Tuesday, November 19, 2019

काही लेख

रात्री टाईमपास नको... (409)



महाविद्यालयात मुलांना शिकविताना मी मुद्दामच अभ्यासक्रमाबाहेरच्या काही गोष्टी मुलांना शिकवीत असतो. गुरुकुल पद्धतीचा हा वारसा मला माझ्या गुरुजनांकडून मला मिळालेला आहे अभ्यासक्रमातली एखादी गोष्ट राहून गेली तरी चालेल, पण मुलांना जीवनात उपयोगी पडतील अशा, आपल्याला माहिती असलेल्या शक्य तेवढ्या गोष्टी त्यांना सांगाव्यात, असा हा सर्वांगीण शिक्षणाचा वारसा मी माझ्यापरीने पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असतो.

गेल्या वर्षी एकदा वर्गात मुलांना विचारले, तुमच्यापैकी किती जण टीव्हीवरच्या मालिका पाहतात? वर्गातल्या निम्म्या मुलांनी हात वरती केले. मी प्रत्येक जण साधारण किती मालिका पाहतो, हे विचारल्यावर एका कन्येनं ती एकसलग पाच मालिका पाहात असल्याचं तिनं सांगितलं. मी तिला उद्यापासून कोणती तरी एकच मालिका पाहण्याची अट घातली आणि मग वर्षभर ती टीव्ही पाहण्यात किती वेळ वाया घालवते, याची चौकशी करीत राहिलो.

स्मार्टफोन हातात आल्यापासून फक्त तरुण पिढीचाच नव्हे तर सर्वच वयोगटातील लोकांचा रात्रीचा कितीतरी वेळ मोबाईलवर टाईमपास करण्यात जातो, ही गोष्ट लक्षात आल्यावर मी माझ्या विद्यार्थ्यांना रात्री टाइमपास करायचा नाही, अशी अट स्वतःलाच घालण्याचा सल्ला दिला.

त्याचे कारणही मी त्यांना सविस्तर समजावून सांगितले. ते त्यांना क्षणात समजले. पटलेही. ते तुम्हालाही पटेल याची मला खात्री आहे.

मित्रांनो, रात्र वाईट... अंधार वाईट... तो वाईट गोष्टींना निमंत्रण देतो... असेच संस्कार आपल्या संस्कृतीने आपल्यावर केलेले आहेत. स्मार्टफोनच्या निमित्ताने आपण सारे हे नव्याने अनुभवतो आहोत. म्हणजे पाहा, तुम्ही रात्री दहा वाजता मोबाईलवर एखादी वेबसिरीज किंवा एखादा मोठा सिनेमा पाहिला घेतलात किंवा युट्युब किंवा तत्सम वेबसाईटवर व्हिडिओ पाहत राहिलात, तर तासांमागून तास खर्च झाले तरी तुम्हाला त्याचे भान राहत नाही, असे तुमच्या लक्षात येईल. रात्री दहाला सुरु केलेली वेबसिरीज पहाटे चार पाच वाजेपर्यंत पाहणार्‍या तरुण मुलांची संख्या, आपल्या देशातसुद्धा लाखाच्या घरात असेल. निव्वळ टाईमपास म्हणून रात्री दोन-चार तास सहज खर्च करणार्‍या नागरिकांची संख्या काही कोटीच्या घरात असेल, हे सांगण्यासाठी सर्व्हे करण्याची आवश्यकता नाही.

गंमत आहे पाहा, समजा तुम्ही दिवसा पाच तास एखादी वेबसिरीज पाहत राहिलात किंवा दिवसाचे पाच तास तुम्ही युट्युबवर किंवा तत्सम वेबसाईटवर व्हिडिओ पाहण्यात घालवलात किंवा एखादा ऑनलाईन गेम खेळण्यात घालविलात, एवढेच काय, पत्ते कुटण्यात, क्रिकेट खेळण्यात कॅरम खेळण्यात किंवा टीव्ही पाहण्यात जरी तुम्ही पाच तास खर्च केलात, तरी तुम्हाला त्याबद्दल अपराधीपणाची भावना वाटत.े रात्री मात्र खर्च केलेला वेळ आपल्याला अपराधाची भावना देत नाही. दिवस आणि रात्र यांच्यात हा एक मोठाच फरक आहे, जो आपल्या सहज लक्षात येत नाही.

माझ्या विद्यार्थ्यांना दिलेला हा सल्ला, म्हणूनच आज मी आपणास, सर्व मित्रांना, ज्येष्ठांना आणि चिमुकल्यांनासुद्धा देतो आहे- रात्री टाईमपास करू नका.

हा एक सल्ला मानलात तर तुमचे कितीतरी मानवी तास तुम्ही वाचवू शकाल. आपले वाचणारे लाखो-करोडो मानवी तास आपल्या ही समाजाची, राष्ट्राची संपत्ती आहे, हे लक्षात घेतलात, म्हणजे हा सल्ला केवढा मोलाचा आहे, हे तुमच्या सहज लक्षात येईल.





सँडविच करायला शिका (421)




काही काही माणसांची शिकवण्याची हातोटी एकदम विलक्षण असते. झेनकथा ज्यांना माहीत असतील त्यांना अनुभव देऊन शिकविण्याची हातोटी माहीत असेलच.  अलीकडे रोजच्या खाण्यातील सँडविच या पदार्थाच्या माध्यामातून शिकवण देणारा एक किस्सा कळाला. मोठा अफलातून किस्सा आहे हा. आपण आचरणात आणावा आमि आपल्या मित्रांनाही आचरणात आणायला सांगावा असा.

सँडविच हा पदार्थ आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. कोणत्याही वेळी खाता येणारा असा पदार्थ आहे. पुन्हा आरोग्यासाठी उत्तम. सहज करता येणारा. ज्यांना आपल्या स्वतःसाठी जेवण करता येत नाही त्यांनी किमान सँडविच करणे शिकून घेतले पाहिजे. सँडविच करणे अत्यंत सोपे आणि खाण्यासाठी अतिशय उत्तम असते.

स्लाईस ब्रेडचा तुकडा घेतला, त्यावर तुम्हाला हवे ते पदार्थ एकावर एक ठेवले. पुन्हा दुसरा एक स्लाईस ब्रेडचा तुकडा घेऊन त्यावर ठेवला. चटणी घाला व सॉस घातला की सँडविच तयार होते. सँडविच प्रत्येकाला करता यायला हवे. म्हणजे उपाशी राहण्याची वेळ येणार नाही. अर्थात हे सँडविच करा हे सांगण्याचा माझा हेतू नाही. मला त्या पुढे जाऊन काहीतरी वेगळेच सांगायचे आहे. अर्थात हे सारे माझ्या पदरचे नाही, पण मला भावलेले, मला विचारमंथनाला प्रवृत्त करणारे आहे. इतरांनाही हे सांगायला हवं, असं सतत वाटायला लावणारं आहे.

मी अनेकदा युट्युबवर अनेकांची मोटिव्हेेशनल भाषणे ऐकत असतो. असेच एकदा मला एक व्याख्यान ऐकायला मिळाले. त्यातील सँडविचचा उल्लेख मला खूपच आवडला. त्यात उत्तम बोलण्याचे मार्ग सुचविणार्‍या वक्त्याने त्यात छान मार्गदर्शन केले आहे. कोणाचीही उगाचच निंदा करू नका, चार चौघांत तर नक्कीच करू नका. गरज असल्यास त्या माणसाला एका बाजूला घेऊन त्याबद्दल त्याला माहिती द्या. तसे केल्याने तुमचा हेतू कितीही चांगला असला तरी तुमच्याबाबत त्या माणसाच्या मनात शत्रुत्व निर्माण होते असे याचे म्हणणे आहे.

जर तुम्हाला एखाद्याला त्याची चूक लक्षात आणून द्यायची असेल तर सँडविच करायला शिका. तुम्हाला एखाद्याची जी गोष्ट आवडत नाही किंवा जी गोष्ट चांगली नाही असे वाटते. ती त्याला सांगण्यापूर्वी चांगल्या गोष्टींच्या मध्ये घालून सांगा. म्हणजे आधी त्याच्या बोलण्यातील, त्याच्या विचारातील चांगली गोष्ट सांगा, मग त्याला चुकीची गोष्ट सांगा आणि पुन्हा एकदा त्याला त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट सांगून तुमच्या बोलण्याचा समारोप करा. या प्रकारे जर तुम्ही सँडविचमध्ये घालून एखाद्याला त्याची चूक दाखवून दिलात तर ती चूक ऐकणारालाही सुधारावी वाटते. सुधारण्याची शक्यता वाढते. शिवाय तुमच्यासोबत शत्रुत्व निर्माण होत नाही

ही गोष्ट अगदीच छोटी आहे, हेही मला माहीत आहे. पण छोटी असली तरी अतिशय महत्त्वाची आहे. जसे की सँडविच हे जेवण नव्हे, तो संपूर्ण आहार नव्हे, पण तरीही भुकेच्या वेळेला अन्य काही मिळत नसताना सँडविच हा एक अत्यंत उत्तम असा पदार्थ आहे. तसेच हा छोटा विचार अत्यंत कामाचा आहे. शक्य असल्यास तुम्ही तुमच्या आयुष्यात तो अवलंबून पाहा. अनेकदा आपण माणसांना आपण उगाच दुखावत असतो. अनेकदा चांगला सल्ला दिला असताना माणसं दुखावली जातात. या संडवीच पद्धतीमुळे तुमचे मानवी संबंध सुधारतील. मित्र वाढतील. आयुष्य अधिक आनंदी आणि अधिक सुखी होईल.









विश्‍वासावर जग चालतं...(437)




आजकाल कोणाचा कोणावर विश्वास राहिला नाही, असे आपण वरचेवर म्हणत असतो. तरी विश्वास नावाचं मूल्य कितीतरी महत्त्वाचं आहे हे आपण जाणतोच. फसवणुकीच्या कितीतरी बातम्या आपण रोजच्या रोज वाचतअसतो. अशा वेळी मी तुम्हाला विश्‍वासावर जग चालते म्हटले तर तुम्हा मला वेड्यात काढाल. पण थांबा...

दोन छोट्या गोष्टी सांगितल्या म्हणजे मी काय सांगतो तेे सहज लक्षात येईल. एकदा एक विमान हवेत असताना त्यात बिघाड होतो आणि विमान वेगाने खाली येऊ लागते. तेव्हा सगळेच प्रवासी भयभित होतात. एक छोटी कन्या फक्त निर्भय असते. एक माणूस काळजीनं तिला विचारतो, तुला भीती वाटत नाही का... ती म्हणते, बिलकुल वाटत नाही. कारण या विमानाचे पायलट माझे बाबा आहेत आणि मला विश्वास आहे की, ते हे विमान कोसळून देणार नाहीत.

दुसरी गोष्ट आहे सीमेवर लढत असलेल्या दोन सैनिकांची. बलवीर आणि दलवीर अशी त्यांची नावे. बलवीर जखमी होऊन पडला. दलवीर आपल्या सहकार्‍यांसह बलवीरपासून काहीशे फूट अंतरावर होता. बलवीर शेवटच्या घटका मोजत होता. पण त्याला वाटत होतं की, दलवीर आपल्याला भेटायला येईल.

दलवीरला सहकारी सांगत होते नको जाऊ, आता तो तसाही वाचणार नाही. पण सुसाट वेगाने येणार्‍या गोळ्या चुकवत दलवीर काही क्षणात त्या ठिकाणी पोहचला. बलवीरने त्याच्याकडे कृतार्थ नजरेनं पाहिलं आणि कायमचे डोळे मिटले. दलवीर येणार हा विश्वास सार्थ झाल्याने त्या शेवटच्या क्षणी बलबीरला जो आनंद झाला त्याला उपमा नाही. आणि आपण आपल्या मित्राच्या विश्वासाला पात्र ठरलो याचा आनंद दलवीरला आयुष्यभर ताकद देत राहिला.

मित्रांनो, विश्वासाची गोष्ट अशी आहे. आपण कितीही कुणाचा कुणावर विश्वास राहिला नाही असं म्हणत असलो तरी आपलं सगळं जीवन हे परस्परांच्या विश्वासावर अवलंबलेलं आहे.

थोडा विचार करून पाहा... तुमच्याही हे सहज लक्षात येईल.

आपण ज्या गाडीने प्रवास करतो, त्या गाडीच्या ड्रायव्हरला आपण ओळखत नसतो, पण तो ड्रायव्हर गाडी नीट चालवेल याचा आपल्याला विश्वास असतो. आपण ज्या रस्त्याने चालत असतो त्या रस्त्याने हजारो वाहने जात असतात. त्यातला एकही ड्रायव्हर आपल्या अंगावर गाडी घालून आपल्याला चिरडून ठार मारणार नाही, हा विश्वास आपल्या मनात असतो, म्हणूनच आपण रस्त्यानं निर्धास्तपणे चालू शकतो. कोणत्या तरी इलेक्ट्रिशनने लावलेल्या पंख्याखाली आपण निर्धास्तपणे हवा घेऊ शकतो, कारण त्याच्या कामावर आपण विश्वास टाकलेला असतो. कोणत्याही हॉटेलमध्ये आपण जेव्हा जेवण घेतो तेव्हा तिथल्या आचार्‍याने या अन्नात विष कालवलेलं नाही यावर आपला ठाम विश्वास असतो, नाही का... आपल्या एकूण जगण्यालाच विश्वासाचं अतिष्ठान लागतं.

जसं हे दुसर्‍यांच्या विश्वासावरचं आहे, तसंच अगदी आपल्या स्वतःवरच्या विश्वासाचं आहे. लोक मोठमोठे पराक्रम करतात ते त्यांच्यात शक्ती असते,  बुद्धी असते, म्हणूनच नव्ह,े तर असा काही पराक्रम आपण करू शकतो, असा विश्वास त्यांच्यापाशी असतो, म्हणूनच ते ती गोष्ट करू शकतात. प्रतिस्पर्ध्यावर मात करता येईल हा विश्वास असल्याशिवाय कोणताही खेळाडू मुळात मैदानावर उतरतच नाही. आपल्या जीवनाच्या मैदानावर आपण आयुष्य नावाची खेळ करीत असतो. तेव्हा आपल्याला जगता येईल, आपल्याला आनंदाने जगता येईल,  उत्तम जगता येईल, हा विश्वास आपल्यापाशी असायला हवा.

सावधानता हवीच, पण तरीही इतरांवर विश्वास ठेवायला. जग विश्वासावर चालतं.





गोष्टीची गरज (436)



गोष्ट ऐकायला सगळ्यांनाच आवडते. आपलं बालपण आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकण्यातच गेलं. या गोष्टींमधून आपल्या बालमनावर संस्कार झाले. रात्री झोपण्यापूर्वी आजीच्या कुशीत जावं... आजी गोष्ट सांग ना, म्हणून तिला आग्रह करावा आणि मग आजीने रोज नवी गोष्ट सांगावी असे ते दिवस होते. आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात आजी-आजोबा नाहीत. त्यामुळे मुलांच्या जगण्यातली गोष्ट हरवली.

आटपाट नगर होतं... किंवा एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या... किंवा कोणे एके काळी असं घडलं... असं म्हणून सुरू होणारी गोष्ट... त्यात आमची पिढी रमली आणि रमतगमत मोठी झाली. आज मात्र गोष्ट आपल्या आयुष्यातून हद्दपार झाली की काय, असं वाटावं अशी स्थिती आहे

यू-ट्युबसारख्या माध्यमातून खरेतर आता आपल्याला हव्या तेवढ्या गोष्टी ऐकायला आणि ऐकवायला मिळू शकतात. तिला ओलाव्याचा अभाव असला तरी तिथे ती उपलब्ध आहे. पण ‘गोष्ट’ ही महत्त्वाची गोष्ट आहे हेच कदाचित आपण अलीकडच्या काळात विसरून गेलो आहोत.

मुलांसाठी काम करीत असताना  ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत आली आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान एखादी गोष्ट सांगू लागलो की, मुलं आणखी सांगा म्हणतात. मला ते शक्य नसतं, पण वाईट वाटत राहतं की, ही मुलं गोष्टीची उपाशी आहेत. म्हणूनच गेली काही वर्षे ‘आम्हालाही मुलांसाठी काही करायचं आहे’, असे म्हणणार्‍या प्रत्येकाला मी सांगतो, जवळच्या शाळेत जा आणि मुलांना गोष्टी सांगा.

गोष्ट ऐकायला फक्त मुलांनाच आवडते असं नाही, मोठ्या माणसांनाही गोष्टी आवडतात. म्हणूनच तर कथा-कादंबर्‍याचा वाचकवर्ग मोठा आहे. कथाकथनाचे कार्यक्रमही होत असतात. आपल्याकडे त्याची मोठी परंपरा आहे.

काही महिन्यांपूर्वी ‘कथा-कट्टा’ एक नावाचा कार्यक्रम ऐकायला मिळाला. कथाकट्टा हा एक असा उपक्रम आहे, जो भाषा वाचवू पाहतो आहे. या लोकांना आपल्या सगळ्या प्रादेशिक भाषा जिवंत राहाव्यात, असं वाटतं. आणि भाषांचं रक्षण करण्याचा एक मार्ग म्हणून त्यांनी कथाकथनाला सुरुवात केली आहे. जागोजागी जाऊन हे लोक लोकांना गोष्टी सांगतात. त्यातलाच एक कथाकथनाचा कार्यक्रम मला ऐकायला मिळाला. त्यांच्यातली एक कथाकथनकर्ती म्हणाली, भाषा जतन करण्याचा हा एक उत्तम मार्ग म्हणून आम्ही हा उपक्रम चालवतो आहोत.

खरं तर आपणही आपल्या भाषेसाठी आणि आपल्या लोकांसाठी असे कथाकथनाचे छोटे-मोठे प्रयोग करू शकतो. आपल्याकडे कथालेखनाची मोठी परंपरा आहे. आजही अनेक सशक्त कथाकार कथा लिहीत आहेत. त्यातल्या कथा घेऊन त्यांचे अभिवाचन केलं तर लोकांना ते नक्कीच आवडेल. आपल्या महाविद्यालयांनी, विविध सांस्कृतिक संस्थांनी... एवढेच काय आपल्या सोसायट्यांनीही असा एखादा वाचकांचा गट करून कथा सांगायला सुरुवात करायला काहीच हरकत नाही. सांगणारे आले की ऐकणार येतीलच. मग त्या कथेच्या निमित्तानं आपली भाषा, आपली संस्कृती, आपलं जगणं टिकून राहील. प्रवाही होईल. संवर्धित होईल. आपल्या भाषा आणि जगणे इंग्रजी-हिंदीच्या रेट्यखाली चिरडून जाऊ नये यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्यातली ही एक अत्यंत चांगली, लोकांना हमखास आवडणारी आणि भाषा टिकवून ठेवायला अधिक सोयीस्कर ठरणारी गोष्ट आहे. म्हणून आपण सगळ्यांनी कथा सांगू या. ऐकू या. त्यामुळे आपली संस्कृतीच केवळ टिकणार नाही तर तिच्या कथा पुन्हा पुन्हा सांगितल्या जातील. तिच्यात कथा पुन्हा पुन्हा घडत राहतील. आपल्यासाठी आणि आपल्या येणार्‍या पिढीसाठी ते फारच मोलाचे असेल.

Monday, November 18, 2019

काही लेख

तुमचा मुलगा खेळतो काय? (17.11.2019)

आता चाळीशीत असलेल्या पिढीला बालपणाच्या ज्या आठवणी आठवतात, त्यातली एक आठवण सगळ्यांनाच आठवत असते. मैदानावर क्रिकेट, कबड्डी, खो-खो, लगोरी, लंगडी, हुतुतू असा कोणता तरी खेळ रंगात आला आहे आणि आपली आई आपल्याला ओरडून-ओरडून घरी बोलावते आहे. आपल्या मनात अजूनही खेळत राहण्याची इच्छा आहे आणि आई मात्र अरे पुरे झाले, तासनतास नुसते खेळत राहणार आहेस का, असे म्हणते आहे. आता मात्र घराघरात गेलात तर अरे पुरे झाले, किती तास खेळणार आहेस, हेच वाक्य आईच्या तोंडून पुन्हा-पुन्हा उच्चारले जात असल्याचे ऐकायला येईल. फरक एवढाच आहे की, आता हे वाक्य आई घरातच उच्चारते. घरातच मोबाईलवर तासन्-तास बसून खेळणार्‍या मुलाला उद्देशून. परवा एक आई मुलाला दम देऊन घराबाहेर खेळायला पाठवताना पाहिली आणि एकदम एक विलक्षण गोष्ट लक्षात आली. मैदानावरून घरात न येणारी आमची पिढी आता इतिहासजमा झाली आहे आणि स्मार्टफोनच्या नादामुळे मैदानावरच न जाणारी एक नवी पिढी जन्माला आली आहे. वयाची तिशी पार करेपर्यंत मागच्या पिढीची पोटे खपाटीला गेलेली असत आणि आज सात-आठ-नऊ वर्षांच्या मुलांच्या पोटाला घड्या पडलेल्या दिसतात. त्या या बदललेल्या जीवनशैलीमुळे होय.
व्यायामाचे महत्त्व, शारीरिक हालचालीचे महत्त्व मागच्या पिढीला समजावून सांगावे लागले नाही. नव्या पिढीतील मुलांना मात्र, ‘अरे! किमान हला की रे’, असे सांगण्याची वेळ आली आहे. विशेषतः शहरांमध्ये जी गुबगुबीत बाळे आणि मुले दिसत आहेत. आरोग्यासाठी हे हितकर नाही. लहान मुलांनी व्यायाम करण्याची अपेक्षा नाही. त्यांचे शरीर लवचिक व्हावे आणि शरीरावर मेद साचू नये यासाठी त्यांनी खेळणे अपेक्षित आहे. मैदानी खेळांमधून आपसूकच जितका व्यायाम होतो, तेवढा मुलांसाठी आवश्यक असतो. त्यामुळे मुले काटक आणि बळकट बनतात. मैदानावरील खेळ माणसाच्या शरीराला जसे ताजेपणा देतात तसेच माणसाचे मनसुद्धा ताजेतवाने करतात. मैदानी खेळामुळे मनोधैर्य वाढीस लागते,  चिकाटी निर्माण होते, खेळाडू वृत्ती निर्माण होते आणि हे गुण मग पुढील आयुष्यात उपयोगी पडतात. सांघिक खेळामुळे सहकार्याची वृत्ती, संघभावना आणि नेतृत्वगुण यांना वाव मिळतो. त्यांचा विकास होतो. पुढील आयुष्यात त्याचा मोठा उपयोग होत असतो.
फार पूर्वीपासून मानव खेळ खेळत आलेला आहे. शिकार, कुस्ती, कवड्या, सोंगट्या, फासे, धावणे, थाळीफेक, रथांच्या व घोड्यांच्या शर्यती, मुष्टियुद्ध असे नाना प्रकारचे खेळ जगाच्या पाठीवर माणूस वर्षानुवर्षे खेळत आलेला आहे. अलीकडच्या काळात एकूण जगाचे सपाटीकरण झाले आहे. त्यात आपण आपल्या कितीतरी गोष्टी हरवून बसलो आहोत. आज जगभरात स्मार्टफोनमुळे मोबाईल गेमचे प्रमाण इतके वाढले आहे की, मोबाईल गेमने जवळपास सगळ्या देशातले देशी खेळ संपवायला आणले आहेत की काय, असे वाटावे अशी स्थिती आहे.
आधुनिक शिक्षणशास्त्रात खेळाचा प्रामुख्याने समावेश केलेला आहे. खेळाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळेच खेळासाठी शालेय अभ्यासक्रमात विशेष तासिका असतात. मात्र असे असले तरी आपल्याकडे खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारसा चांगला नाही. त्यामुळे या तासांमध्ये उर्वरित अभ्यासक्रम भरून काढण्याकडे बहुतांश शाळांचा कल असतो. त्यात अलीकडेच शहरांमध्ये अनेक शाळांना मैदानेच नाहीत. त्यामुळे मैदानी खेळापासून मुले दुर्दैवाने दूर राहतात. अनेक सोसायट्यांनासुद्धा मैदाने नाहीत. त्यामुळे सोसायट्यांच्या आवारात मैदानी खेळ खेळणे शक्य होत नाही. अनेक ठिकाणी मैदाने आहेत, पण दुर्दैवाने ती गाड्या पार्क करण्यासाठी वापरली जातात. परिणामी आपल्या मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदानच उपलब्ध होत नाहीत. विविध पातळ्यांवर खेळाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. चांगल्या खेळाडूंना शिष्यवृत्त्याही देण्यात येतात. मात्र असे असतानाही एकूण समाजात मैदानी खेळाचे प्रमाण जितके असायला हवे तितके नाही.
आपल्याकडे क्रिकेटचे मोठे वेड आहे. मात्र हे वेड असलेले निम्म्याहून अधिक लोक कधीही क्रिकेट खेळत नाहीत. त्यांचे क्रिकेटवेड हे क्रिकेटचे सामने टीव्हीवर पाहणे आणि क्रिकेटविषयी बातम्या वाचणे इतक्यापुरतेच मर्यादित असते. दुसर्‍याचा खेळ पाहत राहण्यात फक्त मनोरंजन होऊ शकते. त्यातून शरीर आणि मनाला फार मोठा फायदा होत नसतो. क्रिकेट पाहणे हे मनोरंजनाचे साधन आहे. मात्र अलीकडे अनेकांच्या बाबतीत ते मनोरंजन राहण्यापेक्षा व्यसनच झालेले दिसते. क्रिकेटचे सामने सुरू झाले म्हणजे अनेक जण कामाला दांड्या मारून ते पाहात राहतात हे आपण अनेकदा पाहिलेले आहे. याचाच परिणाम मुलांवर होत असतो.
एकूणच मैदानी खेळांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कालसुसंगत नाही. आपल्याला खेळांची केवढी आवश्यकता आहे हे आपण जाणले नाही. आपला मुलगा खेळतो काय, हे आपण पाहत नाही. त्यांनी खेळावे म्हणून आपण काही प्रयत्न करतोय, असे दिसत नाही. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे माणसाच्या मनावर प्रचंड ताण असतो. आपल्या मुलांना या नव्या युगात जगायला शिकवायचे असेल तर त्यांना मानसिकदृष्ट्या कणखर केले पाहिजे. मैदानी खेळ हे मानसिकदृष्ट्या कणखर होण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. आजकाल आपल्या आहारातही फार मोठे बदल झाले आहेत. आपली नवी पिढी जंकफुडच्या आहारी गेलेली दिसते. एकदा तुम्ही मैदानी खेळ खेळायला लागलात, म्हणजे तुम्ही नकळतपणे आहाराविषयी दक्ष व्हायला लागता. आजही मैदानी खेळ खेळणार्‍या कोणत्याही खेळाडूकडे गेलात तर त्यांच्या आहारात जंकफूडचे प्रमाण फारच कमी असल्याचे तुमच्या सहज लक्षात येईल. पौष्टिक आहार शरीराला गरजेचा असतो ही बाब खेळाडूंच्या मनावर नकळतपणे बिंबवली जात असते. जंकफुडमुळे होणारे अनेक आजार खेळाडूंपासून चार हात लांब राहतात हे वेगळे सांगायला नको.
मैदानी खेळांच्या याच विविध फायद्यांमुळे आपला मुलगा खेळतो काय? असा प्रश्न विचारावासा वाटतोपण त्याचे उत्तर नाही, असे असेल तर आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे.



‘सँडवीच’पद्धतीमुळे संबंध सुधारतील (16.11.2019)

काही काही माणसांची शिकवण्याची हातोटी एकदम विलक्षण असते. झेनकथा ज्यांना माहीत असतील त्यांना झेनगुरूंची अनुभव देऊन शिकविण्याची हातोटी माहीत असेलच. एकाहून एक अफलातून झेनकथा आपल्याला अचंबित करून सोडतात. अलीकडे रोजच्या खाण्यातील सँडविच या पदार्थाच्या उदाहरणातून एक महत्त्वाची शिकवण देणारा एक किस्सा कळला. मोठा अफलातून किस्सा आहे हा. आपण आचरणात आणावा आणि आपल्या मित्रांनाही आचरणात आणायला सांगावा असा.
सँडविच हा पदार्थ आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. कोणत्याही वेळी खाता येणारा असा पदार्थ आहे. पुन्हा आरोग्यासाठी उत्तम. सहज करता येणारा. ज्यांना आपल्या स्वतःसाठी जेवण करता येत नाही, त्यांनी किमान सँडविच करणे शिकून घेतले पाहिजे. सँडविच करणे अत्यंत सोपे आणि खाण्यासाठी अतिशय उत्तम. स्लाईस ब्रेडचा तुकडा घेतला, त्यावर तुम्हाला हवे ते पदार्थ एकावर एक ठेवले. पुन्हा दुसरा एक स्लाईस ब्रेडचा तुकडा घेऊन त्यावर ठेवला. चटणी घाला व सॉस घातला की सँडविच तयार होते. सँडविच प्रत्येकाला करता यायला हवे. म्हणजे उपाशी राहण्याची वेळ येणार नाही. अर्थात हे सँडविच करा, हे सांगण्याचा इथे हेतू नाही. मला त्या पुढे जाऊन काहीतरी वेगळेच सांगायचे आहे. अर्थात हे सारे आमच्या पदरचे नाही, पण आम्हाला भावलेले,  विचारमंथनाला प्रवृत्त करणारे आहे. इतरांनाही हे सांगायला हवे, असे सतत वाटायला लावणारे आहे.
आम्ही अनेकदा युट्युबवर अनेकांची मोटिव्हेेशनल भाषणे ऐकत असतो. असेच एकदा आम्हाला एक व्याख्यान ऐकायला मिळाले. त्यातील सँडविचचा उल्लेख आम्हाला खूपच आवडला. त्यात उत्तम बोलण्याचे मार्ग सुचविणार्‍या वक्त्याने त्यात छान मार्गदर्शन केले आहे. कोणाचीही उगाचच निंदा करू नका, चार चौघांत तर नक्कीच करू नका. गरज असल्यास त्या माणसाला एका बाजूला घेऊन त्याबद्दल त्याला माहिती द्या. तसे केल्याने तुमचा हेतू कितीही चांगला असला तरी तुमच्याबाबत त्या माणसाच्या मनात शत्रुत्व निर्माण होते असे याचे म्हणणे आहे.
जर तुम्हाला एखाद्याला त्याची चूक लक्षात आणून द्यायची असेल तर सँडविच करायला शिका. तुम्हाला एखाद्याची जी गोष्ट आवडत नाही किंवा जी गोष्ट चांगली नाही, असे वाटते, ती त्याला सांगण्यापूर्वी चांगल्या गोष्टींच्या मध्ये घालून सांगा. म्हणजे आधी त्याच्या बोलण्यातील, त्याच्या विचारातील चांगली गोष्ट सांगा, मग त्याला चुकीची गोष्ट सांगा आणि पुन्हा एकदा त्याला त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट सांगून तुमच्या बोलण्याचा समारोप करा. या प्रकारे जर तुम्ही सँडविचमध्ये घालून एखाद्याला त्याची चूक दाखवून दिलीत तर ती चूक ऐकणार्‍यालाही सुधारावीशी वाटते. सुधारण्याची शक्यता वाढते. शिवाय तुमच्यासोबत शत्रुत्व निर्माण होत नाही
ही गोष्ट अगदीच छोटी आहे, हेही आम्हाला माहीत आहे. पण छोटी असली तरी अतिशय महत्त्वाची आहे. जसे की सँडविच हे जेवण नव्हे, तो संपूर्ण आहार नव्हे, पण तरीही भुकेच्या वेळेला अन्य काही मिळत नसताना सँडविच हा एक अत्यंत उत्तम असा पदार्थ आहे. तसेच हा छोटा विचार अत्यंत कामाचा आहे. शक्य असल्यास तुम्ही तुमच्या आयुष्यात तो अवलंबून पाहा.
काही वेळेला स्पष्ट बोलावे लागते. शाळेत मुलांना रागावणे, कर्मचार्‍यांशी रागाने बोलणे हे ते काम साध्य करण्यासाठी आवश्यक तरी असते. पण अनेकदा नातेवाईक, मित्र आणि शेजारी यांच्याशी बोलताना आपण उगाचच अयोग्य भाषा वापरतो. मग माणसे तुटतात. अनेकदा आपण माणसांना उगाचच दुखावत असतो, तर अनेकदा चांगला सल्ला दिला असताना माणसं दुखावली जातात. या सँडवीच पद्धतीमुळे तुमचे मानवी संबंध सुधारतील. मित्र वाढतील. आयुष्य अधिक आनंदी आणि अधिक सुखी होईल.



प्राकृत मराठीमधील पहिला ग्रंथ (15.112019)

मराठी भाषेचा उगम प्राकृत मराठीमधून झाला. त्या प्राकृत मराठीमध्ये लिहिलेला पहिला ग्रंथ म्हणजे ‘गाथासप्‍तशती’ होय. महाराष्ट्रात इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200 या चारशे वर्षांच्या काळात सातवाहन राजवट होऊन गेली. त्या राजांपैकी हाल सातवाहन राजाने ‘गाथासप्‍तशती’ हा ग्रंथ सिद्ध केला. राजा हाल सातवाहनाने आपल्या राज्यातील कवींना काव्यरचना करण्याचे आव्हान करून त्यांनी केलेल्या रचना संकलित केल्या. स्वत: काही रचना केल्या आणि त्यातून ‘गाथासप्‍तशती’ हा ग्रंथ सिद्ध झाला. ‘गाणे’ ह्या अर्थी असणार्‍या ‘गै’ ह्या धातूपासून ‘गाथा’ हा शब्द तयार झाला. गाथा हे वृत्त संस्कृतमधील ‘आर्या’ ह्या वृत्तासारखे आहे. गाथावृत्तामुळे ह्या ग्रंथाला ‘गाथासप्‍तशती’ हे नाव पडले. प्रत्येक गीताला गाथा असे म्हटले जाते. सप्‍तशती म्हणजे सातशे श्‍लोक. प्राकृत भाषेतील आद्यग्रंथ म्हणून या ग्रंथात उल्‍लेख केला जातो. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या या राज्याची राजधानी तेव्हा प्रतिष्ठान नावाने ओळखली जात होती. आजचे पैठण तेच त्यावेळचे
प्रतिष्ठान होय.
सातवाहन राजाने आपल्या राज्याचा विस्तार उत्तरेपर्यंत केला असल्याने त्याच्या गाथासप्‍तशतीचा उल्‍लेख उत्तर भारतातील अनेक ग्रंथांमध्ये सापडतो. संस्कृत कवी बाणभट्ट व राजशेखर यांनी त्यांच्या काव्यग्रंथात ‘गाथासप्‍तशती’चा उल्‍लेख केलेला आहे. या ग्रंथावर सुमारे 18 टीका आहेत. त्यामध्ये कुलनाथ, गंगाधर, पीतांबर, प्रेमराज, भुवनपाल, साधारण देव यांच्या टीका महत्त्वाच्या असून बहुतेक टीकाकारांनी गाथांचे अर्थ शृंगारिक दृष्टिनेच लावले आहेत. या ग्रंथाचे अनुकरण करून प्राकृतमध्ये वज्जालग्ग, गाथासाहस्त्री, संस्कृतमध्ये आर्यासप्‍तशती आणि हिंदीमध्ये बिहारी सतसई अशा रचना झाल्या आहेत.
पाश्‍चात्य जर्मन पंडित वेबर यांच्यापर्यंत ‘गाथासप्‍तशती’ची महती पोहोचली होती. भारतीयांना या गाथा-संकलकाची पहिली ओळख आल्ब्रेख्त फिड्रिख वेबर ह्या थोर जर्मन पंडिताने इ.स. 1881 मध्ये करून दिली. त्यानेच ह्या ‘गाथासप्‍तशती’ची (गाहा सत्तसई) पहिली संपादित प्रत तयार केली.
राजा हाल याने एक कोटी गाथांमधून सातशे गाथा निवडल्या असल्याचा उल्‍लेख ‘गाथासप्‍तशती’मध्ये केला आहे. तो या गाथांचा केवळ संग्राहक-संपादकच नाही तर तो काही गाथांचा कर्ताही आहे. ‘गाथासप्‍तशती’मध्ये दोन-दोन ओळींच्या सातशे गाथा संकलित केलेल्या आहेत.
महाराष्ट्रातील त्या काळचे समाजजीवन, कृषिजीवन, ग्रामीण जीवन आणि माणसामाणसांतील भावनांचा आविष्कार या गाथांमध्ये झालेला दिसतो. हाल सातवाहनाने या ग्रंथाचे संकलन आणि संपादन केलेले असल्याने काही अभ्यासक हाल राजाला महाराष्ट्रातील पहिला संपादक म्हणूनसुद्धा गौरवितात.
‘गाथासप्‍तशती’ या काव्यात विंध्य पर्वताच्या दक्षिणेपासून ते गोदावरीच्या उत्तरेपर्यंतचा परिसर चित्रीत झालेला आहे. मराठवाडा, विदर्भ, गोदावरीचे दोन्ही तीर या परिसरातील समाजजीवन, परंपरा, भाषा, रीतिरिवाज, ग्रामीण संस्कृती आणि मराठी मातीचा गंध या गाथांमध्ये आढळतो. त्या काळच्या समृद्ध ग्रामजीवनाचे चित्रण या गाथांमधून येते. साळी, तूर, कापूस, ताग, हळद इत्यादी पिके, आंबे, जांभूळ, काकडी ही फळे झाडे, पशुपक्षी शिवाय गोदावरी, तापी, नर्मदा, मुळा या नद्यांचे उल्‍लेखही ‘गाथासप्‍तशती’मधील अनेक ग्रंथांमध्ये आढळतात.
‘गाथासप्‍तशती’मध्ये ज्या सातशे गाथा आहेत त्या दोन ओळींच्या स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण रचना आहेत. मानवी भावना, मानवी व्यवहार आणि नैसर्गिक दृश्यांचे सुंदर आणि सौंदयपूर्ण चित्रण या गाथांमध्ये केलेले आढळते. स्त्री-पुरुष यांच्यामधील विलासपूर्ण व्यवहार, प्रणय यांचाही विलोभनीय आविष्कार ग्रंथात मोकळेपणाने केलेला आढळतो. विविध व्रते आढळतात. होळीसारख्या उत्सवांचे उल्‍लेख आढळतात.
आज उपलब्ध असलेल्या ‘गाथासप्‍तशती’चे सहा पाठभेद असल्याचे सांगतात. यातल्या काही कथांमध्ये हजार गाथा आहेत, तर त्यातील 430 गाथा या सगळ्या पाठभेदांमध्ये असल्याचे एका अभ्यासकाने म्हटले आहे. काही अभ्यासकांनी असे म्हटले आहे की, हाल सातवाहनाने सुंदर सुभाषितांचा एक कोश निर्माण केला, त्यातच पुढे सातशे गाथांचा समावेश झाला आणि त्याचे नाव ‘गाथासप्‍तशती’ असे झाले.
तत्कालीन समाजात आढळणार्‍या स्त्रियांविषयी यातल्या अनेक गाथा आहेत. अनेक गाथा या शृंगाररसप्रधान आहेत. स्त्रीची साध्वी, पतिव्रता, चंचला, कुलटा अशी विविध रूपे या गाथांमधून वर्णन केलेली आहेत.
मराठीतील एक नामवंत कवी राजा बढे यांनी ‘शेफालिका’ नावाने या ग्रंथाचा मराठीत पद्यानुवाद केला आहे. याच पुस्तकात प्रा. अरविंद मंगरूळकर यांनी गद्यानुवाद केला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.


हसायला विसरू नका! (12.11.2019)


‘हसतो तो माणूस’ अशी एक माणसाची व्याख्या आहे. माणूस आनंद झाला म्हणजे हसतो. तो विनोद वाचून हसतो. नाटक-सिनेमा पाहून हसतो. टीव्हीवर कार्यक्रम पाहून हसतो आणि एकमेकांशी बोलताना गंमत करून हसतो. कोणी ओळखीचा दिसला तरी हसतो, कोणी ओळखीचा नसेल तर ओळख काढायला म्हणून हसतो. हसण्यात आनंद आहे. सुख आहे. मन ताजेतवाने करण्याची शक्ती आहे. आजारांपासून बचाव करण्याची शक्तीही या हसण्याच्या आनंदात आहे.
माणसाने विज्ञान-तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली, पण आनंदाने जगायचे कसे, याचे उत्तर मात्र विज्ञानतंत्रज्ञानाला देता आलेले नाही. विज्ञानाने सुखसाधने तयार केली, पण सुख निर्माण कसे करायचे हे मात्र विज्ञानाला कळलेले नाही. माणसाने सुख शोधल पाहिजे. त्यासाठी आला क्षण जगून घेऊन हसले पाहिजे. वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्टमध्येे 156 देशांची क्रमवारी लावली आहे. कोणता देश किती आनंदी आहे यावर ही क्रमवारी ठरते. या क्रमवारीत यंदा भारत 7 अंक मागे गेला असून यंदा 140 व्या क्रमांकावर आहे.
अनेक गोष्टीमध्ये पहिल्या पाचदहामध्ये असणारा देश आनंदाच्या क्रमवारीत पहिल्या शंभरातसुद्धा असू नये, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. स्थळकालपरिस्थिती यास कारणीभूत  आहे हे खरेच. पण महान प्राचीन परंपरा लाभलेल्या आपल्या देशात आनंदाने कसे जगावे हेच आता आपल्या माणसांना सांगायची वेळ आली आहे, हे दुर्दैव होय. देशांचा हा आनंदाचा क्रम त्या देशातील नागरिक किती आनंद घेऊ शकतात, यावर अवलंबून असतो. अंतिमता माणसाचे जगणे किती आनंदी आहे हेच महत्त्वाचे, नाही का?
काही काही माणसे सदैव दुर्मुखलेली असतात. ती तशी का असतात कळत नाही. दुःख आणि संकटे तर प्रत्येकाच्याच जीवनात असतात. ती जीवनाची अपरिहार्यता आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे, सुख जवापाडे दुःख पर्वताएवढे. तेव्हा जीवनात सुखापेक्षा दुःख अधिक असणार हे तर आहेच. पण म्हणून सदासर्वदा चेहरा पाडून बसून
कसे चालेल?
यासंदर्भात काही वर्षांपूर्वी वाचलेली एक गोष्ट आठवते. एक भिकारी एका साधूकडे भीक मागत असतो. साधू म्हणतो, प्रथम तू मला काहीतरी दे. मग मी तुला काहीतरी देईन. त्यावर आश्चर्यचकित झालेला भिकारी म्हणतो, साधुमहाराज, माझी थट्टा करता काय? माझ्याकडे आहे काय तुम्हाला द्यायला? त्यावर तो तेजस्वी साधू उत्तर देतो, ईश्वराने तुला हसण्याचे सामर्थ्य दिले आहे आणि ते आजही तुझ्यापाशी आहे.
खरे तर भीक मागणार्‍या माणसाकडून गोड हसण्याची अपेक्षा करता येणार नाही किंवा चेहरा पाडल्याशिवाय भीक मिळणार नाही हेही खरे, पण त्या सवयीने भिकारी आपल्याला हसता येते हेच विसरून जातो. हे फक्त भिकार्‍याचेच होते असे नाही. चांगल्या चांगल्या घरातली कमावती माणसेही असे वागू लागतात. माणसाने दुसर्‍यासाठी हसले पाहिजे आणि स्वतःसाठीही हसले पाहिजे.  हसणे ही फक्त माणसाला लाभलेली देणगी आहे. तेच माणसाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. पण आपण तेच विसरून चाललो आहोत. ‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण’ असे संतांनी लिहून ठेवले आहे. हास्य हे मन प्रसन्न करण्याचे सर्वोत्तम टॉनिक आहे. अनोळखी माणसालाही तुम्ही एक स्मितहास्य करून दाखवलं तर तो त्या क्षणापुरता का होईना तुमचा होऊन राहतो. मग आपली माणसं अधिक जवळ येतील यात शंका आहे का?
हास्याचे नाना प्रकार आहेत. त्यातलं निर्मळ हास्य हेच सर्वोत्तम हास्य होय. विकट हास्य, कुत्सित  हास्य अशा काही हास्यापासून मात्र आपण स्वतःला सदैव दूर ठेवले पाहिजे. लक्षात ठेवा माणसाने हसले पाहिजे. नाहीतर माणसाचं हसू होतं. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे किंवा आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे किंवा हसते हसते जीना सिखो अशी वचने ऐकणार्‍या आपल्या समाजाला हसायचे कसे हे सांगायला लागू नये. आपल्या आध्यात्मिक परंपरा आणि त्यातला पुनर्जन्म विचार  हा माणसाच्या सुखासाठी जन्माला आलेला आहे, नाही का? म्हणून आम्हा म्हणतो, माणसा,
हसायला विसरू नको!

Thursday, August 15, 2019

लडाख बुद्धिष्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष रिनचेन नामग्याल यांची खास मुलाखत

शांतिप्रिय लडाखला वेगळे झाल्याचा आनंद
70 वर्षांचे स्वप्न साकार झाले!
लडाख बुद्धिष्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष रिनचेन नामग्याल यांची खास मुलाखत
(वैभव बळीराम चाळके)
आपल्याला माहीत असलेला लडाख म्हणजे उंचच उंच ओसाड डोंगररांगा... भारतातलं पर्यटनाचं एक अतिशय महत्त्वाचं ठिकाण म्हणजे लडाख! विशेषत: मोटर सायकलवरून ट्रेकिंग करण्याची हौस असणार्‍या लोकांचे ड्रिम डेस्टिनेशन म्हणजे लडाखच्या ओसाड पण नयनरम्य डोंगररांगा होत. अप्रतिम दृश्यांनी ओतप्रोत भरलेल्या या डोंगररांगांमध्ये दरवर्षी पर्यटक गर्दी करतात. आता जम्मू आणि काश्मीर राज्याचा विशेष राज्याचा दर्जा म्हणजे कलम 370 हटवल्यामुळे आणि जम्मू काश्मीरचे विभाजन करून जम्मू-काश्मीर हा एक केंद्रशासित प्रदेश आणि लडाख हा दुसरा केंद्रशासित प्रदेश असे विभाजन  केल्यामुळे लडाखमध्ये आनंदाची लहर निर्माण झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील लोकांपेक्षा वेगळे असलेले हे लोक कायम त्या राज्यात उपेक्षित राहिले. म्हणून त्यांनी गेली अनेक दशके, स्वातंत्र्यापासूनच लडाखला केंद्रशासित प्रदेश करावे म्हणून मागणी लावून धरली होती. काश्मीरच्या विभाजनामुळे, जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन प्रदेश केंद्रशासित जाहीर केल्यामुळे या लढ्याची मागणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे लडाखच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या आहेत. डोंगररांगात वसलेल्या या लोकांची जम्मू-काश्मीरने कायमच उपेक्षा केल्यामुळे आता केंद्राकडे जाऊन आपले जीवन अधिक लवकर, अधिक सुकर करता यईल, असे लडाखला वाटते आहे. लडाखला जम्मू काश्मीरपासून अलग करा, अशी मागणी करत 70 वर्षे लढा देणार्‍या लडाख बुद्धिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष रिनचेन नामग्याल यांच्याशी आम्ही साधलेला हा संवाद...
लडाखला जम्मू-काश्मीरपासून वेगळे करून केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्यात आले, या घटनेकडे आपण कसे पाहता?
रिनचेन नामग्याल- आम्ही अत्यंत खूश आहोत. आम्हा सगळ्यांनाच मोठा आनंद झाला आहे. आम्ही या आनंदाचा उल्लेख दुसरे स्वातंत्र्य असा करीत आहोत. 70 वर्षे म्हणजे स्वातंत्र्यापासून आमची ही मागणी होती. आमचे हे स्वप्न होते. ते आज अस्तित्वात आले आहे. त्यामुळे आमच्या प्रदेशातील सगळी जनताच आज खूप आनंदात आहे. आमच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
आपण गेली अनेक वर्षे जम्मू आणि काश्मीरपासून अलग होण्यासाठी लढा उभारला होता. जम्मू-काश्मीरपासून अलग व्हावे, असे आपल्याला का वाटत होते?
रिनचेन नामग्याल- 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासूनच आमची ही मागणी आहे. 1947 सालीच आमच्या लडाख बुद्धिस्ट असोसिएशनचे एक पथक तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांना जाऊन भेटले होते आणि तेव्हाच लडाखला केंद्रशासित प्रदेश करा, अशी मागणी केली होती. त्या वेळीच, आम्हाला केंद्रशासित प्रदेश करणे शक्य नसल्यास हिमाचलप्रदेशला जोडून द्या, अशीही मागणी केली होती. म्हणजे आम्हाला जम्मू-काश्मीरसोबत राहायचे नव्हते. आम्हाला स्वतंत्र किंवा हिमाचलप्रदेशसोबत राहणे चालणार होते. याला अनेक कारणे आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील लोक आणि लडाखमधील लोक यांच्यामध्ये खूप फरक आहे. त्यांचे राहणीमान आणि आमचे राहणीमान याच्यात कोणताही मेळ नाही. आमची भाषा त्यांच्या भाषेहून वेगळी आहे. तरीही एवढी वर्षे आम्ही त्यांच्यासोबत राहत होतो. लडाखमधील लोक हे शांतिप्रिय लोक आहेत. काश्मीरमध्ये सततची अशांतता आढळते. त्याचा प्रभाव सतत आमच्यावर पडत होता. तो त्रास आम्हाला सहन करावा लागत होता. काश्मीर प्रदेशात कोणतीही घटना घडली की, त्याचा थेट परिणाम आमच्यावर होत होता. कॉलेजची तीन वर्षे पूर्ण करण्यासाठी आम्हाला काश्मीरमधील अस्थिरतेमुळे पाच-सहा वर्षे लागत होती. कारण काश्मीरमध्ये अस्थिरता आली की, कॉलेज बंद होत आणि मग त्याचा परिणाम आमच्या विद्यार्थ्यांवर होत होता. परीक्षा पुढे ढकलल्या जात होत्या. निकाल वेळेवर लागत नव्हते. असे अनेक प्रश्न काश्मीरमधील अस्थिरतेमुळे आम्हाला अडचणीत टाकत होते. काश्मीर हा मुस्लीमबहुल भाग आहे आणि लडाखमध्ये बुद्धिस्टांची संख्या अधिक आहे. जम्मू-काश्मीर राज्याने आम्हाला सततच दुय्यम वागणूक दिली. विविध विकास कामांसाठी पैशांच्या मंजुरीपासून अन्य अनेक बाबतीत आम्ही कायम डावलले गेलो. त्यामुळे आमच्यामध्ये वेगळे होण्याची भावना उत्तरोत्तर दृढ होत गेली. जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावाद आणि देशविघातक शक्ती मोठ्या प्रमाणावर आढळतात. लडाखमध्ये मात्र तसे आढळत नाही. लडाखमधील लोक हे राष्ट्रवादी आहेत. त्यांनी अनेक लढायांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. आमच्या अनेक संस्था, विशेषत: आमच्या युवा संस्था या कारगिलसारख्या अनेक युद्धाच्या वेळी स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक म्हणून काम करीत होत्या. आपल्या जवानांसाठी अन्नपुरवठा करण्यापासून अन्य अनेक प्रकारची मदत करण्यास लडाखचे लोक कायमच आघाडीवर होते. महिला संघटनांनी हे काम नेहमीच हिरिरीने केले. त्यामुळे लडाख जम्मू-काश्मीरपासून तोडून वेगळा केंद्रशासित प्रदेश केला हे आमच्यासाठी खूप चांगले झाले आहे. आमचे एक सगळ्यात मोठे स्वप्न आता पूर्ण झाले आहे.
आपली राजकीय आकांक्षा तर पूर्ण झाली, पण लडाखमध्ये आता आणखी कोणकोणत्या समस्या आहेत
रिनचेन नामग्याल- आमची स्थानिक भाषा बोथी(बोधी म्हणूनही ओळखतात.) ती या प्रदेशात खूप मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी भाषा आहे. हिमाचलप्रदेश, सिक्कीम डोंगररांगांपासून थेट अरुणाचल प्रदेशपर्यंत आमची ही भाषा बोलली जाते. त्यामुळे आमच्या या भाषेला केंद्रांच्या चौतीस भाषांच्या बरोबरीचे स्थान मिळावे, अशी आमची इच्छा आहे.
आपल्याला जम्मू काश्मीर विधानसभेत पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नाही...
रिनचेन नामग्याल- जम्मू-काश्मीर राज्याचा 70 टक्के भूभाग लडाखमध्ये आहे. मात्र आमची लोकसंख्या केवळ तीन लाख इतकी आहे. म्हणजे एकूण राज्याचा विचार करता ती अगदीच नगण्य आहे. आम्ही जम्मू आणि काश्मीरमध्ये अल्पसंख्याक आहोत. जम्मू-काश्मीर विधानसभेत सर्व मिळून आमचे केवळ चार आमदार आहेत. केंद्रात एक खासदार आहे. लडाखमधील एकूण लोकसंख्येपैकी 56 टक्के लोक हे बुद्धिस्ट समाजाचे आहेत. या प्रदेशाकडे राज्याने सतत दुर्लक्ष केले हे मी आधी सांगितले आहेच. या सर्व कारणांमुळे आमच्याकडे लडाख वेगळा करण्याची मागणी कायमच करण्यात येत होती.
लडाख हा प्रदेश पर्यटन स्थळ म्हणून सर्वत्र परिचित आहे, पण याव्यतिरिक्त तुमच्याकडे कोणते उद्योग चालतात? लडाखची माणसे अर्थार्जनासाठी काय करतात?
रिनचेन नामग्याल- पर्यटन हाच आमचा मुख्य व्यवसाय आहे. याशिवाय आमच्याकडे लोक स्वतःपुरती शेती करतात. अनेक लोक सरकारी नोकर्‍यांमध्ये आहेत. आर्मीमध्ये भरती होणार्‍यांचे प्रमाण आमच्याकडे फारच मोठे आहेत. प्रत्येक घरात किमान एक माणूस सैन्यात असलेला आढळेल. सैन्यात ज्या घरातला माणूस नाही, असे घर लडाखमध्ये तुम्हाला क्वचितच आढळेल. त्यातूनच आमचा चरितार्थ चालतो.
सांस्कृतिकदृष्ट्यासुद्धा आपण जम्मू-काश्मीरपेक्षा वेगळे आहात त्याबद्दल काय सांगाल...
रिनचेन नामग्याल- आमच्याकडे मोठा सांस्कृतिक वारसा आहे. आमचे लोक अतिशय संवेदनशील आहेत. शांतिप्रिय आहेत. शेजारी जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता असताना आमच्याकडे मात्र कायमच शांतता असलेली आढळते. समाजामध्ये एकजिनसीपणा आढळतो. आतापर्यंत आमच्याकडे समाजात मोठे तेढ कधीच निर्माण झाले नाही. लडाखमध्ये लोकांनी काहीतरी आगळीक केली आहे असे तुम्हाला आढळणार नाही. लडाखच्या लोकांमध्ये भारताबद्दल प्रेम आहे. भारतीय आर्मीबद्दल आस्था आहे. जेव्हा जेव्हा भारतीय जवानांना गरज पडली, तेव्हा तेव्हा लडाखी लोक स्वयंस्फूर्तीने त्यांना मदत करत आले आहेत. प्रत्येक युद्धाच्यावेळी लडाखी लोक सैन्याच्या पाठीशी उभे
राहिले आहेत.
11-8-2019

Wednesday, August 7, 2019

मन मिटण्याचा दुःख..

मन मिटण्याचे दुःख...
कागदाची करामत या कार्यक्रमात ज्या विविध गोष्टी मी समाविष्ट केल्या आहेत, त्यातली एक गोष्ट म्हणजे मुलांना या जगात कोणीही ढ नसतो हे सांगणे.
आपल्या शैक्षणिक व्यवस्थेत जो माणूस अभ्यासात हुशार, तो हुशार, असे एक धारणा असलेली दिसते. एक विनोद या अनुषंगाने मला आठवतो. एका विद्यार्थ्याने एकदा आपल्या शिक्षकांना प्रश्न विचारला होता, सर, कमल अभ्यासात हुशार आहे आणि विमल ढ हे खरेच. पण परवा नदी ओलांडताना कमल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली, तेव्हा विमलने तिला पाठीवर मारून किनाऱ्यावर आणली. तरीही आपण सगळे कमलला हुशार म्हणतो. हे कधीतरी बदलेल का हो...
तुम्ही आता आपल्या वर्गातल्या मुलांकडे पाहाल तेव्हा तुमच्या असे लक्षात येईल की, वर्गात पहिल्या पाचात असलेली सगळी मुले आयुष्यात यशस्वी झालेली नसतात आणि शेवटच्या पाचात असलेली सगळी मुले आयुष्यात अयशस्वी झालेली नसतात. कारण प्रत्येकाचे हुशारीचे एक क्षेत्र असते. माणूस हुशार असेल असे एक तरी क्षेत्र असते. एक माणूस सगळ्याच विषयात हुशार नसतो. तसेच वर्गात कोणीही सर्वात ढ नसतो. असलाच तर तो विशिष्ट विषयाच्या अभ्यासात ढ असतो. किंवा आपल्या एका शैक्षणिक पद्धतीत ढ असतो. म्हणून त्याला सगळ्या जीवनातून बाद करण्याची आपली जी व्यवस्था आहे, ती फारशी चांगली नाही. हेच मुलांना सांगण्यासाठी मी जिथे कुठे कार्यक्रम करतो, तिथे मुलांना प्रश्न विचारत असतो. आपल्या वर्गात सगळ्यात हुशार कोण आहे रे... कदाचित एखादा हात वरती येतो. मग मी दुसरा प्रश्न विचारतो, आपल्या सगळ्यात ढ कोण आहे रे...
मी आजवर जितके कार्यक्रम केले, त्या कार्यक्रमात कोणीही हात वरती केलेला नाही. कारण सगळ्यात ढ असा कोणीच नसतो. किंवा आपण आहोत असं कोणालाही वाटत नसतं.
याही कार्यक्रम कोणी हात वरती करणार नाही हे मला माहीत होते. मुले एकमेकांकडे पाहत होती. एकदुसऱ्याची नावे सुचवत होती.
पण एका क्षणी माझा आत्मविश्वास गळून पडला. एक मुलगी हात वरती करून, मी आहे, म्हणाली. मला क्षणभर काय बोलावं कळेना. असा अनुभव मला माझ्या कार्यक्रमात यापूर्वी कधीच आला नव्हता. मी तिच्या जवळ गेलो. तिला विचारलं, हे तुला कोणी सांगितलं... तर ढसाढसा रडत म्हणाली, आहेच मी... सगळ्यांनाच माहीत आहे...
मला तिचा केविलवाणा चेहरा पाहवेना. तिच्याशी काय बोलावं ते कळेना... पण मी एक दीर्घ श्वास घेतला. तिला म्हटलं, ऊठ, इकडे ये, जगात सगळ्यात ढ असे कोणीच नसते.
मग मी सगळ्या मुलांकडे पाहत म्हटलं, मी तुम्हाला सहज करता येणारा एक एन्व्होलोप शिकवणार आहे. कात्रीच्या वापराशिवाय, फेविकॉल, डिंक, गम यांच्याशिवाय बनवता येणारा... एखाद्या लग्नात गेलात तर प्रेझेंट देता येणारा... एखाद्याच्या वाढदिवसाला प्रझेंट म्हणून पैसे द्यायचे असतील तर ते घालून देता येतील अशा... एखाद्याला पत्र पाठवायचं असेल तर त्यासाठी वापरता येणारा...
पुढच्या पाच मिनिटांत मी मुलांना दाखवत तो एन्व्होलोप बनविला. त्या कन्येलाही बनवायला सांगितला. त्या मुलीने मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट बारकाईने ऐकली आणि केली होती. कारण आता ती ढ उरली नव्हती. ती सगळ्यांच्या समोर होती. आताची सेलिब्रिटी होती. तिचा आत्मविश्वास वाढला होता. म्हणूनच असेल कदाचित मी बनवलेल्या एन्व्होलोपपेक्षा तिने उत्तम एन्व्होलोप बनवला होता. तो सगळ्यांना दाखवत मी म्हणालो, मित्रांनो, हिला आतापर्यंत असं वाटत होतं की ती सगळ्यात ढ मुलगी आहे, पण मला सांगा इतका सुंदर एन्व्होलोप बनवणारी मुलगी ढ कशी असेल. हे पाहा, मी जो बनवला आहे त्याहून अधिक नीट तिने बनवलाय.
मग तिला म्हटलं, गैरसमज काढून टाक. तू ढ नाहीस.
कार्यक्रम संपल्यावर मी त्या मुलीला म्हटलं, राहतेस कोठे...
ती म्हणाली, इथेच. मागच्या रोडवर. फुटपाथला.
मी पुन्हा निशब्द... काही क्षण काय बोलावं खलेना... मी माझ्या जवळ असलेले काही कागद त्या मुलीला देत शाळेचा निरोप घेतला.

जगात सर्वात ढ कोणी नसतो, ह्या मतावर मी आजही कायम आहे. पण असं लखलखीत खरं बोलणारे लोकही आहेत, हेही आता मला अनुभवाने पटलं आहे.

आता कोणत्याही क्षणी त्या प्रसंगाची आठवण येते. मनात कालवाकालव होते. मग मन मिटून मी दुसऱ्या कामाला लागतो. मन मिटण्याचा दुःख केवढं मोठं आहे, ते असं थोडी शब्दांत सांगता येतं?

Friday, July 5, 2019

स्टेशनच्या बाहेर बससाठी उभा होतो. बसस्टॉपवर पंधरा सोळा वर्षांचा तरुण उभा होता. तिथे आलेल्या एका नशेबाज चरशी इसमाने त्याची खोड काढली. त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली.
मी मुलाला म्हटले, तू शांत राहा. त्याला जाऊ दे.
तो चरशी निघून गेल्यावर याला म्हटले, त्याला तर कशानेच काही फरक पडणार नाही. तू चांगला आहेस. तुला तुझ्या करिअरची काळजी आहे. तेव्हा तूच समजदारपणा दाखवणं अपेक्षित आहे.

चिखलात दगड मारू नये, असे जाणते लोक म्हणत, त्याची आठवण आली.

Monday, June 24, 2019

बकरू


मी नववीत शिकत होतो. बाबा पोलिसातून निवृत्त होऊन गावी आला होता. गावची जत्रा जवळ आली तशी बकरू आणायची लगबग सुरू झाली. आमचे मोठे चुलते अण्णा आणि आम्ही दरवर्षी एक बकरू घ्यायचो. पण यंदा बाबा म्हणाला, मी माझं वेगळं
बकरू घेणार.
अण्णानं मग दोन पिल्लं मागवली. चार आठ दिवस खाऊपिऊ घालून जत्रेच्या आदल्या रात्री बकरू कापायचं हा पिढ्यांपिढ्यांचा रिवाज. त्या पिल्लांमागे आम्ही मुले दरवर्षी आवडीने फिरत राहायचो. जत्रा आली की, पाव्हणे रावळे घरी येत. त्यात मोठी मौज असे. जत्रेचा तो कालावधी इतका भारी असे की दरवर्षी आम्ही जत्रेची वाट
पाहत असायचो.
अण्णानं मागवलेली पिल्लं आली आणि बाबानं त्यातल्या एका पिल्लाचा ताबा घेतला. तो सकाळ-संध्याकाळ त्या पिल्लाला घेऊन शेतावर न्यायला लागला. पार अंधारून आलं तरी तो परतेना झाला. जत्रेच्या आधीची रात्र झाली. मागच्या अंगणात अण्णानं आपल बकरू कापायला घेतलं. मदतीला मधू आला होता. त्यानं अण्णाचं बकरू कापतानाच मला फर्मान सोडलं.,  रं पोरा, तुझं बी घेऊन ये’
मी बाबाला शोधत गेलो. बाबा आला. त्याने ते अण्णाचं बकरू कापताना पाहिले. अण्णा म्हणाला, जा रं! घेऊन ये मधु पुढची
बकरी हायत.
बाबा गेला. जो आमच्या पडवीत बांधलेलं बकरं घेऊन येईल असं वाटलं होतं. पण अण्णाचं बकरू तोडून साफ करून झालं तरी बाबा आलाच नाही.
अण्णाच्या सांगण्यावरून मी बाबाला हाक दिली. तो तिकडूनचं म्हणाला, नाय कापायचं माझं बकरू.. तुम्ही आवरा.
त्यांचे ते शब्द ऐकून एकच गडबड उडाली. अण्णा म्हणाला, डोकं फिरलं की काय?
आई बाहेर येऊन म्हणाली, डोकं फिरलं व्हय. उद्या पोर आणि नातेवाईक काय तुझ्या बकर्‍याच्या तोंडाकडं बघून जत्रा करतीलं व्हय!
‘अण्णा उठा. तुम्हीच घेऊन या’
आईनं अण्णाला फर्मान सोडलं.
अण्णा उठला. बकरू आणायला गेला. तसा बाबा तरातरा चालत माडीवर गेला.
आम्ही इकडे ते बकरू कापून, तोडून, साफ करून शिजायला घातलं. अवघं घर गंधानं भरून गेलं. रात्री सगळे जेवणाला बसलो तरी बाबा माडीवरून उतरला नव्हता.
आई बोलवायला गेली, बाबा नाही.
आम्ही टम्म जेवलो.
बाबा त्या रात्री जेवला की नाही माहित नाही. पण त्या दिवसापासून बाबा शाकाहारी झाला.

कायझेन नावाची जपानी जादू रोज करा एक मिनिट व्यायाम


कायझेन ही एक एक जपानी कार्यशैली आहे. मोठमोठ्या उद्योगांनी ही कार्यशैली वापरून आपले उद्योग यशस्वी केले आहेत. त्याचप्रमाणे एकेका माणसानेसुद्धा कायझेनचा वापर करून आपल्या आयुष्यात अमुलाग्र बदल केलेला आहे.हजारो-लाखो माणसांनी कायझेनच्या वाटेने आपल्या स्वतःमध्ये अमुलाग्र बदल करून आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळवलेल्या आहेत. ही कायझेनची वाट नेमकी काय आहे आणि या कायझेनच्या वाटेने कसे चालायचे, याचा आपण अगदी थोडक्यात परिचय करून घेऊ या.
निरंतर सुधारणा
कायझेन ही एक कार्यशैली आहे. अनेक जण कायझेन हे तत्त्वज्ञान आहे असे सांगतात. ते जपानी तत्त्वज्ञान असल्याचे अनेक जण सांगत असतात, पण एवढे मोठे शब्द वापरण्याची आवश्यकता नाही. कायझेन म्हणजे निरंतर सुधारणा करीत राहणे आणि त्यासाठी अगदीच छोटीशी सुरुवात करणे होय. एखाद्या कंपनीने कायझेनचा स्वीकार केला म्हणजे ती कंपनी कंपनीच्या सीईओपासून शेवटच्या कर्मचार्‍यापर्यंत प्रत्येकाला छोट्या छोट्या सुधारणांसाठी मानसिकदृष्ट्या तयार करते आणि सगळ्यांच्या सूचनांमधून योग्य त्या सूचनांचा स्वीकार करीत हळूहळू अधिकाधिक सुधारणा करीत जाते. टोयाटो या कंपनीचे याबाबतीत उदाहरण दिले जाते. कायझेनचा वापर करून नित्य छोट्या-छोट्या सुधारणा करीत टोयाटो कंपनीने आपली व्यवस्था आमुलाग्र बदलली आणि अफाट यश मिळवले. जगभरातील मोटिवेशनल आणि विविध कंपन्या उभ्या करणारे सल्लागार या टोयाटो कंपनीचे उदाहरण देत असतात. सामूहिक प्रयत्नांनी रोज छोटी छोटी गोष्ट करीत गेल्यास मोठी गोष्ट कधी साध्य होते ते कळतच नाही, असा याचा अर्थ आहे.
कायझेनची पाच तत्त्वे
कायझेनची पाच मुख्य तत्त्वे सांगितली जातात. त्यातले पहिले तत्त्व आहे. सांघिक काम. जेव्हा तुम्ही सगळ्यांनी मिळून सुधारणा करायचे ठरविता तेव्हाच तुम्ही खर्या अर्थाने सुधारणेकडे जात असता. आपली कंपनी, आपला संघ, आपली सोसायटी, आपले राज्य, आपले राष्ट्र सुधारण्यासाठी अशी सांघिक वृत्ती अत्यंत गरजेची असते. ती निर्माण केली पाहिजे, असे कायझेन सांगते. दुसरे तत्त्व आहे स्वयंशिस्त. स्वयंशिस्तीशिवाय कोणताही बदल शक्य नाही, असे कायझेनम्हणते. कायझेनचे तिसरे तत्त्व उन्नत मनोबल अर्थात तुमचा आत्मविश्वास हे होय. रोज थोडी गोष्ट पण निरंतर करत राहिल्याने आत्मविश्वास वाढीस लागतो आणि मग बदल हमखास होतो असे कायझेन मानते. आपल्या एकूण कार्यक्षेत्रात अशीच प्रगती झाली पाहिजे. त्यात सुधारणा झाली पाहिजे, असेही कायझेनचे तत्त्व आहे. सुधारणेसाठी नवनवीन पर्याय सुचवले जावेत, असेही कायझेन मानते. या पाच तत्त्वांच्या जोरावर कायझेन एखाद्या गोष्टीत, एखाद्या कंपनीत, एखाद्या माणसाला रोज थोडा थोडा करून अंतिमता मोठा बदल करू शकते.
कायझेनमध्ये स्वच्छता, सुव्यवस्था, साधनशुचिता, प्रमाणबद्धता आणि शिस्त या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. एखादी गोष्ट चुकीची घडते आहे, असे लक्षात येताच ती लक्षात आलेल्या माणसाने ताबडतोब थांबून सुधारायला हवी, असे कायझेन सांगते.
वन मिनीट प्रिन्सिपल
कायझेनचा वापर कसा करायचा, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. आपण विविध कामांसाठी कायझेनचा वापर करू शकतो. एक उदाहरण म्हणून आपण व्यायाम करण्याची सवय लावण्यासाठी कायझेन कसा वापरता येईल ते पाहू. दरवर्षी हिवाळा आला की, सुट्टी मिळाली की किंवा पाऊस सुरू झाला की, सकाळी फिरायला जाण्याचा, सकाळी रोज व्यायाम करण्याचा, जिममध्ये जाण्याचा संकल्प आपण करीत असतो. बहुदा हा संकल्प तडीस जात नाही. कायझेनअसे म्हणते की, आपल्या मनावर अशा कोणत्याही संकल्पाचा मोठा ताण येतो आणि अशाप्रकारे कोणताही ताण आला की मनाची स्वाभाविक प्रतिक्रिया अशी असते की, तो ताण दूर करावा. मग विविध कारणे पुढे करीत आपण ते करणे टाळतो आणि ताण दूर करतो. कायझेन नेमके हेच सांगते की, असा ताण येऊ नये, अशा पद्धतीने कामाला लागा.
कोणत्याही दिवशी व्यायाम करण्याचा संकल्प करा आणि त्या दिवशी किमान एक मिनिट व्यायाम करा. त्यानंतर ठरलेल्या विशिष्ट वेळेला घड्याळाचा आलार्म लावून घ्या. आलार्म होताच व्यायाम करायला सुरुवात करा. आता तुम्हाला दिवसातील 14 40 मिनिटांनी पैकी फक्त एक मिनिटं व्यायाम करायचा असल्याने मानसिक ताण येणार नाही. फक्त एक गोष्ट कटाक्षाने पाळली पाहिजे, आलार्म झाला की व्यायाम सुरू. त्यात खंड पडता कामा नये. सातत्याने तुम्ही असे करीत राहिलात की तुमच्या मनाला त्याची सवय होऊन जाते. तुम्हाला माहीतच असेल की कोणतीही सवय सहजासहजी सुटत नाही. त्यामुळे सतत काही दिवस निरंतर एक मिनिटाचा व्यायाम करा. असे एकवीस दिवस केल्यावर तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढीस लागेल. मग या एक मिनिटाची तीन किंवा पाच मिनिटे करा. आता तुम्हाला सवय झालेली असेल. त्यामुळे तीन किंवा पाच मिनिटे व्यायाम करणे अवघड वाटणार नाही. त्याचा मनावर ताण येणार नाही. असे करत हळूहळू हा वेळ वाढवत न्या. तीन मिनिटे किंवा पाच मिनिटे या वेळेवर काही दिवस कायम राहा. मग अपेक्षित असलेला एक तास, दीड तास वेळेपर्यंत व्यायाम वाढवत न्या. असे केल्याने त्याची सवयच लागेल आणि कोणतीही सवय एकदा लागली की ती सुटत नाही, हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेच.
सातत्य टिकविणे सोपे झाले
जपानमध्ये या कायझेनचा शोध लागल्यावर माणसाच्या आयुष्याला जबरदस्त कलाटणी देणारे एक तत्त्वच हाती आले. या कायझेनचा अर्थ आहे, शहाणपणाने केलेला बदल, येथील काई म्हणजे बदल आणि झेन म्हणजे शहाणपण. झेनकथांबद्दल आपण ऐकले असाल. त्या सगळ्या शहाणपणाच्या कथा आहेत. त्यातलेच हे झेन होय. मकाई इमाई यांनी वन मिनिट प्रिन्सिपलचा शोध लावला. मग जपान या तंत्राच्या सहाय्याने यशाचे शिखर गाठणारा देश ठरला. कोणत्याही गोष्टीत यश मिळवायचे असेल तर सातत्य महत्त्वाचे असते आणि हे सातत्य तर टिकवणे अवघड असते. वन मिनिट प्रिन्सिपलमुळे सातत्य टिकविणे सोपे झाले. एक मिनिट काम करायचे म्हटल्यावर माणूस ते सातत्याने करू लागला. त्याला त्याचा त्रास होईनासा झाला आणि हळूहळू त्याला त्याची सवय लागली. त्याचा आत्मविश्वास वाढला आणि म्हणताम्हणता मग वेळ वाढवत नेला, तरी त्याची सवय मोडली नाही. असे म्हणतात प्रत्येक दिवशी निश्चित वेळी, फक्त एक मिनिट, एखादी गोष्ट तुम्ही करीत राहिलात की तिची तुम्हाला सवय होते. वन मिनिट प्रिन्सिपल नेमके हेच सांगते. या वन मिनिट प्रिन्सिपलचा वापर करून तुम्ही रोज एका पुस्तकाचे एकच पान वाचायला सुरुवात केली, तर लवकरच पुस्तक वाचून होईल. शिवाय वाचनाची सवय लागेल. रोज एकच सूर्यनमस्कार घालायला ठरवलात तर सूर्यनमस्कार घालायची सवय लागेल. रोज एक योगासन करायचे ठरविले तर लवकरच योगासनांमध्ये तुम्ही प्रवीण व्हाल. रोज एक मिनिट ध्यानधारणा करायची ठरवलात तर लवकरच ध्यानधारणेची तुम्हाला सवय लागेल. रोज एक स्पेलिंग पाठ केला तर वर्षाला 365 स्पेलिंग पाठ होतीलच, पण तुम्हाला अधिक स्पेलिंग पाठ करावी वाटतील. त्याची तुम्हाला सवय लागेल. रोज एकच पॅरेग्राफ सुंदर हस्ताक्षरात लिहिलात, तर तुमचं हस्ताक्षर संदरह होईल. ह्या एका मिनिटाच्या सवयीचा केवढा मोठा परिणाम होऊ शकतो, याची तुम्ही कल्पना करू शकाल. झेन असं सांगतो की एकवीस दिवस जर तुम्ही सातत्य टिकू शकतात, तर तुम्ही आयुष्यभर ते टिकवू शकता. तेव्हा तुम्हाला अभिप्रेत असलेलं काम एक मिनिटासाठी करायची सुरुवात तुम्ही कधीपासून करत आहात?
कायझेनच्या वाटेने जात आपण स्वतःमध्ये, आपल्या मुलांमध्ये, आपल्या शाळा-कॉलेज, संस्था, कंपन्या, सोसायट्या, उद्योग, गाव, राज्य यांच्यात ही सहज बदल करू शकतो.

कथा... सांगू या... ऐकू या...



गोष्ट ऐकायला आपल्या सगळ्यांनाच आवडते. आपलं बालपण आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकण्यातच गेलं. या गोष्टींमधून आपल्या बालमनावर संस्कार झाले. रात्री झोपण्यापूर्वी आजीच्या कुशीत जावे... आजी गोष्ट सांगणार, म्हणून तिला आग्रह करावा आणि मग आजीने रोज नवी गोष्ट सांगावी असे ते दिवस होते. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात आजी-आजोबा नाहीत. त्यामुळे मुलांच्या जगण्यातली गोष्ट हरवली.
आटपाट नगर होतं... किंवा एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या... किंवा कोणे एके काळी असं घडलं... असं म्हणून सुरू होणारी गोष्ट... त्यात आमची पिढी रमली आणि रमतगमत मोठी झाली. आज मात्र गोष्ट आपल्या आयुष्यातून हद्दपार झाली की काय, असं वाटावं अशी स्थिती आहे
यू-ट्युबसारख्या माध्यमातून खरेतर आता आपल्याला हव्या तेव्हा आणि हव्या तेवढ्या गोष्टी ऐकायला आणि ऐकवायला मिळू शकतात. पण ‘गोष्ट’ ही महत्त्वाची गोष्ट आहे हेच कदाचित आपण अलीकडच्या काळात विसरून गेलो आहोत.
मुलांसाठी काम करीत असताना मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत आली आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान एखादी गोष्ट सांगू लागलो की, मुलं आणखी सांगा म्हणतात. मला ते शक्य नसतं, पण वाईट वाटत राहतं की, ही मुलं गोष्टीची उपाशी आहेत. म्हणूनच गेली काही वर्षे ‘आम्हालाही मुलांसाठी काही करायचं आहे’, असे म्हणणार्‍या प्रत्येकाला मी सांगतो, जवळच्या शाळेत जा आणि मुलांना गोष्टी सांगा.
गोष्ट ऐकायला फक्त मुलांनाच आवडते असे नाही, मोठ्या माणसांनाही गोष्टी आवडतात. म्हणूनच तर कथा-कादंबर्‍यांचा वाचकवर्ग मोठा आहे. कथाकथनाचे कार्यक्रमही अनेकदा होत असतात. आपल्याकडे त्याची मोठी परंपरा आहे. अलीकडच्या काळात त्याचे प्रमाण कमी झाले हे खरं, पण आपला कथाकथनाचा इतिहास मात्र चांगलाच मोठा आहे
काही महिन्यांपूर्वी साठ्ये महाविद्यालयात ‘कथा-कट्टा’ एक नावाचा कार्यक्रम ऐकायला मिळाला. कथाकट्टा हा एक असा उपक्रम आहे, जो भाषा वाचवू पाहतो आहे. या लोकांना आपल्या सगळ्या प्रादेशिक भाषा जिवंत राहाव्यात असे वाटते आणि भाषांचं रक्षण करण्याचा एक मार्ग म्हणून त्यांनी कथाकथनाला सुरुवात केली आहे. जागोजागी जाऊन हे लोक लोकांना गोष्टी सांगतात. त्यातलाच एक कथाकथनाचा कार्यक्रम मला ऐकायला मिळाला. सदाहत हसन मंटो या उर्दूतील महान कथाकाराच्या काही कथा त्यांनी या कार्यक्रमात सादर केल्या. कार्यक्रमाच्या पूर्वी मधुरा अभ्यंकर म्हणाली, ‘भाषा जतन करण्याचा हा एक मार्ग आहे म्हणून आम्ही हा उपक्रम चालवतो आहोत. जमिल हे लेखक याचे प्रमुख आहेत आणि त्यांच्याबरोबर इतर कार्यकर्ते कथाकथन करतात.’
मी ऐकला तो कार्यक्रम उर्दूतील कथांचा होता. हिंदुस्तानी बोली म्हणतात त्या बोलीतील  सदाहत हसन मंटो  यांनी लिहिलेल्या कथा त्यांनी वाचल्या. पण त्यांनी असं भाषेचं बंधन घालून घेतलेलं नाही. सगळ्यातच प्रादेशिक भाषांमधून कथाकथन व्हावं आणि त्यातून आपली भाषा जोपासली जावी यासाठीचा त्यांचा हा उपक्रम असल्याचे ते सांगतात.
खरे तर आपणही आपल्या भाषेसाठी आणि आपल्या लोकांसाठी असे कथाकथनाचे छोटे-मोठे प्रयोग करू शकतो. आपल्याकडे कथालेखनाची मोठी परंपरा आहे. आजही अनेक सशक्त कथाकार कथा लिहीत आहेत. त्यातल्या कथा घेऊन त्यांचे अभिवाचन केले तर लोकांना ते नक्कीच आवडेल. आपल्या महाविद्यालयांनी, विविध सांस्कृतिक संस्थांनी... एवढेच काय आपल्या सोसायट्यांनीही असा एखादा वाचकांचा गट करून कथा सांगायला सुरुवात करायला काहीच हरकत नाही. सांगणारे आले की ऐकणार येतीलच. मग त्या कथेच्या निमित्ताने आपली भाषा, आपली संस्कृती, आपलं जगणं टिकून राहील. प्रवाही होईल. संवर्धित होईल. आपल्या भाषा आणि जगणे इंग्रजीखाली चिरडून जाऊ नये यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्यातली ही एक अत्यंत चांगली, लोकांना हमखास आवडणारी आणि भाषा टिकवून ठेवायला अधिक सोयीस्कर ठरणारी गोष्ट आहे. म्हणून आपण सगळ्यांनी कथा सांगू या. ऐकू या. त्यामुळे आपली संस्कृतीच केवळ टिकणार नाही तर तिच्या कथा पुन्हा पुन्हा सांगितल्या जातील. तिच्यात कथा पुन्हा पुन्हा घडत राहतील. आपल्यासाठी आणि आपल्या येणार्‍या पिढीसाठी ते फारच मोलाचे असेल.

Monday, June 3, 2019

दिवेकर, दीक्षित... आता देशमुख....... वजन घटवण्याची नवी सोपी पद्धती


(वैभव बळीराम चाळके, दै. नवाकाळ, 2 जून 19)
आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी वजन घटवण्यासाठी थोड्या थोड्या वेळाने थोडे थोडे खात राहण्याचा सल्ला दिला होता. हिंदी चित्रपटसृष्टीपासून सुरू झालेला वजन घटवण्याचा हा नवा फंडा चांगलाच गाजला. त्यानंतर दिवसातून फक्त दोन वेळ जेवा असे सांगत जगन्नाथ दीक्षित यांनी नवा प्लॅन लोकांसमोर ठेवला. त्यालाही चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता डॉ. तनवीर देशमुख यांनी आणखी एक नवा प्लान आणला आहे. तो समाजात लोकप्रिय होऊ लागला आहे. राहुरी येथे प्रॅक्टिस करणारे डॉ. तनवीर देशमुख यांचा हा नवा डाइट प्लान नेमका कसा आहे, हे आम्ही त्यांच्याकडूनच विस्ताराने जाणून घेतले.

40 दिवसात तब्बल 18 किलो
इतके वजन कमी केले

डॉक्टर सांगतात, माझे स्वतःचे वजन तब्बल एकशे दोन किलो होते. ते कमी करण्यासाठी मी अनेक गोष्टी केल्या. ज्यांनी ज्यांनी जे जे सांगितले ते ते करून पाहिले. पण वजन कमी झाले नाही. फार तर एखाद किलो वजन कमी होत होते. त्यासाठीसुद्धा दोन-दोन महिने तो विशिष्ट डायट पाळावा लागत होता. मग मी स्वतः वजन का वाढते, याचा अभ्यास करायला सुरुवात केली. वजन वाढण्याची कारणे शोधली. मग 40 दिवसात तब्बल 18 किलो इतके वजन कमी केले.

कमी खाल्ले तरी शरीरात
जास्त कॅलरीज जातात

सर्वसाधारण भारतीय माणसाला चोवीस तासांसाठी साधारणपणे दोन हजार कॅलरीज लागतात.  आपण मात्र आपल्या आहारात 4000 ते 5000 कॅलरीज घेत असतो. वजन कमी करू इच्छिणारे लोक कमी खातात, पण त्यांचे खाणे अधिक कॅलरीज युक्त असते. त्यामुळेच कमी खाल्ले तरी शरीरात जास्त कॅलरीज जात असतात. आपण कमी खातो, पण काय खातो त्याकडे पाहत नाही. म्हणून मी सांगतो की, उपाशी राहण्याची गरज नाही. शरीरात कॅलरीज कमी जातील, असे पाहा. तसे केल्याने वजन सहज कमी होते. वजन कमी करायचे म्हणजे शरीरात जाणार्‍या कॅलरीज कमी करायच्या, एवढे सूत्र लक्षात ठेवा. कमी कॅलरीज असलेला आहार पोटभर घ्या. आता हे कॅलरीजचे गणित कसे ते प्रथम समजून घेतले पाहिजे. सर्व प्रकारच्या भाज्या या कमी कॅलरीज असणार्‍या असतात. म्हणजे शंभर ग्रॅम हिरवी भाजी घेतली तर त्यात 20 कॅलरीज असतात. त्याउलट ते साखर, तळलेले पदार्थ घेतले तर 100 ग्रॅम मध्ये तब्बल 900 कॅलरीज असतात. म्हणजे तुम्ही वजन कमी करण्यासाठी इतर आहार कमी केला, पण त्याच दिवशी चार गुलाबजाम खाल्लात तर उपयोग होणार नाही. कारण गुलाबजाममध्ये शंभर ग्रॅममध्ये तब्बल 900 कॅलरीज असतात. म्हणून तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर सर्वप्रथम साखरेचा त्याग करा. चहा पूर्ण सोडून द्या.
नाश्त्यामध्ये फळे खा
नाश्त्यामध्ये फळे खा. सर्व प्रकारची फळे चालतील. बीट, सफरचंद, डाळिंब, केळे अशी सर्व प्रकारची फळे चालतील. ही सगळी फळे मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यात साखर टाकू नका. वाटलेली ती फळे सर्व चौथ्यासहित खा. तुम्हाला हवे असेल तर या मिश्रणात अर्धा ग्लास दूध टाका. म्हणजे ते थोडे पातळ होऊ शकेल. पोटभर हा आहार घ्या. म्हणजे भुकेचा प्रश्न मिटेल आणि कॅलरीज कमी जातील.
दुपारच्या जेवणात भाज्या
दुपारच्या जेवणाचासुद्धा आपण नीट विचार केला पाहिजे. आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट फार मोठ्या प्रमाणात असतात. ते शरीराला फारशी ऊर्जा देत नाहीत. शिवाय ते पचनाची गती मंद करीत असतात. म्हणून आपण आपल्या आहारातून कार्बोहायड्रेट कमी केले पाहिजेत. पोळी किंवा चपाती यातून कार्बोहायड्रेट शरीरात जात असतात. म्हणून दुपारच्या आहारात चपाती बंद करा. बाजरी, ज्वारी यांची भाकरी हीसुद्धा कार्बोहाइड्रेटसंपन्न असते. म्हणून बाजरी किंवा ज्वारी यापैकी एका धान्यापासून बनवलेली अर्धी भाकरी दुपारी घ्या. अर्ध्या भाकरीने पोट कसे भरेल, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. त्याचा विचार आपण केलेला आहे. या अर्ध्या भाकरीसोबत खाण्यासाठी पुरेशी हिरवी पालेभाजी करून घ्या. त्यासोबत कोबी, पालक, काकडी, गाजर, फळे यांचे सलाड करून घ्या. तुमची अर्धी भाकरी खाऊन झाली की मग पोट भरेपर्यंत ही शिजवलेली हिरवी पालेभाजी आणि सलाद खा. उपाशी राहू नका. भरपेट खा.

संध्याकाळच्या नाश्त्याच्या
वेळेला उसाचा रस प्या

संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळेला उसाचा रस प्या. अगदी चार-पाच ग्लास प्यायलात तरी चालेल. टोमॅटो हा कमी कॅलरीज असलेला पदार्थ असल्याने नाश्त्याच्या वेळी तुम्ही तुम्हाला हव्या तेवढ्या प्रमाणात टोमॅटो खाऊ शकता. शंभर ग्रॅम टोमॅटोमध्ये केवळ सात ते आठ ग्रॅम कॅलरीज असतात.

रात्री प्रोटीनयुक्त आहार घ्या

आता रात्रीच्या आहाराचा विचार करू. तुम्ही शाकाहारी असाल तरीही तुम्हाला रात्री प्रोटीनयुक्त आहार घेतला पाहिजे. त्यासाठी सर्व प्रकारच्या डाळी घ्या. त्या कुकरला लावा. त्यामध्ये आले, लसूण आणि गायीचे तूप आणि तुम्हाला हवा तो मसाला हव्या त्या प्रमाणात टाका. त्या डाळी चांगल्या शिजवून घ्या. तेल मात्र वापरू नका. या डाळी चांगल्या शिजल्या पाहिजेत. त्यासाठी कुकरला आठ ते दहा शिट्ट्या होऊ द्या. रात्रीच्या जेवणात पोळी किंवा भाकरी घेणे पूर्ण वर्ज्य करा. दिवसभरातील या आहारातून तुमच्या शरीराच्या सर्व पोषणमूल्यांच्या गरजा पूर्ण होतील.
चार अक्रोड आणि चार बदाम
रात्री चार अक्रोड आणि चार बदाम पाण्यात भिजायला घाला. सकाळी ते खा. न भिजवलेले अक्रोड किंवा कसे बदाम खाऊन शरीराला फायदा होत नाही. ते तसेच शरीरातून बाहेर फेकले जातात.
तेलाविषयी जागरूक व्हा
तेलाविषयी थोडे जागरूक व्हा. जेवढे तेल कमी खाल तेवढे वजन घटवण्यासाठी चांगले ठरते. आज बाजारात चांगल्या कंपनीचे चांगले तेल 110 ते 120 रुपये लिटरने उपलब्ध आहे. तुम्ही घाण्यावर जर शेंगदाणे घेऊन गेला तर तीन किलो शेंगदाण्यापासून एक लिटर तेल निघते. 80 रुपये किलो असा शेंगदाण्याचा भाव धरला तर एक लिटर शेंगदाणा तेलासाठी तीन किलो शेंगदाणे म्हणजे तब्बल 225 ते 240 रुपये इतका खर्च येतो. असे असताना बाजारात शेंगतेल 110 ते 120 रुपये किलो कसे काय, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. ते तसे मिळते, कारण त्या तेलामध्ये विविध केमिकल आणि पामतेलाचा वापर केलेला असतो. म्हणून मी सांगत असतो की, असे तेल ही अत्यंत खराब गोष्ट आहे. पिशवीतले तेल नको. रिफाइंड तेल नको. तेल वापरायचे झाले तर नैसर्गिक पद्धतीने काढलेले घाण्यावरचे तेल वापरा. गाईचे तूप सगळ्यात चांगले. तेही प्रति माणशी चार चमचे यापेक्षा जास्त नको.

सकाळी उठल्यावर

सकाळी उठल्यावर एक चमचा जिरेपूड, आल्याच्या चार कापा, दालचिनीची पूड चिमूटभर, सात पाकळ्या लसूण (तीही दगडावर ठेचलेली), दीड ग्लास पाण्यात टाकून घ्या. हे पाणी चांगले उकळवून घ्या. साधारण निम्मे होईपर्यंत ते उकळा. आटलेले पाणी बशीत घ्या. त्यात मध व लिंबू पिळा. त्याचे सेवन करा. हा चहाचा एक पर्यायच आहे. वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या पेयांमुळे मेटाबोलिक हालचालींना वेग येतो. शरीरातील चरबी जळून जाण्यास मदत होते.
कोमट पाण्यामध्ये केलेले लिंबूपाणी तुम्हाला हवे तेव्हा पिऊ शकाल. भात मात्र पूर्ण टाळला पाहिजे. गव्हाच्या पिठाची पोळी टाळली पाहिजे. कधी खावी असे वाटलेच तर दुपारी एक पोळी घ्यावी.

आठवड्यातून एकावेळी सुट्टी

आठवड्यातून एकावेळी सुट्टी घ्या. त्यावेळी तुम्हाला हव्या त्या हॉटेलात जाऊन तुम्हाला हवे ते पदार्थ खा. महिन्यामध्ये असे चार दिवस तुम्ही सुट्टी घेऊ शकाल.  त्याप्रमाणे याच दिवसातील एका वेळी तुम्ही तुमच्या आवडत्या हॉटेलात तुमचा आवडता पदार्थ हवा तेवढा खाऊ शकाल, मात्र आठवड्यातले उरलेले साडेसहा दिवस आपला डायट प्लान व्यवस्थित पाळला पाहिजे. या डायट प्लानचे शंभर टक्के पालन केल्यास 100% रिझल्ट मिळेल. आपले वजन कमी होईल. महिन्याकाठी 14 ते 16 किलो वजन कमी करणे या डायटमुळे शक्य आहे.

मी चालत नाही
व्यायाम करीत नाही

मी 40 दिवसात 18 किलो वजन कमी केले. मी चालत नाही. व्यायाम करीत नाही. सकाळी दहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत ओपीडीमध्ये असतो. अनुलोम-विलोम सारखा व्यायाम प्रकारसुद्धा मी करत नाही. तरीही सध्या माझे वजन कमी करून स्थिरावले आहे. याआधी वजन कमी करण्यासाठी मी खूप धावलो आहे. चाललो आहे. व्यायाम केला आहे. पण चुकीच्या आहारामुळे माझे वजन हे सारे करूनसुद्धा घडले नव्हते. गाईचे दूध हळद टाकून पाहिजे तेव्हा, पाहिजे तेवढे घेऊ शकता. मी स्वतः आठवड्यातून एक दिवस जे हवे ते खातो. कधी लग्नवगैरे कार्यक्रमात गेलो तर तेवढा वेळ अपवाद करतो.

21 हजारांची औषधे फुकट गेली

असे केल्याने वजन नक्कीच कमी होईल. औषधांची गरज पडणार नाही. मी अनेक प्रकारे प्रयत्न केले. खर्च केला. व्यायाम केला. फायदा झाला नाही. मात्र या फ्लॅनने माझे वजन घटले. मी एका कंपनीची तब्बल 21 हजारांची औषधे खाल्ली होती. फारसा फरक पडला नव्हता. मी खूप खर्च केला. तुम्ही तसा खर्च करु नका. तुम्ही खर्चाशिवाय आपले वजन कमी करू शकाल. अर्थात त्यासाठी मनाचा ठाम निर्धार करायला हवा. तुम्हाला जर या प्लॅनवर विश्वास असेल तरच हा प्लॅन सुरु करा. एक महिन्यात फरक पाहा. एक महिन्यानंतर मला येऊन आपल्याला किती यश मिळाले याची कल्पना द्या.
डॉ. तनवीर देशमुख यांनी सांगितलेला हा नवा प्लॅन अमलात आणून आपल्याला औषधाशिवाय जर आपले वजन आटोक्यात आणता आले तर ते एक वरदानच ठरावे. डॉ. देशमुख यांनी कोणतेही अघोरी उपाय सांगितलेले नाहीत. कदाचित पुढच्या काही महिन्यात हा डायट प्लॅन आणखी लोकप्रिय होऊन जाईल.
संपर्क- 8605 606 664

Wednesday, May 15, 2019

स्वर्गसुख


कथा स्वर्गसुख

त्यावेळी मी त्या तिघींच्या चेहऱ्यावरून स्वर्गसुख ओसंडून पाहताना पाहिलं....
 काही काही गोष्टी अशा असतात, ज्या कुठे घडल्या, किती वाजता घडल्या आणि नेमक्या कोणत्या माणसाबरोबर घडल्या हे महत्त्वाचं नसतंच मुळी. तसंच याही गोष्टीचं आहे असं मला वाटतं.
जुलै की ऑगस्टचा महिना होता. तुम्ही जुलैच म्हणा हवे तर. २६ जुलै असं म्हटलात तरी चालेल सोयीसाठी स्थळ शहरच होतं. आपण मुंबई समजू तुमच्या सोयीसाठी.
मी ऑफिसला सुट्टी घेतली होती. एका नातेवाईकाला भेटायला गेलो होतो. पाऊस वाढायला लागला, म्हणून ­आम्ही घाईगडबडीत निघालो. येताना आधी शेजारी फोन करून मुले पोहचली का चौकशी केली. दोन्ही मुलं कॉलेजातून वेळेवर घरी परतली होती. मोबाईल नव्यानेच घेतला होता मी. त्यावर माझी बायको रंजना मुलांशी चांगली पंधरा मिनिटे बोलली. मुलाला बाहेर जाऊ नकोस, टीव्ही लावू नको, गॅस लावू नकोस, जेवण मी आल्यावर करते वगैरे वगैरे.
बाहेर सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं. छत्र्या उघडलेल्या होत्या, पण अंगावर बोटभर जागाही सुखी नव्हती. अवघे ओलेचिंब झालो होतो. पाण्यातून पाय उचलत नव्हते, तरी मी रंजनाला, पटपट चल, शक्य तेवढ्या लवकर पाय उचल, म्हणून सांगत होतो. शेवटी ती वैतागली म्हणाली, काटनचा परकर घातलाय, तो चिकटून बसलाय आत. खाली पाण्यामुळे आणि वर परकरमुळे पायाला बेड्या पडल्यासारखे झालंय. मी म्हटलं, जरा हळू बोल, आजूबाजूला लोक चालताहेत याचं भान ठेव. ती म्हणाली, कोण ऐकतंय, ज्याला त्याला कधी घर गाठतो झालंय. त्यात या पावसाचा आवाज... आणि कुठं अश्लील बोलले मी?
बरं! बाई! मी चुकलो, मी चुचकारत म्हणालो, मला माफ कर... पण पाय उचल. जाईपर्यंत किती वाजताहेत कुणास ठाऊक !
साधारण सात मिनिटांच्या अंतरासाठी वीस-पंचवीस मिनिटे खर्च केल्यावर आम्ही स्टेशनात पोहचलो. माझा पास होता. तिचं रीर्टन तिकीट काढलं होतं. स्टेशनात शिरण्यापूर्वी मी तिचं तिकीट आहे ना खिशात, याची खात्री केली. गर्दीतून वाट काढत स्टेशनात पोहचलो.
स्टेशनातली गर्दी पाहून भर पावसात, पाण्यानं निथळत असताना घाम फुटायची वेळ आली. इंडिकेटर बंद होते. माणसांनी  प्लॅटफार्म पूर्ण भरलेला. तसेच निथळत हात चोळत  उभे राहिलो. बायकोने पदर अंगाभोवती गुंडाळून घेतला. अर्धा तास उलटला तेव्हा एक गाडी मुंगीच्या गतीने स्टेशनात आली. पण गाडीत चढणे दूर, गाडीच्या आसपासही आम्हाला फिरकता आले नाही. गाडी आली तशीच हळूवार निघून गेली. शेकडो माणसं अगतिकतेने तिच्याकडे पाहत होती. त्यात आम्ही दोघे. बायकोला घेऊन आता या वेळी, अशा भरलेला गाडीतून शिरणे, केवळ अशक्य हे कळून आल्यामुळे मी विचारात.
म्हणता म्हणता तास दीड तास झाला. पाऊस अखंड पडत होता. एक दोन गाड्या येऊन गेल्या. त्या गाड्यांमध्ये चढण्याचा विचार सोडा, त्या गाड्यांमध्ये चढण्याचा विचार करण्याचंही धाडस झालं नाही माझं. दुकानदारांनी दुकानं बंद केली. ट्रॅकवर पाणी चढलं. काही लोक बस मार्गाने जायला स्टेशन बाहेर पडले. ज्यांना बसने जाणं शक्य नव्हते, ते केविलवाण्या चेहेऱ्याने पाऊस थांबण्याची आणि रेल्वे सुरू होण्याची वाट पाहत थांबले.
आमच्या हिने पुन्हा शेजारी फोन केला. मुलीला कुकर लावायला सांगितला. मुलाला पुन्हा एकदा बाहेर न जाण्याची ताकीद दिली. तेवढ्यात एक बाई रंजना जवळ येऊन तिला म्हणाली, एक फोन करू का? इथं कुठं पीसीओही नाही.
तिने तिला फोन दिला. माझ्याकडे फोन करत तिने फोन लावून देण्याची विनंती केली. मी तिच्या घरचा फोन लावला. रिंग वाजल्यावर तिला दिला. ती बाई, मी सुखरूप आहे वैगेरे बोलली. काळजी करू नका, खूप माणसे आहेत म्हणाली.
आता अंधार पडू लागला होता. पाऊस आणि अंधार उतरोत्तर वाढतच गेला. पाणी ट्रॅकवरून प्लॅटफार्मवर चढलं. हळूहळू पाणी आणखी वाढलं तसे लोक जिन्याकडे सरकले. एकेक पायरी वर चढू लागले. शेकडो माणसं असह्य ताणाने ताणलेली. काही जण त्या ताणातही हसायचा प्रयत्न करत होते. मघाशी फोन मागणारी बाई आता रंजनाबरोबर गप्पा मारू लागली.
हळूहळू पाऊस वाढत गेला. प्लॅटफार्मवरचे लोक विरळ झाले. पाण्याचा जोर वाढला तसे सगळेच हळूहळू प्रथम जिना... मग ब्रिजवर चढले. पाणी म्हणता एकेक पायरी पादक्रांत करत होते.
मी रंजनाला घेऊन सरळ ब्रिजवर गेलो. एका बाजूस जाऊन उभे राहिलो. मघाशी तिच्याशी बोलणारी बाईही सोबत होतीच. ट्रॅक पाण्याखाली गेले होते. प्लॅटफार्मही पाण्याखाली होता. पाण्याचे हजार हत्ती मनसोक्त झुलत होते. खांबाना... भिंतीना धडका देत होते. लोकांमध्ये आता टेन्शन वाढलं होतं. मुलं, पालक, नातेवाईक घरी काळजी करत होते आणि इथे शेकडो लोक अडकून पडलेले. काय करावं तेच कळेना.
अनेक पुरुष पायऱ्यांवर बसले. दोन-चार तास उभे राहून आम्ही हैराण झालो होतो. शेवटी ब्रिजवर जरा बरी जागा पाहून बसलो. म्हणता म्हणता ब्रिजवर उभ्या माणसांनी बैठक मारली. रात्र बरीच झाली होती. पाऊस सुरूच होता. आता किती वेळाने सुटका होईल सांगता येत नव्हते.
दोन्ही बाजूने अथांग पाण्यात उतरणाऱ्या ब्रिजवर साधारण शे-दीडशे माणसं एकाकी अडकून पडलेली. अर्थातच त्यांची कुणाला फिकीर नव्हती. कारण सगळं शहर पाण्याखाली होतं आणि जागोजागी माणसं अडकली होती.
रात्रीचे दीड दोन वाजले असतील... रंजना आणि त्या बाईकडे दुसरी एक बाई आली. ती त्या रंजनाच्या मैत्रिणीच्या कानात काहीतरी बोलली. मग ती मैत्रीण रंजनाच्या कानात बोलली. मघाशी तिच्या एकटीच्या चेहऱ्यावर ताण होता. आता तो रंजना आणि तिच्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावर उतरला. रंजना म्हणाली, बसा ना इथे... सोबत कुणी आहे का? 
नाही... त्या बायकांबरोबर बसले होते तिथे... त्यांना सांगितलं तर कुणी काही लक्षच देईना, गप्प बस म्हणतात...
थांब काही तरी उपाय निघेल, रंजना तिला म्हणाली, मग माझ्याकडे सरकत म्हणाली, तिला बाथरूमला लागलेय जोरात. हैराण झाली आहे. काय करता येईल?
मी म्हटलं, पाहतो,
मी उठलो. ब्रिजचं अवलोकन केलं. काहीच मार्ग सापडेना
एवढ्या ब्रिजवर शे-दीडशे माणसं बसली होती. त्यात सगळ्या पायऱ्यांवर तरुण मुलं बसली होती. काही बाया आणि मुलीही होत्या. पण जिथे बाई-माणसाला मोकळ्याने सुटका करून घेता येईल, अशी जागाच दिसेना कुठे.
मी निराश होऊन परत फिरलो. त्या बाईचा केविलवाणा चेहरा पाहून कुठेच संधी नाही हे शब्द माझ्या तोंडातून फुटेनात. मी रंजनाला म्हणालो, अवघड आहे. दोन शब्द बोलताना माझा कंठ दाटला उगाचच. रंजनाला माझ्या भरून आलेल्या आवाजाचं कारण कळलं असावं, पण चेहरा केविलवाणा करून ती म्हणाली, मलाही...
मला काय करावं तेच कळेना.
रंजनाची ती पहिली मैत्रीण आणि दुसरी मैत्रीण दोघी आपापसात काहीतरी बोलत होत्या. जीवघेण्या आजारानं आजारी असलेल्या मुलांच्या आया बोलतात तशा... अगतिक.
हिला पण.. दुसरी मैत्रिण रंजनाला म्हणाली.
माझंही तेच आहे... पण करणार काय?
दुसरी मैत्रीण मघाशी अवघडत आही होती, पण आता तिच्या चेहऱ्यावर लाज कमी भीती जास्त दाटून आली होती. ती थेट माझ्याकडे पाहत म्हणाली, भाऊ, काय करूया...
तिच्या थेट प्रश्नानं मी बावरलो. मी उत्तर तरी काय देणार होतो! तिचा चेहरा असा केविलवाणा होता की या क्षणी तिच्यासाठी देहाची कातडी करून आडोसा करता आला असता तरी केला असता मी.
जरा... जरा थांबा... काहीतरी मार्ग निघेल, मी म्हणालो.
ती मांडी घालून बसली होती ती उकडवी बसली. रंजनाने तिचा हात धरला. शेजारच्या एका काकांनी रंजनाकडे पाहत विचारलं, तब्येत ठीक नाही का?
रंजना म्हणाली, नाही... गार वाटायला लागलंय तिला!
मग ते काका झुलणारे हत्ती बघण्यात गर्क झाले.
गार तर आम्हा सगळ्यांनाच वाटत होतं. पाण्यातच तर बसलो होतो आम्ही. मी आणखी एक प्रयत्न म्हणून ब्रिजच्या इकडच्या टोकापासून तिकडच्या टोकापर्यंत चक्कर टाकायला उठलो. आशेचा अंधुक दीप जळत होता. ईश्वराकडे प्रार्थना करून मी उठलो. पलीकडे टोकाला आलो तर पाण्यावर दिसणाऱ्या शेवटच्या पायरीवर उभे दोन तरुण लघवी करताना दिसले. मीही त्यांच्याशेजारी उभा राहून मोकळा झालो. लघवी करताना मला मोकळा झाल्याचा आनंद आणि त्या बाया अवघडून पडल्यात याची लाज एकाच वेळी वाटत राहिली.
पॅंटची बटणं लावताना माघारी फिरून तीन पायऱ्या चढलो तर त्या तिथे बसलेले एक आजोबा म्हणाले,  सोडा की कपड्यांतच. जरा गरम तरी वाटेल. कळतंय कुणाला...
मला एकदम उपाय सापडला. झपाझप पावले टाकत मी आलो. माझ्या बॉडी लॅंग्वेजवरून काहीतरी उपाय सापडल्याचं तिघींनीही ओळखलं. त्यात जास्त अवघडलेली दुसरी मैत्रीण उत्सुकतेने- आशेने पाहत राहिली.
मी आलो. रंजनाच्या बाजूला बसलो. म्हटलं, सोडा बसलाय तिथेच. काही कळत नाही कुणाला.
रंजनाने त्या दोघीकडे पाहिलं.
काय? त्यांचा चेहरा बोलला. त्या दोघींनाच आवाज जाईल एवढ्या आवाजात रंजना म्हणाली, द्या सोडून जागेवर म्हणताहेत.
दोघींचे चेहरे वेगळेच दिसले. कळतंय. पण वळत नाही सारखे.
मी त्यांना म्हटलं, आता दुसरा पर्याय नाही. मी तिकडे पाहतो. तुम्ही कार्यक्रम आटपा.
दोघींनी खोल श्वास घेतला. चेहऱ्यावर डावा हात दाबला. रंजना म्हणाली, आधी मी सोडते, मग तुम्ही सोडा हवं तर.
तिने माझा दंड पकडला आणि डोळे मिटले. त्या दोघी आणि मी तिच्या बंद डोळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो. हळूहळू तिच्या चेहऱ्यावरचा ताण उतरला. कळीचं फूल व्हावं तशी ती फुलून ताजीतवानी झाली. एकदम मोकळी. मग माझ्याकडे पाहत हसली आणि म्हणाली, तिकडे पाहा. मी मान फिरवली. पाण्याचे क्रूर हत्ती झुलत धडकत होते.
माझ्या दंडावर चापटी मारत रंजना म्हणाली, झालं...
मी वळून पाहिलं, तर तिघीही एकदम मोकळ्या झालेल्या. त्या दोघी नजरेनच थॅक्स म्हणाल्या मला. मलाही एकदम सुटल्यासारख वाटलं.
त्यावेळी... मी त्या तिघींच्या चेहऱ्यावरून स्वर्गसुख ओसंडून वाहताना पाहिलं.
-         वैभव बळीराम चाळके,
संपर्क- ९७०२७२३६५२