘चित्रकारी ढगांची बघत रहा भाऊ
शिकून नवीन काही मजा घेत जाऊ’ असा शेवट आहे.
‘देश म्हणजे’ या कवितेमध्ये,
‘देश हिरव्यागार डोंगररांगा
देश फुलांनी बहरलेल्या बागा
देश असतो सर्वांसाठी सुखाने राहण्याची सुरक्षित जागा
आपला देश जपू या
त्याच्यासाठी खपू या’
अशा विलक्षण अर्थ सांगणाऱ्या, पण साध्या, आवडतील अशा ओळी आहेत.
मुंग्यांवरची ‘सलाम मंग्यांनो’ अशी आणखी एक छान कविता या संग्रहात आहे. त्यातील या ओळी तर फारच सुरेख उतरल्या आहेत,
‘दिशा पाहून सगळं
विचार करून नीट
ऊन पाऊस वारा
पंचांग बिंच्यांग
आंधळ्या श्रद्धाना
नाहीच थारा...’
‘अजबपूर’ नावाच्या कवितेत कवी लिहितो,
‘अजबपूरची प्रजासुद्धा
अजबगजब प्रजा
निवडणुकीत पैसे खाऊन
निवडते नी राजा’
शिक्षक आणि पालकांनी हे थोडे विस्कटून सांगावे अशी कवितेची आणि कवीची अपेक्षा असेल.
‘कल्पनेच्या दुनियेत’ कवितेचा शेवट कवीने असा केला आहे,
‘कल्पनेच्या दुनियेत आज वाटेल खोटे
यातूनच लागतील ना शोध मोठे मोठे’
गोविंद पाटील हे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी प्रयत्न करणारे शिक्षक आहेत, असे जे मी वर म्हटले आहे, ते यातून अधोरेखित होताना दिसते.
मुलांच्या संवेदनशीलतेला आव्हान करण्याचे काम आपल्या नित्याच्या शिकवणीतून करणाऱ्या गोविंद पाटील यांनी ‘नवीन वासरू’ या कवितेमध्ये गाय व्यायल्याचे वर्णनसुद्धा इतके नेमके केले आहे की, मुलांना या सगळ्यातील सौंदर्य कळावे.
‘हळुवार आले बाहेर मुंडके आणि पाय
आजीने जोर लावून मोकळी केली गाय...’
कोरोना काळात शाळा व्यवस्थेला जो धक्का बसला त्याचीही नोंद या कवितासंग्रहातल्या ‘गाणी गाऊ’ नावाच्या कवितेत आढळते,
‘चिव चिव चिव
ऑनलाईन शाळेत रमेना जीव’
या ओळी मोठ्यांच्या जिव्हारी लागतात.
गोविंद पाटील यांच्या या संग्रहाने मोठ्या अपेक्षा निर्माण केल्या आहेत. येत्या काळात त्यांच्याकडून असेच दर्जेदार लेखन होत राहील आणि असेच काही संग्रह रसिकांच्या वाट्याला येतील, अशी अपेक्षा करू या. त्यांना शुभेच्छा देऊ या आणि त्यांच्या कामासाठी कृतज्ञही राहू या!
- वैभव बळीराम चाळके
९७०२७२३६५२
म्हणींचे गाणे
थेंबे थेंबे तळे साचे... आहे ज्ञान हे मोलाचे
आपला तो बाळ्या... जरी करतो टवाळ्या?
अति तिथे माती... नको फुगवूस छाती
बैल गेला झोपा केला ... कसा येणार कामाला?
पळसाला पाने तीन... त्याला बदलणार कोण?
देश तसा वेश... आहे मोलाचा संदेश
प्रयत्नांती परमेश्वर... नाही दुसरे उत्तर
रात्र थोडी सोंगे फार... हेच जीवनाचे सार
नाव मोठे लक्षण खोटे... जाऊ नये अशा वाटे...
सार काढलेली वाणी... त्यांना म्हणतात म्हणी
- सुवर्णसुत वैभव बळीराम चाळके
१३ जानेवारी २०२२
आतले आणि बाहेरचे...
बांगड्या बघा या...
तो काळ शतकाच्या उंबरठ्यावरचा होता. मी रुईया महाविद्यालयात शिकत होतो. कांजूरला माझ्या एका मैत्रिणीकडे अधूनमधून जात असे. आई-वडिलांशिवाय मुंबईत राहत असल्यामुळे मुलुंडला राहणाऱ्या बहिणीकडे आणि कांजूरला राहणाऱ्या या मैत्रिणीकडे गेलो म्हणजे मला आपल्या घरात गेल्याचा आनंद होत असे. त्या काळातल्या वाळवंटी जीवनातील ती ओयासिस होती असे म्हटलात तरी चालेल. मैत्रिणीच्या घरी तिची आजी, आई, बाबा आणि छोटा भाऊ असे पाच जण राहत. छोटा स्वप्निल तेव्हा साधारण दहा वर्षांचा होता असेल. त्या काळात खिशात फारसे पैसे नसत. त्यामुळे मी त्या छोट्या स्वप्निलसाठी पाच रुपयांची त-हेत-हेची दहा चॉकलेट घेऊन जात असे.
मी घरात नव्या पिढीतला मोठा मुलगा होतो आणि आणि माझ्या मागे अनेक भावंडे होती. त्यामुळे मुलांप्रति मला त्या कोवळ्या वयात वयातसुद्धा प्रचंड प्रेम होते. फक्त या घरातल्या छोट्यासाठी नव्हे, तर मी ज्या ज्या मित्रांकडे आणि नातेवाईकांकडे जात असे, त्या घरातील चिमुकल्यांसाठी मी अशीच छान छान चॉकलेट घेऊन जात असे.
लहान मुलांना तुम्ही किती रुपयाचा खाऊ देता याच्याशी काहीही देणेघेणे नसते. त्यांना हवा असतो नानाविध प्रकारचा आणि भरपूर खाऊ. त्यामुळे अगदी दोन-पाच रुपयांचा विचारपूर्वक निवडलेला असा खाऊ किंवा असेच स्वस्तातले एखादे खेळणे मी घेऊन गेलो की त्यांना आभाळभर आनंद होत असे.
या मैत्रिणीच्या भावाचेही तसेच होते. मी घरी गेलो आणि तो नेमका शाळेत असला तर मग मी त्याच्यासाठी घेतलेली ती चॉकलेट्स फ्रिजच्या पायामध्ये ठेवून देत असे. तो शाळेतून आला की त्याला, वैभवदादा येऊन गेला, असं घरी कोणीतरी सांगितलं की, तो धावत जाऊन फ्रिजच्या पायामध्ये चॉकलेट आहेत का शोधत असे. ती तिथे ती हमखास असत.
पुढे काही वर्षांनी तो मोठा झाला आणि त्याच्या घरात मोठ्या बहिणीचा छोटा मुलगा आला. माझे त्या घरचे जाणे कमी झाले असले, आता पूर्वीपेक्षा अधिक दिवसांनी जाणे होत असे, तरी सातत्य होते. आता त्या छोट्या मुलालासुद्धा तशीच सवय लागून राहिली होती. या काही वर्षात माझ्या परिस्थितीत सुधारणा झाली होती आणि माझे चॉकलेटचे बजेट दुप्पट झाले होते.
आता मी दादाचा मामा झालो होतो.
प्रश्न चॉकलेट देण्याचा नाही. त्यामागच्या आनंदाचा आहे. एक गोष्ट आणखी सांगितली पाहिजे. एकदा दादरच्या छबिलदास गल्लीत एक सतरा-अठरा वर्षांची मुलगी अचानक माझ्या पुढ्यात येऊन थांबली आणि म्हणाली, वैभवमामा, ओळखलं?
मी अर्थातच तिला ओळखलं नव्हतं. तिला तसे सांगितल्यावर ती म्हणाली, अरे, मी सोनी!
पण सोनी नावाच्या अनेक मुली असतात. त्यामुळे मी तरीही तिला ओळखू शकलो नाही. तर ती पटकन म्हणाली, अरे मी मी किशोरीची भाची.
... आणि लखकन मला त्या चिमुकल्या सोनीची आठवण झाली. ही तीच मुलगी होती जिला मी अशीच पाच रुपयांची दहा चॉकलेट घेऊन जात असे.
हे सारे आज आठवण्याचे कारण म्हणजे आज तो छोट्या मुलगा- स्वप्निल- खूप महिन्यानंतर भेटला. तो आता तीस वर्षांचा झाला आहे. एका खासगी कंपनीत नोकरी करू लागला आहे. आम्ही भेटलो. गप्पा मारल्या. निघताना त्याने माझ्या हातात ही$$$ एवढी मोठी कॅडबरी दिली आणि म्हणाला, हे तुमच्या छोट्याला घेऊन जा...
त्याने दिलेले ते चॉकलेट हातात घेताच मला अमाप आनंद झाला. त्याला म्हटलं,
आज एक वर्तुळ पूर्ण झालं...
आपण सारे अशी अनेकानेक वर्तुळे पूर्ण करण्याची स्वप्न बघत असतो. सगळे विश्व एक मंडलाकार आहे आणि अशा मंडलाकारानीच आपले आयुष्य समृद्ध केलेले आहे, हे ज्यांना माहीत आहे, त्यांना वर्तुळ पूर्ण होण्यामधली धन्यता समजू शकेल.
मला या क्षणी बा. भ. बोरकर यांची कविता आठवते...
बांगड्या बघा या
बांगड्या बघा या
श्रावण लावण्यराज
लागला फुलाया...
- वैभव बळीराम चाळके
9702 723 652
■■■