Friday, May 15, 2020

माझे छंद माझे जीवन


माझे छंद माझे जीवन

अगदी लहानपणी मला टाकाऊ वस्तू जमवून ठेवून त्यांच्यापासून काही बनवण्याचा छंद होता. आईकडे बघून मी शालेय वयातच चपला शिवणे, छत्री दुरुस्त करणे इथपासून ते थेट कोंबडी कापून साफ करण्यापर्यंत अनेक गोष्टी शिकलो होतो. आजोबांकडून निरगुडीच्या काड्यापासून शेणाची पाटी आणि अंबाडीच्या सालीपासून दोर बनवायला मी शिकत असे. त्या सगळ्या गोष्टी करताना उपयोगी येणारे सामान आणि हत्यारे माझ्या एका झोलीत ठेवलेली असत. माळ्यावर चढायच्या शिडीखाली एका खुंटीला माझी झोळी टांगलेली असे. तिच्यात माझी खेळणी असत तशाच अशा कित्येक चित्रविचित्र गोष्टीसुद्धा असायच्या. घोंगडी सुखवायच्या पिरशात छत्रीची लोखंडी काडी गरम करून हातोडी आणि पकड यांच्या साह्याने घोंगडीला लावायचा म्हणजे पिन तयार करीत असे. त्याला मोठी कलात्मक गाठ घालण्यासाठी केवढा मोठा खटाटोप करायचो. अनेकदा हाताला चटका बसत असे. पण त्याचे कधी वाईट वाटले नाही. लोखंडी गाडी चालवायचो. त्या गाडीला तार लागे तीसुद्धा मी ठोकून ठोकून बनवत असे. आमच्या घरात बादलीच्या लोखंडापासून बनवलेली एक गाडी होतीच. पण आणखी एक गाडी होती. पण तिची दोन टोके एकमेकापासून दूर होती. त्यामुळे ती गाडी चालवता येत नसे. म्हणून मी कितीतरी दिवस... आठवण होईल तेव्हा तेव्हा... वेळ मिळेल तेव्हा तेव्हा... ती गाडी ठोकत असे. कोवळ्या हातांची फार वाट लागेपर्यंत.  पण त्यातून कदाचित सतत एकसारख्या गोष्टीचा ध्यास घेऊन संयमाने प्रयत्न करण्याचा गुण अंगी बाणवला. तेव्हा मला शास्त्रज्ञ व्हायची इच्छा होती आणि असे नाना उद्योग करताना मी त्याच भूमिकेत असे. कसल्या कसल्या झाडांपासून खेळणी बनवणे हा आमचा मोठा छंद होता. पावसाळ्यातील एक विशिष्ट झाड उगवत असे. त्यापासून आम्ही नांगर जोखड बनवायचो  आणि नांगर नांगर खेळायचो. झाडांच्या फांद्या व दोरा यांनी बनवलेले नांगर जोखड तर मला आजच बनवले असल्यासारखे आठवतात. उन्हाळी दिवसात जमीन खोदून कालवे काढण्याचा छंद होता. तसा त्या काळी बेचकी बनवण्याचा म्हणजे खेळण्यातली बांबूपासून बनवायची बंदूक बनविण्याचा छंद होता. आता आठवले म्हणजे आश्चर्य वाटावे इतक्या गोष्टी आम्ही मुले त्याकाळी करीत असू.

पुढे शाळेत चित्रकलेचा छंद लागला. कागदावर चित्रे काढलीच. पण वर्षातून एक-दोनदा घराच्या भिंती आई सारवीत असे. त्या दिवसाच्या आदल्या दिवशी भिंतीवर कोळसा आणि खडू यांची चित्रे काढण्याची हौस भागविता असे. गणपतीत आई घराच्या भिंती खालून तीन फुटापर्यंत सेल बॅटरीतील दारू घालून त्याने सारवत असे. मग त्यावर चुन्याने आदिवासींची वारली चित्रकला आहे ना त्या शैलीतील चित्रे काढत असे.  पुढे मीही ती कला थोडी अवगत केली होती. 

बांबूची बासरी बनवणे हाही असाच एक चांगला छंद होता. पोकळ बांबू आणून त्यात करवंदीच्या झाडाचे खोड बसायचो. करवंदाचे झाड तोडताना किती काटे लागले त्याचा पत्ता नाही आणि आमच्या बासरीतून सुरेल स्वरांना कधी पत्ता गवसला नाही. 
करवंदीच्या पानावर करवंदीच्या काट्याने नाव लिहून त्यावर आम्ही धुळ अंथरायचो. मग पान झाडले म्हणजे एवढी सुंदर अक्षरे दिसतात! करवंदीच्या पानाची पिपाणीसुद्धा आम्ही वाटेल तेव्हा बनवत असायचो आणि वाजवायचो. 

होळीच्या दिवसात दहा दिवस रानातून शेवरीची झाडे तोडून आणून होळी उभारायचो. 
बाराव्या दिवसापासून शेवरीच्या लाकडापासून शिमग्याच्या नाचासाठी वल्हवे आणि क्रिकेट खेळायला बॅट तयार करण्याचा उद्योग करायचो. बांबूच्या काठीवर कोणती कोणती डिझायर करत राहणे हा एक छंद होता. तांबेटी  या गवतापासून लोक टोप्या बनवत ते मात्र मला अनेकदा प्रयत्न करूनही जमले नाही. 

लपाछपी, चोर-पोलिस, लंगडी, विटीदांडू, लगोरी, कबड्डी, गोट्याआबादुबी, क्रिकेट खेळ खेळायचो. गणपतीगौरीत बाल्याडान्स करायचो. गावात भारुड करत त्यातही अनेकदा काम केले. उन्हाळी सुट्टीत गोठ्यात नमन नाट्याचा खेळ उभा करायचो. त्यासाठी पुठ्ठ्याची बाशिंगे बनवायचो. साडीच्या धारेचा  चाबूक बनवायचो. टॉवेल अंगरखा म्हणून वापरायचो. साडीच्या धारीचा कापडी बोल आम्ही आबादुबी आणि लगोरी खेळण्यासाठी वापरायचो. त्यासाठी अशा धाऱ्या मिळवून त्यांची बोल बनवायचो  खेळ म्हणजे हे असले. असले भलतेसलते.
पण त्यामुळेच आमच्या बालपणाला कंटाळा नावाचा राक्षस कधी शिवला नाही. आज जेव्हा माझा मुलगा टीव्ही... लॅपटॉप... आणि मोबाईलवर खेळून झाल्यावर, पप्पा काय करू सांग ना? कंटाळा आलाय! म्हणतो तेव्हा मला माझ्या समृद्ध बालपणाचे केवढे कौतुक वाटते.  तेव्हा पायात चप्पल नसायची आणि कपडे फाटलेले असायचे, पण अवघा परिसर आपल्याला अंगाखांद्यावर घेऊन खेळवायचा. कवी अरुण म्हात्रे यांचा एक शेर मला तिथे आठवतो आहे...
फाटका होतात खिसा अन् नोटही नव्हती खरी
पण नभीच्या चांदण्यावर मालकी वाटायची... 

आठवी-नववीच्या वयात मला कवितेचा छंद लागला. मग पाठ्यपुस्तकातल्या कविता माझ्या भसाड्या आवाजात मी मोठमोठ्याने गात असे. तोंडाला जरासा... बोंबलाचा दोर... किती छान लागे... सुकटा सार... हा मी चक्क स्वानुभवावर लिहिलेला अभंग गात असताना आजीने, फालतू अभंग लिहू नको अशी तंबी दिल्याचे आठवते. त्याच वयात मी मला आवडणार्‍या मुलीच्या नावाने माझा कवितासंग्रह बनवला होता. तो आजही माझ्या संग्रही आहे. आमच्या एस एस सी केंद्रात मी पहिला आलो आणि मला पुढील शिक्षणासाठी मुंबईत जाण्याची परवानगी मिळावी. मुंबईत येणे हे माझ्यासाठी विश्वरूप दर्शन होते.

मुंबईला आल्यावर रुईयासारख्या प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश मिळाला. माझ्या जीवनाला अपेक्षित दिशा आणि वेग प्राप्त झाला. तेथे मी सर्वप्रथम काय केलं असेल तर वाचनाची भूक भागवायला सुरुवात केली. आचार्य अत्रे, वि. स. खांडेकर यांचे साहित्य प्रथम वाचनात आले. त्याचा पहिला परिणाम म्हणजे भाषेवर संस्कार झाला. मला आठवते मुलांना अत्रे यांचे किस्से सांगणे याचा तेव्हा मला छंद होता. माझे सीनियर मित्र तर मला अनेकदा केवळ विनोदा आणि कविता सांगण्यासाठी लेक्चर बंक करून घेऊन जात असत. पुढे कवितेला खतपाणी मिळत गेलं.  कविता ऐकवून मुलींच्या डोळ्यात हमखास पाणी काढण्याचा मला तेव्हा मोठा छंद  लागला होता. परवा पंधरा-सोळा वर्षानंतर एक मैत्रीण भेटली तिने त्या तशा कवितेची आठवण करून दिली. महाविद्यालयाच्या पाच वर्षात काय काय गोष्टी केल्या... तर कविता केल्या. त्यांची संग्रह बनवले. हस्तलिखितासाठी काम केले. कविता आणि निबंध लेखनात बक्षिसे मिळवली. स्वतः एक पाणी अनियतकालिक काढले. पार्टटाईम नोकरी केली. कॉलेज करता करता कॅलिग्राफी शिकू लागलो. ग्रीटिंग बनवली. त्यासाठी छान छान संदेश लिहिले. कोणाकोणाला वाढदिवसाला भेट दिले. कोणाकोणाच्या वाढदिवसासाठी दुसऱ्याला असे संदेश लिहून दिले. मिळेल तेव्हा आणि पैसे असतील तर नाटके पाहिली. काव्यमैफली ऐकायला 

मुंबईच्या गल्लीबोळात भटकलो. पायपीट केली. कवितांचा कार्यक्रम केला. तो कॉलेजात सादर केला. साठाये महाविद्यालयात जाऊन सादर केला. विद्यापीठ गेलो असता तिथे मराठीचा चळवळीत सक्रिय भाग घेतला. आझाद मैदानावर उपोषण, चौकसभा केल्या. त्या चळवळीसाठी गाणी लिहून ती आझाद मैदानावर सादर केली. याच काळात मराठी शुद्धलेखन शिकलो. कवितेच्या छंदशास्त्राचा अभ्यास केला. गझलेची बाराखडी आत्मसात केली. सामाजिक संस्थेत काम करताना समाजातील उपेक्षित घटकांसाठी आणि घटकांसोबत काम केले. त्यासाठी मुलुंडच्या कोठीवर आणि भांडुपच्या सोलापूर परिसरात जाऊन जनजागृतीचे काम केले. त्यासाठी गाणी लिहून ती सादर केली.

मग पत्रकारितेत आलो. लोकसत्ता, तरुण भारत, आकाशवाणी करीत दैनिक नवाकाळ मध्ये पोहोचलो. तेथे हे काम करीत असताना नानाविध छंद जोपासत आहेच.
अल्बमसाठी साईबाबांवर, पावसावर गाणी लिहिली. त्याचे दोन अल्बम आले. सह्याद्री वरील एका मालिकेसाठी शीर्षक गीत लिहिलेले. रेडिओ सुरभीसाठी जिंगल लिहिली. दोन-तीन सिनेमांसाठी गाणी लिहिली. त्यातला तृषार्त नावाचा सिनेमा रिलीज झाला. दूरदर्शन, ईटीव्ही मराठी या वाहिन्यांवरून कविता सादर केल्या. आकाशवाणीसाठी कवितांचा कार्यक्रम केला. चिंतन सदरात काही लेख वाचले. कागदाची करामत नावाचा मुलांसाठीचा कार्यक्रम तयार करून त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग केले. मुंबई-पुणे-चिपळूण- कोल्हापूर अशा विविध ठिकाणच्या हजारो मुलांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचविला. 

शुद्धलेखनाच्या दिशेनेही कार्यशाळा घेऊन हजारो मराठी लोकांना शुद्धलेखनाचे कानमंत्र दिले. रुईया महाविद्यालयाच्या पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पत्रकारितेतील विविध विषय शिकविले. गणपतीची बाजारपेठ दादर आणि लालबागला विद्यार्थ्यांना वर्षानुवर्षे दाखविली. फक्त रुईया महाविद्यालयाच्या नव्हे तर साठ्ये महाविद्यालयाच्या पत्रकारिता पदवीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा हा प्रत्यक्ष रस्त्यावरचा शिकण्याचा अनुभव दिला. लहान मुलांना घेऊन फोटोग्राफीचे ते शिबिर केले. सायनच्या साधना विद्यालयातील विद्यार्थ्यांना गोष्ट कशी लिहावी याचे प्रशिक्षण दिले. प्रथम या नामवंत संस्थेच्या शिक्षकांना मुलांना भाषा कशी शिकवावी याचे प्रशिक्षण दिले. 

झी24तास या आघाडीच्या वाहिनीच्या सर्व पत्रकारांना शुद्धलेखनाचे धडे दिले. शासनाच्या एका समितीवर घेतले तेव्हा पत्रकारांची भाषा कशी सुधारावी यासाठी काही सूचना केल्या. अनेक महाविद्यालयात भाषा आणि करियर या विषयावर व्याख्याने दिली. मुलांच्या कविता स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून काम केले. हाताने विविध गोष्टी बनवून त्याचे छंदोत्सव या ग्रुपसोबत विविध ठिकाणी प्रदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. सोमय्या महाविद्यालयात देशभरातील हस्त कलाकारांसाठी भरणाऱ्या कला मेळाव्यामध्ये अशा हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन केले. कवितांची पोस्टर डिझाईन करून त्याचे प्रदर्शन केले. अनेक मित्रांना विजिटिंग कार्ड डिझाईन करून दिली. वर्तमानपत्राची शेकडो पाने डिझाईन केली. कॅलिग्राफर ग्रुपच्या फेसबुक पेज वरून कॅलीग्राफर लोकांना शुद्धलेखनाचे मार्गदर्शन केले. काही हजार कविता, काही हजार लेख, काही कथा लिहिल्या. 

कबीरांच्या दोहे यांचा अनुवाद केला. मिराबाईची काही पदे, सूरदासाची काही पदे अनुवादित केली. अनेक चांगले मित्र मिळवले. पुस्तकांचा संग्रह केला.
अवघे जीवनच छंदांनी समृद्ध करून घेतले.

- वैभव बळीराम चाळके
मे 2020
9702 723 752


No comments:

Post a Comment