Saturday, December 24, 2022

खेडूत मुलींचा भाग्यविधाता

 

खेडूत मुलींचा भाग्यविधाता


फुटबॉलचा महाकुंभ नुकताच साजरा झाला. जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाचा आनंद साऱ्यांनीच लुटला. दूर तिकडे दोहामध्ये फुटबॉलचे सामने रंगत असताना अवघे जग त्यात सामील झाले होते. मेस्सी... मेस्सीची गर्जना आपल्या गावखेड्यातही ऐकायला मिळाली. याच फुटबॉलने झारखंडमधील रांचीशेजारच्या कर्मा नावाच्या खेड्यातील २५० मुलींच्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. आनंद कुमार गोपे या विलक्षण माणसाचे हे आगळेवेगळे काम प्रेरणादायी आहे. खेळावरील प्रेम म्हणजे कोणी तरी जिंकल्यावर केवळ जल्लोष करणे नव्हे, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
कर्मा गावातील बहुतांश लोकसंख्या आदिवासी आहे. राज्याच्या राजधानीपासून जवळ असूनही या गावातील अनेक मुलींना स्वतंत्र जीवन जगण्याची परवानगी नाही. कुटुंबातील सदस्यांनी नेमून दिलेली कामे करण्याशिवाय त्या घराबाहेर पडत नाहीत. लहान वयातच त्यांचे विवाह केले जातात. मात्र आनंद कुमार यांनी या गावातील मुलींच्या आयुष्यात फुटबॉल खेळाच्या मदतीने नवसंजीवनी भरली आहे. माजी फुटबॉल खेळाडू आणि परवानाधारक प्रशिक्षक असलेल्या आनंद यांनी आपले जीवन ही रत्ने घडवण्यासाठी समर्पित केले आहे.
३० वर्षीय आनंद यांना लहानपणापासून फुटबॉलची आवड आहे. आई-वडिलांनी त्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले. २०१०, २०११ आणि २०१२ मध्ये रांची लीग आणि जिल्हा स्तरावरही ते खेळले आहेत; मात्र बेताच्या आर्थिक परिस्थितीने त्यांना कधीही राष्ट्रीय स्तरावर सहभागी होता आले नाही. आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी आपले कौशल्य सामाजिक कारणासाठी वापरण्याचे ठरवले आणि कर्मामधल्या मुलींना त्यांचा भाग्यविधाता लाभला. गावात अनेक मुलींचे काही हजार रुपयांच्या हुंड्यासाठी लहान वयात विवाह केले जातात आणि राजस्थान, हरियानासारख्या राज्यांत त्यांची पाठवणी केली जाते, हे पाहून आनंद यांनी या मुलींना फुटबॉल शिकवायचे ठरवले; पण हे आव्हान सोपे नव्हते. अल्पशिक्षित, अशिक्षित ग्रामस्थांना मुलींचे सक्षमीकरण पटवून देण्यात सहा महिन्यांहून अधिक काळ गेला. तेव्हा कुठे त्यांच्या पालकांनी परवानगी दिली. ऑक्टोबर २०१३ मध्ये १५ मुलींना त्यांच्या पालकांनी फुटबॉल खेळण्याची परवानगी दिली आणि या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला सुरुवात झाली; पण स्थानिक रहिवाशांनी त्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुलींनी फुटबॉल खेळणे आणि शॉर्ट्स परिधान करणे त्यांना रुचत नव्हते.
फूटबॉल खेळू लागलेल्या मुलींना आनंद यांनी शाळेत दाखल केले. त्यामुळे त्या शाळेतील फुटबॉल संघांचा भाग बनू शकल्या. हळूहळू त्यांनी आपल्या गावातील २५० हून अधिक मुली आणि ५० मुलांना प्रशिक्षण दिले. २५ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केले. आठ मुलींनी इंग्लंडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. सहा मुली डेन्मार्कमध्ये खेळल्या आहेत. अनिता कुमारी आणि सोनी मुंडा या दोघींना २०२२ च्या फिफा विश्वचषकासाठीच्या शिबिरासाठी निवडण्यात आले होते.
एका विद्यार्थिनीचा बालविवाह होण्यापासूनही त्यांनी रोखला आहे. १३ वर्षांच्या त्या मुलीला २५ हजार रुपयांसाठी राजस्थानात पाठवले जात होते. त्याच मुलीची नंतर झारखंडच्या १४ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली. पुढे ती ताजिकिस्तानमध्ये भारतीय संघासाठी खेळली.
आनंद यांचे काम केवळ अवर्णनीय असे आहे. एका बाजूला देश मंगळ मोहिमा राबवत असताना दुसऱ्या बाजूला आजही लाखो लोक दारिद्र्यात आणि परंपरांच्या बेड्यांत गुरफटलेले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या सरकारी योजना असूनही समाज अपेक्षित उंची गाठू शकलेला नाही; मात्र आनंद कुमारसारखे लोक आपल्या एकट्याच्या हिमतीवर इतिहास रचत असतात. हजारो जणांचे आयुष्य घडवतानाच शेकडोंना प्रेरणा देण्याचे काम करीत असतात.

Sunday, December 11, 2022

मला गुरू नाही ः सुलोचना चव्हाण

 मला गुरू नाही ः सुलोचना चव्हाण



‘तू माझ्या नातवासारखा आहेस. मी तुला अरेतुरेच करते, चालेल ना रे?’  त्या पहिल्या भेटीत ‘अरे’ असे म्हणून पुन्हा पुन्हा आपुलकीने ‘अरे’ म्हणत राहिल्या.


त्याबद्दल सांगतोच; पण त्याआधी ...


साधारण आठवी-नववीचे वय होते. तेव्हा आमच्या शेजाऱ्यांकडे टेपरेकॉर्डर होता आणि काही कॅसेट होत्या. त्यात सुलोचना चव्हाण यांच्या लावण्यांची कॅसेट होती. त्यामध्ये ‘नाव-गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची...’  ‘तुझ्या उसाला लागल कोल्हा... ’ अशा एकाहून एक बहारदार लावण्या होत्या. त्या मला ऐकायला आवडत. कारण इतर गायिकांच्या आवाजापेक्षा या लावण्यांचा आवाज वेगळा होता. तो ऐकावा वाटे. त्यात नुकताच वयात येत होतो. त्यामुळे डबल मिनिंग कळत असल्याचा एक वेगळाच आनंद त्या लावण्या ऐकण्यात होत होता. अर्थात घर मोठ्या संस्काराचे असल्याने या लावण्या गुणगुणता येत नसत. त्या छोट्या आवाजात ऐकता येत, पण तरीही मी त्या चोरूनच ऐकत राहिलो.


त्यानंतर तब्बल दहा वर्षानंतर दैनिक ‘नवाकाळ’मध्ये रविवार पुरवणी सांभाळायला लागलो. तेव्हा मराठीतल्या ज्या नामवंत कलावंतांची चरित्रे आली नाही त्यांच्या चरित्राच्या काही नोंदी करणारी लेखमालिका असा विचार मनात आला. संपादकांनी आनंदाने होकार दिला. मग मी तेव्हा ज्यांची चरित्रे आली नव्हती, अशा शाहीर साबळे, संगीतकार वसंत शिंदे, गीतकार अनंत पाटील अशा काही मंडळींवर त्यांच्याशी सविस्तर आणि अनेकदा बोलून दोन-तीन लेखांच्या लेखमालिका चालवल्या. याच काळात सुलोचना चव्हाण यांच्यावर लेखमालिका लिहायचे ठरले. त्यांच्या फणसवाडीतल्या घरी गेलो. पहिल्या भेटीत त्यांनी मला उपरोक्त प्रश्न विचारला. 


छोट्या दोन खोल्यांच्या घरात त्या राहत होत्या. सोबत मिस्टर चव्हाण, मुलगा विजय, त्यांची पत्नी आणि चिरंजीव असे ते छोटेसे कुटुंब. त्यांचा दुसरा मुलगा अन्यत्र राहत असे.


पणसवाडीच्या या घरात मी अनेकदा त्या लेखांच्या निमित्ताने सुलोचना चव्हाण यांना भेटलो. त्यांचे सगळे आयुष्य त्यांनी उलगडून दाखवले. केवळ माझ्या एकट्यासाठी त्यांच्या लोकप्रिय असलेल्या जवळपास सगळ्या लावण्या थोड्या थोड्या म्हणून दाखवल्या. साबळे यांनी महाराष्ट्र गीत म्हणून दाखवले होते, तेव्हा मी शहारलो होतो, तसाच अनुभव पहिल्यांदा जेव्हा त्यांनी नावगाव कशाला पुसतात गायला तेव्हा आला. 


पहिल्या बैठकीत, त्यांनी त्यांच्या गायनाची सुरुवात कशी झाली, हिंदी गाण्याच्या क्षेत्रात त्यांचा दबदबा कसा निर्माण व्हायला लागला होता, हे सर्व सांगितले. त्या मजकुरातून मी एक लेख लिहिला. त्याचे शीर्षक दिले होते, ‘मला गुरू नाही.’ तो लेख वाचून अनेकांना आश्चर्य वाटले. लेखाखाली सुलोचना चव्हाण यांचा क्रमांक होता. त्यामुळे त्यांना अनेकांनी फोन करून ‘तुम्ही गुरू नाही असे कसे म्हणता’ वगैरे प्रश्न विचारले होते. त्या मला म्हणाल्या, मी सगळ्यांना सांगितले, खरेच मला गुरू नाही. म्हणजे संगीतकारांनी त्यांची त्यांची गाणी मला समजावून सांगितली हे  खरे; पण एरवी एखाद्या गायकाला एक गुरू असतो, तसा गुरू मला नाही, असे त्यांनी मला ठासून सांगितले होते. आजही तो लेख माझ्या संग्रही आहे. शोधायचा प्रयत्न करतोय; पण नेमका कुठे ठेवलाय, ते आठवेना झाले आहे.

सुलोचना चव्हाण यांच्यासोबत या लेखांनिमित्त बैठकी झाल्या. तेव्हा माझ्याकडे नोकियाचा वनवनझिरोझिरो मोबाईल होता. स्मार्टफोन बाजारात यायचे होते. त्यामुळे त्यांचा आणि माझा एकत्र फोटो नाही. पण पहिल्या भेटीपासून त्यांच्याशी आणि त्यांच्या मिस्टरांशीही घट्ट मैत्री झाली. त्यांची मिस्टर चव्हाण कविता लिहीत. त्यांच्या एक-दोन कविता मी ‘नवाकाळ’मध्ये छापून आणल्या, तर त्यांना केवढा आनंद झाला होता!

पुढे कधीतरी मी सहजच किंवा एखादी बातमी घेण्याच्या निमित्ताने त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांचा अनेकदा फोन येत असे. दरम्यान त्यांच्या एका मुलाचा मृत्यू झाला. फार हळहळल्या होत्या. मग मिस्टर चव्हाण गेले. तेव्हाही त्यांचे माझे बोलणे झाले होते. चिरंजीव विजय आणि त्यांचा मुलगा गिरगावात अनेकदा मला भेटत.  दोन क्षण बोलल्याशिवाय बाप-बटे कधी पुढे गेले नाहीत.

आयुष्यात आपण काय काय कमावले, याचा विचार करायला लागलो की, मला जे दहा-वीस क्षण आठवतात. त्यात शाहीर साबळे यांनी माझ्यासाठी गायलेले ‘महाराष्ट्र गीत’ आणि सुलोचना चव्हाण यांनी म्हटलेली ‘नावगाव कशाला पुसतात’ ही लावणी, आणि जयंत नारळीकरांनी मला लिहिलेले पत्र अशा काही गोष्टी हमखास आठवतात.

गेल्या काही वर्षांत सुलोचना चव्हाण यांना भेटलो नाही. त्यांचा आवाज ऐकला नाही. ‘नवाकाळ’ची नोकरी सोडली आणि गिरगावात जाणेही बंद झाले; पण आजही वाटते कधीतरी त्यांचा फोन येईल आणि आपल्या त्या विशिष्ट स्वरात त्या म्हणतील, ‘अरे वैभव... ’

प्रेम कसे मिळवावे हे शिकवणारा मला गुरू नाही; पण मी ते शिकलो आहे. सुलोचना चव्हाण यांनी गुरूशिवाय गाणे अवगत केले... अगदी तसेच!

- वैभव बळीराम चाळके

९७०२ ७२ ३६ ५२


Saturday, December 3, 2022

‘भाषा जनाची भाषा मनाची’


हा जना कोण?
मराठी भाषा विभागाने मराठी भाषेच्या प्रचार-प्रसार आणि संवर्धनासाठी घोषवाक्य आणि बोधचिन्ह जाहीर केले आहे. ‘भाषा जनाची भाषा मनाची’ असे हे घोषवाक्य आहे. या वाक्यातील ‘जना’ कोण? आपल्या जनी माहीत आहे. जना माहीत नाही. जन असा शब्द मराठी भाषेत आहे. त्याचे सामान्य रूप जना होते. मात्र तो अनेक वचनी शब्द असल्याने त्या सामान्य रूपावर अनुस्वार हवा. मराठी भाषा विभागाला एवढे कळत नसेल असे आपण म्हणू शकत नाही. म्हणून हा प्रश्न पडला आहे.
- वैभव बळीराम चाळके

 

Tuesday, November 8, 2022

आपले गाव : पुस्तकांचे गाव होऊ शकते!

 आपले गाव : पुस्तकांचे गाव होऊ शकते!


- वैभव बळीराम चाळके 

9702723652


महाराष्ट्र सरकारच्या वतीने साताऱ्यातील भिलार हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून नावारूपाला आणलं गेले आहे. अलीकडेच या गावाला भेट दिल्यावर माझ्या असे लक्षात आले की, आपले सगळ्यांचीमेच गाव पुस्तकांचे गाव होऊ शकते आणि पर्यटकांना वाचनाचा, पुस्तक चाळण्याचा आनंद देऊन पर्यटनाला चालना देता येऊ शकते.


कसे?


पुस्तकांचं गाव म्हणजे काय हे आधी आपण पाहू या. महाराष्ट्र सरकारने राज्यात एक गाव पुस्तकांचे गाव म्हणून नावारूपास आणण्याचा संकल्प सोडला आणि महाबळेश्वरपासून साधन दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या भिलार गावची निवड केली. या गावातल्या 35 म-40 घरांत, हॉटेल रिसॉर्ट आणि शाळांमध्ये साहित्य प्रकारानुसार वेगवेगळी पुस्तक ठेवली म्हणजे एका शाळेत कवितांची पुस्तके, एका घरात कादंबऱ्या, एका रिसॉर्टमध्ये कविता असे 35 40 साहित्य प्रकार करून एकेका ठिकाणी त्या त्या प्रकारातील पुस्तके ठेवून ते गाव पुस्तकांचे गाव बनवले. आज महाराष्ट्रभरातीलच नव्हे, तर देशभरातील पर्यटक या गावाला आवर्जून भेट देतात. त्यातून पर्यटकांना तर आनंद मिळतोच, पण पर्यटन वाढीलाही हातभार लागतो. रोजगार मिळतो.


माझ्या 'शुद्धलेखनाची कार्यशाळा' आणि 'कागदाची करामत' या दोन कार्यक्रमांच्या निमित्ताने मी महाराष्ट्रभर ठिकठिकाणी फिरत असतो. या फिरतीच्या काळात मी आवर्जून त्या गावातील ग्रंथालय आणि पुस्तकाची संबंधित केंद्रांना आणि माणसांना भेटत असतो. अशाच एका भेटीत चिपळूणच्या 'आरण्यक'ला भेट दिली. तेथील छोटेखानी ग्रंथसंग्रह आणि त्यांचे उपक्रम मला खूपच आवडले. ते घर पुस्तकांच्या गावातल्या एका घरासारखे अत्यंत उत्तम पद्धतीने पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करणारे आहे.


पुस्तकाच्या गावात जाऊन तिथे राहून पुस्तके वाचता येतात, हे खरे असले तरी पुस्तकाच्या गावात येणारे पर्यटक हे बहुदा पुस्तके पाहायला येणारे आणि तिथे पुस्तके पाहिल्यावर त्यातील आवश्यक पुस्तके नंतर विकत घेऊन वाचणारे असे आहेत. तिथे जाऊन पुस्तके चाळावीत, त्यातली आवडतील ती नंतर विकत घ्यावी, असे साधारणपणे घडते. पुस्तके वाचनात आनंद आहे, तसाच पुस्तक पाहण्यात आनंद आहे एखाद्या विषयावरची एवढी पुस्तक उपलब्ध आहेत हे पाहणे हीसुद्धा एक आनंद पर्वणीच असते.


म्हणून मला वाटते, आपले प्रत्येकाचे गाव पुस्तकाचे गाव होऊ शकते. आपल्या गावाशेजारी जर एखादे पर्यटन स्थळ असेल तर तिथे येणारे लोक आवर्जून आपल्या गावात येतील. आपल्या पुस्तकाच्या घराला भेट देतील. यातून पर्यटन आणि व्यवसायांनाही चालना मिळू शकते.


यासाठी करायचे काय?


आपण आपल्या घरात एका छान कपाटात वेगवेगळ्या विषयांवरची हशे-पाचशे पुस्तके आणून ठेवावीत. हे काम खरं तर एकटा माणूसही करू शकेल; पण एकट्याने केले तर ते काम मोठे होताना अडचण येऊ शकते. त्यासाठी आपण आपल्या गावातल्या सगळ्यांनी मिळून ग्रामपंचायतीत किंवा आपल्या गावच्या शाळेत अशा प्रकारे लायब्ररी उघडली आणि सगळ्यांना सांगत राहिलो. गावाच्या बाहेर मुख्य रस्त्यावर त्याची एक पाटी लावली. जवळच्या पर्यटन स्थळावर त्याची माहिती देणार एखादा बोर्ड लावला तर पर्यटक आपल्या गावातल्या या ग्रंथालयाला भेट द्यायला नक्की येतील. त्यात आणखी एक मोठा फायदा म्हणजे आपल्या गावातल्या लोकांना, मुलांना वेगवेगळी पुस्तके पाहता येतील. वाचता येतील. त्यातून पुस्तकांचे एक आनंदी जग आहे आणि ते माणसाला शहाणे करते, हे आपल्या मुलांपर्यंतही पोहोचू शकेल. 


या सगळ्या उपक्रमाला लाखभरापेक्षा अधिक खर्च येणार नाही. आपली ग्रामपंचायत आणि आपले गावकरी मिळून आपणास खर्च सहज करू शकतो. एक लाखात आपले गाव पुस्तकाचे नाव होऊ शकते.


प्रतिसाद पाहून अशा घरांची संख्या वाढवता येईल. कवितांचे गाव, कादंबरीचे गाव अशीही सुरुवात करता येईल.


हा असा प्रयोग करणे कितीतरी गावांना सहज शक्य इहे.


पुस्तकावर प्रेम करणारा माणूस म्हणून कोणती पुस्तके निवडावी, ती कशी ठेवावी, याबाबत काही मार्गदर्शन हवे असेल तर मी आणि माझा छोटासा मित्रपरिवार आपल्यासोबत आहोत. 


महाराष्ट्रातील किती गाव या उपक्रमासाठी पुढे येतील?


असे काही करू इच्छिणाऱ्यांनी माझ्यावरील व्हाट्सअप क्रमांकावर जरूर संपर्क करा.


...

हा लेख वाचन प्रेमींना नक्की फॉरवर्ड करा. कदाचित त्यामुळे एक गाव पुस्तकमय होईल.

...


Monday, October 24, 2022

कबीर

 जैसे तिल में तेल है ज्यों चकमक में आग

तेरा साईं तुझमें है , तू जाग सके तो जाग


तिळात आहे तेल आणखि चकमक मध्ये आग

तसाच आहे साई अंतरी जाण कबिरा जाग ७५


कबीर

 दुरबल को न सताइये, जाकी मोटी हाय

मुई खाल की सांस से, लोह भसम होई जाय


दुर्बलास तू नको सतावू, न घे तयाची हाय

मृत चामड्याच्या श्वासाने लोह लयाला जाय

कबीर

 हिन्दू कहें मोहि राम पियारा, तुर्क कहें रहमाना,

आपस में दोउ लड़ी-लड़ी  मुए, मरम न कोउ जाना । 


हिंदु म्हणे मम राम, तुर्क मग म्हणे श्रेष्ठ रहमान

लढून मेले दोघे, नाही मर्म कोणते जाण ७२ 

Wednesday, October 19, 2022

कबीर

परबत परबत मै फिरया, नैन गवाए रोई

सो बूटी पौ नहीं, जताई जीवनी होई


थकलो शोधून पर्वतरांगा, सर्व दिशांच्या दाही

जीवनदायी जडीबुटी पण, कुठे गावली नाही

कबीर

 जग में बैरी कोई नहीं… , जो मन शीतल होय |

यह आपा तो डाल दे… , दया करे सब कोए ||


मनात ज्याच्या शांती, त्याला जगात दुश्मन नाही

अहंकार टाकता, बोलवी जो तो आपुल्या गेही

कबीर

 ऊँचे पानी ना टिके, नीचे ही ठहराय

नीचा हो सो भारी पी, ऊँचा प्यासा जाय|


उंचावरती ठरे न पाणी, सखळ तिथे ते राही

जमिनीला लाभते पोटभर, नभात साचत नाही

Tuesday, September 20, 2022

 पत्ता बोला वृक्ष से… , सुनो वृक्ष बनराय |

अब के बिछड़े न मिले… , दूर पड़ेंगे जाय ||


पान बोलले झाडाला बा, ऐक सांगते तूज

दूर चालले सोडून आता पुन्हा न कधि हितगूज

 तीर तुपक से जो लड़ै, सो तो शूर न होय ।

माया तजि भक्ति करे, सूर कहावै सोय ।।


धनुष्य तलवारीने लढतो, त्यास न म्हणती शूर

माया त्यागुन भक्त जाहला तोच खरा नरवीर

Sunday, September 4, 2022

आकाश कवेत घेणाऱ्या कविता

 आकाश कवेत घेणार्‍या कविता...


उत्तम निर्मिती मूल्य आणि तितक्याच उत्तम कविता असलेला ‘थुई थुई आभाळ’ हा कवितासंग्रह हाती आला आहे. मुलांना साहित्य-संस्कृतीची जाण यावी, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी गेली अनेक वर्षे सातत्याने अत्यंत उत्साहाने काम करणाऱ्या शिक्षक गोविंद पाटील यांचा हा संग्रह अत्यंत देखणा आणि साहित्य मूल्यांनी परिपूर्ण असा आहे. ज्येष्ठ चित्रकार पुंडलिक वझे यांच्या चित्रकारीने या संग्रहातले भावविश्व अप्रतिम साकारले आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्याचे आकाश कवेत घेणारा हा संग्रह आहे.

डॉ. राजन गवस यांनी या संग्रहाची पाठराखण करताना म्हटले आहे, ‘गोविंद पाटील हे मराठीतील प्रतिभावान कवी आहेत. त्यांच्या बालकवितांना रानशिवाराचा गंध आहे...’

‘कामकरी मुंग्या’ या कवितेत शेवटच्या दोन ओळी अशा आहेत

़़‘अपघाताचा वारा नाही

आळसाला थारा नाही’

कवी यात फक्त वर्णन करीत नाही, तर मुलांना नकळत एक संस्कारही देऊन जातो.

‘टोळ’ कवितेमध्ये शेवटच्या दोन ओळी अशा आहेत,

‘सोलापुरात असे टोळ उडत उडत आले

खिशातला माल विकून गब्बरसिंग झाले’

यात केवळ गंमत नाही, सावधानतेचा इशारा आहे.

‘मासोळी’ कवितेमध्ये सुरुवातीलाच केलेले वर्णन बहारदार आहे,

‘पाण्यातली मासोळी पोहण्यात दंग

पाण्यावर आली की चकाकते अंग’

‘ढगांची चित्रकारी’मध्ये,

‘काळे पांढरे ढग मिळून झाले गोळा

आभाळाच्या फळ्यावर चित्र काढली सोळा’

अशी सुरुवात आणि

‘चित्रकारी ढगांची बघत रहा भाऊ

शिकून नवीन काही मजा घेत जाऊ’ असा शेवट आहे.

‘देश म्हणजे’ या कवितेमध्ये,

‘देश हिरव्यागार डोंगररांगा

देश फुलांनी बहरलेल्या बागा

देश असतो सर्वांसाठी सुखाने राहण्याची सुरक्षित जागा

आपला देश जपू या

त्याच्यासाठी खपू या’

अशा विलक्षण अर्थ सांगणाऱ्या, पण साध्या, आवडतील अशा ओळी आहेत.

मुंग्यांवरची ‘सलाम मंग्यांनो’ अशी आणखी एक छान कविता या संग्रहात आहे. त्यातील या ओळी तर फारच सुरेख उतरल्या आहेत,

‘दिशा पाहून सगळं

विचार करून नीट

ऊन पाऊस वारा

पंचांग बिंच्यांग

आंधळ्या श्रद्धाना

नाहीच थारा...’

‘अजबपूर’ नावाच्या कवितेत कवी लिहितो,

‘अजबपूरची प्रजासुद्धा

अजबगजब प्रजा

निवडणुकीत पैसे खाऊन

निवडते नी राजा’

शिक्षक आणि पालकांनी हे थोडे विस्कटून सांगावे अशी कवितेची आणि कवीची अपेक्षा असेल.

‘कल्पनेच्या दुनियेत’ कवितेचा शेवट कवीने असा केला आहे,

‘कल्पनेच्या दुनियेत आज वाटेल खोटे

यातूनच लागतील ना शोध मोठे मोठे’

गोविंद पाटील हे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी प्रयत्न करणारे शिक्षक आहेत, असे जे मी वर म्हटले आहे, ते यातून अधोरेखित होताना दिसते.

मुलांच्या संवेदनशीलतेला आव्हान करण्याचे काम आपल्या नित्याच्या शिकवणीतून करणाऱ्या गोविंद पाटील यांनी ‘नवीन वासरू’ या कवितेमध्ये गाय व्यायल्याचे वर्णनसुद्धा इतके नेमके केले आहे की, मुलांना या सगळ्यातील सौंदर्य कळावे.

‘हळुवार आले बाहेर मुंडके आणि पाय

आजीने जोर लावून मोकळी केली गाय...’

कोरोना काळात शाळा व्यवस्थेला जो धक्का बसला त्याचीही नोंद या कवितासंग्रहातल्या ‘गाणी गाऊ’ नावाच्या कवितेत आढळते,

‘चिव चिव चिव

ऑनलाईन शाळेत रमेना जीव’

या ओळी मोठ्यांच्या जिव्हारी लागतात.

गोविंद पाटील यांच्या या संग्रहाने मोठ्या अपेक्षा निर्माण केल्या आहेत. येत्या काळात त्यांच्याकडून असेच दर्जेदार लेखन होत राहील आणि असेच काही संग्रह रसिकांच्या वाट्याला येतील, अशी अपेक्षा करू या. त्यांना शुभेच्छा देऊ या आणि त्यांच्या कामासाठी कृतज्ञही राहू या!

- वैभव बळीराम चाळके

९७०२७२३६५२

Monday, March 7, 2022

आट्यापाट्या

 



आट्यापाट्या: चांदणरातीचा खेळ

(होळी विशेष)

वातावरणात गारवा अद्याप बाकी असतो. आता तो माघारी परतण्याच्या बेतात असतो. अशा वेळी होळीचा सण येतो. देशभर हा सण होळी आणि धूलवड असे दोन दिवस साजरा केला जातो. कोकणात मात्र होळी अर्थात शिमगा हा साधारण महिनाभर चालणारा सण आहे. होलिकादहनाचा कार्यक्रमसुद्धा सलग नऊ ते दहा दिवस सुरू असतो.

फाल्गुन पंचमीला सुरू झालेला होलिकादहनाचा कार्यक्रम सलग दहा दिवस पौर्णिमेपर्यंत चालतो. या दहा दिवसांत चांदण्या रात्रीत कोकणात आट्यापाट्या हा खेळ रंगतो. आट्यापाट्या हा⁰ अस्सल देशी खेळ आहे. एका संतरचनेमध्ये 'आट्यापाट्या आणि लगोऱ्या गोट्या डाव मांडीला' असा उल्लेख आहे. आट्यापाट्याचा इतिहास किमान इतका तरी जुना आहे.

पहिल्या होळीच्या दिवशी सायंकाळी सहाच्या सुमारास शाळेतून परतलेले बालगोपाळ शेवरीचे झाड शोधायला निघतात. एक चांगले बारा पंधरा फूट उंचीचे झाड मिळाले की ते तोडून त्याचा शेंडा नीट बांधून, खोडावरचे काटे काढून, आणून होळीच्या माळावर उभे केले जाते. मग भाजावलीसाठी (शेताची मशागत) तोडलेल्या झाडांच्या फांद्यांच्या कवलाचे भारे आणून होळीभोवती रचले जातात. होळी घेऊन येताना आपटबार काढण्यासाठी प्रत्येक जण छानसे दिंडे (वनस्पती) घेऊन येतो. होळी उभी राहिली तिच्याभोवती कवल व गवत लावून झाले की घराघरातून घमेली भरून राख आणून ठेवली जाते.

रात्री जेवण आटपून सगळे जण होळी पेटवायला हजर होतात. होळी पेटवून होळीत दिंडे भाजून त्याचे बार - आवाज- काढले जातात आणि मग आट्यापाट्या आखायला सुरुवात होते. उभ्या आडव्या रेषांनी आट्यापाट्याचे मैदान तयार केले जाते. प्रत्येक आडव्या रेषेच्या दोन्ही टोकांना दगड ठेवले जातात आणि मग आट्यापाट्याचा खेळ सुरू होतो. धुंगाडी टाळी देतो आणि खेळाला सुरुवात होते. एकेका रेषेवर खेळाडू अडविला जातो. कधी धुगाडी आणि रेषेवरचा खेळाडू प्रतिस्पर्धी खेळाडूची कोंडी करतात. ही कोंडी फुटली नाही तर ती कुजली म्हणून हिणवले जाते. आता कोणत्याही पट्टीवर एक खेळाडू बाद झाला तर सगळा संघ बाद होतो आणि एक खेळाडू शेवटच्या पट्टीच्या पार जाऊन पुन्हा पहिल्या पट्टीपर्यंत न मरता परतू शकला तर तो 'पाणी पाजले रे' अशी हाक देऊन आपला विजय जाहीर करतो.

नवरात्रीमध्ये गरबा-दांडिया खेळायला पहिल्या काही दिवसात गर्दी कमी असते आणि उत्तरोत्तर वाढत जाते, तसाच प्रकार इथेही घडतो. चंद्र कलेकलेने वाढत असतो. चांदण्याचा प्रकाश आसमंतावर पसरून राहिलेला असतो. हे चांदणे जसजसे वाढते, तसतसा आट्यापाट्याचा उत्साह वाढतो. खेळाडू वाढू लागतात. मैदान वाढवले जाते. उत्साह टिपेला पोहोचतो. होळीसाठी आणायच्या शेवरीच्या झाडाची उंचीसुद्धा दर दिवशी काही फुटांनी वाढत राहते. शिमगा सण असा कलेकलेने मोठा होत राहतो.

शेवटच्या दिवशी सर्वात मोठी होळी अर्थात होम केला जातो. या दिवशी पंचवीस-तीस-चाळीस फुटांचे शेवरीचे झाड तोडून वाजत-गाजत आणले जाते. या होळीच्या आगमनासाठी गावातील अबालवृद्ध गर्दी करतात. अगोदरच्या छोट्या होळ्यांच्या तुलनेत या मोठ्या होळीभोवती अधिक मोठ्या प्रमाणावर सुके कवळ आणि गवत लावले जाते. या होमाची विधिवत पूजा करून मग त्याला अग्नी दिला जातो. या होमामध्ये घराघरातून नारळ अर्पण केले जातात. होम पेटत असतानाच हे भाजलेले नारळ काढून खाण्यात एक आगळी मौज असते.

या शेवटच्या दिवशी खेळाला सर्वाधिक रंग चढतो. मध्यरात्रीपर्यंत खेळ रंगत जातो. दहा दिवस खेळाकडे ढुंकूनही न पाहणारे वयस्कर लोकसुद्धा या दिवशी जुन्या आठवणींना उजाळा देत खेळात सामील होतात. हा खेळ पाहणे हासुद्धा एक आनंदाचा भाग असतो. आपला मुलगा, आपला भाऊ, आपला नवरा किंवा आपले वडील आट्यापाट्या खेळताहेत, हे मोठ्या कौतुकाने पाहिले जाते. मैदानाभोवती गावातल्या स्त्रियासुद्धा रात्री उशिरापर्यंत प्रेक्षकाच्या भूमिकेत खेळाडूंना प्रोत्साहित करीत राहतात.

दुसऱ्या दिवशी धुळवड केली जाते आणि शिमग्याला सुरुवात होते. सोंगे, कोळ्याचा नाच, खेळे, भारूड, नमन, पालखी असे शिमग्याचे नाना रंग मग भरू लागतात... आट्यापाट्या खेळून अंगात उत्साह संचारलेले लोक मग शिमग्याच्या सणात आनंदाची दिवाळी करतात!
- वैभव चाळके
000

Thursday, January 13, 2022

म्हणींचे गाणे

 म्हणींचे गाणे


थेंबे थेंबे तळे साचे... आहे ज्ञान हे मोलाचे

आपला तो बाळ्या... जरी करतो टवाळ्या?

अति तिथे माती... नको फुगवूस छाती

बैल गेला झोपा केला ... कसा येणार कामाला?

पळसाला पाने तीन... त्याला बदलणार कोण?

देश तसा वेश... आहे मोलाचा संदेश

प्रयत्नांती परमेश्वर... नाही दुसरे उत्तर

रात्र थोडी सोंगे फार... हेच जीवनाचे सार

नाव मोठे लक्षण खोटे... जाऊ नये अशा वाटे...

सार काढलेली वाणी... त्यांना म्हणतात म्हणी


- सुवर्णसुत वैभव बळीराम चाळके

१३ जानेवारी २०२२