कायझेन ही एक एक जपानी कार्यशैली आहे. मोठमोठ्या उद्योगांनी ही कार्यशैली वापरून आपले उद्योग यशस्वी केले आहेत. त्याचप्रमाणे एकेका माणसानेसुद्धा कायझेनचा वापर करून आपल्या आयुष्यात अमुलाग्र बदल केलेला आहे.हजारो-लाखो माणसांनी कायझेनच्या वाटेने आपल्या स्वतःमध्ये अमुलाग्र बदल करून आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळवलेल्या आहेत. ही कायझेनची वाट नेमकी काय आहे आणि या कायझेनच्या वाटेने कसे चालायचे, याचा आपण अगदी थोडक्यात परिचय करून घेऊ या.
निरंतर सुधारणा
कायझेन ही एक कार्यशैली आहे. अनेक जण कायझेन हे तत्त्वज्ञान आहे असे सांगतात. ते जपानी तत्त्वज्ञान असल्याचे अनेक जण सांगत असतात, पण एवढे मोठे शब्द वापरण्याची आवश्यकता नाही. कायझेन म्हणजे निरंतर सुधारणा करीत राहणे आणि त्यासाठी अगदीच छोटीशी सुरुवात करणे होय. एखाद्या कंपनीने कायझेनचा स्वीकार केला म्हणजे ती कंपनी कंपनीच्या सीईओपासून शेवटच्या कर्मचार्यापर्यंत प्रत्येकाला छोट्या छोट्या सुधारणांसाठी मानसिकदृष्ट्या तयार करते आणि सगळ्यांच्या सूचनांमधून योग्य त्या सूचनांचा स्वीकार करीत हळूहळू अधिकाधिक सुधारणा करीत जाते. टोयाटो या कंपनीचे याबाबतीत उदाहरण दिले जाते. कायझेनचा वापर करून नित्य छोट्या-छोट्या सुधारणा करीत टोयाटो कंपनीने आपली व्यवस्था आमुलाग्र बदलली आणि अफाट यश मिळवले. जगभरातील मोटिवेशनल आणि विविध कंपन्या उभ्या करणारे सल्लागार या टोयाटो कंपनीचे उदाहरण देत असतात. सामूहिक प्रयत्नांनी रोज छोटी छोटी गोष्ट करीत गेल्यास मोठी गोष्ट कधी साध्य होते ते कळतच नाही, असा याचा अर्थ आहे.
कायझेनची पाच तत्त्वे
कायझेनची पाच मुख्य तत्त्वे सांगितली जातात. त्यातले पहिले तत्त्व आहे. सांघिक काम. जेव्हा तुम्ही सगळ्यांनी मिळून सुधारणा करायचे ठरविता तेव्हाच तुम्ही खर्या अर्थाने सुधारणेकडे जात असता. आपली कंपनी, आपला संघ, आपली सोसायटी, आपले राज्य, आपले राष्ट्र सुधारण्यासाठी अशी सांघिक वृत्ती अत्यंत गरजेची असते. ती निर्माण केली पाहिजे, असे कायझेन सांगते. दुसरे तत्त्व आहे स्वयंशिस्त. स्वयंशिस्तीशिवाय कोणताही बदल शक्य नाही, असे कायझेनम्हणते. कायझेनचे तिसरे तत्त्व उन्नत मनोबल अर्थात तुमचा आत्मविश्वास हे होय. रोज थोडी गोष्ट पण निरंतर करत राहिल्याने आत्मविश्वास वाढीस लागतो आणि मग बदल हमखास होतो असे कायझेन मानते. आपल्या एकूण कार्यक्षेत्रात अशीच प्रगती झाली पाहिजे. त्यात सुधारणा झाली पाहिजे, असेही कायझेनचे तत्त्व आहे. सुधारणेसाठी नवनवीन पर्याय सुचवले जावेत, असेही कायझेन मानते. या पाच तत्त्वांच्या जोरावर कायझेन एखाद्या गोष्टीत, एखाद्या कंपनीत, एखाद्या माणसाला रोज थोडा थोडा करून अंतिमता मोठा बदल करू शकते.
कायझेनमध्ये स्वच्छता, सुव्यवस्था, साधनशुचिता, प्रमाणबद्धता आणि शिस्त या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. एखादी गोष्ट चुकीची घडते आहे, असे लक्षात येताच ती लक्षात आलेल्या माणसाने ताबडतोब थांबून सुधारायला हवी, असे कायझेन सांगते.
वन मिनीट प्रिन्सिपल
कायझेनचा वापर कसा करायचा, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. आपण विविध कामांसाठी कायझेनचा वापर करू शकतो. एक उदाहरण म्हणून आपण व्यायाम करण्याची सवय लावण्यासाठी कायझेन कसा वापरता येईल ते पाहू. दरवर्षी हिवाळा आला की, सुट्टी मिळाली की किंवा पाऊस सुरू झाला की, सकाळी फिरायला जाण्याचा, सकाळी रोज व्यायाम करण्याचा, जिममध्ये जाण्याचा संकल्प आपण करीत असतो. बहुदा हा संकल्प तडीस जात नाही. कायझेनअसे म्हणते की, आपल्या मनावर अशा कोणत्याही संकल्पाचा मोठा ताण येतो आणि अशाप्रकारे कोणताही ताण आला की मनाची स्वाभाविक प्रतिक्रिया अशी असते की, तो ताण दूर करावा. मग विविध कारणे पुढे करीत आपण ते करणे टाळतो आणि ताण दूर करतो. कायझेन नेमके हेच सांगते की, असा ताण येऊ नये, अशा पद्धतीने कामाला लागा.
कोणत्याही दिवशी व्यायाम करण्याचा संकल्प करा आणि त्या दिवशी किमान एक मिनिट व्यायाम करा. त्यानंतर ठरलेल्या विशिष्ट वेळेला घड्याळाचा आलार्म लावून घ्या. आलार्म होताच व्यायाम करायला सुरुवात करा. आता तुम्हाला दिवसातील 14 40 मिनिटांनी पैकी फक्त एक मिनिटं व्यायाम करायचा असल्याने मानसिक ताण येणार नाही. फक्त एक गोष्ट कटाक्षाने पाळली पाहिजे, आलार्म झाला की व्यायाम सुरू. त्यात खंड पडता कामा नये. सातत्याने तुम्ही असे करीत राहिलात की तुमच्या मनाला त्याची सवय होऊन जाते. तुम्हाला माहीतच असेल की कोणतीही सवय सहजासहजी सुटत नाही. त्यामुळे सतत काही दिवस निरंतर एक मिनिटाचा व्यायाम करा. असे एकवीस दिवस केल्यावर तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढीस लागेल. मग या एक मिनिटाची तीन किंवा पाच मिनिटे करा. आता तुम्हाला सवय झालेली असेल. त्यामुळे तीन किंवा पाच मिनिटे व्यायाम करणे अवघड वाटणार नाही. त्याचा मनावर ताण येणार नाही. असे करत हळूहळू हा वेळ वाढवत न्या. तीन मिनिटे किंवा पाच मिनिटे या वेळेवर काही दिवस कायम राहा. मग अपेक्षित असलेला एक तास, दीड तास वेळेपर्यंत व्यायाम वाढवत न्या. असे केल्याने त्याची सवयच लागेल आणि कोणतीही सवय एकदा लागली की ती सुटत नाही, हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेच.
सातत्य टिकविणे सोपे झाले
जपानमध्ये या कायझेनचा शोध लागल्यावर माणसाच्या आयुष्याला जबरदस्त कलाटणी देणारे एक तत्त्वच हाती आले. या कायझेनचा अर्थ आहे, शहाणपणाने केलेला बदल, येथील काई म्हणजे बदल आणि झेन म्हणजे शहाणपण. झेनकथांबद्दल आपण ऐकले असाल. त्या सगळ्या शहाणपणाच्या कथा आहेत. त्यातलेच हे झेन होय. मकाई इमाई यांनी वन मिनिट प्रिन्सिपलचा शोध लावला. मग जपान या तंत्राच्या सहाय्याने यशाचे शिखर गाठणारा देश ठरला. कोणत्याही गोष्टीत यश मिळवायचे असेल तर सातत्य महत्त्वाचे असते आणि हे सातत्य तर टिकवणे अवघड असते. वन मिनिट प्रिन्सिपलमुळे सातत्य टिकविणे सोपे झाले. एक मिनिट काम करायचे म्हटल्यावर माणूस ते सातत्याने करू लागला. त्याला त्याचा त्रास होईनासा झाला आणि हळूहळू त्याला त्याची सवय लागली. त्याचा आत्मविश्वास वाढला आणि म्हणताम्हणता मग वेळ वाढवत नेला, तरी त्याची सवय मोडली नाही. असे म्हणतात प्रत्येक दिवशी निश्चित वेळी, फक्त एक मिनिट, एखादी गोष्ट तुम्ही करीत राहिलात की तिची तुम्हाला सवय होते. वन मिनिट प्रिन्सिपल नेमके हेच सांगते. या वन मिनिट प्रिन्सिपलचा वापर करून तुम्ही रोज एका पुस्तकाचे एकच पान वाचायला सुरुवात केली, तर लवकरच पुस्तक वाचून होईल. शिवाय वाचनाची सवय लागेल. रोज एकच सूर्यनमस्कार घालायला ठरवलात तर सूर्यनमस्कार घालायची सवय लागेल. रोज एक योगासन करायचे ठरविले तर लवकरच योगासनांमध्ये तुम्ही प्रवीण व्हाल. रोज एक मिनिट ध्यानधारणा करायची ठरवलात तर लवकरच ध्यानधारणेची तुम्हाला सवय लागेल. रोज एक स्पेलिंग पाठ केला तर वर्षाला 365 स्पेलिंग पाठ होतीलच, पण तुम्हाला अधिक स्पेलिंग पाठ करावी वाटतील. त्याची तुम्हाला सवय लागेल. रोज एकच पॅरेग्राफ सुंदर हस्ताक्षरात लिहिलात, तर तुमचं हस्ताक्षर संदरह होईल. ह्या एका मिनिटाच्या सवयीचा केवढा मोठा परिणाम होऊ शकतो, याची तुम्ही कल्पना करू शकाल. झेन असं सांगतो की एकवीस दिवस जर तुम्ही सातत्य टिकू शकतात, तर तुम्ही आयुष्यभर ते टिकवू शकता. तेव्हा तुम्हाला अभिप्रेत असलेलं काम एक मिनिटासाठी करायची सुरुवात तुम्ही कधीपासून करत आहात?
कायझेनच्या वाटेने जात आपण स्वतःमध्ये, आपल्या मुलांमध्ये, आपल्या शाळा-कॉलेज, संस्था, कंपन्या, सोसायट्या, उद्योग, गाव, राज्य यांच्यात ही सहज बदल करू शकतो.