तरुणांसाठी तुकाराम
Thursday, December 28, 2023
तरुणांसाठी तुकाराम...................... आकाशवाणीसाठी लिहिलेले लेख
मराठी शायरी ः भाऊसाहेब पाटणकर
मराठी शायरी ः भाऊसाहेब पाटणकर
वैभव चाळके
उर्दूत लोकप्रिय असलेली शायरी मराठीत लिहीत असताना भाऊसाहेबांनी तिचा आत्माच कसा मराठी राहील याची काळजी घेतली. याशिवाय शायरीचे तंत्र त्यांनी नेमके साध्य केले आहे. रचनेतील रसिकाला धक्का देण्याचे तंत्र त्यांनी इतके चोख अवगत केले की, तेच त्यांच्या यशाचे गमक ठरले. २८ डिसेंबर हा भाऊसाहेबांचा जन्मदिवस. त्यानिमित्त...
मराठी कवितेच्या महामार्गात काही नितांत सुंदर वळणे आहेत. रॉय किणीकरांच्या रुबाया आणि भाऊसाहेब पाटणकर यांची शायरी ही त्यातील दोन महत्त्वाची उदाहरणे. रसिकतेचा सोपान चढत असताना भाऊसाहेबांची शायरी ‘भेटली’ म्हणजे जीव अगदी हरखून जातो. महाविद्यालयात शिकत असताना मुंबई महानगरात कुठे कुठे होणाऱ्या काव्यमैफलींना हजेरी लावण्याच्या काळात मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, वसंत बापटांपासून संदीप खरे यांच्यापर्यंत नानाविध कवींची सादरीकरणे ऐकायला मिळाली. अशाच एका मैफलीनंतर रात्री परतताना एक ज्येष्ठ मित्र म्हणाले, ‘‘तू भाऊसाहेब पाटणकर यांची शायरी वाचली आहेस का? नसली वाचलीस तर नक्की वाच. तुला आवडेल.’’ तो सल्ला शिरोधार्य मानून दुसऱ्या दिवशी ग्रंथालयातून भाऊसाहेब पाटणकरांचा संग्रह आणला आणि वाचून काढला. तेव्हा चढलेली नशा आज २५ वर्षे होऊन गेली तरी उतरलेली नाही... ती कधी उतरेल, असे वाटत नाही!
भाऊसाहेब पाटणकर यांनी मराठीत लिहिलेली शायरी हे मराठी साहित्यातील एक सुंदर लेणे आहे. मराठी गजलेपेक्षा ही शायरी वेगळी आहे. सुरेश भटांनी ज्याप्रमाणे मराठी गजल लिहिली, तशी मराठी शायरी लिहिण्याचे काम भाऊसाहेब पाटणकर यांनी केले. येथे मराठी हा भाषावाचक शब्द नसून तो संस्कृतीवाचक, गुणवाचक शब्द आहे. ‘मठोमती मुंबाजींना कीर्तने करू द्या... विठू काय बेमानांना पावणारा नाही’ असे सुरेश भट म्हणतात, तेव्हा गजलेतील तो शेर केवळ मराठीत आहे, म्हणून मराठी नाही. तो मराठी संस्कृतीतून निर्माण झालेला वाक्प्रचार घेऊन येतो. म्हणून सुरेश भटांची गजल ही अस्सल मराठी गजल आहे. अगदी त्याचप्रमाणे उर्दूत लोकप्रिय असलेली शायरी मराठीत लिहीत असताना भाऊसाहेबांनी तिचा आत्माच कसा मराठी राहील याची काळजी घेतली. याशिवाय शायरीचे तंत्र त्यांनी नेमके साध्य केले आहे. रचनेतील रसिकाला धक्का देण्याचे तंत्र त्यांनी इतके चोख अवगत केले की, तेच त्यांच्या यशाचे गमक ठरले. काही हिंदी चित्रपट आणि काही गाणी जशी आपण पुन्हा पुन्हा ऐकली तरी आपल्याला त्यांचा कंटाळा येत नाही किंबहुना पुन्हा पुन्हा नवा आनंद देण्याचे काम त्या कलाकृती करतात, त्याच गुणवत्तेची ही शायरी आहे. यातली भाषा इतकी सोपी... इतकी प्रासादिक आहे की, कोणत्याही सामान्य वाचकाला या शायरीतील अर्थ सहज उलगडतो... भावतो... आणि दाद द्यायला भाग पाडतो.
इष्काच्या गोष्टी
एरवी शायरीतील प्रेमिक म्हणजे पुन्हा पुन्हा प्रेयसीच्या पायाशी बसून प्रेमाची आळवणी करणारा असतो. भाऊसाहेबांचा प्रेमिक मात्र आपला सन्मान सांभाळून प्रेम करणारा आणि तशीच वेळ आली तर त्या सन्मानासाठी प्रेम उधळून लावणारा आहे. त्यांनीच म्हटले आहे,
‘हसतील ना कुसुमे जरी ना जरी म्हणतील ये
पाऊल ना टाकू तिथे बाग ती अमुची नव्हे
भ्रमरा परी सौंदर्य वेडे, आहो जरी ऐसे अम्ही
इष्कातही नाही कुठे, भिक्षुकी केली अम्ही’
मराठी माणूस मोडून पडेल; पण वाकणार नाही, असे त्याचे जे वैशिष्ट्य सांगतात, ते इथे बेमालूमपणे सहज काव्यात उतरले आहे.
...
कल्पनेच्या उंच भराऱ्या
कल्पनाविलास हा भाऊसाहेबांच्या काव्याचा अगदी खास गुण आहे. त्यांच्या अनेक रचनांमध्ये तोंडात बोट घालायला लावणाऱ्या कल्पनांचा खजिना आपल्याला सापडतो. जीवन व्यवहार आणि जीवन तत्त्वज्ञान हे त्यांचे चिंतनाचे विषय आहेत. ‘जीवन’ या रचनेत जीवनाच्या कठोर वास्तवाबद्दल त्यांनी म्हटले आहे...
‘सारे मला विसरोत, त्याचे वाईट ना वाटे मला
वाटते वाईट, त्यांना विसरता ये ना मला
वाचला वेदांत आणि क्षणमात्र त्यांना विसरलो,
दोस्तहो, दुसऱ्या क्षणी मी वेदांत सारा विसरलो’
साने गुरुजी यांनी त्यांच्या एका कवितेत ‘फक्त माझे अश्रू नको येऊ देवा, हाचि ठेव ठेवा जन्मभरी’ असे म्हटले आहे. भाऊसाहेबांनी म्हटले आहे...
‘काय माझ्या आसवांनी काय मज नाही दिले
ते दिले जे ईश्वराने योग्यासही नाही दिले’
आपल्या इथल्या जीवनाबद्दल ते इतके समाधानी आहेत की, त्यांना या जीवनापुढे स्वर्गही फिका वाटतो आणि मग त्यांच्यातील मिश्कील शायरसुद्धा याविषयी टिप्पणी करतो...
‘आलो तुझ्या दुनियेत नव्हतो चोर वा डाकू आम्ही
एकही ना चीज इथली घेऊन गेलो आम्ही
तोही असो आमच्यासवे आणिला ज्याला इथे
भगवान अरे तो देह मी टाकून गेलो इथे’
...
शायरीतील विनोद
भाऊसाहेबांनी त्यांच्या शायरीतून विनोदाची अशी पखरण केली आहे की, आपण प्रसन्न होऊन जातो. रोजच्या व्यवहारातील छोट्या-छोट्या गोष्टीतून त्यांनी विनोद निर्माण केला आहेच; पण थेट मृत्यूशीही पंगा घेतलेला दिसतो.
‘चंद्रमा हासे नभी शांत शीतल चांदणे
आमच्या आहे कपाळी अमृतांजन लावणे
नसतो तसा नाराज मी
आहे परी नशिबात आपल्याच हाती लावणे’
किंवा
‘पत्रे तिला प्रणयात आम्ही खूप होती धाडली
धाडली होती अशी की नसतील कोणी धाडली
धाडली मजला तिनेही काय मी सांगू तिचे
सर्व ती माझीच होती एकही नव्हते तिचे’
किंवा
‘मृत्युची माझ्या वदंता सर्वत्र जेव्हा पसरली
घबराट इतकी नर्कलोकी केव्हाच नव्हती पसरली
प्रार्थति देवास, म्हणती सारे आम्हाला वाचवा
वाचवा अम्हास आणि पावित्र इथले वाचवा’
किंवा
‘तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद्द झालो खूश मी
आज पण कळले मला ती ऐसेच बघते नेहमी’
किंवा
‘भास्करा, येते दया मजला तुझी आधीमधी
पाहिली आहेस का तू, रात्र प्रणयाची कधी’
आणि मग सूर्य त्यावर शाहिराला उत्तर देतो...
‘आम्हासही या शायराची कीव येऊ लागते
याच्या म्हणे प्रणयास याला रात्र येऊ यावी लागते’
ना म्हणू की इष्क त्याला आहे जराही समजला
इष्कातही दिवसास की जो रात्र नाही समजला’
...
ईश्वराशी संवाद
संत तुकारामांनी 'सुख जवापाडे आणि दुःख पर्वताएवढे' असे सांगून ठेवले आहे. भाऊसाहेबांनी तेच शायरीत कसे सांगितले आहे पाहा...
‘भगवंत तुला जर हाय ऐसे नाव असते लाभले
आम्हासही कोटी जपाचे पुण्य असते लाभले.
पाहुनी हा जपयज्ञ तुजला संतोष असता वाटला
आम्हासही रडण्यात नुसता मोक्ष असता लाभला’
ज्ञानेश्वरांची चराचरांत ईश्वर असल्याची कल्पना मनात आणा आणि मग भाऊसाहेबांच्या या चार ओळी ऐका.
‘तुमचा आहे अंश भगवान मीही कुणी दुसरा नव्हे
लोळण्या पायी तुझ्या तुमचा कोणी कुत्रा नव्हे
हे खरे की आज माझे प्रारब्ध आहे वेगळे
ना तरी आपणास भगवंत काय होते वेगळे’
‘यदा यदाही धर्मस्य’ हे आपणा सगळ्यांना माहिती आहे. भाऊसाहेबांनी ते तिरकस पद्धतीने मांडले आहे. ते म्हणतात...
‘निर्धारण्या दृष्टास तुजला त्रास घ्यावा लागला
देह घ्यावा लागला, अवतार घ्यावा लागला’
याशिवाय जीवनाला गाडीची उपमा देऊन त्यांनी मांडलेले शेर मुळातून वाचण्यासारखे आहेत. इष्क, शृंगार किंवा प्रेम याबद्दलच्या त्यांच्या रचना तेव्हाही लोकप्रिय झाल्या आणि आजही कवितेच्या रसिकांमध्ये लोकप्रिय होऊन राहिलेल्या आहेत. भाऊसाहेबांची प्रेम करण्याची एक स्वतःची रीत आहे आणि ती कुणाही रसिकाला मोहात पाडणारी आहे.
‘दोस्तहो, हा इष्क काही ऐसा करावा लागतो
ऐसे नवे नुसताच येथे जीव द्यावा लागतो
वाटते नागीन ज्याला खेळण्यासाठी साक्षात हवी
त्याने करावा इष्क येथे छाती हवी मस्ती हवी
ना म्हणून इश्कातले या सौंदर्य त्याला समजले
झाल्यावरी बरबाद ज्याला बरबाद झालो समजले’
...
लाखमोली संपदा
जिंदादिल, दोस्तहो, मराठी मुशायरा, मराठी शायरी आणि मैफिल ही त्यांची शायरीची पुस्तके प्रकाशित झाली. देशभर नानाविध ठिकाणी त्यांनी मैफली सादर केल्या. एक निष्णात वकील, सहा वाघांना लोळविणारे नेमबाज शिकारी आणि त्याच एकाग्रतेने रसिकाच्या वर्मा आपल्या शेरोशायरीतून नेम धरणारे भाऊसाहेब पाटणकर हे मराठी काव्याला पडलेले एक सुंदर स्वप्न आहे.
सरते शेवटी त्यांना त्यांच्याच शैलीत अभिवादन...
वाचली ही शायरी, गुणगुणलोही लाखदा
ही मराठीच्या घरातील लाखमोली संपदा
...
(काही अंश दैनिक सकाळमध्ये २८ डिसेंबर २०२३ रोजी प्रकाशित)
Monday, November 27, 2023
वंचितांचा शिक्षणदूत नीलेश निमकर
इं ग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्राबल्य वाढते आहे. नव्या पिढीला परदेशात जाण्यासाठी घडवणे हेच जणू शिक्षणाचे उद्दिष्ट आहे की काय, असे वाटू लागले आहे. असे असताना ग्रामीण भागातील वंचितांसाठी, दुर्गम भागातील आदिवासी, वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी धडपडणाऱ्या नीलेश निमकर यांचे काम नजरेत भरते. या कामात आलेल्या अनुभवांच्या आधारे आपले शिक्षणचिंतन मांडणारे त्यांचे महत्त्वाचे पुस्तक म्हणजे ‘शिकता- शिकवता’. या पुस्तकाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचाचा डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथाचा पुरस्कार मिळाला आहे. उद्याचा भारत उभारण्यासाठी खरे काम व्हायला हवे, ते शिक्षणक्षेत्रात. म्हणूनच अशा व्यक्तींच्या कार्याची दखल घ्यायला हवी.
नीलेश निमकर हे ‘क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट’ अर्थात ‘क्वेस्ट’ या संस्थेचे संस्थापक-संचालक आहेत. शिक्षण क्षेत्रात गेली २५ वर्षे कार्यरत असलेल्या निमकर यांना बालशिक्षणात विशेष रस आहे. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण आणि शिक्षकांचे प्रशिक्षण या क्षेत्रात त्यांचे विशेष योगदान आहे. अभ्यासक्रम विकासाच्या क्षेत्रातही त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. मोठमोठ्या शिक्षणसंस्थांमध्ये त्यांनी सल्लागार म्हणून काम केले आहे. ते मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणचे. आता कामासाठी पालघर तालुक्यातील वाडा येथे स्थानिक आहेत. त्यांचे शिक्षण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये झाले; मात्र चित्रकलेच्या आवडीतून ते आदिवासी पाड्यांवर गेले आणि अनुताई वाघ यांच्या कामाचा त्यांना परिचय झाला. तेथे रमेश पानसे यांच्या ‘ग्राममंगल’मध्ये त्यांनी आपल्या या क्षेत्रातील कामगिरीची सुरुवात केली. तेथे त्यांनी अनेक अभिनव उपक्रम राबवले. त्या अनुभवांतून पुढे त्यांनी ‘क्वेस्ट’ संस्थेची २००७ मध्ये स्थापना केली आणि तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या नावीन्यपूर्ण पद्धती आणि आगळेवेगळे उपक्रम राबवायला सुरुवात केली. पूर्व प्राथमिक ते आठवीपर्यंतच्या मुलांसाठी भाषा, गणित, विज्ञान हे विषय शिकवण्याच्या पद्धतींवर त्यांनी विशेष काम केले. त्यासाठी विविध अभ्यासक्रम तयार केले. लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या संस्थेने चालवलेल्या अभ्यासक्रमाला देशभरातून प्रतिसाद मिळाला होता. महाराष्ट्र सरकारच्या ‘आकार’ या बालशिक्षण अभ्यासक्रमाच्या रचनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ‘लिटरसी रिसर्च इन इंडियन लँग्वेज’ या टाटा ट्रस्ट आणि अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीच्या उपक्रमासाठी निमकर यांच्या संस्थेने भाषा संशोधनाचा संपूर्ण भार उचलला. लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्यावर मुलांचे जे शैक्षणिक नुकसान झाले ते नेमके किती आणि कसे झाले आहे आणि ते भरून काढण्यासाठी शिक्षकांनी काय करायला हवे, या विषयावर त्यांनी शोधनिबंध सादर केला. ‘शिकता शिकवता’ या पुस्तकापूर्वी त्यांनी लहान मुलांसाठी चित्रमय पुस्तके लिहिली आहेत. आता त्यांनी ग्रामीण, आदिवासी भागात शिक्षणाचे काम करताना आलेल्या विविध अनुभवांचे संकलन ‘शिकता शिकविता’मधून वाचकांसमोर ठेवले आहेत. ग्रामीण, आदिवासी मुलांना शिकवताना ते स्वतः कसे शिकत गेले याचे वर्णनही या पुस्तकात आले आहे. त्यांच्या लोकविलक्षण कामगिरीची दखल घेत २०११ मध्ये महाराष्ट्र फाऊंडेशन या प्रतिष्ठित संस्थेने त्यांना पुरस्कार देऊन गौरविले. महाराष्ट्रात यापूर्वीही शिक्षण क्षेत्रात अनेक प्रयोग झाले आहेत. तीच परंपरा निमकर पुढे नेत आहेत. ‘क्वेस्ट’च्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील अडीच लाख मुले आणि तब्बल आठ हजार शिक्षकांना शिक्षण, प्रशिक्षण दिले गेले आहे. ‘शिकता शिकवताना’च्या निमित्ताने उपेक्षित क्षेत्रात काम करताना आलेले अनुभव नव्या पिढीसमोर उपलब्ध झाले आहेत. त्यातून अनेकांना प्रेरणा घेता येईल.
(सकाळ, २७ नोव्हेंबर २०२३)
Sunday, November 12, 2023
नव लाख तळपती...
नव लाख तळपती... (12.11.23 सकाळ दीपपर्व पुरवणी पहिले पान)
(वैभव बळीराम चाळके)
दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करता करता इतरांच्या जीवनात आपल्याला काही प्रकाश पाडता आला तर तो पाडावा, असा संदेश देणारा हा सण आहे. आपण त्यासाठी एखाद्या पणतीप्रमाणे का होईना, पण प्रयत्न करायला हवा. शेवटी अंधार भेदण्याचे काम महत्त्वाचे आहे. तोच दिवाळीचा संदेश आहे.
दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. ‘तमसोऽमा ज्योतिर्गमय’ म्हणजे ‘अंधाराकडून प्रकाशाकडे चला’ असा संदेश देणारा सण आहे. त्यामुळे दिव्याला आणि दिव्यांच्या प्रकाशाला या सणामध्ये फार मोठे महत्त्व आहे. संपूर्ण भारतवर्षात हा सण साजरा केला जातो. त्यामुळे दिवाळीच्या दिवसात हा अवाढव्य भूप्रदेश रात्री विविध प्रकारच्या दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघालेला असतो. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी एका कवितेत ‘नवलाख तळपती दीप विजेचे येथ’ अशी कल्पना मांडली आहे. ती आणखी विस्तारून आपल्याला आपली कल्पना भव्य करावी लागेल, इतके दिवे दिवाळीच्या रात्री या भूपट्ट्यावर उजळत असतात.
दिव्या दिव्या दीपत्कार... असे म्हणत आपण लहानाचे मोठे होतो आणि मग केव्हा तरी आपल्याला ज्ञानेश्वरीतील तेजस्वी सृष्टीचा परिचय होतो. दिवे आणि प्रकाश आपल्या जीवनाला असे व्यापून राहिलेले असतात.
दिवाळीत घर आणि परिसर दिव्यांनी उजळून टाकतो. त्यासाठी आपण पणत्या वापरतो, निरांजन वापरतो, समया वापरतो, आकाश कंदील वापरतो आणि अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर हरतऱ्हेचे इलेक्ट्रिक दिवेसुद्धा वापरत असतो. आपल्याकडे दिव्यांचे किती तरी प्रकार आढळतात. आमचे एक मित्र मकरंद करंदीकर गेल्या पन्नास वर्षांपासून नानाविध दिवे जमा करण्याचा छंद जोपासत आहेत. सर्वाधिक दिवे जमवण्याचा विक्रमच त्यांच्या नावावर आहे. त्यांच्याकडील दिव्यांचा संग्रह पाहणे ही एक पर्वणीच असते. अनेक वर्षे दीप आमावस्येला ते या दिव्यांचे प्रदर्शन भरवत असतात.
माती, दगड, तांबे, पितळ, लोखंड, चांदी, सोने अशा नानाविध वस्तूंमधून दिवे साकारले जातात. आपल्या मंदिराबाहेर या दीपमाळा असतात, त्या दगडातून साकारलेल्या असतात. आपल्या रोजच्या वापरात चिमणी, कंदील असे दिवे असत. आता बल्ब, ट्यूब, एलईडी आले. विविध कामांसाठी विविध दिव्यांचा वापर आपण करत आलो आहोत. ध्यान आणि त्राटकासाठी छोटा दिवा वापरणारे आपण युद्धासाठी मशाली घेऊन बाहेर पडत होतो. तेथून इलेक्ट्रिक दिव्यांपर्यंत आणि त्यांच्याही पुढे महाप्रचंड झोतांपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. प्रकाश अर्थात अग्नी हा संपूर्ण तेजस्वी असतो. ज्ञानेश्वरीमध्ये दीपकळी धाकुटी असा उल्लेख आलेला आहे. या दीपककळीपासून म्हणजे छोट्या पणतीपासून ते थेट सूर्यापर्यंत आपल्याला प्रकाशाची नानाविध रूपे माहिती आहेत. सूर्य अंधःकार नाहीसा करतो, तेच काम इवलीशी पणतीसुद्धा करत असते. ‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ’ हा श्लोक आपण अनेकदा म्हटलेला असेल; पण अनेकांच्या हे लक्षातच येत नाही, की या श्लोकात श्रीगणेशाचे तेज कोटी सूर्याइतके प्रखर आहे असे म्हटले आहे. आपल्याला त्या तितक्या तेजाची कल्पना करायची म्हटले तरी ते अशक्य... श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूपदर्शन घडवले, तेव्हा प्रथम त्याला ते पाहण्याची दृष्टी दिली असे म्हणतात. आपल्याला या इतक्या मोठ्या तेजाची कल्पना करायची तर आधी आपली कल्पनाशक्ती विस्तारून घ्यावी लागेल.
दिवाळी या प्रकाशोत्सवात इतरांच्या जीवनात आपल्याला काही प्रकाश सोडता आला तर सोडावा, असा संदेश देणारा हा सण आहे.
Tuesday, November 7, 2023
मनस्वी लेखक
मनस्वी लेखक
आपल्या साहित्यनिर्मितीने केरळसह जगभरात मानसन्मान मिळविलेले मल्याळम भाषेतील ज्येष्ठ कथाकार ९२ वर्षीय टी. पद्मनाभन यांनी आजवर साहित्य क्षेत्रातील विविध पुरस्कारांना गवसणी घातली आहेच; पण त्यासोबत अनेक महत्त्वाचे पुरस्कार नाकारण्याचे धैर्यसुद्धा वेळोवेळी दाखवले आहे. लेखक हा मनस्वी असतो. त्याला आपला स्वायत्त अवकाश टिकवायचा असतो. याबाबतीत दक्ष असलेले पद्मनाभन् हेही त्यापैकीच. पण त्यामुळे सुरुवातीला ‘पुरस्कार नाकारणारा लेखक’ अशी त्यांची प्रतिमा झाली होती. अलीकडेच त्यांना केरळ सरकारच्या वतीने दिला जाणारा ‘केरळ ज्योती अवॉर्ड’ हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे नाव पुन्हा चर्चेत आले.
आजच्या जगात एकीकडे जग तंत्रज्ञानामुळे अगदी जवळ आले आहे, असे म्हटले जाते. परंतु माणसाला मात्र एक प्रकारचे एकाकीपण भेडसावते आहे. टी. पद्मनाभन यांच्या कथांमधून हा अंतर्विरोध कलात्मक रीतीने व्यक्त होतो. कायद्याचे शिक्षण घेऊन त्यांनी वकिली सुरू केली होती; पण त्यांचा मूळ पिंड लेखकाचा होता. तो त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. लिहिण्याची हौस त्यांना आधीपासूनच होती. पुढे त्यांच्या लेखनकलेला आणखी बहर आला. त्यांचे बालपण दारिद्र्यात गेले. कन्नूर या केरळातील एका छोट्या गावात पुथियिदथ कृष्णन नायर आणि देवकी (अम्मुकुट्टी) या दाम्पत्याच्या पोटी त्यांनी जन्म घेतला. ते काही महिन्यांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि आईवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. मद्रास लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. थालास्सेरी आणि कन्नूर या न्यायालयांमध्ये त्यांनी वकिली केली. याच काळात ते लेखक म्हणून घडत गेले. एफएसीटीचे अध्यक्ष एमकेके नायर या मोठ्या माणसाने पद्मनाभन यांना बोलावून घेतले. तेथे जाऊन त्यांनी विविध पदांवर काम केले. पुढे ते या कंपनीचे उपसरव्यवस्थापक झाले. १९८९मध्ये ते तेथून निवृत्त झाले. त्यांच्या पत्नी कल्लनमर्थोडी भार्गवी यांचा २०१४ मध्ये मृत्यू झाला आणि पद्मनाभन एकटे उरले. १९४८ मध्ये त्यांची पहिली कथा प्रकाशित झाली. आजवर त्यांनी शेकडो लघुकथा लिहिल्या आहेत. याशिवाय त्यांनी आपल्या जीवनातील विविध अनुभवांवर ‘माझ्या गोष्टी- माझे जीवन’ नावाचे एक चरित्रात्मक पुस्तकसुद्धा लिहिले आहे. त्यांच्या कितीतरी कथा विविध भाषांमध्ये भाषांतरित झाल्या आहेत. केवळ देशी भाषा नव्हे; तर रशियन, फ्रेंच, इंग्लिश आदी भाषांमध्येसुद्धा त्यांच्या कथा भाषांतरित झाल्या आहेत आणि तिथल्या रसिकांच्या पसंतीला उतरल्या आहेत. अत्यंत सरळ भाषेत लिहिलेल्या कथा हे त्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असल्याचे जाणकार सांगतात. प्रकाशम परथुन्ना ओरु पेनकुट्टी (तेजस्वी मुलगी, १९५५), ओरु कथाक्रिथु कुरिशिल (एका कथाकाराला सुळावर चढवले जात आहे, १९५६), माखन सिंघिन्ते मरनम (माखन सिंहचा मृत्यू, १९५८), काला भैरवन, गौरी (१९९३) आणि मरया (२०१७) या त्यांच्या प्रमुख साहित्यकृती आहेत. यातील ‘गौरी’ या त्यांच्या कथेवर १९८२ मध्ये दूरदर्शनने संगीतमय सादरीकरण केले होते. याच कथेवर पुढे त्याच वर्षी ‘कवियूर शिवप्रसाद’ नावाचा चित्रपटसुद्धा आला होता. माणसाचा एकटेपणा आणि हतबलता हे त्यांच्या अनेक कथांचे सूत्र असल्याचे समीक्षक सांगतात. पद्मनाभन यांनी आपल्या सुरुवातीच्या काळात अनेक पुरस्कार नाकारले. १९९६ मध्ये त्यांनी केंद्राचा साहित्य अकादमी पुरस्कारही नाकारला होता. अर्थात काही पुरस्कार त्यांनी स्वीकारलेसुद्धा. पण शेवटी अस्सल कलावंत हा पुरस्कारांच्या पलीकडचा असतो.
- वैभव चाळके सकाळ -नाममुद्रा -6.11.23
Tuesday, October 24, 2023
Monday, October 23, 2023
आकाशवाणी
(आशीष शेडगेच्या आग्रहाखातर आकाशवणीसाठी लिहिलेले लेख. हे लेख चिंतन सदरात 25 ते 28 मे 2023 या दिवशी प्रासारित झाले.
1.
मोबाईसाठी आचारसंहिता
पंचवीस तीस वर्षांपूर्वी आजच्यासारखी संवादाची साधने नव्हती. लँडलाईन आणि पीसीओचा जमाना होता. तेव्हा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी मुंबईतल्या कुठल्या कुठल्या गल्ल्यांत जावं लागायचं. वर्तमानपत्रात कार्यक्रमाची कुठेतरी जाहिरात दिसली की ती जपून ठेवावी आणि त्या दिवशी कार्यक्रमाला जावे असा त्या वेळेचा प्रघात होता. कधी पायपीट करत तर कधी बस-लोकलने प्रवास करत अशा शेकडो कार्यक्रमांना आम्हा दरवर्षी हजेरी लावत होतो. या कार्यक्रमांतून विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, शांता शेळके अशा कितीतरी ज्येष्ठ कवींना ऐकता आलं. अनेक लेखक, नाटककार, नट, संगीतकार आणि चित्रकारांना भेटता आलं. अर्थात त्यासाठी वेळ, पैसे आणि शारीरिक ताकद खर्च करावी लागली.
आता मात्र तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सारेच केवढे सोपे झाले आहे. आता तुम्हाला संदीप खरेची कविता ऐकायची असेल, रामदास फुटाणे यांची भाष्यकविता किंवा सलिल-कौशलचे गाणे त्यांच्या आवाजत एकायचे असले तर त्यांच्या क्रायकर्माची वाट पाहावी लागत नाही आणि आटापिटा करत कुठे कुठे पत्ता शोधत जावे लागत नाही. मोबाईल उघडलात की ही मंडळी क्षणार्धात तुमच्यासाठी सज्ज होऊन बसलेली दिसतात.
भीमराव पांचाळ यांचे गजल गायन, शांता शेळके यांची मुलाखत, वा. वा. पाटणकरांची जिंदादिली आणि वपु, पुल, मिरासदार अशी केवढी तरी मोठी माणसे आपल्या हातातल्या मोबाईलमध्ये प्रकट होतात. आपल्याला हवे ते सांगू लागतात. या दृष्टीने आपण फारच मोठे भाग्यवान... तंत्रज्ञानानं आणि आपल्या मागच्या पिढीनं आपल्यावर आभाळएवढे उपकार करून ठेवले आहेत.
पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का?
हे सारं विनामूल्य मिळत असतानासुद्धा अलीकडच्या काळात आपण त्याचा उपयोग करून घेणेच विसरत चाललो आहोत. मोबाईल हाती आला की असं काही दर्जदार शोधावं... अनुभवावर ऐकावं.... पाहावं... हे आता आपल्या ध्यानीच येत नाही. एकाद्या प्रपातासारखे प्रचंड वेगानं नुसता टाईमपास करणारे व्हिडीयो आपल्यावर कोसळत राहतात आणि आपण त्यात पार भोवंडून जातो. त्यात आपला वेळ पाण्यासारखा खर्च होतो आणि बहुदा हाती काहीच येत नाही.
मुलांकडे पाहा... ती तासन्सास एकच गेम खेळत राहतात. मोठ्यांनाही याचे भान उरलेले नाही. परवा एकाने एका गेमच्या साडेपाच हजार लेवल पूर्ण केल्याचे सांगितले. निव्वळ टाईमपास....
आणखी एक गोष्ट सांगू... आपण शोधायला जातो एक आणि पाहत राहतो भलतंच असंही होतं ना... हो.. होतंच.. सगळ्या जगानं आता हे मान्य केलं आहे.
म्हणून म्हणतो... मोबईल आचारसंहिता आपण तयार करायला हवी आणि ती अंगीकारायला हवी... आणि हे काम अन्य कोणी करणार नाही. प्रत्येकाने आपापले नियम करावे आणि पाळावे... किती वेळ... काय आणि केव्हा पाहत राहायचे याचा निवाडा केला म्हणजे... सारे सोपे होऊन जाईल... रात्र ही टाईमपास करण्याची वेळ नव्हे हेही लक्षात येईल... जागरण टळतील...
गेम खेळायला मोबाईल मिलाला नाही म्हणून मुलं आत्महत्या करू लागली आहेत. प्रोढ माणसंही मोबाईल हाताशी नसेल तर अस्वस्थ होऊ लागली आहेत. ही अस्वस्थता मानसिक आजार होऊन बसली आहे. ही टोकाची वेळ जर आपल्यावर येऊ नये वाटत असले तर आताच सावध व्हायला हवं. मोबाईल दुधारी आहे... त्याची दुसरी धार फार भयंकर आहे.. तेव्हा सावध व्हा... आपली आचारसंहिता बनवा आणि पाळा!
आपली नवी पिढा आपल्याकडे आपले अनुकरण करत असते... त्यांच्यासाठी तरी आपण ही अशी आचारसंहिता करून अंगीकारायला हवी! तुम्हाला काय वाटतं? पटतंय ना...?
2.
कथेचं गारूड
परवा जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन पाहायला गेलो होतो. चित्रकारासोबत उभ्याउभ्या गप्पा रंगल्या असताना तिथे त्यांचा दुरून आलेले मित्र मला म्हणाला, तुम्ही चांगले स्टोरी टेलर आहात...
माझ्या अंगावर मूठभर मास चढलं. आपल्याला चांगल्या पद्धतीने कथा सांगता यावी हे माझं अनेक वर्षांचं स्वप्न आहे. त्यामुळे हा अभिप्राय मला फारच मोलाचा वाटला.
खरे तर सर्वांनाच कथा आवडतात. कथा सांगण्याचं कौशल्य माणसाला माणसाशी जोडून देतं. शिवाय आपण आपल्याला गवसलेलं काही मौल्यवान दुसऱ्याला देण्याची वृत्ती या कथा सांगण्यातून वाढीस लागते.
बालपणी आजी-आजोबा गोष्टी सांगत. आजी छोट्या छोट्या अफलातून गोष्टी सांगत असे. आमचं बालपण त्या गोष्टींनी समृद्ध केलं. आयुष्यभरासाठी केवढे तरी मोलाचे संदेश त्या गोष्टींनी दिले. आजीची आठवणी त्या सगळ्या गोष्टी घेऊनच येते. आजोबांनाही गोष्टी सांगायला आवडत असत. आजोबा मोठमोठ्या गोष्टी सांगत. रंगवून... समरसून सांगत...
नामदेवाने दामाजीला गुरु केले त्याची गोष्ट असू दे किंवा मग राम सीतेच्या सुटकेसाठी श्रीलंकेला चालले त्याची गोष्ट... गोष्ट हा सोहळा असे.
आता बहुतेकांच्या घरात आजी-आजोबा राहिले नाहीत. त्यामुळे मुलांना गोष्टीच ऐकायला मिळेना झाल्या. काही व्यावसायिक कंपन्यांनी डिजिटल माध्यमातून गोष्टी आणल्या पण त्या आपल्या समाजात फारशा पोहोचल्या नाहीत. आणि पुढे कधी पोहोचल्या तरी त्याला मानवी स्पर्श नाही...
लाखो वर्षांच्या मानवाच्या इतिहासात मानवीजीवनात कितीतरी बदल झाले. पण गोष्टी सांगण्याची आणि गोष्टी ऐकण्याची त्याची भूक अज्ञाप शाबूत आहे आणि अनंत काळापर्यंत तीशााबूत राहील यात शंका नाही...
मोठ्या जनसमुदायासमोर गोष्टी सांगण्याची आपल्याकडे परंपरा आहे. पूर्वी म्हणे कथेकरी गावोगाव फिरून कथा सांगत. रामायण- महाभारतापासून ते एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या घरात घडलेल्या गोष्टीपर्यंत नानाविध गोष्टी हे कथेतरी विलक्षण पद्धतीनं खुलवून सांगत असत. आमचे आजोबा सांगत, कथेकरी गावात आला की एक एक गोष्ट आठ आठ दिवस सांगत असे. गाव त्याच्या गोष्टी ऐकण्यात रमून जाई.
मला अशा एखाद्या कथेकर्याला भेटायची इच्छा आहे.
मित्रांनो, कथा आपल्याला काय काय देते? कथा आनंद देते... कथा शहाणपण देते... कथा माणसं जोडून देते... कथा मानवी भावभावनांचे व्यवस्थापन करते. साहित्यशास्त्रात ज्याला कॅथर्सिस म्हणतात ते कॅथर्सिस करून देते.... म्हणजे आपल्या भावनांचा निचरा करून आपलं मन नितळ स्वच्छ करून देते...
म्हणून तर आपल्याकडे व पु काळे पु ल देशपांडे द मा मिरासदार शंकर पाटील अशी कितीतरी मंडळी कथाकार म्हणून नावारूपाला आली....
आज आपण नाटक, चित्रपट, वेब सिरीज, मालिका या सगळ्यांमध्ये जे पाहतो ते सारे कथात्मक असते. कथा कादंबऱ्यांचा वाचक हजारोच्या संख्येने अखंड वाचत आला आहे तो कथेच्या या विलक्षण गुणांमुळे होय...
आणि म्हणूनच आपण आपल्या तरुणांना प्रौढांना आणि कथा सांगायला हव्या...
एखादा निवृत्ती घेतोय असे मला म्हणाला की मी त्याला आवर्जून आता आठवड्यातून एक दिवस शाळेत जाऊन मुलांना गोष्टी सांग असे सांगतो.
शाळेला त्याचं महत्त्व कळणार नाही किंवा शाळेला वेळ नसेल... तर एखाद्या पारावर.. एखाद्या कट्ट्यावर किंवा तुमच्या घरात.... सोसायटीचा ऑफिसमध्ये मुलं जमूमवून त्यांना गोष्टी सांगा... यात तुमचं आणि त्यांचंही सौख्य सामावलेला आहे, हे लवकरच लक्षात येईल.
3.
नवी विकृती
आजचे जग हे सोशल मीडियाचं जग आहे. शहरापासून खेड्यापर्यंत सगळीकडे इंटरनेट पोहोचल्यावर आता देशभर कोट्यवधी लोक तासनतास सोशल मीडियावर असलेले दिसतात. सोशल मीडिया ही मोठी उपयुक्त गोष्ट आहे हे आता सगळ्या जगानं मान्य केलं आहे. दस्तूरखुद्द पंतप्रधान सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी जोडलेले राहतात, यावरून या माध्यमाची ताकद सहज लक्षात यावी. तुमच्या-आमच्या आयुष्यातही या सोशल मीडियाने मोठीच गंमत आणली आहे. आपल्या जगण्याचा दर्जा सुधारण्यात हा सोशल मीडिया महत्त्वाची पायरी ठरला आहे. अर्थात हे दुधारी शस्त्र आहे हे अनेकदा सांगून झालं आहे. ते जसं चालवावं, तसं चालतं. आज तुम्ही बसल्या जागी जगभरातील तुम्हाला हव्या त्या व्यक्तींची जोडले जाऊ शकता. त्यांच्याशी संवाद करू शकता. त्यांच्याकडून मदत मिळवू शकता आणि त्यांना मदत करू शकता. सगळं जग आता तुमच्यासाठी तुमच्या मोबाईल इतकं जवळ आलं आहे. म्हणूनच तर रत्नागिरीच्या एखाद्या खेड्यात राहणारा रसिक पुण्यात राहणाऱ्या लेखकाशी क्षणात जोडला जातो. नागपूरच्या चित्रकाराचे चित्र सोलापूरच्या चित्ररसिकाला घरबसल्या पाहता येतं. अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅली पोटापाण्यासाठी गेलेला एखादा इंजिनीयर दिल्ली बंगलोरच्या एखाद्या कलावंताची अखंड जोडलेला राहतो. विविध कलांची देवाणघेवाण अत्यंत सुलभ झाली आहे. मात्र हे सारं होत असताना आपल्याला काही गोष्टींचे भान मात्र आलेले दिसत नाही.
सोशल मीडियाच्या उदयापूर्वी सर्वसामान्य माणूस त्याच्या आयुष्यभर एका वेळी जास्तीत जास्त अडीचशे माणसांची जोडलेला असायचा. म्हणजे त्याच्या लग्नात, त्याच्या दुःखप्रसंगी धावून येणारे लोक हे साधारणपणे अडीचशेच्या आसपास असायचे. सोशल मीडियानं हा संपर्क अफाट वाढवला. उभ्या आयुष्यात दुसऱ्याला कधी चहाही न पाजलेला माणूस शेजाऱ्याच्या दमडीच्या कामालाही न येणारा माणूस या सोशल मीडियामुळे पाच जार माणसांशी जोडला गेला. कोणाच्या बाबतीत ही संख्या लक्ष-दशलक्षांच्या आसपास आहे आणि त्यामुळेच माणसाला माणसांची किंमत राहिली नाही. सोशल मीडियाच्या अकाउंटवरील कमेंट सेक्शनमध्ये गेलात तर माणसं एखाद्याला सहज अपशब्द वापरतात. मला वाटत राहतं, हा माणूस जर त्या माणसाच्या समोर आला तर या भाषेत बोलेल का?
ही किमान सभ्यतेची मर्यादा आपण सोशल मीडियावर फार विसरून गेलो आहोत आणि त्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जे सोशल मीडियावर आपण वागू लागलो आहोत ते आता प्रत्यक्ष आयुष्यातही उतरायला सुरुवात झाली आहे. म्हणूनच मग वेगवेगळ्या मंडळींच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ क्लिपमध्ये अत्यंत गृणास्पद वक्तव्ये एकयला मिळतात. अलीकडे प्रत्यक्ष कार्यक्रमातसुद्धा माणसं तशीच वागू लागली आहेत की काय असेही प्रसंग समोर यायला लागले आहेत. हे अत्यंत भयानक आहे. ही समाजात रुजू पाहणारी नवी विकृती आहे. या नव्या विकृतीचा अटकाव कसा करावा हा मोठा प्रश्न आहे. आपण समाजातल्या विविध प्रश्नांवर जनजागृतीच्या मोहिमा राबवत असतो, तशी एखादी मोहीमच आता याबाबत राबवावी लागेल. तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग इतका अफाट आहे की त्या प्रगतीसोबत जुळवून घेण्यासाठी माणसाला वेळच मिळेनासा झाला आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या वापराची नीती निर्माण होईपर्यंत तंत्रज्ञान कुस बदलतं आणि माणूस भांबावून जातो. हे सारंच आपल्याला नवं आहे. या सगळ्यावर एक अस्सल शहाणपण उत्तम उपाय ठरू शकेल. त्यावर आता आपण विचार करायला हवा. हे नवतंत्रज्ञानाच्या वेगावर स्वार होण्याचं शहाणपण आपण नव्यानं विचारपूर्वक अनेकांचे विचार लक्षात घेऊन निर्माण करायला हवं. ते आपल्या नव्या पिढीत रुजवायला हवं. तरच ही नवी विकृती आपल्याला मुळासकट उपटून टाकता येईल.
4.
समाजशीलता जपू या
माणूस समाजशील प्राणी आहे, हे आपण शिकत आलेलो आहोत. तसा अनुभवही आपण घेतलेला आहे. असं असताना पुन्हा ‘समाजशीलता जपू या’ असं आवाहन करण्याची वेळ काय येते?
अलीकडेच एका प्रसंगानं हे आवाहन करण्यास प्रवृत्त केलं. तब्येतीने कुरबूर सुरू होती, म्हणून फॅमिली डॉक्टरांकडे गेलो होतो. औषधं घेऊन त्यांच्या केबिनमधून बाहेर आलो तर रक्तबंबाळ झालेला एक माणूस त्याच्या पत्नीसोबत आत शिरला. दवाखान्यात एकदम गडबड झाली. कुणी पाणी दिलं. कोणी बसायला जागा दिली. डॉक्टरांना वर्दी देण्यात आली. माणूस थरथरत होता. तरुण होता. असेल तीस-पस्तीस वर्षांचा. तो इतका घाबरला होता की मला एक क्षण वाटलं याच्या खांद्यावर थोपटून त्याला आधार द्यावा. मी त्याचा खांदा पकडला आणि कुठे लागले याची चौकशी केली. चेहऱ्यावर आणि शरीराच्या संपूर्ण पुढच्या भागावर जखमा झाल्या होत्या आणि त्यातून रक्त येत होतं. तो शुद्धीवर होता. साधारण दोन-तीन मिनिटांपूर्वी मुख्य रस्त्यावर स्कूटीवरून नवरा-बायको दोघं तोंडावर पडले होते.
डॉक्टरांनी सिटीस्कॅन करावे लागेल सांगितले. म्हणून मी त्यांना विचारले, घरून कोणाला बोलवायचे का? फोन करू का? दोघेही एकदम म्हणाले, घरी फक्त वृद्ध वडील असतात. म्हटले, एखादा शेजारी येऊ शकेल का? त्यावरही नाही म्हणाले. नातेवाईक किंवा मित्र? तसाही जवळपास कोणी नाही.
परक्या शहरात राहताना एकही शेजारी, एकही नातेवाईक आणि एकही मित्र जोडून न ठेवणारी ही माणसे आपल्याला कुणाची गरजच लागणार नाही या मस्तीत जगत असतात. मराठीतले ज्येष्ठ कथाकार सुधीर सुखटणकर यांची ‘डिंक’ नावाची कथा आहे. त्यात दोघांनी कमवू.. दोघांनी मजा करू, मूलबाळाची जबाबदारी कशाला? अशी मानसिकता असलेल्या शहरातील नवतरुणांबद्दल लिहिले आहे. ही नव्या विचारांची तरुण मंडळी अडचणीत आली म्हणजे त्यांना आधाराला कोणीही असत नाही. जुन्या पिढीला मागास ठरवणारे हे लोक जुन्यापिढीकडून त्यांच्या काही चांगल्या गोष्टी घेण्याचेही टाळतात आणि मग कठीण प्रसंगात त्यांना रडायला दोन डोळे कमी पडतात.
म्हणून म्हणतो, आपण प्रत्येकानं समाजशीलता जपायला हवी. आपल्या घरची माणसं, शेजारची माणसं, आपले नातेवाईक, आपलं मित्रमंडळ, आपले कामातले सहकारी यांच्यासोबत चांगले संबंध ठेवणं हे आयुष्य सुंदर करण्यासाठी गरजेचं आहेत, शिवाय अडचणीच्या वेळी हीच माणसं धावत येत असतात. आपण सगळ्यांसोबत सदैव चांगले वागू शकत नाही. माणसाला शत्रू असणार... शत्रुत्व हा शापच आहे... त्याला घाबरू नये. कधीतरी वैर पत्करून काही गोष्टी कराव्या लागतात. त्या जरूर कराव्यात... पण म्हणून प्रत्येकाशी शत्रुत्व घेण्याची गरज नाही. निदान जेवढे शत्रू वाढतील... तेवढे मित्र वाढवण्याची तरी आपण जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यायला हवी. आपल्या चांगल्या दिवसांत वाईट दिवस असलेल्या मंडळींना आपण मदतीचा हात देऊ केला तर आपल्या वाईट दिवसांत ते हात आपल्या मदतीला येण्याची शक्यता असते. समाजशीलता जपायची ती यासाठी... आणि जर आपण आपल्यापुरते समाजशील झालो... तर सगळा समाजच सुंदर होऊन जातो, हे वेगळं सांगायला नकोच... तेव्हा मित्रांनो, आजपासून समाजशील जगण्याचा आरंभ करू या... ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत,’ हे आपण शाळेतच म्हणून ठेवलं आहे.
Wednesday, October 18, 2023
नवरूप देवी
माउली तू या जगाची
साऱ्या जगा संभाळिशी
दशभुजा तू लक्ष्मीमाते
भाविकाच्या पाठीशी
तू वरदा तू शारदा
तू सुखदायिनी माता
तू अवघ्या जगताची
अव्वल गं अभियंता...
ये शारदे वरदान दे
आरोग्य दे गं सर्वदा
तूच वैद्य आमुची
निवार सर्व आपदा...
तू सेवकाची सेविका
आधार तू या भाविका
वादळाच्या मध्यरात्री
विश्वास तू गं नाविका...
नृत्यांगणा तू आगळी
उपमा नसे तव नर्तना
दाविशी तू माऊली
नित्यनूतन विभ्रमा...
राबशी शेतात तू
अन्नपूर्णा माउली
तूच अंबे सुखावणारी
शांत शीतल सावली...
गृहलक्ष्मी तू सर्वदा
तू घराचा खांब ग
लेकरे आम्ही तुझी
तू पार्वती तो सांब गं...
तू विघ्नविनाशिनी सर्वदा
तू आदिमाता शारदा
तूच निर्मिशी भवानी
या जगाचा कायदा
नाना रूपे माते तुझी
तू जीवा आधार गं
आज तुझिया हातामधी
सर्व हे अधिकार गं...
- सुवर्णसुत 18/10/2023
Monday, October 2, 2023
संस्कृतचा नवनाट्यकर्मी प्रसाद भिडे
प्रसाद भिडे यांची दोनच शब्दांत ओळख करून द्यायची, तर ती ‘संस्कृतचा नवनाट्यकर्मी’ अशी करून देता येईल. त्यांच्या संस्कृत नाट्यशास्त्रातील कामगिरीची दखल घेत केंद्राच्या संस्कृत विद्यापीठाच्या भोपाळ येथील ‘नाट्यशास्त्र अनुसंधान केंद्रा’त अलीकडेच त्यांची ‘असोसिएट प्रोफेसर’ म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला नवा अवकाश मिळाला आहे. प्रसाद मूळचे देवगडचे. डोंबिवलीत त्यांचे बालपण गेले. वडील ‘नाट्यसंपदा’ संस्थेत होते. तो वारसा आणि शाळा-महाविद्यालयातून मिळालेले प्रोत्साहन यामुळे संस्कृतकडील त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण प्रवास सुरू झाला. १९९९ हे केंद्र सरकारने ‘संस्कृत वर्ष’ जाहीर केले होते. रुईया महाविद्यालयातील संस्कृत विभागाच्या
डॉ. मंजूषा गोखले यांनी ‘अखिल भारतीय कीर्तन महाविद्यालया’च्या संयुक्त विद्यमाने शिवाजी मंदिर नाट्यगृहात दोन संस्कृत नाटके सादर केली. त्यात प्रसाद यांना काम करण्याची संधी मिळाली. पुढे ‘युथ फेस्टिवल’मध्ये त्यांनी संस्कृत नाटक सादर करायला सुरुवात केली. त्यांनी ‘भगवदज्जुकीयम्’ हे संस्कृत प्रहसन सादर केले. या नाट्यप्रयोगाला द्वितीय पारितोषिक मिळाले. २००५ मध्ये त्यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले ‘को न याति’ हे नव्या समस्यांना नव्या पद्धतीने सामोरे जाणारे संस्कृत नाटक चांगलेच दाद मिळवून गेले. प्रभाकर भातखंडे हे प्रसाद यांचे गुरू. त्यांनी २४ नवी संस्कृत नाटके केली. गुरूचे बोट धरून प्रसाद यांनी तीन एकांकिका, तीन लघुनाटके लिहून त्याचे प्रयोग केले. नववर्षाच्या स्वागतयात्रेत चौकाचौकांत संस्कृत पथनाट्ये केली. त्यांनी लिहिलेल्या ‘देवशूनी’ या नाटकाला २०१८ मध्ये सर्वोत्कृष्ट लेखनाचा शासनाचा पुरस्कार मिळाला. याच काळात ते प्रायोगिक रंगभूमीवरही कार्यरत होते. ‘एका गुराख्याचे महाकाव्य’ हे महाकवी कालिदासाच्या जीवनावरील नाटक त्यांनी २०१३ मध्ये सादर केले. हौशी नाटक स्पर्धेत त्याला प्रथम क्रमांक मिळाला. प्रसाद यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचाही पुरस्कार मिळाला. २०१६ मध्ये या नाटकाचा अमेरिकेतही प्रयोग झाला. भारतातील तीन कलावंत आणि अमेरिकेतील सात कलावंत घेऊन ऑनलाईन तालीम करून हे नाटक सादर केले गेले.
प्रसाद यांनी आयआयटी मुंबईतून भाषाशास्त्रात पीएचडी मिळवली. नाटकांचे लेखन, दिग्दर्शन, संशोधन आणि प्रत्यक्ष अध्यापन अशी त्यांची आजवरची कारकीर्द आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी सात शोधनिबंध सादर केले आहेत. रुईया, सोमय्या महाविद्यालयांत ते प्राध्यापक होते. आता केंद्रीय संस्कृत विद्यापीठात कार्यरत झाले आहेत. भविष्यातील योजनांबद्दल प्रसाद यांची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. संस्कृत भाषा देशात सर्वदूर पसरलेली आहे. ज्या ज्या प्रांतात संस्कृत नाटके सादर होतात, तिथे तिथे तिथला तिथला रंग घेऊन ती सादर होतात, हे लक्षात घेऊन पुढील काळात विविध प्रांतांतील नाटक आणि लोककलांच्या माध्यमातून अभिजात संस्कृत नाटके सादर करावी, असा त्यांचा मानस आहे. यक्षगान, रामलीला या पद्धतीतून संस्कृत नाटकांचे सादरीकरण करणे, हे त्यांचे ध्येय आहे. त्यासोबतच वर्षातून एक तरी नव्या विषयावरील नवे नाटक लिहून नव्या पद्धतीने सादर करणे आणि आजच्या पिढीला संस्कृतशी जोडून घेणे हे आपले ध्येय असल्याचे ते सांगतात. अध्यापनासोबत संशोधन करताकरता साहित्यातील ‘टीका परंपरा’ पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला.
(2.10.23 रोजी दैनिक सकाळमध्ये संपादकीय पानावर प्रकाशित)
Monday, September 25, 2023
कसदार लेखक सीताराम सावंत
कसदार लेखक सीताराम सावंत
लेखक बदलत्या समाजमनाचा कानोसा घेत असतो आणि आपल्या साहित्यातून त्याची मांडणी करत असतो. मानवी जीवन अधिकाधिक सुखी व्हावे, यासाठी त्याच्या जीवनातील समस्यांचा वेध घेऊन भविष्याविषयी भाष्य करण्याची मोठी कामगिरी लेखक करीत असतो. लेखकाचे ते एक आद्यकर्तव्यच असते. अशा गंभीर वृत्तीने लेखन करणारे अलीकडच्या मोजक्या लेखकांपैकी सीताराम सावंत हे एक महत्त्वाचे नाव होय. बदलते ग्रामीण वास्तव आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून अचूक टिपणाऱ्या आजच्या या आघाडीच्या लेखकास अलीकडेच भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा श्रेष्ठ गद्यलेखक ना. धों. महानोर पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने हा लेखक आणि त्याचे लेखन सर्वदूर पोहोचण्यास नक्कीच मदत होईल.
सोलापूर जिल्ह्यात सांगली-सातारा जिल्ह्यांच्या सीमाभागात असलेल्या इटकी गावात सीताराम सावंत यांचे बालपण गेले. तिथेच प्राथमिक शिक्षण झाल्यावर आटपाडी येथे जाऊन त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात बी. ई. अर्थात अभियांत्रिकीची पदवी घेतल्यावर त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारली. साधारण याच काळात आपल्या विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून त्यांना एक गोष्ट सुचली आणि त्यांनी ती जमेल तशी लिहून काढली. तो काळ दैनिकांच्या जिल्हा पुरवण्यांमध्ये कथा छापून येण्याचा आणि कथास्पर्धांचा होता. त्यामुळे या पहिल्या कथेनंतर त्यांनी एका दिवाळी अंकाच्या स्पर्धेसाठी कथा पाठवली आणि तिला दुसरा क्रमांक मिळाला. नवलेखकासाठी ते मोठे प्रोत्साहनच होते. या स्पर्धेनंतर त्यांनी आणखी एक कथा लिहिली आणि मराठीचे जाणकार म्हणून एका शिक्षकाला दाखवली तर त्यांनी ‘हे कोठून कॉपी करून आणले आहे?’ असा प्रश्न केला. या प्रश्नामुळे दुखावलेल्या सावंत यांनी रागाच्या भरात आणखी कथा लिहिल्या. त्या काळात बेकायदा असूनही उघड उघड गर्भपात होत होते. त्या विषयावर त्यांनी लिहिलेली कथा सातारा आकाशवाणीला पाठवली. तिथे त्या कथेचे नाटिका रूपात सादरीकरण झाले आणि त्याचे मानधनही मिळाले. मग याच काळात म्हणजे २००४ च्या आसपास सावंत यांनी थेट ‘नामदार’ नावाची कादंबरीच लिहून टाकली. आता मागे वळून पाहताना ते म्हणतात… त्या सगळ्या लेखनात दर्जा नावाची गोष्ट नव्हती. उत्साहाने केलेले ते सर्व लेखन होते. साहित्यिकदृष्ट्या ते सारेच गौण स्वरूपाचे लेखन होते.
प्रा. शंकर बोऱ्हाडे आणि कवी संतोष पवार या जाणकारांच्या सहवासात आल्यावर सावंत साहित्याचा अधिक गांभीर्याने वाचन करू लागले. मराठीतल्या उत्तमोत्तम नियतकालिकांचे सभासद झाले. खऱ्या अर्थाने त्यांची साहित्यिक वाटचाल सुरू झाली. झपाट्याने वाचन करत त्यांनी मराठी साहित्याची परंपरा आणि समकाल समजून घेतला. त्याचे फलित म्हणजे त्यांची बदललेल्या ग्रामीण वास्तवाचा वेध घेणारी ‘देशोधडी’ ही कादंबरी वाचक आणि समीक्षकांच्याही पसंतीला उतरली. सावंत यांचे साहित्यक्षेत्रात एक गंभीर लेखक म्हणून नाव होऊ लागले. पोटापाण्यासाठी खेड्यातले लोक शहरात जाऊन राहू लागले आणि शहरातील गावगाडा त्यामुळे कसा बाधित झाला, याचे वर्णन या कादंबरीत आले आहे. त्यानंतर त्यांची ‘भुई भुई ठाव दे’ हा कथासंग्रह आला. शहरालगतच्या खेडेगावातील संस्कृती शहराच्या वाढीसोबत कशी लोप पावते, शहर आजूबाजूची गावे कसे गिळंकृत करत जाते, याचे वर्णन या कादंबरीमध्ये आहे. म्हणता म्हणता शेतकरी आणि शेतमजूर कसे गायब होत गेले, याचा संवेदनशील वृत्तांत त्यांनी या कादंबरीत मांडला आहे. या पुस्तकाने त्यांच्याकडून अपेक्षा आणखी वाढवल्या. साहित्यक्षेत्रात या पुस्तकाची चांगली चर्चा झाली.
राजन गवस, रंगनाथ पठारे, श्रीकांत देशमुख या समकालीन साहित्यिकांनी वेळोवेळी दिलेली दाद आणि परखडपणे केलेली टीका आपल्या साहित्यिक प्रवासाला उपकारक ठरली, असे सावंत मानत आले आहेत. विशेषतः श्रीकांत देशमुख यांनी जी रोखठोक मते मांडली ती आपल्याला चुका सुधारून पुढे जाण्यास कामी आल्याचे ते मानतात.
‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा त्यांचा एक महत्त्वाचा कथासंग्रह. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सीताराम सावंत यांनी आपल्या तिन्ही मुलांना उच्चशिक्षित केले आहे. कन्येच्या विवाहात त्यांनी ‘काव्यार्थ’ नावाचा समकालीन कवींचा प्राथमिक कवितासंग्रह संपादन करून त्याचे वाटप केले. भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने दिलेल्या पुरस्कारामुळे आता दडपण आणि जबाबदारी वाढली आहे, असे सावंत सांगतात. सीताराम सावंत यांच्या रूपाने एक कसदार लेखक मराठीला लाभला आहे.
Monday, September 4, 2023
Tuesday, July 25, 2023
असत्याचे प्रयोग
असत्याचे प्रयोग
- वैभव चाळके
पूर्वी एकदा विनोदातील कारुण्य पाहून अस्मादिकांचा जीव अगदी हळवा होऊ लागला होता. मग त्यांनी ‘हल्ली विनोद वाचताना डोळे भरून येतात...’ असा लेख लिहिला. आता मात्र अगदी त्याच्या उलट झाले आहे. गंभीर गोष्ट पाहिली म्हणजे अस्मादिकांना हसू यायला लागते. आता हा बेरोजगारीचा चार्ट पाहिला... खरे तर हा चार्ट पाहिला म्हणजे ढसाढसा रडायला हवे... पण अस्मादिकांना मात्र आता हसू आवरेना झाले आहे.
असत्याचेही प्रकार असतात. काही धडधडी असत्ये असतात. वाचणाऱ्याला-ऐकणाऱ्याला ती असत्ये आहेत हे वाचताक्षणी, ऐकताक्षणी लक्षात येते. दुसरा प्रकार आहे अर्धसत्याचा. म्हणजे इथे ‘नरो वा कुंजरो वा’ अशी भूमिका घेतलेली असते. जे सत्य आहे तेवढे सांगायचे आणि त्यामागे मोठे धडधडीत असत्य लपवायचे, असा हा प्रकार आहे. तिसरा प्रकार आहे आकडेवारीने सत्याचे रूप पालटून दाखवणे. हा तिसरा प्रकार मोठा भयानक आहे. मोठमोठ्या सत्ता मोठमोठ्या विद्वानांना हाताशी धरून या तिसऱ्या प्रकारचे असत्य लोकांच्या माथी मारत असतात आणि आपला कार्यभाग साधतात.
धडधडीत असत्य आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. ‘अभ्यास झाला’, ‘मी पहिल्यापासून मेहनती’, ‘आपल्याला नाही बाबा खोटे बोलता येत’ ही सगळी धडधडीत असत्ये आपणच जन्माला घातलेली आहेत, हे काय सांगायला हवे. (‘तुझ्यावर जीव ओवाळून टाकीन’ हे केवढे सुंदर असत्य आहे नाही, का?)
दुसरे अर्धअसत्य असते. महाभारतातील एक युद्धप्रसंग सुप्रसिद्ध आहे. पांडव आणि कौरव यांचे युद्ध टिपेला पोहोचलेले असते. कौरव विजयी होतात की काय अशी स्थिती निर्माण झालेली असते. अश्वत्थामा निकराने लढत असतो. आता तो लवकरच पांडवांवर विजय मिळवणार अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना नेहमी सत्य बोलणाऱ्या धर्मराजालाच खोटे बोलायला सांगितले जाते. तो खोटे बोलणार नाही असे सांगतो, तेव्हा हा दुसरा मार्ग वापरायला सांगितले जातो- वापरायचे ठरते. धर्मराज मोठ्याने आवाज देतो, ‘अश्वत्थामा मेला....!’ पुढे तो ‘नरो वा कुंजरो वा’ असे म्हणतो. म्हणजे माणूस अश्वत्थामा मेला किंवा अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला ते माहीत नाही. हे दुसऱ्या प्रकारचे सत्य होय. हे वरकरणी सत्य असते; पण आपल्या पोटात फार मोठे असत्य लपवत असते. तिसरे असत्य म्हणजे आकडेवरीने सत्याचा भास निर्णाण करणारे असत्य... कलियुगात या तिसऱ्या असत्याला मोठे ‘अच्छे दिन’ आले आहेत.
आता समोर असलेल्या बेरोजगार देशांच्या तक्त्यात भारत जगात सोळाव्या क्रमांकावर आहे. आपल्यापेक्षा शेजारी गरीब असला की आपले दिवस बरे जातात, त्या न्यायाने या यादीने दिलासा दिला. अन्यथा नाक्यानाक्यांवर बेरोजगारांच्या फौजा मोबाईल युद्धे खेळण्यात दंग झालेल्या आपण रोज पाहतो आहोत. परवा एक जण म्हणाला, मोबाईलमुळे एक झाले... शिकलेली मुले बिझी राहत आहेत. (कशात ते विचारू नका, असेही तो म्हणाला... पण ‘नरो वा कुंजरो वा’च्या पट्टीत) बालकृष्ण शेषनागावर उभा असावा तसा माझा देश मला उपरोक्त देशांच्या माथ्यावर उभा असलेला दिसू लागला. गंमत म्हणजे इटली आपल्यासोबत एकाच स्थानावर आहे. युवराज 'बेकार' असल्याने दोन्हीकडे एकच आकडा असावा काय, असा प्रश्न पडून गेला.
भारतात ७.८ टक्के बेरोजगारी असल्याचे हा तक्ता सांगतो. अर्थशास्त्रात अर्धबेकारी, सुप्त बेकारी असे प्रकार आहेत, त्याबद्दल यात माहिती मिळत नाही. मी याबद्दल आमच्या विद्याधर काकांना विचारले, तर म्हणाले, रेशन मिळाल्याने अनेक जण खूश आहेत, त्याबद्दलही माहिती नाही त्यात. मला हे पक्के पटले. पण हसूही आले. काका काही सांगितले की ‘मोदी बचाव’ भूमिकेत घुसतात. मागे एकदा वल्लभभाईंच्या सर्वांत उंच पुतळ्याची देशाला गरज होती काय, अशी चर्चा सुरू असताना काका म्हणाले, सगळ्या गोष्टी गरजेसाठी करायचा नसतात. (देशात करोडो तरुण बेकार असताना काकांना जी गरजेपेक्षा अधिक पेन्शन मिळते, ती गरज नसताना मिळते आहे, असे आम्हा सगळ्यांचेच मत असल्याचे आम्ही त्यांना अद्याप सांगितलेले नाही.)
नायजेरियामध्ये जगात सर्वाधिक बेकारी असल्याचे हा चार्ट दाखवतो. 33.3 टक्के इतकी बेकारी या देशात आहे. आपल्याकडे मुंबईच्या परिघावर गेली काही वर्षे नायजेरियन लोक मोठ्या प्रमाणावर दिसत आले आहेत. त्या बेकारीचा हा परिणाम असल्याचे हा तक्ता पाहिल्यावर लक्षात आले. मात्र आडदांड शरीरयष्टीच्या या लोकांपैकी एकालाही मेहनतीचे काम करताना कधी पाहिले नाही. पुढे ऑनलाईन फसवणुकीला आपण त्यांना जबाबदार धरायला लागलो होतो. मात्र ‘जमतारा’ चित्रपट आल्यावर ते सारे महान कार्य आपलेच देशबांधव करत असल्याची माहिती पुढे आली. प्रशिक्षक तिकडून मागवले होते का याची कल्पना नाही.
स्पेन आणि ग्रीस या दोन देशांत आपल्यापेक्षा अधिक बेकारी असल्याचे पाहून जीव सुखावला. आजवर या देशांची नुसती नावे घेतली तरी छाती दडपत असे. आता जर मला कोणी या देशातला नागरिक भेटला तर मी त्याला या एका मुद्द्यावर तरी शरम वाटायला लावू शकतो, याचा मला अत्यंत आनंद झाला. (उभ्या आयुष्यात मी कधी स्पेन आणि ग्रीसचा माणूस पाहिलेला नाही. पुढे तसा योग येण्याचाही संभव कमी असला तरी असली वाक्ये मनाला आणि लेखनाला उभारी देतात, हे लक्षात घ्यावे या ठिकाणी.)
गेले वर्षभराहून अधिक काळ युद्धाला तोंड देणाऱ्या युक्रेनमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणावर बेकारी आहे. अखंड युद्ध सुरू असल्याने देशात प्रचंड काम उपलब्ध झाले आहे; मात्र मोबदला मिळत नसल्याने बेकारी वाढली असावी, असे मला वाटून गेले. रोजगार हमी सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे; मात्र सरकारकडे पैसे नाहीत आणि रोजगार हमीत बेकारी दूर करण्याची क्षमता नसल्याचे त्यांना रोजगार हमी योजनेच्या जन्मप्रदेशातच आढळल्याचे कोणीतरी सांगितल्याचे कळते.
शेअर मार्केटच्या तक्त्यांइतकेच हे तक्ते ‘खरे’ आणि ‘उप-योगा’चे असतात, एवढे नोंदवून सावध करतो.
Wednesday, July 19, 2023
Thursday, February 23, 2023
वसंत बापट यांच्या 'फुलराणीच्या कविता'
वसंत बापट यांच्या 'फुलराणीच्या कविता'
मोठ्या नाही रमता येते बालकवितांच्या जगातशेजारी दारावरून जाताना म्हणाला, 'चाळके काय करताय?'
मी म्हटलं, 'वाचत बसलोय....'
'काय वाचताय काय?' त्याने उत्सुकतेने चौकशी केली.
मी हातातील पुस्तकाचे मुखपृष्ठ त्या शेजाऱ्याला दाखविले.
'मुलांच्या कविता वाचताय? अजब आहात बाबा तुम्ही!' असे म्हणत शेजारी हसतहसत निघून गेला.
मोठ्या माणसाने बालकविता वाचणे ही गोष्ट तुम्हालाही अजब वाटते का? अनेकांना वाटू शकेल. पण मी मात्र अलीकडे पुन्हा एकदा बालकवितांच्या प्रेमात पडलो आहे.
विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट हे मराठीतील तीन कवी जवळपास चाळीस पन्नास वर्षे सातत्याने लिहीत होते आणि गावोगावी जाऊन आपल्या कविता रसिकांना ऐकवीत होते. महाराष्ट्राला कविता ऐकण्याची सवय या तिघांनी लावली. तिघेही वैशिष्ट्यपूर्ण असे कवी होते. त्यांची स्वतःची शैली होती आणि त्यांनी वैविध्यपूर्ण कविता लेखन केलेले आहे. आजही मराठी कवितेचा इतिहास काढून वाचायचा तर या तीन कवींना टाळून पुढे जाता येत नाही. अवघ्या महाराष्ट्रात कविता घेऊन फिरलेले हे त्रिकूट त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणामुळेसुद्धा अत्यंत लोकप्रिय झाले होते. आता या तिघांपैकी कोणीही हयात नाही, पण त्यांचे साहित्य आजहीही रसिक आवडीने वाचत असतात. त्यांच्या या कवितेच्या सादरीकरणाचे ऑडिओ आणि व्हिडिओ प्रचंड लोकप्रिय आहेत.
या तिघांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या तिघांनीही अत्यंत सकस अशी बालकविता लिहिली. सांग सांग भोलेनाथ सारखे मंगेश पाडगावकरांचे बालगीत, छोटेसे बहिण-भाऊ उद्याला मोठाले होऊ सारखे वसंत बापट यांचे बालगीत मुलांना माना डोलवायला लावते. सर्कस वाला सारखी विंदा करंदीकर यांची दीर्घ बालकविता हसता हसता मुलांना विचारप्रवृत्त करते.
मंगेश पाडगावकर यांचे आधी बालकविता संग्रह महाराष्ट्रातल्या घराघरात आवडीने वाचले जातात. करंदीकरांचे परी ग परी सर्कस वाला पिशी मावशी राणीचा बाग हे बालकविता संग्रह मोठ्यांनाही पुन्हा पुन्हा वाचण्याचा मोह पाडतात. वसंत बापट यांचे चंगा मंगा तबडक तबडक आम्ही गरगर गिरकी फिरकी हे बालकविता संग्रहसुद्धा तितकेच वेड लावणारे आहेत.
अलीकडच्या काळात मला पुन्हा एकदा या बालकवितामध्ये रमावे वाटू लागले आहे. मुलासाठी म्हणून आणलेले हे संग्रह मी पुन्हा पुन्हा वाचत असतो.
लॉकडाऊनच्या काळात सगळी जुनी पुस्तके पुन्हा एकदा काढून चाळून झाली. त्यातील वसंत बापट यांचा फुलराणीच्या कविता हा बालकविता संग्रह आता माझ्यासमोर आहे. अतिशय सुंदर मुखपृष्ठ असलेल्या या संग्रहात उत्तम उत्तम बालकविता तर आहेतच, पण चंद्रमोहन कुलकर्णी यांनी काढलेली एकाहून एक सुंदर अशी चित्रे त्या कवितांना आणखीनच मोहक रूप प्राप्त करून देत आहेत. मुखपृष्ठावर एक चिमुकली गवतफुलांमध्ये असलेल्या एका काळ्याभोर खडकावर फुला फुलांचा फ्रॉक घालून बसली आहे. पाठीमागे एक मोठे झाड आहे. त्या झाडाच्या पार्श्वभूमीवर दोन पक्षी उडत आहेत. मागे डोंगर आणि त्यामागे निळं आकाश आहे. ही कन्या म्हणजेच फुलराणी आणि तिच्या या कविता.
चला तर आपण या कवितांचा आस्वाद घेऊ या. फुलराणीच्या कवितांमध्ये थोडा वेळ रमू या.
पट्कन् बटन् दाबल्यावरती
झट्कन् होते खुली
लालजांभळ्या जास्वंदीची
सुंदर जशी कळी
भाजीवाली कवितेमध्ये फुलराणी भाजीवाली होते आणि भाजी विकू लागते. त्या कवितेचा शेवट पाहा किती गोड आहे.
भाजीवाली करते कमाल
एक चॉकलेटला सगळाच माल
खर्री चॉकलेटं दोन दोन द्यावी
भाजीवाली उचलून न्यावी!
डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहणारी चिमुकली फुलराणी म्हणते,
आई तुला सांगून ठेवते शाळेत नाही जाणार
कॉलेजातच एकदम जाऊन मोठी डॉक्टर होणार
मी डॉक्टर झाल्यावरती कडू औषध बंद सर्दी खोकला काही होवो लॉलीपॉप देणार
बहिणी बहिणी ही बहिणीला लाडेलाडे चिडणारी कविता फार गोड आहे...
बहिणी ग बहिणी ग
आपण सख्ख्या बहिणी ग
भातुकलीच्या लग्नपुरत्या
भांडू विहिणी विहिणी गय!
जोडीच्या जोडीच्या
बहिणी-बहिणी जोडीच्या
झिंज्या ओढून झाल्यावरती
गप्पा लाडीगोडीच्या!
गट्टी ग गट्टी ग
पक्की अगदी गट्टी ग
तू आजारी पडल्यावरती
मीही घेते सुट्टी ग!
जोडी ग जोडी ग
जमली अपुली जोडी ग
मीच एकटी कशी शहाणी
तूच एकटी वेडी ग!
फुलराणीला प्रत्येक जण वेगवेगळ्या नावाने हाक मारतो. त्याबद्दलची एक कविता आहे, नावं तरी किती? नावाची. ती अशी आहे...
बाबा म्हणतात रंगी
आई म्हणते राणी
दादा म्हणतो चिमणाबाई
ताई म्हणते शाणी
आजोबांची वेडू
आजीची मी लाडू
कुठलं नाव ठेवू?
कुठलं नाव खोडू?
वर्गामध्ये वटवट केली
बाई म्हणतात टिटवी
हे आईला कळल्यावर
नवीन नाव सटवी!
एका छोट्या मुलीला
नावं तरी किती?
पुढे नवरा नाव बदलेल
ही आहेच भिती!
'इंद्रधनुष्य' ही संग्रहातली अठरावी आणि शेवटची कविता मोठ्यांनाही म्हणावी वाटेल अशीच आहे...
सात रंगांचं कारंज फुट्लं
इंद्रधनुष्य उगवलं म्हट्लं!!
सूर्य रडवेला
कुठे बाई गेला?
निळा निळा शेला
कुणी बाई नेला?
थेंबाथेंबाचे तोरण तुट्लं
इंद्रधनुष्य उगवले म्हट्लं!!
डोलतात फुलं
नाचतात मुलं
झुलतात तुरे
पळतात गुरे
वासरू होऊन वारं सुट्लं
इंद्रधनुष्य उगवलं म्हट्लं!!
झुला झुला झुला
सातरंगी झुला
झेला झेला झेला
रंग रंग झेला
आम्ही आनंद-भांडार लुट्लं
इंद्रधनुष्य उगवलं म्हट्लं!!
आणि मलपृष्ठावर श्रावणाची आरती आहे. कवी वसंत बापट यांनी अनेक गीते लिहिली आहेत. त्यांच्यातला गीतकार इथे श्रावण रंग उधळतो. या गीताचे शेवटचे कडवे पाहा केवढी सुंदर आहे...
गवतफुलांचा झुलतो ताफा
सुगंधी निश्वास टाकतो चाफा
नका भूईवर दण् दणा चालू
विस्कटू नका ग हिरवा शालू
गाऊ या नाचू या धरून ताला
आनंदाचा राजा श्रावण आला
जय रंग श्रीरंग, जय रंग श्रीरंग...
तुम्हाला काय वाटतं, बालकविता वाचतो म्हणून मला अजब म्हणणारा माझा शेजारी या कवितांमध्ये रमणार नाही? त्याचे सोडून देऊ... तुम्हाला आवडल्या ना?
- वैभव बळीराम चाळके
9702 723 652