Tuesday, March 24, 2020

ओळख

ओळख
- वैभव बळीराम चाळके

तुम्ही लेखक आहात ना? माझ्यावरही एक गोष्ट लिहा...
तुला कोण म्हणलं..?
गेह...
कसं कळलं खरं सांग?
सांगितलं कोणी तरी...
कसं कळलं? म्हटलं तू परिचयाची निघतेस की काय...
डोन्ट वरी तसं असलं तरी...
ते जाऊ दे... तुझं नाव?
गंमत आहे नाही मोठी... आपण ओळख करून घेतली नाही एकमेकांची...
तुमचं नाव कळेल का मला?
विद्याधर रणदिवे...
वा छान...
पण तुझं नाव काय?
मी शाल्मली सागवेकर....
पुण्यात कशी?
मी कोल्हापूरची... इंटरव्यूसाठी आले होते म्हणून येथे राहिले. हे पुण्यातील सर्वात चांगलं हॉटेल आहे असं बाबांना वाटते. एक आयटी कंपनी लॉन्च होते आहे. मी बीएससी आयटीआय आहे.
वा..
वाटत नाही का?
चांगला पैसा आहे म्हणून म्हटलं...
फ्रेशर?
जस्ट कम्प्लिट...
तुम्ही?
मी लेखक आहे. दोन-चार सिनेमांच्या कथा लिहिल्या आहेत. एक कॉलम सुरू आहे. बँकेत नोकरीला होतो. गेल्याच वर्षी व्हीआरएस घेतली आणि पूर्णवेळ लेखक झालो.
पैसे मिळतात पुरेसे?
पुरेसे नाही मिळत पण मान मिळून धन चांगले मिळते.
अच्छा. तुम्ही मिस्टर विनायक कुर्तडकर ओळखता? ते माझे दूरचे काका लागतात.
हो का? थेट संबंध नाही आला कधी पण नाव ऐकून आहे...

असं वरवरचं बोलणं झालं. जुजबी ओळख झाली आणि शाल्मली जायला निघाली. जाताना म्हणाली रात्री घाईगडबडीत ओळखच करून घ्यायची राहिली. मला वाटलं सकाळी तुम्ही लवकर उठून जाल आणि भेट व्हायची नाही.
विद्याधर नुसताच हसला. बाय द वे ते जाऊदे तुम्हाला हे सांगायला आले मी की आपली ओळख आत्ताच होतेय. काल आपण भेटलोच नव्हतो.
का? तो सुचक हसतो.
ते तुम्हाला कळते...फक्त आता एवढंच लक्षात ठेवा.
तू पहिल्यांदाच अनुभवले हे...
नाही दुसऱ्यांदा...
कुठे?
इथेच...
कोणासोबत?
माहीत नाही...
व्हॉट माहित नाही?
हो खरंच माहीत नाही?
मागच्या वेळेला... मला वाटलं होतं या वेळीही असेल, पण तो नव्हता.... पण तुम्ही होता... शाल्मली निघाली. निघताना तिने त्याचा हात हातात घेतला. तिला खेचून जवळ घेतले आणि कुशीत घेत पाठीवर थोपटत तो तिला म्हणाला,
आय मिस यु... थँक्स

पाच मिनिटांनी शाल्मली त्याच्या रूममधून बाहेर पडली. तो दारापर्यंत आला निरोप घेऊन तो पुन्हा येऊन खुर्चीत बसला. पटकथा लिहायची होती, पण त्याला तो रात्रीचा प्रसंग सिनेमासारखा पुन्हा पुन्हा दिसत राहिला...

रात्री जेवण झाल्यावर विद्याधर दाराबाहेर येऊन उभा होता. हॉटेलची रचना सी अक्षराच्या आकाराची होती.
तएका बाजूला छोटेसे मैदान होते. त्या दिशेने वारे वाहत होते. म्हणून त्याच कोपऱ्यावर विद्याधर उभा होता. तेवढ्यात समोरच्या खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि मानेवर हात फिरवत एक सुंदर तरुणी गॅलरीत येऊन उभी राहिली. तिने बहुतेक नुकतीच आंघोळ केली असावी.  तो तिच्याकडे एकटक बघत होता. तिचे लक्ष समोरच उभ्या असलेल्या त्याच्याडे गेले. तो तिच्याकडेच पाहत होता. एक क्षण त्याला ती पाहते हे कळले नाही. त्याचे लक्ष तिच्या नजरेकडे नव्हते. त्याला जेव्हा ती पाहते हे कळले तेव्हा तो क्षणभर दचकलाच. मग स्वतःला सावरून त्याने तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण तो फसला. मग बराच वेळ दोघे एकमेकाला फसवत... खेळवत राहिली. तिला काय वाटले कुणास ठाऊक ती आपल्या खोलीत गेली. तो अस्वस्थपणे तिथेच उभा राहिला. काही मिनिटांनंतर पुन्हा दार उघडलं गेले आणि धाडकन पुन्हा लावले गेले. त्या क्षणिक वेळेत तिचा चेहरा लाजलेला... उजळलेला भांबावलेला दिसला त्याला. मग मिनिटभर विचार करून तो तिच्या दरवाजापाशी गेला आणि त्याने दारावर नॉक केलं.
दार उघडायला उशीर झाला तेव्हा त्याला आपण उगाच दार वाजवले असे वाटून गेले. तिने दार उघडले. तो आत गेला. मग त्याने इकडे तिकडे नजर फिरवली.
कोणी नाही मी एकटीच आहे...ती म्हणाली. सुन्दर..
तो थोडा पुढे गेला तिने तेवढ्यात दार ढकलले. तिच्या बिछान्यावर कपडे पडलेले होते. त्यातला नेमका कपडा उचलून त्यांने तिला दाखवला. ती अजून पुढे आली आणि तिने ते सगळे कपडे पटापट छातीशी धरले. तो बिछान्यावर बसला. समोर आरसा होता. त्या आरशात बघत तो म्हणाला,
तुला भीती नाही...
हो वाटते पण थोडी थोडी...
अंगात ताकद भरून वाहत होती. पण तरी सर्वांगाला एक विचित्र थरथर आली होती. म्हणूनच त्याची शब्द स्पष्ट कणखर उच्चारले जात नव्हते. पण शेवटी जोमाने भीतीवर मात केली. किती किती दिवसात न लाभलेल्या सुख उपभोगून तृप्त झालेल्या त्याने तिची रूम सोडली तेव्हा बायकांच्या आठवणीचा सल त्याच्या तृप्त मनाला टोचू लागला. लवकरच त्यांने ही टोचणी तत्त्वज्ञानाच्या औषधाने बरी करून घेतली.
मुक्त झालेल्या हार्टाचाच हा पुनर्जन्म...  तो मनाशीच म्हणाला.
तिने पुन्हा आंघोळ केली. कपडेही बदलले. तरी तिला आपण अजून नग्न आणि अस्वच्छ आहोत असे वाटत होते. पण तरी एका अनोख्या सुखाच्या अनुभवानं मन भरले होते. तो अनुभव अळवाच्या पानावरील मोत्यासारखा सुंदर पण वार्‍यानं हिंदकळत माती होऊ पाहत होता. सुसंस्कृतेचं हे वारे जरा जास्तच वाहतेय असे तिला वाटले होते.

Sunday, March 22, 2020

भाऊरावांचा चारोळीसंग्रह

भाऊरावांनी चारोळ्या संग्रह दाखवायला बोलावलं तेव्हा मला कुठे झक मारली आणि यांना त्या दिवशी तो चारोळीसंग्रह दिला असं वाटून गेलं.

दोन एक महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. घरच्या पुस्तकांमधले नको असलेली पुस्तके मी काढून टाकत होतो. तेव्हा बाबुराव दारावरून जाताना दिसले. सहज हाक मारून त्यांना मी तो बकवास चारोळीसंग्रह दिला.

म्हटले वाचा आवडेल कदाचित...

आणि पुढच्या दोन दिवसात बाबूरावांचा चारोळीकार म्हणून जन्म झाला. आता तीन महिने व्हायच्या आधी बाबूरावांचा चारोळी संग्रह छापून आलाय.

मी काहीशा नाराजीनेच बाबूरावांची पायरी चढलो.

या या या बसा असे म्हणत त्यांनी माझं स्वागत केलं आणि किचनकडे पाहात दोन कप चहा टाक असा आदेशही दिला.

मी पाय पसरून बसलो. तसे बाबुराव चारोळीसंग्रहाच्या दोन प्रती माझ्यासमोर ठेवत मला म्हणाले, हे बघा. आलं आपलं पुस्तक.

मी त्यातली एक प्रत उचलून हातात घेत पाहू लागलो, तर पटकन माझ्या हातातून ती कॉपी घेईल बाबुराव म्हणाले, असू देत त्या दोन. तुम्हाला ठेवा. मी ही पूरत वाचून दाखवतो.

मग मुखपृष्ठावरची एक आणि मलपृष्ठावरची एक असे पुस्तक पलटून वाचून झाल्यावर त्यांनी अर्पणपत्रिका वाचून दाखवली...

माझ्या कोवळ्या वयात माझ्या मनाला प्रेमाचा पहिला अंकूर फोडणाऱ्या यमुला...

मला ही यमू कोण, असा प्रश्न विचारा वाटला, पण थोड्याच वेळात वहिनी चहा घेऊन येणार होत्या म्हणून मी तो मनातल्या मनात दाबून टाकला.

बाबुरावांनी पहिल्या पानापासून चारोळी सांगायला सुरुवात केली आणि आणि आपल्या पद्धतीने माझ्या प्रतिसादाची जराही दखल न घेता 105 चारोळ्या एका दमात वाचून दाखवल्या.

त्यातली एकही चारोळी चंद्रशेखर गोखले यांच्या उंचीची नव्हती.

त्यामुळे कवितेच्या उंचीच्या आसपास पोहोचण्याचा प्रश्नच नव्हता.

मी खोटे वावावा... खूप कष्ट केलेत... असं म्हणालो. त्यात वावावा आहे खोटे होते आणि कष्ट केलात हे खरे होते. कारण या असल्या चारोळीसंग्रहामध्ये छापून येणाऱ्या चारोळ्या वा म्हणायच्या लायकीच्या नसतात. मात्र गाढव कवींनी कष्ट मात्र अमाप  घेतलेले असतात.

एकशे पाच चारोळ्या वाचून झाल्यावर त्यांच्यावरची माझी प्रतिक्रिया जाणून घेत असतानाच वहिनी दोन कप चहा देऊन आल्या.

चहा फक्कड बनविला होता. एकशे पाच चारोळ्या ऐकण्याचे श्रम पहिल्या घोटात दूर झाले. झक मारली आणि या चारोळीकाराच्या हाती सापडलो असे वाटले होते ते कुठच्या कुठे पळून गेले आणि बाबुरावांनी दररोजचा एखादा संग्रह काढावा आणि अशा एका चहाची सोय करावी, असाही विचार मनात येऊन गेला.

चहा देता देता वहिनी म्हणाल्या...
कसा आहे हो संग्रह यांचा? आवडल्या का चारोळ्या?

त्यावर मी म्हणालो, त्यातल्या निम्म्या तुमच्यावरच आहेत की...

या वाक्याचा अर्थ तुमच्या इतक्याच सुमार असा त्यांनी घेतला असेल काय, असेही मनात वाटून गेले...

बाबुराव म्हणाले...
येत्या गुढीपाडव्याला आपली सत्यनारायणाची पूजा असेल तेव्हा अर्धा तास सांस्कृतिक कार्यक्रमात या चारोळ्यांचे जाहीर अभिवाचन करणार आहे. आता अध्यक्ष महाराजांनी आडकाठी केली नाही तर...

मी म्हटले, ते आडकाठी करणार नाहीत. त्यांना फक्त आदल्या दिवशी पियुष बारमध्ये बसवा. सगळे सुरळीत होईल  माझ्या या वाक्यावर बाबुराव गडगडाटी हसले.

येतो म्हटलं आणि निघालो.

वहिनी म्हणाल्या रात्र-रात्र जागून लिहिल्या चारोळ्या... एक चारोळी लिहिताना पंचवीस-पंचवीस कागद फाडले... तुम्ही पण अध्यक्षांच्या कानावर घाला... कष्टाचं कौतुक झालं बरं वाटेल माणसाला...

मी बहिणींना हो म्हणालो... मनात नाही म्हणालो...

घरी येऊन बायकोला बाबुरावांच्या चारोळी वेडाबद्दल सांगू लागलो. तेव्हा ती म्हणाली ते बाकीचे सोडा, थेट उदाहरणे सांगा...

म्हणून मग तिला मी माझ्या लक्षात राहिलेल्या त्यांच्या तीन चारोळ्या सांगितल्या...

कागदावर कागद लिहिले
आणि टाकले फाडून
चारोळ्यासाठी पाहिली आहेत
दोनशे यमके ताडून

गालावरती पावडर
पावडर वरती लाली
ती बघताना लक्षात आलं
वयात आली साली

राज्यात सीएम
दिल्ली पीएम
निवडणूक आली की
मी मतदारच होतो यम...

102 चारोळ्या लक्षात राहिल्या नाही.

आणि या तीन चारोळ्या कधी विसरल्या जातील याची मी वाट पाहतोय...
मुंगीचे महाभारत

कोरोना वायरस या या इवल्याशा जीवाने संपुर्ण जगाविरुद्ध युद्ध पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या परिचयाच्या सगळ्यात छोट्या प्राण्याबद्दल, म्हणजे मुंगीबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी सांगणारा हा लेख...

मुंगीवर लेख लिहिणे ही काही मुंगीएवढी छोटी गोष्ट नाही. मुंगी माणसाच्या जीवनाला जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि जीवापासून शिवापर्यंत चिकटलेली आहे. या मुंगीच्या आभाळाएवढ्या गोष्टी एका लेखात मांडणे केवळ अशक्य आहे. तरीही या अफाट विषयातला काही भाग दाखवून मुंगीविश्वाचे थोडके दर्शन घडविण्याचा हा छोटासा प्रयत्न...

मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी हा संत मुक्ताबाईचा अभंग कूटरचना म्हणून गेलीस सातशे-आठशे वर्षे उलगडण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि दर वेळी त्यातील काही तरी शिल्लकच राहिले आहे, असे जाणकारांना वाटत आले आहे.
कोशिश करने वालों की हार नहीं होती, या हिंदीमधल्या अत्यंत लोकप्रिय कवितेतील एक मुंगी भिंतीवर पुन्हा पुन्हा चढण्याचा प्रयत्न करते आणि पुन्हा पुन्हा पडत राहते हे आपण कधी तरी वाचले किंवा ऐकले असेल. मुंगीचे असे संदर्भ आपल्याला आपल्या साहित्यात विपुल प्रमाणात सापडतात.

मुंगी हा एवढासा प्राणी असला तरी मुंगीचे पराक्रम मात्र तोंडात बोट घालायला लावणारे आहेत. मुंगीबाबतच्या या काही खोट्या वाटू शकतील अशा खऱ्याखुऱ्या गोष्टी.

असे म्हणतात की मुंगी आपल्या वजनापेक्षा 50 पट अधिक वजन उचलू शकते. काही प्रकारच्या मुंग्या त्याहून अधिक वजन उचलतात असेही अलीकडच्या संशोधनात लक्षात आले आहे. मुंगीच्या वेगवेगळ्या जाती जगभर आढळतात. जगात आजवर आढळलेल्या मुंग्यांच्या जाती 12000 इतक्या आहेत. माणसाच्या शरीरात जसेच स्नायू असतात तसे मुंग्यांच्या शरीरातसुद्धा असतात. मात्र मुंग्यांचे स्नायू माणसाच्या स्नायूंच्या तुलनेत त्यांच्या शरीराच्या तुलनेत खूपच अधिक असतात. असे म्हणतात की जगातील सगळ्या माणसांचे वजन केले आणि सगळ्या मुंग्यांचे वजन केले तर ते एकसमान होईल, इतक्या मोठ्या प्रमाणावर पृथ्वीवर मुंग्या अस्तित्वात आहेत.

मुंग्यांबाबत आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मुंग्या दुसऱ्या वारुळातील मुंग्यांना किडन्याप करतात आणि आपल्या वारुळातील कामाला लावतात. मुंग्या या पृथ्वीतलावर 130 दशलक्ष वर्षांपासून अस्तित्वात असल्याचे सांगतात. मुंग्यांच्या वारुळात काम करणार्‍या सगळ्या मुंग्या या माद्या असतात. नर मुंग्याना पंख असतात आणि केवळ प्रजनन हे एकच काम त्यांच्याकडे असते. आपले काम उरकले म्हणजे नर मुंग्या प्राण सोडतात.

आपल्याकडे आढळणाऱ्या काळ्या मुंग्यांचे आयुष्य पंधरा वर्षांहून अधिक असते. कुत्र्यापेक्षा मुंग्या जास्त जगतात. राणी मुंगी मात्र 30 वर्षांपर्यंत जगते. बुलेट मुंगी नावाची एक मुंगी आहे तिचा चावा जगातील सगळ्यात भयंकर समजला जातो. 240 हॉल्टचा शॉक लागल्यासारखी ती मुंगी चावते. सैनिक मुंग्या दुसऱ्या वारुळातील अंडी चोरतात आणि त्या अंड्यातून जन्माला आलेल्या मुंग्यांना गुलामासारख्या वागवतात. एखाद्या वारुळातील राणी मुंगी मेली तर पुढच्या काही महिन्यात त्या वारुळातील सगळ्याच्या सगळ्या मुंग्या मरण पावतात. मुंग्यांना कान नसतात. त्या व्हायब्रेशनवरून संदेशाचे वहन करतात. मुंग्यांना दोन पोटे असतात. एक त्यांना स्वतःसाठी आणि एक दुसऱ्याला घालावयाचे अन्न ठेवण्यासाठी.

जगातील सगळ्यात मोठे वारूळ सहाशे मैल इतके मोठे असून ते दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये आहे. मुंग्यांना फुफ्फुस नसल्यामुळे त्या संपूर्ण दिवस पाण्याखाली जिवंत राहू शकतात. बुल डॉग नावाची मुंगी माणसाला चावल्यास पंधरा मिनिटात माणसाचा मृत्यू होतो. पक्ष्यांना काळ्या मुंग्या आवडतात. काळ्या मुंग्या मारून पक्षी आपल्या पंखात ठेवतात. त्यामुळे पक्षांना परजीवीपासून असणारा धोका टळतो.

बुरशीच्या प्रादुर्भावामुळे काही मुंग्या वेड्यावाकड्या वागू लागतात. ही गोष्ट लक्षात आल्यावर वारुळातील इतर मुंग्या अशा मुंग्यांना ठार मारून टाकतात.

मुंगी हा छोटासाच प्राणी आहे पण त्याच्या या अशा कहाण्या मात्र अजब-गजब आहेत. मराठीतल्या एका पुस्तकाचे ( मोठ्या लेखकाचे चरित्र) नाव 'एका मुंगीचे महाभारत' असे आहे. मुंगीचे हे महाभारताइतकेच विलक्षण वास्तव वाचल्यावर अचंबित व्हायला न होईल तर नवल...