उडणारा घोडा
-वैभव बळीराम चाळके
आज रविवार. मस्त मजेचा दिवस. सार्थ उशिरा
उठला. नाश्ता करून झाल्यावर त्याने मागच्या
रविवारी मिटून ठेवलेली चित्रकलेची वही उघडली.
काळ्या रंगाचे जेलपेन घेऊन त्याने बैठक मारली.
आता पुढचा तास-दीड तास हा इथून उठणार नाही.
हे आई-बाबांनी ओळखले. लहान असल्यापासूनच
त्याला चित्रकलेची आवड आहे. यंदा तो सातवीत
आहे. अभ्यासातून वेळ मिळत नाही म्हणून तो हल्ली
फक्त रविवारी चित्रे काढतो. पूर्वी तो खूप चित्रे काढत
असे. आता मात्र दर रविवारी तो एकच चित्र काढतो.
त्यात गेले दोन तीन महिने त्याने घोड्यावरच सारे लक्ष
केंद्रित केले आहे. दर रविवारी तो एक नवा घोडा
रेखाटतो. काल्पनिक घोडा. कधी सहा पायांचा...
कधी लांब शेपटाचा... कधी पंख असलेला...
आज त्याने चार पंखांचा घोडा रेखाटायला
घेतला आहे. काळ्या जेलपेनने चित्र काढण्याची
खास शैलीच त्याने गेल्या वर्षभरात निर्माण केली
आहे. त्याच्या वयाच्या हिशोबात ही चित्रे अधिकच
सुंदर आहेत. जो पाहील तो त्याचे या चित्रासाठी
कौतुक करतो. राजवर्धनच्या वाढदिवसाला त्याने
काढून दिलेली मनीमाऊच्या पिल्लांचे चित्र केवळ
अप्रतिम होते. सर्वांनी त्याचे कौतुक केले. हा चार
पंखाचा घोडा तो इतूला देण्यासाठी रेखाटतो आहे.
घोडा त्याला अगदी लहानपणापासूनच आवडतो.
खेळण्यात घोडा, टीव्हीवर घोड्याचा कार्यक्रम,
फिरायला जायचे तर घोड्यावर बसता येईल तेथेच
अशी त्याची घोडदौड सुरू असते.
दोन तास झाले असतील तो जागचा हलला
नाही. घोडा काढून पूर्ण होताच तो पप्पाला दाखवणार
होता. पण त्याच्या एकाएकी लक्षात आले की,
आपण बराच वेळ सुसूला गेलेलोच नाही. तो पटकन
उठून धावतच टॉयलेटमध्ये घुसला. मग हातपाय
तोंड धुवून पुसून तो चित्र घेऊन पप्पाकडे गेला.
‘पाहिलात माझा घोडा....!’
‘व्वा!’
‘आवडला?’
‘अर्थातच छान आहे!’
‘पण...’
‘पण काय?’
‘एका पायाचा खूर का रे असा काढलाय! नीट
नाही आला बघ! मोडलेला पाय बांधून ठेवतात
आणि मग तो जखडून राहतो तसा दिसतोय’
‘हा, ना?’ एका पायाकडे बोट दाखवत सार्थने
विचारले.
‘हो! पण चालतंय तेवढं!’
‘सॉरी! चालणार नाही हा घोडा मी इतूसाठी
क्रिएट केलाय. अजून एक रविवार आहे. तिच्या
वाढदिवसाला मी पुढील रविवारी नवीन घोडा
काढणार’
‘पुन्हा दोन तास...’
‘हो काढणार!’ सार्थ निग्रहाने म्हणाला.
तेवढ्यात वेदू हाक मारत आला. चित्रकलेची
वही मिटून ठेवून तो खेळायला गेला. पुढच्या
रविवारी तब्बल दोन तास खर्चून त्याने घोड्याचे
चित्र पुन्हा काढले. पंखाचा हा घोडा अत्यंत देखणा
दिसत होता. आता त्याच्या पायात खोटही नव्हती.
तो घोड्याचे चित्र घेऊन इत्तूच्या वाढदिवसाला
गेला. वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला.
चित्राचेही सार्यांनी कौतुक केलं. इतू तर भलतीच
खूश झाली.
रात्री तो इतूकडेच थांबला होता.
रात्री मामाबरोबर इतू आणि तो आईस्क्रीम
खायला खाली उतरले, तेव्हा मामा त्याला म्हणाला,
‘माझ्याकडे एक जादूचा मंत्र आहे!’
‘जादूचा मंत्र...’ इतू आणि तो एकदम
उद्गारले
‘हो! जादूचा मंत्र! त्या मंत्राने तुम्ही चित्र जिवंत
करू शकता म्हणजे तू इतूसाठी काढलेला घोडा
जिवंत करू शकतोस!’
‘खरेच!’
‘हो’
‘मग करूया!’
‘नको इतू म्हणाली, मला ते चित्र हवे आहे. तू
दुसरा घोडा काढ आणि तो जिवंत कर’
‘माझ्या घरी आहे दुसरा काढलेला,’ तो
म्हणाला.
‘मामा मला मंत्र सांग. मी उद्या घरी गेलो की तो
घोडा जिवंत करेन’
मामाने मंत्र सांगितला. तो त्याने पाठ केला.
घरी परतताच त्याने चित्रकलेची वही काढली.
आणि तो मंत्र म्हटला. क्षणाचा विलंब न लावता
घोडा जिवंत...
तो अवाक्!
मग त्याने घोड्यावर उडी मारून मांड ठोकली.
घोडा तयार होताच त्याने लगाम खेचला. आणि
दुसरे आश्चर्य...
घोडा थेट हवेत झेपावला...
त्याला पंख होते ना! एक दोन नव्हे चार! त्याने
मग हवेत सैर केली. मुक्त सैर. कसले कसले चित्कार
काढत तो अमाप फिरून आला. त्याला विमानात
बसायची इच्छा होती. वरून जग कसं दिसत असेल
असा विचार त्याच्या मनात येई. पण आज त्याने
उंचउंच जाऊन वरून पाहिलं. जीव अगदी हरखून
गेला त्याचा.
मनसोक्त फिरल्यावर आणि चांगलाच दमल्यावर
तो परतला. बाईकच्या पार्किंगमध्ये घोडा उभा करून
तो घरी आला. धापा टाकत आईला म्हणाला,
‘आई, मज्जा आली भारी’
घरात पाऊल टाकताच त्याला टीव्हीवर आगीचे
लोळ दिसले. टीव्ही पाहणार्या आजीला त्याने
विचारले,
‘काय झालं ग आजी?’
‘अरे बॉम्बस्फोट झाला....’
‘कुठे?’
‘मुंबईतच’
‘पण नेमका कुठे?’
‘सीएसटी स्थानकाशेजारी....’
‘कधी’
‘आताच... ब्रेकिंग न्यूजच आहे ही...’
‘अतिरेक्यांनीच केलाय.. समुद्रमार्गे... ते पसार
झाले असल्याची माहितीही पुढे आली आहे.’
‘मी येतो हं थोड्या वेळात,’ म्हणत तो बाहेर
पडला. त्याच तिरमिरीत त्याने घोडा सोडला. उडी
मारून घोड्यावर मांड ठोकली. खबडक खबडक
करीत गेटबाहेर आला
आणि त्याने लगान खेचत
घोडा उडवला. चार पंख
पसरत घोडा क्षणात उंच झेपावला. आधी सीएसटी
गाठत त्याने अंदाज घेतला. हळूच खाली उतरून
त्याने घोडा उभा केला. पोलीस अधिकार्यांच्या
आसपास जाऊन चर्चेला कान दिला. कुलाबा
मच्छीमारनगरातून अतिरेकी पळाल्याची माहिती
मिळताच त्याने पुन्हा घोड्यानेही आकाशात झेप
घेतली. किनारा सोडत तो उंच झेपावला. समुद्रावर
अनेक बोटी दिसत होत्या. बारकाईने पाहताच त्याला
खूप दूरवर वेगाने जाणारी स्पीडबोट दिसली. हीच
बोट... हेच अतिरेकी... त्याने घोड्याची दिशा
बदलून लगाम खेचत वेग घेतला. त्या स्पीडबोटीमध्ये
पाच लोक होते. आपल्या माघारी कोणी नाही ना
याचा अंदाज घेत ते वेगाने चालले होते. काही
क्षणात तो त्यांच्यापासून काही शे फुटांवर पोहचला.
बोटचालक सोडून चौघांनी उडणारा घोडा आणि
त्यावरचा स्वार पाहून गोळीबार सुरू केला. क्षणाचा
विलंब न लावता घोडा उंच झेपावला. गोळीबार
होत राहिला. घोडा आता, गोळीच्या टप्प्याबाहेर
होता. गोळ्या सुसाट वेगाने येऊन गलितगात्र होऊन
समुद्रात पडत होत्या. गोळ्या वेध साधूच शकत
नाही कळल्यावर त्यांनी गोळीबार थांबवला. तसा
घोडा जवळ आला. पुन्हा गोळीबार सुरू झाला.
आता घोड्यालाच एक खेळ सापडला. तो लगेच
वर झेपावला. गोळीबार बंद झाला. पुन्हा तो खाली
आला. गोळीबार पुन्हा सुरू. घोड्याने आता
स्वतःच त्या अतिरेक्यांशी दुश्मनी घेतली होती. तो
उंच गेला अफाट वेगाने खाली येत त्याने गोळीबार
सुरू होण्यापूर्वीच त्या स्पीटबोटच्या जवळून एक
फेरी मारली. आता ते चौघे घाबरले. गोळीबार सुरू
होईपर्यंत घोडा वेधलांबीच्या बाहेर पोहचला होता.
एक अनोखा झगडा सुरू झाला. उलटसुलट दिशेने
घोड्याने खाली झेपावत दोघांना लाथांनी घायाळ
केले. पण त्या चकमकीत घोड्याला पुढच्या डाव्या
खुराच्या जरा खाली एक गोळी चाटून गेली. एक
वेदना मस्तकात गेली. घोडा आणखी चवताळला.
त्याने पुन्हा एक अफाट झेप घेत तिसर्याला दणक्यात
खाली पाडले. पुढची एक झेप चुकली, पण त्या
पुढच्या झेपेत बोटचालकाला घोड्याच्या खुराचा
फटका बसला. तो जागीच ठार झाला.
स्पीडबोटवर आता चार प्रेते. बोट तशीच पळत
आहे. घोडा आता बोटीच्या जवळ उडू लागला.
बोट आणि घोडा समान वेगाने धावू लागताच त्याने
बोटीतील अतिरेक्यांचा अंदाज घेतला आणि बोटीवर
उडी घेतली. ड्रायव्हर सीटवर बसत त्याने स्पीडबोटीचा
वेग कमी केला. मग बोट एकशे ऐंशी अंशात वळवून
तो किनार्याच्या दिशेने निघाला. घोडा बोटीवरून
उडत होता. तब्बल एक तासाच्या प्रवासानंतर बोट
किनार्यावर लागली. घोडा जमिनीवर उतरला.
किनार्यावर ही गर्दी होती. हवाईदलाने हा पराक्रम
पाहिला होता. चित्रित केला होता. हवाईदलाचे प्रमुख
किनार्यावर उपस्थित होते.
त्यांनी घोड्यासह त्याचे स्वागत
केले. लोक मोठ्या आनंदाने
आणि कौतुकाने पाहत होते. त्याच्या घरच्यांनाही
बोलवले होते. इतू आली होती. राजवर्धन आला
होता आणि मामाही आला होता.
हवाईदलाच्या प्रमुखांनी सार्थची पाठ थोपटली.
पाठीवर पडल्याच्या थापेमुळे त्याला एकदम
जाग आली.
‘अरे उठ,’ आजी त्याला सांगत होती.
सार्थ आता संभ्रमात... हे सारे स्वप्न होते...?
पण इतूकडे आपण गेलो होतो. आलो कधी
घरी? स्वप्न नेमके कुठून सुरू झाले?
त्याने गडबडीने उठून चित्रकलेची वही काढली.
जो घोडा त्याने जिवंत केला होता तो पाहिला. तो
तेथे होताच.
त्याची गडबड पाहून त्याच्या मागे फिरणार्या
आजीने विचारले,
‘काय झाले रे?’
‘स्वप्न पडलं मला...’
‘कसलं..?’
‘सांगतो नंतर’ तो म्हणाला. तेवढ्यात बाबा
आंघोळ करून आले होते. त्यांना तो म्हणाला,
‘बाबा, अहो या घोड्याचा एक पाय खराब
दिसतोय ना, त्याचे कारण कळले मला. गोळी
लागलेय त्याच्या पायाला.
आजी तूही ये, आईऽऽ ये ना ग! स्वप्नातला
पराक्रम सांगतो तुम्हाला...’