जगावेगळा चित्रकार
महात्मा गांधी विद्यालयाचे
आमचे डी.एस. सुतार सर
1990 च्या जून महिन्यात मी इयत्ता पाचवीला प्रवेश घेतला. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर असलेली शाळा. दहा अकरा वर्षांचा मी माझ्या घरापासून साधारण पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या या शाळेत माझ्या शेजारपाजारच्या मुलांसोबत जाऊ लागलो. सकाळी नऊ - सव्वा नऊ वाजता घर सोडायचे. साडेदहाला शाळेत पोहोचायचे. संध्याकाळी मात्र पावणेपाचला शाळा सुटली ती धूम ठोकत आम्ही एका तासात पावणे सहाला घरी पोहोचत असू. खरेतर शाळेत जाताना आम्हाला डोंगर उतरत जावे लागत असे आणि येताना डोंगर चढावे लागत असे. मात्र घरी जाण्याची ओढ आणि पोटातली भूक पायांना बळ देत असे. सकाळी नऊच्या आधी नाश्ता करून निघालेले आम्ही सगळे जण संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काहीही खात नसायचो. ही पद्धत होती. शाळेत डबा न आणणे ही फॅशन वाटत असे. गावातली शाळेच्या जवळ असलेल्या छोट्या शहरात राहणारी श्रीमंत घरची काही मोजकी मुले विशेषता मुलीच डबा आणत. त्यामुळे शाळेत डबा घेऊन येणे हे बायकीपणाचे लक्षण मानले जात असे. वाढत्या वयात खरेतर आमचे मोठे कुपोषण झाले, पण याची आम्हाला जाणीव नव्हती. आमच्या पालकांना, आमच्या शिक्षकांना ही जगण्याची रीतच होती, त्यात काही वावगे आहे असे कुणाला वाटत नव्हते. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता आम्ही पाच किलोमीटरचा प्रवास करून शाळेत येत होतो. महामार्गावरचा दोन-अडीच किलोमीटरचा प्रवास बिनधास्तपणे करत होतो. गाड्या आतासारख्या मोठ्या प्रमाणावर नव्हत्या? तरी गाड्या होत्यात आणि वेगात येत असत. पण सह्याद्रीच्या डोंगररांगात जन्माला आलेल्या आम्हा लेकरांना अशा जगण्याची सवय झालेली होती. त्यामुळे त्याचे काही वाटत नव्हते. ना नवल होते न कौतुक होते.
मी प्राथमिक शाळेत जरा बरा विद्यार्थी होतो. या मोठ्या इंग्लिश शाळेमध्ये आल्यावर तेथेही आपणच समजदार आहोत आपल्यापुढे दोन-चार मुलेच आहेत याचीही लवकरच जाणीव झाली आणि आत्मविश्वास वाढला.
याच काळात मला चित्रकलेची आवड निर्माण झालेली होती. डी.एस. सुतार नावाचे एक पन्नाशीचे शिक्षक आम्हाला चित्रकला शिकवत असत. माणूस फारच गोड होता. सर्वांना प्रेमाने वागवणारा होता. त्यामुळे अर्थातच चित्रकलेविषयी अधिक प्रेम वाटू लागले. मला वाटते पावसाळ्याचे दिवस संपत आले तेव्हा आमच्या शाळेच्या दोन्ही बाजूकडील भिंतीवर आमच्या सुतार सरांनी नकाशे आणि चित्रे काढायला सुरुवात केली. एका भिंतीवर त्यांनी आमच्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे चित्र काढायला घेतले. त्याला पोट्रेट म्हणतात हे कळायला मध्ये वीस वर्षे जावी लागली. तर कर्मवीरांचे चित्र काढताना त्यांच्या जोडीला आमचे पवार मामा नावाची शिपाई असत. सर शिडीवर चढून चित्र काढीत. पवार मामा त्यांना मदत करीत. सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वी, मधल्या सुट्टीत, लघवीच्या सुट्टीत आणि दोन तासांच्या मधल्या वेळेत, मी सर चित्र कसे काढतात ते जाऊन पाहत असे. मला अजून आठवते शाळेत शेजारच्या होस्टेलच्या चुलीमधून सरांनी कोळसे आणले होते आणि त्या कोळशाने रेखाटन करून घेतले होते. मग त्याच्यावर रंगलेपन केले होते. हे काम पाहणे हा माझ्यासाठी मोठा आनंदाचा भाग होता. आपणही मोठे होऊन चित्रकार होणार अशी मनाशी मी खूणगाठ बांधली होती,पण...
हा पण नेहमीच वाईट असतो. पहिले सत्र संपण्याच्या आसपास सुतार सर यांचे आकस्मिक निधन झाले आणि त्याने चित्रकार मनावर आघात केला. चित्रकार व्हायचे स्वप्न भंगले.
पुढे सहावीत गेल्यावर मोरे नावाचे एक शिक्षक भेटले. ते आम्हाला मराठी शिकवायचे. मराठी शिकवण्याच्या पद्धतीमुळे भाषेची रुची लागली आणि चित्रकलेकडून मी भाषेकडे सरकलो. अर्थात तरीही मनात चित्रकला जिवंत होती. मी माझ्या परीने वाढवण्याचा प्रयत्न करीत होतो.
पुढे मुंबईत शिक्षणासाठी आल्यावर पुस्तकांच्या प्रेमामुळे मुखपृष्ठ आणि मुखपृष्ठासह पुस्तकांसाठी चित्र काढणार्या चित्रकारानी मला चित्रकलेकडे ओढले. सुलेखनाकडे ओढले. पुढे पत्रकारितेत आल्यामुळे काही प्रदर्शनास जाण्याचा योग आला आणि म्हणताम्हणता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार, सुलेखनकार यांच्या ओळखी झाल्या. दरम्यान एकदा घर सोडून बाहेर पडावे लागले तेव्हा दोन चित्रकार बंधूंनी आधार दिला. सहा महिने त्यांच्यासोबत राहताना चित्रकलेत बुडूनच राहिलो होतो.
चित्रकलेची ही अशी वाटचाल करीत असताना त्या दिवशी शाळेबाहेर रिक्षा थांबवून मी शाळेच्या कंपाऊंडच्या आत गेलो. सुतार सरांनी काढलेले ते पोट्रेट पाहत असताना सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
त्या पोट्रेटच्या खाली सुतार सरांनी केलेली स्वतःची डी.एस. सुतार ही सही आणि त्याच्याखालची 22- 9- 1990 ही तारीख वाचलीच! पण त्याखाली मदतनीस म्हणून वसंत पवार यांचे लिहिलेले नाव पाहून मला सुतार सरांबद्दल आणखीनच आदर वाटू लागला. सर तेव्हा जायला नको होते असे पुन्हा एकदा वाटून गेले. जगभरातल्या नामवंत चित्रकारांनी त्यांच्या चित्राखाली आपली सही आवर्जून केली आहे. ती कलावंताची नाममुद्रा असते. पण चित्राखाली आपली सही करताना आपल्याला मदत करणाऱ्या शिपायाचे नाव देण्याचे औदार्य असलेला मला माहीत असलेला हा एकमेव चित्रकार होय.
सुतार सर, तुम्ही माझ्या मनात आहात आणि मनात कायम राहाल.
No comments:
Post a Comment