Monday, January 30, 2017

कवितेतील फुलपाखरे

कवितेतील
 फुलपाखरे

फुलपाखरांशी खेळतच आमची पिढी मोठी झाली.
सोबतीला होती ग.ह. पाटील यांची कविता -
छान किती दिसते! फूलपाखरू
या वेलींवर! फुलांबरोबर
गोड किती हसते! फूलपाखरू
पंख चिमुकले! निळेजांभळे
हलवून झुलते! फूलपाखरू
डोळे बारीक! करिती लुकलूक
गोल मणी जणू! फूलपाखरू
मी धरू जाता! येई न हातां
दूरच ते उडते! फूलपाखरू
ही कविता आमच्या पिढीच्या सर्वांच्याच गळ्यातला
ताईत होऊन राहिली आहे. कविता म्हटले की, ज्या
दोन-चार कविता हमखास आठवतात त्यातली ही
एक कविता. तिचे कवी कोण, हे कदाचित अनेकांना
माहीत नसेल. पण कविता मात्र तोंडपाठ आहेच.
तर मराठीतील आणखी कोणकोणत्या कवितांत
‘फुलपाखरू’ आले आहे याचा विचार करू लागलो
की मला दोन शेर आठवतात. हे दोन्ही शेर मला
कविमित्र कैलास गांधी याने प्रथम ऐकवले. त्यानंतर
ते अनेकदा अनेक ठिकाणी अनेकांकडून ऐकावयास
मिळाले. त्यातला पहिला शेर आहे. गोव्याच्या
कवियित्री राधा भावे यांचादु:खालाही
चिमटीमध्ये धरता येते।
आणिक त्याचे फूलपाखरू करता येते॥
राधाजींच्या या शेराला दाद न देईल तो अरसिक!
केवढा जबरदस्त विचार मांडलाय! दु:खाचे फुलपाखरू
ही प्रतिमाही एकदम नावीन्यपूर्ण! पुन्हा फुलपाखराशी
मानवी मनाचे जे पूर्वबंध आहेत ते जागवले म्हणजे या
शेराची उंची कळू लागते!
दुसरा शेर आहे गजलकार चित्तरंजन भट यांचा!
हो, गजलसम्राट सुरेश भट्ट यांचे हे चिरंजीव. तेही
अफलातून गजल लिहितात. आजच्या लोकप्रिय
कवींच्या तोंडी त्यांचा हा शेर सदैव ऐकावयास मिळतो.
चित्तरंजन लिहितातकोणत्या
चिमटीत मी त्याला धरू
हिंडते मेंदूत जे फुलपाखरू
गजलेतील नवा विचार म्हणून या शेराकडे
पाहिले जाते. गजलच नव्हे तर एकूण कवितेत असा
नवा विचार मांडला गेला पाहिजे. नव्या प्रतिमांची,
कल्पनांची नवकवींनी कास धरली पाहिजे. भाषेचा
माथा तरच उन्नत होईल.
- शब्दवैभव

No comments:

Post a Comment