Sunday, March 22, 2020

मुंगीचे महाभारत

कोरोना वायरस या या इवल्याशा जीवाने संपुर्ण जगाविरुद्ध युद्ध पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या परिचयाच्या सगळ्यात छोट्या प्राण्याबद्दल, म्हणजे मुंगीबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी सांगणारा हा लेख...

मुंगीवर लेख लिहिणे ही काही मुंगीएवढी छोटी गोष्ट नाही. मुंगी माणसाच्या जीवनाला जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि जीवापासून शिवापर्यंत चिकटलेली आहे. या मुंगीच्या आभाळाएवढ्या गोष्टी एका लेखात मांडणे केवळ अशक्य आहे. तरीही या अफाट विषयातला काही भाग दाखवून मुंगीविश्वाचे थोडके दर्शन घडविण्याचा हा छोटासा प्रयत्न...

मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी हा संत मुक्ताबाईचा अभंग कूटरचना म्हणून गेलीस सातशे-आठशे वर्षे उलगडण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि दर वेळी त्यातील काही तरी शिल्लकच राहिले आहे, असे जाणकारांना वाटत आले आहे.
कोशिश करने वालों की हार नहीं होती, या हिंदीमधल्या अत्यंत लोकप्रिय कवितेतील एक मुंगी भिंतीवर पुन्हा पुन्हा चढण्याचा प्रयत्न करते आणि पुन्हा पुन्हा पडत राहते हे आपण कधी तरी वाचले किंवा ऐकले असेल. मुंगीचे असे संदर्भ आपल्याला आपल्या साहित्यात विपुल प्रमाणात सापडतात.

मुंगी हा एवढासा प्राणी असला तरी मुंगीचे पराक्रम मात्र तोंडात बोट घालायला लावणारे आहेत. मुंगीबाबतच्या या काही खोट्या वाटू शकतील अशा खऱ्याखुऱ्या गोष्टी.

असे म्हणतात की मुंगी आपल्या वजनापेक्षा 50 पट अधिक वजन उचलू शकते. काही प्रकारच्या मुंग्या त्याहून अधिक वजन उचलतात असेही अलीकडच्या संशोधनात लक्षात आले आहे. मुंगीच्या वेगवेगळ्या जाती जगभर आढळतात. जगात आजवर आढळलेल्या मुंग्यांच्या जाती 12000 इतक्या आहेत. माणसाच्या शरीरात जसेच स्नायू असतात तसे मुंग्यांच्या शरीरातसुद्धा असतात. मात्र मुंग्यांचे स्नायू माणसाच्या स्नायूंच्या तुलनेत त्यांच्या शरीराच्या तुलनेत खूपच अधिक असतात. असे म्हणतात की जगातील सगळ्या माणसांचे वजन केले आणि सगळ्या मुंग्यांचे वजन केले तर ते एकसमान होईल, इतक्या मोठ्या प्रमाणावर पृथ्वीवर मुंग्या अस्तित्वात आहेत.

मुंग्यांबाबत आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मुंग्या दुसऱ्या वारुळातील मुंग्यांना किडन्याप करतात आणि आपल्या वारुळातील कामाला लावतात. मुंग्या या पृथ्वीतलावर 130 दशलक्ष वर्षांपासून अस्तित्वात असल्याचे सांगतात. मुंग्यांच्या वारुळात काम करणार्‍या सगळ्या मुंग्या या माद्या असतात. नर मुंग्याना पंख असतात आणि केवळ प्रजनन हे एकच काम त्यांच्याकडे असते. आपले काम उरकले म्हणजे नर मुंग्या प्राण सोडतात.

आपल्याकडे आढळणाऱ्या काळ्या मुंग्यांचे आयुष्य पंधरा वर्षांहून अधिक असते. कुत्र्यापेक्षा मुंग्या जास्त जगतात. राणी मुंगी मात्र 30 वर्षांपर्यंत जगते. बुलेट मुंगी नावाची एक मुंगी आहे तिचा चावा जगातील सगळ्यात भयंकर समजला जातो. 240 हॉल्टचा शॉक लागल्यासारखी ती मुंगी चावते. सैनिक मुंग्या दुसऱ्या वारुळातील अंडी चोरतात आणि त्या अंड्यातून जन्माला आलेल्या मुंग्यांना गुलामासारख्या वागवतात. एखाद्या वारुळातील राणी मुंगी मेली तर पुढच्या काही महिन्यात त्या वारुळातील सगळ्याच्या सगळ्या मुंग्या मरण पावतात. मुंग्यांना कान नसतात. त्या व्हायब्रेशनवरून संदेशाचे वहन करतात. मुंग्यांना दोन पोटे असतात. एक त्यांना स्वतःसाठी आणि एक दुसऱ्याला घालावयाचे अन्न ठेवण्यासाठी.

जगातील सगळ्यात मोठे वारूळ सहाशे मैल इतके मोठे असून ते दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये आहे. मुंग्यांना फुफ्फुस नसल्यामुळे त्या संपूर्ण दिवस पाण्याखाली जिवंत राहू शकतात. बुल डॉग नावाची मुंगी माणसाला चावल्यास पंधरा मिनिटात माणसाचा मृत्यू होतो. पक्ष्यांना काळ्या मुंग्या आवडतात. काळ्या मुंग्या मारून पक्षी आपल्या पंखात ठेवतात. त्यामुळे पक्षांना परजीवीपासून असणारा धोका टळतो.

बुरशीच्या प्रादुर्भावामुळे काही मुंग्या वेड्यावाकड्या वागू लागतात. ही गोष्ट लक्षात आल्यावर वारुळातील इतर मुंग्या अशा मुंग्यांना ठार मारून टाकतात.

मुंगी हा छोटासाच प्राणी आहे पण त्याच्या या अशा कहाण्या मात्र अजब-गजब आहेत. मराठीतल्या एका पुस्तकाचे ( मोठ्या लेखकाचे चरित्र) नाव 'एका मुंगीचे महाभारत' असे आहे. मुंगीचे हे महाभारताइतकेच विलक्षण वास्तव वाचल्यावर अचंबित व्हायला न होईल तर नवल...

No comments:

Post a Comment