Saturday, July 23, 2011

संतांची शिकवण

संतांची शिकवण
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असे आपण म्हणतो तेव्हा प्रामुख्याने आपल्यासमोर उभे राहतात ते भागवत धर्माची पताका खांद्यावर घेणारे ज्ञानदेव-नामदेव-एकनाथ-तुकाराम हे संत चतुष्ट्य व त्यांच्यासोबत क्षात्रतेजाची पूजा मांडणारे संत रामदास. मराठी संत साहित्याचा अभ्यासही या पाच प्रमुख संतांच्या संदर्भातच झालेला आढळतो. जनसामान्यातही प्रामुख्याने जर कोणत्या संतांची शिकवण मोठ्या प्रमाणात मानली जात असेल तर या पाच संतांचीच होय.
या पाच संतांपैकी ज्ञानेश्वर, नामदेव आणि तुकाराम हे विठ्ठलभक्त वारकरी होते. एकनाथ महाराज हे दत्त संप्रदायी पण पुढे वारकरी संप्रदायाला बळकटी देण्याचे काम करणारे आणि एकूण समाजातली दरी मिटवत समन्वय साधू इच्छिणारे! तर संत रामदास क्षात्रधर्माची उपासना आणि प्रचार प्रसार करणारे!
या पाच संतांनी आणि त्यांच्या भोवतींच्या संत मंडळींनी आपल्याला कोणती शिकवण दिली. कोणकोणत्या बाबतीत आजही ती शिकवण आपल्याला दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरत आली आहे. यासंदर्भात संतसाहित्याचा घेतलेला हा धावता आढावा. हा लेखनप्रपंच पदरचे काही सांगण्यासाठीचा नव्हे तर संत साहित्याने दिलेले धडे कोणते याची उजळणी करण्यासाठी केलेला प्रयत्न होय.
संत ज्ञानदेवांपासून संत तुकारामांपर्यंत भागवत धर्माची कशी उभारणी केली हे संत बहिणाबाईंनी नेमक्या शब्दांत एका अभंगात सांगितले आहे.
ज्ञानदेवाने भागवत धर्माचा तर पाया रचलाच, पण त्याच वेळी प्राकृत भाषेचा, तत्त्वज्ञानाचा, भाषाविज्ञानाचा व मराठी काव्याचाही पाया रचला आहे. आज या कोणत्याही क्षेत्रात नव्या विचारांची मांडणी करावयाची असेल तर "ज्ञानेश्वरी'स वगळून चालत नाही. शिवाय योग आणि अध्यात्माचा कळस गाठण्याची कमालही ज्ञानेश्वरांनी करून दाखविली. म्हणूनच साधारण सातशे-आठशे वर्षे विचारवंत आणि अभ्यासक ज्ञानेश्वरीचा डोह पुन्हा पुन्हा उपसून पाहत आहेत, त्याचा थांग अजून लागलेला नाही. तो उपसावा तो तो नवा अर्थ लाभू लागतो.
ज्ञानदेवाने स्वभाषेचा अभिमान बाळगण्याची आणि तो वाढविण्याची शिकवण दिली. आज जगभरात हजारो भाषांपुढे जो प्रश्न आहे त्याचे चोख उत्तर ज्ञानेश्वर माऊलीने देऊन ठेवले आहे. माझी मराठी अमृताशी पैजा जिंकणारी आहे असे माऊलीने लिहून ठेवले आहे, पण आपण त्यांच्या या शिकवणुकीकडे दुर्लक्ष केेले आणि इंग्रजीच्या गुलामीचा पट्टा गळ्यात घालून श्र्वान झालो. त्याच्याच प्रामाणिकपणाने इंग्रज मालकाशी प्रामाणिक राहिलो आहोत.
ज्ञानदेवांनी चिद्‌विलास वादाची, म्हणजे चराचरात चैतन्य भरलेले आहे या नव्या तत्त्वज्ञानाची मांडणी करून "हे विश्वचि माझे घर' म्हटले आहे. स्वामी विवेकानंदांनी जगाला विश्वबंधुत्वाची शिकवण देण्यापूर्वी सहाशे वर्षे ज्ञानेश्वरांनी विश्र्वबंधुत्वाची शिकवण दिली होती.
ज्ञानेश्वरांच्या निमित्ताने मराठी भाषेस आणि मराठी मुलुखास एक ज्ञानसूर्य लाभला आहे. ज्ञानेश्वरांनी काय शिकवण दिली असे विचारून उत्तरे देत बसण्यापेक्षा त्यांनी काय शिकवले नाही? असाच प्रश्न अधिक सयुक्तिक ठरावा एवढे त्यांचे कार्य सूर्यतेजी आहे.
भावनेचा ओलावा संत नामदेव
संत नामदेव हे ज्ञानेश्र्वरांचे समकालीन होय. "नाचू कीर्तनाचे रंगी। नामदीप लावू जगी' म्हणत नामसंप्रदायाचा प्रचार, प्रसार करणारे नामदेव म्हणजे मराठीतील पहिले भावकवी होत. नामदेवांच्या अभंगात भावनेला मोठे महत्व आहे. साध्या सोप्या भाषेत, बहारदार कल्पना करीत नामदेवांनी, रसाळ भावनेत बुडवून उपदेश केला. म्हणूनच उपरोक्त पाच संतांपैकी सर्वमुखी होण्याचा मान तुकारामांबरोबर नामदेवांना मिळाला. आपल्याकडे चरित्र लेखनाची मोठी परंपरा नाही. पण महानुभाव पंथात महिपतीने आणि वारकरी पंथात नामदेवांनी चरित्रलेखनाचे महत्व जाणून चरित्रलेखन केलेले आढळते. ज्ञानदेवादी संतांची चरित्रे आपल्याला नामदेवांच्यामुळेच प्राप्त झाली. नामदेव नामाच्या प्रसारासाठी उत्तरेला पंजाबपर्यंत गेले. शिखांच्या गुरुग्रंथसाहेबमध्ये त्यांच्या पदांचा समावेश आढळतो. म्हणजे नामदेवाच्या उपदेशाचे महत्त्व थेट पंजाबपर्यंत आणि शिख धर्मापर्यंत पोहचलेले आढळले. ज्ञानदेवांनी बुध्दीचे अचाट सामर्थ्य दाखविले पण देव हा भावनेने जाणायचा असतो असे म्हटले. नामदेवांचे सारे जीवित आणि कार्य त्या उदात्त, निर्मळ भावनेशीच जोडलेले आहे. भावनेचं बळ नामदेवांनी नेमके जाणले. नामदेव देवाकडेही काय मागतात पाहा-
नामा म्हणे देवा तुमचे नलगे मज काही।
प्रेम असो दया हृदयी, आपुल्या लागतसे पायी।
नामदेवांचा मार्ग भावनेचा होता. म्हणूनच त्यांनी बाळगोपाळ्यांच्या भावना नेमक्या जाणत बोबड्या बोलांच्या रचना लिहिल्या-
कुत्ना थमाल ले धमाल आपुल्या गाई
आम्ही अपुल्या घलासि जातो भाई
ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम आणि रामदास यांच्या तुलनेत रामदेवांचा उपदेश अधिक प्रेमाने अधिक आपुलकीने केलेला वाटतो. आईने मुलाला सांगावे तसे नामदेव गोड शब्दांत बोलतात. म्हणूनच कदाचित नामदेवांचा धाक वाटत नाही. त्यांच्याबद्दल प्रेम वाटते आणि उत्तरोत्तर ते वाढत जाते.
समन्वयवादी संत एकनाथ
या कवी पंचकातील तिसरे कवी संत एकनाथ होय. संत एकनाथांचे अवघे चरित्र आणि लेखन ही समस्त समाजासाठी मोठी शिकवण आहे. एकनाथ महाराजांचे एकाच शब्दात वर्णन करायचे तर "समन्वयवादी' असे त्यांना म्हणता येईल. संत ज्ञानेश्वरांनी नाना क्षेत्रांची पायाभरणी केली तसाच संत एकनाथांनी नाना क्षेत्रांचा समन्वय साधला. समन्वय हेच अंतिम कल्याणाचे तत्त्व आहे, हा उपदेश, ही शिकवण संत एकनाथांनी दिली.
संत एकनाथ परंपरेने दत्त संप्रदायी होते. पण पुढे त्यांनी वारकरी संप्रदायाशी जोडून घेतले. संत एकनाथ स्वतः संस्कृताचे पंडित होते. पण त्यांनी आपल्या रचना प्राकृतात केल्या. भागवतासारखा अभिजात ग्रंथ निर्माण करतानाच सर्वसामान्यांच्या भाषेत भारुडे रचली. एका बाजूला भागवताच्या एकादशस्कंधावर ओवीबद्दल टीका रचून मूळ अर्थ सोपा करून दाखवला तर भारुडे रचताना भाषा सर्वसामान्यांची वापरून रूपके घडविली. म्हणजे जे अवघड ते सोपे केले आणि सोपेच समजणाऱ्यांना त्यांच्यात भाषेत रूपके घडवून अवघड समजून दिले. दलित-सवर्ण समन्वयासाठी एकाहून एक धाडसी निर्णय घेतले. एवढेच नव्हे तर गंगाजल तहानलेल्या गाढवास पाजून ज्ञानेश्वरांच्या चिद्‌विलासवादाचा रोकडा प्रयत्न आणून दिला.
संस्कृत भाषा देवे केली।
मग प्राकृत काय चोरापासोनी झाली?
असा थेट प्रश्न विचारून पंडितांना प्राकृत भाषेचे महत्त्व पटवून दिले, पण त्याच वेळी त्यांनी संस्कृत व तत्कालीन पारशी भाषेवर चुकूनही अन्याय केला नाही. एकनाथांनी भारुडांमधून असा उपदेश करून ठेवला आहे की, तो नित्यनूतन अर्थ देत राहतो. शेकडो वर्षे या भारुडांनी समाजावर गारूड केले आहे. मग ते विंचू चावला असेल किंवा नवरा नको ग बाई असेल. एकनाथांनी अध्यात्माच्या मार्गावर प्रकाशाचे दिवे ठेवलेच, पण प्रपंचाच्या मार्गावरही उपदेशाचा प्रकाश टाकलेला दिसतो. प्रपंच हाच परमार्थ करण्याचे अनोखे कार्य त्यांनी करून दाखविले आणि सर्वसामान्यांना अध्यात्माचा सोपा, सुकर मार्ग दाखविला. अशाप्रकारे नाना गोष्टींचा समन्वय-सुवर्णमध साधल्यानेच कल्याण साधू शकते, अशी एक महत्त्वपूर्ण शिकवण नाथांनी दिलेली दिसते.
जगद्‌गुरू संत तुकाराम
"ज्ञानदेवे रचिला पाया। तुका झालासे कळस' असे बहिणाबाईने म्हटले आहे. ज्ञानदेवांनी पाया रचला. त्यावर तुकोबांनी कळस चढवला, असे म्हटले जाते. महाराष्ट्राचा उल्लेखच आपण "ग्यानबा-तुकारामां'चा महाराष्ट्र असा करतो. आजही जनसमान्यांच्या मुखातून तुकाराम महाराजांच्या हजारो ओळी दरक्षणी ऐकायला मिळतात. सर्वसामान्यांत सर्वाधिक लोकप्रिय असलेला संतकवी म्हणजे तुकाराम होय. साधीसोपी भाषा, आंतरिक तळमळ, कधी मेणाहुनी मऊ तर कधी वज्राहुनी कठीण अशी विशेषणे असल्यानेच तुकारामांचे अभंग सदासर्वकाळ समाजात प्रिय होऊन राहिले आहेत. तुकारामांची कितीतरी वचने रोज व्यवहारात सुभाषितांसारखी वापरली जातात.
तुकोबा सर्वाधिक प्रिय होण्याचे कारण तो सर्वसामान्यांसारखा प्रापंचिक दुःखात भरडून निघाला. त्याला संतत्व प्राप्त झाले ते सांसरिक व्यापाच्या जंजाळात "रात्रंदिवस आम्हा युद्धाचे प्रसंग' आले ते पार केल्यावरच! म्हणूनच तुकारामाच्या अभंगात एकाच वेळी सांसारिक आणि पारमार्थिक मार्गावर चालणाऱ्यांना वाट दाखविणारी वचने आढळतात. तुकाराम महाराज "सुख जवापाडे। दुःख पर्वताएवढे' असे जीवनाचे सार सांगतात. पण म्हणून ते रडत बसत नाहीत. तर सुखाचा पुरेपूर आनंद घेतात. अपार दुःख असले तरी आनंद निर्भेळपणे अनुभवता येतो, हे मोठेच सत्य तुकारामांनी मांडून ठेवले आहे. त्यांनीच आपल्या अभंगात-
आनंदाच्या डोही । आनंद तरंग ।।
आनंदची अंग। आनंदाचे ।।
असे म्हणून ठेवले आहे. तुकारामांनी साधारण साडेचार हजार अभंग लिहिले. त्या अभंगसागरात सुभाषितांची एकाहून एक सरस मोती आढळतात.
समर्थ रामदास
जेव्हा महाराष्ट्र आणि अवघा देश परकीय आक्रमणांनी रसातळाला गेला होता. तेव्हा मनामनांत राष्ट्रतेज जागृत करण्याचे काम करणारे समर्थ रामदास हे या कविपंचकातील पाचवे कवी होय. समर्थ रामदासांनी दुबळ्या झालेल्या मनांसमोर धनुर्धर रामाचा आदर्श उभा केला. गावोगाव मारुतीरायाची स्थापना करून तरुणांना राष्ट्रहितार्थ शरीर कमविण्याची प्रेरणा दिली.
"दासबोधा'ची रचना करून त्यांनी अध्यात्माबरोबरच राजकारण, समाजकारण, बुद्धिवाद, प्रयत्नवाद यासारख्या भौतिक व राष्ट्रहितपोषक विषयांवर आपली मते मांडली. आज एकविसाव्या शतकातही व्यवस्थापनासारख्या विषयावरची रामदासांची मते आणि त्यांची शिकवणी मार्गदर्शक ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. मनाच्या श्लोकातील एकेक ओळ ही जणू अनुभवसिद्ध सुभाषितेच आहेत. रामदासांच्या एकूण वाङ्‌मयात जागोजाग अशी सुभाषिते, वचने आढळतात. "यत्न तो देव जाणावा', "मरे एक त्याचा । दुजा शोक वाहे । अकस्मात तोही पुढे जात आहे' अशी कितीतरी वचने सांगता येतील. "दासबोध' हा समर्थ संप्रदायात ग्रंथराज मानला जातो. आजही लाखो लोक या दासबोधातील बोधामृताचे अखंड प्राशन करून परमार्थ आणि प्रपंच या दोन्ही क्षेत्रांत प्रगती साधताना दिसतात. आध्यात्मिक प्रगतीबरोबरच, भौतिक हित आणि राष्ट्रहित यासाठी रामदासांनी केलेला उपदेश, त्यांनी केलेले कार्य हे अत्यंत मोलाचे आहे. रामदासांचे तेच मोठे वैशिष्ट्य आहे. त्यांची करुणाष्टके, त्यांचे मनाचे श्लोक, त्यांचा ग्रंथराज दासबोध आणि इतर काव्ये ही शेकडो वर्षे जनसामान्यांपासून राजकर्त्यांपर्यंत साऱ्यांनाच हितोपदेश करीत आली आहेत.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे किंवा आम्हा मराठीजनांना संताचा वारसा लाभला आहे असे आपण म्हणतो, तेव्हा या संतांच्या विचारांनी समृद्ध झालेल्या सांस्कृतिक वातावरणाविषयी, त्यांच्या शिकवणीविषयीच आपण बोलत असतो. जगाच्या पाठीवर एकाच प्रदेशात इतके मोठे आणि इतके अधिक संत एकाच भूमीत जन्मास आल्याचे दुसरे उदाहरण नाही.
आपल्याकडे पुष्कळ संतसाहित्य उपलब्ध आहे. ग्रंथरूपाने उपलब्ध आहे. पण आजही बहुतांश लोकांमध्ये संतांची शिकवण पोहोचलेली आहे किंवा पोहचते आहे ती मौखिक परंपरेतूनच होय. गावोगाव होणारी भजने, भारुडे आणि अलीकडे आलेला रेकॉर्ड किंवा तत्सम साधनांतून प्रसारित होणारी संतरचना हीच संत शिकवण जनमानसात पोहचवणारी प्रमुख साधने आहेत.
म्हणूनच संतविचार आणि संतांचा शिकवण ही अभ्यासातून मिळविलेली नव्हे तर ती संस्कारातून थेट रक्तात मिसळलेली आहे. हेच आपले भाग्य आणि हीच आपली संस्कृती होय.
मनाचे श्लोक, हरिपाठ, तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरी आणि दासबोध हे ग्रंथ इथल्या घराघरांत आढळतात. ते ऐकत आणि वाचतच आपण लहानाचे मोठे होतो. एकनाथांच्या गौळणी आणि भारुडे, नामदेवांचे अभंग यांच्यात तल्लीन होत आपण रात्री जागवलेल्या असतात हे खरेच, पण त्यापुढे जाऊन या महान संतांचे इतर साहित्यही आपण आवर्जून वाचायला हवे. नव्या युगाला सामोरे जाताना ते आपल्याला नक्कीच साह्यभूत ठरेल. संतमंडळींनी नेहमीच नव्याचा विचार केला. नव्या माणसासाठी नवी शिकवण दिली. त्यांचे विचार इथून पुढेही सदैव मार्गदर्शक ठरतील, यात शंकेला जागा नाही.
-वैभव बळीराम चाळके
9702723652.

Friday, May 20, 2011

सुखाच्या दिशेने

सुखाच्या दिशेने

लहानपणी आई रागवली, तिने मारलं की आपल्याला त्या पारतंत्र्याचा प्रचंड राग येतो. आपल्याला स्वतःचं काही स्वातंत्र्य नाही. कशाला हे ठरवून दिलेलं आयुष्य जगतोय आपण! असं वाटून घर सोडण्याचे किंवा कधी तरी चक्क आत्महत्येचेच विचार मनात येतात. पण साधारण पंधरावीस वर्षे उलटली की तेच घर नावाचे "पारतंत्र्य' हवेहवेसे वाटू लागते. मग आपण लग्न करतो. मूल होऊ देतो. कुणीही कोणाला गुलाम बनवणे केव्हाही वाईटच. त्याचा सदैव निषेधच करायला हवा. पण जी गुलामी स्वखुशीने स्वीकारली जाते त्यात एक लोभसपणा आहे. (निष्ठावान, दास वगैरे शब्दांनी आपण तिचा अभिमानाने उल्लेख करतो) हा लोभसपणा ध्यानी आला की ओठावर शब्द येतात- "मी तुझा गुलाम मर्जीने! हा तुला सलाम मर्जीने!!' हिंदी कवयित्री संत मीराबाई म्हणते- "मैं तो अपने नारायण की आपही हो गई दासी रे।' ही अशी गुलामी पत्करावी. इतकी मोठी आणि प्रेमळ माणसे लाभणे हे केवढे तरी मोठे सुखच होय.
सुखाची दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुख प्रत्येकाचं वेगळं. एकाला ज्यात सुख मिळेल त्यात दुसऱ्याला मिळणार नाही. म्हणून जर आपल्याला सुखी व्हायचे असेल तर आपण इतरांसारखं जगून चालणार नाही. आपण इतरांसारखे जगून सुखी व्हायचे म्हटले तर ते अवघड आहे. आपल्याला आपला मार्ग शोधायला हवा. प्रसंगी तो बांधायला हवा. मेहनतीने बांधायला हवा. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. इतरांच्या मार्गाने जायचे नाही. पण त्यांच्या मार्गाला कमीही लेखायचे नाही. आपण निवडलेला सुखाचा मार्ग हा एकमेव मार्ग नव्हे. तो आपत्यासाठी सुखाचा मार्ग आहे. सचिन तेंडुलकर फार शिकला नाही. पण तरीही तो महान ठरला. कारण त्याने आपल्या सुखाचा मार्ग निवडला. घडवला. गंमत पाहा, अब्जोपती असलेला सचिन आजही मैदानात घाम गाळतो. का माहीत आहे? कारण तोच त्याच्या सुखाचा मार्ग आहे.
काही वर्षांपूर्वी एक पुस्तक वाचले होते. दोन मराठी वकिलांनी ते लिहिले होते. त्यात त्यांनी "मानवाभिमुखतेचे शास्त्र' ही कल्पना मांडली होती. त्यात त्यांनी म्हटलं आहे, " तुम्ही असे जगा की त्यामुळे इतरांना जगण्यास मदत होईल. थोडक्यात जगताना इतरांचा विचार करा. प्रत्येकजण असा इतरांचा विचार करू लागला तर अवघं जग सुंदर होऊन जाईल. म्हणजे तुम्ही तुमच्या संस्थामध्ये दिशादर्शक व विभागदर्शक पाट्या लावा. शहराचे नियोजन असे करा की बाहेरून आलेला इसम सहज वावरू शकेल. घर असे लावा की कोणती गोष्ट कोठे आहे ते कोणलाही सहज कळले.' त्यांनी मांडलेली कल्पना ही आदर्शची कल्पना होती. आदर्श सहसा हाती येत नाही. पण त्या दिशेने सुरू झालेला प्रवास आपले आयुष्य नक्कीच आनंदी करू शकतो. अनेक वर्षे छोट्या छोट्या पातळ्यांवर हा प्रयोग करून पाहिला आणि तो अमाप आनंद देणारा ठरला आहे. एखाद्याला माहीत नसलेला मार्ग दाखवणे, एखाद्याला गाडीत चढायला- उतरायला मदत करणे, एखाद्या अंधाला रस्ता ओलांडायला करण्यासाठी मदत करणे, एखाद्या आजोबांना आधाराला हात देणे या गोष्टीही अमाप सुख देणाऱ्या-मिळविणाऱ्या ठरू शकतात.
एखाद्याच्या मनाला उभारी येईल असे दोन शब्द बोललात तरी तो "सुखमय' होऊ शकतो. पण आपल्याकडे असे प्रोत्साहनपर शब्द उच्चारण्यापेक्षा एखाद्याला वास्तवाची कठोर जाणीव देण्याचं "पुण्यकर्म' करणाऱ्यांची सख्या जास्त. दुर्दैवाने "आपल्या वाट्यास आले तेच वास्तव' ही आपली कल्पना त्या दुसऱ्याच्या माथी मारतो. एका वक्त्याने या स्वभावाच्या मंडळींच्या अखंड "यज्ञाला' "दुःखी आत्मा मंडळ' नाव ठेवल्याचे ऐकले होते आणि हे दुःखी आत्मामंडळ जगभर कार्यरत असून नेटवर्क मार्केटिंग करणारी ही सर्वात मोठी कंपनी असल्याचे त्याने म्हटले होते. आपल्या स्पष्टीकरणात तो वक्ता म्हणाला होता, कोणीही काही चागले काम करू लागला की त्याला या दुःखी आत्मा मंडळाचा माणूस भेटतो आणि म्हणतो, हे शक्य नाही रे. तुझ्या सारखे छप्पन्न जण पाहिले करेन म्हणणारे. एकालाही जमले नाही. तू उगाच नाही ती स्वप्ने पाहू नकोस, गप्प मळलेल्या वाटेने चाल! त्याच्या या वास्तवाच्या कडव्या विचाराने बिचारा पुढे टाकलेले पाऊल मागे घेतो आणि स्वत: त्या दु:खी आत्मा मंडळाचा सभासद होऊन इतरांना मागे खेचत राहतो. तुम्ही या दु:खी आत्मा मंडळाकडे दुर्लक्ष करायला शिका .
सुखाच्या दिशेने जाताना आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट करायला हवी ती म्हणजे पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन योग्य असायला हवा. आपण पैशाकडे दोन टोकाच्या भूमिकेत पाहतो. एकतर अतिगर्वाने पैसा कुत्राही खात नाही किंवा पैसा काय वेश्याही कमवते! अशी वाक्ये उच्चारली जातात किंवा पैसा पैशाकडे जातो बाबा! किंवा आमच्या नशिबात नाही तर येणार कुठे आमच्याकडे पैसा ही वाक्ये उच्चारली जातात. पैशाविषयी हा दृष्टिकोन वाईट आहे. पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे. पण जगायला पैसा लागतो. पैशाने सगळे प्रश्न सुटत नाहीत, पण अनेक प्रश्न केवळ पैशानेच सुटतात हे आपण समजून घेतले पाहिजे. खूप पैसा कमविणे वाईट नसते. वाईट मार्गाने कमविणे वाईट असते. दारिद्र्याचं समर्थन करण्यात कोणताच पुरुषार्थ नाही.
इथे आणखी एक गोष्ट म्हणजे आपण स्वत:ला , स्वत:च्या क्षमतांना आणि मर्यादांना ओळखायला हवे. आपली इतरांबरोबर तुलना न करता स्वत:चा मार्ग निवडायला हवा. तुमचा शेजारी, नातेवाईक तुमच्यासारखा नसतो. म्हणून त्याचे घर, कमाई, जीवन तुमच्यासारखे नसते हे ओळखा. तुलना अनेकदा दु:खाचे कारण होते. ती टाळा. रोज स्वत:ला स्वत:पेक्षा उंच करा. इतरांपेक्षा उंच होण्याचा अट्टाहास सोडा.
आहे ते अनुभवा! गृहित धरू नका! आपण अनेक गोष्टी गृहित धरतो. मग त्यापासून मिळणारे सुख आपल्याला आनंदच देईनासे होते. मी अनेकांना विचारतो, उन्हातून घरी गेल्यावर, फ्रिजचे पाणी पितांना आपण सुखी आहोत असे वाटते का रे? मला कुणीही याचें उत्तर "हो' असे देत नाही. वाटते ना, बरे वाटते, त्यात काय? असेच उद्‌गार बाहेर पडतात. हे झाले एक उदाहरण. आपण सुखसोयी खरेदी करतो पण त्याचे सुखच घेत नाही. हे सगळे सुख गृहित धरल्यामुळे उणे होते. ते तुम्ही टाळा. झेन संप्रदायात टी ड्रिकिंग नावाचा एक ध्यानप्रकार आहे. त्याचा अर्थ हाती आलेल सुख सर्वार्थाने अनुभवणे तुम्ही हा प्रकार करून पाहा.
आपल्या सुखाआड येणारी आणखी एक गोष्ट म्हणजे आजार. कोणताही आजार आपल्याला त्रास देतोच. पण त्या आजाराला कवटाळून बसण्यात अनेकजण धन्यता मानतात. आजार वेळीच दूर करण्याचा प्रयत्न करा. तो आज आहे आणि उद्या जाणार आहे या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहा. एका पुस्तकात एक वाक्य वाचले, आजाराचे दहन करता आले नाही तर दहन करायला शिका. त्याचा अर्थ तो आजार जात नाही. त्याला सोबत घेऊन आनंदाने कसे जगता येईल ते पाहा. आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ लेखकाने, दर आठवड्याला डायलेसिस घेत संपूर्ण भारतभ्रमण करणाऱ्या एका जिगरबाज महिलेचे उदाहरण दिले आहे. आपल्या कोणत्याही आजारापेक्षा आपली आजाराची कल्पनाच अनेकदा खूप वाईट असते. तशी वाईट कल्पना करणे सोडायला हवे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुखाच्या दिशेने जाताना आपल्या वाटेवर आपण स्वत:च प्रकाश टाकायला हवा. दुसऱ्याने टाकलेल्या प्रकाशावर विसंबून भागायचे नाही. आपली वाट शोधा. स्वत:च्या बुध्दीच्या तेजाचेे दीप त्या वाटेच्या दोन्ही बाजूस उजळवा आणि दिमाखात चालत राहा. सुखाच्या दिशेने जाण्यासाठी तुमच्याच या सह प्रवाशाच्या तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा!
- वैभव बळीराम चाळके

Tuesday, May 17, 2011

ऐकण्याची कला आत्मसात करायलाच हवी, तिने चुंबिलेली लिलीची फुले

ऐकण्याची कला आत्मसात करायलाच हवी!

एका छोट्याशा कंपनीतील ही गोष्ट आहे. त्या कंपनीत साधारण 15-20 कर्मचारी काम करत होते. विजय हा त्यातीलच एक. बऱ्यापैकी हुशार. कामसू सदैव तत्पर असणारा, पण आठवड्यातून एकदा तरी त्याचे सर त्याला सर्वांसमोर झापायचे. मग तो जिव्हारी लागल्यासारखा तडफडायचा आणि "माणसाची किंमतच नाही! कोण मेहनत करतो ते दिसतच नाही! माझे नशीबच फुटके' असे काहीबाही बरळत राहायचा. पुन्हा दुसऱ्या दिवशी आपण कसे कामासाठी सदैव तत्पर असतो, हे दाखविण्यासाठी पुढेपुढे करू लागायचा. सरांचा कालचा राग जावा म्हणून आज प्रयत्न करू लागायचा. सरांनी एखादे काम सांगितले की, खूष होऊन ते उत्साहाने करायचा, परंतु त्यात हमखास चूक करून ठेवायचा आणि पुन्हा ओरडा खायचा.
कधी सर सांगायचे, "एक टेबल आणि दोन खुर्च्या हव्या आहेत आपल्याला, जरा किमती काढून ये.' दुसऱ्या दिवशी हा एखाद्या फर्निचर मालकालाच ऑफिसात हजर करायचा. त्या फर्निचरवाल्याला घरचा रस्ता दाखविल्यावर सर विजयला झापायचे, "तुला किमती काढायला सांगितल्या होत्या. फर्निचरवाल्याला बोलावून आणायला नव्हे.' मग याची बोलती बंद व्हायची. चेहरा कसनुसा व्हायचा. कधी सर सांगायचे, "तुझ्या घरच्या वाटेवर रद्दीवाला आहे ना, त्याला रद्दी घेऊन जायला सांग.' दुसऱ्या दिवशी रद्दीवाला दोन मुलांना घेऊन यायचा. सर रद्दीवाल्याला म्हणायचे,"ही दोन मुले कशाला घेऊन आला आहेस? दहा किलो तर रद्दी आहे अवघी!' तर तो म्हणायचा, " साहेब जुन्या खुर्च्या, टेबल आणि फॅन पण न्यायचा आहे ना?' "कोणी सांगितले तुला?' सर त्याच्यावर वैतागायचे. मग आपण त्याला उगाच बडबडतोय हे लक्षात येऊन, विजयला बोलावून त्या रद्दीवाल्यासमोर त्याची रद्दी करून टाकायचे. मग विजय संबंध दिवस वैतागत राहायचा. सायंकाळी सुटल्यावर तसाच वैतागत घरी जायचा आणि घरच्यांचीही सायंकाळ खराब करून टाकायचा.
आपल्या इज्जतीचे पार पोतेरे करून घेतले होते त्याने. त्याची चूक एकच होती- त्याला ऐकण्याची कला अवगत नव्हती. म्हणजे त्याला दोन कान होते, ते दोन्ही कान तांत्रिकदृष्ट्या सक्षम होते. पण ऐकणे- उत्तम ऐकणे ही एक कला आहे याची त्याला जाणीव नव्हती. तो कोणाचेही संपूर्ण ऐकत नसे. संपूर्ण लक्ष देऊन तर त्याने कधीच काही ऐकलेले नाही. त्याचा दोष हा एवढाच होता. पण तोच फार मोठा होता. त्याच्या एका सहकाऱ्याने त्याला हे सांगण्याचा एक-दोनदा प्रयत्न केला, तर तो त्या सहकाऱ्यावरच वैतागला आणि म्हणाला,"नीट ऐकून घेऊ म्हणजे काय? बोलणाऱ्याच्या तोंडाला कान लावू?' त्यावर तो सहकारी काहीच बोलला नाही. पुढे अनेक दिवस विजयचा घोर अपमान होत असताना "आजही नीट न ऐकल्यामुळेच!' याची तो सहकारी खात्री करून घेत असे.
मराठीतले एक नामवंत साहित्यिक पुण्यात राहत होते. त्यांच्या बाबतीतली एक गमतीदार गोष्ट आहे. काही दिवस ते आजारी होते. त्याच दरम्यान मुंबईचा एक पत्रकार पुण्यात आला होता. जाता जाता त्या साहित्यिकांना भेटण्यासाठी तो त्यांच्या घरी गेला. साहित्यिक घरी नव्हते. म्हणून त्याने शेजारी चौकशी केली. शेजारी म्हणाला,"ते गेले!' पत्रकाराने घाईघाईने मुंबई गाठली आणि "सुप्रसिद्ध साहित्यिक अमुकतमुक यांचे निधन' अशी बातमी छापून टाकली. गंमत म्हणजे "ते गेले!' असे सांगताना त्या शेजाऱ्याला "ते बाहेरगावी गेले' असे सांगायचे होते.
नीट बोलले पाहिजे, हे खरे पण दुसऱ्याने कसे बोलावे यावर आपले नियंत्रण नसते. म्हणून आपण नीट ऐकले पाहिजे.म्हणजे अशा जीवघेण्या गमतीजमती होणार नाहीत. बरे हे ऐकणे म्हणजे समोरच्याचे फक्त शब्दच ऐकणे नव्हे तर त्याचे म्हणणे ऐकणे होय. दरवेळी नुसते शब्द ऐकून बोलणाऱ्याला काय म्हणायचे आहे, हे समजून घेता येत नाही. त्यासाठी त्या शब्दांचा सूर त्यासोबत होणारी शरीराची हालचाल समजून घ्यायला हवी, "शहाणा आहेस!' हे एकच वाक्य आपण "शहाणे माझे बाळ ते!' आणि "मूर्ख कुठला!' अशा दोन्हीही अर्थाने वापरतो नाही का? "तो काल सकाळी कोल्हापूरहून आला.' हे एकच वाक्य माणूस कसा उच्चारतो त्याप्रमाणे बदलत जाते. समजा एखाद्याने "तो' वर जोर दिला तर त्याचा अर्थ "तो' आला "हा' आला नाही. एखाद्याने "काल'वर जोर दिला, तर "काल'आला, "आज' आला नाही. आणि "सकाळी'वर जोर दिला तर "सकाळी' आला "दुपारी' नव्हे असा अर्थ निघतो. "कोल्हापूर' आणि "आला' यावर जोर असेल तर अनुक्रमे मुंबई व दिल्लीवरून नव्हे तर "कोल्हापूर'हून आला आणि "गेला' नव्हे तर "आला' हे प्रामुख्याने सांगायचे असते.
आणखी एक गंमतीची गोष्ट अशी आहे. एका सकाळी एक पहेलवान जवळच्या टेकडीवर जाणाऱ्या रस्त्याने धावण्याचा व्यायाम करीत असतो, वाटेत त्याला एक माणूस गाडी दरीत ढकलत असल्याचे दिसते. त्या किरकोळ शरीरयष्टी असलेल्या माणसाला गाडी काही जागची हलत नाही. म्हणून हा पहेलवान जाता-जाता एक धक्का देतो, त्याबरोबर ती गाडी थेट दरीत जाऊन पडते. तो किरकोळ शरीरयष्टीचा माणूस "थॅंक्यू' म्हणेल म्हणून पुन्हा धावू लागलेला पहेलवान मागे पाहतो, तेव्हा तो किरकोळ शरीरयष्टीचा माणूस त्याला शिव्या घालत असतो असे का होते, हे माहीत आहे? कारण त्या पहेलवानाला ऐकण्याची कला अवगत झालेली नाही. तो किरकोळ शरीरयष्टीचा माणूस गाडी ढकलण्यासाठी प्रयत्न करीत नसतो तर गाडीच्या आधाराने व्यायाम करीत असतो. पहेलवानाने थोडे लक्षपूर्वक पाहिले असते तर त्या किरकोळ शरीरयष्टीच्या माणसाच्या पायातले जॉगिंग शूज, हाफ पॅण्ट आणि स्पोर्टस्‌ टी-शर्टने हा माणूस व्यायाम करतो आहे, हे त्याला नेमके सांगितले असते, पण ऐकायची- नीट ऐकायची सवय नसल्याने अख्खी गाडी दरीत गेली.
आठवून बघा, तुम्ही कधी त्या विजयसारखे अपमानित झाला आहात? एखाद्याच्या जाण्याची भलतीच बातमी प्रसारित केली आहे? किंवा एखाद्याची गाडी अशीच दरीत ढकलून मोकळे झाला आहात? नाही म्हणू नका, जरा स्मरणशक्तीला ताण द्या. कधी ना कधी आपण ऐकण्याचा आळस करू मोठी चूक केलेली असते.
आता प्रश्न उरतो तो एकच- ही ऐकण्याची कला आत्मसात कशी करायची? उत्तर अगदी सोपे आहे. देवाने आपल्याला दोन कान दिले आहेत. ते आपण सैदव उघडे ठेवले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या दोन कानांच्या मध्ये लक्ष ठेवायला हवे आणि मग तिथेच असलेले बुद्धी वापरून बोलणाऱ्या काय म्हणायचे आहे याचा नेमका अर्थ लावला पाहिजे. यासाठी पाच पैसेसुद्धा खर्च येत नाही. ईश्वराने या सर्व शक्ती आपल्याला मोफत दिल्या आहेत. आजपासूनच आपण ही ऐकण्याची कला अवगत करण्याचा प्रयत्न करूया!
-वैभव बळीराम चाळके



तिने चुंबिलेली लिलीची फुले


लिलीची फुले
तिने एकदा
चुंबिता, डोळां
पाणी मी पाहिले...!
लिलीची फुले
आता कधीहि
पाहता, डोळां
पाणी हे साकळे...!
ही पु.शि.रेगे यांची कविता आहे. अवघ्या आठ ओळींची. अवघ्या अठरा शब्दांची. पण तिच्यात मावणारा अवकाश फार मोठा आहे. म्हणूनच कदाचित ती कविता प्रथम वाचली तेव्हापासून मनात घर करून राहिली आहे.
ही कविता आहे डोळ्यांतल्या पाण्याची-अर्थात अश्रूंची-आसवांची! अश्रूंचे आपल्या जीवनातील स्थान फार मोठे आहे. डोळे डबडबले आहेत हे विधान डोळे ठार कोरडे झाले आहेत या विधानापेक्षा अधिक सुंदर आहे, नाही का? म्हणूनच तर साने गुरुजींनी आपल्या कवितेत "फक्त माझे अश्रू नको नेऊ देवा हाचि ठेव ठेवा जन्मभरी!' अशी प्रार्थना केली आहे. आणि चारोळीचा जनक चंद्रशेखर गोखले यांनी पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे, डोळे कुणाचे भरणार नसतील तर मरणही व्यर्थ आहे असं म्हटलं आहे.
वरील कविता आसवांशीच निगेेेडित आहे. माणसाला माणसापासून तोडणाऱ्या आणि माणसाला माणसाशी जोडणाऱ्या आसवांची कविता आहे ही.
कुणी तरी एक ती... लिलीची फुले हाती घेऊन उभी असते. कवी तिला पाहतो. पुढच्याच क्षणी ती हातातली लिलीच फुले चुंबून घेते. ती लिलीची फुले चुंबत असताना तिच्या डोळ्यांत पाणी उभे राहते. का? ते कवीला माहीत नाही. पण त्या लिलीच्या फुलांशी तिचं कुणीतरी माणूस जोडलेलं असणार. लिलीची फुले कधी तरी तिच्या प्रिय माणसाने तिला दिली असतील आणि आता तो नाही म्हणून तिच्या डोळ्यांत ही लिलीची फुले पाहून आसवं आली असतील. त्याच्या स्मृतीने उचंबळून येऊन तिने ही फुले चुंबली असतील किंवा असेच काही तरी...काही तरी खास आठवण त्या लिलीच्या फुलांशी जोडलेली आहे. म्हणून ती फुलं हाती घेतल्यावर चुंबावी वाटली आणि चुंबल्यावर डोळ्यांत पाणी आलं. कवीचा आणि तिचा काहीही पूर्वसंबंध नाही. तो ते एक दृश्य पाहतो एवढाच त्याचा तिच्याशी संबंध! पण तो कवी आहे. सुहृद आहे.( गंगाधर पाटलांनी पु.शि. रेगे यांच्या निवडक कविताचं सकलन केलं आहे, त्याचं नाव "सुहृदगाथा'असंच ठेवलं आहे.) त्यामुळे तिचे डोळे भरलेले पाहून तो तिच्या भावनांशी सहकंप पावतो. तिला तशी आसवांनी डबडबलेली पाहून त्याचंही मन भरून येतं.
पुढच्या चार ओळींत कवी सांगतो की, त्या घटनेचा परिणाम इतका खोल होता की आता कधीही, कुठेही लिलीची फुले दिसली की ती घटना आठवते आणि डोळ्यांत पाणी साकळू लागते. कवी एखाद्या प्रसन्न सकाळी बागेत जातो. अचानक सुंदर उमललेली लिली दिसते. त्याचा स्मृती जागृत होतात. पटकन डोळे भरून येतात. किंवा तो एखाद्या समारंभात जातो लिलीच फुले दिसतात, डोळ्यांत एकाएकी आसवं भरून येतात. त्याच्या संवेदनशील मनानं आणि आसवांनी त्या मुलीच्या आसवांशी आणि तिच्या अज्ञात कहाणीशी मोठे गोड भावबंध निर्माण केले आहेत. स्नेहसंबंधाचे एक हिरवे झाडच त्यांच्या आत रुजून आले आहे.
प्रथम वाचनात ही कविता पटकन कळत नाही. सोपी आहे तरी अवघड वाटते. कारण ती थेट काही न बोलता बरेच काही सुचवते. त्यात या कवितेची रचना थोडी आडवळणाची आहे. त्या आठ ओळींतील पहिल्या साधारण साडेतीन ओळीनंतर स्वल्पविराम येतो, तिथे थांबलात, "डोळां' शब्दातील "ळा' वर असलेला अनुस्वार म्हणजे डोळ्यांत हे समजून घेतलात( "कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबां गेलां' मध्ये "बा'वर अनुस्वार आहे, तो आदरार्थी अनेक वचनांवरचा आहे आणि तो "बाबांनो' असे सुचवतो.) आणि दुसऱ्या कडव्यातील "पाहता'नंतरचा स्वल्पविराम आणि पुन्हा "डोळां' वरील अनुस्वार समजून घेतलात तर कविता एकदम सोपी होत जाईल.
पु.शि. रेगे यांची कविता कळायला थोडे श्रम पडतात. पण कष्टाने कमावलेली भाकरी जो आनंद देते त्याला उपमा नाही. तुम्ही चांगल्या,े दर्जेदार कवितांच्या शोधात असाल आणि थोडे कष्ट करायची तयारी असेल तर पु.शि.रेगेंच्या कविता जरूर वाचा. तसे नसेल तर ही लिलीची फुले काही कमी महत्त्वाची नाहीत. गेली साधारण दहा-बारा वर्षे ती माझ्या ओंजळीत अगदी ताजीतवानी राहिली आहेत. त्यातली काही तुमच्या हाती देतो आहे. ती जपून ठेवा. कुणी रसिक भेटला तर त्यातली काही त्यासही द्या!!
-वैभव बळीराम चाळके

मुंग्या

मुंग्या

सखाराम अण्णाच्या घरावर सूर्य चढला की त्याची किरणं थेट खिडकीतून अजय झोपतो त्या खाटेवर येत. त्या चटक्याने अजय उठे आणि डोळे चोळत आंघोळीला निघे. आजही त्याच चटक्याने त्याला जागा आली. तो उठला आणि आंघोळीला निघाला.
शाळेला अभ्यासाची सुट्टी होती. दहावीची परीक्षा संपली म्हणजे नववीची सुरू होणार होती. अजय झेपेल तेवढा अभ्यास करी आणि कंटाळा आला म्हणजे गावात चक्कर मारून येई.
भाजावळीचे दिवस होते. गावाच्या आसपास सर्वत्र लोक भाजावळीच्या कामात दंग होते. दिवसभर एकेक तरवा भाजवळीसाठी तयार केला जाई आणि मग पहाटे पाचला उठून लोक तरव्यावर माती लावायला जात. यंदा नववीचा अभ्यास असल्याने अजयचे आईवडील त्याला घेऊन जात नव्हते. पण गेल्या वर्षापर्यंत तो आवर्जून जाई. सकाळी साधारण साडेसहा -सातपर्यंत माती खणून बारीक करून तरव्यावर पसरली जाई आणि तरव्याला पेट दिला जाई. म्हणता म्हणता आग भडके-धुराचे हत्ती आभाळाच्या दिशेने पळू लागत.
अजय उठला. घरामागच्या मोरीत जाऊन त्याने आंघोळ केली आणि भाजीभाकरी खाऊन तो अभ्यासाला बसला. वारं सुटल होतं आणि शेतं आगीनं पेटली होती. त्यामुळे गावावर आगीच्या झळा दौडत जात होत्या. घरात फारच गरम होतं म्हणून अजयने अभ्यासाचं गाईड घेतलं, घराला कडी मारली आणि तो आमटोऱ्याच्या सावलीत येऊन बसला. आमटोरा हे आंब्याचं झाड. त्याची फळं फार आंबट होती. ती कोणी तोंडातही घेत नसे, पण त्याची सावली मात्र एकदम गडद पडत असे. अजय परीक्षेच्या काळात इथेच अभ्यास करीत बसे.
आजही तो येऊन तिथल्या नेहमीच्या पाथरीवर बसला. अधूनमधून येणारे उष्ण वारे वगळता इथं थंड वातावरण होतं. म्हणूनच तो सुखावला होता. पण एका क्षणी तो धडपडत उठला. त्याचा हात प्रतिक्षिप्त क्रियेने कुल्ल्याकडे गेला होता. तोंडाने बोंबलत आणि कुल्यावर हात घासत तो वेडावाकडा नाचू लागला. वेदनेनं हैराण होत तो पुढची दोनचार मिनिटे तसाच कळवळत राहिला. त्याला लाला मुंगीने दंश केला होता. एकसारखा यग मारत होता. जरा वेदना शांत झाल्यावर त्याने ती मुंगी शोधून काढली आणि तिथल्याच एका दगडाने तिचा चेंदामेंदा केला. तिच्या अस्तित्वाची फक्त एक रेघ पाथरीवर राहिली.
अजयचे अभ्यासातून लक्ष उडाले. त्याला लहानपणीची आठवण आली- पाचवीत असताना एकदा हरे अभ्यासाला आलो तेव्हा अशाच एका मुंगीने मांडीवर चावा घेतला होता आणि वेदनेने कळवळत घरी जाताना आपण ढोपर फोडून घेतलं होतं. त्याला त्या मुंग्यांचा राग आला.
"आपण कळायला लागल्यापासून पाहतोय या आमटोऱ्याच्या मागच्या चिवारीच्या बाजूला या लालमुंग्यांची वारुळं आहेत. वारुळं नव्हे, साम्राज्याच आहे त्यांचं. त्या एरवी कुणाला त्रास देत नाहीत तरी एखाद्याला चावल्या म्हणजे तो असा एकदम फुगडी घालू लागतो.
"आपण यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे-' अजय मनाशीच बोलत होता.
दुसऱ्या दिवशी आईबाबा सकाळी भाजावळीसाठी बाहेर पडून गेले. उन्हं खाटेवर आली तसा अजय उठला. तोंडही न धुता तो काडीेपेटी खिशात टाकून घराला कडी मारून घराबाहेर पडला. गोठ्याच्या शेजारी गवताच्या वरंडी रचून ठेवल्या होत्या. त्यातली एक वरंड त्याने डोक्यावर घेतली.आमटोऱ्याच्या पाथरीवर त्याने वरंड उतरवून ठेवली. पुन्हा घरी जाऊन खोपीतली भाराभर लाकडे बांधून घेऊन आला.
आता त्याने त्या लालमुंग्यांच्या वारुळांभोवती गवताची एकेक पेंडी रचून गवताची तटबंदी उभारली. त्या पेंड्यांनी पेट घेताच वाऱ्यावर त्या उडून जाऊ नयेत म्हणून त्याने त्यावर लाकडे रचली. एकदम कडेकोट बंदोबस्त केला गेला. त्याला इतिहासातला पाठ आठवला, पुरंदर किल्ल्याला मुघल फौजेने वेढा घातला... आता एकही मुंगी जिवंत राहणे शक्य नाही! तो मनातल्या मनात म्हणाला. मग काडेपेटी काढून त्याने शिल्लक राहिलेल्या पेंड्यांमधली एक पेंडी पेटवली आणि त्या पेंडीने वारुळांभोवती रचलेल्या गवताच्या तटबंधीला आग लावली. सारीकडून गवत भरभरून पेटले. आतल्या मुंग्यांची कोण धावपळ झाली. असंख्य मुंग्या वारुळांतून बाहेर आल्या. प्रचंड वेगाने त्या सैरावैरा पळू लागल्या आणि शेकड्याच्या संख्येने जळून करपून मरू लागल्या. अजयला आता चेव चढला. त्याने उरलेल्या पेंड्या त्या वारुळांवर टाकल्या. आता त्याला त्यांचं सैरावरा पळणं पाहण्याची गरज उरली नाही. त्याला आता फक्त वारुळं, मुंग्या, गवत आणि लाकडाची राख उरलेली पाहायची होती.
हजारो मुंग्या मृत्युमुखी पडल्या. मघापासून गवताचा वास येत होता. आता त्या वासापेक्षा करपलेल्या मुंग्यांचा वास अधिक गडद झाला.
अजयच्या कुल्यावरच्या वेदना कमी कमी होत शांत झाल्या.
दुपारी आईवडील घरी परतले तेव्हा त्यांना हा सारा प्रकार समजला. वडील काही बोलले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर ताण तेवढा दिसू लागला. पण आई करवादली, "काय केलंस हे गुलामा? देवाच्या मुंग्या होत्या त्या! सात पिढ्यांपासून आहेत तिथं. कुणाची हिंमत आली नाही त्यांना हात लावायची? आणि तू आज त्यांची राख रांगोळी केलीस! देव कोपला म्हंजी रं! काय ही अवदसा सुचली तुला?' आणि मग आवाजाची पट्टी बदलत आई हात जोडून म्हणाली, "संभाळ रं देवा माझ्या लेकरला. हातून चूक झाली आसल! लहान लेकरू हाय त्याला माफ कर!
आपण काही चूक केली आहे असं त्याला आतापर्यंत वाटत नव्हतं. पण आई रागवल्यावर आणि विशेषतः तिने देवाला साकडं घातल्यावर अजय घाबरला. आपण काही तरी अक्षम्य पाप केलं आहे आणि त्याची फळं आता आपल्याला भोगावी लागणार आहेत असं त्याला वाटू लागलं. आई देवापुढं पदर पसरत होती. अजयच्या नावानं शिव्या हासडत होती. मग अजयही मनातल्या मनात देवाला सॉरी म्हणाला. आई खूप खूप वैतागली आणि मग त्याला जवळ घेऊन रडरड रडली.
नेहमीप्रमाणे रात्री नऊला सगळे जण झोपी गेले. अजय एकटाच अभ्यास करत जागत होता. पण आज त्याचं मनच लागेना. त्याला तो दुपारचा प्रसंग पुन्हापुन्हा आठवत होता. मनात अनामिक भीती सळसळत होती. शेवटी साडेनऊला तो आपल्या खाटेवर झोपायला गेला.
आणि रात्री अकराच्या सुमारास...
"आई ग! हट... हट...' असा आवाज करीत तो उठला त्याच्या आवाजाबरोबर आई आणि बाबाही उठले. अंधारातच दोघे खाटेजवळ आले. अजय उठला होता, पण त्याचे डोळे मिटलेलेच होते. तो हातपाय झाडत होता. आणि अंगावरच्या मुंग्या झाडत होता. त्याच्या सर्वांगाला हजारो मुंग्या दंश करीत होत्या. वडिलांनी त्याचा हात धरला तर त्याने त्यांना भिरकावून दिले. आई "अजू, बाळा अजू' करीत त्याला समजवू पाहत होती. पण अजू शुध्दीवर नव्हताच मुळी! तो त्या हजार मुंग्यांच्या दंशांनी हैराण झाला होता. कधी तोंडावरून हात फिरवत होता. कधी पाठीवर तर कधी पायांवर! त्याने त्याच वेगाने शर्ट काढून फेकला. बरमोडा उतरवला. तरी हजारो मुंग्या त्याच्या अंगावर होत्याच्या तो त्यांना शिव्या पालत अगतिक होत धडपडत होता. फार केविलपणा झाला होता तो. आई त्याच्या जवळ गेली. पण त्याने तिला हिसकावून लावले. काय करावे ते कळेना तिला. इतक्यात तिच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. आणि विजेच्या वेगाने पुढे होत तिने होती नव्हती ताकद एकवटून त्याच्या कानफटात लागावली!
एकदम झालेल्या त्या आघाताने तो खडबडून जागा झाला आणि धडपडत आईकडे केविलवाण्या नजरेने पाहत राहिला. अंगावर एकही मुंगी नाही हे पाहून तो सुखावला . पण भीतीने अंग थरथरत होते.
क्षणभर विसावलेली आई पुन्हा विसकटली..
"मुडदा बसविला रं सात पिड्यांचा परपंरेचा! अजाण लेकरू त्याला दोनदा चावताना लाज नाय वाटली. मला न्या तुम्हाला रक्ताचीच भूक लागली असेल तर. माझ्या पोराला पुन्हा शिवायच नाय! जाळून टाकीन... समदं घरदार... गाव जाळून टाकीन सगळं...'
- वैभव बळीराम चाळके

Tuesday, March 22, 2011

सामाजिक समतेचे प्रतीक

सामाजिक समतेचे प्रतीक
सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं साखरपा हे माझं गाव. तिथे खंडवाडी नावाच्या छोट्या खेड्यात माझं बालपण गेलं. आज मुंबईत जगताना सगळ्या सण उत्सवांच्या वेळी ते जुने दिवस, त्या लोकरीती, त्या वेळेचे ते खेळ आठवतात. होळी अर्थात शिमगा आला की ते पंधरा दिवस गाव मनात पुन्हा जिवंत होतो. शाळा सुटल्यावर पळत पळत घरी यावं. पटापट दोनचार घास पोटात ढकलून कंबरेला आकडी बांधावी. त्यात कोयती सरकावून रानात शेवरीचा शोध घ्यायला निघावं. एखादी शेवर सापडली की तिला तोडून-किसून बांधावी आणि सजवून होळीच्या मळीत आणून उभी करावी. रात्री जेवून तिथेच आट्यापाट्या खेळाव्यात. मग होळी पेटवून दिंडे, आमट्या वाजवाव्यात. असा सगळा सुखाचा महासागरच त्या दहा दिवसांत झुलत असायचा.
होळी झाली की शिमग्याचा सण अर्थात वडे मटणाचा बेत असे. आणि मग दुपारपासून कोल्याचा नाच सुरू होई. वाडीतले सगळे जण देवळात जमत. मग एका तरुणाला साडी नेसवून गोमू बनवलं जाई. दुसऱ्याला मेकअप लावून कृष्ण बनवत. त्याला अनेकदा गोम्याही म्हणत. या गोमू आणि गोम्याला मध्यभागी ठेवून त्याच्या दोन्ही बाजूंनी मग इतर लोक दोन सरळ रेषांत वल्हे घेऊन उभे राहत आणि विशिष्ट पदन्यास करीत गाणी म्हणत नाचत. मधीच एखादी चाल मारली जाई. वल्हेधारी उभ्या रेषेत तर गोमू-गोम्या आडव्या रेषेत विशिष्ट लयीत झुलत राहत. एकजण डोलकी वाजवत असे. एक जण पुढे म्हणे. बाकीचे त्याच्या मागून म्हणत-
रायगड किल्ल्याला सोन्याच्या पाच पायऱ्या
तोरण बंाधिले भवानी देवीला
या गाण्यापासून
शेलारमामा म्हातारा ऐंशीया
वर्षांचा त्याने लढाय केली उदय भानूशी..
पर्यंतचा ऐतिहासिक आठवणी जागवणारी म्हटली जात.
आंबेवाडी फणसवाडी अलका हीच काय गो सासूरवाडी पासून गंगाजमना दोघी बहिणी ग पाणी जायजुय व्हाय। माशानं मारला दणका ग पाणी पाटाला जाय पर्यंतची रोजच्या जगण्याशी निगडित असलेली गाणी त्यात असत. त्याशिवाय सोंबा या देवा तू माझा सारथी देवाची आरती ओवाळू ये ओवाळू ये अशी आरती असे. त्यात देवानाच सारथी करून देवाच्या देवाला ओवाळलं जाई.
आमचं घर थोडं उंचावर आहे. म्हणून आमच्या घरी आल्यावर लोक हमखास वाळकेश्वरही हवा डोंगरी । बंगला बांधिला हवेवरी । त्या बंगल्याला दोन चार खिडक्या । हवा खेळे अति छान हो। हे गाणव म्हणत आणि त्यातील वाळकेश्वरी शब्दाच्या जागी चाळकेश्वरी असा शब्द वापरत तेव्हा छानच वाटत असे.
घरोघरी हा नाच फिरत राही. सर्वत्र गोमू गोम्या, ढोलकीवाला आणि नाचणाऱ्यांना ओवाळून दक्षिणाही दिली जात असे. रात्री उशिरापर्यंत हा नाच सुरू राही.
दुसऱ्या दिवशीपासून आमचा नाच बाहेर गावी जात असे आणि बाहेरचे नाच आमच्याकडे येत. त्यात जोयशीवाडीचा नाच खास असे. ते लोक जाकडी-नमनातील ड्रेस घालून नाचायला येत. त्यामुळे एक वेगळेच ग्लॅमर निर्माण होई. कधी गुरववाडीवरचा लिंगायत-गुरवाचा नाच येई. अधूनमधून सोंगे येत. आमचे खेळ, नाच यातले गुरू आणि हरहुन्नरी आप्पा सुर्वे कसलं तरी फर्मास सोंग काढीत. एकनाथांच्या कूट रचना म्हणत ते नाचत असत.
आम्ही मुलंही वह्यांच्या पुढ्यांचे मुखवटे बनवून रंगवून त्याला कोंबडीच्या पिसांचे तुरे खोवून सोंग काढायचो. किंवा मोठ्यांसारखा छोट्यांचा नाच काढत दारोदार फिरून धमाल करायचो. लोक मोठ्यांना पाच किंवा दहा रुपये दक्षिणा देत. आम्हाला चार आणे, वीस पैसे, आठाणे मिळत. आम्ही फक्त दहाबारा घरेच फिरायचो. पाच सहा रुपये जमायचे, ते वाटून घेतल्यावर श्रीमंत झाल्यासारखं वाटायचं. गाण्यावाजवण्याचा आनंद मिळायचा तो वेगळाच!
कोल्याच्या नाचाचे एक फार मोठे वैशिष्ट्य मला अलीकडे जाणवले. या नाचाने वर्षानुवर्षे सामाजिक समतेची गुढी उभी ठेवली आहे. आमचं गाव किनाऱ्यापासून जवळजवळ 50 किमी दूर आहे. कोळी समाजाचा आणि आमचा जवळचा संबंध नाही, तरी कोळी समाजाचा हा नाच आमच्याकडे मोठ्या प्रेमाने केला जातो. तो कोळ्यांचा आहे असं आम्हाला वाटतच नाही. एरवी स्वतःला शहाण्णव कुळी म्हणणारे मराठे, ब्राह्मणांसारखे शुध्द शाकाहारी असलेले लिंगायत- गुरव आणि जाकडी, नमननाट्यात वाखाणलेले गेलेले कुणबी हे सगळेच कोळी नसून कोळ्यांचा हा नाच आपला मानतात. दर शिमग्याला त्याची मजा घेतात आणि इतरांना देतात. प्रत्यक्ष कोळी समाजात हा नाच होतो की नाही कुणास ठाऊक!
शिमगा म्हटलं की, होळी, फाग, आट्यापाट्या, पालखी, खुणा या सगळ्याबरोबरच कोल्याच्या नाचाला मोठे महत्त्व आहे. विशेषतः त्याच्या या सामाजिक समतेच्या संदेशामुळे... सामाजिक अभिसरणाच्या त्याच्या गुणामुळे!!
- वैभव बळीराम चाळके

तिने चुंबिलेली लिलीची फुले
लिलीची फुले
तिने एकदा
चुंबिता, डोळां
पाणी मी पाहिले...!
लिलीची फुले
आता कधीहि
पाहता, डोळां
पाणी हे साकळे...!
ही पु.शि.रेगे यांची कविता आहे. अवघ्या आठ ओळींची. अवघ्या अठरा शब्दांची. पण तिच्यात मावणारा अवकाश फार मोठा आहे. म्हणूनच कदाचित ती कविता प्रथम वाचली तेव्हापासून मनात घर करून राहिली आहे.
ही कविता आहे डोळ्यांतल्या पाण्याची-अर्थात अश्रूंची-आसवांची! अश्रूंचे आपल्या जीवनातील स्थान फार मोठे आहे. डोळे डबडबले आहेत हे विधान डोळे ठार कोरडे झाले आहेत या विधानापेक्षा अधिक सुंदर आहे, नाही का? म्हणूनच तर साने गुरुजींनी आपल्या कवितेत "फक्त माझे अश्रू नको नेऊ देवा हाचि ठेव ठेवा जन्मभरी!' अशी प्रार्थना केली आहे. आणि चारोळीचा जनक चंद्रशेखर गोखले यांनी पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे, डोळे कुणाचे भरणार नसतील तर मरणही व्यर्थ आहे असं म्हटलं आहे.
वरील कविता आसवांशीच निगेेेडित आहे. माणसाला माणसापासून तोडणाऱ्या आणि माणसाला माणसाशी जोडणाऱ्या आसवांची कविता आहे ही.
कुणी तरी एक ती... लिलीची फुले हाती घेऊन उभी असते. कवी तिला पाहतो. पुढच्याच क्षणी ती हातातली लिलीच फुले चुंबून घेते. ती लिलीची फुले चुंबत असताना तिच्या डोळ्यांत पाणी उभे राहते. का? ते कवीला माहीत नाही. पण त्या लिलीच्या फुलांशी तिचं कुणीतरी माणूस जोडलेलं असणार. लिलीची फुले कधी तरी तिच्या प्रिय माणसाने तिला दिली असतील आणि आता तो नाही म्हणून तिच्या डोळ्यांत ही लिलीची फुले पाहून आसवं आली असतील. त्याच्या स्मृतीने उचंबळून येऊन तिने ही फुले चुंबली असतील किंवा असेच काही तरी...काही तरी खास आठवण त्या लिलीच्या फुलांशी जोडलेली आहे. म्हणून ती फुलं हाती घेतल्यावर चुंबावी वाटली आणि चुंबल्यावर डोळ्यांत पाणी आलं. कवीचा आणि तिचा काहीही पूर्वसंबंध नाही. तो ते एक दृश्य पाहतो एवढाच त्याचा तिच्याशी संबंध! पण तो कवी आहे. सुहृद आहे.( गंगाधर पाटलांनी पु.शि. रेगे यांच्या निवडक कविताचं सकलन केलं आहे, त्याचं नाव "सुहृदगाथा'असंच ठेवलं आहे.) त्यामुळे तिचे डोळे भरलेले पाहून तो तिच्या भावनांशी सहकंप पावतो. तिला तशी आसवांनी डबडबलेली पाहून त्याचंही मन भरून येतं.
पुढच्या चार ओळींत कवी सांगतो की, त्या घटनेचा परिणाम इतका खोल होता की आता कधीही, कुठेही लिलीची फुले दिसली की ती घटना आठवते आणि डोळ्यांत पाणी साकळू लागते. कवी एखाद्या प्रसन्न सकाळी बागेत जातो. अचानक सुंदर उमललेली लिली दिसते. त्याचा स्मृती जागृत होतात. पटकन डोळे भरून येतात. किंवा तो एखाद्या समारंभात जातो लिलीच फुले दिसतात, डोळ्यांत एकाएकी आसवं भरून येतात. त्याच्या संवेदनशील मनानं आणि आसवांनी त्या मुलीच्या आसवांशी आणि तिच्या अज्ञात कहाणीशी मोठे गोड भावबंध निर्माण केले आहेत. स्नेहसंबंधाचे एक हिरवे झाडच त्यांच्या आत रुजून आले आहे.
प्रथम वाचनात ही कविता पटकन कळत नाही. सोपी आहे तरी अवघड वाटते. कारण ती थेट काही न बोलता बरेच काही सुचवते. त्यात या कवितेची रचना थोडी आडवळणाची आहे. त्या आठ ओळींतील पहिल्या साधारण साडेतीन ओळीनंतर स्वल्पविराम येतो, तिथे थांबलात, "डोळां' शब्दातील "ळा' वर असलेला अनुस्वार म्हणजे डोळ्यांत हे समजून घेतलात( "कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबां गेलां' मध्ये "बा'वर अनुस्वार आहे, तो आदरार्थी अनेक वचनांवरचा आहे आणि तो "बाबांनो' असे सुचवतो.) आणि दुसऱ्या कडव्यातील "पाहता'नंतरचा स्वल्पविराम आणि पुन्हा "डोळां' वरील अनुस्वार समजून घेतलात तर कविता एकदम सोपी होत जाईल.
पु.शि. रेगे यांची कविता कळायला थोडे श्रम पडतात. पण कष्टाने कमावलेली भाकरी जो आनंद देते त्याला उपमा नाही. तुम्ही चांगल्या,े दर्जेदार कवितांच्या शोधात असाल आणि थोडे कष्ट करायची तयारी असेल तर पु.शि.रेगेंच्या कविता जरूर वाचा. तसे नसेल तर ही लिलीची फुले काही कमी महत्त्वाची नाहीत. गेली साधारण दहा-बारा वर्षे ती माझ्या ओंजळीत अगदी ताजीतवानी राहिली आहेत. त्यातली काही तुमच्या हाती देतो आहे. ती जपून ठेवा. कुणी रसिक भेटला तर त्यातली काही त्यासही द्या!!
-वैभव बळीराम चाळके

Sunday, February 27, 2011

मराठी असे आमुची मायबोली

मराठी असे आमुची मायबोली
27 फेब्रुवारी हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिन आपण सारे "मराठी भाषा' दिन म्हणून साजरा करतो. मराठीला दुसरे ज्ञानपीठ मिळवून देणारे कुसुमाग्रज हे महान कवी या मातीत जन्मले हेही आपले भाग्यच होय. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हटलं की, "उठा, उठा चिऊताई'पासून "ओळखलंत का सर मला'पर्यंतच्या पाठ्यपुस्तकातील कविता आठवतात, तशाच पृथ्वीचे प्रेमगीत, स्वप्नांची समाप्ती, अहिनकुल, गर्जा जयजयकार अशा त्यांच्या अजरामर कविता आठवतात, पण मराठी भाषादिनाच्या निमित्ताने विचार करू लागलो की, "पन्नाशीची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडोनी वाट वाकडी धरू नका, ' हा त्यांचा फटका आठवतो. मराठी भाषेची झालेली दैन्यावस्था कुसुमाग्रजांनी या फटक्यातून मांडली. शासनाने त्या कवितेची पोस्टर बनविली. शिधावाटप पत्रिकेवर त्यातल्या काही ओळी छापल्या आणि कर्तव्यपूर्तीचा श्वास घेतला. पण मराठीचे दशावतार संपले नाहीत. संपण्याची चिन्हे नाहीत. मराठी कवींनी मराठी भाषेबद्दल वेळोवेळी रचना केल्या आहेत. त्यातून मराठीचा अभिमान तर व्यक्त होतोच, पण काळजीही व्यक्त होते. मराठीचा आवाज सतत वाजता ठेवण्याचं काम मराठी कवींनी सातत्याने 700-800 वर्षे केले आहे. आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आपण या आवाजाचा वेध घेऊ या.
मराठीची काव्य परंपरा साधारणतः ज्ञानेश्वरांपासून मानली जाते. मराठी कवितेचा भक्कम पाया ज्ञानेश्वरांनी रचला. त्या भक्कम पायावर आज मराठीची परंपरा उभी आहे. संत ज्ञानेश्वर मराठीची थोरवी सांगताना लिहितात-
जैसी दीपांमाझि दिवटी। का तिथी माझि पूर्णिमा गोमटी।
तैसी भाषांमध्ये मऱ्हाटी। सर्वोत्तम।।
तीर्थांमध्ये काशी। व्रतांमध्ये एकादशी। भाषांमध्ये तैशी।
मऱ्हाटी शोभिवंत।।
ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायातील ओळी तर सर्वश्रुतच आहेत-
माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातेंही पैजां जिंके।
ऐसी अक्षरें रसिकें। मेळवीन।।
संत ज्ञानेश्वरांच्या नंतर होऊन गेलेल्या संत एकनाथांच्या काळात संस्कृत भाषेचा वृथा अभिमान धरून पंडित प्राकृत भाषेस कमी लेखत होते. त्यांना थेट सवाल करताना एकनाथ महाराज लिहितात-
संस्कृतवाणी देवें केली। तरी प्राकृत काय चोरापासोनि झाली?
मराठी भाषेचा अभिमान असा थेट व्यक्त करून एकनाथ महाराजांनी मराठीत विपुल रचना केली. प्रौढ मराठीत तरी केलीच, पण लोकभाषेत भारूडे रचून मराठीला एक नावाच डौल प्राप्त करून दिला.
आज मराठीची प्रामुख्याने इंग्रजीशी तुलना होते. अशी तुलना करताना तुमच्या इंग्रजीत काका आणि मामाला एकच शब्द अंकल आणि काकी आणि मावशीलाही एकच आण्टी शब्द अशी टीका केली जाते. इंग्रजीची शब्दसंपत्ती अमाप आहे. तरी तिच्यातील नेमकी वैगुण्ये हेरून मराठी अभिमानी तिला कमी लेखून आपला अभिमान व्यक्त करतो. संस्कृताचा जोर होता तेव्हा दासोपंतांनी संस्कृताचे असेच वैगुण्य नेमके ओळखून मराठीचा आपला अभिमान व्यक्त केला आहे. तुमच्या संस्कृतात नुसता "घट'. पण आमच्या मराठीत त्याच्या नाना रूपांना नाना शब्द आहेत, हे सांगताना दासोपंत लिहितात-
संस्कृतें घट म्हणती। आतां तयाचे भेद किती
कवणा घटाची प्राप्ति। पावावी तेणें?
हारा, डेरा, रांजणु। मुठा, पडगा, आनु।
सुगडतौली, सुजाणु। कैसी बोलैल?
घडी, घागडी, घडौली। अलंदे वांचिकें वौळीं।
चिटकी, मोरवा, पातली। सांजवणें तें।।
ऐंसे प्रतिभाषे वेगळाले। घट असती नामाथिले।
एकें संस्कृतें सर्व कळे। ऐसें कैसेन?
आज मराठी भाषा ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. ती राजभाषा नव्हती तेव्हा कवी माधव ज्युलियन यांनी लिहिलेली "आमुची मायबोली' ही कविता आजही सर्वांच्या ओठावर आहे. ज्युलियन लिहितात-
मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं,
पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं,
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू वसे आमुच्या मात्र हृन्मदिरी
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे हिला बैसवू वैभवाच्या शिरी।।
मराठी भाषेचा अभिमान ओवी, अभंग, लावणी, पोवाडा अशा विविध रचनांतून व्यक्त झालेला आपण अनेकदा पाहतो पण रावसाहेब र.लु.जोशी यांनी मराठीची भूपाळी लिहिली आहे. ते लिहितात-
प्रभातकाळी तुझी लागली ओढ मायबोली
भवती गुंजे तव गुण गाणी मंगळ भूपाळी
संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषा अमृताशी पैजा जिंकते असे म्हटले आहे, हाच धाग धरून अमृताशी मराठीची तुलना करता करता सोपानदेव चौधरी म्हणतात-
अमृतास काय उणे?
सांगतसे मी कौतुकें
माझी मराठी बोलकी
परी अमृत हे मुके!
अमृत आणि मराठी इतर सर्व बाबीत समान, पण अमृताला बोलता येत नाही म्हणू ते थोडे कमीच, असे सोपानदेव म्हणतात. याचबाबत डॉ.ना.गो. नांदापूरकर आपल्या "माझी मराठी' कवितेत लिहितात-
माझी मराठी असे मायभाषा हिच्या कीर्तिचे तेज लोकी चढे
गोडी न राहे सुधेमाजि आता, पळाली सुधा स्वर्ग लोकाकडे
मराठी भाषेपुढे अमृताची गोडी फिकी पडल्याने अमृत थेट स्वर्गात पळून गेले अशी अद्वितीय कल्पना नांदापूरकर यांनी केली आहे.
मराठी गझलभास्कर सुरेश भट यांनी मराठीबाबत आपल्या मायबोली रचनेत म्हटले आहे-
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहला खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
मराठी भाषेची उपेक्षा आधी संस्कृतकडून आणि आता इंग्रजीकडून होत आहे. ही उपेक्षा मराठीच्या पुत्रांना सदैव सलत आली आहे. म्हणूनच मराठीच्या जन्मापासून मराठी कवींनी मराठीच्या बाजूने सदैव रणशिंग फुंकले आहे. जन्मापासूनच ही भाषा लढते आहे. तिचा लढा अखंड चालू आहे. आजही तो संपलेला नाही. पण ज्या अर्थी ती लढली पण मेली नाही त्या अर्थी ती इथून पुढेही अशीच लढून आपले अस्तित्व नक्की टिकवील. मराठी भाषादिनानिमित्त आपण तिच्या या लढाईला थोडे अधिक बळ देऊ या!
ज्या कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त आपण मराठी भाषा दिन साजरा करतो त्या कुसुमाग्रजांनीच बजावून ठेवले आहे-
भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे
गुलाम भाषिक होऊन अपुल्या प्रगतीचे शिर कापू नका।।

Friday, February 11, 2011

पाणी पेटते आहे

पाण्याला आपण जीवन म्हणतो यातच पाण्याचे सारे महत्त्व आले. अशा महत्त्वपूर्ण पाण्याचा विषय आता दिवसेंदिवस अधिक मोठ्या प्रमाणावर भडकताना दिसतो आहे. फक्त मुंबई, महाराष्ट्र किंवा भारतभरच नव्हे तर एकूण जगात पाण्याविषयी जे एक विचित्र राजकारण सुरू आहे त्यातून युद्धे भडकण्याची शक्यता आहे. तिसरे महायुद्ध पाण्यावरून होईल आणि तिसरे महायुद्ध म्हणजे संपूर्ण मानवजातीचा नाश ही दोन विधाने परस्परांशी जोडून पाहिली म्हणजे पाणी केवढे गरम झाले आहे हे लक्षात येईल. आजवर गरीब श्रीमंत, काळेगोरे, उचनीच असे भेदभाव होते. आता पाणीवाले आणि विना पाणीवाले असा भेदभाव निर्माण होण्याची व टोकाला जाण्याची शक्यता आहे. दुर्दैवाने या संघर्षात गरीब तो बिनापाणी आणि श्रीमंत तो पाणीवाला असे होऊ लागले आहे. पाण्याला विकावू वस्तू केल्याने आणि पाण्याच्या स्त्रोतांवर आणि साठ्यांवरच मालकी हक्क प्रस्थापित होऊ लागल्याने पाणी अतिशय वेगाने पेटू लागले आहे. एक मोठे अर्थकारण आणि राजकारण पाण्याला जोडले गेले आहे. पर्यावरण आणि सांस्कृतिक क्षेत्राशी असलेली पाण्याची नाळ तोडून सामाजिक विषयाच्या कक्षेतूनही पाण्याला बाहेर फेकले जात आहे. त्यामुळेच पाण्याचा नैसर्गिक, मूलभूत अधिकार संपण्याच्या आणि पाण्याचेच "पेटंट' होण्याच्या दिशेने राक्षसी वाटचाल सुरू आहे.
हा पाणीप्रश्न घेऊन यावर्षी मुंबईतील माटुंग्याच्या रामनारायण रुईया महाविद्यालयाने विष्णुशास्त्री चिपळूणकर व्याख्यानमाला आयोजित केली होती. विष्णुशास्त्री चिपळूणकर व्याख्यानमालेचे हे 38वे वर्ष होते. आजवर या व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील अनेक नामवंत बोलून गेले आहेत. दरवर्षी एक विषय निवडून त्या विषयातील तीन ज्येष्ठ अभ्यासक, विचारवंत यांना व्याख्यानासाठी बोलाविले जाते. या वर्षी "पाणी' हा विषय घेतला होता. त्यासाठी पाण्याच्या विषयावर अभ्यास, चिंतन करणारे आणि प्रत्यक्ष चळवळीत काम करणारे तीन दिग्गज लोक वक्ते म्हणून लाभले होते. वर म्हटल्याप्रमाणे पाण्याने मोठे राजकारण सुरू असून ते 99 टक्के विरुद्ध एक टक्का असे आहे. हे तिन्ही वक्ते 99 टक्के सामान्यांच्या बाजूने विचार करणारे होते. सामाजिक न्यायाची भूमिका घेणारे होते. तपशीलवार आकडेवारी देत तिन्ही वक्त्यांनी या प्रश्नाचा सखोल आलेख काढला. पाण्याच्या प्रश्नाकडे पाहण्याचा अधिक प्रगल्भ दृष्टिकोन त्यामुळे मिळू शकेल.
पहिल्या दिवशी महाराष्ट्राचा पाणी प्रश्न या विषयावर विजय दिवाण यांनी आपले विचार मंाडले. महाराष्ट्राच्या पाणीप्रश्नाच्या अनुषंगाने त्यांनी वस्तुस्थितीची मांडणी करून कोणती दिशा स्वीकारायला हवी यावर प्रकाश टाकला.
जलधोरणात बदल हवेत
महाराष्ट्र सरकारने 2003 साली आपले जलधोरण जाहीर केले. 2005 साली त्या संदर्भात काही कायदे केले. या जलधोरणात आणि कायद्यात सामाजिक न्याय, पर्यावरण या दृष्टीने काही ठोस बदलांची आवश्यकता असल्याचे सांगत या प्रश्नावर काम करणाऱ्या 22/23 संघटनांनी मिळून एक बदलाचे आवेदनच शासनाला सादर केले आहे.
महाराष्ट्राच्या पाणीस्थितीबाबत आंतरराष्ट्रीय पाणी व्यवस्थापन संस्थेने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, भारतातील सात नद्यांचा पाणीसाठा कमी झाला आहे आणि त्यात कृष्णा, गोदावरी या महाराष्ट्राच्या दोन महत्त्वाच्या नद्या आहेत. नासानेही पश्चिम भारतात म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यांत लवकरच भूजलाची तीव्र टंचाई माजेल असे म्हटले आहे.
महाराष्ट्रात पाणीप्रश्नावर होणाऱ्या अंदाजपत्रकातील खर्च पाहिला तर पाण्यात केवढे राजकारण आहे ते लक्षात येईल. लघुपाटबंधाऱ्यातून एकूण केवळ 17 टक्के शेतजमीन भिजवली जाऊ शकते. मात्र त्यासाठी साधारण आठ हजार करोड रुपयांची तरतूद आहे तर उरलेल्या 83% शेतजमिनीसाठी केवळ 150ते 250 कोटी रुपयेच मिळतात. दिवाण म्हणाले, की लघुपाटबंधाऱ्याऐवजी जर या 83% शेतजमिनीचा विचार करून जलसंधारणावर मोठी गुंतवणूक केल्यास 3 वर्षांत महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने पाणी मिळू शकेल. लघुपाटबंधारे ज्या 17% शेतजमिनीला पाणी पुरवू शकतील म्हणून बांधले आहेत. ते फक्त 32% एवढेच क्षेत्र सिंचनाखाली आणत आहेत. हेही लक्षात घ्यायला हवे. पाणी पंप करायला वीज कोठून आणणार? महाराष्ट्रातील पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पंप करून कोकणातून घाटमाथ्यावर नेण्याचा विचार सुरू आहे खरे तर 120 मीटरपेक्षा अधिक उंचावर पाणी पंप करणे शक्य नसताना 400 मीटर उंचीवर पाणी चढविण्याचे घाटत आहेत. यासाठी वीज कोठून आणणार याचा विचार केलाय का? शिवाय कोकणही तहानलेला आहे त्यांना त्या नद्यांचे पाणी द्यायला हवे. शासन कमी खर्चाच्या योजना करू इच्छित नाही. म्हणून या सर्वाबाबत तुम्ही आम्हीच आवाज उठवण्याची वेळ आली आहे.
पाण्याबाबत विभागीय असमतोलाचा राक्षस उभा आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण हे प्रांत सदैव तहानलेले तर पश्चिम महाराष्ट्र त्यांचे पाणी ओरबाडतो आहे.
पाणी हे सर्वांसाठी मोफत असलेले नैसर्गिक साधन आज आर्थिक वस्तू होऊ लागले आहे. नफा तत्त्वावर पाण्याचा विचार होऊ लागला आहे. महाराष्ट्रात 4 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि तरीही पाण्याचा प्राधान्यक्रम सरकारलेखी पिण्याचे पाणी, घरगुती वापर, उद्योग यांच्यानंतर शेती असा आहे. प्रत्येकाला उपजिविकेसाठी मोफत किंवा अल्पदरात पाणी मिळायला हवं. त्याची हमी हवी.(पुढील मजकूर पान 5)
(पान 3 वरून चालू) पाण्याचा वापर करताना ते कुणाला किती देतो आहोत याचाही विचार व्हायला हवा.
पाण्याच्या कार्यक्रमात लोक सहभाग हवा. पर्यावरणाची शाश्वतता जपत जलचक्र टिकवत पाणी वापरायला हवे.
पाणी पर्यावरणाने दिलेले साधन
व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प सुहास परांजपे यांनी गुंफले. त्यांचा विषय होता. "पाणी-पर्यावरण आणि विकास' आपल्या भाषणाच्या अगदी सुरुवातीस त्यांनी पाण्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल होण्याची गरज प्रतिपादन केली. पाणी हे नैसर्गिक साधन आहे हे खरेच पण तसे म्हणणे अपुरे ठरेल. पाणी हे पर्यावरण व्यवस्थेने दिलेले नैसर्गिक साधन असे म्हणायला हवे. तसे म्हटले की पर्यावरणाच्या प्राधान्यक्रमात पर्यावरणाचा मुद्दा फारच मागे आहे. पर्यावरण पाणी पुरवते म्हणून त्याची पाणी पुरविण्याची क्षमता टिकविणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमातील शेतीच्या क्रमाच्या पुढे उद्योगाचा क्रम लावला आहे. पण उद्योग म्हणजे काय? हे स्पष्ट करायला हवे. चपला बनवणारा छोटा चांभार म्हणजे उद्योग की बाटा कंपनी म्हणजे उद्योग हे स्पष्ट करायला हवे.
फायदा उद्योगांना नुकसान लोकांना!
पाण्याकडे पाहण्याचा तंत्रवैज्ञानिक दृष्टिकोन बदलायला हवा. यामुळेच नदीचे संपूर्ण पाणी अडवण्याचा प्रयत्न सुरू होतो त्यामुळे एक तर जलचक्र आपण तोडतो त्याचा परिणाम म्हणून किनाऱ्याकडच्या विहिरीचे पाणी खारट झाले आहे.
पाण्याचा विचार पुरवठ्याच्या बाजूनेच केला जातो. तो मागणीच्या बाजूने करायला हवा. शिवाय पाण्याचा परतावा कसा, कुठे, किती होतो हे पाहायला हवे. उद्योगांना 10% पाणी दिले तर तेवढेच मोजले जाते. पण त्या 10% पाण्यामुळे 25% पाणी नासवले जाते त्याचा विचार होत नाही. सरकारचे परताव्यावर नियंत्रण नाही. त्यामुळे फायदा उद्योगांना आणि नुकसान लोकांचे.
प्रदूषण नियंत्रण बोर्ड हे तर केवळ प्रदूषण निरीक्षण बोर्ड झाले आहे आणि निरीक्षणही बरोबर नोंदवले जात नाही.
निसर्गात एक चक्र सुरू असते. कच्चा माल घेऊन पक्का माल तयार करतो आणि पुन्हा तो निसर्गात जात असतो. हे चक्र आपण समजून घ्यायला हवं म्हणजे कोण निसर्गात काय टाकतो, कोण या चक्रात किती हस्तक्षेप करतो हे लक्षात येईल.
आपल्याकडे जमिनीला पाणी पुरविले जाते माणसाला नाही. त्यामुळे मोठे बागायतदार खूप पाणी वापरून गब्बर होतात. पाणी माणसाला पुरवले म्हणजे त्याचे योग्य वाटप करता येईल. नाहीतर पंप बसवण्याची, अधिक जमिनी घेण्याची क्षमता असलेले श्रीमंतच अधिक श्रीमंत होत जातील.
नदीजोड प्रकल्प करतानाही पुरवण्याच्या बाजूनेच विचार होतोय. पण असलेल्या पाण्याचे नियोजन होताना दिसत नाही. याला राजकीय अडथळे आहेत. पाणी आता आधी आर्थिक वस्तू आणि मग राजकीय वस्तू झाले आहे. राजकारणी ते हत्यार म्हणून वापरत आहेत. कॅलीफोर्नियाने 10 वर्षांत एकही नवा वीजप्रकल्प न उभारता तगड्या नियोजनातून बचतीतून गरजा भागवल्या. आपण त्याप्रमाणे विचार करायला हवा.
अप्रत्यक्ष पाण्याचा विचार व्हायला हवा
आपण प्रत्यक्ष वापरत असलेल्या पाण्याबरोबर अप्रत्यक्षपणेही खूप पाणी वापरत असतो. उदाहरणार्थ आपण जेवतो ते धान्य, भाज्या, डाळी पिकवण्यासाठी पाणी लागतं.कपड्यांसाठी पाणी लागतं. या पाण्याच्या वापराबाबतही आपण जागरूक व्हायला पाहिजे.
पर्यावरणाचा विचार हाच खरा विकासास साहाय्यभूत आहे हे असा विचार केल्यावर लक्षात येईल.
300 ठिकाणी ठिणगी पडण्याची शक्यता
व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प दत्ता देसाई यांनी गुंफले. "पाणी ः राजकारण व अर्थकारण' या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. त्यांनी संघर्षाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला. ते म्हणाले, पाणी पेटते आहे. जगभर साधारण 300 ठिकाणी पाण्यासंदर्भात ठिणगी पडण्याची शक्यता आहे. नव्या युगात पाण्यामागचे अर्थकारण व राजकारण महत्त्वाचे ठरणार आहे. आज युध्दापेक्षा विस्थापित होण्याचे "पाणी' हे मोठे कारण झाले आहे. जगभरातील पाणी मूठभरांच्या हाती देण्याचे घाटत आहे. युध्द नको म्हणून पाण्याचे ट्रेडिंग करण्याचा विचार सुरू आहे. युध्दावर असा अघोरी उपाय सुचवला जातोय. युध्द नको म्हणून, संघर्ष नको म्हणून असा विचित्र उपाय सुचविल्यास शांतता निर्माण होण्याऐवजी युध्दजन्य परिस्थितीच निर्माण होईल. गरिबांना नाडणारे असे उपाय करण्यापेक्षा चांगल्या अर्थाने आपण संघर्षाला सामोरे जायला हवा. गरीब भरडू नये यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. संघर्ष करूनच आता यावर उपाय योजना पाहिजेत. "संघर्ष वाईट' असा जो दृष्टिकोन आहे तो बदलायला हवा.
कंपन्यांचे राजकारण
पाण्याबाबत "युध्द किंवा बाजार' असे दोनच पर्याय असल्याचा खोटा प्रचार जगभर सुरू आहे. मोठमोठ्या कंपन्यांचे तथाकथित तज्ज्ञ बारा बारा हजारांच्या संख्येने जमून पंचतारांकित हॉटेलात जमून पाण्यावर हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पाण्याचा बाजार करून प्रश्न सुटेल असे त्यांचे म्हणणे आहे ते सर्वथा खोटे आहे. आज शीतपेयांच्या कंपन्या शीतपेयांपेक्षा पाण्यातून जास्त पैसा कमावत आहेत.
एकूण सामाजिक स्थितीच अशी झाली आहे की फक्त राजकारणीच कारणीभूत आहेत, असे म्हणून चालणार नाही. शिक्षण, आरोग्य, पाणी, शेती ही सामाजिक विकासाची क्षेत्रे आता गुंतवणुकीची क्षेत्रे झाली आहेत. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आज 95% पाणी लोकांच्या मालकीचे आहे ते ताब्यात घेऊन बाजारात विकण्याचा घाट घातला जातो आहे.
जगभर विषमता होती आणि आहे. "आहे रे आणि नाही रे' हे दोन गट सांगितले जातात. आता पाणी आहे आणि पाणी नाही असे गट होतील. पैसे असतील तर पाणी मिळेल अशी स्थिती येऊ नये आणि पाण्यावरून देशादेशांत, जातीजातींत आणि भाषाभाषांत युध्द पेटू नये असे वाटत असेल तर हा अतिवेगाने होऊ घातलेला चुकीचा बदल वेळीच थोपवायला हवा.
पाणी पेटणे ही परिवर्तनाची नांदी
पाण्याचे आपण मूल्य ओळखायला हवे; पण त्यावर किंमत लावायला नको. मूल्य व किंमत या वेगळ्या गोष्टी आहेत. हिवरेबाजार, राळेगणसिध्दी येथे पाण्याचे मूल्य ओळखले गेले आहे. ग्रामीण भागांत प्रतिडोई 50 लिटर पाणी तर शहरी भागात 150 लिटर पाणी असा आपल्याकडे नियम आहे. हा ग्रामीण जनतेवर अन्याय आहे. पाणी पेटू लागले आहे. पाण्याचे हे पेटणे सामाजिक संघर्षाचीच नव्हे तर परिवर्तनाची नांदी आहे, असे त्यांनी समारोप करताना सांगितले.
पाण्याचे हे अनोखे षडयंत्र वेळीच थोपवायचे असेल तर आपण सर्वांनीच आता त्या दिशेने विचार करण्याची वेळ आली आहे तेव्हा सावधान! पाणी पेटते आहे!!

Monday, January 24, 2011

तीन लेख

ज्वाला आणि फुले
आता माझ्यासमोर हे दोन कवितासंग्रह आहेत. पहिला आहे यशवंत मनोहर यांचा "उत्थानगुंफा' आणि दुसरा आहे प्रशांत असनारे यांचा "मीच माझा मोर'! 84व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ग्रंथदालनातून मी जे मोजके संग्रह घेऊन आलो त्यातले हे दोन संग्रह मी सध्या वाचतो आहे. पहिला आहे कोल्हापुरी रस्स्यावर आलेल्या कटासारखा झणझणीत आणि दुसरा चांगल्या तापवलेल्या दुधावरच्या सायीसारखा! मी मनमुराद चाखतो आहे या दोन्ही चवी आलटून पालटून!
यशवंत मनोहर लिहितात-
"मला मान्य आहे फक्त आता,
माझ्यापुढची अटळ युद्धभूमी,
तिथे प्रथमच जमीनदोस्त होणारी,
तुमची संस्कृती,
तुमचा परमात्मा,
तुमचे अध्यात्म,
तुमची मंंदिरे,
ही तुमची समग्र शस्त्रागारे,
आणि त्यांचे लाडके मायबाप तुम्ही.'
आणि प्रशांत असनारे लिहितात-
झाली तयारी पूर्ण?
तुझा चाकू कुठाय?
हा असा बोथट का?
नीट धार करून घे-
तुझं पिस्तुल व्यवस्थित आहे ना?
साफ केलं?
ठीक आहे,
मग आता लोड करून ठेव.
तुझा हा वस्तरा असा का?
जुना वाटतोय,
नवीन घे
उगाच रिस्क नको!
आणि...
... आणि हे काय?
एवढी जय्यत तयारी सुरू असताना
हा कोण मूर्ख
माऊथऑर्गन वाजवतोय?
असू दे! असू दे!
तोही खिशात असू दे
कुणी सांगावं-
कदाचित तोच उपयोगी पडेल!
पाऊस हा कवींचा आवडता विषय आहे. नव्हे पाऊस हा कवितेचा अपरिहार्य विषय आहे. हे दोन कवी पावसाविषयी काय म्हणतात पाहा- यशवंत मनोहर लिहितात-
कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही
सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे
कालपर्यंत पावलांनी रस्त्यांपाशी तक्रारी मांडल्या नाहीत
झाडे करपली. माथी हरपली.
नदीच्या काठाने मरण शोधीत फिरलो
आयुष्याच्या काठाने सरण नेसून भिरभिरलो
कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही.
प्रशांत असनारे लिहितात-
आताशा मोर केव्हाही नाचतात
मागे एकदा असंच झालं होतं
बरेच दिवस पाऊस आलाच नाही.
अचानक आला तेव्हा
मोर चक्क झोपले होते!
अचानक आलेला पाऊस पाहून
ते उठले,
नाचू लागले.
पण त्यांची जड पावलं ठेक्यात पडलीच नाहीत.
पिसाऱ्यांची पिसं तर
एकमेकांत अडकलेली
तेव्हापासून मोरांनी ठरवलंय
मूड आला की नाचून घ्यायचं-
पावसाचा काय भरवसा?
प्रतीक म्हणून झाडांचा वापर प्रत्येक चांगला कवींने कोणत्या ना कोणत्या कवितेत केलेला आढळतोच. या दोन कवींनी घडविलेली ही झाडांची प्रतीके पाहा.
यशवंत मनोहर लिहितात-
पोळल्या झाडांनी। एक व्हावे झणी
दंडेलीला अग्नी। द्यावयाला।।
प्रशांत असनारे लिहितात-
गुरुजींनी सणसणीत छडी मारली
त्याच्या गोऱ्यापान हातावर
तेव्हा न कळवळता तो पुढे म्हणाला,
गुरुजी, हे पहा,
तुम्ही मारलेल्या छडीचा हा हिरवा वळ
अगदी कसा दिसतोयः
झाडाला नुकत्याच फुटलेल्या कोवळ्यापिवळ्या पानासारखा!
या दोन्ही कवींच्या कविता मला तेवढ्याच भावल्या. यातलं डावंउजवं कुणी करू नये. कारण काळजात जाळ पेटतो तेव्हाच नव्या माणसांच्या जन्माची क्रांती होते आणि काळ वाईट असतो तेव्हा हेच काळीज कवेत घेऊन माणसाचं रक्षण करतं. ज्वाला आणि फुले या दोन्ही गोष्टी या काळजाच्याच. म्हणूनच त्या कवितेचा विषय होतात. भूक लागली म्हणजे भाकरी हवी. त्या भाकरीसाठी जाळ हवा. पण पोट भरलं म्हणजे फुलाची ओढ लागते. भूकलेल्याला भाकरीशिवाय आणि भरलेल्याला फुलाशिवाय जगणंच अवघड होऊन जातं.
म्हणूनच तर ज्ञानदेवाने आत्मतेजाचा मोगरा फुलविला आणि तुकोबाने आत्मतेजाचा वणवा पेटवला.
आज ही त्यांचीच दोन बाळं आपल्या तेजाने तेच काम करीत आहेत. आम्हा रसिकजनांना दुसरं का हवं असतं? याहून निराळं?
- वैभव चाळके.


असीम धैर्याने
तिने अन्यायाला विरोध केला!
मुख्तार माई ही पाकिस्तानातील मीरवाडा या खेडेगावातील एक शेतकरी स्त्री. तलाक झालेली. तिला वाचता येत नव्हतं. सराईकी ही एकच भाषा ती बोलू शके. शिक्षणाची आवड मात्र होती. म्हणूनच ती आजूबाजूच्या मुलांना कुराण शिकवी. तेही तिला वाचता येत नसे. ते तिला पाठ होते. ती तसे मुलांना शिकवत असे. पण एक दिवस तिच्या भावाने शेजारी राहणाऱ्या मुलीवर अत्याचार केल्याचा खोटा आरोप ठेवून गावपंचायतीने त्या बदल्यात मुख्तार माईवर बलात्कार करण्याची सजा सुनावली.
मुख्तार माई दलित कुटुंबातील होती. शेजारी राहणाऱ्या मस्तोई या उच्च समाजातील लोकांकडून या समाजाला नेहमीच अत्याचार सहन करावे लागत. मुख्तार माईंवर पंचायतीच्या सांगण्यावरून बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिने आत्महत्या करावी अशीच सर्वांची अपेक्षा होती. मुख्तारनेही तसाच विचार केला होता. पण एका क्षणी तिला आपण आपल्यावरील अत्याचाराचा बदला घ्यावा वाटला आणि ती लढायला सज्ज झाली.
पोलिसांनी पुन्हा पुन्हा खोटी कबुली द्यायला सांगूनही तिने न्यायालयासमोर खरी गोष्ट सांगितली. पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील एका खेड्यातील एका अशिक्षित बाईने केलेले हे साहसी कृत्य मग जगभरातील वृत्तपत्रातील हेडलाईन ठरले. जगभरातील मानव हक्कवाले तिच्या मदतीला आले. तिची कायद्याची लढाई सुरू झाली.पोलीस संरक्षण मिळाले. खालच्या कोर्टात तिच्यावर बलात्कार करणाऱ्यांपैकी काही जणांवर आरोप सिध्द होऊन त्यांना सजा झाली. काही जण सुटले.खटला पुढच्या कोर्टात सुरू झाला. तिथे फक्त एकाला जन्मठेपेची सजा झाली. बाकीचे सुटले. मुख्तार माई आता हुशार झाली होती. तिने थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत धाव घेतली. मग सुरक्षिततेच्या कारणांखाली त्या तिघांना आणि काही जणांना अटक करण्यात आले. आणखी वरच्या न्यायालयात खटला सुरू झाला. या प्रकरणाची सर्वत्र चर्चा झाल्यावर सरकारने तिला पाच लाखांची मदत दिली. त्यातून मुख्तार माईने मुलींसाठी शाळा काढली. आपल्याप्रमाणे अन्य कुणावर असा प्रसंग येऊ नये यासाठी शिक्षणप्रसार व्हायला पाहिजे. मुली शिकल्या तरच त्यांच्यावरचे अन्याय कमी होतील आणि झाले तर त्या त्यास विरोध करण्यास सक्षम होतील. हे ओळखून मुख्तार माईने मुलींसाठी शाळा काढली. स्वत: शिकलेली नसल्यामुळे अनंत अडचणी सोसाव्या लागल्या तशा इतरांना लागू नयेत म्हणून तिने हे नवे आव्हान स्वीकारले.
बलात्कार झाला की त्या स्त्रीने आत्महत्या करावी, असा जिथे संकेत आहे तिथे मुख्तार माई मोठ्या हिमतीने लढली. एका असामान्य अशा न्यायाधीशांसमोर ही केस सर्वप्रथम आली. त्याने दाखविलेल्या न्यायबुध्दीने मुख्तार माईला मार्ग दिसला आणि एक लोकविलक्षण खटला उभा राहिला. पाकिस्तानातील अन्यायग्रस्त महिलांना समजून घेणारी एक माई अर्थात मोठी बहीण मिळाली. मुलींच्या शिक्षणासाठी एक शाळा उभी राहिली.
मुख्तार माईने जगभर जाऊन व्याख्याने दिली. भूकंपग्रस्तांसाठी निधी जमविला. देशोदेशीच्या संस्थांनी तिचा सत्कार केला. ती जणू अन्यायाविरुध्द लढण्याची जगभरातील महिलांची प्रेरणा ठरली. तिने "इन द नेम ऑफ ऑनर' नावाचे आत्मचरित्रही लिहिले आहे. तिच्यावर एक सिनेमाही आला आहे. आपल्या आत्मचरित्रात मुख्तार माईने ही सगळी गोष्ट सविस्तर लिहिली आहे.
- वैभव बळीराम चाळके



अमाप देणं देणाऱ्या ओठांवरच्या ओळी
"गाण्याने श्रम वाटतात हलके हेही नसे थोडके'असे कवींचे कवी केशवसुत यांनी म्हटले आहे. याचा अर्थ गाण्याने अन्य अनेक महत्त्वाच्या गोष्टी साध्य होतात आणि त्याच वेळी गाणे गायल्याने श्रम हलके वाटतात. श्रम हलके वाटायला लागणे हीही एक महत्त्वाचीच गोष्ट आहे.
केशवसुतांनी सांगण्यापूर्वी गाण्यातली ही जादू मला चांगली अवगत होती. म्हणजे केशवसुतांनी फार पूर्वी सांगून ठेवलेले असले तरी ते आम्हाला कळले नव्हते. ते कळण्यापूर्वीच आम्ही गाण्याने श्रम हलके करीत होतो.
कोकणातल्या दुर्गम खेड्यात मी लहानाचा मोठा झालो. त्यामुळे जातं ओढताना, भात कापताना, ओझं उचलताना आम्ही सारे गाण्याचाच आधार घेत होतो.
मला आठवतं शाळेत असतांना कविता आणि व्याकरणातील अलंकर, वृत्तांची उदाहरण म्हणून असलेल्या काव्यपंक्ती मला तोंडपाठ होत्या. तासभराचा पायी प्रवास करताना, अभ्यास करून कंटाळल्यावर मी त्या सर्व कविता एकामागून एक म्हणत असे-
छानी माझी सोनुकली ती
कुणाकडे गं पाहत होती
कोण बरे त्या संधेतून
हळूच पाहते डोकावून
तो रवी का गोजिरवाणा
आवडला आमुच्या राणींना
हासहासली या वचनांनी
साधी, भोळी ती फुलराणी...
या फुलराणी कवितेतल्या ओळींपासून
पोर खाटेवरी मृत्यूच्याच दारा
कुणा गरिबाचा तळमळे बिचारा
दूर आई राहिली कोकणात
सेविकेचा आधार एक हात
किंवा
आम्हाला वगळा गतप्रभ झणि होतील तारांगणे
आम्हाला वगळा विकेल कवडी मोलावरी हे जिणे
पर्यंत आणि
पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई
पालखीत कोण आम्हा पुसायचे नाही
पासून
तळ्याकाठी गाती लाटा
लाटामध्ये उभे झाड
झाडावर धिवराची
हाले चोच लाल जाड
पर्यंत किती तरी काव्यपंक्ती मी तेव्हा म्हणत असे. आज त्यांच्यात आणखी भर पडली आहे. कोणत्याही कामात असताना अशा ओळी माझ्या तोंडी असतात. हिंदी सिनेमा संगीताचे सुवर्णयुग आम्ही अनुभवलं नाही. भावगीताची जादूही आमच्यापासून कोसो मैल दूर राहिली. पण पाठ्यपुस्तकातल्या या कवितांनी आणि आरत्या, ओव्या, नमन, जाकड्या, टिपऱ्या, फुगड्या, भजनादी कार्यक्रमांतून गायल्या गेलेल्या गाण्यांनी श्रम हलके करता करता आमच्या जीवनाला नवे आयाम दिले. शास्त्रीय संगीतातल्या चिजा आजही आम्हाला कळत नाहीत. पण लोकसंगीताचा केवढा तरी गावरान मेवा आमच्या कानात साठवलेला आहे.
"तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख' हा अभंग धावत्या गतीने आणि विलंबित गतीने अशा दोन प्रकारे आमच्या कानांत अखंड गुंजत असतो. "अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा। दोन्ही थडा भरली चंद्रभागा।।' किंवा शंभर टाळांसोबत घुमणारा "विठोबा तुझा मला छंद। तुझा मला छद। कपाळी केशरी गंध।।' हे गजर आणि "सोंबा या देवा तू माझा सारथी देवाची आरती ओवाळू ये ओवाळू ये।।' सारखी आरती यांनी आमचं भावविश्व केवढं समृध्द केलं आहे.
चंद्रकुळ माझे माहेर माहेर। घाटी डोंगर माझे सासर सासर।। किंवा आंबा पिकतो रस गळतो। कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो। अशी स्त्रीगीते यांनी आम्हाला अमाप देणं दिलं आहे.
उत्तरोत्तर स्मरणसाखळीला नवनवी गाणी जोडली जात आहेत. श्रम तर हलके वाटतातच, पण त्यापलीकडे मोजता न येणारं, सांगता न येणारं बरंच काही देत आहेत.
अलीकडेच शाळेत जाण्यास उत्सुक असलेल्या माझ्या बाळाला शिकवता शिकवता "पुशी कॅट पुशी कॅट' ही इंग्रजी कविताही मला पाठ झाली आहे. ती इंग्रजीत म्हणताना बाळाला मजा येते तशी मला येत नाही. मी "प्यार का मारा' असतो ना तसा मी "मराठी का मारा' आहे. म्हणून मी त्या कवितेचं मराठी भाषांतर करून घेतलंय-
पुशी कॅट, पुशी कॅट
होतीस ग कुठे?
गेले होते लंडनला
राणीच्या भेटे!
पुशी कॅट पुशी कॅट
तिथे काय केले?
खुर्चीखालच्या उंदरालाच
घाबरून गेले!
बाळाला कविता म्हणून दाखवून झाल्या की मीही कविता गुणगुणत असतो आणि खुर्चीखालच्या उंदरांना घाबरण्यात समस्त मांजरांची जिंदगीची बरबाद होतेय हे पाहून हळहळतो. (उंदरांनो, या मांजरांनी नखं काढली तर तुमची खैर नाही हे मात्र विसरू नका.) गाण्याने श्रम हलके वाटण्यापलीकडे जे मिळतं असं मी म्हणतो ना ते हेच!
मग गाताय ना माझ्याबरोबर?
-वैभव बळीराम चाळके

Saturday, January 1, 2011

जागतिकीकरणात हरवलेला चेहरा शोधायला हवा!!

संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांचे प्रतिपादन
नव्या आसूडाची निर्मिती हेच संमेलनाचे प्रयोजन!
जागतिकीकरणात हरवलेला चेहरा शोधायला हवा!!
स्वातंत्र्यवीर सावरकरनगरी, ठाणे, ता.25- ज्या ठाणे जिल्ह्यातील वांगणी गावात बसून महात्मा ज्योतिबा फुले यांनी "शेतकऱ्यांचा आसूड' लिहिला आणि इंग्रज सरकारला महापूर, महामारी, महायुद्धात फक्त शेतकरीच का मरतो? असा प्रश्न विचारला त्या ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या या संमेलनाने नव्या आसूडाची निर्मिती करावी, तेच या संमेलनाचे प्रयोजन आहे, असे प्रतिपादन 84व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी आज येथे केले. कोठे महात्मा फुल्यांच्या प्रश्नाचे उत्तर 140 वर्षांत आपण मिळवू शकलो नाही ते शोधण्याचे काम साहित्याने केले पाहिजे. जागतिकीकरणाच्या रेट्यात माणसाचा चेहरा हरवतो आहे, तो चेहरा शोधून देण्याचे काम साहित्यिकांनी करायला हवे असेही ते आपल्या भाषणात म्हणाले.
आज सकाळी या संमेलनाचे मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात उद्‌घाटन झाले. मावळत्या अध्यक्षांच्या छोटेखानी भाषणानंतर संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी माणसाचे जगणे आणि साहित्य याचा नेमका आलेख काढत साहित्य आणि माणसाचे जगणे यात अंतर पडत चालले असल्याचे विधान केले. हे अंतर संपवणे गरजेचे आहे आणि त्यासाठी काळाची चाहूल ओळखणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
जागतिकीकरणामुळे जीवनाला प्रचंड वेग आला आहे. आयुष्याचं नाव स्पर्धा झालं आहे. त्यात वस्तूंपुढे माणूस छोटा झाले आहे. पण हे सारं दुर्देवाने आपल्या साहित्यात प्रतिबिंबीत होत नाही. जागतिकीकरणाचे आकलन करून घेण्यास आपल्याला उशीर झाला आहे. या नव्या जगासाठी नव्या तत्त्वज्ञानाची पायाभरणी करण्याची आज आवश्यकता आहे. सौंदर्य आणि जीवन यातील जीवन महत्त्वाचे, मी जीवनालाच प्राधान्य देतो. आदिवासी लोक भिंतींवर सुंदर चित्रे काढतात, पण ते चित्रासाठी भिंत बांधीत नाहीत हे लक्षात घ्यायला पाहिजे.
उत्तम कांबळे भाषणाला उभे राहिले तेव्हा संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या तेव्हा ते म्हणाले, तुमचा आवाज ऐकला. माझ्या जन्मभूमीतला आवाज ऐकला आणि आनंद झाला. संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न बरीच वर्षे लोंबकळत राहिला तो आपण आता सोडवून टाकला पाहिजे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या परंपरेला अभिवादन करून उत्तम कांबळे यांनी आज भाषणाला सुरुवात केली. उत्तरोत्तर भाषण अधिक रंगत गेले.
पृथ्वी शेष फण्यावर उभी आहे असे सांगितले जात होते. मग ती राबणाऱ्याच्या तळहातावर असल्याचे सांगितले जाऊ लागले. आता ती संगणकाच्या पडद्यावर आली आहे, याचे भान आपण ठेवायला हवे. राजकारणाचा मी द्वेष करीत नाही आणि त्याच्याशी अतिरेकी गळेबाजीही करीत नाही. राजकारणाचा द्वेष केल्यानेच आपल्याकडे राजकीय महाकादंबरी निर्माण झाली नाही. महानाट्य निर्माण झाले नाही. आपण मी म्हणतो तेच प्रमाण, ही कृती सोडून दिली पाहिजे. मराठीच्या विविध बोली परिघावर ताटकळत न्याय मागत आहेत. आज आजूबाजूला वैचारीक लढे दिसत नाहीत. मी लढ्यांना साद घालतो आहे. वैचारीक दुष्काळ आपल्याला परवडणार नाही. जी भाषा जीवनाची होत नाही, तिच्यासाठी चर्चा कराव्या लागतात. भाषा व संस्कृती शासन निर्माण करीत नाही. तर त्यांना गतीशील करण्याचे काम शासनाचे आहे. अशी ठाम विधाने करीत साहित्याचाही आपण गांभीर्याने विचार करायला हवा असे सांगत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
ठाण्यात या निमित्ताने साहित्यांची मांदियाळी जमली आहे. दुपारनंतरही विविध परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी पहिला दिवस साजरा झाला. या संमेलनात विधान परिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरे, आमदार एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर आणि महापौर अशोक वैती आदी राजकीय नेते सामील झाले होते.