Monday, January 30, 2017

कवितेतील फुलपाखरे जागी झालेली बाई

कवितेतील
 फुलपाखरे

जागी झालेली बाई

बाईच्या जगण्याचं रडगाणं तर कित्येकांनी गायलंच
आहे. पण तिच्या दुःखाच्या अथांग काळ्याशार
पाण्यातून मान वर करून तिच्या आत ही अथांगता
फोडून टाकण्याची ताकद असल्याची जाणीव देणारी
कवयित्री नीरजा यांची कविता मराठी काव्यरसिकाला
नेहमीच आपली वाटत आली आहे.
नीरजा यांचा ‘मी माझ्या थारोळ्यात’ हा दीर्घकवितांचा
संग्रह आता माझ्यासमोर आहे. मी काहीही न बोलता
या एवढ्याच प्रस्तावनेसह त्यातले मी अंडरलाइन करून
ठेवलेले काव्यतुकडे एका मागोमाग एक तुमच्यासमोर
ठेवतो आहे. अस्वस्थ नाही झालात, डोळे खाडकन् नाही
उघडले, बाईला काय हवं ते नाही कळलं तर अजून
तुम्हाला खूप चालायचं नीरजापर्यंत पोहचायला याची
खूणगाठ मनाशी बांधून स्वतःला माफ करा. नीरजा
लिहितात - ‘मला व्हायचं आहे आता/भयमुक्त/सोडवून
घ्यायचं आहे स्वतःला/तुझ्यातून/पुन्हा एकदा व्हायचं
आहे/आदिम अथांग/पुसायचा आहे/माझ्या कपाळावरचा
इतिहास/तू लिहिलेला/खुडायच्या आहेत मुळ्या/
रूढिपरंपरांच्या/खोडायची आहेत अक्षरं/माझ्यासाठी
तू तयार केलेल्या/नियमावलीतील/भिडायचं आहे
थेट/माझ्यातल्या शक्यतांना’
‘आज माझ्या श्वासात/मी साठवते आहे/स्वातंत्र्याचा
करकरीत गंध/धुडकावते आहे/वर्षानुवर्षांची तुझी
एकछत्री राजवट’
‘बाईनं द्यायला हवा नकार/ह्या व्यवस्थेला/असं वाटतंय/
तुझ्या काही मित्रांना/हातात हात घेऊन माझा/ते काढू
पहाताहेत मला/माझ्याच आयुष्याच्या चिखलातून/
पण माझ्यासाठी/आणि माझ्या इतर मैत्रिणींसाठी/पुरेसे
नाहीत/हे दोन-चार हात/हजारो हातांनी/यायला हवंस तू
माझ्याकडे’
‘गंगेसारखी पवित्र हवी बाई/आणि मर्यादेत रहाणारीही;/
दुथडी भरून वहायला लागली/किनारे ओलांडत
अस्ताव्यस्त/तर/तू वसवलेली गावं उद्ध्वस्त करून
जाईल/हे तुझ्या मनात वसलेलं भय किती आदिम आहे/’
‘मला परतायचं आहे/पुन्हा एकदा/त्या आदिम अंधार्‍या
गुहेत/जिथं होते मी विमुक्त/आणि तुझ्याही मनात नव्हतं
रुजलं विष/लिंगसत्तेचं.’
‘ती बाई कशी काय झोपू शकते/गाढ/ह्या कानठळ्या
बसवणार्‍या/ग्लोबलायझेशनच्या आवाजात?/माझ्या
मनात चाललेल्या/स्फोटांच्या अखंड मालिकांचा आवाज/
ऐकू येत नाही का तिला?/की जाणूनबुजून घेते आहे ती
सोंग/निवांत असण्याचं?’
- शब्दवैभव

No comments:

Post a Comment