माझे नवे सदर दै. नवाकाळ मधून.....दर रविवारी.....
कवितेतील फुलपाखरे
कवितासंग्रहांचा एक चांगला संग्रह माझ्यापाशी आहे. गेल्या २० वर्षांत जमविलेली ही माझी अमूल्य संपत्ती आहे. त्यातील कोणताही कवितासंग्रह काढला तरी त्यात मला फुलपाखरे बागडताना दिसतात. शब्दांची फुलपाखरे, अर्थांची फुलपाखरे, छंद-लईची फुलपाखरे, प्रतिमा-उपमांची फुलपाखरे... पहिल्या वाचनातच मला आवडलेल्या ओळी, शब्द यांच्यासमोर खुणा करून ठेवण्याची मला सवय आहे. पुढच्या वेळी जेव्हा संग्रह हाती येतो तेव्हा काव्यगुणांची फुलपाखरे कोठे बागडत आहेत ते मला नेमके आढळते. थोडा जरी वेळ मिळाला तरी मग मी तो या फुलपाखरांसोबत घालवतो.
अलीकडे तर या संग्रहांमधून एकसारख्या रंगांची, एकसारख्या जातीची फुलपाखरे मला मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहेत. एक या पुस्तकात तर दुसरे त्या पुस्तकात... कधी एखाद्या पुस्तकातल्या फुलपाखराशी नाते सांगणारे फुलपाखरू मला एखाद्या कार्यक्रमात... एखाद्या रेडिओ, टीव्हीवरील शोमध्ये... कधी वर्तमानपत्रात-मासिकांत... आढळतात. ही सजातीय फुलपाखरे मग केवढा तरी आनंद देऊन जातात. फुलपाखरांचे असे रंग निरखण्यात काळ केवढा सुंदर जातो. हा एक सुंदर असा शोधप्रवास आहे. अखंड आनंद देणारा. तो आनंद मग इतरांनाही वाटावा, असे वाटू लागते. चला तर तुम्हीही माझ्यासोबत... दर रविवारी याच जागेवर... तर्हेतर्हेची कवितेतील सजातीय फुलपाखरे पाहूया!!
- शब्दवैभव
No comments:
Post a Comment