Friday, November 20, 2020

आतले आणि बाहेरचे...

 आतले आणि बाहेरचे...


कवी विंदा करंदीकर अर्थात गो. वि. करंदीकर यांनी 'आतले आणि बाहेरचे' या शीर्षकाचा एक ललित निबंध लिहिला आहे. एखाद्या व्यवस्थेच्या बाहेर असलेल्या माणसांना आतले लोक त्यांच्यावर अन्याय करतात, त्यांना आत येऊ देत नाहीत, असे वाटत असते. मात्र या बाहेरच्या पैकी ज्याला आत जाता येते तो आत गेल्यावर आपली भूमिका बदलतो आणि आतला होतो. बाहेरच्यांना बाहेर ठेवण्यासाठी प्रयत्नशील होतो. अशा आशयाचा तो निबंध आहे.

माणूस व्यवस्थेच्या बाहेर असताना वेगळा आणि आत असताना वेगळा वागतो, हे या निबंधात सांगितले आहे. पाठ्यपुस्तकात हा निबंध समाविष्ट होता. त्यामुळे कोट्यवधी लोकांना तो चांगलाच माहीत आहे. आतले आणि बाहेरचे म्हटले की सर्वप्रथम करंदीकरांचा हा लघुनिबंध आठवतो. त्यांनी जे सांगितलेले आहे ते सार्वत्रिक आहे. आपल्याला तसे अनुभव येतात आणि करंदीकरांचे मोठेपण पुन्हा पुन्हा प्रत्ययाला येते.

असे असताना पुन्हा आज या निबंधाचा विषय आतले आणि बाहेरचे असाच का निवडला असेल बरे, असा प्रश्न वाचकाला पडणे अगदी स्वाभाविक आहे. करंदीकरांच्याच भाषेचा उपयोग करून सांगायचे तर अशी परंपरा पाठीशी असल्याशिवाय नवता निर्माण होत नसते.

या जुन्यात शीर्षकाला एक नवीन अर्थ प्राप्त झालेला आहे किंवा एक नवीन अर्थ उमगला आहे. म्हणूनच आज हा विषय पुन्हा एकदा निबंधाचा विषय झाला आहे.

मित्रांनो, सध्या आपण अत्यंत बिकट परिस्थितीतून जातो आहोत. आपल्याला आपल्याच जगण्याच्या व्याख्या नव्याने मांडण्याची वेळ आलेली आहे. आर्थिक आघाडीवर आपण सारेच अडचणीत आलेलो आहोत. गेल्या सहा महिन्यांत लोकांमध्ये सर्वाधिक चिंतेचा विषय ही आर्थिक घसरण हा आहे, हे आपण सारे जाणतोच. मात्र एक गोष्ट कदाचित आपल्या लक्षात आली नसेल, या काळात सुस्थिस्तीत असणारे लोक म्हणजे ज्यांना आपण सेटल आहेत असे म्हणतो ते लोक अधिक चिंताग्रस्त झाल्याचे आपण पाहिले. याउलट आठ-दहा दिवस पायपीट करत आपल्या गावाला पोहोचलेला मजूर लाख अडचणींवर मात करीत गावागावांत सुखाने नांदतो आहे,  असे चित्र तुम्हाला दिसेल. अर्थात तो अत्यंत आनंदी आहे, त्याच्या समोर समस्या नाहीत, असे नव्हे. मात्र ज्यांना आपण सुस्थितीतील लोक समजतो, त्यांच्यापेक्षा हा माणूस अधिक आनंदी आहे, असे चित्र ढोबळमानाने मांडता येईल आणि ते सर्वांना मान्य होईल.

हे असे का झाले?

मित्रांनो, आपले प्रत्येकाचे असे एक आतले विश्व असते. आपण सारे या आतल्या विश्वात आणि आपल्या बाहेरच्या विश्वात स्वतःला "ऍडजेस्ट' करत जगत असतो. या काळात आपले बाहेरचे विश्व उद्ध्वस्त झाले.  अडचणीत आले. विस्कळीत झाले. हे आपण पाहिले, मात्र या काळात ज्यांनी आपले आतले विश्व विस्कटू दिले नाही. उद्ध्वस्त होऊ दिले नाही. तेच लोक आज थोडे आनंदी, थोडे समाधान, थोडे समतोल असलेले दिसतात. या बाहेरच्या विश्वाला बघत, या बाहेरच्या विश्वाचा वेध घेत चालत आले आणि ज्यांनी आपल्या आतल्या विश्वाकडे काहीसे दुर्लक्ष केले,  किंबहुना कधीतरी हा बाहेरचा वेग, हे बाहेरचे जग कोलमडून पडू शकते, याची शक्यताच मनाला स्पर्शू न दिल्यामुळे चुकीच्या पायावर जीवन उभे केले, त्यांचे अंतरविश्वसुद्धा उन्मळून पडले. तेच अधिक चिंतेत आहेत. गोष्ट कळायला थोडी अवघड आहे.  परिस्थितीच तशी अवघड आहे. मात्र हा सूक्ष्म असा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. या काळाकडून हे शिकले पाहिजे. आपले आतले विश्व आणि बाहेरचे विश्व याकडे आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे, बाहेरच्या विश्वावर आपले नियंत्रण नाही, पण आतल्या विश्वावर आपलेच नियंत्रण आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. प्रगतीच्या काळात याकडे दुर्लक्ष होते. ते तसे अनेकांचे झाले.

मजूर, गोरगरीब, कामगार यांची बाहेरच्या विश्वातली प्रगतीच न झाल्यामुळे त्यांच्या आतल्या विश्वावर त्याचे मोठे परिणाम झाले नव्हते आणि म्हणूनच त्यांचे आतले विश्व जसे होते तसे राहिले.  त्याला फारसा धक्का लागला नाही आणि त्याचेच परिणाम त्यांना या काळात अनुभवायला आले, हे आपण समजून घ्यायला हवे.

गेल्या काही वर्षांमध्ये जगाला बाजाराने ग्रासले आहे. माणसाच्या नकळत तो या बाजाराचा आहारी गेला आहे आणि तसेच जात असताना त्याला त्याचे सुखद अनुभव मिळत गेले. मात्र या सुखाच्या पायवाटेखाली अंथरलेला गालिचा आपला नाही, याची जाणीवच तो या सुखाच्या अनुभूतीत विसरून गेला आणि त्यामुळे अशा गालिचावर अनवाणी पायांनी मजेने चालू लागला. आपल्या स्वकष्टार्जित चपलासुद्धा गरजेच्या नाहीत म्हणून फेकून दिल्या.

बाजाराने आपला गालिचा काढून घेतल्यावर आता चपलांशिवाय चालताना या बाजारशरण माणसाचे मोठे हाल सुरू झाले आहेत.

- वैभव बळीराम चाळके
9702 723 652

Tuesday, October 20, 2020

बांगड्या बघा या...

बांगड्या बघा या...


तो काळ शतकाच्या उंबरठ्यावरचा होता. मी रुईया महाविद्यालयात शिकत होतो. कांजूरला माझ्या एका मैत्रिणीकडे अधूनमधून जात असे. आई-वडिलांशिवाय मुंबईत राहत असल्यामुळे मुलुंडला राहणाऱ्या बहिणीकडे आणि कांजूरला राहणाऱ्या या मैत्रिणीकडे गेलो म्हणजे मला आपल्या घरात गेल्याचा आनंद होत असे. त्या काळातल्या वाळवंटी जीवनातील ती ओयासिस होती असे म्हटलात तरी चालेल. मैत्रिणीच्या घरी तिची आजी, आई, बाबा आणि छोटा भाऊ असे पाच जण राहत. छोटा स्वप्निल तेव्हा साधारण दहा वर्षांचा होता असेल. त्या काळात खिशात फारसे पैसे नसत. त्यामुळे मी त्या छोट्या स्वप्निलसाठी पाच रुपयांची त-हेत-हेची दहा चॉकलेट घेऊन जात असे.


मी घरात नव्या पिढीतला मोठा मुलगा होतो आणि आणि माझ्या मागे अनेक भावंडे होती. त्यामुळे मुलांप्रति मला त्या कोवळ्या वयात वयातसुद्धा प्रचंड प्रेम होते. फक्त या घरातल्या छोट्यासाठी नव्हे, तर मी ज्या ज्या मित्रांकडे आणि नातेवाईकांकडे जात असे, त्या घरातील चिमुकल्यांसाठी मी अशीच छान छान चॉकलेट घेऊन जात असे.


लहान मुलांना तुम्ही किती रुपयाचा खाऊ देता याच्याशी काहीही देणेघेणे नसते. त्यांना हवा असतो नानाविध प्रकारचा आणि भरपूर खाऊ. त्यामुळे अगदी दोन-पाच रुपयांचा विचारपूर्वक निवडलेला असा खाऊ किंवा असेच स्वस्तातले एखादे खेळणे मी घेऊन गेलो की त्यांना आभाळभर आनंद होत असे.


या मैत्रिणीच्या भावाचेही तसेच होते. मी घरी गेलो आणि तो नेमका शाळेत असला तर मग मी त्याच्यासाठी घेतलेली ती चॉकलेट्स फ्रिजच्या पायामध्ये ठेवून देत असे. तो शाळेतून आला की त्याला,  वैभवदादा येऊन गेला, असं घरी कोणीतरी सांगितलं की, तो धावत जाऊन फ्रिजच्या पायामध्ये चॉकलेट आहेत का शोधत असे. ती तिथे ती हमखास असत.


पुढे काही वर्षांनी तो मोठा झाला आणि त्याच्या घरात मोठ्या बहिणीचा छोटा मुलगा आला. माझे त्या घरचे जाणे कमी झाले असले, आता पूर्वीपेक्षा  अधिक दिवसांनी  जाणे होत असे, तरी सातत्य होते. आता त्या छोट्या मुलालासुद्धा तशीच सवय लागून राहिली होती. या काही वर्षात माझ्या परिस्थितीत सुधारणा झाली होती आणि माझे चॉकलेटचे बजेट दुप्पट झाले होते.

आता मी दादाचा मामा झालो होतो.


प्रश्न चॉकलेट देण्याचा नाही. त्यामागच्या आनंदाचा आहे. एक गोष्ट आणखी सांगितली पाहिजे. एकदा दादरच्या छबिलदास गल्लीत एक सतरा-अठरा वर्षांची मुलगी अचानक माझ्या पुढ्यात येऊन थांबली आणि म्हणाली, वैभवमामा, ओळखलं?

मी अर्थातच तिला ओळखलं नव्हतं. तिला तसे सांगितल्यावर ती म्हणाली, अरे, मी सोनी!

पण सोनी नावाच्या अनेक मुली असतात. त्यामुळे मी तरीही तिला ओळखू शकलो नाही. तर ती पटकन म्हणाली, अरे मी मी किशोरीची भाची.

... आणि लखकन मला त्या चिमुकल्या सोनीची आठवण झाली. ही तीच मुलगी होती जिला मी अशीच पाच रुपयांची दहा चॉकलेट घेऊन जात असे.


हे सारे आज आठवण्याचे कारण म्हणजे आज तो छोट्या मुलगा- स्वप्निल- खूप महिन्यानंतर भेटला. तो आता तीस वर्षांचा झाला आहे. एका खासगी कंपनीत नोकरी करू लागला आहे. आम्ही भेटलो. गप्पा मारल्या. निघताना त्याने माझ्या हातात ही$$$ एवढी मोठी कॅडबरी दिली आणि म्हणाला, हे तुमच्या छोट्याला घेऊन जा...


त्याने दिलेले ते चॉकलेट हातात घेताच मला अमाप आनंद झाला. त्याला म्हटलं,

आज एक वर्तुळ पूर्ण झालं...


आपण सारे अशी अनेकानेक वर्तुळे पूर्ण करण्याची स्वप्न बघत असतो. सगळे विश्व एक मंडलाकार आहे आणि अशा मंडलाकारानीच आपले आयुष्य समृद्ध केलेले आहे, हे ज्यांना माहीत आहे, त्यांना वर्तुळ पूर्ण होण्यामधली धन्यता समजू शकेल.


मला या क्षणी बा. भ. बोरकर यांची कविता आठवते...


बांगड्या बघा या

बांगड्या बघा या

श्रावण लावण्यराज

लागला फुलाया...


- वैभव बळीराम चाळके

9702 723 652

■■■

Monday, September 7, 2020

साखरपा बाजार


साखरपा बाजारपेठ

साखरप्याच्या बाजाराचे बालपणावर मायाजाळ
त्या दिवसांच्या आठवणींनी कातर होते संध्याकाळ// ध्रु//

मासळिच्या बाजारामधली घमघमणारी सुकट सुखी
कबनुरकरच्या वखारीतली त्यावर घालू लाल फकी
कोल्हापुरची भाजी, डेरी, सलूनमधली तशि धमाल //1//

सावकार अन् गांधी यांची भव्य दुकाने गर्दीही
मंजुनाथची मिसळ आगळी खारे जाइल सर्दीही
तिखट तिखट मग म्हणत खायचो होउन आम्ही लालेलाल //2//

नरहरिच्या मंदिरात कोणी विश्रांतीला छान बसे
रहाटावरी पाणी तेथे हवे तेवढे पीत असे
केतकर पोंक्षे थरवळ शेट्ये डंब्याकडचा अस्ली माल //3//

कन्या शाळा गिरिजा मंदिर पोस्ट नि शिंदे  रानभरे
परमिट रुम कासार विजा मारूती अन्  माडीवाले
जुन्या स्टँडवर अंकुशराव नि रेशन दुकान उघडा माळ //4//

गणेश मंदिर खंडकर टेलर पाथ्रेचे पॅटीस अहा
स्टॅण्डवरी शेट्यांचे कॅण्टिन तिथे प्यायचो गरम चहा
स्वस्तातिल डॉक्टर देशपांडे दहा रुपयातच सर्व कमाल//5//

चव्हाट्यावरी बॉम्बे टेलर पुढे विद्येचा होय विकास
नाना शेट्ये वटवृक्षाचा तिथेच होता खुला निवास
अडल्यानडल्याचा नानांनी नेहमीच केला सांभाळ//6//

मांडवकर ओसवाल शिंदे जाधव सारे आठवती
नंदूदाच्या दुकानातल्या मनात जपल्या लख्ख स्मृती
रविवारी तर मजाच नुसती खाऊ खाऊ मस्त धमाल//7//

पोटासाठी गाव सोडले तसाच हा सुटला बाजार
सुटले सगळे मित्र-जिव्हाळे आठवणी पण लाख-हजार
त्या बाजारापुढे फिके रे मुंबईतले ए वन मॉल//8//

- सुवर्णसुत वैभव बळीराम चाळके
साखरपा, खंडवाडी.
 संपर्क- 9702 723 652.

Saturday, August 29, 2020

गुरू

 

गुरू थेट जीवा शिवाशीच जोडी
गुरू लाभता जीवना येइ गोडी //

गुरू माउलीच्या परी पाजि पान्हा
गुरूविन दुजा कोण लावील थाना
गुरू अमृताची मुखी धार सोडी //

गुरू दीप त्याची प्रभा विश्वव्यापी
गुरू थोर त्याची शिकवणी प्रतापी
गुरू लाभल्याने गळे मोहबेडी //

गुरू रोज घ्यावा गुरू रोज गावा
गुरू हरक्षणी लाभणारा विसावा
सुवर्णासुताला गुरू शब्द धाडी //

- सुवर्णसुत, वैभव बळीराम चाळके
9702 723 652.

Wednesday, August 19, 2020

शुद्धलेखन कार्यशाळा


प्रिय शिक्षक/पत्रकार/ लेखक मित्रांनो,

'पौरस आर्ट व्हिजन'मुळे सवलतीत सुरू असलेल्या उपक्रमातील दोन कार्यशाळा यशस्वी झाल्या. लवकरच तिसरी कार्यशाळा करतो आहोत. आपल्यासाठी ही एक उत्तम संधी चालून आली आहे.

आपण मराठी भाषा संवादाचे माध्यम म्हणून वापरतो. आपल्या या भाषेचे काही लेखननियम आहेत. उत्तम संवादासाठी ते अत्यंत आवश्यक असतात. प्रमाणलेखनाचे नियम किंवा शुद्धलेखनाचे नियम म्हणून ते ओळखले जातात.

दुर्दैवाने आपल्यापैकी अनेकांना ते माहीत नाहीत. अर्थातच माहीत नाही हा मोठा दोष नव्हे. माहीत नाहीत, कारण ते आपल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत आपल्याला कधीच शिकवले जात नाहीत. परिणामी अनेक  शिक्षकांना येत नाहीत. आपल्याला माहीत नाहीत, म्हणून आपण आपल्या विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाही.

पण...

आता तुम्हाला ते शिकण्याची संधी आहे.
'शुद्धलेखनाच्या दिशेने' नावाने मी गेली काही वर्षे शुद्धलेखनाचे शासनमान्य नियम आणि काही अनुभवसिद्ध कानमंत्र देणारी कार्यशाळा घेत आहे. शेकडो शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आजवर ही कार्यशाळा करून आपले लेखन सुधारून घेतले आहे.

भाषा आपल्याला योग्य प्रकारे लिहिता येत नाही,  ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. अचूक लेखनाअभावी गैरसमज निर्माण होतात. ध चा मा झाल्याने काय गोंधळ होतो हे आपल्याला माहीत आहेच. कधीतरी यावरून अपमानित होण्याचीही वेळ येते. माझाही असाच एकदा घोर अपमान झाला आणि मग मी झटून अभ्यास करून सारे शिकून घेतले.

उत्तम संवादासाठी सगळ्यांनीच योग्य लेखन करावे, म्हणून मी ही कार्यशाळा कष्टपूर्वक आकारास आणली आहे.

अनेक महाविद्यालये, विविध संस्था, शिक्षक संघटनांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून शुद्धलेखनाचे नियम आत्मसात केले आहेत. लेखक-पत्रकार पत्रकारांसाठी सुद्धा ही कार्यशाळा अत्यंत उपयोगाची आहे. 'झी24तास' या आघाडीच्या वृत्तवाहिनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना या कार्यशाळेअंतर्गत मी प्रशिक्षित केले आहे.

कोरोनानंतरच्या लॉकडाउनच्या काळात ही कार्यशाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू केली असून, आता आपण घरबसल्या ही कार्यशाळा करून आपले लेखन सुधारू शकाल. शिवाय सवलत सुरू आहे.

वीस वर्षे पत्रकारिता आणि सर्जनशील लेखनाचा अनुभव पाठीशी घेऊन मी या नव्या उपक्रमाला सुरुवात केली आहे.

सोबत दहा प्रश्न पाठवत आहे. त्यातील पाचपेक्षा अधिक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देता आली नाहीत किंवा त्याबद्दल तुमच्या मनात शंका निर्माण झाली, तर तुम्हाला या कार्यशाळेची नितांत आवश्यकता आहे, हे वेगळे सांगायला नको.

कार्यशाळेसाठी अवश्य संपर्क करा.

● वैभव बळीराम चाळके
9702 723 652
vaibhav.b.chalke@gmail.com

या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत आहेत का?

■ सञ्चय म्हणजे काय?
■ देहांत केव्हा देहान्त केव्हा?
■ संस्था शब्दात व आहे काय?
■ प्रीती की प्रिती?
■ रविंद्र की रवींद्र?
■ पाऊले की पावले?
■ किमतीला की किंमतीला?
■ एकादा की एखादा?
■ बहीण दीर्घ बहिणीला र्‍हस्व का?
■ हे सारे शोधायचे कोठे?
000

(आपल्या परिचयाच्या शिक्षक, पत्रकार, लेखक यांना नक्की फॉरवर्ड करा.)
000

Wednesday, August 12, 2020

बोलगाणे

 

■ कागदाच्या करामतीचं बोलगाणं...■

चला चला सगळे जण, मस्तपैकी बसा
आजचा दिवस मजेचा! म्हणत सगळे हसा
टेन्शनबिन्शन सोडून द्या, उत्साहाने भरा
आणि 'कागदाच्या करामती' माझ्यासोबत करा
तुमच्यासाठीच घेतलेला हा गुरुजींचा वसा!!♡♡♡

घडी घडी घालत चला
चुका करणे टाळत चला
म्हणजे मग होईल जादू
चल रे सोन्या, चल रे दादू
कागदाच्या घड्यांमधून साकार करू ससा!!♡♡♡

अशी घडी तशी घडी
घडीवरती घडी
उंच-उंच घेऊ चला
कल्पनेची उडी
काटेकोर मोजमाप
मापामध्ये नाही पाप
घडी घालता राहा दक्ष
ध्येयाकडे ठेवून लक्ष
जीवनाचाही प्रवास आपला अगदी असतो असा!!♡♡♡

छोट्या छोट्या गोष्टींमधून
मोठ्या गोष्टी कळत जातात
आधी असतात कळ्या त्यातून
सुंदर फुले फुलत जातात
कागदाच्या करामती
हेच तुम्हाला सांगत राहतील
तुमच्याभोवती कागद आता
आयुष्यभर रांगत राहतील
या आनंदझऱ्यावरती भरून घ्या पसा!!♡♡♡

तुम्हाला जे येईल ते
इतरांना वाटत राहा
आणि जे येणार नाही
ते पुन्हा पुन्हा घोटत राहा
इवल्या-इवल्या या कलाकृती
इवलेइवले हे खेळ
छोट्यासोबत मोठ्यांचाही
उजळून देतात वेळ
सांगा माझा कागदखेळ वाटतो आहे कसा!!♡♡♡

- सुवर्णसुत वैभव बळीराम चाळके
9702723652
vaibhav.b.chalke@gmail.com 

'कागदाची करामत' हा मुलांसाठीचा अफलातून कार्यक्रम आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा.

Tuesday, July 28, 2020

कृष्ण नव्हे भोगी... शंकर नव्हे जोगी...

कृष्ण नव्हे भोगी... शंकर नव्हे जोगी...

संतश्री तुकाराम महाराज यांची गाथा हा लाखो मराठीजनांच्या मनाचा विसावा आहे. रोज हजारो-लाखो लोक या गाथेतील अभंग वाचतात. समजून घेतात. समजून सांगतात. रोजच्या व्यवहारातील कितीतरी प्रश्नांची उत्तरे गाथेत दडलेली आहेत. ती उलगडता आली म्हणजे आपले नित्याचे प्रश्नही सहज उलगडतात. आधुनिक संत म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, त्या विनोबा भावे यांनी तुकारामांचे निवडक अभंग या नावाने गाथेचे एक संपादन केलेले आहे. मी अनेकदा हे संपादन वाचत असतो. दर वाचनात एखादा नवा अभंग उलगडतो. एखादा नवा चरण नव्याने समजून येतो. तुकारामांचा एखादा विचार नव्यानेच कळून येतो. एखाद्याचे चरणातली सूचकता लख्खपणे दिसू लागते.
संत तुकारामांच्या एका अभंगांमध्ये एक चरण असा आहे-
कृष्ण नव्हे भोगी/
शंकर नव्हे जोगी/
तुका पांडुरंगी/
हा प्रसाद लाभला//
आपल्याला माहीत असलेला कृष्ण हा तर भोगी आहे. तो गोकुळात दहीदूध चोरून खातो. तो गवळणीची छेड काढतो. त्यांच्या माठातले दही-दूध-लोणी खातो. गवळणी यमुना जळात न्हाऊ लागल्या की त्यांचे कपडे पळवितो. त्याच्याबद्दलच्या अनेक तक्रारी लोक यशोदेकडे येऊन करीत असतात. तो बासरी वाजवतो. मोरपीस आपल्या डोक्यावर धारण करतो. हे आपण आपल्या साहित्यातून पाहिलेले आहे. त्यामुळे आपल्याला श्रीकृष्ण हा भोगी वाटतो. श्रीकृष्णाचे जीवन ऐहिक सुखदुखःत गेले असे आपल्याला वाटते. ते खरेही आहे. पण मग गीता वाचायला लागलो की फळाची अपेक्षा न ठेवता कर्म कर असे सांगणारा कृष्ण आपल्यासमोर येतो. जग ही माया आहे. नश्वर आहे. नाशिवंत आहे. हे सांगणारा कृष्ण तत्त्वज्ञ म्हणून आपल्यासमोर उभा राहतो. मग आपल्याला कृष्ण भोगी की त्यागी असा प्रश्न पडतो.
शंकर हे दैवत आपण वैराग्याचे दैवत म्हणून ओळखतो. तो अंगाला राख फासतो आणि स्मशान वैराग्याच्या खुणा अंगावर वागवतो. सृष्टीची निर्मिती ब्रह्म करतो. तिचे पालन विष्णू करतो आणि तिचा नाश शंकर करतो, असेही आपल्या धर्मशास्त्रात सांगितले जाते. शंकराचे तांडव नृत्य आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेच. तेव्हा असा हा शंकर म्हणजे खरंतर त्यागाची परिसीमा होय. तो भोळा आहे. तो भक्तांवर प्रसन्न झाला की त्यांना हवे ते देतो, अशाही अनेक कथा आपण ऐकलेल्या आहेत. पण मग कधीतरी शंकराला पार्वती, गणेश आणि कार्तिकेय यांच्यासोबत पाहिले की, हा कुटुंबवत्सल माणूस आहे, असेही वाटायला लागते. शिवपार्वती जोडी तर आपणा सगळ्यांना माहीत आहे. शिवपार्वतीच्या कितीतरी कथा आपल्या साहित्यात आढळतात. मग मात्र आपल्याला प्रश्न पडतो की, शंकराला त्यागी म्हणावे की भोगी म्हणावे? ज्याप्रमाणे कृष्णाला भोगी म्हणता म्हणता तो त्यागी आहे हे आपल्या लक्षात येते, त्याचप्रमाणे शंकराला त्यागी म्हणता म्हणता तो भोगीही आहे असेही लक्षात येते.
जीवनाची ही व्यामिश्रता आहे. तीच खरी आहे. त्याचे आकलन म्हणजे जीवनाचे आकलन होय. हेच संत तुकाराम वरील चरणातील सांगतात. एकदा काही व्यामिश्रता समजू लागली ही मग कितीतरी गहन वाटणारे प्रश्न सहज सुटून जातात.
श्रावणामध्ये धार्मिक ग्रंथपठाणाची पद्धत आहे. गाथेसारख्या ग्रंथांचे पठण या काळात करायचे ते जीवनाचे नेमके आकलन व्हावे यासाठीच होय. विवेकाच्या कसोटीवर घासून घेतलेले पुराण आणि शास्त्रग्रंथातले ज्ञान आजही मोठे उपयोगाचे आणि मार्गदर्शक आहे यात शंका असण्याचे कारण नाही.
000

Tuesday, June 2, 2020

कोरोनाविरोधातील ‘केरळ पॅटर्न’


कोरोनाविरोधातील केरळ पॅटर्न
डॉ. अरुण गद्रे यांनी घेतलेली डॉ.अमर फेटले यांची मुलाखत

भारतातील पहिला कोरोना रुग्ण ज्या केरळ राज्यात सापडला त्या केरळ राज्याने कोरोना साथीचा जो यशस्वी मुकाबला केला तो कौतुकास्पद आहे. केरळ पॅटर्न म्हणून या गोष्टीकडे मोठ्या कौतुकाने पाहिले जात आहे. जगभरात हा पॅटर्न प्रसिद्ध झाला. हा केरळ पॅटर्न राबविणाऱ्या केरळच्या टीमपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे डॉ.अमर फेटले! महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डॉ. अरुण गद्रे यांनी या डॉ.अमर फेटले यांची विचारवेधसाठी घेतलेली मुलाखत कोरोनाशी सामना कसा करावा, याचा आदर्श समोर ठेवणारी आहे. नवाकाळच्या वाचकांसाठी केलेले हे शब्दांकन...

डॉ.अरुण गद्रे- कोवीड आजाराविरोधाचा तुमचा हा लढा नेमका केव्हापासून सुरू झाला?
डॉ.अमर फेटले - सतरा-अठरा जानेवारीला आम्हाला चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे लोक आजारी पडत आहेत ही गोष्ट कळली. केरळचा चीनशी फार निकटचा संबंध आहे. कारण केरळमधून आमचे वैद्यकीय शाखेचे अनेक विद्यार्थी तेथे शिक्षणासाठी जातात. त्यामुळे मग आम्ही ताबडतोब आरोग्य खात्यात बरोबर बैठक घेतली आणि जर तेथे साथीचा मोठा प्रसार झाला तर आपले विद्यार्थी परत येतील तेव्हा काय करायचे, याच्या विचाराला सुरुवात केली. आमची कंट्रोल रूम तेव्हाच कामाला लागली. केरळमध्ये  14 जिल्हे आहेत. आम्ही कंट्रोल रूमच्या माध्यमातून पुढच्या काही महिन्यांत जर आपल्याकडे अशी परिस्थिती आली तर काय करायचे याची पावले उचलायला सुरुवात केली. आमच्याकडे कंट्रोल रूम सिस्टीम अगोदरपासूनच अस्तित्वात होती. गेली काही वर्षे साथीच्या आजारांसाठी ही सिस्टीम केरळ राज्याने उभारलेली आहे.

डॉ.अरुण गद्रे- म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने covid-19 जागतिक महामारी जाहीर करण्यापूर्वीच आपण सावध झाला होतात?
डॉ.अमर फेटले- अगदी बरोबर जागतिक आरोग्य संघटनेने महामारी जाहीर करण्यापूर्वीच आम्ही पावले उचलायला सुरुवात केली. आम्ही आमची संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लावली. संसर्गजन्य आजारांच्या लक्षणांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. तापाच्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवले. त्यानंतर आम्हाला भारत सरकारकडून सावधानतेचा इशारा मिळाला. मग आम्ही जागतिक आरोग्य संघटना आणि इतर वैद्यकीय संघटनांच्या वेबसाईटवरून अपडेट घेत राहिलो. तेथून मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही देशांमध्ये पहिल्यांदा कोरोनाशी कसा लढा द्यायचा याची गाईडलाईन तयार केली. कोरोना मॅनेजमेंटची गाईडलाईन आम्ही 26 जानेवारी रोजी जाहीर केली.

डॉ.अरुण गद्रे- जागतिक आरोग्य संघटनेने तपासण्या करण्यावर भर दिला होता. तुमच्या गाइडलाइनमध्ये त्याच्यापेक्षा वेगळे काही होते काय?
डॉ.अमर फेटले - जागतिक आरोग्य संघटनेने तपासणीचा जो मंत्र दिला तो फार नंतर आला. त्याच्या अगोदरच आम्ही आमच्या गाईडलाईन जाहीर केल्या होत्या. आम्ही सर्वप्रथम विमानतळांवर सावधानतेचा इशारा दिला. प्रत्येक एअरपोर्टवर एक एक वैद्यकीय अधिकारी नेमला. प्रत्येक विमानतळावर एक टीम सज्ज केली. तेथे आम्ही स्क्रिनिंग सुरू केले. प्रवाशांवर नीट पाळत ठेवली. रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित अशी विशेष रुग्णालयांपर्यंतची प्रवासाची सोय केली. ज्या चार जिल्ह्यांमध्ये एअरपोर्ट आहेत तेथे विलगीकरण कक्ष ताबडतोब उभारून घेतले. हे विलगीकरण कक्ष आम्ही अद्ययावत असे उभारले होते. तेथे पीपीई किट वेळीच उपलब्ध केल्या. हे सारे आम्ही ही फारच लवकर सुरु केले. सागरी वाहतूकीबाबतसुद्धा आम्ही वेळी दक्ष झालो. सगळ्या पोर्टवर यंत्रणा उभी केली.
त्याचबरोबर आम्ही आमची कंट्रोल रूम नव्याने अद्ययावत केली. वेगवेगळ्या टीम या कंट्रोल रूमसोबत काम करू लागल्या. वेगवेगळ्या विभागात कंट्रोल रूमचे काम सुरू झाले. पाळत ठेवणे, माहिती गोळा करणे, तपासण्या करणे, प्रसारमाध्यमांना वेळीच योग्य ती माहिती देणे, सोशल मीडिया योग्य प्रमाणे हाताळणे, पायाभूत सुविधा उभारणे, मनुष्यबळाची उभारणी करणे, त्यांना प्रशिक्षित करणे असे एकूण 18 विभाग कार्यरत झाले. मुख्य कंट्रोल रूमसोबत प्रत्येक जिल्ह्यात त्यांची त्यांची कंट्रोल रूम उभी करून काम सुरू केले. आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. राजन खोब्रागडे यांनी अत्यंत मेहनतीने आणि उत्साहाने हे सगळे काम हाती घेतले. आमच्या कुटुंब कल्याण खात्याच्या मंत्री केके शैलेजा टीचर यांनी या कामात स्वतःला झोकून दिले. त्या रोज आमच्या कंट्रोल रूममध्ये येऊन कामाला बसत असत. या दोघांच्या रूपाने आमचे सरकारच आमच्या सोबत कंट्रोल रूममध्ये कामासाठी हजर होते आणि प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींवर त्यांचे लक्ष होते.
आमच्यासोबत एक अकॅडमी कमिटीसुद्धा होती. ती कमिटी covid-19 आजार भविष्यात किती आणि कसा पसरेल याचा अंदाज बांधत होती. त्याचे चित्र रेखाटत होती. अशी एकापेक्षा अधिक कल्पना चित्रे या टीमने आपल्या अभ्यासातून रेखाटली आणि त्याप्रमाणे मग आम्ही तयारी करायला लागलो. त्याप्रमाणे आम्ही गाईडलाईन तयार केल्या. 
डॉ.अरुण गद्रे- हे सारे म्हणजे एखादे मिलिट्री ऑपरेशन असावे तसे आहे. आपण सुरुवातीच्या काळातील काही अनुभव आम्हाला सांगू शकाल का... मी असे ऐकले आहे की, एक वेळ तुम्ही लाख 40 हजार  माणसांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवले होते. सरकारच्या बाजूने तुम्ही पूर्ण तयारी केली होती, पण शेवटी दुसरी बाजू लोकांची होती. लोकांनी कसा प्रतिसाद दिला... तुम्ही त्यांना कशाप्रकारे सारे समजावून सांगितले ते सांगा...
डॉ.अमर फेटले- 30 जानेवारीला मी माझ्या मुलीच्या बाळंतपणासाठी दुसऱ्या जिल्ह्यात गेलो होतो. मी तिथे असताना मला फोन आला की, एका चीनवरून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याची बातमी आहे. तिथे मोठाच प्रश्‍न निर्माण झाला होता. कारण ही भारतातील पहिली केस होती. त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना समजावून सांगण्यापासून सगळ्या गोष्टी आमच्या टीमने केल्या. ज्या त्रिशूर जिल्ह्यात ही केस आढळळी तेथे डॉक्टर रीना म्हणून होत्या, त्यांनी त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना समजावून सांगून त्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आणि क्वारनटाईन केले. त्या मध्यरात्री चार मंत्री रुग्णालयात त्या विद्यार्थ्याला पाहण्यासाठी हजर झाले होते. त्या रात्री झालेल्या मिटींगला मी हजर नव्हतो, पण दुसऱ्या दिवशी सकाळीच मी जाऊन आमच्या टीममध्ये सामील झालो. त्या रात्री सुरू झालेल्या बैठका दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सातत्याने सुरू होत्या. संपूर्ण देशातच एक भीती निर्माण झाली होती. प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा आम्ही काय करतो याची प्रचंड उत्सुकता होती. तेव्हा सरकारने प्रसारमाध्यमांसमोर हा सर्व विषय ठेवण्यासाठी माझ्यावर जबाबदारी सोपवली. तेव्हापासून मी दोन फोन वापरत होतो आणि त्या काळात जेवढे फोन आले तेवढे सगळे फोन मी उचलले होते. एकही फोन मी नाकारलेला नाही. त्याच वेळी आम्ही चॅनेलवरून काय करतो आहोत हे सर्वांना सांगत होतो. अत्यंत पारदर्शक व्यवहारामुळे लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. केरळमध्ये दिशा हेल्पलाइन नावाची एक हेल्पलाइन गेली काही वर्षे सुरू आहे. निपाह व्हायरस आला तेव्हा आणि केरळा पूर आला तेव्हा या दिशा हेल्पलाइने महत्त्वाचे काम केले होते. या वेळीसुद्धा ही दिशा हेल्पलाइन कामाला आली. या दिशा हेल्पलाइनची क्षमता वाढविण्यात आली आणि आणि प्रत्येकाला जी हवी ती माहिती मिळवण्यासाठी हा नंबर देण्यात आला. काही मुलभूत माहिती तिथला माणूस देत होता आणि अधिकची माहिती हवी असेल तर विशेषज्ञांचा लाईन जोडून देत होता. लाखो लोकांनी या हेल्पलाईनवरून माहिती घेतली. त्यामुळे लोकांना थेट डॉक्टरांकडूनच फोनवर माहिती मिळू लागली.
डॉ.अरुण गद्रे- या कालावधीत मोठ्या प्रमाणावर लोकांचे प्रशिक्षण करावे लागले. आशा वर्कर, नर्स, डॉक्टर या सगळ्यांनाच प्रशिक्षण देण्याची गरज होती. अल्पावधीत आपण हे सारे कसे साध्य केले?
डॉ.अमर फेटले-  या काळात आम्ही एकूण लाख 50 हजार लोकांना प्रशिक्षित केले. हे सारे आम्ही  मिडिया कॉन्फरन्सिंगद्वारे केले. वेगवेगळ्या गटांसाठी वेगवेगळ्या मीडिया कॉन्फरन्स आयोजित केल्या. नर्स, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांच्यासोबत इतर विभागातील कर्मचाऱ्यांचेसुद्धा प्रशिक्षण केले. दोन-तीन आठवड्यात आम्ही इतक्या लोकांना प्रशिक्षित केले. एक यूट्यूब साईट तयार केली. त्याद्वारे माहिती देऊ लागलो.

डॉ.अरुण गद्रे- क्वारनटाईन व्हायला लोकांनी विरोध केला का? तुम्ही त्यावेळी ही परिस्थिती कशी हाताळली?
डॉ.अमर फेटले- अनेकदा लोकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. लोक बाईकवरून बाहेर निघत होते. मग आम्ही लोकल लोकांच्या मदतीने लक्ष ठेवणाऱ्या टीम तयार केल्या. सुरुवातीचे रुग्ण म्हणजे चीनमधून आलेले वैद्यकीय विद्यार्थी होते. त्यातले काही जण हिंसकसुद्धा झाले होते. त्यानंतर इतर देशातून येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. आम्ही मग एअरपोर्टवर लोकांना सविस्तर माहिती देऊन सेंटरमध्ये आणू लागलो.
मग आम्ही रूट मॅप तयार करायला सुरुवात केली. म्हणजे पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आलेल्या माणसांची त्याच्याकडून माहिती घेऊन केलेली तारीख, वेळ, माणूस यादी. तो कुठे भेटला, कधी भेटला या सगळ्याची नोंद. ते रूट मग आम्ही माध्यमांमध्ये सर्वांसाठी प्रसिद्ध केले. त्यामुळे लोकांमध्ये जी प्रचंड भीती निर्माण झाली होती ती काही प्रमाणात कमी झाली. रुग्ण कोठे कोठे गेला हे नेमके लोकांना कळले. त्यातून मग त्याच्या संपर्कात आलेले लोक ते स्वतः काळजी घेऊ लागले. लाखो लोक भीतीखाली वापरण्यापेक्षा हजार लोक भीतीखाली आले. हेल्पलाइनला लाखांऐवजी हजार लोकांचे फोन येऊ लागले. उगाचचा त्रास वाचला.

डॉ.अरुण गद्रे- शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील लोकांचा प्रतिसाद आणि सहकार्य मध्ये कोणता फरक जाणवलातुम्ही त्या परिस्थितीशी कसा सामना केला?
डॉ.अमर फेटले- आमचे केरळ राज्य बहुतांश छोट्या छोट्या शहरांनी बनलेले आहे. येथे हे शहर आणि ग्रामीण असा मोठा फरक नाही. त्यातूनही ज्याला ग्रामीण भाग म्हणावे तेथून चांगला प्रतिसादाला मिळाला. अर्थात याचे श्रेय आमच्या स्थानिक वैद्यकीय पथकांना दिले पाहिजे. ग्रामीण भागात या वैद्यकीय पथकातील लोकांच्या नागरिकांशी थेट ओळखी होत्या. त्याचा उपयोग झाला. शहरी भागात अशा ओळखी असणे शक्य नव्हते.

डॉ.अरुण गद्रे- तुमच्याकडे मुंबईप्रमाणे झोपडपट्टीचा भाग आहे का?
डॉ.अमर फेटले- धारावीसारखी आमच्याकडे झोपडपट्टी नाही. काही भागांमध्ये झोपडपट्टी आहे. अर्थात तिथल्या लोकांना आम्ही स्थलांतरित म्हणत नाही. त्यांना पाहुणे कामगार असे म्हणतो. तेथे विविध भाषिक लोक असल्याने आम्हीही सहा भाषांमध्ये त्यांच्यासाठी काम सुरू केले. त्यांच्यासाठी सर्व प्रकारची मदत देऊ केली. त्यामुळे त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला. देशभर लॉकडाऊन होण्याच्या अगोदरच दोन दिवस आम्ही केरळमध्ये कर्फ्यू लावला होता.

डॉ.अरुण गद्रे- आपण या काळात तंत्रज्ञानाचा काही नावीन्यपूर्ण वापर केलात का?
डॉ.अमर फेटले- अनेकदा असे होत होते की काही लोक माहिती देत नव्हते. काही लोक चुकीची माहिती देत होते. अशा वेळेला आम्ही काय करत होतो, त्यांनी दिलेली माहिती सायबर सेलसोबत फोन मॅपिंग करून खात्री करून घेत होतो. त्यामुळे श्रम कमी झाले आणि नेमकी माहिती समोर येऊ लागली. सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज या मॅपिंगसाठी अनेकदा वापरले.


डॉ.अरुण गद्रे- तुम्ही क्वारनटाईन यंत्रणा कशी उभी केली?
डॉ.अमर फेटले- आमचे पायाभूत सुविधांचे खाते, पीडब्ल्यूडी आणि पंचायत यांच्या मदतीने कामाला लागले. लॉकडाऊन जाहीर झाल्यावर  राज्यातील वस्तीग्रहे, मोठ्या इमारती आणि रिकामी हॉटेले यांच्याशी बोलणी करून ती ताब्यात घेतली. तेथे सेंटर्स उभारली. परदेशातून चार विमानतळांवर प्रवासी येत होते. ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत अशा लोकांना कोरोना केअर सेंटरला पाठवत होतो. ज्यांना कोणतीच लक्षणे नाहीत त्यांना होम क्वारनटाईन करत होतो. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या लोकांना आम्ही फ्री वायफाय पुरवले होते. 24 तास मानसिक आधार देणारी हेल्पलाइन उपलब्ध करून दिली होती. हजार समुपदेशकांची दिशाही हेल्पलाइन त्यासाठी काम करीत होती. होम क्वारनटाईन केलेल्या लोकांसाठीसुद्धा काही नियम घालून दिले होते आणि जनमैत्री पोलीस नावाने एक गट त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम करीत होता.
डॉ.अरुण गद्रे- या मोहिमेमध्ये आपण स्वयंसेवकांची मदत घेतली होती. हे स्वयंसेवक कसे मिळाले? ते कसे मिळवले त्यांच्याकडून कसे काम करून घेतले?
डॉ.अमर फेटले गेली काही वर्षे दर पावसाळ्यात केरळमध्ये लेप्टो, डेंग्यू यांच्या साथी येतात. म्हणून गेली काही वर्षे आम्ही जनजागृती मोहीम राबविली आहे. या मोहिमेत जन आरोग्य सेवक काम करतात. हे जन आरोग्य सेवक म्हणजे जनतेतीलच काही लोक आहेत. ते आशा वर्कर आणि आरोग्य पथकासोबत काम करीत असतात. सर्व गल्लीमोहल्ल्यांत, गावागावांत असे जन आरोग्य सेवक आहेत. हे आरोग्यसेवक म्हणजे आमचे ताबडतोब हाताशी असलेले स्वयंसेवक होते. शिवाय वेबसाइटवरून स्वयंसेवक म्हणून आम्हाला जोडून घेण्याची विनंती केली. आमच्या आवाहनाला 43 हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे तिथल्या प्रत्येक घरावर किमान लोकांचे लक्ष होते. आम्ही नागरिकांना आवाहन केले होते कोरेना रुग्ण आढळल्यास त्याच्या मदतीला जा. त्याच्या घरच्यांना आधार द्या. रुग्णाला विलगीकरण कक्षात जाण्यासाठी आवाहन करा. मागच्यांची आम्ही काळजी घेतो असे सांगा. टेलिव्हिजन आणि प्रिंट अशा दोन्ही माध्यमांनी यासाठी मोठी मदत केली. मी स्वतः त्यासाठी कितीतरी वेळ दिला. शिवाय मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री रोज सायंकाळी एक तास जनतेबरोबर संवाद साधत होते, मुख्यमंत्र्यांच्या या संवादाला सर्वाधिक टीआरपी होता. लोक इतर सर्व गोष्टी सोडून मुख्यमंत्र्यांना ऐकत होते.

डॉ.अरुण गद्रे- लॉकडाऊन संपल्यानंतर या व्हायरससोबत कसे जगावे याबाबत काय सल्ला द्याल?
डॉ.अमर फेटले- असा सल्ला देण्याइतका मी मोठा विशेषज्ञ नाही. मात्र एवढे सांगू शकेन की, या वायरसला कमी लेखू नका. हा व्हायरस जाणार नाही. त्यामुळे बाहेर जाताना तो प्रत्येक सरफेसवर आहे याची जाणीव ठेवा. मास्क वापरा फार महागडे माज लावण्याची गरज नाही साधा कापडाचा मास्क वापरा. कोठेही बाहेर जाऊन आला की प्रथम आपले हात साबणाच्या पाण्याने धुवा. कामावरून आल्यावर आंघोळ करून मग इतर लोकांना भेटण्याची सवय लावा. बाहेर जाल तेव्हा सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा. वयस्कर लोकांची काळजी. घ्या मुलांना स्वच्छतेचे धडे द्या. रस्त्यावर थुंकणे टाळा. केरळमध्ये रस्त्यावर थंकणाऱ्यारांची संख्या अत्यल्प आहे. डॉक्टर आणि संशोधक हेच तज्ज्ञ असतात, हे लक्षात ठेवा. कोणीही सांगितलेल्या कुठल्याही माहितीवर उगाच विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही गोष्टीने प्रभावित होऊ नका. सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करा. एक-दोघांनी जरी नियमांचे उल्लंघन केले तर काही हजार लोकांचे जीव धोक्यात टाकण्यासारखे आहे, हे लक्षात ठेवा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला समजू द्या. ऐकला नाही तर रागवा. पण कायदा हातात घेऊ नका. संबंधित विभागाला कळवून त्यांना त्यांचे काम करू द्या. वैद्यकीय विभागात काम करणाऱ्यांना आदराने वागवा. त्यांना बहिष्कृत करणे टाळा. पोलिसांचा आदर करा. आपली तब्येत चांगली ठेवा. 90 टक्के कोरोना माइल्ड म्हणजे कमी त्रासदायक असतो. तांदळाची पेज आहारात घ्या. गुळण्या करायची सवय लावा. तुळशीचा रस, हळदीचे पाणी अशा काही स्थानिक गोष्टी उपयोगात आणू शकाल. फळे आणि आणि फळभाज्या, पालेभाज्या आहारात घ्या. आवळा, पपया यांचे सेवन आवर्जून करा. पुरेशी झोप घ्या. सारखेसारखे कोरोनाचे आकडे पाहत राहू नका. अमेरिकेत किती रुग्ण आहेत याच्याशी सामान्य माणसाला फारसे काही देणेघेणे नाही, हे लक्षात घ्या. आपण काय करायचे हे महत्त्वाचे आहे. आपल्या कुटुंबाची, आपल्याशी संबंधित लोकांची आणि आपल्या परिसरातील सेवेत असलेल्या लोकांची काळजी घेणे एवढेच आपले काम आहे. एवढे केले म्हणजे सगळ्या राज्यांची, देशाची आणि जगाचीही काळजी घेतल्यासारखे आहे.

Sunday, May 31, 2020

अजब न्याय


अजब न्याय

काय करतो आहेस?
वैजयंतीने फोनवर बोलणं या प्रश्नातच सुरू केलं.
उद्याचं पान लावतोय.. मी तिला म्हणालो.
मी तेव्हा उद्या प्रकाशित होणारे युवा पान  सेट करीत होतो.
कधी निघणार आहेस? तिने दुसरा प्रश्न विचारला.
पान झालं की... मी म्हणालो.
किती वेळ लागेल..? तिने प्रतिप्रश्न केला.
तासभर तरी जाईल... मी स्पष्टीकरण दिलं.
आज भेटशील..? तिने विचारलं
हो... म्हणालो.
मग भेटूया.. मी वाट पाहते... असं म्हणून ती फोन ठेवायला निघाली, तर मीच विचारलं,
काही अर्जंट आहे का?
तसंच समज... बोलायचंय तुझ्याशी.. ती म्हणाली.
येतो...
ठेवू... ?
मी बाय-बाय म्हणालो आणि आणि फोन कट केला.
पण 'काय प्रॉब्लेम असेल'च्या भुंग्याने मन पोखरायला सुरुवात केली. पानाचा लेआउट करण्यात मनच लागेना. ऑपरेटर सोलकरला सूचना दिल्या आणि पंधराव्या मिनिटाला मी ऑफिसबाहेर पडलो.
नेहमीच्या जागी पोहोचलो. वैजयंती अगोदरच पोचली होती. मोबाईलवर फेसबुकशी चाळे करीत माझी वाट पाहत बसली होती. नेहमी हसतमुख असणारी ही बया तोंड पाडून बसली होती. काय झालं म्हणून मी विचारलं तर काही न बोलता घडाघडा रडायलाच लागली.
बाजूला बसून उजवा हात पाठीमागून तिच्या उजव्या खांद्यावर टाकून मी तिला नेहमीप्रमाणे जवळ घेतलं आणि विचारलं,
काय झालं?
तर प्रश्नाचे उत्तर आले नाही. हुंदके ऐकायला येऊ लागले.
डाव्या हातानं प्रथम हनुवटी उचलून मग मी तिचे डोळे पुसले.
आश्वासक स्वरात पुन्हा विचारलं,
काय झालं?
मग मात्र तिने आढेवेढे न घेता रडवेल्या चेहऱ्याने सगळी गोष्ट सांगितली.
गोष्ट एकदम फालतू होती.
तिची सहकारी कोणी माया का छाया म्हणून... तिला बॉसने कामावरून काढून टाकलं. तिच्या घरी पैशाचा मोठा प्रॉब्लेम आहे. ती जाताना तिच्याजवळ रडली. त्या रडण्याचं हिला वाईट वाटलं. म्हणून आता ही हुंदके देत होती. मी म्हटलं, तुला वाईट वाटलं तर ठीक आहे. पण मेली तर नाही ना... जिवंत आहे ना... मग सोड चिंता. मिळेल दुसरा जॉब. मग जरा अस्वस्थ होत तिने आपला हॅंकी बाहेर काढून तोंड पुसलं. तिला हसवण्यासाठी हॅंकी... म्हणालो. तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. हॅंकीचा शॉर्टफॉर्म तिच्या पहिल्या भेटीत कळला.  ती जेव्हा हातरुमालाला हॅंकी म्हणाली तेव्हा मी म्हटलं होतं की, शब्द एकदम परफेक्ट आहे. हॅकरचिप एवढा मोठा शब्द म्हणण्याइतका एफएसआय तरी आहे कुठे त्यावर?
तिला तेव्हा एफएसआय हा शब्द माहीत नव्हता. तो सांगितल्यावर तिला हसू आलं होतं. आज मात्र तिला हँकी म्हटलं की तो विनोद आठवण हसू येतं.
प्रेमात असलं की छोट्या छोट्या गोष्टी एवढ्या सुंदर दिसू लागतात.
आम्ही उठलो. नेहमीच्याच चहावाल्याकडे गेलो. मी चहा पीत नाही. ती नेहमीप्रमाणे फूल  चहा प्यायली.  चहावाल्याशेजारी पानपट्टी आहे त्याच्याकडून चॉकलेट घेतली. एक फोडून तोंडात टाकलं. खिश्यातून फोन काढला आणि ऑपरेटर सावपेकरला फोन केला.
झालं का रे पान? मी विचारलं तर तो म्हणाला, हो.
ठेवतो मग. गुड नाईट. मी म्हणालो आणि फोन कट केला.
सालपेकर आमच्या डिपारमेंटमधला सर्वात सीनियर माणूस. तितकाच सिन्सियर. म्हणूनच तर मी सालपेकरवर पान सोडून बाहेर पडू शकतो.
वैजयंतीला तिच्या गाडीला सोडून मी माझ्या घरची वाट धरली.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी अंथरुणात असतानाच फोन वाजला. उपसंपादक मानेचा फोन होता. मी झटकन फोन उचलून कानाला लावला आणि हॅलो म्हणालो. तो हॅलो न म्हणता म्हणाला, साल्या, वाट लावलीस ना... काल काय झोपला होतास काय पान लावताना? क्षणात माझी झोप उडाली. उठून बसत मी काळजीच्या स्वरात विचारलं, काय झालं?
झालेलं काही नाही. तू केलं आहेस ते सांगायला फोन केला.
अरे काय झालं ते नीट सांग ना... मी करवादलो.
काय लफडा करून ठेवला आहेस पानावर? त्याने प्रश्न घातला.
काय झाले ते सरळ सांग ना भडव्या... मी त्याला शिवी घातली.
वाघ्रप्रकल्पाच्या लेखात वाघवाघिणीच्या मैथुनाचा फोटो का टाकला आहेस?
काय? मी आश्चर्याने उद्गारलो. तो काहीच बोलला नाही.
सालपेकरने वाट लावली माझी यार... मी म्हणालो.
तो त्यावरही काही बोलला नाही. मग मीच म्हणालो, खरं सांगतो आहेस ना?
सरांनी दाखवलं मला... आल्याआल्या ते म्हणाले... तोच वाघ तुझ्यावर चढवतो.
म्हणाले, मालकाचा सकाळी सहाला फोन आला होता त्यांना...
मी त्यावर काहीच बोललो नाही. मग तोच म्हणाला, पण पुन्हा पाच मिनिटांनी सर मला म्हणाले, कळवा त्याला आणि टेन्शन घेऊ नको म्हणावं. आल्यावर बघू.
खर?
खरं!
होय... पण  लक्षात ठेव चूक गंभीर आहे.
निघतो मी ताबडतोब, मी म्हणालो
बाय म्हणत त्याने फोन ठेवला.
मानेचा फोन ठेवला आणि मी वाघ मागे लागल्यासारखा तयारीला लागलो.
मी ऑफिसात पोहोचलो तेव्हा माने कामासाठी बाहेर गेला होता. सरळ सरांच्या केबिनमध्ये शिरलो. सॉरी म्हणालो आणि सगळं खरं खरं सांगितलं, मैत्रिणीला भेटायला गेलो. उठल्यावर सरांनी तिचं नाव विचारलं. मी तेही आडपडदा न ठेवता सांगून टाकलं. थोडे वैतागले, पण मग म्हणाले, आता तू विषय सोड उद्याच्या कामाला लाग.
थँक्यू सर, म्हणून मी निघालो तर मागून सरांचा आवाज आलास, आणि हो त्या सालपेकरला शिव्या घालू नकोस.
नाही सर, मी म्हणालो.
मी सरांच्या केबिनमधून बाहेर पडलो आणि डीटीपी विभागात गेलो. सालपेकर तोंड पाडून माझ्याजवळ आला. म्हणाला, माफ करा सर, माझ्या लक्षातच आलं नाही. काल खूप काम होतं. चारच्या बातम्या बदलायचे होत्या. घाईत लक्षातच आलं नाही. मी पानावर घेतला तेव्हा तो फोटो छोटा होता. त्यामुळे असं काही असेल हे लक्षातच आलं नाही. मी घरी गेल्यावर उशिरा त्या आर्टिकलच्या बाजूची बातमी काढण्याचा आदेश आला, म्हणून नावकरने जागा भरायला फोटो वाढवला आणि मग एकदम की गोष्ट लक्षात यायला लागली.
केविलवाण्या स्वरात तो बोलू लागलेला पाहून मी त्याच्या दंडावर थोपटत म्हटलं, सोड... झालं ते झालं. आता मिटलं. मीच तुझ्यावर सोपवून जायला नको होतं.
दिवसभर कामात ती गोष्ट पुन्हा आठवली नाही, पण संध्याकाळी सर स्वतःहून आमच्या विभागात आले. म्हणाले, मालकाकडून मेल आला होता आणि त्यात स्पष्ट लिहिलं होतं ज्याने हा फोटो पानावर लावला त्याला आजपासून कामावर कमी करा. कोणाला कमी केलं ते आज रात्री ऑफिस सोडण्यापूर्वी मला कळवा. कळवायला हवं.
पुढे मला म्हणाले, खरे तर तुलाच कामावरून काढून टाकायला हवा. पण मला वाटतं आपण सालपेकरला कमी करू. मी निराशेतही उसळून विचारलं, का?
कारण सालपेकरला मी उद्या दुसऱ्या ठिकाणी नोकरीला शकतो. पगार तेवढाच मिळू शकेल त्याला. पण तुला काढून टाकलं तर तुझ्यासाठी जॉब नाही माझ्याकडे. मी त्यावर गप्प राहिलो. काय बोलणार...
सालपेकर आणि मला केबिनमध्ये बोलावलं. त्याला व्यवस्थित सांगितलं. आमच्यासमोरच फोन करून  सालपेकरला कामावर घेण्याची विनंती केली. इथल्याएवढा पगार द्यावा म्हणून प्रयत्नशील होते. पण समोरच्या माणसाने सहकारी नाराज होतील, महिन्याभरानंतर वाढवतो, असं सांगितलं. माझ्यावर विश्वास ठेव मी आणखी चांगला जॉब शोधून देईन तुला, सर सालपेकरला म्हणाले.
तो थँक्यू म्हणाला. मी दोघांप्रति कृतज्ञ होतो. पण थँक्यू म्हणून मोकळा होऊ इच्छित नव्हतो.
सकाळी लवकर उठलो होतो. दिवसभर काम करून थकलो होतो. म्हणून चहा प्यायला खाली उतरलो.
हे सर्व तिला सांगाव म्हणून फोन केला तर ती वेडी स्वतः रडत होती. मला नेहमीप्रमाणे माझं गाणं बाजूला ठेवून तिचं ऐकावं लागलं. काय झालं, हा प्रश्न पाच-सहा वेळा विचारल्यावर म्हणाली, मायाला परत घेणार होते कामावर. सकाळी मी सरांना तिच्या परिस्थितीबद्दल सांगितलं. सर तयार झाले. उद्या बोलु म्हणाले. मी उत्साहाने मायाला कळवलंही. आणि आता पाच मिनिटांपूर्वी सरांनी मला निरोप पाठवला, मायाला घेऊ शकणार नाही आपण. म्हणून मी रागातच त्यांना भेटायला गेले तर म्हणाले, वरून आदेश आलाय मला, कोणीतरी सालपेकर नावाचा इसम तिच्या जागेवर जॉईन होतोय उद्यापासून...
मी सारं समजलो. पण तिला काहीच बोललो नाही. चहा प्यायलो आणि ऑफिसला परतलो.
मनात अपराधाची भावना भरून राहिली.
वैजंयतीच्या फोनमुळे मी सालपेपरवर काम सोपवलं होतं. त्याची अप्रत्यक्षरीत्या तिला सजा भोगावी लागली. एक वेगळाच न्याय घडला होता. पण तरीही माझं मन मला खात होतं.
-
वैभव बळीराम चाळके
फेब्रुवारी 2013