Monday, April 29, 2019

कथा- अश्लील बोलणारे सदाना


एक अत्यंत चावट गोष्ट सांगून झाल्यावर माझा मित्र किशोर मला म्हणाला होता, मनोहर ही गोष्ट मला माझ्या सीनियर सांगितली. असल्या पुष्कळ गोष्टी तो सांगत असे. त्यामुळे लोक तो भेटला की त्याला चावट गोष्टी सांग म्हणतात आणि त्याच्या माघारी त्याला पांचट म्हणतात. तेव्हा एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेव अश्लील गोष्ट कुणाला सांगू नकोस. पर्सनॅलिटीचा सर्वात मोठा डॅमेज... व्यक्तिमत्त्वावरचा सर्वात वाईट कलंक म्हणजे अश्लील गोष्ट सांगायची सवय, हे मनावर कोरून ठेव. मलाही सीनियरची सवय लागली आहे. या सवयीमुळे लोक माझा अनादर करतात.
अश्लील गोष्ट सांगण्याच्या सवयीचा बळी असलेला किशोर असा सल्ला देत होता. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार होतं. पण किशोरने आपली सवय मोडून टाकली होती. आता तो फक्त आम्हा मोजक्या मित्रांनाच असल्या गोष्टी सांगत असे. म्हणूनच मी त्याचा सल्ला शिरोधार्य मानला. कधी कधी एखादी अस्सल चीज हाती लागते. एखादा विनोद, एखादी कविता, एखादी गोष्ट अश्लील वाटली की मी तिथेच संपवतो. हे कुणाला तरी सांगावं असं वाटतं, पण मी तो मोह आवरतो. कधी कधी वाटतं हे सारं लिहून काढावं, पण मग विचार येतो, त्यामुळे तर पर्सनॅलिटीला परमनंट डॅमेज होईल. याच कारणाने मी मला माहीत असलेल्या अश्लिल गोष्टी कोणालाच सांगितलेल्या नाहीत. सांगत नाही. काही काही फारच सुंदर आहेत. त्या आठवतात, पण हा आनंद मी वाटत नाही. कारण एकच.. किशोरचा सल्ला. आज मात्र मी मित्राचा सल्ला धुडकावून ही गोष्ट सांगणार आहे. राहवत नाही म्हणून असं म्हणालात तरी चालेल. तर गोष्ट अशी आहे...
या प्रचंड महानगरीच्या प्रचंड कोलाहलात आमची विसोबा धारकऱ्यांची चाळ गुण्यागोविंदाने वर्षानुवर्ष जगत आली आहे. अख्ख्या चाळीत 24 कुटुंबे आहेत. खालील बारा आणि वरती शौचालय आणि कपडे धुवायला वापरतात ते मोठें न्हाणीघर. चाळीत जे जे आणि जे जेवकाय हवं ते आहे. एकमेकांच्या नागदुऱ्या काढल्या जातात, कागाळ्या केल्या जातात, पण तरीही कोणी आजारी पडलं, जन्माला आलं की सर्व चाळकरी घरातल्यासारखे सुख दुःख वाटून घेतात. बटाट्याच्या चाळीसारखे नमुने आमच्या चाळीत नाहीत, पण तरीही सगळे सारखे आहेत असं नाही. असाच एक नमुना म्हणजे आमचे सदाना. त्यांची ही अश्लील गोष्ट. एकटा सडाफटिंग माणूस... सदाना सदासर्वदा खोली बाहेर उभे असत. कमरेखाली चटेरीपटेरी चड्डी आणि वर बनियन... त्यांची नोकरी म्हणे अर्ध्यावर सुटली. तेव्हापासून त्यांनी दुसरी नोकरी केलेली नाही. मिळालेल्या पैशात त्यांचा घरखर्च भागतो. तो फारसा नाहीच. व्यसन कसलंच नाही. लोक तंबाखू खातात, तसे सदाना बडीसोप खातात. कधीकधी चाळीतल्या कोणा ना कोणाच्या घरची भाजी सदानाच्या घरात पोहोचत असे. कुणाकडे काही काम असलं म्हणजे सदानाना आवाज दिला जाई. सदाना कोणाला नाही म्हणत नसेत. मयतापासून बारशापर्यंत कोणतंही काम सदाना एकाच उत्साहाने करत असत.  सदाना पांचट होते. ते उभ्या उभ्या येणार्‍य जाणार्‍या माणसाला काही ना काही बोलत. लहान मुलांना पोपट म्हणून तर तरुणांना राघू म्हणून हाक मारत. बायांना काय बाय... बाय बाय.... म्हाताऱ्या पुरुषांना जमतं ना अजून... असं निलाजरे होऊन विचारत. वय साठीच्या पार असल्याने कुणी त्यांना काही बोलत नसे. एखादी बाई गॅलरीत कपडे सुकायला घालू लागली की ते तिच्याकडे बघूनबघून बोलत राहात. चाळीसमोरून जाणाऱ्या बाया... मुली... सदानाना अंगप्रत्यंगात जवळजवळ पाठ झाल्या होत्या. चाळीतल्या एखाद्या मुलाचं लग्न झालं किंवा एखादी मुलगी लग्नानंतर माहेरी आली की सदाना हमखास विचारत, कसं वाटतंय आता... सगळे छान चाललंय ना... हे प्रश्न विचारताना त्यांच्यासमोर त्या नवदांपत्य त्याचे शरीरसंबंध चालू आहेत, असे चित्र तरळून जाई. त्यांच्या चेहऱ्यावर तसे भाव उमटत. समोरचा माणूस लाजून रागावून वैतागून सरपटत निघून जाई. कारण बोलायचं तर बोलायचं काय... यांच्या बोलण्यात एकही शब्द आक्षेपहार्य नाही. रोजच्या वापरातल्या एकएका शब्दाला सदाना म्हणताम्हणता अश्लील अर्थ चिकटवून टाकीत. कोणी आक्षेप घेईल असे वाटले की वाच्यार्थाबद्दल निशंक असल्याचा आत्मविश्वास चेहऱ्यावर मिरवीत साळसूदपणे पुढे बोलू लागत.
सदानाचा हा छळ गेली अनेक वर्षे चाळकरी भोगत आहेत. पण एवढ्या वर्षांत सदानाला कोणी उलट बोलल्याचं उदाहरण नाही. सदानाचं बोलणं कोणी मनावर घेत नसेल म्हणालात तरी चालेल. पण चाळीत चर्चा चाले. बायकाही कधीकधी त्यांच्या गोष्टी सांगून फिदीफिदी हसत. या गोष्टी ऐकत मोठ्या होणाऱ्या मुली वयात येताच सदानापासून फटकून राहत.
मी सातवीत असताना सदानाच्या घरी गेलो होतो. सदाना चटेरीपटेरी पॅंट घालून पत्र्याच्या खुर्चीत बसले होते. त्यांच्या हातात रंगीत पुस्तक होतं. मी जाताच त्यांनी ते खाटेवरच्या गादीखाली सरकवलं. मी विचारलं, सदाना कसलं पुस्तक, तर ते म्हणाले होते, मनोहरा, तुला सू करता येते का नीट... जमलं की सांग... मग देईन तुला... मला त्यांचा राग आला. त्या रागाने मी त्यांच्याकडे जाणं टाळलं. पुढे दहावी झाल्यावर मी बाहेरगावी होस्टेलवर राहून शिकू लागलो. घरी आलो म्हणजे सदानांचे किस्से कळत. पण मी त्यांच्या वाऱ्याला थांबत नसे.
बारावी होऊन इथे आल्यावर मात्र मला त्यांचे एकाहून एक किस्से कळू लागले आणि हा माणूस चाळ सोडून जाईल तर बरे, असे वाटू लागले. अर्थात चाळीत कोणी माझ्या मताशी सहमत नव्हते. कारण सदांनांनी कधीही आक्षेपार्ह वर्तन केलं नव्हतं. ते सर्वांच्या कामाला येत असत. गेल्या वीस वर्षांत लाईट बिल भरण्याचे काम दरमहा सदाना विनामोबदला करत आले होते. कोणाला कधी पैसे लागले तर सदा नाही म्हणत नसेत. पाहुणारावळा आल्यावर आणि सणसमारंभ असल्यावर सदाना आपले घर वापरायला देत असत.
दोन महिन्यांपूर्वी शहाणेउठणे कुटुंब चाळीत राहायला आले. सदाना सवयीने त्यांचं सामान उचलायला गेले होते. सामान घरात येऊन पडल्यावर मिस्टर शहाणेउठणे सर्वांना थांबायला सांगून बाहेर गेले. थंडा घेऊन आले. सदानांना थंडा देत त्यांनी मिसेस शहाणेउठणे यांची ओळख करून दिली. त्यावर सदाना म्हणाले. नवरा-बायको कळतात हो पटकन. त्याला काय वेळ लागतो. आता ही मुलगी तुम्हा दोघांची, हे काय सांगायला हवं. इथे दोघांची या शब्दाचा अश्लील उच्चार मिसेस शहाणेउठणेंना बरोबर कळला.
मग हळूहळू सदानांच्या या सर्व कथा कळल्या. शहाणेउठणे दिसायला सुंदर नव्हत्या, पण त्यांची शरीरठेवण आव्हान आणि आवाहन करणारी होती. भल्याभल्यांना मानेवर नियंत्रण ठेवता येत नसे. अर्थातच सदाना त्यांना न पाहतील तर नवल... पुन्हा गोची... आक्षेप घ्यायचा तर घ्यायचा काय... सदाना एकही आक्षेपार्ह शब्द उच्चारत नसत... आणि शहाणेउठणे यांच्या खोलीत डोकावतही नसत. दिसल्या म्हणजे पाहात. त्या वैतागल्या होत्या. सदानांना कधी एकदा काहीतरी सुनावते असे त्यांना झाले होते. त्या जणू संधीची वाट पाहत होत्या...
आणि एक दिवस ती संधी मिळाली. चाळीतल्या केकण्यांचा मुलगा हनिमून वरून परत आला. त्याच्या स्वागताला घरात होते तेवढे लोक गॅलरीत आले होते. तो चाळीच्या पायऱ्यांवर होता, तोच अश्लील खोकत सदाना म्हणाले, तरंगत असल्यासारखं वाटतंय ना... की हाडं खिळखिळी झाली प्रवासात.... इथे प्रवासात शब्दाचा उच्चार अश्लील. हीच संधी नेमकी साधत मिसेस शहाणेउठणे म्हणाल्या, सदाना तुम्हीही एकदा कुठेतरी तरंगून या ना. या वयात तोंडाची अशी वाफ जाणं बरं नाही. चाळीत बाया माणसं राहतात. एकदा कफ  निघून की खोकलाही यायचा नाही पुन्हा. पैसाअडका नसला तर सांगा, आम्ही वर्गणी काढू. रोज कानात गटारगंगा ओतून घेण्यापेक्षा ते बरे.
मिसेस शहाणीउठणे मनस्वी संतापल्या होत्या. रागाने तणतणत त्या घरात निघून गेल्या. अवघी चाळ स्तब्ध झाली होती. अनेकांना वाटत होतं शहाणेउठणे बोलल्या ते काही चुकीचं नाही, कुणीतरी बोलायलाच हवं होतं सदानांना. सदाला तोंड पाडून घरात गेले.
पहिल्यांदाच मला फार बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी सदानाच्या घराला कुलूप लावलं होतं. त्यावर एक चिठ्ठी होती-
या तोंडाला गटारगंगा पाहण्याची सवय लागली आहे. ते आता गंगाजल देणे शक्य नाही. तेव्हा मी चाळ सोडून जातोय. कुठे आहे मला माहीत नाही. चाळकऱ्यांनो, आजवर जे प्रेम दिलात त्याबद्दल धन्यवाद. माझ्या या खोलीच काय करायचं ते मिसेस शहाणेउठणेंना विचारा. त्यांना म्हणावं एखादा सभ्य पुरुष तुमच्या पाहण्यात असेल तर ठेवा त्याला या खोलीत. धन्यवाद.
सदाना पांचट होते, तरी ते कुठे गेले असतील, कसे असतील याची काळजी शहाणेउठणेंसह सगळ्यांनाच लागून राहिली. सदाना चाळ सोडून गेल्यापासून सगळे जण त्यांच्याबद्दल, त्यांच्या चांगुलपणाबद्दल बोलू लागले. मला त्या सगळ्या दुतोंडी माणसांचा राग आला.
पण काल आमचे बाबा म्हणाले, तोडणे घाण होता हे खरंच, पण अडीअडचणीला उभा राहायचा पाठीशी... आमच्या मनोहरच्या शिक्षणाचा खर्च केलान दोन वर्षे. पण एका शब्दाने बोलला नाही कोणाला. मला म्हणायचा, तुझा पोरगा हुशार आहे, नाव काढील चाळीचं. माझे पैसे ठेवून काय कुत्र खाणार आहे...
बाबांच्या तोंडची वाक्य ऐकताना मी भोवंडून निघालो. सदाना अश्लील होते, पण फक्त अश्लील नव्हते, हे कळायला फारच उशीर झाला होता...
- वैभव बळीराम चाळके
9702 723 652


Friday, April 26, 2019

कायझेन

कायझेन

कायझेन
कायझेन ही एक एक जपानी कार्यशैली आहे. मोठमोठ्या उद्योगांनी ही कार्यशैली वापरून आपले उद्योग यशस्वी केले आहेत. त्याचप्रमाणे एकेका माणसानेसुद्धा कायझेनचा वापर करून आपल्या आयुष्यात अमुलाग्र बदल केलेला आहे.हजारो-लाखो माणसांनी कायझेनच्या वाटेने आपल्या स्वतःमध्ये अमुलाग्र बदल करून आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळवलेल्या आहेत. ही कायझेनची वाट नेमकी काय आहे आणि या कायझेनच्या वाटेने कसे चालायचे, याचा आपण अगदी थोडक्यात परिचय करून घेऊ या.
वर म्हटल्याप्रमाणे कायझेन ही एक कार्यशैली आहे. अनेक जण कायझेन हे तत्त्वज्ञान आहे असे सांगतात. ते जपानी तत्त्वज्ञान असल्याचे अनेक जण सांगत असतात, पण एवढे मोठे शब्द वापरण्याची आवश्यकता नाही. कायझेन म्हणजे निरंतर सुधारणा करीत राहणे आणि त्यासाठी अगदीच छोटीशी सुरुवात करणे होय. एखाद्या कंपनीने कायझेनचा स्वीकार केला म्हणजे ती कंपनी कंपनीच्या सीईओपासून शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत प्रत्येकाला छोट्या छोट्या सुधारणांसाठी मानसिकदृष्ट्या तयार करते आणि सगळ्यांच्या सूचनांमधून योग्य त्या सूचनांचा स्वीकार करीत हळूहळू अधिकाधिक सुधारणा करीत जाते. टोयाटो या कंपनीचे याबाबतीत उदाहरण दिले जाते. कायझेनचा वापर करून नित्य छोट्या-छोट्या सुधारणा करीत टोयाटो कंपनीने आपली व्यवस्था आमुलाग्र बदलली आणि अफाट यश मिळवले. जगभरातील मोटिवेशनल आणि विविध कंपन्या उभ्या करणारे सल्लागार या टोयाटो कंपनीचे उदाहरण देत असतात. सामूहिक प्रयत्नांनी रोज छोटी छोटी गोष्ट करीत गेल्यास मोठी गोष्ट कधी साध्य होते ते कळतच नाही, असा याचा अर्थ आहे.
कायझेनची पाच मुख्य तत्त्वे सांगितली जातात. त्यातले पहिले तत्त्व आहे. सांघिक काम. जेव्हा तुम्ही सगळ्यांनी मिळून सुधारणा करायचे ठरविता तेव्हाच तुम्ही खर्‍या अर्थाने सुधारणेकडे जात असता. आपली कंपनी, आपला संघ, आपली सोसायटी, आपले राज्य, आपले राष्ट्र सुधारण्यासाठी अशी सांघिक वृत्ती अत्यंत गरजेची असते. ती निर्माण केली पाहिजे, असे कायझेन सांगते. दुसरे तत्त्व आहे स्वयंशिस्त. स्वयंशिस्तीशिवाय कोणताही बदल शक्य नाही, असे कायझेनम्हणते. कायझेनचे तिसरे तत्त्व उन्नत मनोबल अर्थात तुमचा आत्मविश्वास हे होय. रोज थोडी गोष्ट पण निरंतर करत राहिल्याने आत्मविश्वास वाढीस लागतो आणि मग बदल हमखास होतो असे कायझेन मानते. आपल्या एकूण कार्यक्षेत्रात अशीच प्रगती झाली पाहिजे. त्यात सुधारणा झाली पाहिजे, असेही कायझेनचे तत्त्व आहे. सुधारणेसाठी नवनवीन पर्याय सुचवले जावेत, असेही कायझेन मानते. या पाच तत्त्वांच्या जोरावर कायझेन एखाद्या गोष्टीत, एखाद्या कंपनीत, एखाद्या माणसाला रोज थोडा थोडा करून अंतिमता मोठा बदल करू शकते.
कायझेनमध्ये स्वच्छता, सुव्यवस्था, साधनशुचिता, प्रमाणबद्धता आणि शिस्त या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. एखादी गोष्ट चुकीची घडते आहे, असे लक्षात येताच ती लक्षात आलेल्या माणसाने ताबडतोब थांबून सुधारायला हवी, असे कायझेन सांगते.
कायझेनचा वापर कसा करायचा, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. आपण विविध कामांसाठी कायझेनचा वापर करू शकतो. एक उदाहरण म्हणून आपण व्यायाम करण्याची सवय लावण्यासाठी कायझेन कसा वापरता येईल ते पाहू.
दरवर्षी हिवाळा आला की, सुट्टी मिळाली की किंवा पाऊस सुरू झाला की, सकाळी फिरायला जाण्याचा, सकाळी रोज व्यायाम करण्याचा, जिममध्ये जाण्याचा संकल्प आपण करीत असतो. बहुदा हा संकल्प तडीस जात नाही. कायझेनअसे म्हणते की, आपल्या मनावर अशा कोणत्याही संकल्पाचा मोठा ताण येतो आणि अशाप्रकारे कोणताही ताण आला की मनाची स्वाभाविक प्रतिक्रिया अशी असते की, तो ताण दूर करावा. मग विविध कारणे पुढे करीत आपण ते करणे टाळतो आणि ताण दूर करतो. कायझेन नेमके हेच सांगते की, असा ताण येऊ नये, अशा पद्धतीने कामाला लागा.

कोणत्याही दिवशी व्यायाम करण्याचा संकल्प करा आणि त्या दिवशी किमान एक मिनिट व्यायाम करा. त्यानंतर ठरलेल्या विशिष्ट वेळेला घड्याळाचा आलार्म लावून घ्या. आलार्म होताच व्यायाम करायला सुरुवात करा. आता तुम्हाला दिवसातील 14 40 मिनिटांनी पैकी फक्त एक मिनिटं व्यायाम करायचा असल्याने मानसिक ताण येणार नाही. फक्त एक गोष्ट कटाक्षाने पाळली पाहिजे, आलार्म झाला की व्यायाम सुरू. त्यात खंड पडता कामा नये. सातत्याने तुम्ही असे करीत राहिलात की तुमच्या मनाला त्याची सवय होऊन जाते. तुम्हाला माहीतच असेल की कोणतीही सवय सहजासहजी सुटत नाही. त्यामुळे सतत काही दिवस निरंतर एक मिनिटाचा व्यायाम करा. असे एकवीस दिवस केल्यावर तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढीस लागेल. मग या एक मिनिटाची तीन किंवा पाच मिनिटे करा. आता तुम्हाला सवय झालेली असेल. त्यामुळे तीन किंवा पाच मिनिटे व्यायाम करणे अवघड वाटणार नाही. त्याचा मनावर ताण येणार नाही. असे करत हळूहळू हा वेळ वाढवत न्या. तीन मिनिटे किंवा पाच मिनिटे या वेळेवर काही दिवस कायम राहा. मग अपेक्षित असलेला एक तास, दीड तास वेळेपर्यंत व्यायाम वाढवत न्या. असे केल्याने त्याची सवयच लागेल आणि कोणतीही सवय एकदा लागली की ती सुटत नाही, हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेच.
कायझेनच्या वाटेने जात आपण स्वतःमध्ये, आपल्या मुलांमध्ये, आपल्या शाळा-कॉलेज, संस्था, कंपन्या, सोसायट्या, उद्योग, गाव, राज्य यांच्यात ही सहज बदल करू शकतो.
- वैभव बळीराम चाळके
9702 723 652

Wednesday, April 24, 2019

कथा- कांता



गाडी लागल्यालागल्या मी माझ्या आधीच बुक केलेल्या सीटवर येऊन बसलो होतो. आई-बाबा सोडायला आले होते. त्यांना टाटा केला. जा म्हणालो. आणि शेजारी कोण येणार याचा विचार करत होतो. तेवढ्यात एक पन्नाशीचे खात्यापित्या घरचे साहेब आणि त्यांची मुलगी असे दोघे जण माझ्या सीटपाशी आले. मी बसलो होतो तो बाक दोन जागांचा होता. एका रिकाम्या जागेवर आपली बॅग ठेवत तो खात्यापित्या घरच्या इसम सोबतच्या मुलीला म्हणाला, कांता मी इथे बसतो, तू तिकडे बस जा.
कांता मागे गेली. तो इसम आपली सीटवर ठेवलेली बॅग खाली ठेवून धाडकन बसला. मला अर्थातच त्याचा राग आला. ती फुलासारखी गोड मुलगी बाजूला बसली असती तर त्याच्यासारखा आनंद नव्हता दुसरा. पण आता रडण्यात अर्थ नाही. काहीतरी बोलायचं म्हणून मी विचारलं, कुठल्या गावचे तुम्ही...
तेरेवाडी देवाडी
यशवंत सागर यांना ओळखता तुम्ही...
हो. भाऊच लागतो माझा.
तुमचं नाव काय... गाव कुठलं...
माझं नाव विष्णू भोसले. मी वेत गावचा आहे. यशवंत सागर माझे मामा लागतात.
म्हणजे तू नंदाचा मुलगा काय...
होय...
आई कशी आहे....
आमचा संवाद साधारण 15 मिनिटे सुरू होता. एसटी मुंबईच्या दिशेने धावत होती. पंधरा मिनिटानंतर ते मामा म्हणाले, मी मागे बसतो. कांताला पुढे पाठवतो. मागे झटके बसत असतील तिला.

पाठवा, मी म्हणालो.
आता मघासारखा दृष्टिकोन नव्हता. अर्थात तरीही कांता शेजारी येईल याचा सात्विक आनंद होताच. मामा गेले आणि कांताला घेऊन आले. माझी ओळख करून देत म्हणाले, हा यशवंत काकाचा भाचा. गप्पा मारत मी बसा. मी बसतो मागे.
मामा गेले. कांता माझ्या शेजारी बसली. मला एकदम छान वाटलं. छान वाटायचं वय होतं माझं.
हाय... कांता हात पुढे करत कांता म्हणाली.
मी तिचा हात हातात घेत म्हटलं, हाय.
कांता हसली.
विष्णू नाव माझं. बस मस्तपैकी.
मग आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली. मी मुंबईत एमडी कॉलेजात बीएच्या शेवटच्या वर्षाला शिकतो आहे. बॉक्सिंगमध्ये इंरकालेजिएट कॉम्पिटिशनमध्ये पारितोषिके मिळवली आहेत. पुढे एम करून प्राध्यापकी करायचा विचार आहे, वगैरे मी तिला सांगितलं. ती पोद्दारला सेकंड ईयर बीकॉमला आहे. डान्समध्ये तिला विशेष रस आहे, वगैरे माहिती तिने मला दिली.

मी गावात शाळा करून मग शहरात गेलेलो. घरची परिस्थिती बेताची. त्या तुलनेत कांता बऱ्या घरची. मुंबईत लहानाची मोठी झालेली. त्यामुळे एमडी कॉलेज आणि पोद्दार कॉलेजमध्ये जेवढा फरक असायला हवा तेवढा आम्हा दोघांत होता. कांता फॉरवर्ड होती, मी मागासलेले होतो. तरी संकोची. खोट्या प्रतिष्ठेची जास्त काळजी घेणारा.

गाडी संगमेश्वर सोडून नॅशनल हायवेला आली, तशा लाईट बंद केल्या गेल्या. चांदणी रात्र होती. त्यामुळे गाडीत चांदण्याचा दुधाळ काळा प्रकाश पसरला होता. का कुणास ठाऊक कांता चेहरा आता अस्पष्ट दिसायला लागल्याने अधिक छान दिसत होता. कदाचित मगाशी निरखून पाहताना येणारा संकोच आता अंधारात बुडून गेला असणार. कांताही खुलेपणाने गप्पा मारत होती.
आमच्या गप्पा रंगल्या होत्या, तेवढ्या खडखडाट झाला. गाडी थांबली. लाईट लागल्या. सर्व प्रवासी जागे झाले. कंडक्टर पुढे आले. ड्रायव्हर म्हणाला, खाली उतर. प्रॉब्लेम दिसतोय. ते खाली उतरले. प्रवासी उतरले. पण प्रवासी लवकरच कंटाळून गाडीत येऊन पुन्हा डोळे झाकून राहिले. ड्रायव्हर-कंडक्टर काहीतरी कटकट आवाज करीत गाडी दुरुस्त करीत होते.
कांता म्हणाली, ही पर्स मांडीवर घे. मी झोपते त्यावर. लाईट चालू होत्या. त्यामुळे काय करावं कळेना. मी एक कटाक्ष टाकला. मामा आ करून झोपले होते. मी मागे पाहिलं ते तिने पाहिलं आणि म्हणाली, पप्पा नाही काही म्हणणार, रे तशीच आहे. तुला आक्षेप असला तर सांग. मी नाही झोपत.
तसं नव्हे... मी संकोचाने म्हणालो.
मग घे...  म्हणत तिने पर्स माझ्या मांडीवर ठेवली आणि ती त्यावर डोकं टेकून झोपी गेली.
गाडी चालू झाली. पुन्हा गाडीत चांदणं खेळू चांगलं खेळू लागले.

पण माझी मनस्थिती आता पालटली होती. मगापासून कांताविषयी मनात नको ते विचारीत होते, ते आता विरून गेले, ती विश्वासानं मांडीवर झोपली तर आपण तिचा विश्वासघात करू नये, असं वाटलं. मी आतापर्यंत सहजपणेच वागलो होतो. पण आता त्याच सभ्यपणाला सुसंस्कृततेची... आपुलकीची... प्रेमाची झालर येऊ लागली. मी कांताच्या कपाळावर भुरभुरणारे केस हळूवार मागे सारत राहिलो. मग हळुवार हाताने तिला थोपटून निजवलं. आता कांता ही दुसरी मुलगी नव्हतीच मुळी. ती माझी नातलग... माझी मैत्रीण... माझ्या घरातली झाली होती. काळजात येऊन राहिली होती. गाडी हलली तरी कांताची झोपमोड होऊ नये म्हणून मी आटापिटा करून तिचा तोल सावरत होतो. आयुष्यात इतका प्रेमळ... इतका सभ्य आणि इतका आनंदी मी कधीच झालो नव्हतो.

गाडी जेवणाला म्हणून थांबली, तेव्हा कांता उठली, उठल्यावर थँक्स म्हणाली, तिच्या चेहऱ्यावरून कृतज्ञता आणि आपलेपणा ओसंडून वाहत होता.
मी म्हटलं, थँक्स. माझ्यावरच्या विश्वासबद्दल...
थँक यू... कांता अत्यंत ओल्या स्वरात म्हणाली.

कांता मला त्यादिवशी एकदाच भेटली होती. पण परवा यशवंत मामाने कांताच्या मृत्यूची बातमी सांगितल्यावर मी हादरून गेलो. जेवणही गोड लागत नाहीये आणि हे असं का होतंय हे कुणाला सांगताही येत नाहीए...

-      वैभव बळीराम चाळके
9702 723 652

कथा- ओळख



तुम्ही लेखक आहात ना, माझ्यावर ही एक गोष्ट लिहा.
तुला कोण म्हणाल?
गेस...
कसं कळलं सांग...
वेटरनं सांगितलं
अच्छा तरी म्हटलं तुला कसं कळलं...
तुझं नाव?
गंमत बघ आपण ओळख करून घेतली नाही एकमेकांची.
तुमचं नाव काय?
मी... मी शाल्मली.
पुण्यात कशी?
मी कोल्हापूरची... इंटरव्यू साठी आले होते. उशीर झाला म्हणून येथे राहिले. हे पुण्यातला सर्वात चांगलं हॉटेल आहे असं बाबांना वाटतं.
दोघेही गोड हसली. सुचक.
कसला होता इंटरव्यू?
नवी आयटी कंपनी लॉन्च होतेय. मी बीएससी आयटी आहे.
अरे वा...
वा काय...
वाटत नाही का?
तसं नव्हे म्हणजे आयटीमध्ये सध्या चांगला पैसा आहे म्हणून म्हटलं.
तुम्ही...
मी लेखक आहे. दोन-चार सिनेमाच्या कथा लिहिल्या. एक कॉलम सुरू आहे वर्तमानपत्रात. बँकेत नोकरीला होतो. गेल्याच वर्षी व्हीआरएस घेतली आणि पूर्णवेळ लेखक झालो.
पैसे मिळतात पुरेसे...
पुरेसे नाहीत, पण मान धरून चांगले मानधन चांगले मिळते. अच्छा... तुम्ही मिस्टर विनायक कुर्तडकर ओळखता? ते माझे दूरचे काका लागतात.
हो का...
थेट संबंध नाही आला कधी, पण नाव ऐकून आहे मी.

असं वरवर बोलणं झालं. जुजबी ओळख झाली आणि शालू जायला निघाली. जाताना म्हणाली, रात्री घाईगडबडीत ओळखच करून घ्यायची राहिली. मग वाटलं सकाळी तुम्ही लवकर उठून याल जाल आणि भेट व्हायचीच नाही.
विद्याधर नुसताच हसला.
जाऊ दे तुम्हाला हे सांगायला आलो होतो की, काल आपली ओळख नव्हती. आपण भेटलोच नाही काल. का ते तुम्हाला कळले आहे. फक्त आता एवढंच लक्षात ठेवा.
ओके गुड नाईट... स्वीट ड्रीम सर.
एस. आय हॅव टू चिल्ड्रन अल्सो.
तरीही तुम्ही...
फर्स्ट टाइम. बट इट इज ग्रेट एक्सपिरीयन्स.
यू?
सेकंड...
हु वाज द फर्स्ट?
डोन्ट नो...
व्हॅट डोन्ट नो?
कोठे?
इथेच.
कधी?
ऍट लास्ट इंटरव्यू... मला वाटलं होतं आजही तो असेल. तो नव्हता, पण तुम्ही होतात.

शाल्मली निघाली. निघताना तिने विद्याधऱचा हात हातात घेतला. विद्याधरने तिला खेचून जवळ घेतले. कुशीत घेत पाठीवर थोपटत तो तिला म्हणाला, ऑल दि बेस्ट... आय विल मिस यू.
थँक्स... शाल्मलीने त्याच्या ओठावर ओठ टेकले. पाच मिनिटांनी शाल्मली त्याच्या रूममधून बाहेर पडली. तो दारापर्यंत आला. निरोप घेऊन तो पुन्हा येऊन खुर्चीत बसला.
त्याला पटकथा लिहायची होती, पण त्याला तो रात्रीचा प्रसंग सिनेमासारखा पुन्हा पुन्हा दिसत राहिला.

काल रात्री जेवण झाल्यावर विद्याधर दाराबाहेर येऊन उभा होता. हॉटेलची रचना सी आकाराची होती. मध्ये छोटी गार्डन... एका बाजूला छोटासा मैदान... त्या दिशेने वारे वाहत होतं. म्हणून त्याच कोपऱ्यावर विद्याधर उभा होता. तेवढ्यात समोरच्या खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि मानेवर हात फिरवत एक सुंदर तरुणी गॅलरीत येऊन उभी राहिली. तिने बहुतेक नुकतीच अंघोळ केली असावी. तो तिच्याकडे एकटक बघत होता. तिचं लक्ष समोरच उभ्या असलेल्या पुरुषाकडे गेले. तो तिच्याकडे पाहत होता. एक क्षण त्याला ती पाहात होती, हे कळलं नाही. त्याचं लक्ष तिच्या नजरेकडे नव्हतं. त्याला जेव्हा ती पाहते हे कळले तेव्हा स्वतःला सावरून त्याने तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण तो फसला. मग बराच वेळ दोघेही एकमेकांना नजरेने खेळवत राहिली.
तिला काय वाटलं कुणास ठावूक... ती आपल्या खोलीत गेली. तो अस्वस्थपणे तिथेच उभा राहिला. काही मिनिटांनंतर पुन्हा दार उघडलं गेलं आणि धाडकन पुन्हा झाकलं गेलं. त्या क्षणिक वेळेत तिचा चेहरा लाजलेला... भांबावलेला दिसला. मग नीट विचार करून तो तिच्या दारापाशी गेला आणि त्याने दारावर नॉक केलं. दार उघडायला उशीर झाला, तेव्हा त्याला आपण उगाच दार वाजवलं असं वाटून गेलं. तिने दार उघडलं. तो दोन पावलं माग गेला. मग त्यांना इकडेतिकडे नजर फिरवली.
नाही मी एकटीच आहे, ती म्हणाली.
सुंदर...
काय...
हेच..
तो थोडा पुढे गेला. तिचे कपडे पडलेले होते, त्यातला नेमका कपडा उचलून त्यांने तिला दाखवला.
ती अजून पुढे झाली आणि तिने ते सगळे कपडे पटापट उतरून छातीशी धरले. तो बिछान्यावर बसला. समोरच आरसा होता. त्या आरशात बघत तो म्हणाला, तुला भीती नाही वाटत?
वाटते, पण थोडी थोडी...
त्याच्या अंगात जोम होता, पण त्याचा त्यावर ताबा नव्हता. अंगात ताकद भरून वाहत होती. पण ती सर्वांगाला एक विचित्र थरथर आली होती. म्हणूनच त्याचे शब्द स्पष्ट, कणखर उच्चारले जात नव्हते, पण शेवटी जोमाने भीतीवर मात केली.
किती किती दिवसांत न लाभलेले सुख उपभोगून तृप्त झालेल्या त्याने तिची रूम सोडली तेव्हा बायकोच्या आठवणी त्याच्या तृप्त म्हणाला सलू लागल्या. लवकरच त्याने तत्त्वज्ञानाच्या औषधाने ती सल बरी करून घेतली

तिने पुन्हा आंघोळ केली. कपडे दुसरे घातले. तरी तिला आपण अजून अजून आणि अस्वच्छ आहोत असे वाटत होते, पण तरीही एका अनोख्या सुखाचा अनुभव भरलं होतं. अळवाच्या पानावरल्या थेंबासारखा तो अनुभव सुंदर होता, पण वाऱ्याने माती होऊ पाहत होता. सकाळते हे वारे जरा जास्तच वाहते आहे, असंही तिला वाटत होतं.
-    वैभव बळीराम चाळके
९७०२ ७२३ ६५२


Tuesday, April 23, 2019

कथा- निर्मला


चार दिवस पाऊस पडला नाही आणि जमिनीचा ओलावा संपला की निर्मला झाडूचा झडलेला पिसारा हाती घेऊन आपल्या घरापासून गल्ली झाडायला सुरुवात करी. तास-दीड तासाने ती गल्लीच्या त्या टोकापर्यंत पोचे. काम कसं अगदी नीट. निर्मलाने झाडलेल्या जागेवर कस्पट दिसायचं नाही कुणाला. अवघा परिसर झाडून काढी.

श्रावणाचे दिवस असले म्हणजे या स्वच्छतेने अवघा परिसर उजळून निघे. कधीकधी तिथेच मुलं गोट्यांचा डाव मांडत. एरवी गल्लीत चिखल आणि पालापाचोळा इतका असे की त्यात शेकडो गोट्या हरवल्या तरी एक सापडू नये. पण एकदा निर्मलाचा हात फिरला म्हणजे मुलांसाठी लख्ख मैदान तयार होई. ती एकटी न आवाज करता झाडलोट करत राही. कुणी येताजाताना दिसलं की त्याच्यासोबत बोले. ती व्यक्ती निघून गेली की पुन्हा आपल्या स्वच्छता मोहिमेत दंग होई. अख्खी गल्ली स्वच्छ करून झाली की तिथेच एखाद्या दगडावर विसावत दम खाई. मग उठून दूरवरच्या दगडावर झाडूचा बुंधा आपटून सरळ करी. मग आपलं कमरेला गुंडाळलेला जुनेर नीट करून घेई. एका टोकाने घाम पुसून घेई. ब्लाउज खाली करून नीट बसवी आणि सत्तरी पार केलेली हाडांची काडं झालेली निर्मला सदाच्या घरात शिरे. तिथेच पडवीत बसून सदाच्या बायकोला म्हणे, पाणी दे गो. संगू पाण्याचा तांब्या घेऊन आली की निरमला तो हाती घेई आणि दोन दोन घोट घशात ओतून घेत पाणी पीत राही.

जेवलीस काय के काकू? संगी विचारी.

पावसाने उघडीप दिला तर म्हटलं गल्ली तरी झाडून घ्यावी तर एवढा वकत झाला बघ.

भाकरी खातेस.

नको. सकाळी टाकलेय भाकरी. सुकाटपण भाजून ठेवलंय, म्हणून निर्मला उठे आणि आपल्या घराकडे निघे.

आता त्या स्वच्छ मार्गावरून चालताना तिला आपण आपल्या घरात नव्हे तर राजप्रासादात जातो आहोत, असे वाटे. त्या स्वच्छ आरस्पानी वाटेवरून चालत ती घरात पोहोचे आणि त्या खुराडेवजा पडवीत थाटलेल्या आपला प्रशस्त महालात हातावर अर्धी भाकरी आणि त्यावर बळीच्या सुकटाचे दोन तुकडे घेऊन उरल्यासुरल्या दातांनी ते आनंदाने खात राही. एक अलौकिक समाधान तिच्या चेहऱ्यावर पसरे. जेवणाची दोन भांडी खळखळून टाकी. गोणपाट घासून उशाखाली पाठ घेई आणि पडून राही.

वाढत्या वयाबरोबर झोप उडाली आहे. रात्री थोडा वेळ डोळा लागे. एरवी ती टक्क जागी असे. दिवसा कसली झोप येणार? ती नुसतीच पडून राही. जरा उन्हं कळली की  गोणपाटाला घडी मारून ठेवी आणि कपभक च्या बनवून घेई. मग घराला कडी मारून बाहेर पडे.

घराच्या कोपऱ्यावर वळून निर्मला गल्लीत प्रवेश करती झाली तर तिला गल्लीत गोऱ्या सांडलेल्या दिसल्या. आत्ता झाडझूड केले नाही तोवर ही असली घाण केलेली पाहून तिच्या मस्तकाची शिर उठली. नेहमीच्या मनस्वी रागाने तिने शिव्यांचा यज्ञ सुरू केला.

रांडा ना धड चालता येत नाही. कशाला जन्मास आल्यात माहीत नाही. मी म्हातारी झाडलोट करते कंबर बांधून, तर दिसत नाही होय या हिरोइन्सनी. चालताना डोळे थाऱ्यावर नाहीत रांडांचे. पलीकडच्या तात्यांच्याच पोरी इथून गेल्या असाव्यात अशा अंदाजाने निर्मला शिव्या घालू लागते. डोळे नाहीत होय... गोट्या बसवलान परमेश्वरा... निर्मलाचा सुरू झालेला तोंडाचा पट्टा आता तासभर थांबायचं नाव घेत नाही. लोक हे सगळं ओळखून आपल्या कानाची बटन लावून घेतात. निर्मलाने त्या गोवऱ्या उचलून दूर शेतात फेकून दिल्या. मग त्याच स्थितीत पुढे निघाली. आता अवघ्या गल्लीची तपासणी केल्याशिवाय तिला चैन पडणार नव्हती. पाटलांच्या घराशेजारी धन्या मुळेचं आंब्याचं झाड होतं. त्याची कोरम फांदी मोडून गल्लीत पडली होती. त्यामुळे मगाशी झाडून स्वच्छ केलेल्या गल्ली घाण दिसत होती. ती पाहून निर्मलाचं डोकं आणखी तापलं. ह्या धन्याचं घरानं बुडालं, पण हा आंबा राहिला आहे माझी हाडं खायला... गुदस्ता पाडव्याला अशीच गल्ली साफ केली आणि त्यावर त्याची फांदी पडली. इमल्याचं पोर जरा वाचलं. मी ती फांदी उचलली तर माझ्या कमरेत चमाकलं. दोन दिवस जाग्यावर काढले. पाडव्याचं नमनपण चुकलं. या रान्डच्या आंब्यापाई.

जरा पुढे सरकली तर चॉकलेटचे दोन कागद आणि एक गोळ्यांची प्लास्टिक पिशवी पडलेली दिसली. ती उचलून दूर फेकत म्हातारी करवादली, या पोरांना तर नेऊन गाडली पाहिजेत. माझ्या जीवावर उठलेत. संगीच्या नातवाचा तर मी पायच मोडून ठेवणार आहे. माझी मजा बघतो. तेरोज सारवलेल्या ओसरीवर मुतून गेला गुलाम. संगी रांड बोलत पण नाही त्याला.

तेवढा सदाची लेक माईनं म्हातारीला हाक मारली, म्हातारे घरात ये. काम हाय.

तुझा बाप म्हातारा, म्हणत निर्मला घरात आली. माईनं तिच्या हातावर पेढा ठेवलं आणि म्हणाली, ताईला मुलगी झाली. आताच पाहुणे निरोप आणि पेढे घेऊन आले.

होव दे होव दे बाय. बाळंतीन बरी हाय ना... तिनं आईला विचारलं. पण माई बरी हाय म्हणाली.

ते न ऐकताच ती सांगू लागली, सकाळदरणं सगली गली साफ केली ती पाहवेना  रांडेच्यास्नी.  हे हगुन न ठेवलंय जिथं तिथं.

माई तिचं नाव ऐकताच आपल्या कामात बुडाली. तिथल्याच मडक्यातलं पाणी घेऊन पहिली आणि निर्मला घराबाहेर पडली. तिचा शिवा वाहण्याचा आणि कचरा उचलण्याचा यज्ञ अखंड सुरू झाला. गल्लीच्या टोकाला जाऊन  ती संगीच्या घरी विसावली.

मग अंधार पडत आला तशी माघारी फिरली. येताना तिने संगीताचा नातू, माईचा बारका भाऊ, पणजी बाईची सून आणि उभी नानी या सगळ्यांना उद्या रतवाला जायचा बेत सांगितला. एकेकाला माहिती देती अंधार पडल्यावर घरात परतली.

रतवा म्हणजे ओढ्यातले इवलेइवले लाल मासे. श्रावण सुरू झाला म्हणजे निर्मला तंगुसात गांडूळ ओवून ओढ्यावर रथवायला जाई. गांडूळ काढणे, ते तंगुसात ओवणे, गांडुळांचा गळ पाण्यात टाकणे आणि त्याला रतू लागली की तिला अलगत टोपलीत उचलून टाकणे, यात निर्मला मोठी माहीर होती. तिला या सगळ्या कामात मोठा रस वाटे.

दुसऱ्या दिवशी सगळी मुलंमुली आणि उभी नानी निर्मलासोबत वाला गेले. उन्हं उतरायला लागेपर्यंत निर्मलाची अर्धी रोवली भरली. बाकीच्यांनी दहा, वीस, तीस रतवा पकडल्या. घरी परतेपर्यंत आणि रतवा शिजेपर्यंत अंधार दाटून आला. साधारण साडे सातच्या दरम्यान निर्मलाने समोरच्या घरातल्या अंजीला आवाज दिला, अंजी, अगं अंजी... जरा बॅटरी दे. अंजी बॅटरी घेऊन आली आणि म्हणाली, आता कुठे कोसळतेस...

निर्मला त्यावर काहीच बोलली नाही.

मग ती चुलीवरल्या रतवांच्या पातेल्यातील रतवांचे जवळ ठेवलेली कुड्याच्या पानांत दहा-बारा वाटे केले. ते सगळे वाटे एका टोपात घेऊन ते वाटायला निघाली.

ज्या ज्या घरातल्या कुणी रतवाला आलं नव्हतं त्या घरात एक एक वाट नेऊन दिला.

काल तिने ज्यांना शिव्या घातल्या होत्या त्या सगळ्यांच्या घरातही एकेक वाटा पोचला होता. एक वाटा धन्या मोऱ्याच्या घराजवळ ठेवून दिला. तीन-चार रतवांचा एक एक वाटा, पण गल्लीतल्या प्रत्येक घरात आज रतवा होत्या आणि घराघरातून निर्मला म्हातारीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली गेली.

- वैभव बळीराम चाळके


Saturday, April 20, 2019

कथा- मृत्यू वाईट


मृत्यू वाईट...  मग तो कोणाचाही असो, मृत्यू वाईटच. अपघातात झालेल्या मृत्यू वाईट... आजाराने झालेला मृत्यू वाईट.... अकाली झालेला मृत्यू वाईट... तसा वयोमानाने झालेला मृत्यूसुद्धा वाईटच.... मृत्यू म्हणजे अस्तित्वाची समाप्ती. मृत्यू म्हणजे नसणे. मृत्यू म्हणजे शेवट. मृत्यू म्हणजे केवळ अंधार...
थंडीचे दिवस होते. दिवाळी नुकतीच होऊन गेली होती. त्यामुळे एक तर ऑफिसातल्या सगळ्या सहकार्‍यांच्या अंगावर नवे कपडे होते. दिवाळीचा उत्साह होता. चेहर्‍यावर प्रसन्नता होती. अशा वेळी कुसुरकरच्या मोठ्या भावाच्या निधनाची बातमी आली. ऑफिसात एकच शांतता पसरली. बातमी कळल्यावर कुसुरकर ढसाढसा रडला. भावाशी त्याचं नातं जवळचं होतं. तो भावाबद्दल पुन्हापुन्हा बोलत असे. भावाने त्याला लहानाचा मोठा केला होता असेही म्हणे. त्यामुळे भाऊ अचानक गेला हा धक्का त्याला सहन झाला नाही. मृत्यू वाईट... त्यात जवळच्या माणसाचा मृत्यू तर त्याहून वाईट...
कुसुरकर ताबडतोब घरी निघून गेला. त्याला गाडी करून गावाला निघावे लागले. त्याला सोडायला सोबत शिंदे गेला. ऑफिसात दिवसभर लोक त्याच गोष्टीबद्दल बोलत होते. दुपारी जेवणाच्या सुट्टीत आणि चार वाजता चहाच्या वेळी सुद्धा कुसुरकरच्या भावाच्या मृत्यूची चर्चा ऑफिसात सुरू होती.
पवार म्हणाला, बाराव्याला जायचं का? कुसुरकरचं घर तसं फार लांब नाही आणि रविवार येतोय बाराव्याला... शनिवारी रात्री जाऊन रविवारी कार्य करून रात्री गाडीत बसता येईल. सोमवारी कामावर हजर. कोणीच हो म्हणाले नाही. बघू... विचार करू... असेच सगळ्यांचे म्हणणे होते. पण पवार म्हणाला, मला गेले पाहिजे. माझ्या प्रत्येक गरजेला कुसुरकर भावासारखा उभा राहिला पाठीशी. मी जाणार. तुमच्यापैकी कुणी येणार असेल तर सांगा.
ऑफिसातल्या 18 माणसांपैकी कोणीही जायचं नाव काढलं नाही. दहा दिवस निघून गेले. अकराव्या दिवशी शनिवार होता. त्या दिवशी निघायचे होते. आज अर्धा दिवसच ऑफिस होते. पण आज पवार आलाच नाही. सगळ्यांना वाटले कदाचित हा सकाळीच गाडीला बसला असेल. पण ऑफिसची वेळ होऊन गेल्यावर उशिराने पवार हजर झाला. म्हणाला, शेजार्‍याला हार्ट अटॅक आला, त्याला ऍडमिट करून आलोय. आता मला कुसुरकरच्या भावाच्या कार्यालाही जाता येणार नाही. पण मला राहून राहून वाटतंय आपल्यापैकी कोणी तरी गेले पाहिजे. मग तो त्याच्या हाताखाली काम करणार्‍या ओमकारला म्हणाला, ओंकार एवढं काम करशील, हवे तर तुला जायचायायचा खर्च मी देतो, पण जाऊन ये.
ओमकारच्या शेजारी बसणारी शीतल म्हणाली, खरेतर मलाही जायला हवे. माझ्या मिस्टरांच्या आजारपणात कुसुरकर आठ दिवस रोज येऊन हॉस्पिटलला बसत होता. त्या दिवशीपासूनच मी विचार करते आहे पवारांसोबत जाता आलं तर जावं म्हणून.
मग ऑफिसातल्या इतर सहकार्‍यांकडे पाहत ती म्हणाली, चला रे कोणी तरी... एकमेकांच्या सोबत असलो म्हणजे कंटाळा येणार नाही. ओमकार निघतोच आहे, शिरोडकर तुम्ही किंवा साठे तुम्ही येताय का, चला जमत असेल तर जाऊन येऊ.
ओमकारचा नाईलाज होता. ओमकार जातो म्हणाला. संध्याकाळपर्यंत हो नाही करता ओंधकरबाई, शीतल आणि ओमकार असे तिघे जण कुसुरकरच्या गावी जायला निघाले. कुसुरकरचं गाव कोल्हापूर-सांगलीच्या दरम्यान कुठेतरी होते. पवारने पत्ता काढून दिला. मुंबई सेंट्रलवरून कोल्हापूरला जाणारी गाडी पकडा आणि कोल्हापूर स्थानकातून पुढे जा असा सल्लाही दिला.
रात्री नऊ वाजताची गाडी होती. तिघेही मुंबई सेंट्रल स्थानकात भेटू असे ठरवून दुपारी आपापल्या घरी गेले.
रात्री नऊची गाडी लागली तेव्हा एकटी शीतलच मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचली होती. औंधकरबाईंचा फोन लागत नव्हता. ओमकार आलोच, दोन मिनिटांत आलो, पाच मिनिटांत आलो, असं म्हणत होता. शीतलला काय करावे कळेना. गाडीला काही मिनिटे शिल्लक असताना ओमकार धावतपळत पोहोचला. औंधकरबाई आल्या नाहीत. शेवटी दोघांनी निघायचा निर्णय घेतला आणि गाडी पकडली.
मृत्यू वाईट... ओंकार शीतलला सांगत होता. फक्त माणसाचा नव्हे आमच्या घरी एक कुत्रा होता डॉल्फिन नावाचा. फार लाडात वाढवला होता मी त्याला. त्याचं प्रेम होतं आमच्या सगळ्यांवर. डॉल्फिन गेला तेव्हा तुला सांगतो शीतल, आम्ही तीन दिवस घरी जेवलो नव्हतो, वडापाव खा आणि सँडविच खा असे करत दिवस काढले. माणसाचं सुतक वाईट नसेल इतका वाईट काळ होता तो मला.
शीतल म्हणाली, मी तर असा मृत्यू अनुभवलाय की ती आठवणी नको वाटते पुन्हा.
मृत्यूबद्दलच्या गप्पांनी त्यांच्यात एक निराशा भरून राहिली.
बहिणीच्या मृत्यूची गोष्ट सांगताना शीतल खूपच भावुक झाली. तिला आपले अश्रू आवरता आले नाहीत. ती हमसून हमसून रडू लागली. तिच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते. ओमकारला काही क्षण काय करावे कळेना, पण फारच झाले तेव्हा त्याने तिला जवळ घेतले, तिचे डोळे पुसले आणि बराच वेळ तो तिच्या गालावर थोपटत राहिला, शीतलनेही ओमकारच्या कमरेभोवती हात टाकला. तिच्या हाताचा पंजा आपल्या एका कुशीवर रोवलेला ओमकारला स्पष्ट कळला. काहीतरी चुकते असे त्याला वाटायला लागलं. पण काय करावं ते कळत नव्हतं. दोघांमधून वीज संचारून गेली होती.
रात्रीच्या प्रवासात हे असंच होतं. बंध तुटून पडतात. माणसं जवळ येतात. ती एकमेकांना हवीहवीशी वाटतात. शीतल आणि ओमकार यांच्यातील नेमकं तेच झालं. एका मृत्यूची चर्चा करताकरता आणि एका मृत्यूनंतरच्या अंत्यविधीला जाताजाता एक नवाच सर्जनाचा कोंब रुजायला लागला. एक नवंच नातं जन्माला आलं. कुणालाही न कळता वाढलं. रात्रीचा अंधार बहुतेक या अशा अनधिकृत बांधकामांना वेग देत असावा. शीतल तर जवळजवळ त्याच्या मिठीत शिरली होती. ओमकार नको हे सारं म्हणता-म्हणता हवं हे पर्यंतच्या सीमेपर्यंत येऊन पोचला होता. त्यांच्याही नकळत दोघं आता एकमेकांची झाली होती.
पुणे सोडून गाडी सातारच्या दिशेने धावत असताना दोघांनी कुसुरकरच्या गावी जाण्याचा निर्णय रद्दबातल केला. दोघे सातार्‍याला उतरली. तिथे एसटी स्टँडवर चौकशी करून परिसरातल्या एका चांगल्या हॉटेलात थांबली. आता गाडी बिघडल्याचे कारण सांगून आपण सातार्‍यातून परत आल्याची बतावणी ते ऑफिसात करणार होते. तसा त्यांनी प्लॅनही केला. रात्री साधारण चार वाजता सातारा स्टँडवर उतरलेली दोघं साडेचारला आपल्या रूमवर पोचली.
साडेनऊ वाजता ओमकारला जाग आली, तेव्हा त्याने घाईघाईने शीतलला उठवले आणि परतीच्या प्रवासाला निघण्याची सूचना केली.
भराभर आंघोळ वगैरे आटोपून दोघे सातारा स्थानकात पोचले. दुपारचे साडे अकरा वाजले होते आणि संध्याकाळपर्यंत दोघे हमखास आपापल्या घरी बसणार होते, पण ऑफिसात कोणालाही शंका नको म्हणून दोघांनी मिळून ओंधकरबाईंना फोन केला. काल रात्री चार वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत गाडी दुरुस्तीचा निष्फळ प्रयत्न करून झाला आणि मग सातारा डेपोच्या गाडीमधून आम्हाला सातारा डेपोत आणले गेले. तेथून दुसर्‍या गाडीत बसविण्याची सोय करण्यात आली होती. मात्र इतक्या उशिरा गेल्यावर धर्मविधीला पोचता येणार नाही म्हणून आम्ही परतण्याचा निर्णय घेतला आणि आता इथे चहा नाश्ता करून परतीच्या प्रवासाला लागतो आहोत, असे त्यांनी औंधकरबाईंना सांगितले.
कोल्हापूरहून आलेली मुंबई गाडी पकडून त्यांनी मुंबई दिशेचा प्रवास सुरू केला.
ऑफिसात आपल्यात झालेल्या देवाणघेवाणीची कोणालाही खबर लागणार नाही याची जणू तरतूद एका फोनमुळे झाली होती.
शीतल परतीच्या प्रवासात ओमकारच्या हातात हात घालत आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपू पाहते तेव्हा ओमकार म्हणतो, आता हे पुरे झालं. हे आपल्याला असं नाही चालवता येणार. तुला तुझं घर आहे आणि मला माझं लग्न करायचं आहे. तेव्हा जे झालं ते विसरून जाऊ. त्यातच आपलं हित आहे. शीतलला सुरुवातीला त्याचं हे असं म्हणणं नको वाटलं. पण पूर्ण विचारांती तिनेही ठरवलं की जे झालं ते विसरून जाण्यातच आपलं हित आहे.
आणि मग ओमकार खरंच आपला खरा हितसंबंधी आहे, असं तिला वाटू लागलं. त्याचं म्हणणं तिला पटलं. दोघांनीही जे झालं ते विसरून जाऊ असं ठरवलं. शीतलही त्याचा हात सोडते आणि परक्या माणसाच्या शेजारी बसावे तशी बसते. आपल्यात काही झालंच नाही, आपल्यात आता इथून पुढे काही होणार नाही. आपण ऑफिसात होतो तसेच सहकारी आहोत. गाडी बिघडली त्यात चार तास फुकट गेले, म्हणून आपण परत चाललो आहोत, अशी मनाशी म्हणत शीतल विश्वासदर्शक नजरेनं ओमकारकडे पाहते आणि त्याला मनापासून थँक्स म्हणते.
मृत्यू वाईट... माणसाच्या सभ्यतेचा मृत्यू वाईट... नवर्‍याच्या आपल्यावरील विश्वासाचा मृत्यू वाईट... बाईच्या नैतिकतेचा मृत्यू वाईट...
... आणि अनैतिक असले तरी नुकत्याच उमललेल्या नात्याचाही मृत्यू वाईट...


- वैभव बळीराम चाळके

9702 723 652
20 एप्रिल 2019

Friday, April 12, 2019

कथा- सहजीवन सोसायटी


ही आहे आटपाट शहरातली सहजीवन सोसायटी. हे शहर एकविसाव्या शतकातला शहर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने संपन्न असलेली ही सोसायटी... म्हणजे सोसायटीच्या गेटवर तुम्ही उभे राहिलात की तुमच्यासाठी स्वयंचलित दरवाजा उघडला जातो. तो उघडत असताना सीसीटीव्हीने तुमच्या आगमनाची खबर ऑफिसातील सुरक्षा कक्षात बसलेल्या सुरक्षारक्षकाच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर धडकते आणि एक फोटोही काढला जातो. तो विजिटर फाईलमध्ये सेव्ह केला जातो. तुम्ही आलात... डावीकडे तुम्हाला फ्रेश होण्यासाठी अतिशय स्वच्छ असे बेसीन, त्यावर तुम्हाला टॉवेल अशा सुविधा दिसतील. उजव्या बाजूला मैदान, त्याच्याशेजारी बाग आणि या दोन्ही गोष्टी आवश्यक त्या सामनाने संपन्न... शेजारी पंख्याची सुविधा आहे.... आणि एक खास वातानुकूलित कक्षहा उभारला आहे.

तुम्ही पहिल्यांदाच पाहाल तेव्हा या सोसायटीच्या अगदी प्रेमात पडाल, पण पुन्हा पुन्हा पाहत राहाल तर तुमच्या असे लक्षात येईल की, सुविधा आहेत, पण त्याचा वापर कोण करते... म्हणजे वापर होतोच पण वैयक्तिक वापर

नको... हे फारच वरवरचं सांगणे झाले... मी तुम्हाला थोडं खोलात जाऊन सांगतो

आता एवढ्या मोठ्या सोसायटीतल्या प्रत्येकाची गोष्ट सांगणे काही शक्य नाही. म्हणून मी तुम्हाला त्यातल्या काही मोजक्याच गोष्टी सांगतो.

ई विंग मधल्या देवांग कुलकर्णीच्या घरात या... हे आजोबा सैन्यातून निवृत्त झालेले आहेत. अगदी परवा पंच्याहत्तरी साजरी करेपर्यंत कडक शिस्तीने जगत होते. आजी होती तोवर छान चालले होते. आजी गेली आणि देवांग काकांचा कडकपणाही संपला. आता ते 24 तास टीव्हीसमोर बसतात. इंटरनेटवर बसून कुठल्याकुठल्या युद्धाच्या क्लिप पाहत राहतात. त्यांना दोन मुले आहेत. पण दोन्ही अमेरिकेत... मोठा त्यांच्याशी बोलत नाही... छोटा कधीतरी व्हिडिओ कॉल करतो... आणि बोलतो. हळूहळू देवांग काका थकत चालले आहेत. अलीकडे त्यांना चक्करसुद्धा येते. म्हणून ते खाली जाणे टाळतात. दिवसदिवस घरातच असतात. टीव्ही हाच त्यांचा आता जीवनसाथी आहे

नाडकर्णी काकूंच्या घरात येणार... चला... 702 बी विंग हा नाडकर्णी काकूंचा पत्ता. त्यांचा एकुलता एक मुलगा मतिमंद आहे. गेली दोन वर्षे तो जागेला खिळून आहे. काकूंचे वय आता सत्तरच्या आसपास असेल आणि चिरंजिवांचे 45- 50. चिरंजीव काहीही बोलत नाहीत. घरात लावलेल्या मोठ्या टीव्ही स्क्रीनवर गेम खेळत राहतात. तो एकच गेम गेली चार-पाच वर्षे खेळून चिरंजीवाला कंटाळा आलेला नाही. नाडकरणी काकू गरज पडली की दूरच्या नातेवाईकांपैकी कोणालातरी बोलावून घेतात. तेवढाच वेळ यांचे घर घर होते. बाकी घरात कोणी राहते आहे यावर विश्वास बसू नये अशी शांतता

चला आपण ए विंग ला सुद्धा जाऊन येऊ. इथे गोपीनाथ पवार राहतात. त्यांची दोन्ही मुलं उच्चशिक्षित आहेत. पहिला आयटीमध्ये इंजिनीयर म्हणून चांगला नावलौकिक कमवून आहे. अलीकडेच त्याचा सरकारने सत्कार केला होता. दुसरा मुलगा चित्रपटसृष्टीत एका मोठ्या मीडिया हाऊससोबत काम करतो. त्यानेही तिथे चांगले नाव कमविले आहे. एका टेलिव्हिजन चॅनेलच्या सल्लागार मंडळात त्याचा समावेश आहे. अत्यंत सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोपीनाथ पवार यांच्या घरात गोपीनाथ पवार त्यांची पत्नी व दोन मुले राहतात. पण दुर्दैवाची गोष्ट सांगू... गोपीनाथ पवारांना मायनर हार्ट अटॅक आला, त्या दिवशी घरी त्यांची बायको किंवा दोन्ही मुले हजर नव्हती. परिणामी गोपीनाथ पवार स्वतः  जाऊन ऍडमिट झाले.

सी विंग ला अकराव्या माळ्यावर शर्मा फॅमिली राहते. त्यांची दोन मुले शाळेत जातात. मिस्टर शर्मा ऑईल कंपनीत मॅनेजर आहेत आणि मिसेस शर्मा एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या प्रिन्सिपल आहेत. ही फॅमिली अनेकदा एकमेकाशी हसत-खेळत जाता येताना दिसते. त्यामुळे बेस्ट फॅमिली ऑफ सोसायटी हा अवॉर्ड त्यांना दिला जाण्याची शक्यता आहे. अडचण एकच आहे दोघेही कामावर जातात म्हणून त्यांना आपली मुले डे केअर सेंटर मध्ये ठेवावी लागतात. चांगले डे केअर सेंटर दूर असल्याने त्यांनी मुलांना घेऊन जायला एका माणसाची नेमणूक केली आहे. मात्र त्या माणसाचीच शर्मा दाम्पत्याच्या मनात भीती बसून राहिली आहे.

बी विंग पाचव्या माळ्यावर फर्नांडिस एकटा राहतो. त्याच्याकडे त्याचे काही मित्र येतात. काही वेळेला मैत्रिणी आल्याचेही सुरक्षारक्षकाने सोसायटीच्या अध्यक्षांना सांगितले आहे. फर्नांडिस ही काहीतरी विचित्र गोष्ट असल्याचे सोसायटीच्या अध्यक्षांचे मत झाले आहे.

सोसायटीतल्या सव्वादोनशे फ्लॅटमध्ये सव्वादोन हजार कथा आहेत. त्या सगळ्या सांगत बसत नाही. शेवटची एकच गोष्ट सांगतो. मागच्या महिन्यात या सहजीवन सोसायटीत रामलाल यादव नावाच्या एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. बंद फ्लॅटमध्ये हा यादव कधीतरी मरुन पडला होता. शेजाऱ्यांना वास आला म्हणून चौकशी केली गेली तेव्हा प्रेत मरून कुजले असल्याचे लक्षात आले.

हे असे झाले तर करायचे...  काय अत्याधुनिक टेक्नॉलॉजीमध्ये यावर काही उपाय आहे का... हे शोधण्याचे काम सोसायटीने एका कन्सल्टंट कंपनीला तीन लाख रुपयांचा करार करून सोपविले आहे.
-वैभव बळीराम चाळके
९७०२ ७२३ ६५२