Sunday, March 22, 2020

भाऊरावांचा चारोळीसंग्रह

भाऊरावांनी चारोळ्या संग्रह दाखवायला बोलावलं तेव्हा मला कुठे झक मारली आणि यांना त्या दिवशी तो चारोळीसंग्रह दिला असं वाटून गेलं.

दोन एक महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. घरच्या पुस्तकांमधले नको असलेली पुस्तके मी काढून टाकत होतो. तेव्हा बाबुराव दारावरून जाताना दिसले. सहज हाक मारून त्यांना मी तो बकवास चारोळीसंग्रह दिला.

म्हटले वाचा आवडेल कदाचित...

आणि पुढच्या दोन दिवसात बाबूरावांचा चारोळीकार म्हणून जन्म झाला. आता तीन महिने व्हायच्या आधी बाबूरावांचा चारोळी संग्रह छापून आलाय.

मी काहीशा नाराजीनेच बाबूरावांची पायरी चढलो.

या या या बसा असे म्हणत त्यांनी माझं स्वागत केलं आणि किचनकडे पाहात दोन कप चहा टाक असा आदेशही दिला.

मी पाय पसरून बसलो. तसे बाबुराव चारोळीसंग्रहाच्या दोन प्रती माझ्यासमोर ठेवत मला म्हणाले, हे बघा. आलं आपलं पुस्तक.

मी त्यातली एक प्रत उचलून हातात घेत पाहू लागलो, तर पटकन माझ्या हातातून ती कॉपी घेईल बाबुराव म्हणाले, असू देत त्या दोन. तुम्हाला ठेवा. मी ही पूरत वाचून दाखवतो.

मग मुखपृष्ठावरची एक आणि मलपृष्ठावरची एक असे पुस्तक पलटून वाचून झाल्यावर त्यांनी अर्पणपत्रिका वाचून दाखवली...

माझ्या कोवळ्या वयात माझ्या मनाला प्रेमाचा पहिला अंकूर फोडणाऱ्या यमुला...

मला ही यमू कोण, असा प्रश्न विचारा वाटला, पण थोड्याच वेळात वहिनी चहा घेऊन येणार होत्या म्हणून मी तो मनातल्या मनात दाबून टाकला.

बाबुरावांनी पहिल्या पानापासून चारोळी सांगायला सुरुवात केली आणि आणि आपल्या पद्धतीने माझ्या प्रतिसादाची जराही दखल न घेता 105 चारोळ्या एका दमात वाचून दाखवल्या.

त्यातली एकही चारोळी चंद्रशेखर गोखले यांच्या उंचीची नव्हती.

त्यामुळे कवितेच्या उंचीच्या आसपास पोहोचण्याचा प्रश्नच नव्हता.

मी खोटे वावावा... खूप कष्ट केलेत... असं म्हणालो. त्यात वावावा आहे खोटे होते आणि कष्ट केलात हे खरे होते. कारण या असल्या चारोळीसंग्रहामध्ये छापून येणाऱ्या चारोळ्या वा म्हणायच्या लायकीच्या नसतात. मात्र गाढव कवींनी कष्ट मात्र अमाप  घेतलेले असतात.

एकशे पाच चारोळ्या वाचून झाल्यावर त्यांच्यावरची माझी प्रतिक्रिया जाणून घेत असतानाच वहिनी दोन कप चहा देऊन आल्या.

चहा फक्कड बनविला होता. एकशे पाच चारोळ्या ऐकण्याचे श्रम पहिल्या घोटात दूर झाले. झक मारली आणि या चारोळीकाराच्या हाती सापडलो असे वाटले होते ते कुठच्या कुठे पळून गेले आणि बाबुरावांनी दररोजचा एखादा संग्रह काढावा आणि अशा एका चहाची सोय करावी, असाही विचार मनात येऊन गेला.

चहा देता देता वहिनी म्हणाल्या...
कसा आहे हो संग्रह यांचा? आवडल्या का चारोळ्या?

त्यावर मी म्हणालो, त्यातल्या निम्म्या तुमच्यावरच आहेत की...

या वाक्याचा अर्थ तुमच्या इतक्याच सुमार असा त्यांनी घेतला असेल काय, असेही मनात वाटून गेले...

बाबुराव म्हणाले...
येत्या गुढीपाडव्याला आपली सत्यनारायणाची पूजा असेल तेव्हा अर्धा तास सांस्कृतिक कार्यक्रमात या चारोळ्यांचे जाहीर अभिवाचन करणार आहे. आता अध्यक्ष महाराजांनी आडकाठी केली नाही तर...

मी म्हटले, ते आडकाठी करणार नाहीत. त्यांना फक्त आदल्या दिवशी पियुष बारमध्ये बसवा. सगळे सुरळीत होईल  माझ्या या वाक्यावर बाबुराव गडगडाटी हसले.

येतो म्हटलं आणि निघालो.

वहिनी म्हणाल्या रात्र-रात्र जागून लिहिल्या चारोळ्या... एक चारोळी लिहिताना पंचवीस-पंचवीस कागद फाडले... तुम्ही पण अध्यक्षांच्या कानावर घाला... कष्टाचं कौतुक झालं बरं वाटेल माणसाला...

मी बहिणींना हो म्हणालो... मनात नाही म्हणालो...

घरी येऊन बायकोला बाबुरावांच्या चारोळी वेडाबद्दल सांगू लागलो. तेव्हा ती म्हणाली ते बाकीचे सोडा, थेट उदाहरणे सांगा...

म्हणून मग तिला मी माझ्या लक्षात राहिलेल्या त्यांच्या तीन चारोळ्या सांगितल्या...

कागदावर कागद लिहिले
आणि टाकले फाडून
चारोळ्यासाठी पाहिली आहेत
दोनशे यमके ताडून

गालावरती पावडर
पावडर वरती लाली
ती बघताना लक्षात आलं
वयात आली साली

राज्यात सीएम
दिल्ली पीएम
निवडणूक आली की
मी मतदारच होतो यम...

102 चारोळ्या लक्षात राहिल्या नाही.

आणि या तीन चारोळ्या कधी विसरल्या जातील याची मी वाट पाहतोय...

No comments:

Post a Comment